प्रस्ताव : हायस्कूलचा काळ, इ.स. १८९१ अखेर म्हणजे माझ्या वयाचीं अठरा वर्षे तेथपर्यंत माझा अभ्यास, खेळ, खोड्यां सोबत्यांचा सहवास व माझा एकान्तवास वगैरे गोष्टी उघडपणें मीं सांगितल्या. आतां जी धर्मभावनांची आठवण मी सांगणार आहें तो विषय गंभीर आहे. इतकेंच नव्हे तर तो माझ्या चरित्रांतला आत्मा आहे. धर्मानें माझ्या आयुष्याचा प्रवाह, निदान त्याची दिशा तरी, पुढें पार बदललीं. अशा महत्त्वाच्या विषयासंबंधीं लिहिण्यापूर्वी धर्माविषयीं माझी दृष्टि कशी आहे तें सांगणें जरूर आहे. मी केवळ आठवणी व मागील अनुभव लिहीत असतां मध्येंच माझीं आतांची दृष्टि किंवा विचार देणें आगंतुक विषयांतर आहे, हें मला कबूल आहे. पण माझी दृष्टि समजल्याशिवाय मी धर्माविषयीं जें लिहीन तें वाचकांस न समजतां कदाचित् गैरसमज होण्याचा संभव आहे. म्हणून हें विषयांतर क्षम्य आहे, असें मला वाटतें.
इतर गोष्टी वेगळ्या आणि धर्म ही बाब वेगळी, अशी पुष्कळ सुज्ञांचीही समज असते. पण इतर गोष्टींप्रमाणेंच मनुष्यमात्रांत धर्माची जी उपजत बुद्धि आढळते तीही परिणतीचा व विकासाचा विषय आहे असें मला वाटतें. म्हणजे तीही नैसर्गिक नियमांना अनुसरूनच उपजते, वाढते आणि कदाचित् लयही पावते. खाणें, पिणें, वाचन, अभ्यास, मैत्री, वैर, खेळ, खोड्यां, संपत्ति, विपत्ति वगैरे गोष्टी केवळ निसर्गाच्या नियमांप्रमाणें घडतात. त्यांना कांहीं ईश्वरी प्रसादाची किंवा प्रेरणेची गरज नाहीं. मात्र धर्माच्या जागृतीला आणि वाढीलाच काय ती ईश्वरी कृत्याची जरुरी आहे, असें मला वाटत नाहीं. अशी जरूरी माझ्या धर्मबुद्धीला असेल तर ती माझ्या पाळण्यांतल्या खेळांना आणि पोरकट खोड्यांना कां नसावी ? मीं जें बरें केलें असेल, तेवढीच नेमकी ईश्वरी कृपा आणि वाईट गोष्टींना मात्र मीच जबाबदार, असें माझें मत नाहीं.
आपल्या चारित्र्याबद्दल व्यक्तीच सर्वस्वीं जबाबदार असेंही माझें म्हणणें नाहीं. जशी व्यक्ति जबाबदार आहे तसाच त्या व्यक्तीचा अनुवंश (पूर्वपरंपरा) आणि परिस्थिति (हिच्यांतच त्या व्यक्तीचें शिक्षण, नातलग, स्नेही, वैरी वगैरे सर्वच नैसर्गिक बाबींचा समावेश होतो.) ह्याही गोष्टी जबाबदार आहेत. एकूण मनुष्याच्या चारित्र्याबद्दल व्यक्ति आणि निसर्ग हीं दोनच कारणें पुरीं असून, ईश्वराला त्यामध्यें खेंचणें अनावश्यक दिसतें. दांडगाई, मारामारी आणि माझ्या दुष्ट खोड्यांच्या आठवणी ज्या लेखणीनें आणि ज्या ओघांत लिहिल्या त्याच लेखणीनें आणि त्याच ओघांत मी माझ्या धर्माचाही विषय लिहितों, हें पाहून कोणा वाचकाचें कोवळें मन प्रथमच बिचकुं नये आणि पुढेंही ज्या सहज आणि मोकळ्या मनानें माझीं व्यंगें मीं सांगितलीं तशाच मोकळेपणानें माझ्या धार्मिक भावनांचा अहवाल मी सांगत आहें हें वाचून कोणाच्या कोवळ्या विचारांना धक्का लागूं नये, म्हणून मध्येंच ही थोडी प्रस्तावना केली आहे.
स्पष्टोक्ति : शिमग्यांतल्या माझ्या ९।१० वर्षांच्या वयांतल्या अश्लील लीला वाचून किंबहुना १४।१५ वर्षांच्या वयांत जुन्या शृंगारिक कादंबर्या वाचून हुरळलेल्या माझ्या मनाला, ''कारंज्याचे तुषार वाटति अग्निकणांचे परी'' हा भपकेदार अनुभव आला अशी माझी स्वतःचीच जबानी वाचून कोणी सूज्ञ वाचक, मी त्या वेळीं मोठा बदफैली होतों असें अनुमान काढणार नाहीं. त्याचप्रमाणें पुढें मी ज्या माझ्या पोरधर्माच्या कहाण्या सांगणार आहें त्या वाचून मी जन्मसिद्ध संतशिरोमणि होतों, असेंही कोणी अनुमान काढण्याचें कारण नाहीं. कच्च्या दिलाच्या, अर्धवट विचारांच्या व पक्षपाती वाचकांसाठीं माझ्या आठवणी मुळींच नाहींत, हें सर्वांनीं ध्यानांत ठेवावें.
बागुलबोवा : धर्म हा विषय बुद्धीपेक्षां भावनेचा अधिक असल्यानें आणि तो विकासशीलही असल्यानें मी ह्या बाबतींतील माझ्या आठवणींना अगदीं माझ्या पाळण्यापासून सुरवात करतों. मी तान्हें बालक असतांना ज्या पाळण्यांत उताणा निजत असें तो पाळणा आमच्या घराच्या सोप्यांत टांगलेला असे. साधारणपणें पाळण्यावर कांहीं खेळणीं अगर भपकेदार रंगीबेरंगी बेगडी झिळमिळ्या बांधण्याचा मातांना शोक असतो. माझ्या पाळण्यावर तसलें कांहीं बांधलेलें मला आठवत नाहीं. पण माझें लक्ष पडल्या पडल्या वरच्या छताकडे जाई. नेमकें पाळण्याच्या वरतीं असलेल्या एका वेळूला एक चमत्कारिक गांठ होती. तिच्याकडे मीं नेहमीं निरखून पाहीं. ती मला एका दाढीवाल्या बोवाच्या मुखवट्याप्रमाणें भासे. मी माझ्या आईचें अंगाईचें गाणें ऐकूनही लवकर निजलों नाहीं आणि कामाखालीं बेजार झालेल्या आईला तर मला निजवावयाची घाई झाली म्हणजे शेवटीं आईनें मला बागुलबोवाची भीति घालावी. इकडे आईनें केलेला बागुलबोवाचा उल्लेख आणि वरतीं ह्या वेळूच्या गांठींत दिसणार्या बुवाची व माझी दृष्टादृष्ट झाली म्हणजे माझा लय त्याच्याकडे विशेषच लागे आणि माझें रडणें थांबे. कारण ही वेळूची गांठ म्हणजेच बागुलबोवा अशी भीति आणि आश्चर्य ह्या भावनांनीं मिसळलेली माझी कोवळी समजूत होऊन माझा वर लय लागे ! मी निजलों असें समजून आई कामाला जाई; पण मी इकडे जागाच असें, ह्या वेळीं मी फार तर २।-२॥ वर्षांचा असेन. ही माझ्या आयुष्यांतील अगदींच पहिली आठवण !
पहिली धर्मभावना : पुढें वर्ष-सहा महिन्यांनीं मी किंचित् बोबडें बोलूं लागल्यावर त्या वेळूच्या गांठीकडे बोट दाखवून 'बागुलबुवा' तोच काय ? असें मी आईला विचारीही व ती हांसून 'होय' म्हणे ! पण हें बागुलबोवाचेंच नव्हे तर माझ्या पहिल्या देवाचें दर्शन होय, हें मला आतां कळतें. तेव्हां मलाच माझें मन कळत नव्हतें, तर तें माझ्या साध्या-भोळ्या आईला कोठून कळणार ? माझाच नव्हे तर अखिल मानवजातीचाही पहिला देव बागुलबुवाच असतो, हें मला पुढें ऑक्सफर्ड विश्वविद्यालयांतील मँचेस्टर कॉलेजांत तुलनात्मक धर्माच्या अभ्यासानें कळलें. व्यक्तींत असो किंवा मानवजातींत असो धर्मविकासाच्या पायर्या जवळजवळ त्याच आहेत, ह्या सिद्धान्ताला माझी ही बाळआठवण किती पोषक आहे ! Fear of God is the beginning of all knowledge ह्या बायबलांतल्या जुन्या करारांतील म्हणीलाही माझी आठवणच जोराची साक्ष देते. मात्र ह्या नव्या बागुलबुवाचा प्रथम परिचय घडतांना मनामध्यें केवळ भीतिच वाटत नसू, भीति थोडी पण आश्चर्य जास्त अशी कांहींशी नवीनच मित्र भावना उत्पन्न होत होती.
धर्माची गोडी : ह्यापुढील चार वर्षांत म्हणजे मी सात वर्षांचा होईपर्यंत घरांतल्या कुळाचारांत आणि विधिसंस्कारांत देवापेक्षां देवीउपासनेचें प्राबल्य अधिक असे. माझे आजोबा बसवंतराव विशेष धार्मिक नव्हते. संताबाई ही माझी आजीच धर्मकृत्यांत पुढाकार घेत असे. आमचे घरीं नवरात्राचा सण आणि सोहळा सर्वांत मोठा होत असे. नवरात्रांत माझी आजी नऊ दिवस उपास करीत असे. केवळ फळांवर, तींही थोडीं केळीं खाऊन ती असे. तिचें मुख्य दैवत श्रीयल्लमादेवी हिचें वर्णन मागें आलें आहेच. तुळजापूरची अंबाबाई माझ्या आजोबांची व यल्लमा ही माझ्या आजीची, वस्तुतः पहिलीपेक्षां दुसरी मला अधिक पसंत असण्याचें कांहीं कारण नाहीं. असलेंच तर आजीचा पुढकार एवढेंच. जितका गाजावाजा अधिक किंवा जितकें गोड खावयाला ज्याच्या पूजेंत अधिक मिळेल तितकें तें दैवत लहान मुलाला अधिक प्रिय, हा नियम निसर्गसिद्धच आहे. वैदिक दैवतांत इंद्र अधिक प्रिय आणि प्रबल कां ? तर तो दाूर अधिक पीत असे म्हणून. ती इंद्रालाही प्रिय अशी समजूत रूढ झाली असावी. ह्या न्यायानें मला ही यल्लमा ५।६ वर्षांपासूरन प्रिय झाली. मनावरचा हा संस्कार मी पुढें इंग्रजी पांचव्या इयत्तेंत असतांनाही मला कसा जाणवला, हें मीं मागें सांगितलेंच आहे.
ताईबाईचें प्रस्थ : आमच्या देव्हार्यावर आणि नवरात्राच्या पूजेंत तुळजापूरच्या अंबाबाईचें चित्र आणि आरत्या अधिक येतात. ह्याचें कारण श्रीयल्लमा ही कानडी देवता आणि तिची उपासना अधिक ग्राम्यपणाची. आमचे घरचे पुरोहित तम्मण भटजी डेंगरे ह्यांना अंबाबाईच्याच मराठी व कानडी आरत्या येत असत, पण सौंदत्तीपेक्षां तुळजापूर अधिक लांब आणि जमखंडीस अंबाबाईच्या देवळापेक्षां श्रीयल्लमाचेंच देऊळ अधिक प्रसिद्ध व शिवाय माझ्या आजीचा करारीपणा जास्त. म्हणून ती जिवंत असेपर्यंत माझ्या बाबांनीं पुढें सुरू केलेल्या ब्राह्मणी संस्कृतीला विशेष बळ आलें नाहीं. देव्हार्यावरच्या श्रीयल्लमापेक्षांही बाहेरच्या गोठ्यांतील कोनाड्यांत बसलेली ताईबाई हिचें प्रस्थ वर्षांतून एक दिवस इतकें माजे कीं, आम्ही सर्वजण त्या दिवशीं अगदीं हैराण होऊन जात असूं. आम्ही सर्वजण शाकाहारी असूनही केवळ नवसासाठीं म्हणून ह्या ग्राम्य ताईबाईची, एक गाभण मेंढी कापून आजीला कंदुरी करावी लागत असे. आमचे आजोबा जरी मोठे भाविक नव्हते, तरी तेच एकटे मांसाहारी असल्यामुळें ताईबाईची ही पूजा त्यांच्या पथ्यावर पडे. आजाआजींचें सर्व ठीक झालें, तरी मला हें काय गौलबंगाल चाले तें कळत नसे ! तें कसेंहि असो, यल्लमामुळें माझ्या मनावर अनुकूल परिणाम होत, तर ताईबाईकडे पाहून प्रतिकूल ठसे उमटत !
सूडाची कल्पना : मी लहानपणीं इतका खोडकर होतों तरी फार कनवाळू होतों. ह्या ताईबाईला बळी देण्यास आणिलेल्या गाभण मेंढीची मला मोठी कींव येत असे. पण माझा इलाज तो काय चालणार ? माझ्या देखत त्या बिचार्या जिवाचा घात झालेला पाहून मला ह्या ताईबाईचा मोठा राग येत असे. तरी दुसरे दिवशी इतर देवांबरोबर तिचीही पूजा मला मुकाट्यानें करावी लागत असे. ह्या ताईबाईचें उणेंपुरें करण्याचा मार्ग जरी नव्हता, तरी तिचा सूड उगविण्याची मला दुसरी एक चमत्कारिक संधि मिळत असे, ती अशी. आमच्या वाड्यांच्या महाद्वाराच्या बाहेर दाराशी लागून दोन्ही बाजूंस दोन तिकोनी दगड ठेविलेले असत. त्यांना चुना लावलेला असे. प्रसंगविशेषीं त्यांना हळद-कुंकुंही लागत असे. ह्या दोन द्वारपालक देवताच असत म्हणावयाच्या. दिसण्यांत आकृतीनें हे दगड ताईबाईप्रमाणें आणि तेवढेच असत. मला वाटे कीं, हे ताईबाईचे कोणी तरी नातलग असावेत. त्या दुष्ट ताईबाईवरचा माझा राग मी केव्हां केव्हां त्या बिचार्या बाहेर ठेवलेल्या दगडांवर मनमुराद काढून घेत असें. त्यांना मी एकमेकांवर चांगले ठेंचून काढीत असें. मी त्यांना उलटें ठेवीं, पालथे पाडीं. पण कांहीं केलें तरी मेलेली मेंढी पुन्हां थोडीच जिवंत होणार होती ! मारून माझेच हात दुखरे झाले, म्हणजे मला हा खुळा नाद सोडावा लागे.
यथासांग पूजा : ह्या ताईबाईसारखीच आमच्या वाड्यांच्या अगदीं बाहेरच्या अंगणांतील वायव्येकडील एका पडक्या खोलींतील खांबाचीही मला लहानपणीं पूजा करावी लागत असे. हें रमाबाई नांवाच्या एका मृत बाईचें भूत होतें. येणेंप्रमाणें आमचे घरीं माणसांपेक्षां देवदेवतांची गर्दी फार मोठी जमली होती. नवरात्रांत, गणेशचतुर्थी वगैरे महापूजेचा प्रसंग आला म्हणजे देवघरांतील देव्हार्यावरील खंडोगणती टाकांची व मूताअची पूजा झाल्यावर, मग उतरंडीच्या डेर्यांची (गाडग्यांची), नंतर देव्हार्यासमोरच्या कोनाड्यांत ठेवलेल्या लाकडी पादुकांची, जवळच्या खिडकींत रचून ठेवलेल्या सर्व पोथ्यांची, स्वयंपाकघरांत येऊन ताक करण्यासाठीं रोवलेल्या खांबाची, सोप्यांतील मुख्य कोनाड्यांत बसविलेल्या गणपतीची, गोठ्यांत बसलेल्या ताईबाईची आणि शेवटीं अगदीं बाहेर पायखान्याजवळील खोलींतील वर सांगितलेल्या खांबाची ऊर्फ भुताची पूजा अनुक्रमें करावी लागत असे. ही पूजा म्हणजे ताम्हनांतून नेलेल्या पाणी, गंध, अक्षता, फुलें वगैरेंनीं करावयाची असे. शिवाय हें झाल्यावर धूपारती, दीपारती आणि कापरारती ओवाळायला पुन्हां ह्या इतक्या देवतांसमोर यावें लागे. ही आरती ओवाळतांना उजव्या हातानें आरती ओवळणें आणि डाव्या हातानें घंटा वाजविणें ही कसरत एकाच वेळीं करावी लागत असे. आणि पुष्कळ वेळां-विशेषतः गोड नैवेद्यामुळें अगर शाळेला सुटी असल्यामुळें मी खुषींत असलों तर-ही सर्व पूजा यथासांग करणें मला आवडतही असे.
मारुतीची पूजा : मराठी चौथ्या-पांचव्या इयत्तेंत असतांना बाबांनीं घरचें पुजारीपण मजकडेच दिलें होतें. ह्या मूर्तिपूजेंत माझें मन जरी केव्हां केव्हां रमत असे, तरी रोज रोज हें सर्व नियमानें करण्याचें लचांड मागें लागल्यामुळें मी बहुतेक फार कंटाळत असें. ह्याचें कारण असें कीं, आमची मराठी शाळा सकाळीं ७ पासून १० पर्यंत आणि पुन्हां दोन प्रहरीं २ पासून ५ पर्यंत असे. उन्हाळ्याचे दिवसांत सकाळीं शाळेंतून आल्यावर कडकडीत भूक लागलेली असायची. तरी पण मला आंघोळ करून सोवळ्यानें ही सर्व पूजा करावी लागे. इतकेंच नव्हे तर घरांतील सर्व पूजा आटोपल्यावर मग गांवच्या मारुतीचे देवळांत जाऊन त्याची पूजा करून यावें लागे. मारुतीला जातांना सोवळ्यानें जावें लागे. स्नान करून अंगाला व कपाळाला गंध लावून उजव्या हातांत पळी-पंचपात्री, त्यांत पाणी, फुलें, तिचे बाजूला गंधाचा मोठा गोठा लावलेला, डाव्या खाकेंत धुतलेल्या उपरण्याची घडी, अशा थाटानें आमची वामनमूर्ति मारुतीला निघावयाची. सुमारें ११।१२ वाजतां उन्हाळ्यांतलें तें कर्नाटकी ऊन पडे, पण अनवाणीच जावें लागे. मारुतीचें देऊळ बरोबर बाजारांत आमच्या हायस्कुलासमोरच होतें. तेथून आल्यावर मारुतीचें तीर्थ घरीं सर्व मंडळींना पळीपळीभर द्यावें लागत असे. हें एक माझी पूजेची हजेरी लावण्याचें साधन बाबांनीं करून ठेविलें होतें ! इतकें झाल्याशिवाय मला जेवायला मिळत नसे. पूजेला ब्राह्मण ठेवल्यास कोठल्याही देवस्थानांत त्याला चमचमीत नैवद्याचें खावयाला आणि वर भरपूर दक्षिणा असते. मला मात्र इतकें सारें करून जेवतांना नुसती कोरडी भाकर, तुरीची पातळ डाळ आणि तांबडी भगभगीत मिरच्यांची चटणी ह्याशिवाय कांहीं मिळत नसे. चटणीवर तेलही मिळावयाची मारामार ! मग माझ्या कोवळ्या मनावर ह्या पूजेचा काय परिणाम होत असेल बरें ?
गाड्यांची पूजा : अर्थात् मला ह्या सर्व पासरीभर देवांचा केव्हां केव्हां भारी राग येत असे. पूजा करीत असतां सगळे देव माझ्या हातींच येत. जे दगडाचे कठीण असत ते वांचत; पण जे सोन्यारुप्याचे नाजूक टाक असत त्यांना मी धरधरून वांकवीत असें आणि पुन्हां बाबांनीं पाहूं नये म्हणून सरळ करून ठेवीं. घाई झाली म्हणजे दुरूनच मी त्यांच्यावर पाणी फेकून भिजवीत असें. घरांतल्या देवांचा असा झटपट संक्षिप्त समाचार घेतल्यावर मारुतीचीही तशीच वाट लागावयाची. घरांतून निघतांना पंचपात्री, गंध, फुलें, अक्षता सर्व शृंगार थाटाचा असावयाचा; पण पोटांत कावळे चावूं लागल्यावर कोण मारुतीपर्यंत जातो ? आमचें मोठें अंगण ओलांडल्यावर बाहेर रस्त्त्यांत लगेच म्हातारबा नांवाच्या माझ्या बाबांच्या एका सुतार मित्राच्या मालकीचा सुतारी कारखाना लागत असे. त्यांच्याकडे दुरुस्तीला आलेल्या खटारगाड्यां रस्त्यांतच उभ्या असावयाच्या. त्यांपैकीं एखाद्या गाडीच्या चाकाच्या गड्डयाची पूजा करून मी घरीं तीर्थ द्यावयाला येत असें; पण माझी ही चोरी फार दिवस न लागतांच उघडकीला आली. म्हातारबा वरचेवर बाबांना भेटावयाला येत असत. ते म्हणत, ''रामा ! (माझ्या बाबांपेक्षां वयानें बरेच वडील असल्यानें ते अशी एकेरी हाक मारीत) आमच्या रस्त्यांत उभ्या असलेल्या गाड्यांच्या चाकांवरून अलीकडे बरेच दिवस पाणी, गंध, फुलें, अक्षता आढळतात. हा काय चमत्कार !'' बाबांनाही हें काय गौडबंगाल आहे तें पाहावेंसें वाटल्यावरून ते पाहावयास गेले. पाहतात तों आपल्या घरचीं गंध व फुलें नित्याचीं त्यांच्या ओळखीचीं दिसलीं. घरी येऊन त्यांनीं मला दरडावून विचारलें, ''कायरे विठ्या, रस्त्त्यांतल्या गाड्यांची पूजा करीत असतोस काय ?'' कांहीं झालें तरी मी खरें बोलणारा मुलगा, अशी बाबांचीं नेहमीं खात्री होती. म्हणूनच त्यांचा मी लाडका होतों. मी मोठा खजील झालों व खरा प्रकार सांगितला. त्यांच्या रागाला वावच न उरल्यामुळें त्यांना उलट माझी कींव आली आणि खरें बोलण्याबद्दल त्यांनीं माझें कौतुकच केलें. गोष्ट अशा थरावर आली म्हणजे माझे आईलाही मध्यस्थी करण्याचें धैर्य होई. शाळेंत जाणार्या लहान मुलाला जेवणाला उशीर होतो, म्हणून तिनेंही मला पाठबळ दिलें. शेवटीं माझ्या मागची मारुतीची ब्याद सुटली. मारुतीपेक्षां मला रस्त्यांतली गाडीच पावली म्हणून मीही आनंदलों. मग त्यापुढें देव्हारांतल्या सोन्यारुप्याच्या टाकांच्या कंबराही मीं फारशा वांकविल्या नाहींत. कारण केव्हां तरी बाबा पूजा करावयास आले म्हणजे सगळ्या देवांच्या कंबरा वांकलेल्या पाहून त्यांना चमत्कार वाटे. हे देव म्हणजे आमचे आजे, पणजे हे पूर्वजच असत. ते सर्व म्हातारे होऊन वारले होते. म्हणून त्यांच्या कंबरा वांकणें साहजिकच होतें. असल्या पुजार्यापासून आमचें रक्षण कर, अशी त्यांनीं ईश्वराजवळ प्रार्थना केली असावी. म्हणून त्यांची व माझी ह्या अवेळीं पूजेच्या चरकांतून सुटका झाली ! मूर्तिपूजा ही पहिल पायरी म्हणून तिचें मंडन करणार्यांनीं हा एक धडा घेण्यासारखा आहे. कांहीं असो, बाबांनीं पूजा करणें अगर न करणें केवळ माझ्याच मर्जीवर सोंपवून आपला समंजसपणा प्रगट केला व त्याचा सुपरिणाम असा झाला कीं, माझ्या धर्मबुद्धीला कायमचा धक्का पोंचला नाहीं.
भिंतीवरील थाप : पुढें आई मला केव्हां केव्हां पूजा करावयाला सांगे. पण आईला झुकांड्यां द्यावयाला मला कितीसा उशीर लागणार ? स्वयंपाकघरांतल्या भिंतीवर मी खडूनें एकदां मोठ्या अक्षरानें खालील वाक्य लिहून ठेविलें होतें. ''आई ! मी उद्यां पूजा करतों, बरें !'' दुसरे दिवशीं आईनें मला टोंकलें. ''कां रे विठू, आज पूजा करणार ना ?'' मी काय, मुलखाचा चवचाल पोर्या ! मी तिला म्हणे, ''आई, माझें वाक्य नीट वाच. मीं आज पूजा करण्याचें कबूल केलें नसून उद्यां करण्याचें ठरविलें आहे ना ?'' तो उद्यां आज कधींच येणें शक्य नव्हतें. ''लिहिणें वाचणें शिकलीं म्हणजे मुलें कशीं चावट होतात बाई !'' असें म्हणून आई बिचारी गप्प बसे. भिंतीवरील वाक्य माझ्या अवखळपणाचें स्मारक म्हणूच कित्येक दिवस तसेंच राहून गेलें. प्रत्यक्ष बाबाही तें पाहून न पाहिल्यासारखें करीत. ''हें पोर पुढें कोणाचे हातीं सांपडणारं नाहीं.'' असें भाकीत ते आईपुढें करीत. दोघेंही माझें मला नकळत कौतुक करीत व स्वस्थ बसत !