ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
(रविवार ता. २१-५-११ रोजीं कोल्हापूरच्या ब्राह्मसमाजाच्या वार्षिकोत्सवामध्यें दिलेलें व्याख्यान.)
एकाद्या वृक्षाची साल आणि त्याचा गाभा ह्यांच्यामध्ये परस्पर जो संबंध आहे, तोच संबंध ब्राह्मसमाज व ब्राह्मधर्म ह्यांमध्ये आहे. वृक्षाच्या सालीमध्ये कालांतराने फेरफार होतो, पण गाभा तोच असतो. ह्याप्रमाणे ब्राह्मसमाजाचे जरी रूपांतर होणे शक्य असले, तरी ब्राह्मधर्म हा सनातनच राहणार म्हणून त्याची तत्त्वे काय आहेत ते आपण प्रथम पाहू.
प्रथम तत्त्व, मोकळा विश्वास हे आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यामध्ये बुद्धी अथवा विवेक म्हणून एक शक्ती आहे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये श्रद्धा अथवा विश्वास अशी एक शक्ती आहे. विश्वास असावयास पाहिजे, असे आमचे म्हणणे नाही, पण तो प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीअधिक मानाने असतोच, असे आमचे म्हणणे आहे. आणि ह्यासंबंधाची ब्राह्मधर्माची पहिली आज्ञा अशी आहे की, तो विश्वास मोकळा ठेवावा. त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध अथवा दडपण असू नये. काही स्वाभाविक कारणांनी आपला विश्वास कमी होत असेल, किंवा नष्ट होत असेल, तर तसे होऊ द्यावे, पण अन्य काही कारणाने नवीन विश्वास उत्पन्न होत असेल किंवा जुना दृढ होत असेल तर ते मात्र होता देऊ नये असे म्हणणे काही मोकळ्या विश्वासाचे लक्षण नाही. विश्वासास दोन्ही बाजूंनी मोकळे ठेविले पाहिजे. त्याच्या जाण्याच्या किंवा येण्याच्या मार्गावर कसलेही कृत्रिम दडपण ठेवणे हा अधर्म होय, कारण ज्या अर्थी विश्वास ही आपली एक नैसर्गिक उपजत देणगी आहे त्या अर्थी तिला इतर कृत्रिम उपायांची जरूरी नाही, इतकेच नव्हे, तर तिला त्यांची बाधा न होऊ देणे हे आपले कर्तव्य आहे.
दुसरे तत्त्व, वाढते ज्ञान हे होय. आम्ही आपले ज्ञान वाढणारे आहे की नाही ह्याची नेहमी खबरदारी घेतली पाहिजे. अद्वैतवाद्यांचा अदवैत सिद्धांत हे वाढते ज्ञान नव्हे, जे आहे ते एकच तत्त्व आहे असा एकदा मनाचा ग्रह झाला की मनाची गतीच खुंटली असे होते. पुढे जाणावयाचे ते काय आणि नेणावयाचे ते काय? ह्या कारणामुळे ब्राह्मधर्मानुयायांच्या पसंतीस अद्वैतवाद उतरत नाही. एरवी ब्राह्मसमाज अद्वैतवादी आहे किंवा द्वैतवादी आहे ह्याची चर्चा करण्याच्या भानगडीत पडण्याचे कारण नाही. नित्य नवे नवे जे अनुभव येतात आणि सोध लागतात, त्यांची किंमत नाहीशी करून टाकणारा अद्वैतवाद ब्राह्मास रूचत नाही. कारम व्यक्तीस येणा-या ह्या एकाद्या लहानशाही ताज्या अनुभवाची किंमत शिळ्या अद्वैतवादापेक्षा मोठी आहे. येणेप्रकारे प्रत्येक व्यक्तीस जे अनुभव येतात आणि तत्कालीन मनूमध्ये जे भोवताली नानाप्रकारचे शोध लागतात, त्या सर्वांचा सुसंस्कार त्या व्यक्तीच्या मनावर होऊन अखेरीस तिला जी पूर्ण प्रज्ञा प्राप्त होईल ती देखील प्रगमनशीलच असणार ह्याशिवाय ज्ञानाची इतर कोणतीही स्थिती ब्राह्मास संभवनीय दिसत नाही. त्याप्रमाणे विश्वास मोकळा ठेवण्यात, त्याचप्रमाणे ज्ञान वाढते ठेवण्यातही ब्राह्मास कोणत्याही प्रकारचा धोका दिसत नाही. उलट ही त्याची आवश्यक कर्तव्ये आहेत.
तिसरे तत्त्व शुद्ध प्रीती हे होय. “ऐसी कळवळ्याची जाती| करी लाभाविण प्रीति” ह्या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे आपली प्रीती लाभावीण असली पाहिजे. शुद्ध प्रीती नुसती लाभावीण असते, एवढेच नव्हे, तर त आणि तिचा विषय ह्यांच्यामध्ये स्थळ आणि वेळ ह्यांचे कोणतेच अंतर राहू शकत नाही. सर्व विश्वाचे आपण मध्यबिंदू होऊन सर्वांवर आपण प्रीती करू लागतो. ह्याप्रमाणे निरंतर आणि निर्लोभ प्रेम ब्राह्मधर्माचे तिसरे आवश्यक लक्षण होय.
चौथे लक्षण सात्विक सेवा होय. वरील प्रेमाच्या योगे सेवा करीत असताना मनास कोणत्याही प्रकारे निराशा आणि शीण होण्याचा संभव नसतो. आजपर्यंत केलेले प्रयत्न केले नसते तर बरे झाले असते, असे म्हणण्याची पाळीच येत नाही. कारण ही सात्विक सेवा करीत असताना प्रतिक्षणी आनंदच होत असतो. तो आनंद पुढे कधी तरी व्हावयाचा आहे असे नसते, शिवाय पदोपदी अधइक सेवा करण्याची शक्ती वाढतच जाते. म्हणून ही सात्विकसेवा असे म्हटले आहे.
येणेप्रमाणे सारांशरूपाने ब्राह्मधर्माचे स्वरूप आहे. ह्या धर्माची संस्थापना राममोहन रॉय यांनी केली असे म्हणता येत नाही. ह्यावर वेळोवेळी जी काही अनिष्ट वेष्टमे पडत आहेत, त्यांचे निराकरण करून ही तत्त्वे अधिक उज्ज्वल करण्याचा नवीन प्रारंभ राममोहन रॉय ह्यांनी सन १८३१ साली केला. पण वर सांगितल्याप्रमाणे झाडातील गाभ्याच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे सालीची जरूरी आहे. त्याचप्रमाणे ह्या सनातन तत्त्वांचा योगक्षेम चालण्यासाठी नवीन रचनेची आणि पद्धतीची जरूरी आहे. त्याचे नाव ब्राह्मसमाज आणि त्याची स्थापना राममोहन रॉय ह्यांनी केली. मनुष्याच्या अंत:करणामध्ये स्वाभाविकपणे वागत असलेल्या वरील ब्राह्मतत्त्वांची उघाडणी आणि विकास व्हावा म्हणून अशा समाजाचा देशोदेशी, प्रांतोप्रांती आणि गावोगावी प्रसार करणे आवश्यक आहे, तसा समाज ह्या कोल्हापूर शहरात स्थापन होऊन हा वार्षिकोत्सव साजरा करण्यात येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. तथापि ब्राह्मधर्माच्या सनातनपणात बाधा येत नाही. यद्यपि सालीमुळे गाभ्याला वेष्टण पडून त्याच्या स्वतंत्रपणास बाधा येते, किंबहुना सालीच्या दोषामुले गाभ्यावर विकारही घडतो, तथापि सालीशिवाय गाभ्याची स्थिती आणि वाढ शक्य नाही म्हणून सालीचे महत्त्व लक्षात आणलेच पाहिजे. पण एकादे जुनाट झाड आतून पोकळ होऊन नुसती वरील साल मात्र रहाते आणि असे झाले असता ते केव्हातरी जसे खाली गळून पडतेच तशीच निरनिराळ्या काळी ह्या धर्मपंथांची वाट लागते हे आपण विसरू नये. ह्या नियमास ब्राह्मसमाजही अपवाद होणार नाही. कालांतराने ब्राह्मधर्माची जीवनत्त्वे हल्लीच्या समाजातून नाहीशी झाली तर अन्य रीतीने त्याच्यावर निराळे नवीन वेष्टण येईल, पण ब्राह्मधर्माचा मनुष्यजातीतून अजीबात नायनाट होणे नाही. हा शाश्वत संबंध ध्यानात ठेवूनच समाजाचा ठिकठिकाणी प्रसार करण्याचे काम प्रत्येक ब्राह्माने करावयास पाहिजे. सर्व हिंदुस्थानभर किंबहुना जगभर ब्राह्मसमाजाचा विस्तार झाला, पण त्यामध्ये प्रत्यक्ष ब्राह्मधर्मालाच जर अवशेष राहिला नाही, तर रानातल्या झाडाच्या जुन्या ढोल्कयाप्रमाणे ह्या समाजाची स्थइती होईल व त्याचे मह्त्त्व सर्पणापेक्षा जास्त उरणार नाही हे जरी खरे आहे, तरी सनातन ब्राह्मधर्मतत्त्वांची वाढ ह्या किंवा अशा समाजाशिवाय होणे केवळ अशक्य आहे. समाजदोषाने तत्त्वे थोडीबहुत दूषित होणारच, आणि शेवटी समाजाचा अजीबात लयही होणार, असे असताही समाजाशिवाय धर्मतत्त्वास गत्यंतर नाही हे जाणून प्रत्येक ब्राह्माने आपल्या समाजाचा योग्य अभिमान राखून ह्याचा सतत योगक्षेम चालविणे जरूर आहे. आपले कलेवर कधीतरी विलयाला जाणार, आत्मा अविनाशी आहे, कलेवराची बाधा आत्म्याला होते, ह्या गोष्टी कितीही ख-या असल्या म्हणून आम्ही आपल्या शरीराची जोपासना करणे सोडून देणे हे जसे मूर्खपणाचे आणि घाताचे होणार आहे, तसेच आपल्या समजाविषयी उदासीन रहाणे हेही आत्मघातकीपणाचे होणार आहे. समाजाची खटाटोप सोडून देऊन सनातन ब्राह्मतत्त्वाचे आचरण करू पाहणारी एकादी ब्राह्मव्यक्ती अन्नपाणी वर्ज्य करून मोक्षास जाऊ इच्छिणा-या बुद्धिभ्रष्टाप्रमाणेच आहे असे समजण्यास काहीच हरकत नाही. त्याचे जीवित ज्याप्रमाणे एक दोन दिवसांत बंद पडेल, त्याचप्रमाणे ह्या ब्राह्मव्यक्तीचेही ब्राह्मधर्माचरण अल्पकाळांतच नष्ट होईल.