बंगलूरच्या रस्त्यांतील एक फेरी
(सुबोधपत्रिका. २७-१२-१९०३)
ता. २७ रोजी सकाळी ७ वाजता कॉफी आटपल्यावर ब्राह्मबंधु-स्वामी मजकडे आले व आम्ही दोघे मिळून शहर पाहण्यास निघालो. युरोपीय शहरांचा देखावा स्मृतिपटलावर अद्यापि ताजा असल्यामुळे त्याच्या तुलनेने आजच्या देखाव्याचे मला विशेषच कौतुक वाटू लागले. हिंदुस्थान म्हणजे रशिया खेरीज करून बाकीच्या युरोपाप्रमाणे एक खंडच आहे, असे म्हणतात ते पुष्कळ दृष्टीने खरे आहे. उत्तर युरोपातून आल्प्स् चढून खाली दक्षिणेस इटालीत उतरल्यावर पाहणारास जी देखाव्याची पालट दिसते तीहूनही जास्त मला येथे दिसू लागली. दक्षिण युरोपात जुन्या ग्रीक व लॅटिन सुधारणांच्या सांगाड्यावरून आधुनिक सुधारणेचे मांस भरलेले तर काही ठिकाणी नुसता रंग चढलेला पाहून इतिहास भक्तास जो विस्मय वाटण्यासारखा आहे त्याहून अधिक दक्षिण हिंदुस्थानात वाटतो-निदान मला तरी वाटला. आज सकाळच्या फेरीत रस्त्याने मला जागोजाग एक ना दोन, चार सुधारणा आढळल्या- द्रविडी, आर्य, मुसलमानी, इंग्रजी. मोठी मौज ही की, काही ठिकाणी चारींची बेमालूम भेसळ होऊन गेली आहे तर काही ठिकाणी एकीवर दुसरीची, दुसरीवर तिसरीची अशी पुटे बसलेली आहेत. रस्त्यात जाणा-या येणा-याकडे नुसते घटकाभर निरखून पाहिले तरी बस्स, मानवजातिशास्त्राचे एक दोन धडे सहज समजतात. काळा वर्ण तर सांगावयास नकोच. पण बसके नाक, पसरट तोंड, लोंबते ओठ, एकंदरीत बावळी व राकट मुद्रा ही खालील वर्गाची साधारण चेहेरेपट्टी पुष्कळ ठिकाणी उच्छ वर्णासही लागू पडते. जातिभेदाचे ठराविक नियम अद्यापि जरी महाराष्ट्रातल्याहीपेक्षा अधिक कडकपणे इकडे पाळले जात आहेत तरी, आर्य आणि अनार्य ह्या नैसर्गिक वर्णांचा संकर कधीच होऊन गेला आहे हे उघड दिसते. हल्लीच्या अय्यर, अयंगार, राव, कोमटी, मुदलीयार, नायडू, बक्कलग्यार, कुरूबर, पारिया इत्यादी जाती, हिंदुस्थानच्या इतर भागातल्या जाती आणि वेदांतल्या चार जाती ह्यांचा कसा काय मेळ बसवावा ह्यासंबंधी घोटाळा रस्त्याने जाता जाता मनात माजत असे. ह्या घोटाळ्यात मन आहे तोच एकादी पारिया (महार) बाई (तिने स्वत: अगर तिच्या बापाने ख्रिस्तीधर्माचा स्वीकार केला असल्यामुळे) मडमसाहेबासारखा पोशाख करून एकाद्या दुकानात शिरताना दिसे आणि मुख्य शेटजी तिला खडी ताजीम देऊन आपल्या सर्व जिनसा दाखविण्यास पुढे पुढे करीत. इकडे तिचा जातिबंधूच पण ‘स्वधर्मे निधनं श्रेय:’ म्हणून परधर्माला भिणारा एकादा पारिया गटारावरच उभा असलेला दिसे. असो.
ह्याप्रमाणे....स्वामींशी इंग्रजीत बोलत, स्वामींचे शब्द मात्र इंग्रजी पण उच्चार अस्सल तामिळी व कित्येक ठिकाणी वाक्यरचनाही तीच! इकडे वरचेवर लक्ष जाई पण गेल्यासारखे दाखवीत रस्त्याने चाललो असता ह्या द्राविडी शहराची अस्ताव्यस्त शोभा नजरेत भरू लागली. भक्कम वर्तुलाकारमध्ये झिजलेल्या खांबांच्या रांगा, गुळगुळीत चुनेगच्चीच्या थंडगार ओट्या, स्वच्छ धुतलेली दगडी आंगणी, त्यांवर घातलेल्या रांगोळ्या, मधूनमधून लहान लहान शेणाच्या गोळ्यांत रोवून ठेविलेली भोपळ्याची फुले, (मला वाटते लक्ष्मीची आवडती जी कमळे त्यांच्याऐवजी ही असावीत) किंचित् आखूड पण भक्कम लाकडी दरवाजे आणि अंबरठे आणि त्यांवर ओढलेले हळदीकुंकवाचे पट्टे वगैरे पाहून खरोखर आल्हाद होत असे. आणि स्वच्छता व नीटनेटकेपणा ह्या गुणाने पाश्चात्यांनी आमच्यापुढे विशेष घमेंड मारू नये असे वाटू लागते तोच, ह्या स्वच्छ घरापुढच्या गलिच्छ गटारात केवळ सार्वजनिक हलगर्जीपणाची हेंदर साचली होती आणि कित्येक ठिकाणी तर स्वत: गटारांचाच हमरस्त्यात लोप होऊन गेला होता ते पाहून वरील तुलनात्मक बाबीत पुन: विचार करणे भाग पडे. नागरिक नीटनेटकेपणा राखण्याची जबाबदारी सर्व नगरावर आहे, आणि ती सक्तीने पाळण्याचे काम नागरिक अधिका-याचे आहे हे काही नुसते सरकाराबरोबर भांडून आम्हांला कळण्यासारखे नाही. आमच्या रस्त्यांत सुंदर इमारती नाहीत असे नाही. चालता चालता एका चौकात आल्याबरोबर आडगल्लीतल्या लाल मसजीद नावाच्या एका सुंदर मुसलमानी उपासनामंदिराकडे माझी नजर गेली. मंदिराची मासेलवाईक बांधणी आणि रसिक सुबकता मनात एकदम भरल्यामुळे ते नीट पाहिल्याशिवाय पुढे पाऊल पडेना. ते सर्व पाहून बाहेर पडल्यावर बाजूचा दरिद्री व घाणेरडा देखावा पाहून चमत्कारिक हिरमोड झाला. एका बाजूस बुरूडांनी आपल्या उंच वेळूंची भलीमोठी जुडगी आणि तट्ट्याची भेंडोळी मशिदीला लागूनच ठेविली होती. ती मशिदीहून उंच दिसत होती आणि जवळ त्यांच्या तक्रारी, व्यापाराचा गलबला चालला होता. मशिदीच्य दारातच मिठाईवाल्याची भजी तळण्याची एक जंगी कढई कढत होती. आणि हा खाण्याचा माल, विकणा-याची मूर्ती व तिचा पेहराव ही दोन्ही कढईपेक्षाची काळी कुळकुळीत दिसत होती. दुस-या बाजूस कोळसेविक्यांची दुकाने लागली होती. ह्या प्रकारे ह्या मशिदीच्या सौंदर्याची व सात्विकतेची चोहोंकडून हलाखी चाललेली पाहून सादृश्यामुळे चटकन माझ्या मनात निराळेच विचार आले. जो आमच्या रस्त्यात हा प्रकार नित्य चालला आहे. त्याहून ओंगळ प्रकार आमच्या धर्मात नाही का चालला? धर्मात किती शुद्ध, सात्विक व सुंदर तत्त्वे आहेत, धर्माच्या इतिहासात किती थोर प्रयत्न झालेले आहेत आणि त्या सा-यांवर आता भलत्याच गोष्टींचे किती कठीण वेष्टण पडले आहे आणि कोण गवगवा माजला आहे! लाल मशिदीची काळजी काजीसाहेबास असावयाला पाहिजे खरी. तथापि त्यांनी आपले काम केले नाही अगर त्यास करता आले नाही म्हणून एकादा म्युनिसिपालिटीचा कामगार येऊन केवळ रस्त्यातील शोभेची नाहक हानी होते ती न व्हावी ह्या हेतूने, मशिदीच्या दारातल्या भल्या मिठाईवाल्यास आपले दुकान तेथून उठविण्यास ताकीद देऊ लागला तर त्यास काजीसाहेब खात्रीने अनुकूल होतील काय? ते काही असो, काजीसाहेबाचा व दुकानदारांचा अंतस्थ संबंध काही असो किंवा त्या मशिदीचे काही होवो, सध्या धर्मात जी बाजारी लोकांनी चोहीकडे धुमाकुळ उडवून दिली आहे ती निवारण करणारा कोणीतरी चांगला खवीस आला पाहिजे खास. जेरूसलेमच्या देवळात नित्य जमून गिल्ला करणा-या सराफांना येशूने एकदा पार धुडकावून दिले होते. असे कित्येकांना कित्येकदा केले आहे तरी हे सराफ पुन: जमतात. त्यांना वेळोवेळी हुसकून लावण्याची योजना झालीच पाहिजे. दुसरा इलाज नाही.
ह्या प्रकारें ह्या दक्षिणेंतील शहरांत हिंडत असता द्रविडी देवळांची पसरट व बोथट शिखरे ख्रिस्ती चर्चची गाथिक निमुळती स्पायर्स, मुसलमानी मशिदीचे पांढरे शुभ्र मनोरे ह्या
सा-यांचे एकच विसंगत चित्र नजरेस दिसू लागले. एकादा अस्सल आर्य, कडकडीत सोवळा, अर्धा उघडा, मानेवर लांब शेंडीचा झुपका लटकत असलेला असा आयंगार आपल्या वाटेत एकादी गरीब पारियाबाई जिच्या एकंदर शारीरिक व मानसिक विकासावरून पाहता ती हिंदुस्थानापेक्षा आफ्रिकेत राहण्यास योग्य दिसत आहे......आली म्हणून तिजवर डोळे वटारीत आहे तोच मागून एक बाईसिकल घंटी न वाजता एकदम आलेली पाहून पारियाबाई व आपण दोघेजण गटारावर उभी राहतात, व एकादा सोजीर बेगुमान दौडत जातो. एकादा अर्धवट शिकलेला अंडरग्राजुएट पायात जोडा वरती पाटलून घालून कानडी हेलात इंग्रजी बोली रस्त्याने मोठमोठ्याने आपल्या सोबत्याशी बोलत जात आहे. एकादा मुसलमान ज्याच्या जातीची स्थिती टिपू सुलतानाच्या वेळी कशी असेल ती असो; आता मात्र तिचा मोठा धंदा म्हणजे गाडी हाकण्याचा झाला आहे, इतका की परवा कुतब्याचा मोठा सण होता म्हणून गाड्या अत्यंत महाग झाल्या होत्या..... असा तो सणानिमित्त भपकेदार कपडे घालून निमाज पडण्यास निघाला आहे. असे नानाविध चमत्कार दाखविणारा जीवंत सिनेमेटोग्राफ मला बंगळूरच्या रस्त्यात दिसला.
ही अपूर्व विसंगतता व विविधता पाहून हिवाळ्याच्या थंड हवेत हिंदुस्थानात चैनीसाठी फिरावयास आलेल्या युरोपियन प्रवाशास मोठी मौज वाटत असेल. पण मद्रासच्या राष्ट्रीय सभेस निघालेल्या एकाद्या यात्रेकरूस व देशभक्तास काय वाटेल! बिचा-याच्या मानेवर केवढी प्रचंड जबाबदारी! असली परस्परविरूद्ध तत्त्वे एकत्र ठोकून त्यांचे एक राष्ट्र घडवावयाचे केवढए जोखमीचे आणि दीर्घोद्योगाचे काम हे! हे पाचपंचवीस वर्षात होणारे नव्हे तर शतकेच्या शतके करीत राहिले पाहिजे. आणि ते एकाच बाजूने करून होणार नाही तर सर्वच बाजूंनी अनेक अडथळे सोसून करीत राहिले पाहिजे. खरोखर धार्मिक काम हे !!