दुस-या गटाची तयारी

१९२१ साल सुरू झालें.  दुष्काळाच्या आपत्तींत सांपडलेल्या हजारों माणसांचे प्राण वांचले आणि भोकरवाडींतील भव्य पटांगण दुसर्‍या इमारतीचा पाय खणण्यासाठीं मोकळें झालें.  पाया खणूनही तयार झाला.  होळकर सरकारनें २०००० रु. दिले तेव्हां भावी आश्रमाला ''अहल्याश्रम'' हें नांव देण्याचें त्यांनीं कबूल केलें.  म्हणून सर तुकोजीराव होळकर यांचेकडे 'पाया घालण्यास या' असें आमंत्रण करण्यास मी इंदुरास गेलों.  पण त्या वेळीं श्रीमंत महाराजांवरच आकाश कोसळलें होतें.  त्यांना पदच्युत करण्याची धामधूम चालली होती.  माझें काम झालें नाहीं.  मी इंदुराहून मातृसंस्थेच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीला माझ्या जनरल सेक्रेटरीशिपचा राजीनामा पाठवला.  वाटेवरचें युद्ध घरीं आलें होतें, आणि ज्यांच्यासाठीं मीं जिवाचें आणि घरादाराचें रान केलें होतें तेच माझ्यावर असंतुष्ट होते.  कारण काय, तर आतां मोठमोठ्या इमारती होऊं लागल्या, देशभर स्वराज्याची भाषा चालूं लागली, मग ह्या मिशनमध्यें अस्पृश्यांना स्वराज्य कां मिळूं नये ?  मातृसंस्थेंतील लोक या वादाच्या मुळाशीं जाईनात.  या लोकांचे व्यर्थ लाड पुरवूं नयेत असा वरवरचा उपदेश करून वेळींअवेळीं ते मलाच दोघ देऊं लागले.

विरोधक चळवळींत पुण्याचे शिवराम जानबा कांबळे यांचा हातखंडा असे.  रा. हरिश्चंद्र नारायण नवलकर यांनीं शिवराम जानबा कांबळे यांचें चरित्र लिहिलें आहे.  त्यांत पान ४३ वर खालील मजकूर आहे :-

अस्पृश्योद्धारक मंडळी  :  रा. वि. रा. शिंदे ह्यांच्या नि. सा. मंडळीकडून अस्पृश्यांत जितक्या जोरानें विद्येचा प्रसार होईल अशी जी त्या समाजाची अपेक्षा होती ती निष्फळ होत चालली.  अशा परिस्थितींत रा. किसन मुक्ताजी सोनवणे ह्या तरुण गृहस्थांनीं शिवराम रामजी कांबळे यांच्या घरीं जाऊन त्यांना असें सुचवलें कीं, आपण एक नवीन संस्था स्थापन करूं आणि ह्या कामीं श्री. वालचंद रामचंद्र कोठारी, बी.ए. संपादक 'जागरूक' यांचा सल्ला घेऊं.  ह्याप्रमाणें हे उभय गृहस्थ रा. कोठारी ह्यांना जाऊन भेटले.  त्यांना हा विचार पसंत झाला आणि हे तीन गृहस्थ डॉ. मॅनसाहेबांच्या घरीं जाऊन भेटले.  डॉ. मॅनसाहेबांनाही हा विचार मान्य झाला आणि चौघांच्या संमतीनें ता. १६।४।२१ रोजीं वरील संस्था स्थापली.  डॉ. मेनसाहेबांनीं रा. कोठारी यांना अस्पृश्योद्धारकमंडळीची रचना कशी करावयाची यासंबंधानें एक मसुदा तयार करण्यास सांगितलें.  रा. कांबळे यांनीं ता. १७।४।२१ रोजीं डॉ. मॅनसाहेबांना एक पत्र पाठविलें.  त्यांत वरील मंडळीसाठीं ३००० रु. ची रक्कम जमवावी आणि तत्प्रीत्यर्थ १०० रु. रा. कांबळे यांनीं आपल्यातर्फे आगाऊ दिले.  डॉ. मॅननीं कांबळे यांस आभाराचें पत्र पाठविलें.''

भोकरवाडींत आमच्या मोठ्या इमारतीचा पाया एका बाजूस पडत होता तर दुसरीकडे मिशनला विरोधी संस्था अस्पृश्यवर्गाच्यातर्फे निघून तिचा पाया येणेंप्रमाणें घातला जात होता.  कांहीं कारणामुळें डॉ. मॅन हे पुणें शाखेच्या कमिटीवर नव्हते.  ही संधि साधून वरील अस्पृश्यमंडळींनीं त्यांना आपल्याकडे खेंचलें.  अस्पृश्यांच्या संस्थेनें काय काम केलें हें कळत नाहीं.  पण रा. शिवरामभाऊंच्या चरित्राच्या प्रस्तावनेच्या आरंभीं त्यांच्याच हस्ताक्षरांतील खालील पत्र प्रसिद्ध झालेलें आहे.  


कामाठीपुरा, ५ वी गल्ली
पुणें, ता. २-४-२८

रा. रा. वा. रा. कोठारी यांस :-

सा. न. वि. वि. आपला ता. २७-३-२८ चा जोडकार्ड पोहचला.  डिप्रेस्ड क्लासेस कमिटीच्या असलेल्या शिल्लक रक्कमेचा व्यय पुढें कसा करावयाचा असें डॉ. मॅन यांनीं आपणांस विलायतेहून विचारलें आहे, आणि त्याप्रमाणें आपण ही रक्कम अस्पृश्य विद्यार्थिगृहाला व येथील चांभार विद्यार्थी मंडळाला द्यावी असें आपलें मत व्यक्त केलें आहे.  तरी आपण दोघांनींच या रक्कमेची विल्हेवाट लावणें हें मला बरें दिसत नाहीं.

आपली संस्था स्थापन होऊन आज सुमारें ७ वर्षे होऊन गेलीं आहेत.  एवढ्या अवधींत जमाखर्चाचा हिशोब कमिटीपुढें एकदांही ठेवण्यांत आला नाहीं.  तेव्हां आतां आपणांला संस्था बंद ठेवायची असेल तर तिच्या सभासदांची मीटिंग बोलावून ह्या गोष्टीचा विचार करावा अशी माझी सूचना आहे.

आपला,
शिवराम जानबा कांबळे


ह्या सुमारास मिशनच्या वसतिगृहांतून बरेच वरिष्ठ दर्जाचे शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी, वर्‍हाडांतील रा. गणेश अक्काजी गवई व पां. ना. भटकर, अस्पृश्योद्धारार्थ स्वतः झटूं लागले.  पण अस्पृश्यांच्या उच्च शिक्षणाच्या कामीं हयगय करून विद्यार्थिगृहें व उद्योगशाळा काढण्यांत मिशन वेळेचा व पैशाचा उगाच व्यय करीत आहे अशा तक्रारी वरील पुढार्‍यांकडून येऊं लागल्या आणि अशा तक्रारींस मिशनच्या प्रचारकार्यांतून रिकामे झालेले रा. जी. के. कदम ह्यांच्याकडून आश्चर्यकारक पाठिंबा मिळूं लागला.  ता.३० मे १९२० च्या सु. पत्रिकेंत या प्रकरणीं खालील मजकूर आहे.

''रा. पां. वा. भटकर १९१८ सालच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेंत नापास झाले.  नंतर बोर्डिंग सोडून मिशनच्याच प्रयत्‍नानें नोकरीस लागले.  १९१९ मध्यें पुन्हां कॉलेजच्या पहिल्या परीक्षेस बसले व पास झाले.  आपल्याला कॉलेजकोर्स पुरा करावयाचा असेल तर मिशन मदत करावयास तयार आहे. मग चार सोडून ८ वर्षे लागलीं तरी हरकत नाहीं.  फक्त बोर्डिंगांत राहून अभ्यास केला पाहिजे.  (रा. भटकर यांना रा. शिंदे यांनीं स्वतः श्रीमंत सयाजीरावमहाराजांकडे नेऊन २५ रु. ची दरमहा स्कॉलरशिप देवविली; पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं.)

''मिशन स्थापन झाल्याला आज अवघीं १३ वर्षे झालीं.  इतक्या अवकाशांत ज्यांची मजल मॅट्रिकपर्यंत पोंचली अशा विद्यार्थ्यांची माहिती वर थोडक्यांत दिलेली आहे.  तीवरून उच्च शिक्षण झेंपण्याइतकी ताकद सदर विद्यार्थ्यामध्यें कितपत आहे हें दिसून येईल.  आज मुंबई बोर्डिंगांत ९।१० मुलें हायस्कूलचें शिक्षण घेत असून लवकरच मॅट्रिकच्या परीक्षेला बसतील अशी त्यांची तयारी आहे.  ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे मिशन उच्च शिक्षणाचे किपत विरुद्ध आहे या आरोपाचा निकाला लागेल.  रा. गवई व रा. भटकर ह्या मॅट्रिक पास झालेल्यांची रा. शिंदे यांच्याच खटपटीनें सेंट झेवियर आणि फर्ग्युसन कॉलेजांत पुढील अभ्यास करण्याची सोय झालेली असून तिचा त्यांनीं फायदा घेतला नाहीं.  बोर्डिंगें, शाळागृहें इत्यादिकांची किती जरूरी आहे हें आंधळ्यालाही दिसण्यासारखें आहे.  असें असून आमच्या अस्पृश्यबांधवांना या गोष्टी निरर्थक वाटतात व ह्या गोष्टींवर पैसा खर्च करणें म्हणजे 'खराबी' करणें वाटतें.  पैसा कोणाचा, खर्च करतो कोण, निषेध करतो कोण ?  सर्वच कांहीं चमत्कार !

'' ... आज उच्च वर्णाच्या लोकांनीं नीच मानलेल्या लोकांचा जो पक्ष घेतला आहे तो त्यांच्यामध्यें जागृति करण्यासाठीं व त्यांना मार्ग दाखविण्यासाठीं आहे, हें सर्वांनीं लक्षांत ठेवलें पाहिजे.  अस्पृश्यांनीं स्वतःचा उद्धार आपला आपणच केला पाहिजे.  स्वतः त्यांनीं आपल्या पायांवर उभें राहिलें पाहिजे, असें आम्हीं आजपर्यंत पुष्कळ वेळां म्हटलें आहे.  परंतु ही मंडळी स्वतः थोडी चळवळ करूं लागली कीं, तीस प्रारंभ उच्च वर्णाच्या द्वेषाच्या द्वारें होत असतो.  हें जें एक नवीनच विघ्न उपस्थित होतें तें त्यांच्या उद्धाराच्या चळवळी उच्चवर्गीय असल्यानें कमी प्रमाणानें भासेल असा आमचा अनुभव आहे.  दुसरी एक खेदाची गोष्ट आम्हीं अनुभवली आहे कीं, अस्पृश्यवर्गीयांपैकीं कांहीं मंडळी पुढें गेली म्हणजे मग त्यांना आपल्या मागासलेल्या बंधूंची आठवण पडत नाहीं.  ते आपल्यापैकींच आहेत हें ते विसरतात.  पुढें गेलेल्यांमध्ये मागें राहिलेल्यांच्या संबंधानें जागृत सहानुभूति कशी उत्पन्न करतां येईल हा फार महत्त्वाचा प्रश्न नीच मानलेल्या जातींची कळकळ बाळगणारांपुढें आहे.''

येणेंप्रमाणें अस्पृश्यांत वादाचें रण माजलें असतां भोकरवाडींतील मुख्य इमारतीचा पाया घालण्यांत येऊन कोनशिला बसविण्याची वेळ येऊन ठेपली.  होळकर महाराज न आल्यामुळें मला म्हैसूर येथें जाऊन तेथील युवराजसाहेबांना या समारंभास येण्यासाठीं आमंत्रण करावें लागलें.  तें त्यांनीं आनंदानें पत्करलें.  ता. ५ सप्टें.१९२१ रोजीं गणेशचतुर्थीचा मुहूर्त होता.  त्या दिवशीं कोनशिला बसविण्याचें ठरविलें होतें.  पहिल्या गटांतील इमारतीच्या समोरील पटांगणांत भव्य मांडव घालण्यांत आला होता.  म्हैसूरचे युवराज सर कांतिरव नरसिंहराज वाडियर बहादूर जी.सी. आय. ई. यांनीं अध्यक्षस्थान मंडित केलें होतें. गांवांतील प्रमुख मंडळींनीं उच्च स्थान चिक्कार भरून गेलें होतें.  प्रेक्षकांनीं मंडपही भरला होता.  या वेळीं सेक्रेटरी या नात्यानें मीं जी महत्त्वाची घोषणा केली ती अस्पृश्यांनीं मिशनमध्यें येऊन जबाबदारपूर्वक काम करण्याची जी चळवळ चालली होती तिच्या दृष्टीनें फार महत्त्वाची होती.  सु. सत्रिकेच्या ता. ११।९।२१ च्या अंकांत त्या घोषणेचा जो विस्तृत उल्लेख केला आहे तो मार्मिक आहे. तो असा :-

''गेल्या सोमवारीं पुणें शहरीं अहल्याश्रमाची कोनशिला बसविण्याचा समारंभ म्हैसूर युवराजांचें हस्तें झाला.  त्या वेळीं रा. शिंदे यांनीं फार सुंदर व जागृतिकारक भाषण केलें.  ज्यांस आज बहुजनसमाज अस्पृश्य समजत आहे त्यांच्या उद्धारकार्याला आपल्याला स्वतःला वाहून घेतलें व त्यांच्याच चळवळीचें मूळ म्हणून त्या लोकांमध्यें आतां जागृति उत्पन्न झाली असतां रा. शिंद्यांचे हेतूंचा अस्पृश्यांतीलच कांहीं लोक विपर्यास करूं लागले आहेत.  त्यांच्याविषयीं रा. शिंदे यांचे उद्‍गार सर्व अस्पृश्यांनीं लक्षांत घेण्यासारखे आहेत.  नि. सा. मंडळीचा उद्देश अस्पृश्यांत स्वाभिमान उत्पन्न करून त्यांस स्वावलंबी करण्याचा होता व आहे.  ही विचारजागृति होत असल्याचीं चिन्हें दिसत आहेत व त्याबद्दल शिंद्यांनीं संतोष प्रदर्शित केला आहे.  हें मिशन ह्याच मंडळींसाठीं आहे व त्यांनींच तें चालवावें हें केव्हांही योग्यच.  रा. शिंदे यांची त्यास तयारीही आहे.  पंरतु आम्हांला तर असें वाटतें कीं मिशनसारखी संस्था स्वतंत्रपणें चालविण्याची पात्रता अद्याप आमच्या अस्पृश्य गणलेल्या बांधवांत आली नाहीं.  हा त्यांचा दोष नव्हे.  बहुत काल अज्ञानाच्या स्थितींत राहिल्यामुळें त्यांस ही स्थिति प्राप्‍त झाली आहे.  ह्यासाठीं जागृतीचें कार्य वरिष्ठ वर्गाकडूनच होणें इष्ट व अगत्याचें आहे.  वरिष्ठ वर्गांनीं ह्या वर्गाविषयीं अन्याय केला आहे.  तो वरिष्ठ वर्गांच्याच गळीं उतरवला पाहिजे.  दुसरी एक गोष्ट अशी आहे कीं, निराश्रित साह्यकारी मिशनसारख्या संस्था सहकारी तत्त्वावर चालणें शक्य आहे; परंतु केवळ सर्व सत्ता आपल्या हातीं असावी व त्या संस्थेस वाहून घेतलेल्या माणसांनीं ह्या नव्या जागृत होऊं पाहणार्‍या लोकांच्या हाताखालीं वागावें असें कोणीं म्हटलें तर तें अत्यंत अप्रयोजक होईल.  ज्यांच्यासाठीं ही सर्व खटपट आहे.  त्यांच्यामध्यें जागृति झाली तर ही मंडळी स्वतःच्या पायावर उभी राहून कार्यक्षम होऊं लागली कीं, नि. सा मंडळी आपोआपच आपलें दप्‍तर आवरावयास लागेल.''

यावर गोपाळ कृष्ण देवधर वगैरे कांहीं वक्तयांचीं भाषणें झालीं.  मुलांचे प्रेक्षणीय खेळ झाले.  महाराजांनीं जाऊन कोनशिला बसविली.  पुनः स्वस्थानीं आल्यावर त्यांनीं सहानुभूतिपर भाषण केलें.  आभार मानल्यावर सभा बरखास्त झाली.

जवळच्या इमारतींत बर्‍याचशा खर्ुच्या ठेवून खास गुप्‍त बैठकीची व्यवस्था अगोदरच करून ठेवण्यांत आली होती.  या बैठकींत अस्पृश्यांच्या तक्रारी, मागण्या व सूचना काय आहेत त्या त्यांनीं युवराजांच्या कानांवर प्रांजळपणें घालाव्यात, असें माझें त्यांना स्पष्ट सांगणें होतें.  स्पृश्यवर्गापैकीं या सभेस कोणीही हजर राहूं नये आणि मिशनच्या चालकांपैकीं कोणीहीं या गुप्‍त सभेपासून होतां होईल तों दूर राहावें, असा कडेकोट बंदोबस्त अस्पृश्य स्वयंसेवकांकरवीं ठेवण्यांत आला होता.  अस्पृश्यांचें म्हणणें ऐकून युवराजांनीं आपल्यास पसंत वाटेल त्याप्रमाणें आपलें म्हणणें वर्तमानपत्रांतून जाहीर करावें अशी त्यांस विनंती करण्यांत आली होती.  पण ह्या योजनेमुळें अस्पृश्यांचा विरोध बहुतेक जागच्या जागींच विरला.

तृण नाहीं तेथें पडला दावाग्नी ।  जाय तो विझोनी आपसया ॥

बैठक झाली.  महाराजांनीं म्हणणें ऐकून घेतलें.  पण ''जाहीर करण्यासारखें कांहींच नाहीं.  सर्व ठाकठीक आहे.''  असा अहवाल हंसत हंसत महाराजांनीं मला येऊन सांगितला.

मातृसंस्थेकडे मी माझ्या जनरल सेक्रेटरीशिपचा राजीनामा मागेंच दिला होता.  कमिटीनें हें मंत्रिपद रा. गिरिजाशंकर त्रिवेदी यांजकडे दिलें होतें.  तरी पण ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणजे घटनामंत्र्याचें काम मींच करावें असा एक्झिक्युटिव्ह कमिटीचा ठराव होता; पण दगदगीचें काम तर हेंच होतें.  मी तर त्याला फार कंटाळलों होतों.  इमारतीचें कामही आतां सुसूत्र चाललें होतें.  म्हणून पुणें शाखेच्या स्थानिक सेक्रेटरीचाही अधिकार मी खालीं ठेवण्यांस तयार झालों होतों.  पण इमारतीचें काम प्रत्यक्ष संपूर्ण होण्यापूर्वी पुणें शाखा मला सोडण्यास तयार होईना.  म्हणून कसेंबसें एक वर्ष मला अत्यंत नाइलाजानें कंठावें लागलें.

ता. ३ मार्च १९१८ सु. पत्रिकेंत म्हणजे मुंबई येथें जी मोठी अस्पृश्यतानिवारक परिषद झाली, तिच्या पूर्वी एका सद्‍गृहस्थानें माझ्या उलट धोक्याची सूचना म्हणून इंग्रजींत खालील मजकूर लिहिला होता.

"From an announcement in the Local Papers it appears that under the auspicies of the D.C.M. Society an All India Conference will be held in Bombay.  I have also heard that efforts are being made to enlist the practical sympathies of Pandit Madan-Mohan Malwiya and even of Mr. B. G. Tilak.  It is good to enlist the sympathy of the nationalist Party in this cause since the Congress passed the sympathetic resolution in its last session.  It seems that the general secretary has lately been moving in that direction.  I understand that in his anxiety to secure the nationatist support the General Secretary has gone to the length of incorporating many leading nationatists in the executive committee of the Society.  At the recent election by removing old and experienced workers who have built up the Society none would be more glad than myself to see more of our public men taking interest in such philanthropic institution.  But enlisting sympathy and agitating vigorously to that end is one thing and to place your inachinery in the bands of Political agitators, is another.  I have many things to say against the methods of the General Secretary and his latest step has confirmed me in my belief that he is more fit to be a propagandist or an agitator for this cause than to be the executive head of an institution which had to be worked on recognised rules of business, specially as the Society "From an announcement in the Local Papers it appears that under the auspicies of the D.C.M. Society an All India Conference will be held in Bombay.  I have also heard that efforts are being made to enlist the practical sympathies of Pandit Madan-Mohan Malwiya and even of Mr. B. G. Tilak.  It is good to enlist the sympathy of the nationalist Party in this cause since the Congress passed the sympathetic resolution in its last session.  It seems that the general secretary has lately been moving in that direction.  I understand that in his anxiety to secure the nationatist support the General Secretary has gone to the length of incorporating many leading nationatists in the executive committee of the Society.  At the recent election by removing old and experienced workers who have built up the Society none would be more glad than myself to see more of our public men taking interest in such philanthropic institution.  But enlisting sympathy and agitating vigorously to that end is one thing and to place your inachinery in the bands of Political agitators, is another.  I have many things to say against the methods of the General Secretary and his latest step has confirmed me in my belief that he is more fit to be a propagandist or an agitator for this cause than to be the executive head of an institution which had to be worked on recognised rules of business, specially as the Society is a registered body."

या इंग्रजी मजकुराचा भावार्थ असा कीं, ''मिशनच्या कार्याला राष्ट्रीय पक्षाची मदत आणि सहानुभूति मीं मिळवली आहे हें बरें आहे.  पण मिशनच्या साधारण सभेच्या गेल्या निवडणुकींत एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्यें राष्ट्रीय पक्षाचीं कांहीं माणसें मीं घेतलीं हें बरें केलें नाहीं.  मिशनच्या कारभाराच्या मुख्य जागेवर काम करण्यापेक्षां प्रचाराची चळवळ करण्यास माझी लायकी आधिक आहे.  म्हणून मी यापुढें जनरल सेक्रेटरी म्हणून काम न करतां घटनामंत्री म्हणून काम करणें बरें.

आक्षेपास उत्तर  :   मिशनच्या कामाला सर्व पक्षांची सहानुभूति मिळाली पण कारभारांत मात्र राष्ट्रीय पक्षांचा हात शिरकुं द्यावयाचा नाहीं असा प्रकार किती दिवस चालूं शकला असता ?  वर्गणी घ्यावयाची, परिषदेंत काम करावयाचें आणि निवडणुकीच्या वेळीं मात्र विशिष्ट पक्षाला बाहेर ठेवावयाचें हें शक्य कसें ?  सुरुवातीला प्रा. समाजाच्याच पुढार्‍यांनीं मिशन चालविलें.  त्यांच्याच श्रमानें मिशन नांवारूपाला आलें, ही गोष्ट अगदीं खरी; पण म्हणून त्यांच्याच श्रमामुळें राष्ट्रीय पक्षाची सहानुभूति मिळून कमिटीवर काम करण्यास ते पुढें आले असतांना त्यांना दूर ठेवणें कसें शक्य होईल ?  सोसायटी रजिस्टर्ड आहे.  तिच्या सनदेचे नियम आहेत आणि ते पाळण्याला नवीन येणारे लोक तयार आहेत.  मग त्यांना बाहेर कसें ठेवावें  ?  साधारण सभेंतून एक्झिक्युटिव्ह कमिटीची निवडणूक तर उघड्यां पद्धतीनें आणि नियमानुसार होत होती.  नवीन निवडणुकीचें श्रेय किंवा अपश्रेय व तिची जबाबदारी एका जनरल सेक्रेटरीवरच कशी पडते ?  स्वतः जनरल सेक्रेटरीची निवडणूकही याच नियमान्वयें होत होती.  या वादाला कंटाळून त्यांनीं जनरल सेक्रेटरीशिपचा राजीनामा दिल्यावर पुन्हां त्यांना ऑर्गनायझिंग सेक्रेटरी नेमण्यासाठीं मिशननें नवीन नियम केले त्यांत तरी जनरल सेक्रेटरीचा हात नव्हता ना ?  सुबोध पत्रिकेमध्ये निनांवी तक्रार करणार्‍यांनीं या गोष्टीचा विचार करावयास पाहिजे होता.

असहकार  :   अस्पृश्यवर्गाचें लक्ष राष्ट्रीय जागृतीकडे आणि राष्ट्रैक्याकडे वळवतांना मिशनचे अध्यक्ष सर नारायणराव, मुंबई शाखेचे सेक्रेटरी वामनराव सोहोनी, इतर कार्यकर्ते रा. सय्यद वगैरे आणि मी ह्या सर्वांचें एकमत होतें.  ह्या वादाचे वेळीं आम्हीं सर्वांनीं समतोलपणा राखला होता.  अशा वेळीं महात्मा गांधींनीं आपली अहसकाराची व बहिष्काराची चळवळ सुरू केली.  शाळा-कॉलेजें, कोर्टांतील वकिली या सर्वच गोष्टींवर बहिष्कार पडूं लागला.  राष्ट्रीय शाळांनीं सरकारी ग्रँट घेण्याचें बंद केलें.  अशा वेळीं आमच्या मिशनपुढें प्रश्न उभा राहिला कीं, अस्पृश्यवर्गाला आम्हीं या असहकाराच्या चळवळीत ओढावें कीं काय ?  त्यासाठीं आमच्या शाळांना मिळणार्‍या मोठमोठ्या सरकारी ग्रँटस् सोडाव्यात कीं काय ?  असें करणें आम्हांला इष्ट आणि शक्य दिसलें नाहीं.  राष्ट्रीय सभेला मिळून तिच्याशीं एकजीव होऊन काम करण्यास अस्पृश्यवर्ग तयार नव्हता.  त्यांच्यावर जबरी करण्याचा अधिकार आम्हांला नव्हता.  १९१८ सालांत कर्नाटकांत अथणी या गांवीं राष्ट्रीय पक्षाच एक मोठी जिल्हा परिषद झाली होती.  तींत मीं भाग घेतला होता.  त्या वेळीं या बाबतींत लो. टिळकांचें स्पष्ट मत काय होतें याचा मीं सुगावा घेतला.  सरकारी मदत बंद केल्यास आमच्या अखिल भारतीय मिशनच्या खर्चाची सर्व जबाबदारी राष्ट्रीय सभा, लो. टिळक अथवा महात्मा गांधी घेऊं शकतील काय ?

टिळकांचें मत  :  आमच्या शाळांना सरकार ज उदार ग्रँट देतें तें सरकारचें कर्तव्यच आहे.  एरव्हीं अस्पृश्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च जो सरकारवर पडला असता त्याचा निम्मा भाग ग्रँट म्हणून देण्यांत सरकारचा फायदाच आहे.  राष्ट्रीय सभा अगर इतर कोणी हा निम्मा भाग आपण देऊन सरकारची त्यांतूनही सुटका करणार काय ?  सरकारी मदत न घेतली तरी विद्याखात्याच्या नियंत्रणाखालून आमच्या शाळा कशा सुटणार ?  ह्या सर्व गोष्टी नीट विचारांत घेऊन आमच्या मिशननें असहकाराच्या चळवळींत मुळींच पडूं नये आणि सरकारी ग्रँट अवश्य घ्यावी हें उभयपक्षीं शहाणपणाचें होईल.  व्यक्तिशः मी किंवा माझ्यासारखीं माणसें राजकारणांत स्वतंत्रपणें भाग घेतात हें पुष्कळ झालें.  आमच्यामागें मिशनला ओढणें शक्य नाहीं व इष्टही नाहीं असें लो. टिळकांनीं स्पष्ट मत दिलें.

गांधींचे मत  :  १९२१ च्या नाताळांत नागपूर येथें राष्ट्रीय सभा भरली.  असहकारितेच्या चळवळींत अस्पृश्यांना सामील करून घ्यावें कीं नाहीं या बाबतींत माझें मत काय पडतें हें महात्मा गांधींनीं अजमावून पाहण्याचें ठरवलें.  त्या वेळीं आमच्या मिशनची अखिल भारतीय परिषद जमवण्यासाठीं मी नागपूरला गेलों होतों.  याच संधीला माझें मत घेण्यास्तव राष्ट्रीय सभेच्या विषयनियामक कमिटींत महात्माजींच्या सांगण्यावरून माझी नेमणूक केली.  अथणीं येथें लो. टिळकांनीं जें सांगितलें तेंच नागपूर येथें महात्माजींना सांगितलें.  पोक्तपणें विचार करून पाहिल्यावर असहकार्यासारख्या कठिण बाबतींत अस्पृश्यांना गुंतवण्याचा तूर्त काळ आला नाहीं हें जाणून मिशनचें समतोल धोरण त्या वेळीं जें मीं ठरवलें होतें तेवढेंच पुरें आहे, सरकारी ग्रँट चालू ठेवावी असें महात्माजींचें म्हणणें पडलें.

सु. प. च्या ५ जाने. १९२१ च्या पानावरील मजकुराचा सारांश.

नागपूर परिषद  :   ''नागपूर येथें अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद गेल्या शनिवारीं ता. २५ डिसें. १९२० रोजीं रा. गांधी यांच्या अध्यक्षतेखालीं भरून पुढील आशयाचे ठराव पास झाले : (१) अस्पृश्यवर्गाची हिंदु धर्म व हिंदु राष्ट्र यांशीं एकनिष्ठा ध्यानांत घेऊन त्यांच्यावर असलेल्या नागरिकत्वाचे व धार्मिक प्रकारचे सर्व प्रतिबंध एकदम काढून टाकावे.  

(२)  हिंदुस्थानांतील उद्योगधंद्यांचा पूर्ण विकास व्हावा म्हणून अस्पृश्यांच्या मार्गांत अद्यापि स्वतंत्रपणें धंद्याची निवड करण्यांत आणि चालवण्यांत कांहीं अडथळे येत आहेत ते सर्व जाऊन त्यांच्यांत स्वयंनिर्णयाची वृत्ति विकसित व्हावी, अशा रीतीनें त्यांना हरएक सवलत देऊन मदत करावी.

वरील परिषद रा. विठ्ठल रामजी शिंदे यांनीं नागपूरच्या पांचपावलीजवळील मैदानांत अत्यंत घाईघाईनें भरवली.  तरी पण परिषदेस प्रचंड लोकसमूह हजर होता.  मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, जम्नालाल बजाज, सरोजिनी नायडू, राजगोपालाचारी वगैरे प्रांतोप्रांतींचे पुढारी हजर होते.  महात्माजींचें भाषण सर्वांनीं शांतपणें ऐकून घेतलें.  ते म्हणाले, ''मी वैष्णव आहें.  वरर््णाश्रमाचा अभिमानी आहे.  तरी सुद्धां हिंदु धर्मांत कोठेंही आधार सांपडत नाहीं.  अस्पृश्यत्व हें फार भयंकर पाप आहें.  मी वणाश्रमाचा अभिमानी आहें तरी मी एक अस्पृश्य मुलगी दत्तक घेतली असून तिजवर माझें अत्यंत प्रेम आहे.  ती मला पोटच्या मुलांप्रमाणें प्रिय आहे व तिला आपली असें म्हणवून घेण्यासाठीं मला आपल्या पत्‍नीशीं बरेंच झगडावें लागलें आहे.  मीं या मुलीला दत्तक घेतलें आहे तरी इतरांनींही तसेंच करावें असा माझा आग्रह नाहीं.''

महात्माजींनीं दत्तक घेतलेली ही लक्ष्मी नांवाची मुलगी आमच्या मिशनच्या मुंबई येथील वसतिगृहांतून नेली होती आणि पुढें तिचा विवाह मद्रासेकडील एका ब्राह्मण गृहस्थाशीं लावण्यांत आला असें ऐकिवांत आहे.  वर्णाश्रमाच्या अभिमानाचा हा अर्थ.