( १८८५-१८९१ अखेर )
हीं सात वर्षे माझ्या आयुष्यांतलीं महत्त्वाची होतीं. इ.स. १८८५ च्या पावसाळ्याचे आरंभीं माझा वडील भाऊ वारल्यामुळें माझ्या भावंडांत मीच वडील झालों आणि माझ्या स्वभावांत एकदम विलक्षण फरक पडला ! बाळपणाचा हूडपणा कमी होऊन मी गंभीर, विचारी व अभ्यासी बनलों. आईबाबांचा शोक, घरची झपाट्यानें खालावत चाललेली सांपत्तिक स्थिति, माझ्या आईला वरचेवर झालेल्या मुलांचे बाळपणांतले मृत्यु आणि बाबांचा हताश उदासीनपणा ह्याचा परिणाम मजवर दिवसेंदिवस अधिकाधिक घडत चालला. ह्या वेळीं मला ११ वें वर्ष संपून १२ वें नुकतेंच लागलें होते.
शिक्षकवर्ग : जमखंडी हा लहान संस्थानी गांव. त्या वेळीं संस्थानचें उत्पन्न ४।५ लाखांचें असावें. शहरची वस्ती १५ हजारांची. शाळा खात्याची स्थापना नुकतीच झाली असावी. अशा ठिकाणचें हायस्कूल कोणत्या दर्जाचें असावें ह्याची कल्पना सहज होते. मी हायस्कुलांत गेलों तेव्हां तें हायस्कूल झालें नव्हतें. फार तर पांच इयत्ता असतील. रा. त्रिंबकराव खांडेकर ह्यांना पुण्याहून हेडमास्तराचे जागेवर आणिलें होतें. त्यांची स्वतःची मॅट्रिकची तरी परीक्षा झाली असेल कीं नाहीं हें मला माहीत नाहीं. पण त्यांचा स्वभाव सुशील, नीतिमान्, नेमस्त, गंभीर आणि करारी होता. नवीन इंग्रजी शिकलेल्यांचा उथळपणा त्यांच्यांत मुळींच नव्हता. जमखंडी गांवांत व दरबारांत त्यांच्या ह्या स्वभावामुळें लोक व स्वतः यजमानही वचकून होते. असिस्टंट शिक्षकांत विशेष कोणी म्हणण्यासारखे शिकलेले किंवा फारसे बुद्धिमान् नव्हते. मी पांचव्या इयत्तेंत गेल्यावर शाळेचा दर्जा वाढून त्याच वर्षी वरील वर्गांत बाहेरील पदवीधर शिक्षक आणावे लागले. मी सहाव्या इयत्तेंत गेल्यावर जमखंडीच्या शाळेंतून मुलें प्रथमच मॅट्रिकच्या परीक्षेस पाठविण्यांत आलीं. तिसर्या वर्षी आम्हां चौघांना जमखंडी हायस्कुलांतून पाठविण्यांत आलें. त्याच सुमारास आमच्या शाळेला हायस्कूलचा दर्जा प्राप्त झाला. सहाव्या इयत्तेंत रा. वासुदेवराव चिरमुले, बी.ए. हे पहिले पदवीधर नवीन नेमण्यांत आले. रसायन शास्त्राच्या प्रयोगाचेंही कांहीं सामान शाळेला मिळालें. एकंदरींत आतांप्रमाणें त्या वेळीं तशा मागसलेल्या प्रांतांत इंग्रजी शिक्षणाचा दर्जा असावा तसा नव्हता. आगगाडी ( सदर्न मराठा रेल्वे ) मी पांचव्या इयत्तेंत जाईपर्यंत झाली नसावी.
विषयांची गोडी : पहिल्या वर्षी इंग्रजी हा विषय मला नवा असल्यामुळें व शिक्षक चांगला सहानुभूतीचा नसल्यामुळें मला तें वर्ष फार जड गेलें. पण दुसर्या वर्षापासून मला इंग्रजी भाषेची व शाळेंतील इतर सर्वसामान्य विषयांची गोडी लागली. तेव्हांपासून शिक्षक जरी विद्वान् नव्हते तरी सहानुभूतीनें शिकविणारे मिळाले. माझी हुशारी पाहून ते माझें कौतुक करूं लागल्यामुळें मला उत्तेजन मिळालें. Nothing succeeds like success (यशासारखें यशस्वी कांहींच नाहीं.) ही इंग्रजी म्हण मला तेव्हां जरी माहीत नव्हती, तरी तिचा अनुभव मला जास्त जास्त येऊं लागला. मराठी शाळेंत असतांना आम्ही वर्गांत जमिनीवर बसत असूं. तरटाच्या लांब पट्टया हांतरावयाला असत. इंग्रजी शाळेंत आम्हांला बाकावरबसावयास मिळालें. मागें टेकावयाला उंच व जाड उतरत्या पाठीचीं मेजें (डेस्कस्) असत. शाळेची इमारत शहरच्या मध्यभागीं, भर बाजारांत उंच अशा जोत्यावर, टुमदार व मनांत भरण्याजोगी होती. मराठ शाळेंत सकाळसंध्याकाळ दोन वेळां जावें लागत असे. इंग्रजी शाळेंत दोन प्रहरीं ११ पासून सायंकाळीं ५ पर्यंत एकदांच जावें लागे. मे महिन्याची लांब सुट्टी मिळे. मराठी शाळेच्या शिक्षकांचें पंतोजीपणाचें मुख्य लक्षण म्हणजे त्यांच्या हातांतील वेताची एक लांब छडी आणि तिचे केवळ मास्तरांच्या लहरीप्रमाणें आमच्यावर होणारे उदार प्रयोग ! इंग्रजी शाळेंत हा प्रकार बदलला. एकंदरींत मी एका नवीन जीवनप्रवाहांत पडल्याप्रमाणें वाटलें.
ग्रहणशीलता : इंग्रजी तिसर्या इयत्तेपर्यंत आम्हांला जुन्या काळचीं इंग्रजी क्रमिक पुस्तकें म्हणजे 'हॉवर्ड' ची मालिका. आतांच्या आकर्षक रीडर्सप्रमाणें त्यांत चित्रें वगैरे कांहीं नव्हतीं. तरी तिसर्या इयत्तेपासून इंग्रजी राहाटीचे धडे वाचावयाला मिळत. त्यामुळें ग्रहणशील बुद्धीच्या माझ्या डोळ्यांपुढें एका नवजीवनाचे नव्या रंगाचे पडदे दिसूं लागले. इंग्रजी शेताचें वर्णन, इंग्रजी झाडाझुडपांचीं नांवें, इंग्रजी खेडीं, इंग्रजी कुंपणावरील निरनिराळ्या जंगली वेली, फुलें वगैरे नवीन देखावे मला नवीन हर्ष देऊं लागले. त्यामुळें मला धडे आवडूं लागले. विषय आवडला म्हणजे तो सुलभ होतो. इतकेंच नव्हें तर परिणामकारीही हातो. तिसर्या इयत्तेचे शिक्षक रा. आप्पा काळे हे होते. त्यांच्या शिकवणींत एकपट रसिकता असली तर ती माझ्या हृदयांत चेंडूप्रमाणें उशी घेऊन द्विगुणित व चौगुणित होई. अशा रीतीनें शिक्षकाच्या सहानुभूतीला शिष्याच्या ग्रहणशीलतेची जोड मिळत चालली.
इंग्रजी अभ्यास : मी चौथ्या इयत्तेत गेलों, तर माझे आवडीचे शिक्षक आप्पा काळेही चौथ्या वर्गात शिक्षक झाले. इंग्रजी पुस्तक 'सँडफर्ड ऍंड मर्टन' हें लावण्यांत आलें. तें मला फार आवडलें. विचार नवीन व उदार, भाषा बालबोध, मधून मधून इंग्रजी पोषाखांचीं चित्रें, इंग्रजी राहणीचीं व वनश्रीचीं शब्दचित्रें आणि छायाचित्रें ह्यांमुळें इंग्रजी राहणीविषयीं कुतूहलता मजमध्यें दिवसेंदिवस वाढूं लागली. इतकी कीं पुढें मी मोठा झाल्यावर दैववशात् इंग्लंडांतील उत्तमोत्तम विश्वविद्यालयांत, ऑक्सफर्ड येथें दोन वर्षे राहावयास मिळालें, तेव्हां तेथील खेड्यांपाड्यांत जाऊन शेतांत, कुंपणांत फिरून मीं जे देखावे पाहिले व अनुभव घेतला त्यांचीं पूर्वस्वप्नेंच जणुं मला माझ्या जमखंडीसारख्या खेडवळ शाळेंतील क्रमिक पुस्तकें वाचीत असतांना पडत होतीं. पांचव्या इयत्तेंत 'लँबस् टेल्स' हें पुस्तक लावलें होतें. त्यांत कविकुलगुरु शेक्सपियर्सची भेट झाली. शिकविण्यास ठाकूर नांवाचे पुणेरी शिक्षक होते. सहाव्या इयत्तेंत 'रीडिंगज् फ्रॉम दि स्पेक्टेटर' हें पुस्तक चिरमुले ह्यांनी शिकविलें. हे एक ग्रॅज्युएट-बी.ए. होते. यांत ऍडिसच्या खर्या बालबोध इंग्रजीचा व ताज्या विचारांचा मासला कळला. अशा रीतीनें माझ्या हृदयांत इंग्रजी भाषेची नव्हें, तर संस्कृतीच्याचही पक्षपाताचीं बीजें इतक्या कोंवळेपणांतच रुजूं लागलीं.
पांचव्या इयत्तेंत संस्कृत, भूमिति आणि बीजगणित व सहावींत रसायन, यंत्रशास्त्र, भूगोल, खगोल इत्यादि आधुनिक शास्त्रांची मूलतत्त्वें ह्यांचा उपक्रम झाला. एखाद्या मनोर्यावर चढत असतांना प्रत्येक मजल्याभोंवतालचें क्षितिज अधिकाधिक विस्तीर्ण होऊन ज्याप्रमाणें जास्त प्रदेश दृष्टीच्या टापूंत येतो व आनंद वाढतो त्याप्रमाणें माझा हा हायस्कूलमधला अभ्यासक्रम मला फार चित्तवेधक व बोधकारक झाला. त्यामुळें माझ्या घरांतील भयानक दारिद्र्याच्या वेदना मला कधींच भासल्या नाहींत, कीं माझ्या शिशुदशेच्या सहजानंदांत कधीं खंड म्हणून पडला नाहीं. ह्या माझ्या सदानंदी उत्साहामुळें माझ्या आईबाबांचें दुःखही हलकें झालें. विशेषतः माझ्या आईला आपले कठीण कष्ट सह्य झाले, ह्या गोष्टीचा मला आतां अभिमान वाटतो.
सकृद्दर्शनीं प्रेम : आमची खेडवळ शाळा, तो जुना काळ; इंग्रजी विद्येचा आमच्या देशांत आतां कोठें नवा आरंभ झालेला, तशांत माझें कोवळें वय ह्या सर्व गोष्टी विचारांत घेतां, पुढें माझ्यावर इंग्रजी संस्कृतीनें जो अमोघ मोहपाश टाकला आणि माझ्या सर्व आयुष्याचा प्रवाह बदलून टाकला, त्या भावी परिणामाचे डोहाळे जणुं मला ह्या माझ्या साध्याभोळ्या शाळेंत भासूं लागले. Love at first impression म्हणजे सकृद्दर्शनीं प्रेमाच्या झटक्याचाच हा एक मासला माझ्या प्रत्यक्ष अनुभवास आला.
मराठी अभ्यास : मी केवळ इंग्रजीला हुरळून तन्मय झालों आणि माझ्या मातृभाषेला व संस्कृतीला पारखा झालों असें मुळींच नव्हे. चवथ्या-पांचव्या इयत्तेंत आम्हांला नवनीतांतील कांहीं कविता लावल्या होत्या. त्यांत विशेषेंकरून रघुनाथ पंडिताचे नलदमयंती आख्यानानें मजवर जो ठसा उमटविला तो अद्यापि ताजा आहे. ह्या सुंदर काव्यांतील कविता मी घरीं माझ्या आईला व बहिणींना म्हणून दाखवून मोठ्या रसिकतेनें त्यांचा अर्थ सांगत असें. मराठीवरील माझें अकृत्रिम प्रेम वाढण्यास शाळेपेक्षां अधिक साधनें माझ्या घरींच होतीं, हें सांगण्यास मला कृतज्ञता वाटते. श्रीधर, महिपति, तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे मराठी कवि आणि प्रासादिक संतांच्या ग्रंथांचें पारायण माझे बाबा स्वतःच घरीं करीत असत. त्यांच्या संग्रहीं ह्या जुन्या पोथ्या बर्याच होत्या व त्या वाचून ते नेहमीं इतरांस पुराणिकाप्रमाणें अर्थ सांगतांना मी ऐकत असें. चवथ्या-पांचव्या इयत्तेंत माझें मराठी सुधारल्यावर मी स्वतः रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, भक्तिविजय वगैरे ग्रंथ नित्य वाचून आपल्या वर्गांतल्या मुलांना त्यांचा अर्थ सांगत असें. त्या वेळीं मराठी गद्य वाङ्मय तयार झालें नव्हतें; पण आम्हांला त्याची वाण भासली नाहीं. आतां जी आधुनिक वाङ्मयात गबाळ वाढ झाली आहे तिच्यामुळें बालबोध मराठीच्या परिचयांत विशेषे भर पडली किंवा फायदा झाला, असें मला वाटत नाहीं.
संस्कृत अभ्यास : सहावींत माझा संस्कृतशीं संबंध घडला. आमच्या शाळेंत रा. गणेशशास्त्री जोशी म्हणून एक जुने शास्त्री संस्कृत वाङ्मय शिकविण्यास होते. मॅट्रिकचा अभ्यास करतांना एक्स्ट्रॉ रीडिंग म्हणजे शाळेंतील वर्गांत नेमलेल्या अभ्यासापलीकडे कांहीं वांचणें बरें असतें. तें वाचावयास शास्त्रीबोवांचे घरीं आम्ही कांहीं विद्यार्थी मिळून जात असूं. माझा पहिला नंबर पाहून शास्त्रीबोवा मी जातीन मराठा म्हणून कोणताही भेद मनांत न आणतां रसिकतेनें रघुवंश, कादंबरी, शाकुंतल वगैरे वाङ्मय आम्हांला शिकवीत असत. सकाळीं आम्ही त्यांचेकडे जात असूं. ते गोठ्यांत गाईचें शेण काढीत असतांना तोंडात तंबाकूचा बार भरून त्याच्या मधून मधून पिचकार्या मारीत कधीं कधीं इकडे तिकडे फिरत आम्हांला रघुवंशांतील श्लोक सांगत. बाणाची कादंबरी त्यांनीं आम्हांला अशी शिकवली कीं, ती त्यांची हंसत मुद्रा, सूक्ष्म विनोद, प्रेमळ बोल मला अद्यापि आठवतात. अच्छोद सरोवरावरील शिवालयांतील महाश्वेतेच्या संगीत भजनासारख्या देखाव्याचें वर्णन करण्याची पाळी आली कीं, गणेशशास्त्रांच्या स्वाभाविक रसिकतेला पाझर फुटे, शृंगार, वीर, करुणादि नऊ रसांचें अभ्यंगस्नान आम्हांला घडे. ऍडिसनचे 'सर रॉजर डी कॉव्हरले' वाचीत असतांना जो मी इंग्लंडांतील खेड्यांतील देखाव्यांत रमे, तोच एकदम दीड हजार वर्षांपूर्वीच्या श्रीहर्षाचें चरित्र शास्त्रीबोवांच्या मुखांतून ऐकतांना मागील भारतीय वैभवाच्या शिखरावर भ्रमण करूं लागे. आणि हीं स्थळ-कालांतरें करणारा मी त्या वेळीं १७।१८ वर्षांचाच होतों !
रसिकता : गणित असो वा शास्त्र असो, भाषा असो वा व्याकरण असो, परकीय इंग्रजी असो वा मृत संस्कृत असो कीं मातृभाषा चालू मराठी असो, माझी गति सारखीच अकुंठितपणें चाले. सर्व हायस्कूलच्या अभ्यासक्रमांत मला अभ्यासाचे श्रम म्हणून कधीं भासलेच नाहींत. ह्याचें कारण माझ्या बुद्धीचें तेज नसून (मी बुद्धीनें साधारणच आहें) केवळ माझ्या हृदयाची निर्मळ रसिकताच होय, हें मला येथें नमूद करावयाचें आहे. ही रसिकता मला शाळेपेक्षां घरांतच अधिक, गुरूंपेक्षां माझ्या आई-बापांकडूनच जास्त मिळाली हें खास. माझ्या घरीं जातिभेद नव्हता, तसा माझ्या हृदयांत संस्कृतिभेदाचा किंवा पक्षपाताचा कृत्रिमपणाही नव्हता. सौंदर्य जेथें भेटेल तेथें ऊर्ध्वहस्तानें स्वीकारण्यास मी लहानपणापासून एका पायावर तयार आहें. मग तें इंग्लंडांतलें असो कीं स्वदेशांतलें असो, शहरांतलें असो कीं खेड्यांतलें असो, संस्कृत असो कीं प्राकृत असो, तें सहज व स्वाभाविक असलें कीं पुरे. मी त्याला बिलगतोंच म्हणून समजावें. ह्या माझ्या मुग्ध शृंगारी स्वभावामुळें, केवळ कपटी व्यवहाराच्या दृष्टीनें पाहतां प्रपंचांत माझें बर्याच अंशीं नुकसान झालेंआहे आणि कांहींजणांमध्यें मजसंबंधी दुराग्रहही पसरला आहे, तरी पण 'स्वभावो दुरतिक्रमः' ह्या न्यायानें मी आपला माझ्याच चालीनें चाललों आहें, ही चाल मी हायस्कुलांतच नव्हें तर अगदीं माझ्या पाळण्यांतच किंबहुना माझ्या मातृगर्भातच शिकलों असेन.