हायस्कुलांत असतांना विशेषतः ४ थ्या ५ व्या इयत्तेपासून पुढें माझ्यामध्यें भावी सामाजिक सुधारणेचें बीजारोपण कसें होऊं लागलें ह्यासंबंधींच्या आठवणी देऊन मी हा हायस्कूलचा काळ पूर्ण करणार आहे. ह्यालाही माझ्या आईबाबांचा धर्म आणि शील हींच केवळ कारणीभूत आहेत.
भावंडांचीं नांवें : माझ्या आजाआजींचा धर्म कसाही असो, ते जिवंत असेतोंपर्यंत जरी माझ्या आईबाबांनीं त्यांच्या पुरातन देवदेवींच्या उपासनेची परंपरा बिनतक्रार चालविली होती-, तरी ती त्यांच्या पाठीमागें फार दिवस टिकली नाहीं. आजा-आजी असतांनाच बाबांच्या पंढरपूरच्या वारकरी पंथांत नुसता प्रवेशच नव्हें तर पुढाकारही चालू होता. माझ्या वडील भावाचें लाडकें नांव जरी भाऊ असें होतें तरी त्याचें पाळण्यांत ठेवलेलें खरें नांव परशुराम हें होतें. श्रीयल्लम्मा हें रेणुकादेवी-जमदग्नि ॠषीची पत्नी-हिचें तेलगू अथवा कानडी नांव होय. तिचा मुलगा परशुराम. हें नांव माझ्या भावाला श्रीयल्लमाची भक्ति करणारी जी माझी आजी तिनें ठेविलें असावें. पण पुढील सर्व मुलांचीं नांवें माझ्या बाबांनीं आपल्या पंढरपूरच्या भागवत संप्रदायाप्रमाणें ठेविलेलीं आहेत. तीं अशीं. परशुरामाच्या पाठीवरच्या आणि माझ्या आधींच्या मुलाचें नांव कृष्णा. हा लहान असतांनाच माझे आईचे अंगाखालीं झोपेंत चेंगरून मरण पावला, हें मागें आलेंच आहे. ह्यानंतर माझें नांव विठू. जन्मपत्रिकेंत माझें पाळण्यांत ठेविलेलें नांव तुकाराम असें आढळतें. माझ्या जन्माचे वेळीं बाबा पंढरपूरच्या वारीला गेले होते. म्हणून परत आल्यावर त्यांनीं माझें नांव विठ्ठल हें ठेविलें. मी पांचवा मुलगा. माझ्यानंतरचा मुलगा नांव ठेवण्यापूर्वी ६।७ वे दिवशींच वारला. नंतर मुलगी झाली. ती ७ वी जनाक्का. ही कार्तिक शुद्ध एकादशीस जन्मली. ह्या वेळींही बाबा पंढरपुरास जाऊन आले असावेत. आठवी मुलगी तान्याक्का. हिचें पाळण्यांतलें नांव मुक्ताबाई असें आहे. पुढें जी बरींच मुलें झालीं तीं लहानपणींच वारलीं. त्यांपैकीं एकाचें नांव दत्त होतें. शेवटचा मुलगा एकनाथ. अगदीं अखेरचें मूल चंद्राबाई. हें नांव मात्र बबलादी सिद्धांचें जें उपास्यदैवत चंद्रगिरीताई तिचेवरून ठेविलें होतें. एकंदरींत वारकरी पंथाच्या साध्या, उदार, प्रागतिक, भागवत धर्माचा पगडा माझ्या वडिलांच्या मनावर आणि अकृत्रिक शीलावरही बसला होता.
मातापित्यांचें ॠण : तुकाराम हें नांव मागें पडून विठू हें माझें नांव कसें पुढें रूढ झालें त्याचा जरी शोध आतां नीट लागण्याचा संभव नाहीं, तरी माझ्या बाबांच्या भागवत धर्मांतून माझी भावी सामाजिक सुधारणा कशी उदय पावली हें शोधून काढणें तितकें कठीण नाहीं.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनावें ॥१॥
हा तुकारामाचा अभंग सर्वच वारकरी म्हणतात. पण त्याचा ठसा बाबांनीं व आईनें माझ्या ग्रहणशील हृदयावर आपल्या प्रत्यक्ष आणि पदोपदींच्या प्रेमळ आचरणानें जो उठविला आहे, त्यांत ज्या भावी साधारण ब्राह्मसमाजाचा मी प्रचारक झालों त्यानेंही विशेष भर टाकिली असें माझ्यानें म्हणवत नाहीं.
ज्ञानदेवें घातला पाया । तुका झाला कळस ॥
ह्या उक्तीप्रमाणें ज्या शुद्ध भागवत धर्माची प्राणप्रतिष्ठा महाराष्ट्रांत झाली त्यांतच उदार, सामाजिक प्रागतिकतेची व सहानुभूतिपूर्ण सहिष्णुतेचीं भरपूर बीजें होतीं.
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ।
आवडीनें नामें गाती, ते नर पावती मंगल धाम ॥
हें सुंदर भजन म्हणून नाचणार्या पुष्कळ वारकर्यांच्या आचरणामध्यें वरील साधूंच्या शुद्ध शिकवणीचा मेळ दिसत नाहीं. पण माझ्या वडिलांच्या आचरणाविरुद्ध मला ही कुरकुर करावयाला मुळींच जागा नाहीं. प्रार्थना अगर ब्राह्मसमाजाचा परिणाम अद्यापि मराठ्यांवरच नव्हे, तर इतरही महाराष्ट्रीयांवर झालेला नसून मी मात्र आज या समाजाचा एक का होईना पण अपात्र प्रचारक म्हणून वावरत आहें. ह्यांत कांहीं श्रेय असेल तर मोठा भाग ह्या समाजापेक्षां माझ्या वडिलांनीं घालून दिलेल्या जिवंत आचरणाच्या धड्यांकडेच जास्त आहे !
आमचें घराणें मूळचें दक्षिणेकडील अस्सल कर्नाटकांतलें. राजपुतांशीं संबंध लावणार्या उत्तरेकडील मराठ्यांपेक्षां दक्षिणेकडील देशस्थ मराठे साध्या राहणीचे व बाळबोध वळणांतले. ह्यांचा मराठमोळा पडदानशीन नखर्याचा नाहीं किंवा ब्राह्मणी सोंवळेपणाच्या जातिभेदालाही फारसा जुमानणारा नाहीं. निदान माझ्या पाहण्यांत माझ्या आजीपासून तरी ह्या दोन सामाजिक विषांची बाधा आमचे घरीं दिसून आली नाहीं. ह्यांत माझ्या बाबांनीं आपल्या सहजसुंदर भागवत धर्माची भर टाकली. ''कोणाही जीवाचा न घडो मत्सर'' हें वर्म तर माझ्या आईच्या स्वभावांत अगदीं श्वासोच्छ्वाप्रमाणें सहज भिनलें होतें. ह्यांत मीं पामरानें कांहींच भर टाकणें शक्य नव्हतें.
पवित्र वातावरण : आमच्या घरीं पडदा नव्हता. इतकेंच नव्हें तर बाहरेची कोणी सभ्य आणि विश्वासार्ह पाहुणेमंडळी अगर मित्रमंडळी आली, तर त्यांच्याशीं आमच्या घरचीं स्त्रीपुरुष आणि लहानथोर सर्व माणसें फार मोकळेपणानें व आपलेपणानें वागत असत. ह्या स्वाभाविक बाळबोधपणामुळें आमच्या घरीं येणार्यांना अगदीं पवित्र आणि भारलेल्या वातावरणांत उतरल्याप्रमाणें अनुभव येई, असे कित्येकांनीं आमचेजवळ उघड उद्गार काढावे. माझ्या मित्रांना आमच्या घरच्या अकृत्रिम व निष्कपट चालीरीति, घरांतील लोकांचा एकमेकांशीं स्नेह व गोड वागणूक आणि दुसर्यांशी तसेंच वर्तन अगदीं नमुनेदान वाटत. कांहीं नवीन आलेले स्नेही तर कांहीं गोष्टींकडे टक लावूनच पाहात बसत ! आमच्या घरची शांति, तृप्ति, प्रीति ह्या त्यांना कांहीं अवर्णनीय वाटत. आमच्या घरीं आल्यावर एखाद्या पुरातन देवळांत गेल्याचा त्यांना भास होऊन, परत जावेंसें वाटत नसे ! आमचे बाबा आपल्या मुलींना ''आई'' म्हणून हांक मारीत असत ही लहानशीच गोष्ट, पण परकीयांवर ह्या गोष्टींतील सहृदयतेचा परिणाम चटकन् होई. माझ्या दोन लहान बहिणी माझ्या लहानग्या मित्रांबरोबर लडिवाळपणानें व मोकळेपणानें वागत. आई तर माझ्या कोणाही मित्राला आपल्याच मुलाप्रमाणें वागवावयाला केव्हांही तयार असे. ह्यामुळें आमचे घरीं विश्वकुटुंबियतेचा जिवंत देखावा अथवा साक्षात्कार दिसे.
नुसता पडदा न घालणें ह्यांत कांहीं विशेष नाहीं; पण अंतःकरणांतच मुळीं पडद्याला थारा न देणें ही दैवी कृपा होय. आमचे घर म्हणजे ह्या कृपेचा एक देव्हारा होता ! प्रापंचित विपत्ति कितीही आल्या; दारिद्र्य, आजार, मरण, कर्जाचा बोजा असले इतर कितीही मनाची पारख करणारे प्रसंग आले, तरी घरचें शांतीचें वातावरण कधीं क्षुब्ध होत नसे. येणेंप्रमाणें भौतिक दारिद्र्यांत आत्मिक श्रीमंतीचा भोग आमचे घरीं आणि घरांतील लहानथोर व्यक्तींत दिसत असे. अशा घरीं मग जातिभेदाला कोठून वाव मिळणार ! आधुनिक सुधारकांप्रमाणें जातिभेद मोडण्याची उठाठेव करण्याची आम्हांवर कधीं पाळीच येत नसे. कारण तो जातिभेदचा संस्कारच आम्हांवर घडला नव्हता. लहान मुलांपुढें मद्यपाननिषेधाच्या व्याख्यानांची जरुरीच नसते. त्याप्रमाणें जातिभेद मोडण्याचा कोणी आम्हांला उपदेश केला असता, तरी तो मुळीं आम्हांला समजलाही नसता. इतके आम्ही ह्या भेदाच्या अमंगळ विषाला अनभिज्ञ होतों !
मुलींचें शिक्षण : शिक्षणाचे बाबतींत आमच्या घराण्याचा त्या प्रांतांत मोठा विशेष होता. बाबांनीं जें पुस्तकी शिक्षण आणि जी बहुश्रुतता मिळविली ती त्या काळचे मानानें नांवाजण्यासारखी होती. आणि मीही पुढें हायस्कुलांत जाऊन सतत नंबर पहिला व त्या काळच्या विद्यार्थिवर्गांत अग्रगण्य झालों. ह्याचें प्रत्यक्ष श्रेय बाबांना नाहीं तरी अप्रत्यक्षपणें पूर्व भूमिका तयार केल्याचें श्रेय त्यांचेकडेच जातें. पण ह्यापेक्षांही त्यांच्या प्रागतिकपणाचें मोठें कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनीं आपल्या दोन्ही मुलींनाही शाळेंत घातलें ही होय. मी जसा माझ्या हायस्कुलांत अगदीं पहिला अमदानींतला मुलगा तशा माझ्या बहिणी त्या वेळच्या मुलींच्या शाळेंतल्या जवळजवळ पहिल्याच विद्यार्थिनी होत्या ! जनाक्का आणि तान्याक्का ह्या दोघी माझेपेक्षां धाकट्या बहिणी. पहिली मोठी हुशार, सतेज दिसे. दुसरी धाकटी मात्र अगदीं भोळी आणि बुद्धीनें मागासलेली असे. जनाक्का बाबांची विशेष लाडकी. क्षत्रिय घराण्यांत लहानपणीं मुलींना मुलांचाच पोषाख घालण्याची बर्याच ठिकाणीं चाल आहे. अशा मुलींना वडील केव्हां केव्हां सभांतून व दरबारांतून अशाच पुरुषी पोषाखांत घेऊन जात असतात. जनाक्काचा हा पोषाख व त्या वेळचें तिचें बाळसें बाबांना व आमच्या घरच्या सर्व मंडळींना फार आवडत असे. आम्हीं मुलांनीं कधीं विजार घातली नाहीं तर पण जनाक्काला ऊर्फ आपल्या 'आईला' बाबांनीं कोल्हापुरी पद्धतीची तुमान करून आवडीनें घालावी ! आणि तिनेंही ती घालून मोठ्या दिमाखानें आम्हांपुढें यावें !
स्वभाव-लक्षणें : वरील परिस्थितींत वाढल्यामुळें माझ्या भावी सुधारणेची तयारी कशी झाली हें निराळें फारसें सांगावयाला नको. स्वातंत्र्याची प्रीति, नव्या जीवनाचा शोक व सत्याचा छडा लावण्याची जन्मजात हौस हीं माझ्या स्वभावाचीं मुख्य लक्षणें होतीं. ह्या लक्षणांना कोणत्याही तर्हेनें आळा घालण्याचा माझ्या आईबाबांनीं कधींही प्रयत्न केला नाहीं, हें केवळें माझें भाग्य ! कुरणांत चरणार्या आईबापांजवळ त्यांचें शिंगरूं ज्याप्रमाणें स्वच्छंदानें बागडत असतें, तद्वत् माझ्या आईबाबांचा मला आश्रय होता, पण दाब कसलाही नव्हता ! मीं एखादी चांगली, पण अगदीं नवी आणि रूढीविरुद्ध गोष्ट केली, तर उलट तिचें ते कौतुकच करावयाला तयार असत ! ही अपूर्व संधि माझ्या सुधारणेला मिळाली.
अभेद भाव : हायस्कुलांत गेल्यावर माझ्या अभ्यासांत जसे नवे नवे विषय येऊन त्यांत अप्रतिहत गति होऊं लागून माझ्या चैतन्यक्षितिजाचें वलय दिवसेंदिवस वाढूं लागलें, तसेंच मला निरनिराळ्या जातींचे व संस्कृतींचे मित्र आणि सोबती मिळत जाऊन माझ्या विचाराला आचाराचें स्वरूप देण्याचे प्रयोग करण्यालाही वाव मिळूं लागला. ब्राह्मण-लिंगायतांसारख्या ज्या जाति मराठ्यांकडे जेवत नाहींत त्या जातींचीं माणसें आमचे विश्वकुटुंबीय घरीं जेवत. न्हावी, धोबी वगैरे ज्या इतर हिंदूंकडे किंवां मुसलमान वगैरे परधर्मीयांकडे मराठे जेवीत नाहींत, त्या जातींचे लोकांशींही पंक्तिभेद करण्याचें पाप आमचे घरीं कधीं घडत नसे. पण मी पुढें जेव्हां माझ्या मित्रांशीं मिळून मिसळून वागूं लागलों तेव्हां ह्यापुढची पायरी मला चढावी लागली.
मुसलमान स्नेही : इंग्रजी चवथ्या किंवा पांचव्या इयत्तेंत असतांना मूर्तुजा नांवाचा एक माझा मुसलमान स्नेही होता. तो माझ्या घरीं नेहमीं येत असे व जेवतही असे. त्यानें एके दिवशीं सहज मला आपल्या घरीं जेवावयास बोलावलें. परजातीच्या माणसाचे घरीं प्रत्यक्ष जाऊन जेवण्याचा माझ्या जन्मांतला तो अगदीं पहिला प्रसंग होता. मी लागलाच कबूल तर झालोंच; पण जेवणाला बसलों तेव्हां मी कांहीं तरी अपूर्व गोष्ट करतों, असें मला वाटूं लागलेलें स्पष्ट आठवतें. त्या वेळीं माझें वय फार तर १४।१५ वर्षांचें असावें. मूर्तुजाला व त्याच्या घरच्या माणसांना तर माझ्या ह्या मोकळेपणाचें जास्तच आश्चर्य वाटलें. ह्यानंतर मी सहाव्या आणि सातव्या इयत्तेंत गेल्यावर सय्यद मीरासाहेब हतरुट ह्या पोक्त मुसलमान गृहस्थाचा माझ्याशीं प्रथम परिचय व नंतर अगदीं जिवलग स्नेह जडला. मीरासाहेब आमच्या घरीं आणि मी त्यांचे घरीं अगदीं उघड जेवत असूं. ह्या माझ्या सुधारकी वर्तनानेंच आमचा परस्परांचा लोभ जडला. पुढें कांहीं वर्षांनीं ते वारल्यावरही त्यांचे थोरले चिरंजीव सय्यद अबदुल कादीर हे मला आपल्या मुलाप्रमाणें वाटूं लागले. त्यांनीं शेवटीं ब्राह्मधर्माचा स्वीकार करून ते प्रार्थनासमाजाचे सभासद झाले. शिवाय मीं स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (Depressed Classes Mission Society of India) चे ते एक आस्थेवाईक प्रचारकही झाले ! माझ्या सुधारकी बाण्याचा प्रत्यक्ष मीरासाहेबांवरही परिणाम झाला. ते एक मुसलमान गृहस्थ असल्यामुळें त्यांचे घरीं अर्थात् स्त्रियांचा पडदा होता. पण मीरासाहेबांनीं माझी व आपल्या पत्नीची ओळख करून दिली होती व मजपुढें त्या पडदा पाळीत नसत.
शुद्ध तत्त्वें : वरील गोष्टीचा विशेष खालील कारणांत आहे. आमच्या घरीं जीं साहजिक सुधारणेचीं तत्त्वें पाळलीं जात तीं समता आणि स्वतंत्रता, उदारता आणि स्वाभिमान ह्यांच्या समतोलांत होतीं. आमचे घरीं वरिष्ठ म्हणविणार्या ब्राह्मण, लिंगायत जातींचे सभ्य गृहस्थ येत असत, ते जर आपला पोकळ डौल सोडून आमच्याशीं समानतेनें व खर्या प्रेमानें वागत असले तरच आम्ही त्यांच्या घरीं जेवावयास जात असूं व त्यांच्याशीं घरोबा राखीत असूं. एरवीं ते कितीही श्रीमंत किंवा घरंदाज असले तरी आम्ही त्यांचेकडे ते ब्राह्मण आहेत अगर लिंगायत आहेत एवढ्याच कारणानें जेवावयास जात नसूं ! त्याचप्रमाणें मराठ्यांपेक्षां खालच्या मानलेल्या किंवा मुसलमानांसारख्या परधर्माच्या मित्रांकडे जेवावयाला जावयाचें झाल्यास त्यांच्यात समानतेचें, स्वतंत्रतेचें अंतःकरणापासून प्रेमाचें नातें असेल तरच आम्ही जात असूं. एरवीं नाहीं. ह्या न्यायानें मीरासाहेबांना किंवा त्यांच्या पत्नीना आमच्या घराण्यापुरता तरी आपला पडदानशीनपणा सोडावा लागला, हें सहजच आहे. अशा गोष्टी केवळ देवाण-घेवाण ह्या व्यापारी तत्त्वानें किंबहुना आधुनिक सुधारकांच्या शुद्ध बुद्धिवादानेंही घडून येण्यासारख्या नसतात. अंतःकरणाचा जिव्हाळा, हेतूचा शुद्धपणा आणि अकृत्रिम प्रेम हा सर्व सुधारणांचा अढळ पाया होय. ह्याच तत्त्वावर आमच्या घराण्याला त्या जुन्या काळीं व जमखंडीसारख्या मागासलेल्या अथवा कानाकोपर्यांतल्या प्रांतीं एवढी प्रागतिकता राखतां आली. तींच शुद्ध स्नेहाचीं तत्त्वें माझ्या हायस्कूलच्या काळांत माझ्या स्नेहांशीं आमच्या परस्पर वर्तनांत होतीं.
पडदा, शिक्षण, जातिभेद वगैरेंचे बाबतींत इतकी प्रगति करून आमच्या विवाहाचे बाबतींत मात्र बाबांनीं असा अविचार कां केला ह्याचा वरील कारणांवरून खुलासा होण्यासारखा आहे. तो असा कीं, त्यांची प्रागतिकता केवळ नवीन बुद्धिवादावर किंवा विचारावरून अवलंबून नव्हती. ती निर्मळ अंतःकरणावर व दांभिकपणाच्या अभावावर अवलंबून होती आणि ह्याच वळणानुसार माझेंही वर्तन होतें.
हायस्कूलमध्यें नवीन वाङ्मय, नवीन विषयांचें अध्ययन व नवीन संस्कृतीचा परिचय घडल्यामुळें माझ्या स्वतःमध्यें कांहीं अंशीं बुद्धिवादाचा अंकुर दिसूं लागला होता. तो मॅट्रिकची परीक्षा पास होऊन मी कॉलेजांत गेल्यावर अर्थात् जोरानें फोंफावूं लागला. पण सातव्या इयत्तेंत असतांना त्या बुद्धिवादाचीं पूर्वचिन्हें थोडींशीं माझ्या वर्तनांत दिसूं लागलीं होतीं. घरीं माझें वजन घरगुती बाबतींत बाबांवरही पडूं लागलें. त्यामुळें त्यांनीं माझी धाकटी बहीण मुक्ताबाई हिच्या विवाहाची घाई केली नाहीं. एरवीं उपवर होण्यापूर्वी मुलींचे लग्न झालेंच पाहिजे, ह्या समजुतीला जर आईबाबा चिकटले असते, तर मुक्ताबाईचें लग्न माझ्या आणि जनाक्काच्याप्रमाणें त्यांनीं लहानपणींच उरकून घेतलें असतें. मुक्ताबाईचें लग्न ती जवळ जवळ १४ वर्षांची झाल्यावर झालें. त्या वेळीं मी कॉलेजांत होतों.
सहृदयता : मी मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला पुणें सेंटरला बसून इ.स. १८९१ च्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्यें पास झालों. त्या वेळीं माझें वय १८ वर्षांचें होतें. ह्या कोवळ्या वयांत आणि मागासलेल्या कर्नाटक प्रांतांतील जमखंडीसारख्या एका छोट्या ब्राह्मणी संस्कृतीच्या संसथानांत त्या जुन्या काळांत माझ्या हातून सामाजिक सुधारणेचे जाणूनबुजून प्रयत्न होण्याचा प्रश्न नव्हता. वर ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या केवळ माझ्या भावी सुधारणेचीं पूर्वचिन्हें एवढ्याच अर्थानें सांगितल्या आहेत. पण ह्यांत एका महत्त्वाच्या तत्त्वाचा येथेंच निर्देश करणें बरें वाटतें. तें तत्त्व म्हणजे सामाजिक असो अगर धार्मिक असो कोणत्याही खर्या सुधारणेचें मूळ कारण शुद्ध बुद्धिवाद आहे किंवा सहृदयता आहे ह्याचा निर्णय हें होय. ह्या निर्णयाचे बाबतींत माझा कल दुसर्या कारणाकडे म्हणजे सहृदयतेकडे जास्त आहे. हीच गोष्ट मीं वर लिहिलेल्या आठवणींतून बर्याच अंशीं सिद्ध होऊं पाहते. निदान त्या वेळच्या माझ्या हायस्कूलच्या शिक्षणांत तरी शुद्ध बुद्धिवादाचा प्रादुर्भाव करून देणारे विषय म्हणजे रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र ह्यांच्या मूलतत्त्वांचीं लहान पुस्तकेंच होत. एका वर्षांत ह्यांचे शिकवणीमुळें काय आणि त्यामुळें माझ्या विचारसरणीस निराळें वळण लागणें फारसें संभवनीय नव्हतें. ह्यावरून असें दिसतें कीं, माझ्या आणि माझ्या आईबाबांच्या वर्तनांतील वर सांगितलेला उदारपणा व प्रागतिकपणा ह्याचें कारण माझी व त्यांची सहृदयता, न्यायाकडे प्रवृत्ति आणि दांभिकपणाचा तिटकारा हेच गुण होते. मी पुढें कॉलेजांत गेल्यावर ह्या स्वाभाविक गुणांत बुद्धिवादाची भर पडली, एवढेंच फार तर म्हणतां येईल.
इतराजी : मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील सबंध वर्ष काय करावें या विवंचनेंत गेलें. नोकरी पाहण्यासाठीं बेळगांवास सुमारें सहा महिने काढले. तरी कोठें दाद लागेना. शेवटीं जमखंडी हायस्कुलांत शिक्षकाची जागा रिकामी झाली, म्हणून हेडमास्तर श्री. त्रिंबकराव खांडेकर यांनीं मला जमखंडीस बोलावून घेतलें आणि रिकामी जागा मला दिली. इंग्रजी २ र्या इयत्तेवर २।३ महिने काम केलें नाहीं तोंच श्रीमंत सरकारांनीं मला रामतीर्थास बोलावून नेलें व मुंबईस व्हेटरनरी कॉलेजमध्यें स्कॉलरशिप देऊन पाठवितों, असें सांगितलें; पण मीं त्या वेळीं उत्तर दिलें कीं, 'मला जनावरांचा डॉक्टर व्हावयाचे नाहीं. आर्टस् कॉलेजमधील स्कॉलरशिप दिल्यास जावयास तयार आहे.' यावरून यजमानांस राग येऊन त्यांनीं मला ताबडतोब नोकरीवरून दूर केलें आणि दिपवाळीचा पगारही दिला नाहीं.