नाममंत्राचे सामर्थ्य
(रविवार ता. १७-३-१९११ रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या तिस-या जयंती निमित्त केलेल्या उपदेशाचा सारांश.)
नाममंत्र आहे सोपा । अविश्राम चाळी पापा ।।
जो का निश्चय धरील । नाम तया उद्धरील ।।
नर नारी कोणी याती । नाम ठेवे एके पंक्ती ।।
तुका म्हणे या नामाने । कृपा केली भगवंताने ।।
आता ज्या साधूचा अभंग गाईला त्या तुकाराम महाराजांच्या चरित्राची कालच (ता. १६ रोजी) आपण ओळख करून घेतली. ते कसे वाढले, संसारात असताना त्यांनी कसे दिवस काढले, ईश्वराच्या सेवेत ते कसे राहिले, लोकांस त्यांनी सन्मार्ग कसा दाखविला, संकटास त्यांनी कशी पाठ दिली, शत्रूंशीही ते कसे वागले वगैरे अनेक महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान आपण करून घेतले आहे. असे जे साधूंत श्रेष्ठ साधू तुकाराम महाराज त्यांनी सर्वकाल भजनात, देवाच्या सेवेत घालविला हे खरे. पण, त्यांनी आमच्यासाठी मागे काही निरोप ठेविला आहे काय, काही आनंदाची बातमी, काही विश्रामाचे स्थान, संसारात असताना काही समाधानाची जागा असे काही ठेविले आहे, किंवा काही शुभ वर्तमान गाजविले आहे काय, असे वारंवार मनात येते. त्यास ह्या अभंगात संपूर्ण उत्तर मिळणार आहे. होय. तुकाराम महाराजांनी आपल्या मागे मोठा निरोप ठेविला आहे, आनंदाची बातमी आम्हा सर्वांच्यासाठी ठेविली आहे. तथा थकलेल्या भागलेल्यास विश्रांतीचे स्थान ठेविले आहे. आम्ही मात्र आपली तयारी केली पाहिजे. आणि हा निरोप, ही बातमी, हे शुभवर्तमान सर्व काही, ह्या एका अभंगामध्ये भरून आहे. ह्या अभंगाच्या प्रत्येक ओळीमध्ये हे आनंदाचे वर्तमान ओतप्रोत भरलेले आहे. त्याचा स्वीकार करण्याची मात्र आमची तयारी पाहिजे. पहा ह्या अभंगाच्या द्वारे तुकोबा काय संदेश पोहोचवीत आहेत तो !
मनुष्यजन्माचा किती थोर अधिकार आहे ! मनुष्यजन्म प्राप्त होणे म्हणजेच आमची जणू काय पापापासून मुक्तता होणे आहे. परंतु असे असून ह्या मुक्तीच्या, ह्या पापविमोचनाच्या गोष्टी सांगावयाच्या सोडून आम्ही अधिकाधिक पापात पडतो आणि रात्रंदिवस पापाच्याच गोष्टी सांगतो ! इतर प्राणी पुष्कळ आहेत, सर्प आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, दुसरे अनेक हिंस्र पशू आहेत, पक्षी आहेत, त्या सर्वांना आत्मे आहेत. पण त्यांना मन नाही. त्यांच्या ठिकाणी स्वतःच्या संबंधाने काही जागृती नाही. काही जाणीव नाही. यातना होत असल्या तरी कालच्या यातनांची आज आठवण नाही, उद्याविषयीची कल्पना नाही. आम्हांला मन मिळाले आहे, आम्हांला बुद्धी आहे. पापदग्ध करून टाकणारा हा अमोलिक मनुष्यजन्म सापडला आहे. आणि आम्ही त्याचे सार्थक करून घेत नाही. देवाच्या नामाचा हा सोपा मंत्र जणू काय सापडला असून त्याची आम्ही हेळसांड करतो, पापकर्माचा इतका ढीग करतो, परस्परांच्या हेव्यामध्ये इतके गुंततो, संशयाने आपली मने इतकी दूषित करून घेतो, मत्सराने इतके वेडावून जातो, ज्ञानी असून अज्ञानाचा इतका पसारा मांडतो, प्रेम-निष्काम प्रेम-करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये ठेविले असून सूड घेण्याच्या बेतामध्ये इतके गुंग होतो की त्यामुळे अगदी हिंस्र, अगदी क्रूर, अधिक कृतघ्न, अधिक दुष्ट होतो व आपल्या थोर अधिकारास मुकतो ! हे पाहून तुकोबा सांगताहेत असे भांबावू नका, असे सैरावैरा पळू नका. हा नाममंत्र अगदी सोपा आहे. दुसरे लोक जादू टोण्याचे मंत्र पुष्कळ सांगत असतात. परंतु त्या सर्वांहून हा मंत्र सोपा आहे, ह्याचे सामर्थ्य अपार आहे. तुम्ही कितीही अपार पापे केलीत, पापांचे ढीग रचिलेत तरी एका क्षणामध्ये त्यांची राख करून टाकणारा हा मंत्र आहे ! एके बाजूला तुमची अपार पापे आणि दुस-या बाजूला प्रेमाची मूर्ती पण परम सामर्थ्यवान परमेश्व असा हा संबंध आहे. त्यामुळे त्या देवापुढे तुमच्या पापांचा तो काय टिकाव लागणार आहे ? मात्र तुम्ही ह्या सोप्या नाममंत्राचा निश्चयाने आश्रय केला पाहिजे. हा धर्म नवीन आहे म्हणून बुझून जाऊ नका. कोणतीही संकटे आली, कसेही प्रसंग आले तरी देवाचे नाव सोडावयाचे नाही, देवाच्या सेवेला मुकावयाचे नाही त्याचा जो हा मार्ग त्याच्यापासून एक रतिभरही मागे सरावयाचे नाही अशा निर्धाराने, अशा दृढ निश्चयाने ह्या संसारात फिरा, कर्मे करा, वावरा, आनंदाने रहा, सेवेत रत रहा म्हणजे पहा तुमच्या हातून कितीही पापे झाली असली तरी एका क्षणामध्ये ती दग्ध होतील. मात्र तुमच्या ठिकाणी निश्चयाचे बळ असले पाहिजे.
असा ज्यांचा जागता निश्चय आहे, असे ज्यांचे बळ आहे, ते पुरुष आहेत की त्या स्त्रिया आहेत, ते उच्च जातीचे आहेत की ते खालच्या वर्गातील आहेत, ते भाग्यवान की भाग्यहीन आहेत, ते श्रीमंत आहेत की गरीब आहेत, ते अधिकारी आहेत की नाहीत, ह्याचा मग विचार नाही. हे देवाचे नाव सर्वांना एका पंक्तीला नेऊन बसविते. उच्चनीचपदाचे भेद आम्ही क्षुद्र मनुष्यांनी केलेले. धन द्रव्याचे भेद हे निरनिराळ्या कारणांचे, निरनिराळ्या परिस्थितीचे परिणाम होत. नाममंत्राच्या आवारात त्यांचा प्रवेश नाही. तेथे सर्वांची पंगत एक, सर्वांची जात एक, सर्वांचा धर्म एक, मात्र आमचा निर्धार पाहिजे. आमचा निश्चय जितका बलवान तितका ह्या मंत्राचा परिणाम अधिक सुस्पष्ट आमच्या अनुभवास येतो. ह्या निशचयाची, ह्या निर्धाराची, मनाच्या तयारीची आपणाला दोन उदाहरणे सांगतो. गौतमबुद्धांनी लोकांस नवीन वाटणा-या धर्माची स्थापना केली. लोकांना ज्या गोष्टी नवीन वाटत होत्या त्या त्यांनी मोठ्या निर्धाराने प्रचारात आणल्या. पुरातन मार्गाचा त्याग केला. तो मार्ग खरा नव्हे असे सांगत सांगत ते संचार करू लागले. त्यामुळे त्यांस ज्याप्रमाणे अनुयायी मिळाले त्याचप्रमाणे अनेक शत्रूंचीही जोड त्यांना लाभली ! त्यांच्या शुभवर्तमानाच्या योगे ज्यांची चित्तवृत्ती अगदी क्षुब्ध झाली होती, त्यांना हा नवा धर्म अधर्म आहे असे वाटत होते. असे एक गृहस्थ एकदा गौतमबुद्धांपाशी गेले आणि त्यांनी त्यांस मनसोक्त शिव्या देण्यास प्रारंभ केला ! त्यांची त्यांनी वाटेल तशी निर्भर्त्सना केली ! परंतु त्याचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही ! आम्हांला कोणी एक शिवी देणार असे वाटले की, ती त्याच्याकडून स्पष्टपणे बाहेर येईल अशी आमची वृत्ती होते. मग त्याने एक दिली तर आमच्या दोन होतात, त्याच्या सहा तर आमच्या बारा असे होऊन आम्ही दोघेही जिवंत नरकवासामध्ये लोळू लागतो ! परंतु बुद्धाची ही अशी वृत्ती पाहून त्या ब्राह्मणास मोठा अचंबा वाटला. इतक्या शेलक्या शिव्या दिल्या, इतकी निर्भर्त्सना केली, तरी हा बुवा काही खवळत नाही, ह्याची चित्तवृत्ती क्षुब्ध होत नाही, ह्याची शांती आहे ती आहेच. हे पाहून तोच उलट अधिक क्षुब्ध झाला व म्हणाला, मी इतक्या शिव्यांची लाखोली वाहिली, इतकी निर्भर्त्सना केली, तरी त्याचा आपल्यावर काही परिणाम नाही. आपली पूर्वीची शांती आहे ती आहेच, हे कसे ? बुद्धदेव म्हणाले, “आपल्या होत्या नव्हत्या त्या सर्व शिव्या, सर्व शाप संपले ना ? नसल्यास आणखी चालू द्या. माझे उत्तर अगदी साधे आहे. पहा, कोणी मोठ्या प्रेमाने जर आपल्याला काही भेट आणली, पण त्या भेटीचा जर आपल्याला स्वीकार करावयाचा नसला, तर ते भेटीचे ताट आपण परत करतो, त्याचप्रमाणे मीही करीत आहे. आपली ही मला भेट आहे, हे ताट माझ्यापुढे ठेविले आहे पण ते मला नको आहे, मी त्याचा स्वीकार करीत नाही. आपण ते आणले आहे तसे आपले परत न्या. ते आपले आपल्याजवळच ठेवा !” कोण हा निश्चय, कोण ही शांती ! एकार्थी अशा प्रकारच्या साधू पुरुषाची निर्भर्त्सना करणे हे देखील मोठे पुण्य आहे ! कारण अशा साधूचा प्रत्यक्ष सहवास झाला म्हणजे मग आपली आतील पापे सगळी धुवून निघून आम्ही शुद्ध होतो !
हा असा निश्चय किंवा ही अशी निर्धाराची वृत्ती एकट्या गौतमबुद्धांचीच होती असे नव्हे. त्यांच्या शिष्यांनाही असेच साधन केले होते. एकदा एक शिष्य धर्मप्रचारास जाण्याची परवानगी मागू लागला. त्याची गौतमांनी अनेक प्रकारे समजूत केली, त्याचा निश्चय पाहिला. हा मार्ग नवीन आहे, लोक निर्भर्त्सना करतील, शिव्या देतील असे समजून मी समाधान मानून कामास लागेन असे बुद्धांनी सांगताच मला त्यांनी मारले नाही असे शिष्याचे उत्तर आले ! ‘पण तुला मारही बसण्याचा संभव आहे’ असे गुरूंनी म्हणताच, त्यांनी मला जिवे मारले नाही असे पाहून मी पुन्हा प्रचाराच्या कार्याला लागेन, असे शिष्याने सांगितले. ‘अरे बाबा, हा मार्ग इतका बिकट आहे, लोकांना इतका नावडता आहे की, ते खवळून जाऊन तुझा प्राणही घेतील’ असे बुद्धदेव म्हणाले. “तर मग ह्यापेक्षा आणखी काय पाहिजे ? लोकांना सन्मार्गाचा उपदेश करीत असता, लोकांच्या सेवेमध्ये असताना मला मरण आले तर ती माझी थोर पुण्याई, तर आता मला आपण मागे ठेवू नका, मला जाऊ द्याच. आपल्या कार्याला लागू द्या”. अशा शिष्याला मागे कोण ठेवणार त्याला नको जाऊ म्हटल्याने तो काय मागे रहाणार !
सारांश अशा प्रकारच्या निश्चयाने ह्या महामंत्राचा आम्ही स्वीकार केला, तर आमच्या अखिल पापांचा तत्काल नाश होईल. आमच्या सहवासाने इतरांच्या, ठिकाणी जागृती होईल. तर त्याचा स्वीकार करिताना आपण गरीब आहो, आपण स्त्री आहोत, आपण हीन जात म्हणून गणलेल्यांपैकी आहो, आपण अज्ञान आहो, आपण आधीच पापराशी आहो, असले विचारच मनात आणावयास नको. एकदा ह्या मंत्राचा स्वीकार करून निश्चयाने आम्ही वावरू लागलो की त्याचे कार्य दिसते, सर्व भेद नष्ट होतात, सर्व दोष नष्ट होतात, आपण शुद्ध होतो, आपण इतरांस शुद्ध करतो, आपण तरतो, इतरांस तारतो, असा हा नाममंत्र आहे, असा त्याचा महिमा तुकोबांनी आपल्याला सांगितला आहे तो आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करू या.