खडतर पांच वर्षे

स्वभावदोष  :   येथपर्यंत घरांतील दारिद्र्याच्या मीं ज्या आठवणी दिल्या त्या केवळ माझ्या बाबांच्या व विशेषतः आईच्या स्वभावाचें वर्णन करण्यासाठीं दिल्या.  त्यांच्या स्वभावांतील दोष दाखविण्यासाठीं नव्हे.  ह्या दारिद्र्याचें कारण माझ्या बाबांचा आळशी स्वभाव असेल, पण कोणत्याही प्रकारची कोणाची फासवणूक किंवा अप्रामाणिकपणामुळें त्यांच्या उत्पन्नामध्यें आलेला तोटा हें नव्हतें.  आतां ह्यापुढेंही कांहीं आठवणी द्यावयाच्या.  त्यांत बाबांच्या स्वभावांतले कांहीं दोष दिसतील.  पण ते त्यांचे दोष नसून-निदान दोष दाखविण्याचा माझा हेतु मुळींच नसून- माझ्या आईच्या स्वभावांतला दैवी चांगुलपणा दाखविण्यासाठींच केवळ त्या आठवणी मी देत आहें.  माझ्या आईच्या सहिष्णुतेची पारख करण्याकरितां व आम्हां मुलांच्या भावी शिक्षणाकरितां देवानें आम्हांला दारिद्र्य हा मित्र दिला.  त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोंत.  पण त्याही पुढें आम्हां मुलांची नसली तरी आमच्या आईची पारख करण्याकरितां आम्हांवर जें दुर्धर संकट आलें, त्याबद्दल काय म्हणावें हें समजत नाहीं.  तें संकट म्हणजे माझ्या बाबांना निशा करण्याचें व्यसन लागलें हें होय !  बाबांना प्रथम गांजा ओढण्याचें व नंतर कांहीं दिवसांनीं दारू पिण्याचें व्यसन लागलें !

संस्थानी नोकरी  :  बाबा त्यांचे लहानपणापासून सुखांत व लाडांत वाढलेले.  पैशाचा लोभ त्यांच्यामध्यें मुळींच नव्हता.  लोभाचा इतका अभाव कीं त्यामुळें त्यांना पैशांची योग्य किंमतही कळत नव्हती, असें म्हटलें तरी चालेल.  त्यांचे शिक्षण बैठें आणि पांढरपेशी होतें.  ही स्थिति त्यांचें अर्धे वय म्हणजे जवळजवळ ते चाळीस वर्षांचे होईपर्यंत चालून मग त्यांना दारिद्र्य आल्यानें पुढें त्यांच्या स्वभावांत व धंद्यांत फरक पडणें कठीण झालें.  जमखंडीचे यजमानांशीं ते भांडून आपण होऊनच घरीं बसले होते व त्यावर यजमानांनीं दोनतीनदां बोलाविलें तरी ते गेले नाहींत.  मला समजूं लागल्यावर ते म्हणत असलेले मला आठवतें कीं, आपण कोणता धंदा नोकरीशिवाय केला नाहीं व आतां नोकरीही जमखंडीच्या यजमानांशिवाय दुसरीकडे करावयाची नाहीं.  आणि हा आग्रह-मग तो बरा असो कीं वाईट असो - त्यांनीं सोळा वर्षे चालविला.  माझ्या जन्माचे सुमारास म्हणजे इ.सन १८७३ चे सुमारास त्यांनीं नोकरी सोडली.  पुढें सोळा वर्षांनी त्यांचा हा करारी आग्रह पाहून यजमान श्रीमंत आप्पासाहेबांनीं आपणच इ.सन १८९० चे सुमारास त्यांना स्टोअरकीपरचें (हिशेबी) विश्वासाचें काम दिलें.  पण दरमहा पगार दहा रुपये होता.  १६ वर्षे घरीं अभिमानानें बसलेल्या नोकराला पुन्हां बोलावल्याबद्दल आप्पासाहेबांचे आभार मानायचे कीं इतक्या जुन्या अनुभवी माणसाला इतका लहान पगार दिल्याबद्दल त्यांच्या कंजूषपणाची तारीफ करावयाची हें ठरविणें कठीण.  पण कांहीं असो, बाबांचा हा पगार व माझी स्कॉलरशिप ह्यावर आमच्या आईनें आमच्या संसाराचें आझें हाकललें.  शिवाय ह्या वेळीं मी इंग्रजी ६ आणि ७ व्या इयत्तेंत गेल्यानें मला पुस्तकांचा खर्च येऊं लागला तोही भागला.  जमखंडी हायस्कुलांत शाळेची फी सातव्या इयत्तेअखेर दरमहा एकच आणा असल्यानें माझ्या दुय्यम शिक्षणांत खंड पडला नाहीं.

व्यसनी विराप्पा  :  इ.सन १८९० चे सुमारास बाबांना ही नोकरी लागली. इ.सन १८८५ सालांत माझा मोठा भाऊ वारल्यापासून ह्या पांच वर्षांत माझ्या आईनें काय दुःख व कष्ट सोशिले तें आमच्या डोळ्यांसमोर आहेत.  कारण नुसतें दारिद्र्यच नव्हें तर बाबांना निशाबाजी लागली ह्याचें तिला फार दुःख होई.  तरुणपणीं बाबांचे हातीं जेव्हां मुबलक पैसा खेळत होता, तेव्हां त्यांना नुसतें तंबाकूचेंही व्यसन नव्हतें.  पानांचा विडाही ते नेहमीं खात नसत.  उतारवयांत त्यांना हें गांजाचें व्यसन लागलें, ह्याचें कारण त्यांची दारिद्र्य-वेदनांमुळें उदासीनता आणि किंकर्तव्यता हीच होय.  बाबांना पुढें पुढें कांहीं सुचेनासें झालें.  अशांत त्यांच्या भाविकपणामुळें ते आल्या-गेल्या साधूजवळ, बैराग्याजवळ जाऊन बसूं लागले.  अर्थात् हे बैरागी म्हणजे निःसंग फिरस्ते, गांजेकसच असणार.  त्यांच्या बेजबाबदार व बेपर्वाईच्या गोष्टी ऐकत बसतांना बाबांना आपल्या संसाराच्या वेदनांचा विसर पडत असावा.  मग त्यांत गांजाच्या व्यसनाची भर पडण्यास काय उशीर !  तशांत ज्या दत्त सांप्रदायाच्या ते ह्या वेळीं नादीं लागले होते, त्यांतील बरीच मंडळी आळशी, उनाड व गांजेकस होती.  त्यांत विराप्पा नांवाचा एक कोष्टी गृहस्थ होता.  तो स्वभावानें फार चांगला होता.  तो कांहीं कानडी साधुसंतांची पदें फार रसिक तर्‍हेनें म्हणत असे.  पण त्याला गांजाचें व्यसन फार जबर होतें.  तो माझ्या बाबांचा मोठा सोबती होता.  माझ्या बाबांना व्यसन लागण्याचें हें एक कारण.  विराप्पा तर ह्या व्यसनापायींच शेवटीं वारला.  हा आपल्या मित्राचा नाश झालेला पाहून माझे बाबा मात्र शुद्धीवर येऊन निवळले !

बबलादीचे सिद्ध  :   पण इतक्यांत बाबांना दुसरी वाईट संगत लागली.  ती म्हणजे मागें सांगितलेल्या बबलादीच्या लिंगायत साधूंची.  बबलादीचे हे सिद्ध पुरुष त्या काळीं कानडी प्रांतांतले बरेच प्रसिद्ध देवर्षि होते.  जमखंडीच्या पूर्वेस सुमारें १२ मैलांवर कृष्णा नदीचे कांठीं विजापूर जिल्हांत बबलादी नांवाचें एक खेडेगांव आहे.  त्या गांवी ह्या सिंद्धांचा मठ आहे.  चंद्रगिरी नांवाच्या एका देवतेचा ह्या सिद्ध घराण्याच्या मूळ पुरुषाला प्रसाद होता.  ते मूळ पुरुष चांगले निःसंग साधु असावेत, असें त्यांनीं केलेलीं कांहीं अनुभवी कानडी पदें या सिद्धांच्या बरोबर हिंडणारे अनुयायी म्हणत, यावरून दिसतें.  ह्या सिद्धांच्या आशीर्वादानेंच पुन्हां नोकरी लागली, अशी आमच्या बाबांची समजूत होती.  बबलादीचा संप्रदाय त्या प्रांतांत तेव्हां वाढत होता.  त्यांपैकीं सर्वांत वडील सिद्ध शंकराप्पा, त्यांचे चिरंजीव सदाशिवाप्पा आणि त्यांचे दोन पुतणे गंगाप्पा व शिवरुद्राप्पा असे चौघेजण आळीपाळीनें कर्नाटकांत फिरतीवर भिक्षेस निघाले म्हणजे आमचे घरीं येऊन उतरत असत.  याशिवाय त्यांचे शिष्य पडसलगी नांवाच्या एका खेड्यांत (आईच्या माहेरगांवीं) आलगुरास तवनाप्पा नांवाचे एक पूर्वाश्रमींचे जैन जातीचे सिद्ध होते.  ह्यांच्याच मार्फत बाबांचा बबलादीशीं संबंध जडला.  हा इ.सन १८८९ सालीं जडला असावा.  इ.सन १८९० मध्यें बाबांना नोकरी लागली.  हे स्वामी उघड उघड अभेद-मार्गी असत, म्हणजे जातिभेद पाळीत नसत.  ते कोणाची पर्वा करीत नसत व निःस्पृह आणि धुंद असत.  ते दारू पीत व मांस खात.  तुळजापूरची देवी आमची कुळदेवता.  तिला मांसाचा नैवेद्य जरूर लागतो.  तुळजापूरचे भोपे भाऊराव कदम आमचेकडे भिक्षेला आले कीं हा नैवेद्य होत असे.  शिवाय एक रामदासी ब्राह्मण संन्यासी येत.  ते तर दारू व मांस दोन्हीही घेत.  अशा अनेकांच्या संगतींत बाबांना दारूची ही चटक लागली व मांसाचा प्रघात आमचे घरांत पडला असावा.  तरी पण आमच्या दारिद्र्यामुळें त्यांचें हें व्यसन अनावर होऊं शकलें नाहीं, हे आमच्या दारिद्र्यमित्राचे आम्हांवर मोठे उपकारच !

स्वभावांतील पालट  :  प्रथम प्रथम बबलादीच्या सिद्धावर माझीही चांगली श्रद्धा होती.  ते घरीं आले कीं त्यांची पूजा आमचे घरीं होत असे.  चहूंकडून सर्व जातींचे भक्त येत.  स्वामी तुळशी-कट्टयावर बसत व आम्ही ताटांत कापूर ठेवून आरती म्हणत ओवाळावयाचें व त्यांच्या पायांवर फुलें घालावयाचीं हीच काय ती त्यांची साधी पूजा होती.  आरती झाल्यावर भक्त लोक दारूच्या बाटल्या त्यांचेपुढें ठेवीत आणि आशीर्वाद मागत.  ती दारू सर्वजण पीत.  त्यांत मोठा वांटा ह्या सिद्धाचा असे.  दारूच्या निशेंत सिद्धाच्या तोंडून जीं भविष्यवाक्यें निघत तीं खरीं होत, अशी भक्तांची समजूत असे.  ही आरती करीत असतांना मीच ताट ओवाळीत असें व कानडींतील यांच्या संप्रदायाच्या आरत्या व इतरही चांगलीं पदें मी नीट चालीवर म्हणत असें.  शाळेंतला माझा चांगला अभ्यास, माझी श्रद्धा व निर्व्याज वर्तन वगैरेमुळें मीही त्या सर्व साधूंना आवडत असे.  पण पुढें माझी इंग्रजी हायस्कुलांतील मॅट्रिकची परीक्षा पास होऊन मी कॉलेजांत जाऊन पुणें-मुंबईकडचें मला नवें वळण लागल्यावर त्या प्रांतीं लोकांत सिद्धांपेक्षां माझीच प्रसिद्धि होऊं लागली.  तेव्हां मात्र ही सिद्धमंडळी मला पाहून चपापूं लागलीं.  मी मोठा विद्वान् होईन, हें त्यांच्या तोंडचें कानडी भविष्य मीं कित्येक वेळां प्रत्यक्ष ऐकलें होतें.  मॅट्रिक क्लासमध्यें असतांनाच मला या सिद्धांच्या लीला आवडेनाशा झाल्या होत्या.  बाबांवरही माझ्या सर्व वर्तनाचा दाब बसून हें बंड आमच्या घरांतून अजिबात बंद झालें.  इतकेंच नव्हें तर पुढें नोकरी लागल्यावर बाबांच्या भांबावलेल्या मनाला कांहीं व्यापार मिळाल्यामुळें म्हणा किंवा माझ्यामुळें म्हणा त्यांची निशाबाजी अगदीं बंद झाली !  इ.सन १८९१ चे डिसेंबरांत माझी मॅट्रिकची परीक्षा पास झाली आणि माझ्यांतच नव्हे तर माझ्या घराण्यांतही मोठाच पालट झाला !