पूर्व बंगालची सफर

ता. १ सप्टेंबर रोजीं बाबू हेमचंद्र सरकारनें मजसाठीं पूर्व बंगाल, उत्तर बंगाल, बिहार, संयुक्त प्रांत आणि पंजाब ह्या पांच निरनिराळ्या भागांत शतसांवत्सरिकानिमित्त प्रचार करून ह्या वर्षअखेर पुण्यास जावें असें ठरवलें.  माझें उतारवय, आज तीन महिनें इन्फ्लुएंझाच्या व्याधीमुळें आलेली अशक्तता वगैरे अनेक कारणांमुळें मी किंचित् नाखुष होतों; पण बंगाल्याबाहेर पडण्याला कोणी बंगाली मिशनरी तयार होत नाहीं, हें पाहून नाइलाजानें तें कार्य मला पत्करावें लागलें, तरी तें मला आत्मिकदृष्ट्या प्रिय होतें.  पूर्व बंगाल्यांत संतत धार पावसाळा, नद्यांना आलेले महापूर, मलेरिया, मला न रुचणारें अन्न, न समजणारी भाषा, ह्यावरून निदान बंगाल्यांतील कामांतून जरी सुटका झाली असती तरी बरें झालें असतें.  पण तसें न होतां इतर सात प्रचारकांना बरोबर घेऊन पूर्व बंगाल्यांतील चितगांगपासून उत्तर बंगाल्यांतील दार्जिलिंगपर्यंत जावें, असें ठरलें.  (१) रमेशचंद्र मुकर्जी  (२) बारिसालचे राजकुमार घोष व त्यांचा मुलगा जतींद्रकुमार,  (३) अनिलचंद्र चौधरी,  (४) सुधीरकुमार बोस,  (५) बभ्रुवाहन ठाकूर,  (६) माधवचंद्र विश्वास आणि मी असे आठ जण श्रियाळदास स्टेशनवरून निघालों.

बंगाल्यांतील महापूर  :   जेसोर जिल्ह्यांतील मलिहाट, मशीहाट व राजापूर, खुलना जिल्ह्यांतील मदारतोली, रुच्चिददाहा, जालोकाटी व कुरीयाना वगैरे बंगाल बॅकवर्ड क्लास मिशनच्या ठिकाणीं ही सफर नेऊन आम्हीं ब्राह्म समाजाचा संदेश पोंचवला.  भैरव नदीला मलिहाटजवळ मोठा पूर आला होता.  प्रभात, नदीप्रवाह व नदीकिनारा यांचा सुंदर देखावा दिसला.  भात, अंबाडी, आळू, कोचुरीचीं रानें माजलीं होतीं.  खेडीं किंचित् उंचवट्यावर असल्यानें तेवढींच पाण्यावर होतीं.  बाकी सर्व जलमय दिसलें.  एका ठिकाणाहून १०० यार्डांवरील ठिकाणीं जाण्यास पडावाची जरुरी लागे.  शेतकांतील पिकांवर दहा दहा फूट पाणी पावसाळ्यांत सतत चार महिने राहात असतें.  पिकें मार्च-एप्रिलमध्येंच पेरावीं लागतात.  पूर ओसरून गेल्यावर तीं आपोआपच वाढलेलीं दिसतात.  एक गांव सोडून दुसर्‍या गांवीं जाईपर्यंत तेथील मंडळी बायकां-मुलांसहित आमची वाट पाहात उभी असत.  टाळ, खोल (मोठे मृदंग), बाजाची पेटी इत्यादि भजनाचीं साधनें असत.  मोठा झेंडा व लहान लहान निशाणें प्रत्येकाचे हातीं फडकत असत.  होडींतून प्रवास करतांना सतत भजन चालू असे.  किनार्‍यावर उतरल्यावर ठिकाणावर पोंचेपर्यंत नगरसंकीर्तनं सुरू होई.  ठिकाणीं पोंचल्यावर उपासनेला सुरुवात होई.  नंतर भोजन, संभाषण व भेटी वगैरे होत.  हें सर्व पावसांत भिजतच चालू असे.

एक कोनशिला समारंभ  :  ह्या प्रांतीं मी दुसर्‍यांदा आलों होतों.  माझ्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या कामाचा पुष्कळ परिचय ह्या प्रांतीं अगोदरच झाला होता. त्यामुळें मी जेथें जाईं तेथें बंगाल्यांतील नमःशूद्र नांवाच्या अस्पृश्य मानलेल्या जातींच्या बायकामुलांच्या झुंडीच्या झुंडी मला पाहण्यास येत.  ता. ५ रोजीं माशाहाटी येथें अस्पृश्यांच्या हायस्कूलच्या इमारतीच्या पायाचा दगड बसवण्याचा समारंभ होता.  तो माझ्या हस्तें झाला.  त्या वेळीं सुमारें २००० लोकसमुदाय लोटला होता.  माझें हिंदींत भाषण झालें.  हायस्कूलचे हेडमास्तर शरच्चंद्र मुझुमदार हे एके काळीं नास्तिक होते; पण ब्राह्मसंगीत ऐकून ते एकेश्वरी झाले.  लवकरच तेथें ब्राह्ममंदिर उपस्थित झाल्यावर आपण तेथें आचार्याचें काम करूं असें ते म्हणाले.  दिवसा प्रचारकार्य करून आम्ही चांदण्या रात्रीं बोटीचा प्रवास करीत असूं.  पुष्कळ वेळां वाट माहीत नसल्यानें प्रवसास विलंब लागे.  सच्चिद्दाह येथें नमःशूद्रांचीं दोन हायस्कुलें आहेत.  तेथील काम आटोपून सकाळीं ९॥ वाजतां बारिसाल जिल्ह्यांतील जालोकाठी या गांवीं जाण्यास मोठी स्टीमर घेतली.

पूर्व बंगाल्यांत बारीसाल, चितागाँग आणि कोमिल्ला ह्या तीन ठिकाणीं सुसंघटित समाज आहेत.  शतसांवत्सरिक उत्सवाचे एका सेक्रेटरींनीं आमचें जसें संचारपथक करून पूर्व बंगाल्यांत पाठवलें होतें तसेंच दुसरें एक पथक पश्चिम बंगाल्यांत पाठवलें होतें.  हीं दोन्हीं पथकें ठरलेल्या दिवशीं ठराविक कार्यक्रम आटोपून डाक्का येथें जमणार होतीं.  डाक्का ब्राह्म समाज कलकत्ता ब्राह्मसमाजाच्या खालोखाल मोठा आहे.  पूर्व संकेताप्रमाणें मोठमोठ्या ब्राह्म समाजांनीं आपापले ह्या सालचे वार्षिकोत्सव त्यांच्या गांवीं हीं पथकें जेव्हां येतील त्या वेळीं ठरविले होते.  त्यामुळें आम्हांस ह्या मोठ्या गांवीं तीन चार दिवस तरी राहावें लागे.  दरम्यान लहानसान ब्राह्म समाजांत भेटी द्यावयाच्या होत्या.

राममोहन रॉयचें स्वप्न  :   बारिसाल समाजानें आमच्या पथकाशिवाय बाबू बिपिनचंद्र पाल ह्या मोठ्या वक्त्याला व राजकीय पुढार्‍याला व ब्राह्म समाजाच्या सभासदाला मुद्दाम आमंत्रण करून आणवलें होतें.  १८ सप्टेंबर रोजीं उत्सवाच्या शेवटच्या दिवशीं ब्राह्ममंदिरांत मोठी जाहीर सभा करण्यांत आली.  त्या वेळीं ''विश्वजननी धर्म'' (Universal Religion) या विषयावर माझें व पालबाबूंचें सायंकाळीं व्याख्यान प्रसिद्ध झालें होतें.  माझें प्रथम पाऊण तास इंग्रजी भाषण झालें.  मी प्रथम महाराष्ट्रांतील पंढारपूरसंप्रदायाची संक्षिप्‍त माहिती सांगितली.  मुंबई प्रार्थना समाजानें संत तुकारामास सुशिक्षितांच्या नजरेसमोर कसें आणलें आणि विद्वानांकडून त्याला मान्यता कशी देवविली हें मीं सांगितलें.  रोम शहरांत पोपच्या राजवाड्यांजवळ सिस्टाइन चॅपेल नांवाच्या लहानशा दालनांत मोझेसचा एक संगमरवरी भव्य बैठा पुतळा आहे.  मायकेल ऍंजेलो या शिल्पकाराला हा पुतळा कोरण्यास चाळीस वर्षे लागलीं.  मोझेसची मूर्ति ऍंजेलोच्या मनांत अगोदर भरली होती.  अशी त्याची प्रथम मनोमन मूस तयार झाल्यावर ऍंजेलोनें संगमरवरी दगडाच्या ठोकळ्यांतून चाळीस वर्षे कलाकुसरी करून ती जणूं पोखरून बाहेर काढली.  जणुं काय ती आंत दडूनच बसली होती.  तद्वत् ब्राह्म समाजाची ही मूस ईश्वरानें राममोहन रॉयच्या मनांत आधींच ओतली होती.  ती पुढें राममोहन रॉयनीं व अनेक ब्राह्म समाजाच्या बंधुभगिनींनी सकल ब्राह्म सामाजिक कुसंस्काररूपी दगड दूर करून गेल्या शतकांत उघड केली.  हें आविष्करण अद्यापि चालूच आहे.  ताजमहालाचें स्वप्न शहाजहानास अगोदरच पडलें होतें.  तें पुढें २०,००० माणसांनीं २२ वर्षे खपून मूर्त स्वरूपास आणिलें.  ब्राह्म समाज हें राममोहन रॉयचें एक मानसिक संगमरवरी स्वप्नच होय.  ईजिप्‍तांतील मनोरे, हिंदुस्थानांतील मोठमोठीं देवळें, हीं सर्व हजारों कैद्यांकडून व वेठीस धरलेल्या मजुरांकडून उभारलेलीं आहेत.  तीं त्यांच्या अन्यायाचीं स्मारकेंच आहेत.  ब्राह्म-ब्राह्मिकांनीं ब्राह्म समाजाच्या उभारणीसाठीं स्वार्थत्यागपूर्वक कष्ट व छळ सोसले.  आतां त्यांचे वंशज व बाहेरचे लोक त्या स्मारकाचा उपभोग फुकट घेत आहेत.  ह्या सुंदर उपमा श्रोतृवृंदास फास आवडल्या.  पुष्कळांनीं तसें उघड येऊन सांगितलें.  सतीषचंद्र चक्रवर्ती आणि बिपिनचंद्र पाल ह्यांनीं मला निर्भर चित्तानें कवटाळलें.

चित्तागाँग  :   ता. १९ सप्टेंबरला ८। वाजतां मेघनाद नदीच्या पात्रांतून चांदपूरला निघालों.  सकाळीं १० वाजतां पद्मा नदीच्या अफाद पात्रांत शिरलों.  सागराप्रमाणें ही विशाल व भयानक आहे.  पुष्कळदां हिनें हाहाःकार केला आहे.  पात्रांत     भयंकर मगर आहेत.  पाण्यानें तुडुंब भरलेल्या पात्राची रुंदी २।३ मैल तरी असावी.  नलगुरी बंदराजवळ तर पात्र ६ मैल रुंद होतें.  चांदपूरचें काम आटोपून ता. २१ ला सकाळीं चित्तागाँगला (चैत्यग्राम) आलों.  येथें नवविधान व साधारण ब्राह्म समाज अशा दोन पंथांचीं मंदिरें आहेत.  अर्थात् आम्ही साधारण ब्राह्म समाजाचे पाहुणे होतों.

हेमलताबाई  :   सप्टेंबर २४ ला मिस्टर देवेन्द्रनाथ भट्टाचार्य यांच्या पत्‍नीनें चित्तगाँगमध्यें साधारण ब्राह्म समाजांत उपासना चालवली.  देवेन्द्र हे प्रथम जुन्या मताचे ब्राह्मण होते.  प्रथम ते ब्राह्म झालेले सौ. हेमलताबाईंना आवडलें नाहीं.  ते पुढें घरींही प्रार्थना करूं लागले.  तेव्हां तर त्या अधिकच भ्याल्या.  पण शेवटीं जेव्हां देवेन्द्रांच्या संतापी बापानें देवेन्द्राला त्याचा दायभाग देण्याचें नाकारून तो एका जुन्या देवळाला दिला, तेव्हां हेमलताबाईंनीं दायभागाचा धिक्कार करून त्या स्वतः ब्राह्मो झाल्या.  त्यांची उपासना व चरित्र ऐकून मी द्रवलों.  त्यांना इंग्रजी येत नव्हते.  मला आता गरजेपुरतें बंगाली येऊं लागलें होतें.  ता. २६ला नवविधान ब्राह्म समाजाच्या मंडळीनें मला आपल्या मंदिरांत जाहीर उपासना करण्यास बोलावलें.  बंगाल्यांत पुष्कळ ठिकाणीं ह्या दोन पंथांचें आपसांत मुळींच पटत नाहीं.  मी साधारण पक्षाचा असूनहि मला हें आमंत्रण आलें हें अपूर्व होतें.  केवळ मी महाराष्ट्रांतील ब्राह्मो प्रचारक म्हणूनच हा सन्मान होता.  मीं 'समन्वय' (Harmony) ह्या विषयावर इंग्रजींत प्रवचन केलें.  उपासना हिंदींत केली.

ता. २७ सप्टेंबरला राममोहन रॉय पुण्यतिथि साजरी करण्यांत आली.  ता. २९ ला 'नीला' स्टीमरनें कॉक्सबझार गांवीं निघालों.  एका तासानें आमची नदी बंगालच्या उपसागरास मिळाली.  समुद्रास पाहून आनंद झाला.  पुढें कुतुबदीया व मस्कली बेटांजवळील खाडींतून दिसणारा देखावा बहारीचा होता.  कॉक्सबझार ब्राह्म समाजांत जोगेंद्रसेन वकील, ऑनररी मॅजिस्ट्रेट हे एकच ब्राह्म सभासद असूनही आमचे स्वागतार्थ दिंडी, पताका, खोल घेऊन मुलांबाळांसह आले होते.  सुमारें १०० माणसें बंदरावर आलीं होतीं.  हा बंदराचा गांव बंगालच्या उपसागराच्या पश्चिम किनार्‍यावर पूर्व किनार्‍यावरील जगन्नाथपुरीच्या समोर आहे.  येथें ब्रह्मी लोकांची वस्ती फार आहे.  हा आराकान प्रांत पूर्वी ब्रह्मदेशाचा भाग होता.  आतां फक्त एक डोंगराची रांग आड आहे.  येथें पूर्वी बौद्धविहार होता.  समुद्रकिनार्‍यावरील वालुकामय वाळवंट फार नयनमनोहर दिसत होतें.  पाण्याच्या कांठाशीं आमची उतरण्याची सुंदर सोय केली होती.  रात्री चांदण्याच्या होत्या.  तेथें तीन दिवस आम्हीं फार विश्रांतींत घालवले.    

हा पहा ब्राह्म धर्माचा विजय !  :   ता. १ ऑक्टोबरला मी हायस्कूल विद्यार्थ्यांसमोर थोडेंसे बोललों.  राममोहन रॉयची बाळपणची गोष्ट सांगून ''गोष्टींतल्या मुलाचें नांव कोण सांगेल ?''  असा सवाल केला.  एका मुसलमान मुलानें राममोहन हें नांव मोठ्या उत्साहानें सांगितलें.  मी उद्‍गारलों, ''हा पाहा ब्राह्म धर्माचा विजय !  मुसलमान मुलासही राममोहनांचें नांव माहीत आहे !''  (पण हिंदूंना माहीत नव्हतें याची वाट काय ?)  ता. २ ला चित्तागाँगला परतलों.  येथें मला सनस्ट्रोक (मस्तिष्कताप) झाला.  दासबंधूंची मोठी कन्या अमिया हिनें अर्धा तास खंड पाण्याची धार मस्तकावर धरून सुमारें एक तास वारा घालून मला बरें केलें.  ता. ३ ऑक्टोबर रोजीं पहारतली, ता. ४ ला बरोमा, ता. ५ ला फेनी या गांवीं जाऊन ता. ७ रोजीं नोआखली येथें आलों.  फार पावसामुळें विशेष काम झालें नाहीं.

नोआखली  :  नोआखली हा जिल्ह्याचा गांव आहे.  मेघनाद व पद्मा ह्या दोन नद्यांच्या आक्रमणामुळें ३४ भाग वाहून गेला आहे.  बाकीचाही त्याच पंथास लागला आहे.  दक्षिण-पूर्व व कांहीं उत्तर भाग भयाण, ओसाड व भिजलेल्या चिखलाचा, ८।१० मैलपर्यंत दिसतो.  पात्राजवळ जाऊन पाहिलें असतां जमीन कात्रून पाण्यांत टाकण्याचा, नद्यांचा सतत उपक्रम नजरेस येतो.  तेथें ब्राह्ममंदिर आहे.  पण नगराप्रमाणें मंदिरही कातरलें जाऊन जवळजवळ ओस पडलें आहे.  रायबहादूर राधाकांत आईस हे एकटेच ब्राह्म.  तेहि अनुष्ठानिक नाहींत.  हे आमच्यासाठीं कोमिल्लाहून आपल्या चिरंजिवाचे येथें आले होते.  ब्राह्म समाज म्हणजे वकील, डॉक्टर, सरकारी अधिकारी वगैरे उपर्‍या सुशिक्षितांचा, स्थानिक फारच कमी.  हे शाळूसोबती चोहींकडे पांगून मंदिरें ओस पडल्याचीं उदाहरणें उत्तर प्रांतांत तर आहेतच, पण खुद्द बंगाल्यांत तर अधिकच आहेत.  ता. ८ ऑक्टोबरला रात्रीं ७ वाजतां कोमिल्ला येथें पोचलों.        

माझें बंगालींत भाषण  :   सायंकाळीं मला नित्याप्रमाणें थकवा व कणकण भासली.  त्यावरून आज तीन महिने माझ्या मनावर व शरिरावर जो ताण पडत आहे तो आतां कमी केला पाहिजे असें मला वाटलें.  पण व्याख्यानास उभें राहिल्यावर मी हें सर्व विसरतों.  सायंकाळचें व्याख्यान इतकें वठलें कीं, दुसर्‍या दिवशीं गांवच्या मंडळींनीं येऊन दुसरें व्याख्यान देण्याचा आग्रह केला, विषय World and Work of Brahma Samaj हा होता.  प्रथम बंगालींत मी पांचसात मिनिटें बोललों.  अशा तर्‍हेनें परकीयानें स्वभाषेंत नांदी केल्यानें श्रोतृवृंद खूष होतो.

उल्हास दत्त  :   पूर्व बंगाल हा जहाल राष्ट्रीयतेचा प्रांत आणि कोमिल्ला हें ठिकाण त्याचा आत्मा.  येथें मला उल्हास दत्त हे ज्वलज्जहाल तरुण भेटले.  हे तरुण विद्यार्थी असतांना आमच्या घरीं मुंबईस यांचा फार घरोबा असे.  क्रांतिकारक चळवळ करून ते अंदमानची ५।६ वर्षे हवा खाऊन आले होते.  मला भेटतांच त्यांनीं मोठ्या आग्रहानें आपल्या घरीं मातापितरांकडे नेलें.  बाप जहाल मताचा सुधारक असूनही वेदाचा अभ्यासी होता.  आई साधीभोळी व प्रेमळ होती.  तिनें माझ्या आईची आठवण करून दिली.  माझ्या आईनें उल्हासला खाऊं घातलें होतें.  म्हणून त्याच्या आईनें मला गोडगोड जेवण खाऊं घातलें.

अभयाश्रम  :  १० ऑक्टोबरला अभयाश्रम नांवाची प्रसिद्ध नमुनेदार संस्था पाहिली.  गांवाबाहेर सुमारें २ मैलांवर ७ एकर जमीन घेऊन तेथें सुंदर निरनिराळ्या पर्णकुट्या बांधल्या आहेत.  १०।१२ विद्वान् तरुण राष्ट्रकार्यास सर्व जीवित अर्पण करून ब्रह्मचर्यव्रत घेऊन राहिले आहेत.  खादीचें मुख्य भांडार व प्रसार येवून होतो.  खादी रंगवण्याचें काम येथेंच चालतें.  महात्मा गांधींचीं बहुतेक तत्त्वें येथें पाळण्यांत येतात.  सर्व वातावरण आध्यात्मिक, निर्भय व स्वाधीनतेचें आहे.  मोठ मोठे विद्वान् उघड्यां हवेंत हातानें परिश्रम करतात.  मात्र स्त्रियांना येथें शिरकाव नाहीं.  दुर्भाग्य !!  मग अभयाश्रम कसा ?

ता. ११ ला दार्जिलिंगला जाण्याकरितां निघालों.  आमची यजमानीण मिसेस् सुशीला दत्त हिनें फारच प्रेमानें पाहुणचार केला.  तिच्या लेकीसुनांनीं आम्हां सर्वांस घरच्यासारखें वागवलें.  त्यांनीं कांहीं मिराबाईंचीं सुंदर पदें मला उतरून दिलीं व चाली शिकविल्या.  सून हिरण्यमी व नाती ज्योतिकणा व ज्योत्स्ना ह्या वेळोवेळीं आम्हांस गाऊन दाखवीत असत.  पुढें हीच ज्योतिकणा दत्त मोठी क्रांतिकारक निघाली.  येथें मीं माझ्या पथकांस डाक्क्याकडे जाण्यास सोडलें व मी हिमालयास जाण्यास निघालों.

रात्रीं १ वाजतां चांदपुरास आगबोटीवर चढलों.  ता. १३ ला दार्जिलिंग स्पेशलनें (आगगाडी) ६॥ वाजतां सिलिगुरी येथें हिमालयाच्या पायथ्याशीं पोचलों.  कांचनगंगेनें दर्शन देऊन स्वागत केलें.  दार्जिलिंग-हिमालयन रेल्वेंतून सकाळीं सात वाजतां निघून १० वाजतां कर्सिऑंग स्टेशनवर पोचलों.  हें स्थळ ६००० फूट उंच आहे.