धर्म समाज आणि परिषद
* धर्म, समाज आणि परिषद
(* लाहोर येथील ब्राह्मपरिषदेंतील मुख्य उपासना ता. २६ डिसेंबर १९०९ रविवारीं सायंकाळीं ब्राह्म मंदिरांत झाली ती कलकत्त्याचे भाई ब्रजगोपाळ नियोगी ह्यांनीं हिंदींत चालविली व त्यानंतर रा. वि. रा. शिंदे ह्यांनीं इंग्रजींत उपदेश केला त्याचा सारांश.)
काही काळापूर्वी धर्म आणि शास्त्र ह्यांमध्ये लढा पडला होता व आता ह्या दोहोंमध्ये समेट झाला आहे असे हल्ली मानण्यात येत आहे. पण ह्या समजुतीत एक प्रकारचा धोका आहे. कारण एक तर हा वरील लढा पडण्याचे पूर्वी धर्माचेच एकछत्री राज्य होते, त्याला आता शास्त्ररूपी जबरदस्त प्रतिस्पर्धी भेटल्यामुळे त्याच्याशी तडजोड करावी लागली आहे, ह्यामुळे धर्माचा एक प्रकारचा पराजयच झाल्याचा भास होत आहे. शिवाय शास्त्र अद्यापि होतकरू आहे व धर्माचे तर दिवस होऊन चुकले आहेत. म्हणून पूर्वीचे पारडे अगदी बदलून पुढे शास्त्राचेच एकछत्री राज्य होईल असा ध्वनी ह्या तडजोडीच्य वादातून निघत आहे. म्हणून समेटाच्या ह्या वरच्यावर गोष्टी सोडून देऊन आपल्याला धर्म आणि शास्त्र ह्यांचे प्रांत कसे भिन्न आहेत ते पाहिले पाहिजे. शास्त्राचा कोणताही प्रांत घ्या तो देश काळाच्या मर्यादांनी आखून टाकिला आहे. प्रकाश घ्या, त्याच्याभोवती अनंत अंध:काराचे अवगुंठन आहे. प्राण घ्या, तो अनंत मृत्यूच्या कोंदणात बसविलेला आहे. यावद्भवमात्र अनंत अभावाने व्याप्त दिसत आहेत. अज्ञानेनावृतं ज्ञातं तेन मुहयंति जंतव:| ह्या पदात वर्णिलेले आकुंचित ज्ञानच शास्त्राचे साधन जी बुद्धी तिचा विषय आहे. तिची शक्ती कितीही ताणली तरी अनंत अमर्याद वस्तूपर्यंत तिची मजल कदापि पोहोचणे शक्य नाही, तेथून तिला अप्राप्य मनसासह परत यावे लागणार. पण मनाची दुसरी जी अपूर्व शक्ती श्रद्धा तिचा मात्र ही अनंत अमर्याद वस्तू होऊ शकते. ह्या दृष्टीने पाहाता धर्माचा प्रांत शास्त्राच्या हल्ल्यापासून त्रिकाळ सुरक्षित आहे हे कळून येईल. धर्माचा हेतू आणि कामगिरी म्हणजे ह्या श्रद्धाशक्तीची नेहमी जोपासना करून तिचा उत्तरोत्तर शुद्ध विकास करणे हा होय. अर्थात ब्राह्मधर्माची तर ह्याहून दुसरी काही कामगिरी नाही.
आता धर्मसंघाची अथवा समाजाची कामगिरी काय ते पाहू. श्रद्धेचा विकास करणे हा जो धर्म ह्या पुरूषार्थाचा हेतू त्याला अनुसरून आजपर्यंत होऊन गेलेल्या किती धर्मसंघांनी किंवा समाजांनी आपली कामगिरी बजावली आहे बरे? शिंप्याच्या दुकानात ज्याप्रमाणे आयते तयार केलेले कपडे विक्रीला ठेवतात त्याप्रमाणे ह्या समाजात आयती मते व आयते आचार ह्यांचा माफक दराने सारखा क्रयविक्रय चाललेला असतो! ब्राह्मधर्माची ज्योत जागती ठेवावयाची असेल तर ब्राह्मसमाजाला हा नुसता दलालीचा धंदा करून चालावयाचे नाही. धर्मसमाजाचे काम आपल्या सभासदांपैकी प्रत्येक व्यक्तीला पूर्ण स्वतंत्र आणि स्वाधीन बनविणे हे आहे. त्याला कसल्याही धर्ममताखाली चिरडून टाकणे किंवा कर्मात कोंडून ठेवणे हे नव्हे. मते आणि आचार ही ख-या श्रद्धेला बहुधा मारक होतात, विरळाच प्रेरक होतात. ह्यावरून समाजाने व्यक्तिसाठी काहीच न करता त्यांना नुसते वा-यावर मोकळे सोडले म्हणजे त्या स्वतंत्र व स्वाधीन होतात सा अर्थ नव्हे. उलट समाजाची सभासदांसंबंधी मोठी जबाबदारी आहे. सभासदाची समाजासंबंधी जबाबदारी म्हणजे वर्गणी, अंगमेहनत आणि आगमन ह्यांत बहुतेक येते. पण समाजात जो अधिकृत वर्ग असतो त्याने सभासदांपुढे नित्य निरनिराळी मते प्रतिपादिली पाहिजेत, नवे नवे सिद्धांत शोधले पाहिजेत, सुंदर विधी आणि संस्कारांची शोभा दाखविली पाहिजे. पण ह्यांतील एकाचाही तिळमात्र आग्रह न केला पाहिजे. ठराविक मतांचा आणि विधींचा एकच साचा-मग ती कसलीही असोत, सभासदांच्या गळ्यात अडकविल्याने समाजाची इतिकर्तव्यता झाली असे निदान ब्राह्मसमाजाने तरी समजून चालावयाचे नाही. भिन्न भिन्न मते आणि प्रचार सभासदांपुढे अशा कुशल रीतीने ठेविले पाहिजेत की, त्यांची योग्य निवड करण्यास त्यांना मदत मिळेल. डॉ. किंग नावाचे अमेरिकन उपदेशक हिंदुस्थानात नुकतेच असे सांगून गेले की, मुलांना वर्तनाची योग्य निवड करता येईल अशी पूर्ण मदत करमे एवढेच काय ते पालकांचे कर्तव्य होय. इतर व्यवहारात अज्ञान मुलाशी पालकांचा जो संबंध आहे तोच धर्मबाबतीत संघांचा साधारण सभासदांशी आहे. ह्यावरून श्रद्धेचा विकास करणे हा धर्माचा उद्देश आहे, असे समजावे. म्हणजे ब्राह्मसमाजाचे मुख्य लक्षण स्वातंत्र्य किंवा व्यक्तित्व हेच होय. त्याशिवाय श्रद्धेची वाढ होत नाही, इतकेच नव्हे तर उलट लयच होतो असे इतिहास पुकारीत आहे.
आता परिषदेची कामगिरी काय आहे ती पाहू या. व्यक्तीला आपले व्यक्तित्व राखता येत नाही. ते वाढविण्याची तर गोष्ट राहो, ह्यासाठी संघाची जरूरी आहे, ही गोष्ट सकृतदर्शनी चमत्कारिक दिसते, पण खरा प्रकार असाच आहे. संघ जर आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावील तरच व्यक्तीचा विकास सुरळीतपणे होईल. पण जशी व्यक्तीला संघाची जरूरी तशीच संघाला परिषदेची आहे. एकाद्य ठिकाणचा समाज कितीही मोठा व चांगला असला तरी त्यालाही व्यक्तीप्रमाणे मर्यादा व उपाधी आहेतच व त्यामुळे त्याच्या कर्तव्यशक्तीला आळा पडतो व धर्माच्या अनंत उन्नतीला बाधा येते. म्हणून ठिकठिकाणचे समाज निदान आपल्या प्रतिनिधींच्या द्वारा नियमित काळी एकत्र व्हावेत हे जरूर आहे व स्वाभाविकही आहे. म्हणूनच प्रत्येक धर्माच्या इतिहासात वेळोवेली परिषदा भरल्या आहेत. पण आमच्या ठिकठिकाणच्या ब्राह्म व प्रार्थना समाजांमध्ये ही भावना अद्यापि व्हावी तशी मुळीच रूढ झाली नाही. *
असो. धर्म, समाज आणि परिषद ह्यांचे उद्देश अनुक्रमे श्रद्धा, स्वातंत्र्य आणि सहकार्य वाढविणे हे होते.