बंगालची सफर
(सुबोधपत्रिका, २८-०१-१९०६)
ब्राह्मधर्माची परिषद १८८९ सालीं प्रथम मुंबईस भरल्यापासून एक दोन वर्षे खेरीज करून जरी सालोसाल दर काँग्रेसच्या वेळी भरत आली आहे, तरी तिजसंबंधी माहिती पुष्कळांना झालेली नव्हती. केवळ काँग्रेसकरिता आलेलेच लोक काय ते जमत व त्यांच्याही आठवणीत ती फार दिवस टिकत नसे. पण मुंबईस भरलेल्या १९०४ च्या परिषदेपासून हिची प्रसिद्धी होऊ लागली. ती काशी येथील परवाच्या परिषदेमुळे तर बरीच झाली. ह्या परिषदेत बंगाल्यातील दोन्ही पक्षांची परस्पर बरीच सहानुभूती वाढली व शिवाय निरनिराळ्या प्रांतांतील ब्राह्मांचा बराच स्नेह झाला. अशा हितकारक परिषदेची खबर अधिक पसरावी. मुंबईकडील कामाची हकीकत इकडच्या दूरदूरच्या समाजास कळवावी, (कारण प्रार्थनासमाज व आर्यसमाज यांतीलही भेद न जाणणारे काही ब्राह्म इकडे भेटले) काही प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करून घ्यावी, मुख्य मुख्य समाज समक्ष पहावे, शिवाय सर्व समाजांची एक डिरेक्टरी करावयाची आहे, त्याअर्थी काही माहिती स्वत: मिळवावी वगैरे हेतूने मी बंगाल व आसाम प्रांतांत फिरतीवर निघालो. ता. २ जानेवारी रात्री ११ वाजता मी......
बांकीपूर
बिहार प्रांतातील मुख्य शहर बांकीपूर येथे आलो. बांकीपूर, पाटणा व दिनापूर ही मोठमोठी शहरे एकमेकांला अगदी लगूनच भागीरथीच्या काठी आहेत. हा देश जरी बहारी (हिंदुस्थानी) लोकांचा, तरी येथे बंगाली लोकांची बरीच वस्ती आहे, व सरकारी नोक-या पटकावण्याच्या व विद्याव्यासंगाच्याबाबतीत ह्यांचा पुष्कळच पुढाकार आहे. अर्थात एतद्देशीय बहा-यास हे आवडत नाही, हे बंगाली जाणून आहेत. वायव्येकडील प्रांतात ज्याप्रमाणे एकही ब्राह्म एतद्देशीय सापडणे कठीण, त्याप्रमाणे सबंध बहार प्रांतातही बहारी ब्राह्मांची संख्या एकाच हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी आहे. पण ही उणीव केवळ ब्राह्मसमाजाचीच आहे असे नव्हे. स्त्रीशिक्षणासारख्या सर्वमान्य सामाजिक सुधारणेतही इकडे महागाई फार आहे. बांकीपूर येथे एक मुलींचे खासगी हायस्कूल आहे; ते मूळ बंगाल्यांनीच काढले. हल्ली एकंदर सुमारे १०० मुलींपैकी बहारी मुली ४ च आहेत. बाकीच्या बंगाली मुलींपैकी २४ ब्राह्मांच्या आहेत. सर्व स्त्री व पुरूषशिक्षक ब्राह्मच आहेत. ह्या शाळेची व्यवस्था बहुतेक येथील प्रमुख ब्राह्मांच्याच हाती आहे. ह्याचे श्रेय येथील वृद्ध पेन्शनर आचार्य बाबू प्रखाशचंद्र राय व विशेषेकरून त्यांची परलोकवासी पत्नी अघोरकामिनी ह्यांजकडे आहे. मध्ये एकदा ही शाळा मोडकळीस आली असता अघोरकामिनीने सर्व व्यवस्था आपल्याकडे घेतली व शाळा हायस्कूलच्या दर्जास आणून सोडिली. ब्राह्मसमाजाच्या दृष्टीने पाहता कलकत्त्याच्या खाली डाक्का व त्याचे खाली बांकीपूरचाच नंबर लागतो. येथे जरी दोन पक्षांचे हल्ली दोन समाज आहेत तरी परस्पर बरीच सहानुभूती आहे व ती वाढत्या कलेवर आहे. तथापि अगदीच भेद मिटून पूर्ण ऐक्य होण्याची नुसती आशादेखील तूर्त दिसत नाही. मात्र दोन्ही पक्षांकडून प्रामाणिकपणे यत्न होत आहे.
बांकीपूर ब्राह्मसमाज
हा नवविधान पक्षाचा आहे. हा सन १८६६ मे, ता. २४ दिवशी स्थापण्यात आला. ह्यापूर्वी एकदा केशवचंद्र ह्यांनी येथे येऊन एका व्याख्यानाने सर्व प्रदेश दणाणून सोडला असे सांगतात. हल्ली ह्या समाजातील उपासकांची संख्या स्त्रीपुरूष व मोठी मुले मिळून सुमारे ५० आहे. शिवाय हितचिंतक. हल्ली जुने मंदिर पाडून नवीन बांधण्याचे काम चालू आहे. अघोरकामिनीच्या परिश्रमाने स्थापन झालेल्या दोन संस्था हल्ली तिच्या नावाने चालू आहेत. अघोर नारी समिती नावाची सभा स्त्रियांच्या उन्नतीसाठी व इतर परोपकाराची कामे करीत आहे. अघोरपरिवार नावाचे सुमारे १०-१२ लहान मुलींचे बोर्डिंग बाबू गौरीप्रसाद मुजुमदार व त्यांची पत्नी ह्यांचे व्यवस्थेखाली आहे. शिवाय कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता एक बोर्डिंग आहे. त्यात हल्ली ११ विद्यार्थी राहत आहेत. हे जरी ब्राह्म नाहीत तरी त्यांस ब्राह्मधर्माचेच वळण लागत आहे.
बांकीपूर ब्राह्म कांग्रिगेशन
हे साधारण समाजपक्षाचे आहे. सन १८९६ चे सुमारास कलकत्त्याच्या साधनाश्रमातून भाई प्रकाशदेव, सुंदरसिंग, गुरूदास चक्रवर्ती, सतीशचंद्र चक्रवर्ती एम. ए. व श्रीरंग बिहारीलाल एम. ए. असे पाचजण केवळ ईश्वरावर भरंवसा ठेवून धर्मप्रचारार्थ निघाले ते वाटेत बहारप्रांती आरा येथे उतरले व तेथे त्यांनी एक साधनाश्रम स्थापिला. सन १८९६, ऑगस्ट महिन्यात तो आश्रम आरा येथून बांकीपूर येथे नेण्यात आला. तेव्हापासून ह्या समाजाची सुरूवात झाली. सुंदरसिंग परलोकी गेले, भाई प्रकाशदेव ह्यांनी लाहोरास ठाणे दिले व मागे राहिलेल्या तिघांनी जिवापाड श्रम करून नावजण्यासारखी कामे उभारली आहेत. ह्यांचे स्वतःचे अद्यापि मंदिर नाही. प्रचारक गुरूदास चक्रवर्ती ह्यांचे घरीच समाज दर रविवारी सायंकाळी भरतो. हल्ली ब्राह्मउपासकांची संख्या स्त्रिया, पुरूष व मुले मिळून एकंदर ६० आहे.
राममोहन राय सेमिनरी ही १८९७ जानेवारी ता. १ रोजी स्थापिली. ह्या शहरी हे एक पहिल्या नंबरचे हायस्कूल झाले आहे. लोक व सरकारी अधिकारी ह्य दोघांच्याही आदरास ते पात्र झाले आहे. शाळेस क भक्कम व पुरेशी इमारत स्वतःच्या मालकीची आहे व तिच्याभोवती विस्तीर्ण पटांगण व कंपौंड आहे. मुलांची संख्या १०९ आहे. शाळेतच ब्राह्ममुलांकरिता एक बोर्डिंग आहे. प्लेगमुळे बोर्डिंगात मुलांची संख्या फार कमी झाली आहे. हल्ली ६ मुले आहेत, पैकी २ च ब्राह्म आहेत. पण बाकीच्या चौघांस पूर्ण रीतीने ब्राह्म वळण लावण्याचे अटीवरच घेण्यात आले आहे. ह्या शाळेची इमारत विकत घेण्याचे बाबतीत बरेच कर्ज झाले होते ते शेठ दामोदरदास गोवर्धनदास ह्यांच्या उदार देणगीने फेडण्यात आले. ह्या बाबतीत चालक मंडळीनी फार फार आभार प्रदर्शित केले. ह्याशिवाय एक स्त्रियांची सभा. एक आदित्यवारचा लहान मुलांचा वर्ग आणि तरूण ब्राह्मगण अशा संस्था आहेत. गरीब लोकांकरिता एक रात्रीची शाळा आहे. दुष्काळात व विशेषेकरून प्लेगमध्ये आश्रमाने फार मेहनत घेतल्यामुळे प्रचारक मंडळीचे बरेच वजन आहे. ह्याशिवाय बहारी यंग मेनस् इन्स्टिट्यूट नावाची संस्था ह्यांच्याच हाताखाली आहे.
ता. ३ रोजी अघोरपरिवारात उपासना चालविली. ता. ४ रोजी सायंकाळी बाबू प्रकाशचंद्र राय ह्यांचे घरी दोन्ही पक्षांची प्रमुख मंडळी जमली. मी प्रथम मुंबईकडची सर्व हकीकत सांगितली. नंतर दोन पक्षांचे एकत्र कार्य कसे होईल ह्याविषयी संभाषण चालले. प्रकाशचंद्र राय हे जरी पक्के नवविधानी आहेत तरी ह्यांचा दोघांसही एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. शेवटी उत्सवात एकमेकांनी कार्यक्रम मिळून ठरवावा व एकमेकांच्या उपासनेस वगैरे पाळीपाळीने जावे असे ठरले. ता. ५ रोजी दोहोंकडील स्त्रियांची सभा मि. दास बॅरिस्टर ह्यांचे घरी जमली होती. पोस्टल मिशन, डोमेस्टिक् मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामे स्त्रियांनी कशी करावयाची आहेत ह्याविषयी बोललो. मुलींनादेखील माझे इंग्रजी भाषण कळले. हेमंतकुमरी चौधरी सिलहतहून कॉन्फरन्सला आलेल्या डेलिगेटही त्यावेळी हजर होत्या. त्यांनी हिंदीत भाषण केले.
मोंगीर
ता. ६ रोजी दोनप्रहरी येते आलो. भागिरथीचे तटी हे मोठे रमणीय स्थान आहे. विशेषेकरून जुन्या किल्ल्यातील भाग मनोहर आहे. इंग्रज पाठलाग करीत असता मीरकाशीम ह्यांनी येथेच शेवटचे ठाणे दिले होते. पुराणातील राजा दानशूर कर्ण ह्याची दान देण्यास बसण्याची जागा गंगेच्या तीरावर एका लहानशा उंचवट्यावर अद्यापि दाखविण्यात येते. हल्ली ह्या ठिकाणी बेद रामपूरच्या जमीनदाराने सुंदर महाल ‘कर्णचौडा’ बांधला आहे. येथून पुढे गंगाजीचे विस्तीर्ण व बाकदार पात्र व माठोमोंगीर गावाभोवतालच्या टेकड्यांची अर्धगोल रांग व त्यावरची दूर क्षितिजात दिसणारी सुपारीची झाडे ह्या सर्वांचा एकंदर देखावा प्रेक्षकांचे म दंग करून टाकतो. एका फ्रेंट प्रवाशाने तर ह्या देखाव्यास अगदी अप्रतिम असे शिफारसपत्र दिल्याचे ऐकण्यात आले.
असो. ब्राह्म यात्रेकरूंस ह्या स्थळाचे महत्त्व असे सांगण्यात येते की, ब्राह्मसमाजात भक्तिसंप्रदाय जो सुरू झाला तो मूळ ह्या ठिकाणी. सन १८६८ च्या सुमारास इ. आय. रेल्वेचे ऑडिट ऑफिस जेव्हा कलकत्त्याहून मोंगीरजवळ जमलापूर येथे आणिले तेव्हा त्यातील ४-५ ब्राह्म कारकून मोंगीर येथे राहू लागले. पुढे त्यांच्या श्रमाने येथील समाज स्थापण्यात आला व नंतर १८७२ त हल्लीचे मंदिर बांधण्यात आले. मंदिरात एकदा काही वैष्णव मंडळीस भजनास बोलाविले होते. त्यापैकी एका चांडाळ जातीच्या भक्ताने इतके प्रेमळ व आवेशयुक्त भजन केले की त्याचा मंडळीवर विलक्षण परिणाम झाला. पुढे साधू अघोरनाथ ब्राह्मप्रचारक ह्यांचे भजनाविषयी प्रेम अधिकाधिक वाढून शेवटी स्वत: केशवचंद्रसेन एकदा येथे असता त्यांच्यावरही भजनाचा परिणाम घडला व येथे समाजाचे कार्य बरेच वाढले. पुढे हा भक्तीचा वेग जरी सर्व ब्राह्मसमाजात पसरला आणि मोंगीर समाजात एका काळी ४०-५० सभासद होते तरी हल्लीची येथली ओसाड व दीनवाणी स्थिती पाहून अंतःकरण गहिवरते व मानवी मनाची अस्थिरता पाहून विस्मयते. मंदिरापुढील पटांगणात केशवचंद्रसेन, साधू अघोरनाथ, दीनानाथ चक्रवर्ती प्रचारक यांच्या तीन समाधी मध्यभागी एका चौथ-यावर बांधल्या आहेत. मंदिराकडे पाहून व इतिहास ऐकून मनास जी उदासीनता प्राप्त होते तिच्याच जणू ह्या तीन दृश्य मूर्ती.
पुढे लवकरच कर्ताभजा मंडळीचा कोणी एक पुरूष ह्या गावी आला. इकडे ह्या नावाची एक ईश्वराच्या कर्तृत्वगुणाची उपासक मंडळी आहे. ह्यांचे लक्षण जवळजवळ शाक्तमार्गीयांप्रमाणेच असावेसे वाटते. केवळ मनोविकारालाच वश होऊन समाजात आलेली काही नादलुब्ध मंडळी वरील पुरूषाच्या नादी लागली. सुमारे १८८० साली कृष्ण प्रसन्नसेन नावाच्या समाजातील एका हितचिंतकाने सनातनधर्म मंडळीची नवीनच एक ध्वजा उभारली. ह्या प्रकारे मंडळी कमी होता होता शेवटी मध्ये ऑडिट ऑफिसही पुनः पूर्वस्थळी गेले. १९०२ त ह्या गावी आर्यसमाजाची स्थापना झाली पण तोही नीट चालत नाही. हल्ली मंदिरात फार तर ३-४ जण उपासनेस जमतात. बागची बावू (द्वारकानाथ बागची) नावाचे एक वृद्ध गृहस्थ मंदिरातच असतात. कुचबिहारच्या महाराजांकडून त्यास दरमहा ४ रू. मिळतात. आपल्या पित्याच्या समाधीपुढे दिवा लावण्याकरिता म्हणून महाराणी दरमहा ३ रू. देते.
येथील कॉलेजातील एक तरूण प्रोफेसर बाबू सुरेशचंद्र राय हे सभासद आहेत व दुसरे एक बोर्डिंग सुपरिटेंडेंट हितचिंतक आहेत. त्यांच्याशी व इतर काही मंडळीशी दोनप्रहरी संभाषण झाले व येथील तरूण विद्यार्थ्यांकरिता काही धार्मिक संस्था काढावी असे ठरले. यानंतर
भागलपूर
येथे ता. ७ रोजी आदित्यवारी ७|| वाजता पोहोचलो. एकांतस्थळी एक लहानसे पण सुंदर मंदिर आहे. उपासना संपत आली होती. स्त्रिया-पुरूष मिळून उपासक १०-१२ होते. दुसरे दिवशी सकाळी आचार्य हरीसुंदर बोस ह्यांचे घरी केशवचंद्रसेन ह्यांच्या पुण्यतिथीसंबंधी उपासना त्यांनीच चालविली. येथील प्रमुख लोकांचा विशेष कल जरी नवविधान पक्षाकडे आहे तथापि मंत्री बावू निवारणचंद्र मुकरजी हे फार समजूतदार व वजनदार असल्याने समाजाचे एकंदर धोरण अगदी ति-हाईतपणाचे आहे. आनुष्ठानिक ब्राह्म उपासकांची एकंदर संख्या सुमारे ६० व इतर ५ आहे.
हा समाज ता. २२ माहे फेब्रुवारी सन १८६४ रोजी, विशेषेकरून बाबू ब्रजकृष्ण बसू व नवकुमार राय ह्यांच्या प्रयत्नाने व प. वा. प्रतापचंद्र मुझुमदार ह्यांच्या सल्ल्याने स्थापित झाला. राजा शिवचंद्र बानर्जी नावाच्या एका अत्यंत आस्थेवाईक हितचिंतकाने स्वत: सर्व खर्च सोसून मंदिर बांधविले ते केशवचंद्र ह्यांचे हस्ते ता. २२ फेब्रुवारी १८८० रोजी उघडण्यात आले. ह्याचे पूर्वी सन १८७८ साली ह्या जागेला लागूनच एक भली मोठी जागा विकत घेऊन त्यात ५ ब्राह्म कुटुंबांनी आपली राहण्याची मोठमोठी घरे बांधली.
समाजात थोडी का होईनात पण बडीबडी प्रमुख व वृद्ध मंडळी आहेत. पण उपासनेशिवाय दुसरे काही काम होत नाही. संगत सभा, बायकांची सभा, तरूण ब्राह्मगण, मुलांसाठी शाळा, सामाजिक मेळे वगैरे बरेच सुखसोहळे उपभोगून हा समाज आता शांत झाला आहे. ता. ९ रोजी सायंकाळी सुमारे ५-६ तरूण पदवीधर ब्राह्म मंडळीपुढे मुंबईच्या तरूण ब्राह्मगणाचे छापील नियम वाचून दाखविले व विचाराअंती येथील पूर्वीची तरूणांची संस्था पुन: सुरू करण्याचे ठरले. ह्यानंतर रात्री ७ वाजता बाबू निवारणचंद्र मुकर्जी ह्यांचे घरी प्रमुख मंडळी जमली. त्यापुढे मी मुंबईकडील कामाची हकीकत सांगितली. बहुतेकांस ती नवीनच असल्याने ऐकून फार समाधान झाले व दोघांनी तर वारंवार अशी इच्छा प्रदर्शित केली की मुंबई व बंगालप्रांतातील ब्राह्मांचे अधिक निकट संबंध जुळविणे फार इष्ट आहे व त्याकरिता परस्पर विवाह-व्हवहार करणे, अवश्य आहे. मी म्हटले की, निरनिराळ्या प्रांतांतील ऐपतदार ब्राह्म गृहस्थांनी सहकुटुंब निरनिराळ्या प्रांतांत प्रवास केल्याविना वरील विवाह-व्यवहार कधीही शक्य होणार नाही आणि अशा प्रवासामुळे सर्वपक्षी अत्यंत हित होणार आहे. नवविधान व साधारण समाज ह्यांतील दुहीसंबंधाने मुंबईकडील समाजाचे अगदी ति-हाईतपणाचे वर्तन पाहून इकडील पुष्कळ ठिकाणच्या दोहोंपक्षांच्या कट्ट्या अभइमान्यांसही बरे वाटते हे मोठे सुचिन्ह आहे.
ता. १० सकाळी मी कुचबिहारकडे निघालो. भागलपुराजवळ वाळवंट व प्रवाह मिळून गंगेचे ७ मैल अफाट पात्र आहे. ते आगगाडी व आगबोटीतून ओलांडले. पुढे दोनप्रहरी