व्हायकोम सत्याग्रह

१९२४ चा पावसाळा सुरू झाला.  तसाच त्रावणकोर या संस्थानच्या व्हायकोम या गांवीं मोठा सत्याग्रह सुरू झाला.  व्हायकोम येथील देवळांतच नव्हे तर देवळाला जाण्यायेण्याच्या वाटेवरही मोठमोठ्या प्रतिष्ठित पण अस्पृश्य मानलेल्यांस जाण्यास कायदेशीर मनाई होती.  म्हणूनच स्वामी विवेकानंदांनीं 'मलबार म्हणजे एक वेड्यांचें इस्पितळ' असें म्हटलें होतें. अशा देवळांच्या वाटेवर जाण्याला ख्रिस्ती, मुसलमान वगैरे कोणत्याही परधर्मीयाला केव्हांही मनाई नव्हती.  इतकेंच नव्हे तर देवळाच्या मंडपांत व बाह्य मंडपांत अशा परकीयांना प्रतिष्ठितपणें नेण्यांत येत असे.  हा विलक्षण अन्याय हाणून पाडावा म्हणून व्हायकोमला सत्याग्रह सुरू झाला.  हा विषय मुख्यतः सामाजिक सुधारणेचा होता तरी गांधींच्या नवीन राजकारणामुळें त्यास उग्र राजकीय स्वरूप प्राप्‍त झालें होतें.  कांहीं अस्पृश्यवर्गीय मंडळी ह्या सत्याग्रहापूर्वी कित्येक वर्षे आर्य समाज, ब्राह्म समाज व थिऑसफी वगैरे नवीन धर्मपंथांतून सभासद म्हणून दाखल झाली होती.  त्यांनादेखील रस्त्यावर जाण्यास अटक होऊं लागली.  लाहोरचे स्वामी श्रद्धानंद आर्य समाजाचे वतीनें, कालिकतचे मंजिरी रामय्या (ज्यांनीं कलकत्त्याच्या काँग्रेसमध्यें अस्पृश्यतेच्या विरुद्ध प्रथम ठराव आणला) थिऑसफीच्या वतीनें वगैरे सुधारक मंडळी ह्याच सत्याग्रहांत मोठ्या अटीतटीनें भाग घेत होती.

साधु शिवप्रसाद  :   अशा वेळीं मलबार प्रांतांतील ब्राह्मसमाजाचे सभासदच नव्हे तर एक प्रचारक, साधु शिवप्रसाद नांवाचे तरुण व्हायकोमला गेले.  ते पूर्वाश्रमींचे तिय्या जातीचे होते.  म्हणून इतर अस्पृश्यांप्रमाणें त्यांनाही मनाई झाली.  त्यांनीं तो वृत्तांत कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजाच्या कमिटीकडे लिहून कळवला.  साधारण ब्राह्म समाजाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्राणकृष्ण आचार्य यांनीं त्रावणकोर दरबाराकडे जाहीर विनंतीपत्र पाठवून ह्या बाबतींत ताबडतोब दाद मागितली आणि मी साधारण ब्राह्म समाजाचा मंगलोर येथील प्रतिनिधि म्हणून पत्राची एक प्रत मजकडे पाठवून मीं समक्ष व्हायकोम येथें जावें आणि श्यक्य असेल तो प्रयत्‍न करावा अशी सूचना मला करण्यांत आली.  मलबार प्रांतांत ब्राह्म समाजाचा प्रचार करणारे साधु शिवप्रसार यांचींही मला वेळोवेळीं पत्रें येऊं लागलीं आणि व्हायकोम येथेंच नव्हे तर त्या प्रांतांत प्रचारकार्यासाठीं मीं मदत करावी म्हणून दक्षिण व उत्तर मलबारांत दौरा काढावा असा त्यांचा तगादा लागला.  मी हें प्रकरण मंगलोर समाजाच्या कमिटीपुढें ठेवलें; पण कमिटीला नको म्हणण्याचें धैर्य होईना व हो म्हणण्याचेंही आवडेना.  पैशाचाच प्रश्न (दौर्‍याच्या खर्चाचा) असेल तर तो भाग मी पाहून घेतों, पण ज्या अर्थी अस्पृश्यसेवा हें माझ्या ब्राह्म प्रचाराचें मुख्य अंग आहे आणि ज्या अर्थी कलकत्त्याच्या ब्राह्म समाजाच्या अध्यक्षांनी मीं व्हायकोमला जावें म्हणून सुचवलें त्या अर्थी हा दौरा काढणें माझें कर्तव्य आहे, आणि मंगलोर ब्राह्म समाज कमिटीला कोणतीही हरकत घेणें शक्य नाहीं.

व्हायकोम सत्याग्रहाची धामधूम   :   कालिकत ब्राह्म समाजाचे सेक्रेटरी डॉ. गोपालन् हेही पूर्वाश्रमींचे अस्पृश्यच होते.  त्यांना माझा दौरा अत्यंत पसंत पडला.  त्यांनीं कालिकतला बोलावलें.  खर्चाची तजवीज केली.  साधु शिवप्रसाद ह्यांना कालिकतला बोलावलें.  दौर्‍याचा कार्यक्रम ठरून मे महिन्यांत मी व साधु शिवप्रसाद व्हायकोमला गेलों.  त्यापूर्वी कालिकत येथें व्हायकोम सत्याग्रहाविषयीं एक प्रचंड जाहीर सभा झाली.  अर्थात् तींत स्थानिक राजकीय पुढार्‍यांनीं भाषणें केलीं.  माझेंही भाषण झालें.  तें मद्रासच्या वर्तमानपत्रांतून जाड मथळ्याखालीं प्रसिद्ध झालें.  तें पाहून मंगलोर समाजांतील सोंवळ्या बिल्लव मंडळींचें धाबें दणाणलें.  व्हायकोम हा लहानसा तालुक्याचा गांव होता.  त्या ठिकाणीं हजारों सत्याग्रही आणि इतर प्रेक्षक यांचा प्रचंड तळ पडला होता.  आर्य समाजाचे आणि शीख समाजाचे जथे एकावर एक येऊन थडकत होते.  शीखांनीं तर एक मोफत भंडारा चालवला होता.  सत्याग्रहांमध्यें नुसते अस्पृश्यच नसून नायर लोकांचा भरणाही होता.  कांहीं नंबुद्री तरुणही त्यांत होते हें विशेष होय.  साधु शिवप्रसाद व मी गेल्यावर तेथील सत्याग्रह्यांनीं आमचें आनंदानें स्वागत केलें.  व्याख्यानें होऊं लागली.  दुसरे दिवशीं साधु शिवप्रसाद यांना घेऊन मी सत्याग्रहास निघालों.  मी येण्यापूर्वीच माझीं सविस्तर वर्णनें फोटोसहित पोलिसकडे गेलींच होतीं.  मुख्य पोलीस कमिशनरच आज सत्याग्रहाच्या खुंटावर सज्ज उभे होते.  त्यांनीं मला ओळखलेलें पाहून फार आश्चर्य वाटलें.  रोज शंभर शंभर सत्याग्रहींचे जथे रस्त्यांतील कुंपणाजवळ आडवे बसत. वाव मिळाली कीं, आंत घुसण्याचा ते प्रयत्‍न करीत.  पोलीस त्यांना पिटाळून लावीत. एका वेळीं एका माणसाला जावयाला मिळेल इतकें अरुंद फाटक ह्या कुंपणास ठेवण्यांत आलें होतें.  त्याच्या दोन्ही बाजूंस दोन पोलीस अधिकारी उभे असत.  शिवप्रसादाला घेऊन मी ह्या अरुंद फाटकांतून जाणार हें आधींच प्रसिद्ध झालें होतें.  शिवप्रसादाच्या बगलेंत हात घालून मी ह्या फाटकांत आधीं शिरलों.  पोलिसांनीं मला जाऊं दिलें पण प्रमुख अधिकारी पोलीस कमिशनरनें माझ्या व शिवप्रसादांच्यामध्यें दांडकें घालून हंसत हंसत म्हटलें कीं, ''आपण खुशाल जा !  पण यांना जांता येणार नाहीं !''  मीं म्हटलें कीं, ''आम्ही दोघे ब्राह्म धर्माचे प्रचारकबंधु आहोंत.  आम्हां दोघांनाही न ओळखतां तुम्ही असा पंक्तिपंच कां करतां ?''  ''आम्ही आपल्याला पूर्ण ओळखतों.''  मीं त्यांना बजावलें कीं, ''मी येथून त्रिवेंद्रममध्यें दरबारला भेटावयास जाणार आहें.  तुम्ही आम्हांला बेकायदेशीर अटक करीत आहां याची पूर्ण जबाबदारी घेतां आहांत ना ?''  अधिकारी म्हणाले, ''आम्ही जें करीत आहोंत तें दरबारच्याच आज्ञेनें करीत आहोंत.  आपल्याला आम्हीं अटक केली नाहीं.  उलट पोलीस बरोबर देऊन तुम्हां एकट्यालाच सन्मानपूर्वक देऊळ दाखवण्याचीही आमची तयारी आहे.  मात्र तुमच्या बंधूंस तसें करतां येणार नाहीं.  कारण पूर्वाश्रमींचें ते कोण आहेत तें आम्ही ओळखवतों.''

दिवा व राघवैय्या  :  पुढें लगेच आम्ही त्रिवेंद्रम् येथें दिवाण राघवय्या यांची गांठ घेतली.  शिवप्रसाद बरोबर होतेच.  ब्राह्म समाजाच्या अध्यक्षाकडून त्यांना (त्रावणकोर दरबारला) ज्या ब्राह्म प्रचारकांवर व्हायकोम येथें अन्याय होत आहे म्हणून दाद मागण्याचा अर्ज आला होता तो आपणांस मिळाला काय असें विचारलें.  त्याचें उत्तर अद्यापि मिळालें नाहीं हें कसें ?  दिवाणानें उत्तर केलें कीं, ''त्या प्रश्नाचा विचार चालू आहे,'' मीं म्हटलें, ''आपला इकडे विचार चालू आहे तर तिकडे व्हायकोमला परवां आम्हांला अटक झाली याची वाट काय ?''  ते म्हणाले, ''झालेल्या प्रकरणांत थोडी कसूर झाली आहे हें खरें; पण ज्या अस्पृश्यांनीं ब्राह्म समाजाची दीक्षा घेतली आहे, त्यांनीं आपण हिंदु नाहीं असें जाहीर करावें म्हणजे त्यांची वाट खुली होईल !''  मीं म्हटलें, ''ब्राह्म समाज हा हिंदु आहे कीं नाहीं हा मोठा प्रश्न आहे.  तें ठरवणें दुसर्‍याचें काम नव्हे.  ब्राह्म समाज कोणीही असो.  हिंदु नसलेल्या परधर्मी गृहस्थांस मज्जाव नाहीं आणि ब्राह्म समाजिस्ट आपण हिंदु नाहींत असें जाहीर करीपर्यंत त्यांना मज्जाव; असा तुमच्या कायद्याचा अर्थ आहे काय ? असें असेल तर मी स्वतः महाराजांना भेटून खुलासा विचारणार आहे.''  दिवाण म्हणाले, ''महाराजांनीं हा सर्व अधिकार दरबारकडे दिला आहे.  ते तुम्हांला भेटणार नाहींत.''  यापुढें हुज्जत घालीत बसण्यांत अर्थ नाहीं असें समजून मीं दिवाणांस नम्रपणें सांगितलें, ''ह्या सर्व विसंगत प्रकाराचा पुकारा मी ठिकठिकाणीं जाहीर सभा भरवून करणार आहें.  आपली हरकत असल्यास कळवा.''  तेव्हां ते म्हणाले, ''तुमचे व आमचे मार्ग भिन्न आहेत व ते दोघांनाही मोकळे आहेत.  यापेक्षां जास्त कांहीं मी सांगूं शकत नाहीं.''  

मुंबई क्रॉनिकलमधील तार  :   यापुढें कोचीन व त्रावणकोर संस्थानांत ब्राह्म समाजाच्या प्रचारासाठीं आम्ही ठिकठिकाणीं गेलों.  कोचीनची राजधानी अर्नाकुलम् येथें आम्ही गेलों असतां तेथील प्रेस असोसिएटेडच्या एजंटनें मुंबई क्रॉनिकल पत्राचा एक अंक माझे हातीं देऊन त्यांतील एक तार मला दाखविली.  तिचा आशय असा होता :- 'पुण्याचे प्रसिद्ध पुढारी रा. वि. रा. शिंदे हे व्हायकोम येथें गेले असतां त्रावणकोर पोलीस अधिकार्‍यांनीं त्यांना देवळाच्या वाटेवर जाऊं देण्यास मनाई केली हें बरें झालें नाहीं.  रा. शिंदे ह्यांच्या मागें सबंध महाराष्ट्र आहे हें त्रावणकोर दरबारनें पक्कें ध्यानांत ठेवावें !'  हा मजकूर सर्वांशीं खरा नव्हता म्हणून मी मुंबई क्रॉनिकलला ताबडतोब दुरुस्तीचें पत्र लिहिलें कीं, ''व्हायकोमला मला स्वतःला मनाई झाली नाहीं.  उलट सन्मानानें देऊळ दाखविण्याची पोलीसनें तयारी दाखवली.  मात्र माझे ब्राह्म प्रचारकबंधु शिवप्रसाद यांना ते पूर्वाश्रमींचे अस्पृश्य म्हणून अशी बंदी झाली.''  क्रॉनिकलला ही चुकीची तार ज्या प्रेस असोसिएटेडच्या एजंटनें पाठविली त्याच्याकडून चुकीबद्दल दिलगिरी प्रदर्शित करणारें एक पत्रही मजजवळ देऊन ठेवलें.

व्हायकोमच्या सत्याग्रहाचें निरीक्षण करून मला एक गोष्ट स्पष्ट दिसून आली कीं, दक्षिण मलबारांत (त्रावणकोर व कोचीन संस्थानांत) मंदिरांत किंबहुना मंदिराच्या वाटेवर जाण्याबाबत स्पृश्य हिंदु, ख्रिश्चन आणि मुसलमान अथवा दुसरा कोणीही परधर्मीय परकी मनुष्य यांना मज्जाव नाहीं.  मात्र स्वतःला हिंदु म्हणवणार्‍या अस्पृश्याला मज्जाव आहे.  मग तो कितीही सुशिक्षित किंवा प्रतिष्ठित असो त्याच्याविरुद्ध ही जी सर्वधर्मीयांनीं मिळून एकी केली होती ती मोठी आश्चर्यकारक होती.  आणि ह्या पवित्र एकीला ह्या दोन हिंदु संस्थानांचा पाठिंबा होता आणि ब्रिटिश सरकार तिकडे डोळेझांक करीत होतें.

नंबुद्री व नायर  :   मी या दौर्‍यावर निघालों तेव्हां केवळ व्हायकोम सत्याग्रह हाच माझा हेतु नव्हता; तर ह्या प्रांतांत पुरातन कालापासून वस्ती करून राहणारे नंबुद्री नांवाचे ब्राह्मण आणि नायर नांवाचे क्षत्रिय ह्यांची राहणी आणि चालीरीती निरखून पहाव्यात हा एक उद्देश होता.  ह्या दोन्ही जाती मलबारांत बाहेरून आल्या होत्या.  नंबुद्री ह्या शब्दाची व्युत्पत्ति नंबु = श्रद्धा आणि द्री = श्री म्हणजे श्रद्धास्पद असा अर्थ आहे.  मलबारांतील बहुतेक जमीनदारी ह्या दोन जातींकडेच आहे.  त्यांतल्या त्यांत नंबुद्रींचा पगडा नायरवरही आहे.  ह्या दोन जातींमध्यें अनुलोम विवाहपद्धति प्रचलित आहे; म्हणजे नायरांच्या स्त्रिया वरिष्ठ मानलेल्या नंबुद्री पुरुषांना देण्याचा प्रघात आहे.  ह्या प्रकाराला विवाह असें न म्हणतां संबंधम् असें म्हणतात.  एका नंबुद्री ब्राह्मणास अशा प्रकारें अनेक नायर स्त्रियांशीं संबंध ठेवतां येतो.  नंबुद्री कुटुंबांत वडील मुलानेंच आपल्या नंबुद्री जातीच्या स्त्रियांशीं विवाह करावा व बाकीच्या मुलांनीं नायर जातीच्या स्त्रियांशीं संबंधम् लावावा असा प्रघात आहे. नंबुद्री जातीयांशीं असा संबंध ठेवून घेणें नायर लोकांत मोठें भूषणावह समजलें जातें.  वडील मुलांशींच नंबुद्री स्त्रियांनीं लग्न लावालें ही चाल असल्यानें नंबुद्री स्त्रिया पुरुषांपेक्षां अधिक शिल्लक राहून बहुपत्‍नीकत्वाची चाल पडली आहे.  नायर व नंबुद्रींचा संबंध नुसता बेटीव्यवहारापुरताच होतो; रोटीव्यवहार होत नाहीं. आणि बेटीव्यवहारसुद्धां पुष्कळ प्रसंगीं नांवापुरताच असतो.  नंबुद्रीप्रमाणेंच नायर लोकही आपल्यापेक्षां कनिष्ठ जातींशीं अशा प्रकारचा बेटीव्यवहार ठेवतात.  नायर समाज मातृशासनपद्धतीचा (Matriarchy) आहे.  आर्थिक मिळकतीचा वारसा व वहिवाट बायकांकडून चालवयाची.  पुरुष मिळकतीचा नुसता व्यवस्थापक. एका बाईची मिळकत अशा प्रकारें तिच्या बहिणीच्या मुलीकडे जाते.  वस्त्रप्रावरणाचे बाबतींतही नायर लोकांत चमत्कारिक चाली आहेत.  बेंबीपासून वरील भागावर कसलाही कपडा न वापरण्याची चाल त्यांच्यांत आहे.  स्त्रिया अर्धनग्न असतात.  अर्थात् या बाबतींत कालमानेंकरून पुष्कळच सुधारणा झाली आहे.  छातीवर एखादा लहानसा रुमाल किंवा तत्सम वस्त्र टाकलें कीं झाला पोषाख पण कोणी वडीलधारें माणूस सामोरें आल्यास त्याचा मान राखण्याकरितां तोही रुमाल काढून टाकण्याची पद्धत आहे.  युरोपियन लोक जसे डोकीवरची टोपी उतरून सन्मान दर्शवतात त्याचप्रमाणें छातीवरचें वस्त्र काढण्याची ही स्त्रियांत पद्धत असे.  नायरहूनही खालच्या जातींतील स्त्रिया राजरोसपणें रस्त्यांतून उघड्यां छातीनें हिंडत असल्याचें मीं प्रत्यक्ष पाहिलें आहे.  वरिष्ठ जातींपुढें छातीवर वस्त्र घेऊन जाणें म्हणजे त्यांचा उपमर्द करण्यासारखें आहे असें कनिष्ठवर्गीय स्त्रिया समजत.  मात्र नंबुद्री जातीच्या स्त्रिया पडद्यांत असत.  त्या कधीं उघड्यांवर दिसत नसत.  कलावंतिणी व वाईट चालीच्या स्त्रिया मात्र अंगावर संपूर्ण पोषाख घालीत.  त्या प्रांताच्या सेन्सस् रिपोर्टांतून व डिस्ट्रिक्ट गॅझेटमधून अशा विलक्षण चालींसंबंधीं तपशीलवार आणि चित्तवेधक वर्णनें आहेत.

मंगलोरकडे कोर्वी नांवाची एक जंगली जात आहे.  त्या जातीच्या बायका रस्त्यांतून अर्धनग्र स्थितींत हिंडत असत.  तेथील डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे सेक्रेटरी रा. सा. के. रंगराव ह्यांनीं त्या जातीच्या स्त्रियांस सभ्य चालीरीती शिकावाव्यात असें मनांत आणलें.  बरेंचसें नवीन कापड आणून त्यांच्या चोळ्या शिवून त्या ह्या स्त्रियांस वांटण्यांत आल्या.  प्रथम हा नवीन पोषाख पाहून स्त्रियांस आनंद वाटला.  पण त्या घरोघर गेल्यावर त्यांच्या जमातीला हा भ्रष्टाकार पाहून इतका राग आला कीं, त्यांनीं ह्या बायकांस बेदम मारलें. दुसरे दिवशीं त्या बायकांनीं नवीन पोषाखाचें गाठोडें परत आणून के. रंगरावांच्या अंगणांत फेंकून दिलें व के. रंगरावांस अत्यंत बिभत्स शिव्याशाप देत, त्रागा करीत त्या निघून गेल्या.  

ह्या प्रांतांत नायर लोकांचा मागील काळीं इतका कडक अंमल असे कीं, एखाद्या खालच्या जातीच्या इसमास नायर माणसानें ठार केलें तर त्याच्यावर कांहीं खटला चालत नसे.  ह्या प्रांतांतील लोकांची स्वच्छतेविषयीं फार प्रसिद्धि आहे.  प्रत्येकाच्या घरीं परड्यांमध्यें तळीं असावयाचीं.  जातां येतां कित्येक वेळां तरी त्यांत स्नान करून ओलेत्यानेंच स्त्रीपुरुष हिंडत असल्याचें मीं पाहिलें.  पावसाळ्यांत मी स्वतः पुष्कळ तास भिजून चिंब झालों तरी सर्दी म्हणून कधीं झालीं नाहीं.