महाराष्ट्र परिषद

मिशनच्या परिषदा  :-  मेघवृष्टीनें प्रचार करण्याचे तीन प्रकार आहेत -  (१) ठिकठिकाणच्या हितचिंतक पुढार्‍यांचीं मनें वळवून त्यांच्याकडून लोकमत तयार करण्यासाठीं त्यांच्या त्यांच्या गांवीं प्रचंड सभा भरविणें.  (२) अशा रीतीनें लोकमत अजमाविल्यावर जनरल सेक्रेटरीनें (मुख्य प्रचारकानें) प्रांतांच्या एका मुख्य ठिकाणीं अंगभूत शाखा स्थापून तिच्या नियंत्रणाखालीं जिल्ह्याच्या ठिकाणीं उपशाखा स्थापण्यासाठीं प्रांताचें निरीक्षण करून आणि निधि मिळविण्यासाठीं दौरे काढणें.  (३) तिसरा प्रकार मिशनच्या खास परिषदा भरविणें.  भारतीय राष्ट्रीय सभेची बैठक नाताळांत जेथें जेथें होत असे तेथें तेथें एकेश्वरी धर्माची परिषद भरविण्यास मला जावें लागत असे.  त्याच वेळीं मी ह्या मिशनच्याही परिषदा संघटित रूपानें भरवीत असें.  १९०६ मध्यें मिशन स्थापल्यावर १९०७ मध्यें सुरत, १९०८ मध्यें मद्रास, १९०९ लाहोर, १९१० अलाहाबाद, १९१२ बांकीपूर, १९१३ कराची येथें काँग्रेसच्या वेळीं या परिषदा भरविण्यांत आल्या.  बांकीपूर येथें काँग्रेसचे अध्यक्ष, अमरावतीचे नामदार मुधोळकर वकील हेच मिशनच्या परिषदेचे अध्यक्ष होते.  कराचीच्या परिषदेंत लाला लजपतराय हे अध्यक्ष होते.  ह्या परिषदांमुळें प्रांतांप्रांतांतून आलेल्या पुढार्‍यांचें लक्ष ह्या मिशनच्या कार्याकडे लागत असे.  त्या त्या प्रांतांत ह्या मिशनच्या कार्याची उभारणी करण्यासाठीं माहिती आणि मदत मिळत असे.  पण प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यांत ह्या अस्पृश्यांच्या प्रश्नाला शिरकाव होण्याला त्या वेळीं अनुकूलता मुळींच नव्हती.  हा प्रश्न धर्माचा आहे; त्याची भेसळ राजकारणांत नको, अशी सबब सांगून त्या वेळचे जहाल अथवा मवाळ राजकीय पुरुष हा प्रश्न सफाईदारपणें टाळीत असत.

परिषदेची तयारी  :  १९०६ सालीं हें मिशन निघून त्याचें अर्धे तप १९१२ अखेर संपूर्ण झालें.  ह्या राष्ट्रीय प्रश्नाच्या बाबतींत ह्या अर्ध्या तपांत महाराष्ट्रीयांनीं उचल खाऊन सर्व प्रांतांत आघाडी मारली.  मुंबई, मद्रास, मध्यप्रांत ह्या हिंदुस्थानांतील तीन इलाख्यांत ह्या मिशनच्या द्वारें व शासनाखालीं ह्या प्रश्नाची अपूर्व घटना केली.  म्हणून मला असें वाटूं लागलें कीं, ह्या मिशनची खास महाराष्ट्रीय परिषद भरवून लोकमताचा आढावा घ्यावा.  ह्या प्रयोगासाठीं पुणें शहर हेंच योग्य ठिकाण असें ठरविलें.  मुंबई हें पैशाचें केंद्र आणि पुणें हें चळवळीचें केंद्र हा आधुनिक महाराष्ट्राचा अनुभव आहे.  पुणें शाखेचें वसतिगृह स्थापावें, सर्व मिशनचा एक मध्यवर्ती आश्रम स्थापावा, सनातनी पक्षाला हालवून पाहावें, भिन्नजातीय व भिन्न धर्मीय पुढार्‍यांची सक्रीय सहानुभूति कसोटीस लावून पहावी वगैरे इतर अनेक हेतु होतेच.  ही परिषद वरिष्ठ वर्ग आणि अस्पृश्यवर्ग ह्यांच्या सहकार्यावर घडवून आणण्यांत आली.

परिषद फर्ग्युसन कॉलेजच्या ऍंफि-थिएटरमध्यें सर रामकृष्णपंत भांडारकर यांचे अध्यक्षतेखालीं सन १९१२ ऑक्टोबर ता. ५, ६, ७ ह्या तीन दिवशीं भरली.  परिषदेच्या कामाकरितां स्वयंसेवकांची जोरदार घटना केली.  त्यांत विशेषतः पुणें येथील शेतकी कॉलेजचे व इतर कॉलेजांतील बर्‍याच तरुण स्वयंसेवकांनीं ऊन, वारा, पाऊस यांना न जुमानतां एकसारखी मेहनत केली.  सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सभासद रा. वझे यांनीं आणि इतरांनीं फारच श्रम घेतले.  परिषदेकरितां आलेल्या सर्व जातींच्या दूरदूरच्या पाहुण्यांची जेवण्याची व राहण्याची सोय मिशनच्या लष्करांतील शाळेंत करण्यांत आली.  जेवणासाठीं भव्य मंडप घालण्यांत आला होता.  सर्व जातींचे मिळून २६० पाहुणे आले होते.  त्यांचीं एकत्र भोजनें तीन दिवस मिळून-मिसळून होत होतीं.  परिषदेच्या दुसर्‍या दिवशीं म्हणजे रविवारीं परिषदेचे स्वयंसेवक, वरिष्ठ जातीचे हितचिंतक आणि निरनिराळ्या अस्पृश्य जातींचे पाहुणे मिळून सुमारें ४०० पानांचें थाटाचे प्रीतिभोजन झालें.  ह्या भोजनांत ५० वरिष्ठ जातींच्या लोकांनीं भाग घेतला.  कमिटीचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. मॅन यांनीं प्रीतिभोजनांत सर्वांत मिसळून भोजन केलें.

सर्व पाहुणेमंडळी पुण्यास आल्यावर त्यांचें नांव, जात ह्यांची नोंद होई.  सकाळचा चहा झाल्यावर परस्पर परिचय होऊन भोजन होई.  सभेचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणें उरकण्यांत येई.  सर्व कार्यक्रमाला भजनानें व उपासनेनें आरंभ होई.  पहिले दिवशीं रा. ब. काशिनाथ बाळकृष्ण मराठे यांनीं उपासना चालविली.  दुसरे दिवशीं परिषदेसाठीं प्रार्थना समाजाच्या हरिमंदिरांत परिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर यांनीं उपासना चालविली.  त्या वेळीं परिषदेचे बाहेरगांवचे २५० पाहुणे हजर होते.  तिसर्‍या दिवशीं मिशनचे शाळेंत मीं स्वतः उपासना चालविली.  त्या वेळीं मुंबईहून आलेल्या परळ मिशनच्या मुलांनीं निरनिराळ्या व्यक्तिप्रार्थना केल्या.  

पुढार्‍यांचा मेळावा  :   दोन प्रहरीं अध्यक्ष भांडारकर स्थानापन्न झाले.  जमलेल्या थोर मंडळींत सर चंदावरकर, डॉ. मॅन, भावनगर संस्थानचे दिवाण पट्टणी, ना. मौलवी रफिउद्दीन, इचलकरंजीचं अधिपति श्रीमंत बाबासाहेब घोरपडे, कोल्हापूरचे भास्करराव जाधव, गोपाळराव देवधर, बी. एस. कामत, प्रो. धोंडोपंत कर्वे, रेव्हरंड रॉबर्टन, तेलगू समाजाचे पुढारी डॉ. कोरेज, अस्पृश्यांपैकीं सुभेदार मेजर भाटकणर, नगरचे डांगळे, पुण्याचे कांबळे, भंग्यांचे पुढारी नाथामहाराज, सातारचे मातंग पुढारी श्रीपतराव नांदणे वगैरे अनेक पुढारी होते.

कार्याचें क्षेत्र  :   प्रथम मीं माझ्या भाषणांत ह्या चळवळीचा थोडक्यांत इतिहास सांगून मिशनच्या हल्लींच्या कार्याचा विस्तार पुढील कोष्टक देऊन सांगितला.

ठिकाणें                                        संस्था
१ मुंबई -        ५ दिवसाच्या शाळा व १ रात्रीची शाळा.  ५०० विद्यार्थी.  १ वसतिगृह व त्यांतील
                  २६ मुलें, २ भजनसमाज, १ धंदेशिक्षणाची शाळा.

२ पुणें -          एक २०० मुलांची शाळा, १ भजनसमाज, १ वाचनालय, क्रिकेट क्लब वगैरे.

३ हुबळी -       १ दिवसाची शाळा, १ रात्रीची शाळा, १ वसतिगृह.

४ सातारा -      १ रात्रीची शाळा, १ भजनसमाज.

५ ठाणें -         गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी स्थानिक मंडळी.

६ दापोली  -     गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी स्थानिक मंडळी.

७ मालवण -     गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी स्थानिक मंडळी.
८ मंगलोर -      १ दिवसाची शाळा, १ रात्रीची शाळा, १ वसतिगृह, १ हातमागाचा वर्ग.

९ मद्रास -       २ दिवसाच्या व २ रात्रीच्या शाळा, एकंदर मुलें १३०

१० अकोला -    ३ रात्रीच्या शाळा, १ वसतिगृह.

११ उमरावती -  २ रात्रीच्या शाळा.

१२ इंदूर -       १ रात्रीची शाळा.

१३ भावनगर -   १ दिवसाची शाळा.

१४ कोल्हापूर -  १ वसतिगृह.

सध्या एकंदर १४ ठिकाणीं २३ शाळा, ५५ शिक्षक, ११०० मुलें, ५ वसतिगृहें, इतर १२ संस्था व ५ प्रचारक असून खर्च एकंदर रु. २४४८५ आहे.

वरील विस्ताराचें निरीक्षण केल्यावर असें दिसून येईल कीं, निरनिराळ्या ४ भाषा चालू असलेल्या ७ प्रांतांत मंडळीला आपले प्रयत्‍न करावयाचे आहेत; म्हणूनच तिला हल्लीं भरलेल्या परिषदेसारख्या निरनिराळ्या ठिकाणीं प्रांतिक परिषदा भरविण्याची जरुरी आहे.  अशा परिषदेशिवाय मंडळीला आपल्या कार्याचा विस्तार व दृढीकरण करण्यास दुसरा मार्ग नाहीं.

सरकार, संस्थानिक, म्युनिसिपालिट्या आणि परोपकारी संस्था, सर्व जाती आणि सर्व धर्म - एकूण ह्या प्रचंड देशांतील सर्व शुभ शक्ति - ह्यांचें केंद्र ह्या कार्यांत जितक्या अंशानें जास्त साधेल तितक्याच अंशानें अधिक यश येईल हें ध्यानांत वागवून परिषदेचे सर्व सभासद सात्त्विक वृत्तीनें विचार करतील अशी उमेद आहे.

भाषणें  :   अध्यक्ष डॉ. भांडारकर यांचें विद्वत्ताप्रचुर आणि संशोधनात्मक असें भाषण झालें.  अस्पृश्यतेचें मूळ आणि मीमांसा त्यांनीं वेद, उपनिषदें, पाली ग्रंथ, मराठी संतकवि यांच्या आधारें व प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासाला धरून मोठ्या अधिकारयुक्त वाणीनें केली.  यानंतर निरनिराळ्या व्यक्तींनीं पुढीलप्रमाणें विद्वत्तापूर्ण अशीं व्याख्यानें दिलीं.

               वक्ता               
        विषय
१ गणेश अक्काजी गवई   
वर्‍हाडांत ख्रिश्चन मिशननें अस्पृश्यांसंबंधीं केलेलें काम व त्याची मिशनच्या कार्याशीं तुलना
२  बी. एस. कामत 
गुरुकुलाची आवश्यकता.
३  सौ. लक्ष्मीबाई रानडे
सदर.
४  रा. गोपाळराव          
उपदेशकाची जरुरी.
५  रा. केशव रामचंद्र कानिटकर
औद्योगिक शिक्षणाची दिशा. यानंतर वसतिगृहासाठीं भिक्षापात्र फिरविण्यांत आलें.
६  रा. भास्करराव जाधव .... 
सदर.
७  रा. नाथामहाराज (भंगी पुढारी)  ... सदर.
८  नामदार बाबासाहेब इचलकरंजीकर ....  उद्धाराच्या कामीं अस्पृश्यांनीं वरिष्ठ वर्गाशीं मिळूनमिसळून वागावें.  यांनीं ५० रु. देणगी जाहीर केली.
९  प्रो. गो. चि. भाटे  .... 
 सर्वांस अवश्य शिक्षण द्यावें.
१०  न. चिं. केळकर ....     म्युनिसिपालिट्या लोकनियुक्त व्हाव्यात व त्यांत अस्पृश्य प्रतिनिधि असावेत.
११  रा. आर. जी. प्रधान  ....
 सदर
१२  प्रो. हरिभाऊ लिमये  ....
 म्युनिसिपालिटींत अस्पृश्य प्रतिनिधि येण्याची वाट न पाहतां त्यांच्या उन्नतीची सोय करावी.
१३  रा. भास्करराव जाधव  .... अस्पृश्यांनीं सरकारी नोकरींत शिरण्याची आवश्यकता व कोल्हापूर संस्थानांतील प्रयत्‍न. महाराजांनीं हत्तीवर अस्पृश्य माहूत नेमल्याचें उदाहरण.
 १४  रा. जोग इचलकरंजीकरांचे चिटणीस ....   इचलकरंजी संस्थानांतील प्रयत्‍न.
 १५  रा. वि. रा. शिंदे  ...  मुंबई, पुणें येथें मिशनचे स्वतःचे इमारतीची जरुरी.
 १६  एल. बी. नायडू  --- सदर ---
 १७  श्री. महाभागवत (भावी शंकराचार्य) ....   संस्कृतमध्यें.  मिशनच्या धार्मिक प्रयत्‍नांची योग्यता.  हे प्रयत्‍न
 १८  प्रो. लक्ष्मणशास्त्री लेले ....



समारोप व रा. वि. रा. शिंदे यांचे आभार.
 समन्वयाच्याच पायावर झाले पाहिजेत.  त्याबद्दल मिशनचे आधार.
वेदोपनिषदांतील उतारे.  वेदकाळीं अशी अस्पृश्यता नव्हती.
हल्लींचें विकृत स्वरूप गेलें पाहिजे.


१९  अध्यक्ष भांडारकर  ....                      

 
स्त्रियांची सभा  :   तिसर्‍या दिवशीं श्रीमती रमाबाईसाहेब रानडे यांच्या अध्यक्षतेखालीं स्त्रियांची सभा लष्कर येथील शाळेंत भरली.  वरिष्ठ वर्गांतील सुमारें ५० व अस्पृश्य समाजांतील सुमारें २०० स्त्रिया हजर होत्या.  सौ. लक्ष्मीबाई रानडे, सौ. सीताबाई भांडारकर, सौ. काशीबाई कानिटकर प्रमुख स्थानीं बसल्या होत्या.  अध्यक्षीणबाई म्हणाल्या, ''अशीं कामें आम्हा बायकांच्या अंगवळणीं पडलीं नाहींत, पण तीं पडेपर्यंत कामाला खरा जोर येणार नाहीं.  निराश्रित वर्गांतल्या स्त्रियांची सुधारणा करण्यासंबंधानें पुणें, मुंबई, यवतमाळ, अकोला, अमरावती वगैरे ठिकाणीं जे प्रयत्‍न होत आहेत ते सर्व मीं पाहिले आहेत.  अकोला येथें श्रीमती बेन्द्राबाई यांनीं आपल्या महार जातींतील १४।१५ मुलांचें एक स्वतंत्र वसतिगृह चालविलें आहे.  त्यांत इतकी स्वच्छता व टापटीप दिसली कीं, हीं मुलें निकृष्ट जातीचीं आहेत असें कोणालाही ओळखतां येत नाहीं.''  नंतर मिशनच्या शाळेंतील शिक्षिका पार्वतीबाई जाधव या महार बाईचें भाषण झालें.  ह्या बाई मिरजेहून आल्या होत्या.  त्या म्हणाल्या - ''ह्या परिषदेस येण्यापूर्वी आमची उतरण्याची सोय होईल काय याची पंचाईत आम्हांस पडली होती.  पण येथें आल्यावर ब्राह्मणादि वरिष्ठ जातींच्या बायकांनीं आमची उत्तम बडदास्त ठेवली.  उलट महार, मांग, चांभार वगैरे आम्ही लोकच एकमेकांच्या पंक्तीस बसण्यास कुरकुरूं लागलों.  तेव्हां 'तुम्हांस (महारांस) ब्राह्मणांच्या पंक्तीस बसण्याची हौस वाटते आणि मांगास पंक्तीस येऊं देण्यास तुम्ही नाराज होतां हें कसें ?' असें विचारलें.  ह्यावर सर्वांची समजूत पटून सुमारें ३०० महार-मांग एकत्र बसलेले पाहून सर्वांना मोठा आनंद झाला.''

नंतर कु. शिंगणे व पुणें येथील अस्पृश्य पुढारी श्रीपतराव थोरात यांची कन्या कु. लक्ष्मीबाई यांचें निबंधवाचन झालें.  अकोल्याच्या श्रीमती इंदिराबाई परचुरे यांचें भाषण झालें.  शेवटीं सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्यांनीं अध्यक्षीणबाईंचे आभार मानले.

महाराष्ट्र परिषदेस एकूण १७ जिल्ह्यांतील ५४ गांवांतल्या निरनिराळ्या १० जातींच्या २३० पाहुण्यांची सर्व तर्‍हेची सोय परिषद कमिटीमार्फत करण्यांत आली होती.  ह्याखेरीज इतर सभासद पुणें शहरांतील स्थानिक रहिवासी होते.
दोन विघ्नें   :   ह्या परिषदेचीं सर्व कामें अत्यंत उत्साहानें पार पडलीं; तरी दोन प्रकारें विघ्नें आल्यानें परिषदेला मोठी मनोरंजकता आली.  दुसर्‍या दिवशीं रविवारीं मोठ्या थाटाचें ४०० लोकांचें सहभोजन ठरलें होतें.  परिषदेंतील पाहुण्यांचें तीन दिवस सहभोजन चाललेलें होतेंच !  दोन दिवस ब्राह्मण आचारी खुशीनें स्वयंपाक करीत होते; पण रविवारच्या मोठ्या सहभोजनाचें दिवशीं पुणें शहरांतील बरीच ब्राह्मण-मंडळी जेवण्यास येणार होती, हें ऐकून सकाळीं दहा वाजतां स्वयंपाक्यांनीं संप करून मोठा अडथळा आणला.  चालकांनीं लगेच त्यांना मंडपांतून जाण्यास सांगितलें.  बाहेरून आलेल्या पाहुण्यामंडळींपैकीं ब्राह्मण बायकांनीं आणि स्वागत कमिटींतील अस्पृश्य सभासदांच्या बायकांनीं स्वयंपाकाचें सर्व काम एकदम अंगावर घेऊन ठरल्याप्रमाणें १२ वाजतां सर्व तयारी केली.  सौ. रुक्मिणीबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालीं बिनबोभाट सर्व तयारी झालेली पाहून सर्व पाहुण्यांना आश्चर्य व आनंद वाटला.  दोन तासांत दोन पंक्ती उठून सर्व भोजनसमारंभ आटोपल्याबरोबर जोराची पर्जन्यवृष्टि एक तासभर झाली.  लष्करांतल्या शाळेंतील पाहुणेमंडळींच्या उतरलेल्या ठिकाणाहून फर्ग्युसन कॉलेजचें सभागृह २ मैल लांब होतें.  तरी स्वयंसेवकांनीं अपूर्व तसदी घेऊन सभेच्या कामांत कोणत्याही प्रकारची उणीव भासूं दिली नाहीं.  एक तासाच्या विलंबानें सभेचें काम सुरळीतपणें पार पडलें.  देव तारी त्याला कोण मारी !
अपूर्व कामगिरी  :  परिषदेकरितां जवळ जवळ २००० पत्रें बाहेर पाठवून त्यांचीं उत्तरेंही आलीं.  हें एक दीड महिन्यांच्या आंतच करावें लागलें.  बाहेरगांवांहून परिषदेसाठीं येणार्‍या मंडळींना रेल्वे-तिकिटाची सवलत मिळावी म्हणून निरनिराळ्या रेल्वे कंपन्या व आगबोट कंपन्या यांच्याशीं मीं पुन्हां पुन्हां पत्रव्यवहार केला.  तरी सर्वांकडून शेवटीं नकारार्थीच उत्तर आलें.  स्वागत कमिटीचे दुय्यम चिटणीस रा. दा. ना. पटवर्धन ह्यांनीं ही परिषद घडवून आणण्यासाठीं जे अविरांत श्रम केले त्यांचें वर्णन शब्दानें करवत नाहीं.  रा. ए. के. मुदलियार यांचे हाताखालीं त्यांना दक्षतेचें आणि तत्परतेचें वळण लागलें होतें.  परिषदेचें बहुतेक श्रेय त्यांनाच आहे.  सुमारें पाऊणशें पानांचा परिषदेचा अहवाल पुस्तकरूपानें प्रसिद्ध करून परिषदेच्या वाङ्‌मयांत त्यांनीं एक संस्मरणीय भर टाकली.

उदार देणगी  :  ही परिषद पुणें येथील इमारतफंडासाठीं मुख्यत्वेंकरून भरविण्यांत आली होती.  परिषदेंत तो फंड न मिळतां उलट खर्चांतच २५९ रु. १४ आ. ३ पै तूट आली.  पुणें शहराच्या दारिद्र्याचें याहून सुंदर प्रदर्शन दुसरीकडे कोठें दिसणार !  पण चिटणीस रा. पटवर्धन यांचे सात्त्विक परिश्रमाला दुसरीकडूनच यश येणार होतें.  परिषदेचा सुंदर अहवाल वाचून इंदूरचे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर यांना दयेचा पाझर फुटला आणि त्यांनीं पुढील महिन्यांतच जनरल सेक्रेटरी म्हणून मला ताजमहाल हॉटेलमध्यें बोलावून २०,००० रु. चा चेक माझे हातीं दिला.  ह्यांतच पुढें मुंबई सरकारच्या ८७,००० रु. ची भर पडून पुणें शाखेसाठीं भोकरवाडींत 'अहल्याश्रम' या नांवाच्या सुंदर इमारतींत आश्रम उघडण्यांत आला.