धर्मजागृती
[*सातारा येथील मित्रसंमेलनाकरिता रा.रा.वि.रा. शिंदे हे तेथे गेले असता समेलनासंबंधी त्यांचे “सामाजिक सुधारणा आणि हिंदी राष्ट्रीयत्व” ह्या विषयावर एक व्याख्यान झाले. त्याचा बराचसा सारांश तेथील प्रकाश पत्रात आला आहे. रा. शिंदे ह्यांची गावात आणखी काही धर्मासंबंधी व्याख्याने व्हावयाची होती. पण नुकतीच व्याख्याने फार झाली असल्यामुळे तूर्त तो बेत तहकूब करावा लागला. तथापि तेथील छावणीतील लष्करी लोकांकरिता सदरबाजारात ता. २५ मे १९०५ रोजी संध्याकाळी वरील विषयावर रा. शिंदे ह्यांचे व्याख्यान झाले. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की ह्या व्याख्यानाकरिता मंडळी जमविणे, खुर्च्या, बाके, दिवाबत्ती वगैरेंची व्यवस्था राखण्याचे सर्व श्रेय एका मुसलमान पेन्शनर सदगृहस्थाने व त्याच्या काही सजातीय मित्रांनीच संपादिले. दुसरी गोष्ट ही की व्याख्यानाला जागा नेमिली होती ती बाजारातील एका मुख्य चव्हाट्याच्या कोप-यावरील पोलीसचौकीत पोलीसच्या अगदी खुशीनेच मिळाली होती व बाहेर रस्त्यापर्यंत बाके मांडली होती. चौकीचे खांब वेलीफुलांनी सुशोभित केले होते. मराठा लाईट इन्फंट्रीतील डॉक्टर, सुभेदार, जमादार वगैरे अमलदार शिपाई, मुसलमान, पार्शि व इतर लोक ऐकण्यास आले होते.]
धर्मावर भाषण करण्याचे मला जरी वारंवार प्रसंग येतात. तरी बहुतेक ते सावलीत, सुखाने बसून विद्याव्यासंग करणा-या पांढरपेशांमध्येच असतात. आज मला देशसंरक्षणाचे पवित्र पण कठीण ब्रीद बाळगणा-या तुम्हा क्षत्रियांपुढे बोलावयाचे आहे म्हणून आनंद होत आहे. धर्माची जागृती म्हणजे काय व ती कशी ठेवावी हे सांगण्यापूर्वी मुळी धर्म म्हणजेच काय हे सांगणे अवश्य आहे. कित्येकांचे म्हणणे असते की, धर्मतत्त्वे ही समजण्यास अत्यंत गूढ, वेद वगैरे जुन्या ग्रंथासही त्यांचा पार लागला नाही, व अलीकडच्या शहाण्या लोकांनी ह्याबाबतीत ज्ञान होणे अशक्य आहे, असा शेरा दिला आहे, म्हणून ह्या भानगडीत मुळी पडूच नये हे बरे. उलटपक्षी यात्रा, पूजा, नवस केले, कित्येक पिढ्या चालत आलेले बरेवाईट कुळाचार निमूटपणे चालविले आणि भटभिक्षुक आणि नातलग व शेजारी ह्यांची समजूत केली की झाला सर्व धर्म. ह्यात जर का कोठे कसूर झाली तर इहलोकी आपण नास्तिक ठरू, वाळीत पडू व परलोकी नरक भोगू अशी भीती पुष्कळांस पडते. पण थोडा विचार केल्यास वरील दोन्ही प्रकार असमंजसपणाचे आहेत असे दिसून येईल. धर्माचे व्यवहारापुरते ज्ञान कोणासही होमे केवळ अशक्य आहे असे नाही आणि त्याचे खरे आचरण ठेवणेही वरप्रमाणे केवळ वरपंगी नाही. तर आपण धर्म म्हणजे काय हे अगदी सोप्या दृष्टीने पाहू या. पतिव्रतेचा धर्म काय, पतीची आज्ञा पाळणे व सुख साधणे, विस्तवाचा धर्म काय, जाळणे. काचेचा धर्म काय, तर पलीकडचे दिसणे. ही मजपुढे दिव्यावर जी काच बसविली आहे, तिच्यातून जर दिवा दिसला नाही, स्वत: काचच दिसू लागली, तर ती काच नव्हे. आपण त्याला दगड म्हणून हात लावल्याबरोबर थंडगार लागू लागला तर त्यास विस्तव न म्हणता बर्फ म्हणू. म्हणजे काय की, काचेने व विस्तवाने आपापला धर्म म्हणजे अंगचा अवश्य गुण सोडला असे होय. ह्याप्रमाणे व्यवहारात ‘धर्म’ शब्दाचा आम्ही अर्थ समजतो. हाच अर्थ आम्ही नेहमी ध्यानात धरला तर धर्माचा व्यर्थ वाढलेला कठीणपणा कमी होईल. इतर पदार्थांत व प्राण्यांत जसे त्यांच्या अंगचे अवश्य गुण आहेत, तसेच मनुष्यप्राण्यांतही जो गुण आहे त्यास आम्ही धर्म म्हणतो, तो गुण हा की, मनुष्य आदिकरून निरनिराळ्या ठिकाणी जे धर्म आढळतात, त्या सर्वांचा उगम जो ईश्वर त्याचे ज्ञान करून घेमे, त्यासच शरण जाणे व त्याने लावून दिलेली सेवा सांभाळणे, हा गुण इतर प्राण्यांत आढळत नाही आणि जर कदाचित काही माणसांतही हा गुण आढळला नाही तर त्याची वाढ अद्यापि मनुष्यदशेपर्यंत झाली नाही असे समजून त्यास खुशाल खालील प्राण्यांत गणण्यास काही हरकत नाही. म्हटले आहे :
आहार-निद्रा-भय-मैथुनानि |
समानमेतानि पशुभिर्नराणाम् ||
ज्ञानं ही तेषामधिको विशेषः |
ज्ञानेनहीनाः पशुभिः समानाः ||
ह्या ठिकाणी ज्ञान म्हणजे वर सांगितलेला गुणच होय, केवळ खाण्यापिण्याचे ज्ञान नव्हे. ह्याचेच नाव धर्म.
हा धर्म म्हणजे अर्थात एकच असणार. त्याची अनेक रूपे जरी जगात अनेक कारणांनी आढळत असली तरी त्या सर्वांचे मूळ स्वरूप वर सांगितलेले एकच असणार. ही सर्व रूपे ईश्वरास सारखीच प्रिय असली पाहिजेत. आम्ही मात्र त्याचे मूळ स्वरूप विसरू नये. ईश्वराचे राज्यात हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिस्ती असा खात्रीने भेद होणार नाही.
हल्ली इंग्रजांच्या राज्यात जर हा भेद पाळण्यात येत नाही, तर ईश्वराचे राज्य जे खात्रीने अधिक पवित्र असणार त्यात कसा पाळण्यात येईल! इंग्रजसरकार स्वत: ख्रिस्तीधर्माचे आहे. आपल्या धर्माची किंमत ते जाणत नाहीत असे नाही. पण आजपर्यंतच्या अनुभवाने ते जर, केवळ धर्म निराळा म्हणूनच एकाद्यास आपल्या दरबारात निराळी जागा न देण्याइतके शहाणे झाले आहे, तर देव काय त्यापेक्षा कमी शहाणा असेल की त्याच्या दरबारात असा भेद होईल! मग स्वत: देवच जर धर्मभेद पाळीत नाही तर मनुष्याने तो पाळणे किती सत्यास धरून होईल बरे? हे सत्य व धर्माचे मूळ स्वरूप लक्षात सतत बाळगणे म्हणजे धर्मजागृती, अथवा धर्म जागा राखणे असे होईल.
पण अलीकडे धर्मजागृती करणे याचा भलताच अर्थ होऊन बसला आहे. हिंदूने म्हणावे की, आमचाच धर्म सर्वात जुना, श्रेष्ठ आणि पवित्र म्हणून त्याचे जे हल्ली आचार आहेत त्यांचाच वरचष्मा राखू, मुसलमानांनी ह्याच्या उलट प्रयत्न करावे, व ख्रिस्त्यांनी तर ह्या दोघांनाही पुढे नरकवासच आहे असे भाकीत करावे, असा प्रकार चालला आहे. असे होता होता परधर्माची खूप निंदा करणे, त्यातील असतील नसतील ते सर्व दोष बाहेर काढणे व प्रसंगी दंगा माजविणे हेच धर्मजागृतीचे लक्षण झाले आहे. अशाने आम्ही कधी देवाकडे जाऊ? आम्ही येथे ह्या पोलिसचौकीत आहो ते जर समजुतीच्या चार गोष्टी बोलून एकमेकांचे हृदगत जाणू तर ठीक. पण जर का दंडेली करून एकमेकांतला नीच भाव वाढवू लागू, तर तत्काल हे पोलीसदादा आम्हा सर्वांस बाहेर घालवितील. असे आहे तर जन्मभर धर्माच्या नावाने वाद माजवून व तंटे वाढवून शेवटी ईश्वराकडे गेलो तर तो कसा आम्हांस आत घेईल बरे?
ब्राह्मसमाज अगर प्रार्थनासमाज जी धर्मजागृती करीत आहे ती अशाप्रकारची नव्हे, किंवा हल्ली चालू असलेल्या सर्वच धर्मपंथांत थोडे बहुत दोष आहेत म्हणून तेवढे दोषच दाखविण्याचेही काम समाज करीत नाही. तर सर्व पंथांत भरून असलेले मूळ स्वरूप उघडकीस आणून हल्ली सर्वांचा समेट करण्याचा व अखेरीस काच, अग्नी इत्यादिकांस वर सांगितल्याप्रमाणे जसा एकच धर्म, तसा मानवी अंत:करणाचीही ईश्वराकडे ओढ घेणे हा एकच धर्म आहे, असे सिद्ध करण्याचा समाजाचा प्रयत्न आहे. ह्या सातारा गावीही रा.रा.काळे, जव्हेरे वगैरे मंडळी हाच प्रयत्न करीत आहेत. धर्म जागा ठेवणे असल्यास तुम्ही सर्वांनीही त्यास मदत करणे जरूर आहे.