मानवी आदर आणि दैवि श्रद्धा
१.
(प्रार्थनामंदिर ता. २७-२-१९१०)
सेवा-भक्ति-भाव, नेणें मी पतित ||
-तुकाराम
परमेश्वरावर प्रथम भाव ठेवणे, त्यासच आपल्या प्रेमाचा विषय करणे, त्याची इच्छा तीच आपली इच्छा अशा भावनेने त्याची सेवा करणे आणि ह्या तीन साधनांच्याद्वारे प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित ह्या कर्मबंधनातून मुक्त होणे, ह्या परमार्थाच्या चार पाय-या आहेत. परंतु परमेश्वराचे स्वरूप म्हणजे अगदी अतर्क्य आणि अज्ञेय हा अनुभव लहानमोठ्या सर्वांसच येतो. “न कळे महिमा वेद मौनावले | जेथे पांगुळले मन पवन |” असे संत सांगतात. तर मुळी समजण्यासच कठीण, अशा परमेश्वरावर भाव कसा ठेवावयाचा,भक्ती आणि सेवा कशी करावयाची आणि मुक्त कसे व्हावयाचे? आम्ही प्रापंचिक माणसे, आमच्या अल्पशक्तीचा आणि वेळेचा बराच भाग आमच्या प्रापंचिक गोष्टीतच खर्च होणार. बाल्य, जरा, व्याधी इत्यादिकांमध्ये आमच्या आयुष्याचा बराच भाग निकामी होणार. अशा स्थितीत परमेश्वरासंबंधी भाव, भक्ती, सेवा ही प्रत्यक्षपणे आमच्या हातून कशी घडावी? तशी आमची इच्छा असूनही, घडणे जवळ जवळ अशक्य आहे. म्हणून आमच्या प्रापंचिक व्यवहारातच जर कोणी असा मार्ग दाखवून दिला, आणि आमच्यातील परस्पर व्यवहारांना कोणी असे वळण लावून दिले की, त्याचे पर्यवसान वरील भाव, भक्ती, सेवा ह्यांमध्ये साहजिकपणे होईल, तर मोठी चांगली गोष्ट होईल. एरवी परमेश्वराविषयी कितीही दर्शने स्थापिली, कितीही कंठरवाने उपदेश केला, तरी त्याचा तादृश्य फायदा होणार नाही. प्रापंचिक व्यवहार आणि त्यातील अपूर्णता समूळ नाहीशी होऊन, केवळ वरील पारमार्थिक भावनांचे साम्राज्य चालेल हे संभवत नाही. व्यक्तीविषयक अपवाद सोडून दिले, आणि सर्व मनुष्यजातीचा समवायाने परमार्थ साधावयाचा असला तर तो ह्या आमच्या रोजच्या प्रापंचिक व्यवहारालाच हळूहळू योग्य वळण देऊन साधणार आहे. म्हणून आम्हांस परमार्थाची काही प्रापंचिक साधने कोणी सांगेल तर तोच खरा उपदेशक.
परमार्थाच्या उपदेशकास प्रापंचिकांनी जर वर सांगितल्याप्रमाणे आपली अडचण कळविली तर ती अगदी योग्य होईल. आणि ती ध्यानात ठेवून उपदेशकाने आपला सर्व रोख अवश्य वळवावयास पाहिजे ह्यात संशय नाही. म्हणून आम्ही प्रथम ईश्वरावर आमची श्रद्धा प्रत्यद्ध एकदम जरी जडली नाही, तरी पर्यायाने कशी जडेल हे पाहू. संसारात इष्टमित्र, सखेसोयरे, आश्रितजन आणि परकीय ह्यांच्यामध्ये परस्परांचा नित्य संबंध येतो. त्यात असे एक वर्तनाचे कोणते तत्त्व आहे की, जे पूर्णपणे आणि निश्चयाने सांभाळिले असता त्याचे पर्यवसान ईश्वरी श्रद्धेमध्ये होईल? एकदम सांगावयाचे म्हणजे आम्ही जर परस्परांशी आदरबुद्धीने वागू आणि त्यामध्ये कधीही चूक होऊ देणार नाही, तर शेवटी आमची ईश्वरावर आपोआपच श्रद्धा जडलेली आहे असे आपणांस आढळून येईल. रोजच्या व्यवहारात मनुष्यप्राण्याशी किंबहुना भूतमात्राशी आदराने वागल्याने अपरिमित, अप्रमेय ईश्वरावर श्रद्धा ती कशी बसेल ह्याविषयी शंका उत्पन्न होईल. पण आदराचे हे व्रत अखंड चालविल्यानेच वरील शंकेचे निरसन होणार आहे. एरवी शाब्दिक युक्तिवादाने ते होणार नाही.
मनुष्यमात्राशी आदरबुद्धीने वागावे ही त्यातल्यात्यात सुलभ गोष्ट आहे. दुस-याने आपला अपराध केला तर त्याला क्षमा करावी, दुस-यावर आपल्या स्वत:प्रमाणेच प्रेम करावे, ह्या गोष्टी कठीण भासतात, इतकेच नव्हे तर त्या अधिक महत्त्वाच्या वाटतात. पण पुष्कळ प्रसंगी क्षमेचा आणि प्रेमाचा प्रसंगच येत नसूनही आपण क्षमा आणि प्रेम करीत आहो असे आपल्यास मात्र वाटत असते. क्षमा करावयाच्या पूर्वी दुस-याने खरोखरीच आपला अपराध करावयास पाहिजे. पुष्कळ वेळां असे घडते की, दुस-याकडून अपराध झालेला नसतो तो आम्ही उगाच मानून घेऊन क्षमा करीत असतो. आणि यद्यपि खरोखर अपराध झाला असला, तरीक्षमा करण्याचा अधिकार आपणाकडे न घेता तो ईश्वराकडे सोपविणे अधिक श्रेयस्कर असते. काही झाले तरी क्षमेची भावना आपल्या मनात येत असता दुस-यांच्या दोषांच्या जाणिवेचा थोडाबहुत विटाळ आपल्या मनाला होतोच. आदरबुद्धीचा तसा प्रकार नाही. सर्व मनुष्यांस आपल्यासमान लेखणे हा आदरबुद्धीचा अर्थ आहे. दुस-याचे दोष दिसल्याबरोबर आपल्या दोषांचे स्मरण होणे, दुस-यांची पापे पाहिल्याबरोबर जणू काय ती आप-या हातून घडली, असे वाटून त्याविषयी अनुकंपा बाळगणे हे आदरबुद्धीचे लक्षण. दुस-याच्या शरीराला क्षत पडल्याबरोबर आपल्या मनाला दु:ख होते, तर दुस-याच्या मनाला क्षत पडल्याबरोबर आपल्या मनाला जास्त दु:ख व्हावयास पाहिजे. पण असे न होता, दुस-याच्या मनाचा उणेपणा अथवा अपराध नजरेस आल्याबरोबर आपण आपल्यामध्ये क्रोध आणि तिरस्कार ह्यास जागा देतो. ह्याचे कारण मनुष्यमात्रासंबंधी आपल्यामधील आदरबुद्धीचा अभाव हेच होय. ‘आत्मवत् सर्वभूतानि य: पश्यति स पश्याति|’ हे आदरबुद्धीचे योग्य प्रवचन आहे. आदरबुद्धी म्हणजे केवळ औपचारिक ओढून ताणून आणलेला दरबारी संभावितपणा नव्हे. मनुष्याचे मन-मग तो मनुष्य कसाही असो-ही एक आदरणीय वस्तू आहे, सुखदु:ख, पाप आणि पुण्य ह्या सर्व स्थितीत ह्या मानवी मनाशी अन्यायाने, बेपर्वाईने, निष्काळजीने कधीही वागता कामा नये, अशी आपल्या मनाला संवय लावावी. सर्व प्राणिमात्रांच्या जीवास धक्का न लागावा, म्हणून अहिंसेचे जे तत्त्व आम्ही आचरितो, ह्याच तत्त्वाचा अधिक परिणत विकास म्हणजे मानवी मनाशी आपल्यामध्ये आदराची उपजतबुद्धी राखणे हे होय.
एकाच कुटुंबामधील माणसे पुष्कळ मागे परस्पराशी भांडून रूसतात आणि अलग होतात. पण कौटुंबिक रक्तसंबंधामध्ये असे काही अपूर्व रसायन आहे की, त्यायोगे हा रूसवा-फुगवा लवकरच नाहीशी होऊन ती एकत्र होतात. परंतु परकीयाशी बेबनाव झाला तर आपल्यामध्ये वरील उपजत आदरबुद्धीचे रसायन नसल्यास हा तुटलेला संबंध पुन्हा जुळून येत नाही. पण ह्या आदराच्या भावनेत आम्ही नित्य वागू लागलो, तर संसारातील ब-याच कटकटीच्या प्रसंगी आपल्या मनाला जखमा होणार नाहीत; झाल्या तरी त्या लवकर भरून येतील आणि मनाची पुष्कळ मोडतोड आणि झीजही होणार नाही.
ही आदरबुद्धी खालील तीन प्रकारांनी पाळण्याचे व्रत धरिले पाहिजे; जसे आपले विचार आपल्यास प्यारे असतात तसेच आणि तितकेच दुस-यांचेही विचार त्याना प्यारे असतात तसेच आणि तितकेच दुस-यांचेही विचार त्याना प्यारे असतात ही गोष्ट अगदी उघड आहे. तथापि एकाद्या विषयावर आपण चर्चा करू लागलो, तर ही गोष्ट आपण पार विसरून जातो, आणि चर्चा करणारे दोन्ही पक्ष आपले विचार आपल्यास प्रिय आहेत एवढ्याच समजुतीने बोलू लागतात. आपल्याला दुस-यास जे सांगावयाचे ते त्याला त्याचे विचार ‘प्रिय आहेत हे आपण जाणतो’ असे दाखवून नंतर सांगावे. प्रतिपक्षाला एकदा हा आमच्यातील आदरभाव समजला म्हणजे वादाची तीव्रता बरीच कमी होऊन जाते, नाही तर तो आमचा एक शब्दही ऐकणार नाही व जर ऐकू लागलाच तर त्याचा आमच्याविषयी गैरसमज होईल. प्रथमारंभीच आदराच्या ह्या नियमाची हेळसांड करून आपण वादविवाद करू लागल्यास वाद एका बाजूस राहून द्वंद्व माजते व प्रकरण हातघाईवर येते. ज्याची मते ज्याला त्याला प्रिय असतात, म्हणून कोणास कोणी काही सांगू नये असा ह्याचा अर्थ नव्हे. परंतु त्याला मान्य नसलेले असे काही आपण त्याला सांगावयाचे असते, म्हणून आपण त्याची तयारी करण्यासाठी त्याच्या मताविषयीचा आपला पूज्यभाव त्याच्या मनावर चांगला ठसविण्याची जरूरी आहे.
दुसरा प्रकार, दुस-याच्या मनोवृत्ती सांभाळणे हा होय. आपल्याप्रमाणेच दुस-यालाही वृत्ती आहेत, आणि दुस-याप्रमाणेच आपल्यामध्येही व्यंगे आहेत. दुस-याने जर आपल्याशी सांभाळून वागावे असे आपणांस वाटते तर आपणही दुस-याशी तसेच वागले पाहिजे. नाही तर बेपर्वाईने, बेगुमानपणाने, व्याख्यानाच्याद्वारे, वर्तमानपत्राच्याद्वारे किंवा अन्य त-हेने आम्ही आपला हलगर्जीपणा दाखविला तर त्याचा दुष्परिणाम दोघांनाही भोवतो. तिसरा प्रकार हा की, केवळ दुस-याचे दोषच सांभाळून न राहता दुस-याच्या गुणांचे आणि कृतीचे योग्य मंडन केले पाहिजे. एकाद्याच्या हातून काही कृत्य घडले व ते लोकांच्या कानी घातल्यापासून फायदा आहे अशी आपली खात्री झाली तर, त्याची प्रसिद्धी करणे आपले कर्तव्य आहे आणि तसेच दुस-याच्या आनंदाने आपण आनंदी होणे हे मोठेपणाचे लक्षण आहे.
ह्याप्रमाणे आम्ही जर मनुष्यमात्राशी आदराने वागू तर ह्याच प्रापंचिक आदरबुद्धीचा विकास ईश्वराच्या ठायी आमची श्रद्धा जडण्यामध्ये होईल. तुम्ही प्रेम करा, न करा, क्षमा बाळगा न बाळगा, पण हा आदरभाव कायम ठेविल्यास प्रेम आणि क्षमेचे श्रेय येईल. घडोघडी संबंध जडणा-या मनुष्याशी अनादराने वागून अदृश्य ईश्वरावर श्रद्धा ठेवणे कधीतरी आम्हांला संभवनीय होईल काय? पाया आणि तळमजला असल्याशिवाय वर भरभक्कम किल्ला आहे हे मानणे जसे वेडगळपणाचे होईल, तसे आदर नसताना मी श्रद्धावान होईन हे म्हणणेही वेडगळपणाचे आहे. ईश्वर मला तारो वा मारो, मी त्याचे पाय दृढ धरीन, त्याचे रूप कसेही असो त्याची वसती मजमध्ये आहे असे मी मानीन, पण शेजारच्या मनुष्याशी माझा आदरभाव आहे की नाही इकडे लक्ष देणार नाही हे म्हणणे चमत्कारिक दिसते. उलटपक्षी आपण ह्या प्रपंचामध्ये ह्या आदराचा सुलभ मार्ग चालून जाऊ, तर काही काळाने आपल्यामध्ये आपोआप ईश्वरी श्रद्धेचा साक्षात्कार होईल, म्हणूनच तुकाराम म्हणतात :
नको मज ताठा नको अभिमान |
तुजवांचुनि क्षीण होतो जीव ||१||