मॅंचेस्टर कॉलेज

इंग्लंडांतील प्रचारक पद्धतशीरपणें तयार करण्यासाठीं मँचेस्टर कॉलेज या नांवाची केवळ उदार धर्मशिक्षणासाठीं वाहिलेली संस्था ऑक्सफर्ड येथें आहे.  मँचेस्टर कॉलेज हे मँचेस्टर येथें प्रथम निघून लंडन वगैरे ठिकाणीं स्थलांतर पावून आतां ऑक्सफर्ड शहरांत स्वतःच्या कायमच्या इमारतींत चालू आहे.

वास्तविक पाहतां ही संस्था इ.स. १७५७ मध्यें वॉरिंग्टन अकॅडमी या नांवानें वॉरिंग्टन येथें स्थापन झाली.  तिचें पुढें १७८६ सालीं मँचेस्टर कॉलेज असें रूपांतर झालें.  या क्रांतीच्या काळीं संस्थापकांचा धर्म व शास्त्र या दोहोंवरही सारखाच विश्वास होता.  म्हणजे यांचा धर्म शास्त्रीय व शास्त्र धार्मिक होतें.

अध्यापक वर्ग  :  पहिले प्राध्यापक जॉन टेलर हे ( १७५७-६१ सालीं ) होतें.  इ.स. १८९७ सालापर्यंत प्रसिद्ध डॉ. मार्टिनो हे प्राध्यापक होते.  त्यानंतर माझ्या वेळीं व नंतरही डॉ. ड्रमंड हे प्रिन्सिपाल होते.  हे विद्येनें तसेच श्रद्धेनें आणि शीलानें फार मोठे गृहस्थ होते.  ह्यांच्याशिवाय प्रो. अप्टन (तत्त्वज्ञान), प्रो. कार्पेन्टर (तुलनात्मक धर्म व पाली भाषा), प्रो. ऑजर्स (Church history  -ख्रिस्तीसंघाचा इतिहास), प्रो. जॅक्स (समाजशास्त्र आणि Hibburt Journal चे संस्थापक व संचालक) वगैरे जाडे पंडित त्या विषयाचे अध्यापक होते.  प्रिन्सिपाल ड्रमंड हे बायबल आणि धर्मशास्त्र शिकवीत.  ह्यांपैकीं प्रो. कार्पेन्टर हे तुलनात्मक धर्म ह्या माझ्या ऐच्छिक विषयाचे विशिष्ट Tutor म्हणजे माझ्या अभ्यासावर देखरेख ठेवणारे, नेमून दिलेले गुरु असत.  त्यांच्याजवळ मीं पाली भाषा आणि बुद्धधर्माचा विशेष अभ्यास केला.  दोन वर्षांचा अभ्यास आटोपून ह्या कॉलेजचा डिप्लोमा मला देतेवेळीं कॉलेज-कमिटीकडे प्रो. कार्पेन्टरनें मजबद्दलचें जें प्रशस्तीपत्र पाठविलें त्यांत माझ्या खास गुरूनें (डॉ. कार्पेन्टरनें) चांगले गौरवपर आणि प्रेमळ उद्‍गार काढले होते.

पूर्व व पश्चिम  :  हिंदुस्थानांतील विश्वविद्यालयांप्रमाणें ह्या कॉलेजांत विद्यार्थ्यांची परीक्षारूपी शर्यत लावून त्यांच्या शहाणपणाचा दर्जा ठरवीत नाहींत.  नेमून दिलेले खास गुरु आपापल्या शिष्यांना निरनिराळ्या विषयांत निबंध लिहिण्यास सांगून त्यांच्या अभ्यासाची आणि विचारविकासाची पारख करतात.  वर्षअखेर खास निबंध लिहावयाला देऊन त्यांत दाखवलेल्या हुशारीप्रमाणें प्रशस्तिपत्र लिहून देतात.  कॉलेजांत विद्यार्थीही इकडच्याप्रमाणें शेंकड्यांनीं किंवा हजारांनीं मोजतां येण्यासारखा प्रकार मँचेस्टर कॉलेजांत नाहीं.  एका वेळीं फार तर १५।२० विद्यार्थ्यांहून जास्त नसतात.  तेही दोन वर्षांतून विभागलेले असतात.  ते दुसरीकडे बी.ए. अगर एम.ए. होऊन आलेले असतात.  अगोदरच कोणत्या तरी गीर्वाण प्राचीन भाषेंत त्यांना पदवी मिळालेली नसेल तर अशा कोणत्या तरी दोन प्राचीन भाषांचा अभ्यास करण्याची ह्या कॉलेजांत व्यवस्था असते.  मुंबई विश्वविद्यालयाचा संस्कृतचा बी.ए. असल्यानें मीं येथें पालीचा अभ्यास जास्ती केला.

धर्मपरिवार  :  मँचेस्टर कॉलेजचें महत्त्व त्यांतील केवळ ठराविक अभ्यासक्रमावर मुळींच अवलंबून नाहीं.  तें एक उदार धर्मशिक्षणाचें कुटुंबच होतें.  १५।२० विद्यार्थी, पांच सात प्रोफेसर, त्यांच्या मुली, नाती व इतर कुटुंबीय ह्या सर्वांचा धर्मपरिवार म्हणजेच कॉलेज.  कॉलेजची इमारत प्रशस्त, नवी आणि सुंदर.  अवाढव्य पुस्तकालय, गंभीर व स्वतंत्र उपासनालय आणि त्यांत दर आठवड्यांला प्रार्थनेसाठीं जमणारा ऑक्सफर्ड शहरांतील युनिटेरियन समाज असें एक कॉलेजहूनही मोठें कुटुंब होतें.  कॉलेजच्या उपासनालयांत प्रोफेसर मंडळी रविवारची साप्‍ताहिक उपासना चालवीत.  त्याशिवाय दर बुधवारीं सायंकाळीं कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्यानें उपासना चालवण्यास शिकावें म्हणून एक साप्‍ताहिक उपासना व उपदेश तयार करावयाचा असे.  तो ऐकून सूचना देण्यासाठीं एका खास प्रोफेसराची नेमणूक आहे.

निबंध व प्रयोग  :  ह्याशिवाय विद्यार्थ्यांना वत्तृफ्त्वाचे प्रसंग यावेत, मोठमोठ्या विषयांवर विचारविनिमय करण्याला त्यांना अवसर मिळावा म्हणून मार्टिनो क्लब या नांवाची संस्था स्थापन करण्यांत आली होती.  प्रत्येक टर्ममध्यें हा क्लब दोनदां भरत असे.  त्यांतच वर सांगितल्याप्रमाणें चेट्कॉव्ह ह्या रशियनानें रशियांतील धर्मशिक्षण ह्यावर निबंध वाचला.  हे मोठे ग्रंथकार असून प्रसिद्ध Socialist व Anarchist होते.  ऑक्सफर्डमधील सर्व युनिटेरियन समाजांतील स्त्रीपुरुषांचा परिचय व्हावा, विचारविनिमय वाढावा, म्हणून वर्षांतून निदान एक तरी मोठें स्नेहसंमेलन घडविण्यांत येत असे. अशा एका स्नेहसंमेलनांत The Romance of Social Reform in India ह्या विषयावर मीं एक निबंध वाचला.  नुसता निबंधच न वाचतां, 'हिंदुगृहपद्धति व सामाजिक स्थिति' कशी असते हें प्रत्यक्ष दाखविण्याकरितां मध्यम स्थितींतील कुटुंबाच्या देखाव्याची सजावट मीं करून दाखविली.  कांहीं तरुणांना व तरुणींना हिंदी पोषाख देऊन हिंदुपद्धतीनें बसविण्यांत आलें होतें.  पोषाक, सामान, नकली दागदागिने वगैरे एका दुकानांतून तात्पुरते आणले होते.  नवीन लग्न झालेली सूनबाई कोपर्‍यांत भिंतीकडे तोंड करून कशी बसते, जवळ आलेल्या परीक्षेसाठीं तिचा नवरा मोठमोठ्यानें घोकंपट्टी करीत दुसर्‍या कोपर्‍यांत कसा बसतो, कोणी वडीलधारें माणूस अवचित आल्यावर दोघें उठून कसे नमस्कार करतात वगैरे दृश्यें हावभावांसकट दाखविण्यांत आलीं.  एकंदर प्रयोग लोकांना इतकां आवडला कीं 'Inquirer' नांवाच्या युनिटेरियन समाजाच्या मुखपत्रांत हा निबंध आणि हा सर्व प्रकार प्रकाशित झाला.  इतकेंच नव्हे तर त्या सर्व लेखाचें भाषांतर एका फ्रेंच वर्तमानपत्रानें प्रसिद्ध करून त्याची एक प्रत मजकडे आभारपूर्वक पाठविली.

चहापान  :  नवीन टर्म सुरू झाल्यावर कॉलेजांतील वृद्ध प्रोफेसर प्रत्येक विद्यार्थ्याला समक्ष भेटून, आपल्या घरीं चहा घेण्याला दर आठवड्यांतून कोणता दिवस मुक्रर केला आहे तो कळवीत असत.  सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वसतिगृहांत जागा मिळत नसे.  असे विद्यार्थी गांवांत भाड्यांनें जागा घेऊन राहात असत.  अशा विद्यार्थ्यांच्या घरीं जाण्यासही प्रोफेसर्स कमीपणा मानीत नसत.  त्यांच्या घरीं चहाची परतभेट देण्यासही आनंदानें जात.  मग अशा कॉलेजला कुटुंब म्हणूं नये तर काय म्हणावें ?

उपासक  :  सकाळीं १० पासून दोन प्रहरीं १ पर्यंत तीनच तास कॉलेजची व्याख्यानें असत.  झालींच तर संध्याकाळीं जाहीर व्याख्यानें असत.  रात्रींच्या वेळीं क्लबच्या सभा, संमेलनें चालत.  वर्षांतून सहा महिने अभ्यास आणि सहा महिने सुट्टी असें वर सांगितलेंच आहे.  पण आठवड्यांतून चार दिवस कॉलेज व तीन दिवस सुट्टया असत.  शनिवार, आदितवार, सोमवार हे सुट्टीचे दिवस ठेवण्याचें कारण हें कीं, इतर गांवांतील कुठल्याही एका युनिटेरियन समाजामध्यें जर एखादे वेळीं उपासक आचार्य नसले तर मँचेस्टर कॉलेजांतील विद्यार्थ्याला तें काम करण्याला पाठविण्यांत येत असे आणि सांजसकाळच्या दोन उपासनेसाठीं जाण्यायेण्याचें भाडें, पाहुणचारासह दोन पौंड वेतन त्याला मिळत असे.  ही वर्णी मलाही लागत असे.  ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून मला विशेष आवडीनें निवडण्यांत येत असे.  ह्या व इतर अनेक प्रकारांनीं हें कॉलेज म्हणजे सर्व देशांतील सर्व युनिटेरियन समाजाचें एक काळीजच (Heart) होऊन राहिलें होतें.  याशिवाय मुलांना गरीब लोकांच्या वस्तींत जाऊन तेथें दयेचीं व परोपकाराचीं कामें करण्याची संवय लागावी म्हणून एका स्वतंत्र लहानशा मिशनची स्थापना झाली होती. ह्याचा कॉलेजशीं प्रत्यक्ष संबंध नव्हता.  तरी डॉ. ड्रॅमड यांची कन्या मिस नेली हिनें पुढाकार घेऊन हें चालविलें होतें आणि कॉलेजचे विद्यार्थी त्यांत भाग घेत होते.