बॉरोडेलमधील प्रार्थना व भेट !
लीथस् कॉटेजच्या वन्य कुटिकेत आमचे जे पुढील पंधरा दिवस अति सुखाचे गेले त्याची गोड सूचना, गुरूपत्नीने वर सांगितल्याप्रमाणे प्रथमदर्शनी दुरूनच जे स्वागत केले त्यात मिळाली होती.
इंग्लिश सरोवर-प्रांत हे एक सा-या युरोपात पाहण्यासारखे स्थळ आहे आणि त्यात डरवेंटवॉटर हे सुंदर सरोवर व त्याच्या काठचे बॉरोडेल नावाचे खोरे ही तर एकाद्याला अगदी वेड लावून टाकतात. म्हणूनच मागे ह्या ठिकाणी मोठमोठे राष्ट्रीय कवी व लेखक संसार अगदी विसरून भृगासारखे गुंगत राहिले, व आता तर युरोप आणि अमेरिकेहूनही रसिकांच्या झुंडीच्या झुंडी येथे येतात! प्रख्यात सौंदर्यवादी जॉन रस्किन हा जेव्हा अगदी लहान होता तेव्हा दाईने त्यास एकदा ह्या सरोवराच्या काठी फ्रायर्स क्रॅग नावाच्या लहानशा खडकावर आणिले, त्यावेळी त्या मुलाच्या अति कोवळ्या व ग्रहणशील मनावर निसर्गाने येथे असा कायमचा छाप मारिला की, ही त्याची प्रथम भेट रस्किन मरेतोपर्यंत वारंवार उत्कंठेने आठवीत असे. आता ह्या खडकावरील झाडीत रस्किनच्या चहात्यांनी वरील भेटीच्या स्मारकार्थ एक सुंदर शिलालेख रोविला आहे !
आमच्या गुरूची कुटिका बॉरोडेल दरीच्या तोंडाशी, डरवेंट नदीच्याकाठी, डोंगराच्या बगलेत जेथून सर्व सरोवर नजरेत चांगले भरेल अशा नाक्यावर उभी आहे. त्यामुळे येता जाता, उठता बसता, कार्य करता, ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरीदेखील हो! सृष्टीचे प्रसन्न मुख आम्हांस सतत दिसत असे. जेवणाच्या पंगतीत बसलो असता एकाएकी दूर स्किडॉच्या शिखरावर सूर्यकिरणाची अपूर्व शोभा दिसे, दिवाणखान्यात क्रीडेत गुंगलो असता मध्येच सरोवरावर मेघधारा नाचू लागत तिकडे लक्ष जाई, खोलीत वाचीत बसलो असता भिंतीखालच्या नदीशी वायू अकस्मात धिंगाणा घाली, आणि पाहता पाहता गुलाम दरीतून शीळ घालीत पार निसटून जाई! ह्या प्रकारे सृष्टीबाला आमच्याशी अहोरात्र सलगी करी पण ती मोठ्याची कन्या म्हणून तिच्या प्रत्येक चेष्टेचे आम्हा सर्वांना उलट मोठे कौतुकच वाटे!
एके दिवशी संध्याकाळी जेवण आटोपल्यावर मी एका समानशील सोबत्याबरोबर बॉरोडेल दरीत शतपावलीस निघालो. अहा! ही शतपावली कधी तरी विसरणे शक्य आहे काय! ह्या डोंगरातील सडकही रूंद, प्रशस्त आणि धुतल्यासारखी स्वच्छ होती. दोहों बाजूस हजार हजार फुटांचे उंचवटे क्वचित अगदी अंगाला येऊन भिडत, क्वचित पुन्हा मागे हटत, त्यांवरून नाना जातींची झाडे पालवली होती, फुले फुलली होती, लता लोंबत होत्या, लोहाळे लगटले होते, भारतीय देखाव्यांची प्रमुख लक्षणे जी रंगीबेरंगी शोभा आणि परिमळाचा दर्प ती मात्र येथे नव्हती, तथापि सौंदर्यात उणीव भासत नव्हतीच. उजवीकडचा कडा सरळ तुटला होता. डावीकडे डरवेंट नदी खडकातून उतरत असता आपल्याशीच मंद स्वरात मंजुळ ओव्या गात होती. त्या स्वरास सृष्टि—राग म्हणतात असे माझ्या मित्राने सांगितले.
चहूकडे इतके निवांत की पातळ पानही लवत नव्हते. शांतीचे साम्राज्य जणू डोळ्यांनी निरखू लागलो. सुधारणेची कटके तिने येथून बारा कोस पळविली होती. सुधारणा, उद्धारणा वगैरे विचारांचा गवगवाही बंद पडला. बाह्य शांतीमुळे अंतरातील खोल शब्द अधिकाधिक स्पष्ट ऐकू येऊ लागले. ९|| वाजले होते तरी असा गोड संधिप्रकाश पडला होता की, वाचता सहज यावे. समोर कॅसल क्रॅगच्या निमुळत्या मनो-यावर दशमीचा चंद्र लोंबत होता. आम्ही दोघे संगतीने चललो होतो, तरी बोलक नव्हतो. स्वतः कौतुक करण्याचीही वेळ मागेच टळून गेली होती, मग संवादाला जागा कुठे राहिली! जसजसे पुढे जावे तसतशी दरी आकसू लागली. नकळतच सृष्टीने आम्हांला शेवटी अगदी अंतःपुरात नेले! तेथे जिवलग जनांचीही स्मृती उरली नाही. निकट विषयांचेदेखील भान उडाले. लौकिकातून नाहीसेच झालो!
असा कोण जादूवाला ह्या भरलेल्या अंतःपुरात होता की, ज्याने आमची अशी पाहता पाहता पराधीन अवस्था करून सोडली! वरती जो एकदा लय लागला तो खाली करण्याची काही शक्ती उरली नाही.
आनंद होत होता काय आम्हांला?
सांगवत नाही. काही वेळापूर्वी मात्र झाला होता खरा.
आम्ही काही पहात होतो काय?
नव्हतो! दिसत होते पण काहीतरी!
मागितले का काही?
छे हो! काय मागावयाचे?
जिवाला कसे होत होते?
मधूनमधून सुस्कारे बाहेर पडत होते!
ते का म्हणून?
कोणी सांगावे! काहीतरी आतून बाहेर निघत होते व काही बाहेरून आत शिरत होते-छे, मी काहीतरी वेड्यासारखे वर्णन करीत आहे.
एकूण हा प्रकार काय? आणि ते कोण?
“prayer is the burthen a sigh,
The falling of a tear,
The upward glancing of an eye,
When none but God is near.”
-(Montgomery)
(मुखी श्वास, आसवे गाळी | नेंत्री वरतीच न्याहाळी |
अशा या प्रार्थनेच्या काळी | जवळी तोचि एकला ||१||)
कवीने हे वरील उद्गार कोणत्या वेळी काढले असतील ते असोत. मला तर आता असे कळून चुकले आहे की, वरील जो प्रकार घडला ती माझी प्रार्थना होती. आणि परमेश्वरावाचून जवळ कोणी नव्हते. एकूण प्रार्थनेचे काम इतके साधे व सोपे आहे काय? होय. कार्ळाइलही तेच सांगत आहे.
“Prayer is and always remains a native and deepest impulse of the soul…On the whole, silence* is the one safe form of prayer known to me in this poor, sordid era-though there are ejaculatory words too, which occasionally rise on one,with a felt propriety and variety.”
*ह्याचे भाषांतर तुकारामाच्या विचारात असे आले आहे:-
‘करावी ते पूजा मनेची उत्तम| लौकिकाचे काम काय तेथे’ ||१||
देवी! अशी प्रार्थना करावयाला व ही भेट घ्यावयाला सरोवर प्रांतापर्यंत येण्याचीच जरूरी आहे काय? नाही. जेथे कसली उपाधी नाही, अशा कोठल्याही उघड्या जागेत आणि मोकळ्या हवेतही उपासना घडण्यासारखी आहे. माणसांच्या गर्दीतही देवा तू भेटतोस. नाही कसे म्हणू! घरी आईची माया, बहिणीची प्रीती, पत्नीचा अनुराग, पुत्राचे वात्सल्य, समाजात शेजा-याची सहानुभूती, मित्रांचा स्नेह, राष्ट्रात देशभक्तांची कळकळ व संतांचा अनुग्रह आणि शेवटी जगतात महात्म्यांची निरपेक्ष अनुकंपा इत्यादी दर्शनेही तुझ्याशिवाय इतर कोणाची असू शकतील? जनात तुझा असा साक्षात्कार घडतो खरा, पण तो किती विरळा. उलटपक्षी किती कठीण अनुभव येतो! पण एथले तुझे रूप कसे अबाधित आणि अखंड आहे! हे वरचे आकाशाचे छत कधी फाटेल काय! हा खालचा सरोवराचा आरसा कधी फुटेल किंवा मळेल काय! ह्या पाखरांचे गळे कधी बसतील काय! हे पर्वताचे तट, हा वा-याचा पंखा, वृक्ष, वल्ली, दळ, पाषाण, पाणी, आकाशातील मेघ ह्यांवरूनही सर्वत्र ईश्वरा ‘तुझी कुशलधाम नामावली’ कशी सुवाच्य रेखाटली आहे! लहान बालके देखील ती वाचून आनंद पावतात! मग आम्ही का असे वारंवार विन्मुख व्हावे! हे कल्याणनिधान, आम्ही स्वत:भोवती जो क्षुद्र चिंतेचा गुंता निरंतर गोवीत असतो तो तूच करूणेने उकल, आणि आतासारखेच वेळोवेळी आपल्याकडे कृपाहस्ताने आम्हांला ओढून घे. आमच्या इच्छेनेच तुजकडे येण्याची आमची शक्ती नव्हे!
वगैरे वगैरे प्रार्थना देव भेटून गेल्यावर, उघडपणे करीत आम्ही परत कुटिकेंत आलों.