प्रसिद्ध दे. भ. श्री. बाळूकाका कानिटकर यांनी खालील टिपणें पाठवलीं आहेत -
''(१) हरिभाऊ फाटक व बाळूकाका कानिटकर यांनीं श्री. विठ्ठलरावांना भेटून १९३० च्या एप्रिल महिन्यांत कायदेभंग चळवळींत पुढारीपण घेण्याची विनंती केली ती त्यांनीं मान्य केली. लगेच श्री. केशवराव जेधे हेही ह्या चळवळींत सामील झाले. (२) कर्मवीर शिंदे यांनीं पुणें जिल्ह्यांत खेडोपाडीं पायीं दौरा काढला. त्यांचे पथकाबरोबर श्र. हरिभाऊ पाठक, श्री. हरिभाऊ तुळपुळे, श्री. पोपटलाल शहा ही मंडळी मधूनमधून जात असत. ह्या दौर्याचा खेडोगांवीं फार परिणाम झाला. व्याख्यान, पोवाडे वगैरेंच्या साहाय्यानें हा प्रचार झाला. खेडेगांवांतील मंडळींनीं ह्या लोकांचें उत्साहानें स्वागत केलें. जेवणखाण वगैरेची सोय आपोआप न सांगतां जागोजाग लोक स्वयंस्फूर्तीनें करीत. (३) शिंदे आठवड्यांचे शेवटीं पुण्यास परत येऊन पुन्हां दौर्यावर जात. पुण्यास बाळूकाका कानिटकर हे चळवळीचे सर्वाधिकारी नेमले गेले होते. त्यांना सर्व प्रकारें उत्तेजन देऊन श्री. शिंदे व इतर पुढारी ह्यांनीं महत्त्वाची मदत केली. पुण्याहूीनी बाहेरगांवीं ठिकठिकाणीं जाणार्या सत्याग्रही तुकड्यांना निरोप देण्याचे समारंभ रा. शिंदे ह्यांचे अध्यक्षतेखालीं अनेक वेळां होत असत. त्या वेळीं श्री. शिंदे ह्यांच्या पत्नी समक्ष हजर राहून जाणार्या सत्याग्रह्यांना नारळ व आशीर्वाद होत. (४) कानिटकर ह्यांचे वाड्यांतच प्रथम सत्याग्रहशिबिर होतें. तेथें क. शिंदे, श्री. तात्यासाहेब केळकर, श्री. हरिभाऊ फाटक, श्री. हरिभाऊ तुळपुळे, संगमनेरचे श्री. रामकृष्ण दास वगैरेंची बैठक होऊन महाराष्ट्रांत जंगलसत्याग्रह करण्याचें ठरलें. प्रभातफेरी जशी पुण्यानें सुरू केली तशीच जंगलसत्याग्रहाची कल्पना पुण्यानेंच उचलून धरली व ती सबंध बृहन्महाराष्ट्रभर कालांतरानें, वणव्याप्रमाणें, पसरली. कानिटकर यांनीं हजार सत्याग्रही निरनिराळ्या युद्धक्षेत्रावर पाठवल्यानंतर त्यांनाता. ३० एप्रिल १९३० रोजीं सरकारनें पकडलें.''
एप्रिल महिन्याच्या तिसर्या आठवड्यांत सोमवारीं सकाळीं मीं हवेली तालुक्यांतील पहिल्या दौर्यावर निघालों. बरोबर दहापंधरा तरुण स्वयंसेवकांची तुकडी होती. सत्याग्रहाचा मोठा झेंडा पुढें फडकत होता. बाजाची पेटी, टाळ आणि प्रभातफेरीची पद्यावली प्रत्येकाच्या हातीं होती. एक डफ-तुणतुण्यांसह पोवाडेवाल्यांचा ताफा बरोबर होता. पुण्याच्या हद्दीवर फर्ग्युसन कॉलेजच्या समोर प्रथम झेंडावंदन झालें.
दौरा : हा दौरा प्रथम पुण्याजवळील दापोडी गांवीं गेला. तेथून प्रत्येक खेडेगांवांत प्रथम प्रभातफेरी म्हणत उभ्याउभ्याच व्याख्यानें देत पुढच्या गांवीं जात असूं. दोन प्रहरी एखाद्या गांवीं जेवण्याचा बेत आधींच ठरलेला असे. स्नान वगैरे आटोपल्यावर जेवण्यास वेळ असेल तेव्हां पोवाडे सुरू होत. चिंचवड, देहू, आळंदी, चऱ्होली, लोणी, लोहगांव वगैरे लहानमोठीं सर्व गांवें करून पहिल्या आठवड्यांत बहुतेक हवेली तालुका संपवला. ह्या आठवड्यांत पायीं शंभर मैलांचा प्रवास झाला. ह्या दौर्याचा पुढील आठवड्यांचा कार्यक्रम वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असे; पण एकदोन दिवसांतच खेड्यांपाड्यांतून दौर्याची दाट वंदता कर्णोपकर्णी पसरूं लागली. पण गांव संपवून पथक दुसर्या गांवं निघालें कीं, झेंड्यांची वाट पाहात बायकामुलें हद्दीवर येऊन बसत. पुढें पुढें तर हा दौरा खेड्यांतील लोकांना इतका प्रिय झाला कीं, एका गांवचे लोक आपल्या गांवचे हद्दीपर्यंत पोंचवायला येत तर दुसर्या गांवचे लोक सामोरे न्यावयाला येत. दौरा अमुक ठिकाणीं असेल असें संकेताने ओळखून पुण्याहून वासुकाका जोशी, देवगिरीकर वगैरे मंडळी मधून मधून समाचार घेण्यास येत. पहिल्या आठवड्यांचा दौरा संपवून शेवटचें खेडें जें लोहगांव त्याहून येत असतां वाटेंत येरवड्यांच्या तुरुंगाच्या बाहेर उभें राहून पथकानें एक गाणें म्हटलें. तुरुंगाच्या बाहेर कांहीं कैदी काम करीत होते, आम्हीहि त्यांच्याबरोबर लवकर जाऊं असा विश्वास आम्हांस वाटत होता. झेंड्यांचा जयजयकार झाला. त्या वेळीं कैद्यांनींहि त्यांत भाग घेतला. पोलिस कौतुकानें पाहात होते. येरवड्यांजवळील टेकडीवरील विठ्ठलदास ठाकरसी यांच्या पर्णकुटीजवळच्या धर्मशाळेंत पथकाची उतरण्याची सोय केली होती. तेथें सहभोजन झालें त्या वेळीं गांवांतील शिष्टमंडळी हजर होती. सायंकाळीं जंगलीमहाराजाचे देवळांत पथक थोडा वेळ राहिलें. तेथून शिवाजीमहाराजांचे पुतळ्यास हार घालून बुधवार चौकांतून मोठी मिरवणूक निघाली. सदाशिव पेठेंतील शिवाजीमंदिरांत जाहीर सभा झाली. त्या वेळीं आठवड्यांचा अहवाल मीं सांगितला आणि खेड्यांतील समाज स्वातंत्र्याला किती आतुर झाला आहे ह्याची हकीगत मीं कळवली.
दुसरा दौरा : पुढच्या सोमवारीं सत्याग्रहपथक खेड तालुक्यास निघालें. त्या वेळीं एक मोटार-लॉरी भाड्यांनें करावी लागली. स्वयंसेवक वीस जमले. जास्त येण्यास आतुर होते. मंचर, घोडें, जुन्नर, नारायणगांव वगैरे खेड्यांतून दौर्याचें मोठ्या थाटानें स्वागत झालें. ह्या दौर्यांत प्रथम मीठ विकण्याचा कायदेभंग सुरू झाला. दांडी येथून मिठाचीं मडकीं आणण्यांत आलीं होतीं. केव्हां केव्हां मिठाचा लिलांव होऊन बरेच पैसे जमत. स्वयंसेवकांचे कॅप्टन कृष्णराव महादेव काळे हे होते. ह्यांनीं अवर्णनीय उत्साह दाखविला. माझ्यानंतर ह्या उत्साही युवकास ७ म.स. मजुरीची शिक्षा झाली. गाडगीळ व लिमये हीं दोन मुलें पोवाड्यांची बहार करीत असत. मोठ्या गांवांतील सभेंत आसपासच्या सर्व खेड्यांतील बायकामुलें येऊन वाट पाहात बसत असत.
हे दिवस उन्हाळ्याचे असल्यानें शेतकर्यांना सुटी असे. त्या वेळीं वर्षाचे हंगामे, उरुस, कुस्त्या ह्यांच्या निमित्तानें मोठमोठ्या जत्रा भरत. ह्याचा फायदाही दौर्यास मोठा झाला. सभेंतील व्याख्यान संपल्यावर विदेशी कापडाची होळी होत असे. त्या वेळीं कोणावरही जुलूम होत नसे. उत्साहाच्या भरांत लहान लहान मुलें आपल्या डोक्यावरील मौल्यवान् विदेशी टोप्या होळींत टाकीत. त्यांत कांहीं सरकारी अधिकार्यांचीं मुलें आपल्या वडिलांच्यादेखत आपल्या टोप्या फेकीत. सभा सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यावर पथकाच्या गांवांतून फेर्या होत. त्यामुळें पथकाचीं गाणीं गांवोगांव म्हणण्याचा प्रघात पडला. उरुस व जत्रेंतला जमाव सोडून दिला तरी इतर सभेच्या वेळींसुद्धां कांहीं ठिकाणीं ५।७ हजारांचा जमाव सहज जमे. लोकांना ह्या दौर्याचें वेडच लागून गेलें होतें.
हा दौरा म्हणजे धार्मिक वारकर्यांची एक दिंडीच झाली होती. स्वयंसेवक पथकाची शिस्त धर्म म्हणून पाळीत असत. भल्या पहाटे उठून ५॥ वाजतां उपासनेस सर्वजण नियमानें बसत. उपासनेच्या वेळीं मी त्यांना पथकाची शिस्त, आम्हीं चालविलेल्या कार्याचे पावित्र्य आणि जबाबदारी, अनत्याचार आणि सहनशीलता वगैरे धार्मिक विषयांचें महत्त्व समजावून सांगत असें. ६ वाजतां सूर्योदयाचे वेळीं सर्वजण झेंडावंदन करीत. नंतर खेड्यांतून प्रभातफेरी निघे. ती संपल्यावर आम्ही दुसर्या गांवीं जात असूं. दुसर्या आठवड्यांचा दौरा संपल्यावर ह्या कामानें सबंध महाराष्ट्रभर खळबळ उडवून दिली. सरकार धरण्याची प्रतिक्षणीं आम्ही वाट पाहात होतों. पोलिस शिपाई किंवा सी.आय.डी. भेटले तर त्यांनाही आम्ही आनंदानें मोटारींत घेत असूं.
तिसरा दौरा : तिसरा दौरा भीमाशंकर व त्याच्या पलीकडील गांवीं निघाला. हा प्रांत तेथील प्रसिद्ध कोळ्यांचा होता. त्यांत कांहीं गुन्हेगार प्रवृत्तीचीं माणसें असत. त्यांना दारू न पिणें, चोरी, अत्याचार न करणें वगैरे आमच्या कार्याचीं सात्त्विक तत्त्वें समजावून सांगणें अत्यंत कठीण गेलें. ते म्हणत, ''आम्ही दारू एक वेळ सोडूं, पण चोरी व मारामारी कशा सोडूं ? तो आमच्या पोटाचा धंदा व वाडवडिलांचा धर्म आहे.'' हें एकून आम्ही अशा लोकांपुढें कायदेभंगाचें पुराण बंद ठेवीत असूं. आणि इतर सामोपचाराच्या गोष्टी सांगत असूं. एकदोन ठिकाणीं तर सभेमधून अस्पृश्यांना वेगळें बसवण्यांत आलें. ह्या वेळीं आम्ही आपलें ठाणें अस्पृश्यांत नेऊन स्पृश्यांना वेगळे ठेवीत असूं आणि अस्पृश्यतेचा जुना कायदा मोडायला त्यांना शिकवीत असू. खरें पाहतां अशा दौर्यावर आम्हीं सरकारचा द्वेष करावा असें कोठेंच कधीं सांगितलें नाहीं. सरकारचे पुष्कळ कायदे आमच्या हिताचेच आहेत, ते अवश्य पाळावेत असेंच आम्ही सांगत असूं. जे कायदे प्रजेच्या हिताचे नसतात व जे प्रजेच्या विरोधास न जुमानतां केलेले असतात, असेच कायदे निवडून काढून ते पाळूं नयेत असें आम्ही सांगत असूं.
माझी अटक : आमच्या पथकांत सर्व जातींचे तरुण होते. आम्हीही एक प्रकारच्या युद्धक्षेत्रांत होतों. म्हणून कोणत्याही प्रसंगीं आम्ही जातिभेद पाळीत नव्हतों. सोंवळ्या तरुणांस आम्ही अगोदरच येऊं देत नसूं. किंबहुना अशा प्रकारच्या भेदाचें कोणालाही स्मरणही नव्हतें. ता. १० मे १९३० रोजीं आम्ही तिसर्या आठवड्यांचा दौरा संपवून पुण्यास परत आलों. भीमाशंकरचा घाट चढून उतरल्यामुळें व बराच प्रवास पायीं झाल्यामुळें मी फार थकून गेलों होतों. रविवारचे दिवशीं कोठेंही बाहेर पडलों नाहीं. ता. १८ मे रोजीं वैशाख शुद्ध पौर्णिमेस बुद्धजयंति होती. कौटुंबिक उपासनामंडळाच्या विद्यमानें सालाबादप्रमाणें उत्सव करण्यास वेळ नव्हता. सकाळीं मी एकटाच पर्वतीच्या टेकडीवर जाऊन ध्यान करून आलों. १२ वाजतां जेवणखाण करून दिवाणखान्यांत बसलों. इतक्यांत पुणें शहरचे पोलिस इन्स्पेक्टर मि. मिलर व जिल्हा इन्स्पेक्टर मि. शिंदे हे मला पकडावयास दारांत आले. ही कुजबजू मला अगोदरच कळली होती.
माझी प्रवासाची पिशवी, वाचनाचीं पुस्तकं, व जरुरीचे कपडे घेऊन मी गेलों. भगवद्गीता, धम्मपद, बायबल, 'सुलभसंगीत', चष्मा, विंचरण्याची फणी, इतके माझे सोबती कोठेंही बरोबर असणारे, तेही माझ्याबरोबर निघाले. घरांतील माणसें खिन्नवदनानें पटापट पायां पडूं लागलीं. रस्त्यांत मोटार उभी होती. पोलिसांनीं मला खेडकडे नेतों असें खोटेंच सांगितलें. ती खोटी हूल गांवांत उठल्यावर बाबूराव जेधे वगैरे मंडळी खेडकडे जाऊन आली. तिसरे प्रहरीं खंडाळा येथील सरकारी बंगल्यांत माझे बाळपणींचे स्नेही, डेप्युटी कलेक्टर श्री. माधवराव हुल्याळ ह्यांचेपुढें मला उभें करण्यांत आलें. ११७ कलमाखालीं गुन्ह्याला चिथावणी देण्याचा व ४७ कलमाखालीं बेकायदेशीर मिठाची विक्री केल्याचा असे दोन आरोप माझेवर होते. दोन पोलिस, मीं व मॅजिस्ट्रेट ह्या चोघांशिवाय कोर्टांत कोणीच नव्हतें. मी खोलींत शिरतांच रा. हुल्याळ यांनीं आपण होऊनच मला नमस्कार केला व आपल्या टेबलाला लागूनच मला बसावयास खुर्ची दिली. गुन्हा कबूल आहे काय असें हुल्याळ मॅजिस्ट्रेटनें विचारलें. मी म्हटलें कीं, ''पोलिसांनीं सांगितलेली हकीकत सगळी खरी आहे. मीं गुन्हा केला किंवा कसें तें सांगण्याचें काम माझें नव्हे. तें कोर्टानें ठरवावें.'' सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली. क्लास बी अशी शिफारस झाली. पण ती वॉरंटावर न लिहितां तोंडीच पोलिसास बजावण्यांत आलें. त्या हलगर्जीपणामुळें तुरुंगात दोन आठवडे तिसर्या वर्गाचें सुख अनुभवास आलें.
खटल्याचा फार्स संपल्यावर मित्र या नात्यानें मी मॅजिस्ट्रेट हुल्याळ यांच्या पत्नीस भेटलों. त्याच्या पत्नीचे डोळे अश्रूंनीं भरले होते. मीं विनोदानें म्हटलें ''आपल्याच नवर्याचा म कैदी असून आपण अश्रु गाळतां !'' एक अंजीर खाऊन पाणी पिऊन मीं मोटारींत बसलों. सायंकाळीं ७ वाजतां येरवडा तुरुंगांत दाखल झालों. मुक्त नेसूंचें धोतर व अंगांतला सदरा ह्याशिवाय माझे सर्व कपडे एका पार्शी वॉर्डरनें काढून घेतले. मी तिसर्या वर्गाचा सक्तमजुरीचा कैदी म्हणून मला एकानें झोंपावयाला जाडेंभरडें तरट व पांघरावयाला तसेंच कांबळें दिलें. ना उशी ना चादर, पण दिवसभर झोंप लागली. पहिल्या आठवड्यांतच माझें ४।५ पौंड वजन कमी झालें. तुरुंगाच्या धक्क्यानें असें प्रथम प्रथम होतें. पण पुढें तें भरून निघतें. तुरुंगाच्या बाहेरच्या भिंतीला लागूनच अंधारी म्हणून जो भाग आहे त्यांत मला ठेवण्यांत आलें. रात्रीं खोलींत प्रकाश नसे. म्हणून ह्या भागाला कदाचित् अंधारी हें नांव असावें. पण पूर्वी ह्या भागांतील खोल्यांत दिवसासुद्धा अंधार असावा. त्याशिवाय अंधारी हें नांव ह्या भागाला अन्वर्थक नाहीं. कारण, ह्याच्याच पूर्वेकडील भाग स्वच्छ आणि प्रशस्त होता. अंगणांत झाडें, स्नानास हौद वगैरे चांगली व्यवस्था होती. रात्रीं दिवेही असत. मला १५ दिवसांनीं 'बी' क्लास मिळाल्यावर ह्या चांगल्या भागांत माझी बदली झाली. महात्मा गांधी वगैरे मोठ्या पुढार्यांनाहि पुढें ह्याच वॉर्डांत ठेवण्यांत आलें होतें.
भास्करराव जाधव : ता. १ जुलै १९३० रोजीं रा. भास्करराव जाधव मला मुद्दाम भेटावयास आले. त्या वेळीं ते शिक्षणमंत्री होते. रुप्याचे छडीचा भालदार घेऊन आल्यामुळें चहूंकडे तुरुंगांत खळबळ उडाली. सुपरिंटेंडेंटच्या खोलीमध्यें भासकररावांकडे मला नेण्यांत आलें. मला पोंचवून सुपरिंटेंडेंट जेव्हां जाऊं लागले तेव्हां मीं त्यांना बसण्याची विनंती केली. इतर कोणी भेटावयास आलें असतां कैद्याला १५ मिनिटांपेंक्षां अधिक वेळ भेटण्याची परवानगी नसते. पण भास्करराव तब्बल दोन तास माझ्याशीं बोलत बसले तरी उठेनाताच. ते मराठींत बोलूं लागले. भास्कररावांना मीं ''कां आलांत ?'' असें विचारलें. ''एरव्हीं समाचाराला आलों'' असें सांगून ते म्हणाले, ''आतां तुम्ही वृद्ध झालां आहांत. तुम्हांस विश्रांतीची जरुरी आहे. ती घेण्याचें निश्चित करीत असाल तर मी तुम्हांस नेण्यासाठीं आलों आहें,'' मीं म्हटलें, ''विश्रांतीच जर मला पाहिजे आहे, तर मला येथल्याइतकी बाहेर दुसरीकडे कोठें मिळणार नाहीं. आणि आमच्यासारखी मंडळी येथें असली तर बाहेरचीही थोडी गडबड कमी होईल.'' भास्करराव म्हणाले, ''अहो, काय बाहेर वणवा पेटला आहे. शहरांतून आणि खेड्यांतून सारखीच धामधूम चालली आहे.'' ''असें जर आहे तर आम्हांला येथेंच राहूं द्या'' मीं म्हटलें. ''मी येथें येण्यापूर्वी जर तुम्ही मनांत आणलें असतेंत तर मी येथें आलोंही नसतों. येथें आल्यावर मला बाहरे नेण्याचें मनांत आणून काय उपयोग ?'' असा एकमेकांच्या मनांतला भाव एकमेकांस कळल्यावर, मग ब्राह्मणेतर पक्षाविषयीं बोलणें सुरू झालें. ''ब्राह्मणेतर पक्षाची संघटना चांगली होत नाहीं, काम होत नाहीं'' वगैरे वगैरे माझीं स्पष्ट मतें मीं सांगितलीं. एकंदरींत हें संभाषण आणि ही भेट मला आंधळ्या कोशिंबिरीप्रमाणें वाटली.
तुरुंगांतील दिनचर्या : 'सी' क्लास व 'बी' क्लास यांतील फरक असा आहे. 'सी' क्लासच्या कैद्यांना सकाळीं १ वाडगाभर जोंधळ्याची कांजी मिळते. मग १० वाजतां १ किंवा बाजरीच्या भाकरी आणि मुगाची आमटी. संध्याकाळीं ५ वाजतां पुन्हां तेंच जेवण मिळतें. नेसावयास खादीचे दोन मांडचोळणे व दोन सदरे मिळतात. निजावयास एक काथ्याचें तरट व दोन कांबळीं. 'बी' क्लासला कांजीच्या ऐवजीं सकाळीं ७ वाजतां अर्धा शेर दूध, १० वाजतां चपाती, भात, वरण, एक भाजी, लोणी व साखर. संध्याकाळीं ५ वाजतां तेंच जेवण. दोन्ही क्लासला चटणी वगैरे कांहीं तिखट मिळत नाहीं. 'बी' क्लासला नेसावयास ठराविक धोतराचीं पानें, अंगांत दोन सदरे, डोक्यास खादीची गांधी टोपीसारखी टोपी. निजावयास एक गादी, एक चादर, एक उशी आणि अंथरावयास दोन कांबळीं. भांडीं 'सी' क्लासला १ उथळ वाडगा व १ कथलाचें टमरेल एवढींच भांडीं मिळतात. 'बी' क्लासला ऍल्युमिनियमचें ताट, तांब्या, दोन वाडगे हीं भांडीं मिळतात. कैद्यांनीं हीं भांडीं वरचेवर स्वच्छ ठेवावींत अशी ताकीद मिळे व त्यांची तपासणी होत असे. रोज सकाळीं डॉक्टर येऊन कैद्यांची तपासणी करीत असे. रोग्यांस औषण आणून देत. 'बी' क्लासला खोलींतच औषध मिळे. 'सी' क्लासला दवाखान्यांत जावें लागे. आजार गंभीर असल्यास रोग्याची तुरुंगांतील हॉस्पिटलांत रवानगी होई. दर आठवड्यांला स्वतः जेल सुपरिंटेंडेंट येऊन प्रत्येक कैद्याची तपासणी करून कांहीं गरजा, अडचणी असल्यास ऐकत असे. त्याच्याबरोबर जेलर, असिस्टंट जेलर, वॉर्डर वगैरे असत. एक असिस्टंट जेलर रोज कैद्यांस येऊन भेटून जात असे. ही सर्व बडदास्त राजकीय 'बी' कैद्यांसाठींच असे. 'बी' क्लासचे सगळे कैदी एकाच वॉर्डांत ठेवण्यांत आले होते. त्यांना एकमेकांच्या खोलींत जाण्यास मनाई असे; पण व्हरांड्यांत किंवा अंगणांत बोलण्यास हरकत नसे.
तुरुंगांतील कामें : 'बी' क्लासच्या सक्तमजुरीच्या कैद्यांना काथ्याचीं जुनीं तरटें उकलणें आणि उकललेल्या काथ्यांची पुन्हा नवीन दोरखंडें बनवणें हें काम सकाळीं सातपासून १० पर्यंत व दुपारीं १२ पासून ४ पर्यंत असें एकंदर ७ तास असे. 'सी' क्लासला बाहेरचीं कष्टाची कामें मिळत व धट्टयाकट्टया माणसास चक्की मिळे. म्हातार्या माणसांना सवलतीनें काम मिळे. पण काथ्या वळण्याचें काम फार श्रमाचें नसल्यानें माझें वय ५८ वर्षांचें होतें तरी माझ्या आणि माझ्याबरोबर इतर तरुण कैद्यांच्या कामांत कांहीं फरक होत नसे. नित्य उठून ह्या प्रकाराशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नसल्यानें कैद्याच्या मनांत उदासीनता येत असे. आमच्या दालनाच्या समोरील अंगणांत पूर्व बाजूस एक कलमी आंब्याचें ठेंगणें झाड व पश्चिम बाजूस एक लिंबाचें झाड हिरव्यागार पालवीनें वांकलेलें दिसे. वरचेवर आम्ही त्यांच्याजवळ जाऊन आमच्या मनाची उदासीनता घालवीत असूं. दर पंधरवड्यांनें आमचीं वजनें घेण्यांत येत असत. ता. १०।८।३० रोजीं माझें १४४ पौंड वजन भरलें. तीन महिन्यांत माझें १२ पौंड वजन कमी झालें.
आमांश व गाउटचा आजार : येथें आल्यापासून मी जून महिन्याचे शेवटीं आमांशानें आजारी पडलों. त्यांतच मला म्हणजे बोटांतील संधिवाताचा विकार झाल्याचें कळलें. माझ उजव्या पायाचीं तीन बोटें नखाजवळ पाळीपाळीनें दुखूं लागलीं. हा आजार मला पूर्वी कधीं झाला नव्हता. मला हॉस्पिटलांत सुमारें ८ दिवस ठेवण्यांत आलें. ता. १४ ऑगस्टला घरची मंडळी भेटण्यास आली, तेव्हां हॉस्पिटलांतून भेटण्याचे ठिकाणीं जाण्याचीसुद्धां मला शक्ति नव्हती. कसाबसा भेटून परत आल्यावर अंगांत ताप चढला. रात्रभर बोट ठणकून फार त्रास झाला. प्रकृतीची काळजी वाटूं लागली. दुसरे दिवशीं सुजलेलें बोट फुटलें. ता. ९ पासून १९ पर्यंत हॉस्पिटलमध्येंच होतों. बोटांतून पू गेल्यामुळें आराम पडला. अंधारींत परत आलों. ऑगस्टच्या शेवटीं पुन्हां थोडासा आमांशाचा विकार झाला. हा अंथरुणांत पडण्यासारखा आजार नाहीं. नेहमींप्रमाणें खाणेंपिणें चालू असून काम पण करीत असे. रोज काथ्या वळण्याचें काम करावें लागल्यामुळें हाताचीं बोटें दुखत. पडल्या जागीं उठतांनाही श्रम होतात. हा प्रताप वार्धक्याचा कीं तुरुंगाचा हें कळेना.
तुरुंगांतील धर्माचरण : तरुंगांत हिंदु व मुसलमान कैद्याला धर्माचरण करण्याचें कांहीं साधन नाहीं. पण रोमन कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट या ख्रिस्ती पंथांची साप्ताहिक उपासना चालू असते. मला अशा उपासनांची फार गरज भासूं लागली. तेव्हां सुपरिंटेंडेंटच्या परवानगीनें मी कॅथॉलिक उपासनेस दर मंगळवारीं जाऊं लागलों. येथें येवरड्यांचे फादर लॉडर हे उपासक असत. उपासना सकाळीं चालू असे. आम्हांला 'इलेस्ट्रेटेड विकली' हें इंग्रजी साप्ताहिकच काय तें वाचावयास मिळे. 'विविध वृत्त' आम्हांस वाचावयास मिळणार अशी बातमी असि. जेलर मि. रॉजर यानें सांगितली. म्हणून आम्ही त्याबद्दल अधिकार्यांकडे वारंवार पृच्छा केली असतांही अधिकार्यांनीं त्यास सफाईनें बगल दिली. आमच्या वॉर्डांतील आम्ही चौदा कैदी दर रविवारीं तें पत्र आधाशासारखें वाचून काढीत असूं. राजकीय वार्तेची ह्यांत गंधवार्ताही नसे. म्हणून या पत्राची निवड झाली होती. सोमवारीं पुन्हां हें आमच्याकडून काढून घेण्यांत येत असे. मजकूर संपल्यावर केव्हां केव्हा आम्ही जाहिरातीसुद्धां वाचीत असूं. त्या वेळीं राजकीय पखाचीं व गांधींचीं सरकारशीं समेटाचीं बोलणीं चाललीं होतीं. सप्रू, जयकर हे शांतिदूत गांधींना वरचेवर येऊन भेटून जात असत. तुरुंगाच्या दारावरील दुसर्या मजल्यांतील सुपरिंटेंडेंटच्या ऑफिसांत त्यांचीं बोलणीं चालत असत. बोलणीं समजलीं नाहीं तरी खालीं आवाज ऐक येई. त्यावरच आम्ही तृप्ति मानून घेत असूं.
स्थलांतर : एकदां पंडित नेहरूना उत्तर हिंदुस्थानांतून येरवड्यांत आणण्यांत आलें. त्यांच्यासाठीं अंधारीचा वॉर्ड खालीं करून पाठीमागें सर्कल म्हणून एक मोठें दालन आहे त्यांत आम्हां चौदा जणांस एकत्र ठेवण्यांत आलें. हरिभाऊ तुळपुळे, बाळुकाका कानिटकर, नगरचे देवचाके, स्वामी सदानंद, इतकेच काय ते महाराष्ट्रियन होते. बाकी सगळे गुजराथी होते, ज्या दालनांत आम्ही चौदा जण होतों त्यांत आम्ही येण्यापूर्वी 'सी' क्लासेस ८६ कैदी धरून ठेवण्यांत आले होते. दररोज शेंकडों राजबंदींचे थवेच्या थवे येत. येतांना त्यांच्या जयजयकाराच्या आरोळ्या ऐकून ते आल्याची आम्हांस वर्दी कळे. तुरुंगाच्या नेहमींच्या सगळ्या जागा गच्च भरल्यामुळें बाहेर तंबूंतून नवीन तुरुंग निर्माण करण्यांत आला होता. रोज नित्य नित्य नव्या बातम्या कर्णोपकर्णी कळत. चित्ताची चलबिचल होई. सर्कलमध्यें आल्यापासून आम्ही रोज भजन-उपासना एकत्र करीत असूं. माझें एक भाशाशास्त्रावर व्याख्यान झालें. आमच्या बोलण्यांत राजकारण नसल्यामुळें आमच्या उपासनांकडे व व्याख्यानांकडे जेलर कानाडोळा करूं लागले.
ऍडव्हायझरी कमिटी : प्रत्येक तीन महिन्यांनीं एक ऍडव्हायझरी कमिटी तुरुंग पाहण्यास येत असे. जून व सप्टेंबर महिन्यांत ही कमिटी आली. मि. मॅकी, कमिशनर व त्यांच्यासह सात-आठ युरोपियन व हिंदी गृहस्थ आले होते. हीं माणसें आम्ही जणुं काय प्राणिसंग्रहालयांतील प्राणची आहोंत, अशा समजुतीनें पाहून जात. कोणी कांहीं व कसलीही विचारपूस करीत नाहींत. मग ह्या कमिटीचा उपयोग काय ? दुसर्या कोणाजवळ न थांबतां मजसमोर सर्वांना आणलें. जणुं काय संग्रहालयांतील मी म्हणजे अतिशय प्रेक्षणीय प्राणी. हिस्ट्री तिकिट नांवाचें लहानसें पुस्तक प्रत्येक कैद्याच्या नांवें असतें. त्यांत त्याचें वर्तन, वजन, दिनचर्या नमूद केलेलीं असतात. माझें तिकिट कमिटीच्या मुख्य साहेबानें पाहिलें. मंडळी मुक्याचें व्रत पाळून आली तशी गेली.
मीं येथें ता. १२ मे रोजीं आल्यापासून तुरुंगाधिकार्यांकडे लेखनसाहित्याची मागणी केली. एक महिन्यानें मागणी सफल झाली. टाक असला तर दौत नाहीं, दौत असली तर शाई नाहीं, आणि हें सर्व असलें तर दिवा नाहीं असा प्रकार नेहमीं चालू असे. ता. २४ जुलै रोजीं माझ्या खोलींत दिव्याची व्यवस्था करण्यांत आली. अडीच महिन्यांनंतर मिळणार्या दिव्याच्या प्रकाशाकडे पाहून मला आनंद झाला. तो इतका कीं लिहण्याचें सोडून मी दिव्याकडेच पाहात बसलों. त्या दिवसापासूनच मी माझी रोजनिशि व बाळपणींच्या आठवणी लिहूं लागलों.
मुक्तता : ता. १३ ऑक्टोबर १९३० ला मी व बाळूकाका अंगणांत शत पावली करीत असतां आमचा वॉर्डर सखाराम तुकाराम धाकटे (एक मराठा जातीचा खुनी कैदी) एकदम मजकडे येऊन माझ्या पायां पडून रडूं लागला. आपण वॉर्डर या नात्यानें थोडेंसें कडक वागवल्याबद्दल पश्चात्ताप झाला एवढेंच तो म्हणत होता. मला मागाहून कळलें कीं, माझी सुटका ता. १४ रोजीं होणार होती हें त्याला, आधीं कळलें होतें. पण तें त्याला मला कळविण्याचा अधिकार नव्हता. ह्या शिस्तीमुळें मी त्यास पुन्हां भेटणार नाहीं म्हणून त्याचें हें रडें होतें.
ता. १४ ऑक्टोबर १९३० रोजीं सकाळीं उठल्याबरोबर जमादारांनीं येऊन मी सुटलों, म्हणून सामानाची तयारी करून लवकर ऑफिसांत येण्याची वर्दी दिली. पुणें शहर काँग्रेस कमिटीचे चिटणीस श्री. जोशी हेही मजबरोबरच सुटले. माझी डायरी व लेख तपासून कांहीं आक्षेप निघतील कीं काय अशी मला भीति होती; पण तसें कांहीं झालें नाहीं. ८ वाजण्याचे सुमारास आम्ही बाहेर पडलों.
एकंदरींत सर्व अधिकार्यांनीं माझ्या तुरुंगवासांत मला बरें वागवलें. मध्यंतरीं एका तरुण युरोपियन जेलरनें तुरुंगाच्या नियमांची सबब सांगून माझी दाढी व डोकीवरचे केस काढण्याचा घाट घातला होता. ''पण ती कधीं निघावयाची नाहीं'' असा मीं त्यास निक्षून जबाब दिला म्हणून तें प्रकरण कसेंबसें निपटलें.
मी सकाळीं ९।१० च्या सुमारास घरीं पोंचलों. दुसरे दिवशीं रेमार्केटांत जाहीर सभा भरवून माझें अभिनंदन करण्यांत आलें. शेवटीं माझ्या गळ्यांत हार घालतांना मीं म्हटलें, ''आतां कायदेभंग करून तुरुंगांत जाणें ही इतकी सामान्य गोष्ट झाली आहे कीं, अशा माळा तुरुंगांतून परत आलेल्यांच्या गळ्यांत न घालतां त्या अद्यापि तुरुंगांत न गेलेल्यांच्या गळ्यांत घातलेल्या बर्या.'' सभेंत हंशा पिकला.
बडोद्याच्या सफरी : १९२९ च्या हिंवाळ्यांत बडोदा येथील सहविचारिणी सभेनें मीं बडोद्यास येऊन व्याख्यान द्यावें अशी विनंती केली. त्या वेळीं माझ्या सुनेच्या बडोदा राज्यांतील मिळकतीविषयीं कांहीं खाजगी काम होतें. म्हणून मी माझ्या सुनेला व तिच्या ट्रस्टींना बडोद्यास घेऊन गेलों. जयसिंगराव स्टेट लायब्ररीमध्यें माझें व्याख्यान झालें. 'तौलनिक भाषाशास्त्र' हा विषय होता. श्रीमंत संपतराव गायकवाड अध्यक्षस्थानीं होते. व्याख्यानाची हकीकत वर्तमानपत्रांतून वाचून श्रीमंत मासाहेब महाराणी चिमणाबाईसाहेब यांनीं मला भेटीस बोलावलें. रशियांतील कम्युनिझम वगैरे विषयावर बरेंच भाषण झालें.
मांसाहेबांच्या भेटीचा माझा पहिलाच प्रसंग होता. त्यांच्याही मनांत मला बरेच दिवस भेटावयाचें होतें.
जानेवारी महिन्यांत महाराज युरोपहून परत आले. भेटीनंतर थोडे दिवस बडोद्यास राहून दोन तीन व्याख्यानें देण्यास त्यांनीं फर्मावलें. ता.२२ जाने. रोजीं ''लक्ष्मीविलास'' पॅलेसमधील दरबारहॉलमध्यें Study of Universal Religion (विश्वधर्माचें अध्ययन) ह्या विषयावर माझें व्याख्यान झालें. आमंत्रणावरून सर्व दरबारचे लहानमोठे अधिकारी हजर होते. ऑक्सफर्डच्या मँचेस्टर कॉलेजच्या ह्या विश्वधर्माच्या अध्ययनाप्रीत्यर्थ बडोदा संस्थानांत एक विद्यालय असावें असा महाराजांचा फारा दिवसांचा मनोदय होता. मागें जेव्हां जेव्हां ते मुंबई-पुण्यास येऊन मला भेटण्यास बोलावीत तेव्हां तेव्हां हा विषय काढून महाराज माझ्याशीं विचारविनिमय करीत आणि ह्या कामासाठीं मीं बडोद्याला येऊन रहावें अशी इच्छा प्रदर्शित करीत. पण माझ्या इतर कार्यबाहुल्यामुळें आजवर तें शक्य झालें नव्हतें. आतां पुन्हां तोच विषय काढून, ह्याविषयीं एखादी निश्चित योजना तयार करून देण्याचें महाराजांनीं मला सांगितलें. मीं त्यांना कांहीं टिपणें लिहून दिलीं. तेवढ्यानें त्यांचें समाधान झालें नाहीं. त्यांनीं तीन व्यवस्थित योजना मागितल्या. एक साधी आणि कमी खर्चाची; दुसरी त्याहून अधिक खर्चाची, पण अधिक तपशिलाची; तिसरी पद्धतशीर मँचेस्टर कॉलजसारख्या एखाद्याच कॉलेजची.
ह्या बडोदें संस्थानांतील जुन्या शिक्षणपद्धतीचें धर्मशिक्षण व अनुष्ठान पाहून ह्याच योजनेंत मँचेस्टर कॉलेजसारख्या उदार धर्माची योजना कशी बसवावी हा एक प्रश्नच होता. ह्यासाठीं बडोद्यांतले कांहीं अधिकारी मदतीला घेऊन ही योजना मीं तयार केलीं. ह्या मंडळींत प्रो. चिं. वि. जोशी आणि ट्रेनिंग कॉलेजचे प्रि. रा. व्होरा होते. योजना तयार करून महाराजांपुढें ठेवावयाचे वेळीं ते आजारी पडले. खाजगी रवानगी खात्यातर्फे श्रीमंत संपतराव गायकवाड यांना ह्या योजनेंत लक्ष घालण्यास महाराजांनीं फर्मावलें. शेवटीं सर्व योजना दिवाणसाहेबांकडे त्यांच्या विचारासाठीं पाठवण्यांत आली. शेवटीं हें प्रकरण संस्थानच्या कौन्सिलकडे जाणार हें जाणून कौन्सिलचे एक मुसलमान सभासद माझ्या ओळखीचे होते आणि माझ्याबरोबर ते गेस्ट हाउसमध्येंच राहात होते, त्यांची मीं भेट घेतली व त्यांना योजना दाखवली. हल्लींची पैशाची स्थिति ध्यानांत घेतां कौन्सिल ही योजना मुळींच पास करणार नाहीं, असें त्यांनीं आपलें खात्रीलायक मत सांगितलें. इतक्यांत महाराज विलायतेला गेले म्हणून मीहि पुण्यास आलों. एकंदरींत लक्षण पाहतां या विषयाचा अनुकूल विचार होणार नाहीं म्हणून मीं त्याचा नाद सोडून दिला.
१९३३ सालच्या जानेवारी महिन्यांत बडोद्याहून हुजुर-कामदार-ऑफिसांतून एक गृहस्थ मला भेटावयास आले, आणि त्यांनीं कळविलें कीं, १९३२-३३ सालचें ''श्रीमंत सयाजीराव गायकवाड पारितोषिक'' कमिटीनें तें पारितोषिक मला देण्याचा ठराव पास केला आहे. पारितोषिक १ हजार रु. आणि फक्त १९३३ सालापूर्वी दरमहा १०० रु. ची तैनात मिळून बावीसशें रुपये मला एकंदर रोख मिळाले. वार्षिक तैनात १२०० रु. मला मिळावी अशा शब्दयोजनेमुळें लोकांचा असा गैरसमज झाला कीं, मला संस्थानाकडून तहाहयात १०० रु. पेन्शनच मिळाली. ही चुकीची बातमी कांहीं वर्तमानपत्रकारांनीं प्रसिद्धही केली; पण खरा प्रकार एक वर्षासाठींच १२०० रु. मिळावयाचे असा होता. मला ही दुरुस्ती कांहीं वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करावी लागली.
ता. १७-१-३३ रोजीं मी बडोद्यास गेलों. मला तेथें बरींच सार्वजनिक आणि खाजगी कामें थोड्यां वेळांत उरकावयाचीं होतीं, म्हणून मी माझे मित्र रा. बी.बी. केसकर यांस बरोबर घेतलें. हें पारितोषिक हिंदुस्थानांतील सर्वमान्य मोठमोठे साहित्यिक, ग्रंथकार, लोकसेवक यांसारख्यांना नोबेल प्राइझच्या धर्तीवर देण्याचें बडोदें सरकारनें ठरवलें आहे. मीं केलेल्या समाजसेवेसाठीं सार्वजनिक मान्यता देण्याच्या हेतूनें हें पारितोषिक स्वीकारणार्यांनीं बडोद्यास एक आठवडा येऊन संस्थानचे पाहुणे म्हणून राहावें आणि सवडीनुसार एकदोन व्याख्यानें द्यावींत असा नियम होता. त्याप्रमाणें मी बडोद्यास गेलों. ह्याच वेळीं माझें 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हें संशोधनात्मक पुस्तक नागपूरचे प्रो. श्रीनिवास नारायण बनहट्टी यांनीं आपल्या नवभारत ग्रंथमालेतर्फे प्रसिद्ध केलें होतें. तो ग्रंथ मीं श्रीमंत सयाजीरावमहाराजांस अर्पण केला होता. ता. १८ जानेवारी १९३३ रोजीं सायंकाळीं बडोदा कॉलेजहॉलमध्यें श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज ह्यांच्या अध्यक्षतेखालीं माझें पहिलें मुख्य व्याख्यान ठरलें होतें. पण महाराजांची आकस्मिकरीत्या प्रकृति बिघडल्यानें त्यांनीं तशाही स्थितींत व्याख्यानास थोडा वेळपर्यंत हजर राहण्याचें औदार्य दर्शविलें.
मीं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माझ्या पुस्तकांतील विषय 'अस्पृश्यतेचा प्रश्न' ह्यांतील मुख्य मुख्य मुद्द्यांचें माझ्या व्याख्यानांत विवरण केलें. दरबारचे लहानमोठे अधिकारी व इतर शिष्टजनांनीं कॉलेजचा हॉल भरून गेला होता. ह्याशिवाय महाराजांचे आज्ञेनुसार पुन्हां एकदां 'लक्ष्मीविलास' पॅलेसमध्यें एक खास व्याख्यान झालें आणि त्यानंतर प्रो. माणिकराव ह्यांच्या प्रसिद्ध आख्याड्यांत एक व्याख्यान 'समाजसुधारणा' ह्या विषयावर सार्वजनिक रीत्या झालें.
बडोदा राज्यांतील अस्पृश्यवर्गाचें एक शिष्टमंडळ मला भेटून आपल्या तक्रारी सांगण्यासाठीं ता. १९।१।३३ रोजीं आलें. त्यांच्या एकंदर चौदा तक्रारी होत्या. (१) बडोद्यांतील कांहीं शाळांमधून आणि कॉलेजांतून अस्पृश्य मुलांना प्रवेश मिळण्यास अडचण येते. (२) जिल्ह्यांतील सार्वजनिक मोटार सर्व्हिसमध्यें बसून प्रवास करण्यास मज्जाव होतो. (३) बडोद्याखेरीज इतरत्र मंदिर प्रवेशास अटकाव होतो. (४) खानावळी, उपाहारगृहें वगैरे सार्वजनिक ठिकाणीं शिरकाव होत नाहीं. (५) पगाराचें मान फार कमी आहे. (६) वेठ धरण्याचे बाबतींत जुलूम होतो. (७) नळाचे पाण्याविषयीं गैरसोय. (८) कँपमधील (बडोद्याजवळील ब्रिटिश रेसिडेन्सीचा भाग) शाळांतून मुलें दाखल करतांना ख्रिश्चन म्हणून दाखल करावें लागतें वगैरे वगैरे. ह्या सर्व तक्रारी रीतसर नमूद करून मीं त्या विद्याधिकारी भाटे ह्यांच्याकडे पाठवल्या व त्यांचे लेखी खुलासे शिष्टमंडळाकडे पाठवले. ह्याशिवाय बडोदा शहराचे आसपास १०।१५ मैलांतील कांहीं निवडक खेडेगांवीं जाऊन त्या ठिकाणची अस्पृश्याची वस्ती, अस्पृश्यांच्या सोयी-गैरसोयी वगैरे गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या. ह्या वेळीं अस्पृश्यांचे पुढारी धनजीभाई व बडोद्यांतील सुप्रसिद्ध केशवराव देशपांडे यांना मीं बरोबर घेतले होते. श्रीमंत महाराजांकडे यऊन मीं ही हकीकत कळवली.
६ वें परिवर्तन : १९३३ साल संपत आलें त्याबरोबर (पान १२ वर) लिहिल्याप्रमाणें माझें ६ वें परिवर्तन घडून आलें, तें असें. माझ्या हाताचीं बोटें गाउटनें सुजूं लागलीं. अंगांत ताप वगैरे कांहीं नसतांहि शीणभाग भासूं लागला. बोटें लवकर बरीं होईनात म्हणून सहज डॉक्टरनें लघवी तपासली. बरीच साखर जात असल्याचें त्यानें निदर्शनास आणलें. मला मधुमेह झाला होता; पण तो उघडकीस यावयास चार वर्षे लागलीं. हा रोग मला बहुतकरून मी १९३० सालीं तुरुंगांत असतांनाच जडला असावा असें वाटतें. मुंबईला राहून उपचार करून आलों. पण रोगानें मांडलेलें ठाण कांहीं निघेना. हातापायांचा कंपवात वाढूं लागला. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे माझी धडाडीची सार्वजनिक कामगिरी बहुतेक येथेंच संपली.'