भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची संस्थापना
तारीख १८ ऑक्टोबर १९०६ रोजीं कार्तिकी वर्षप्रतीपदेचा शुभ दिवस आला. दोनच दिवसांपूर्वीं मुंबईतील प्रार्थनासमाजाच्या उदार उपाध्यक्षांनी अशा मंडळीची स्थापना होऊन काम सुरू व्हावें म्हणून एक हजार रुपये दिले होते. पाडव्याच्या शुभ दिवशीं सकाळीं नऊ वाजतां (१८ ऑक्टोबर १९०६) एल्फिन्स्टन रोड स्टेशन लगतच्या मुरारजी वालजीच्या बंगल्यांत मंडळीची पहिली शाळा उघडण्याकरितां गांवांतील चार शिष्ट मंडळी जमली. मंडळीचे अध्यक्ष नामदार न्यायमूर्ति चंदावरकर ह्यांनीं जमलेल्या मुलांना पहिला धडा घालून देऊन मंडळीचें काम सुरू करण्यापूर्वी आपल्या भाषणांत खालील अर्थाचें सूत्रवाक्य सांगितलें कीं, ''ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्यानें आम्ही स्वतःलाच वर आणीत आहों. हें पवित्र कार्य करित असतां ह्या लोकांचा आम्ही उद्धार करणार ? हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणांत न शिरो आणि आम्हां सर्वांना ह्या घोर अन्यायामुळें जी अधोगति मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे. असा साधा आणि सात्त्विकभाव आम्हांमध्यें निरंतर जागृत राहो !'' आणि ह्या भावाला अनुसरूनच आज दोन वर्षें मंडळीचें काम चाललें आहे.
हेतु
हिंदुस्थानांतील महार, मांग, चांभार, धेड, पारिया वगैरे (विशेषेंकरून पश्चिम हिंदुस्थानांतील) निकृष्ट वर्गांना व इतर अशाच रीतीनें निराश्रित झालेल्या लोकांना (१) शिक्षण, (२) कामधंदा, (३) ममतेची आणि समतेची वागणूक, (४) धर्म, नीति, आरोग्य आणि नागरिकता इत्यादीविषयक उदार तत्त्वांचा उपदेश व अशा इतर साधनांच्या द्वारें आत्मोन्नति करण्याचे कामीं साहाय्य करणें, हा ह्या मंडळीचा हेतु असून हिच्या विद्यमानें सध्या खालील संस्था काम करित आहेत.
शाळा
जी. आय. पी. आर. परळ स्टेशनजवळीत नंबर १ ची इंग्रजी-मराठी शाळा आहे. येथें हल्लीं मराठी मूळाक्षरांपासून तो इंग्रजी चार इयत्तांपर्यंत शिक्षणाची उत्तम सोय केली आहे. मुलगे १९० आणि मुली ३० शिकत आहेत. कुर्ल्याजवळ देवनार येथील कचरापट्टींत नंबर २ ची प्राथमिक शाळा आहे. तीमध्यें ४१ मुलें आणि १ शिक्षक आहे. भायखळा येथे नंबर ३ ची प्राथमिक शाळा आहे. तीमध्यें १०१ मुलें आणि ३ शिक्षक आहेत. एकंदर मुलांची संख्या सरासरीनें ५०० असते.
जे. जे. हॉस्पिटलसमोर भंगी लोकांकरितां १ व महालक्ष्मी स्टेशनाजवळील कचरापट्टींत १ अशा दोन दिवसाच्या व एक रात्रीची अशा तीन गुजराथी शाळा चालू आहेत. त्यांत १२५ मुलें आहेत.
पुस्तक बांधण्याचें काम
मुलांना ५ तास सारखें शिकण्याचा कंटाळा येऊं नये म्हणून व काहीं तरी हातकाम यावें म्हणून दररोज दोन तास मोठ्या मुलांना परळच्या शाळेंत पुस्तकें बांधण्याचें व लहानमोठ्या वह्या, ब्लॉटिंग पॅड्स वगैरे तयार करण्याचें काम शिकविण्यांत येतें.
उद्योगशाळा
सन १९१२ एप्रिलपासून प. लो. वासी शेठ एन्. एम्. वाडिया ह्यांच्या इष्टेटींतून दर महा ५०० रु. तीन वर्षेंपर्यंत मिळणार असल्यामुळें मंडळीनें एक उद्योगशाळा उघडली आहे त्यांत सुतारी व शिवण काम शिकविलें जातें.
शिवणकाम
मुलींना व गिरण्यांतून काम करूं न इच्छिणाऱ्या निकृष्ट वर्गांतल्या, पण अब्रदार बायकांना घरीं बसल्या आपले व मुलांचे कपडे शिवतां यावे म्हणून त्यांना साधें शिवणकाम शिकविण्याची व्यवस्था परळच्या शाळेंत केली आहे. सध्यां एक चांभाराची बाई शिकून तयार झाली आहे.
पुस्तकालय
शेठ तुकाराम जावजी, मेसर्स बाबाजी सखाराम आणि कंपनी व मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी वगैरेंच्या साहाय्यानें ३०४ पुस्तकें जमविलीं आहेत. गेल्या वर्षीं ह्यांपैकी २५८ पुस्तकें वाचण्याकरितां देण्यांत आलीं. वाचनालयांत २ दैनिक, ५ साप्ताहिक पत्रें आणि ४ मासिक पुस्तकें ठेवण्यांत येत असतात.
मैदान क्लब
तरुण मुलांनीं वाईट नादाला लागूं नये म्हणून त्यांचा एक क्रिकेट फुटबॉल क्लब आहे. विशेषेंकरून शिमग्यासारख्या सणांत चांदण्यारात्रीं शिक्षक लोकांच्या नजरेखालीं आट्यापाट्या वगैरे खेळ खेळण्यांत येतात. सन १९०७ सालच्या होळीच्या दिवशीं खेळांत हुशार ठरलेल्या गड्यांस, सर भालचंद्र कृष्ण ह्यांच्या हस्तें बक्षिसें वांटण्यांत आलीं व वरील क्लब उघडण्यांत आला. हल्लीं ४० मेंबर व क्रिकेटच्या तीन टोळ्या आहेत. व्यायामाशिवाय ह्या क्लबमार्फत मधूनमधून व्याख्यानें, संमेलनें, वनभोजनें इत्यादि ज्ञानवृद्धि, स्नेहवृद्धि आणि करमणूक करण्याचेंहि प्रकार होत असतात.
देवनार कचरापेटी
येथें सुमारें ५०० म्युनिसिपल कामकरी अंत्यज मानलेल्या लोकांची वसाहत आहे. ही मुंबई म्युनिसिपालिटीच्या मालकीची जागा असून म्युनिसिपालिटीच्या हद्दीबाहेर म्हणजे ठाणें जिल्ह्यांत असल्यानें मंडळीनें पुष्कळ प्रयत्न करूनही ह्या लोकांच्या शिक्षणाची सोय करण्याचा म्युनिसिपालिटीस अधिकारच नाहीं असें शेवटीं ठरलें; आणि मालकी मुंबई म्युनिसिपालिटीची आहे म्हणून ठाणे जिल्ह्यांतूनहि शिक्षणाची व्यवस्था अद्यापि झाली नाहीं ! मिळून आज कित्येक वर्षें इतक्या लोकांची उणीव भरून निघाली नाहीं. शेवटीं तेथें वरील शाळा आपल्याच खर्चानें उघडून मंडळीनें गरज भागविली. हल्लीं शेठ हाजी युसफ हाजी इस्मायल ह्यांच्या उदार मदतीनें एक झोंपडी बांधून तिच्यांत एक दिवसा आणि एक रात्रीं अशा शाळा चालू आहेत. शिवाय मंडळीकडून मधून मधून व्याख्यानें, कीर्तनें, बक्षीस-समारंभ वगैरे होत असतात.
वाङ्मय
अस्पृश्य मानिलेल्या लोकांची कठीण स्थिति वरिष्ठ लोकांच्या नजरेस यावी व त्यांची सहानुभूती मिळावी, म्हणून इंग्रजींत तीन लहान पुस्तकें छापून त्यांच्या पुष्कळ प्रति फुकट वांटण्यांत येत आहेत. शिवाय प्रमुख इंग्रजी, मराठी आणि गुजराथी पत्रांतून वेळोवेळी ह्या लोकांच्या स्थितीसंबंधीं व कामासंबंधी लेख येत असतात.
निराश्रित सेवासदन
केवळ शाळा आणि दवाखाने स्थापिल्यानें आणि मधूनमधून व्याख्यानें दिल्यानें ह्या लोकांची गृहस्थिति आणि सामाजिक स्थिति सुधारावयाची हा मंडळीचा जो मुख्य हेतु तो अंशतःहि पूर्ण व्हावयाचा नाहीं. ह्या कामी काही स्वार्थत्यागी आणि श्रद्धाळू माणसांनी आपल्याला वाहूनच घेतलें पाहिजे; त्यांनी ह्या लोकांच्या वसतींत राहून, त्यांच्या घरीं वरचेवर जाऊन त्यांच्या बायांबापड्यांना कामकाज, करमणूक, भजन, प्रार्थना इत्यादिकांच्या निमित्तानें आपल्या घरीं बोलावून व एकंदरीत अशा रीतीनें त्यांच्यांशीं मिळून मिसळून राहिले पाहिजे व मंडळीच्या ज्या निरनिराळ्या संस्था चालू आहेत त्यांकडे त्या लोकांचें लक्ष वेधलें पाहिजे; अशा प्रकारच्या एका आश्रमाची अत्यंत उणीव भासूं लागली. मंडळीच्या चालकांच्या मनांत हे विचार येण्याच्या संधीस ईश्वरकृपेनें त्यांची व एका उदार अंतःकरणाच्या सत्पुरुषाची अवचित गांठ पडून असा आश्रम निघत असेल तर आपण त्याच्या खर्चांसाठी दरमहा शंभर रुपयांची नेमणूक करून देऊ, असे वचन देऊन फेब्रुवारी १९०७ महिन्यापासून त्यांनी ही नेमणूक चालू केली ! व ता. २१ मे रोजीं 'निराश्रित सेवासदन' ह्या नांवानें हा आश्रम सुरू झाला.
हल्लीं प्रार्थनासमाजांतील दोन पुरुष व दोन स्त्रिया यांनीं मंडळीचें काम अंगमेहनतीनें करण्याचें पत्करिलें आहे.
मंगळूर
दक्षिण कानडा जिल्ह्यांत पारिया लोकांची स्थिति फारच दुःसह आहे. मंगळूर ब्राह्म समाजाचे सेक्रेटरी श्रीयुत के. रंगराव हे एकटेच ह्या गरीब लोकांसाठीं गेलीं दहा वर्षें खपत आहेत. सरकारापासून एक प्रशस्त जागा घेऊन त्यांनीं आतां येथें एक ऐसपैस पक्की इमारत बांधली आहे. त्यांची अलीकडे बंद पडलेली शाळा फिरून तारीख ३ नोव्हेंबर १९०७ रोजी ह्या इमारतींत उघडण्यांत आली. हल्ली येथे पारियांची ५१ मुलें शिकत आहेत. पैकी ४ मुलांना दोन्ही वेळ जेवण घालून शाळेंतच ठेवण्यांत येतें आणि २६ मुलांना दोन प्रहरी एक वेळ जेवण घालून रात्री घरी पाठविण्यांत येते. अशा व्यवस्थेशिवाय शाळा चालणेंच शक्य नाहीं. येथील ब्राह्मसमाजांतील सुमारें बारा तरुणांनीं एकत्र जमून एक 'तांदूळ फंड' स्थापन केला आहे. दर रविवारी उपासनेनंतर ते घरोघर जाऊन एक एक मुष्ठीभर तांदूळ जमवितात. तारीख २७ नोव्हेंबर १९०७ रोजी उद्योगशाळा उघडण्यांत आली. हल्लीं सहा भाग तींत चालू आहेत. त्यांवर मुलांना विणकाम शिकविण्यांत येते. ह्या शाळेकरितां सध्यां दोन हजार रुपयांची फार जरूरी आहे. त्यासाठीं पन्नास रुपयांचा एक असे चाळीस भाग काढले आहेत, उदार गृहस्थांनीं या कामीं मदत करणें हें त्यांचें कर्तव्य आहे.
मंडळीच्या शाखा व संस्था
१. मुंबई - ४ दिवसाच्या शाळा, विद्यार्थी ५००. १ वसतिगृह, विद्यार्थी २६. २ भजन समाज. १ उद्योगशाळा (सुतारी, शिवणकाम व बांधकामाचें शिक्षण ).
२. पुणें - १ दिवसाची शाळा, विद्यार्थी २००. १ भजनसमाज. सुतारीचे व शिवणाचे वर्ग. १ लायब्ररी इ.
३. सातारा - १ रात्रीची शाळा. १ भजनसमाज.
४. महाबळेश्वर - १ उद्योगशाळा (दोरखंड व नवार करणें)
५. दापोली, ६ ठाणे व ७ मालवण - येथें गरीब विद्यार्थ्यांस मदत करणाऱ्या कमिट्या.
८. मंगळूर - १ दिवसाची व १ रात्रीची शाळा. १ विणण्याचा कारखाना. १ वसतिगृह. १ वसाहत.
९. मद्रास - २ दिवसाच्या व २ रात्रीच्या शाळा, विद्यार्थी १३०.
१०. हुबळी - १ दिवसाची, १ रात्रीची शाळा. १ वसतिगृह.
११. अकोला - ३ रात्रीच्या शाळा. १ वसतिगृह.
१२. अमरावती - २ रात्रीच्या शाळा.
१३. भावनगर - १ दिवसाची शाळा. १ दवाखाना.
१४. इंदूर - १ रात्रीची शाळा.
एकूण १४ शाखांच्या २४ शाळा व ५ वसतिगृहें आहेत. १२ इतर संस्था. त्यांत ५५ शिक्षक व ११०० विद्यार्थी आहेत. दरसाल मंडळीचा खर्च वीस हजार (२०,०००) रुपयांवर आहे.
येणेंप्रमाणें आपल्या प्रांती ह्या हतभागी वर्गांच्या उन्नतीसंबंधाच्या प्रयत्नांची थोडक्यांत हकीगत आहे. ह्या वर्गाच्या अफाट संख्येच्या मानानें हे प्रयत्न सिंधूत बिंदूप्रमाणें फारच अल्प आहेत हें जरी खरें आहे, तथापि ज्या महात्म्यांच्या उदार अंतःकरणांत शुभ प्रेरणा होऊन ह्या अल्प प्रयत्नास सुरुवात झालेली आहे त्यांच्या मंगल कामनेप्रमाणें त्यांनीं आरंभिलेल्या प्रयत्नांस कांहीं कालानें विशाल स्वरूप प्राप्त होईल, अशी आम्ही आशा बाळगितों.
हल्ली मंडळीच्या कामाकरितां मुंबई आणि पुणें मुक्कामीं इमारतींची फार नड भासत आहे. निदान पश्चिम हिंदुस्थानांतील निकृष्ट वर्गांच्या हिताकरितां मंडळीच्या मनांत जें कांहीं करावयाचें आहे, त्याच्या खर्चासाठीं पैशाची फारच मोठी गरज आहे.
'ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्यानें आम्ही स्वतःलाच वर आणित आहों...' ह्या, ह्या संस्थेच्या संस्थापनेच्या वेळीं संस्थेचे अध्यक्ष न्यायमूर्ति सर चंदावरकर यांनीं सांगितलेल्या मंत्रवाक्याचा सतत जप करून प्रत्येक महाराष्ट्रीय धनी, निर्धन, स्त्री, पुरुष, सुशिक्षित, अशिक्षित, ब्राह्मण, शूद्र शक्त्यनुसार ह्या हीनदीन लोकांच्या हितासाठीं तनमनधनानें प्रयत्न करील अशी आम्ही उमेद बाळगितों.
तो सत्य संकल्पाचा दाता भगवान् आमची ही मंगल कामना पूर्ण करो !