मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ति
४
(प्रार्थनामंदिर ता. २७-३-१९१०)
मन मनासि होय प्रसन्न | तेव्हां वृत्ति होय निरभिमान ||१||
पावोनि गुरूकृपेची गोडी | मना मन उभवी गुढी ||२||
साधके संपूर्ण | मन आवरावे जाण ||३||
एका जनार्दने शरण | मने होय समाधान ||४||
गेल्या तीन खेपेस ईश्वरावरील श्रद्धा, ईश्वराविषयी भक्ती व ईश्वराची उपासना हे तीन परमार्थ प्रपंचात राहूनच अनुक्रमे मनुष्यमात्राविषयी आदर, प्रेम आणि मनुष्याची सेवा ही करून साधता येतात हे सांगितले. आता चौथा आणि शेवटचा जो परमार्थ (मोक्ष) तोही प्रापंचिक साधनानेच कसा साध्य करून घेता येईल, हे पाहू.
वरील अभंगात एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे आपले मन आपणाला प्रसन्न करून घेतले म्हणजे मोक्षप्राप्ती झाली असा खरा अर्थ आहे. तुकारामही म्हणतात:
मन करारे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण ||
मोक्ष अथवा बंधन | सुख समाधान इच्छा ते ||
मने प्रतिमा स्थापिली | मनें मना पूजा केली ||
मने इच्छा पुरविली | मन माउली सकळाची ||
मन गुरू आणि शिष्य | करी आपलेंची दास्य ||
प्रसन्न आपआपणांस | गति अथवा अधोगति ||
साधक वाचक पंडित | श्रोते वक्ते ऐका मात ||
नाही नाही आन दैवत | तुका म्हणे दुसरें ||
मन प्रसन्न करा, तेच सिद्धीचे कारण. आपले मन हे प्रत्यक्ष दैवत आहे. त्याच्याशिवाय इतर देवतांस मनामध्ये थारा दिल्याने मनोदेवता प्रसन्न प्रपंच आणइ परमार्थ ही घडणार नाहीत, इत्यादी तुकारामाचे एकनाथाप्रमाणेच म्हणणे आहे.
एकादे आपण सत्कृत्य केले, एवढ्यावरूनच भागत नाही. त्या सत्कृत्याने आपले मन आपणांस राजी झाले पाहिजे. अखेरची गुढी उभी राहावयाची ती मनानेच उभारली पाहिजे. म्हणजे आज्ञा करावयाची ती मनाने आणि ती पार पाडल्यानंतर पसंतीही मनाकडून मिळावयास पाहिजे. मनाने सांगितले की, ठीक केले, म्हणजे झाले. इतरांना बरे वाटले नाही तरी हरकत नाही. उलटपक्षी सर्वांकडून स्तुतीचा वर्षाव चाललेला आहे, पण आपले मन प्रसन्न नाही तर प्रपंचातसुद्धा सुख होत नाही, मग ज्याला स्वर्ग म्हणतात तेथे ते कसचे होईल?
मोक्षप्राप्ती म्हणजे तो काही दूरचा प्रसंग नाही. तो पदोपदी येणारा अनुभव आहे. मागे गेलेला किंवा दूरचा प्रसंग नाही. तो पदोपदी येणारा अनुभव आहे. मागे गेलेला किंवा नंतर येणारा काळ अथवा स्थिती नव्हे, तर सर्व काळी, सर्व ठिकाणी मनाची प्रसन्नता असणे शक्य झाल्यावर प्राप्त होणारी ती दिशा आहे, अनंत युगांनी मोक्षाचा काळ येणार असे जर धरले तर ही शंका उदभवेल की, पुरातन काळी होऊन गेलेल्या साधु-संतांस मोक्षप्राप्ती झाली नाही काय?
मन प्रसन्न झाले असता जे सुख मिळते, त्या सुखामध्ये आणि परामार्थिक सुखामध्ये बिलकूल फरक नाही. आपले मन नेहमी प्रसन्न ठेवावे, ह्याबद्दल तुकारामबोवांचा असा सणसणीत उपदेश आहे:
जेणे घडे नारायणी अंतराय | होत बाप माय वर्जावी ती ||
तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय | आणिक उपाय दु:खमूळ ||
न मानावें तैसें गुरूंचें वचन | जेणें नारायण अंतरे तें ||
देव जोडे तरी करावा अधर्म | अंतरे ते कर्म नाचरावे ||
आणि भगवद्गीतेंतही असें म्हटलें आहे :
‘सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज |’ नेमून दिलेली कर्तव्ये करीत असता त्यायोगे जर देव अंतरेल तर ती कर्मे सोडून द्या. तुम्हांमध्ये आणि ईश्वरामध्ये तुमचे आईबाप किंवा गुरू आड येऊ लागले तर त्यांनाही सोडा. ह्या ठिकाणी मन म्हणून जो आपला अंश आहे तो साक्षात ईश्वराचा अंश आहे असा अर्थ आहे. म्हणजे मन हा एक जीव आणि ईश्वर ह्या दोघांस जोडणारा दुवा आहे. म्हणून मन प्रसन्न होण्याच्या मार्गात जो जो अडथळा येईल तो तो काढून टाका, म्हणजे मोक्षप्राप्ती होईल. असा द्वैतवादी व अद्वैतवादी सर्व संतांनी एकमताने सिद्धांत केला आहे. साधूची गोष्ट बाजूस ठेवून आम्ही आपापल्या मनाची जरी साक्ष विचारली तरी तेही असेच सांगेल. मनाला सैरावरा धावू न देता आवरावे हे खरे, पण आवरता आवरता त्यास प्रसन्न करावे हे त्याहून खरे, ईश्वरावरील श्रद्धा, ईश्वराची भक्ती, त्याची उपासना, ह्या तीन परमार्थांनी अखेरीस आपल्या मनाची तळमळ मिटून त्याला शाश्वतीची शांती मिळते. तिचेंच नांव निर्वाण अथवा मोक्षप्राप्ती हें होय.