जन्म : आतां माझ्यासंबंधींच्या आठवणींकडे वळातें. मी इ.स. १८७३ एप्रिल ता. २३ ( शके १७९५ चैत्र वद्य एकादशी ) बुधवारीं दोन प्रहरीं ११ वाजतां जन्मलों. बाबांनी माझी जन्मपत्रिका इतर सर्व मुलांप्रमाणें रीतसर ज्योतिषाकडून वर्तवून ठेविली आहे. त्या जन्मपत्रिकेची भाषा अर्धवट संस्कृत व अर्धवट मराठी, पण दोन्ही अशुद्ध त्यामुळें ह्या ज्योतिषीबोवांचे भाषेचेंच नव्हे तर ज्योतिषाचेंही ज्ञान तुटपुंजेंच दिसतें. त्यांत मी अमुक होईन, तमुक होईन, म्हणून ज्या माझ्या भावी गुणांची लांब माळ ओविली आहे, ती वाचून अद्यापि मला मौज वाटते. अर्थात् हें भविष्य अशा कांहीं साधारण मोघम भाषेंत आहे कीं, गोळाबेरजेंत तें कोणालाही लागू पडावें. लहानपणीं मला वाचायला व लिहायला आल्यावर माझ्या पत्रिकेंतील मी मोठा विद्वान् व लोकप्रिय होणार हें भविष्य वाचून मला मोठी फुशारकी वाटे. अगदीं बालपणीं माझ्या अंगांत बाळसें चांगलें असे. आतां जरी मी काळा आहें, तरी बांध्यानें व चेहर्यानें मी लहान वयांत फार आकर्षक होतों, असें आई मला सांगे. माझा वडील भाऊ मजपेक्षां रंगानें उजळ, रूपानें जास्त चांगला आणि स्वभावानें शांत होता. तरी माझ्या बाळशाची व तरतरीपणाची छाप पाहणारावर माझ्या इतर भावंडांपेक्षां अधिक बसे. दादाभाई डॉक्टर नांवाचा कोणी एक दरबारचा पारशी नोकरी बाबांच्या परिचयाचा होता. तो पारशी तर मजवर फार लुब्ध होता. रस्त्यांत कोठेंही भेटला तरी जवळ येऊन तो माझे बरेचसे मुके घेऊन मला बेजार करी, असें आई मला सांगत असे.
एक आपत्ति : तेव्हां मी फार तर सव्वा-दीड वर्षाचा असेन. माझे कानांत सोन्याचे सुंदर झुबे घातले होते. त्याच्या भोंवतालीं लहान मोत्यें लाविलीं होती. हा दागिना साधाच, परंतु मला फार शोभे. तो घालतांना कान टोचावा लागला. त्यांत कांहीं तरी कमीजास्त होऊन माझे कानाला जखम झाली. डावा कान सुजून त्यांत पू झाला. आजीला वाटलें कीं, मला कोणाची तरी दृष्ट झाली. योग्य उपाय न होतां दृष्टीबद्दल बर्याच वस्तु ओवाळून टाकण्यांत आल्या. शेवटीं कानाचा लोंबता भाग कुजून तुटेलसा झाला. एके दिवशीं मला न्हाऊं घालीत असतांना तो भाग तुटून झुब्यासह खालीं पडला. मग काय विचारतां ! आजी, आई आणि आत्या ह्यांनी आकांत मांडला. तेव्हां आजोबा जिवंत होते. हा प्रसंग आठवण्याइतका मी मोठा झालों नव्हतों.
पहिला लळा : तिसर्या वर्षापासून मी थोडें थोडें बोबडें बोलूं लागलों असेन. अगदीं पहिल्या पानावर लिहिलेली माझी आठवण तिसर्या वर्षांतली असावी. मला पहिला लळा आजीचा, बाबांचा किंवा आईचा नसून माझ्या आजोबांचा बसवंतरावांचाच होता. हिंदु घरांत असें होणेंच साहजिक होतें. नवरा-बायको तरुण असतात. मुलाचा आजा-आजी असेतोंपर्यंत त्यांच्यासमोर आपल्या मुलाचें कौतुक आपणच करण्यास त्यांना लाज वाटते. घरकामामुळें त्यांना फुरसतही मिळत नसते. आजा-आजी म्हातारीं असतात. त्यांना काम नसतें. मुलांचा मोह त्यांनाच जास्त असतो.
धाडशी तांडेल : आजी कष्टळू व कडक असल्यानें मी नेहमीं आजोबांच्याच भोंवती असे. त्यामुळें माझ्या मनावरचे अगदीं पहिले ठसे आजोबांनींच उठविले. मला अद्यापि चांगलें आठवतें. आमच्या घराच्या सोप्यांत माझा पाळणा बांधलेला असे. मला त्यांत बसवून नेहमींप्रमाणें तो आडवा न हालवितां उभा हालवीत. असा पाळणा हालूं लागला म्हणजे मी नावेंत बसल्याप्रमाणें खालवर हेलकावे खाईं. अशा हालणार्या पाळण्याला मी नावच म्हणत असें. आजोबा आपल्या ठरलेल्या जागीं सोप्यांत बसून माझे लाड पुरविण्यासाठीं पाळणा उभा हालवीत. पाळणा जोरांत हालूं लागला म्हणजे मोठ्या धाडसी तांडेलाप्रमाणें मी स्वतःला मोठा धन्य मानीत असें. भावी ईर्षेचे हे पहिले धडेच नव्हेत काय ? आजोबा त्या वेळीं वार्धक्यामुळें आंधळे होते. माझ्या तोंडावरची विजयशाली नावाड्यांची विजयश्री जरी त्यांच्या चर्मचक्षूंना दिसत नव्हती, तरी ती कल्पनाचक्षूनें निरखून ते मला उत्तेजन देत. त्या वेळीं ते एक बालगीत म्हणत. त्याचें ध्रुवपद हें असें - ''माझें पकुलें कसें खेळतें ! माझें छकुलें कसें खेळतें !'' तें ऐकून मला धन्यता वाटे !
संवयीचा परिणाम : माझ्या बाबांचें नांव रामजी. आजोबा व आजी त्यांना 'रामा' अशी हांक मारीत. ती ऐकून मीही बाबांना 'रामा' व आईला 'यमुना' अशा नांवांनींच बोलावीत असें. कौतुकामुळें कांहीं दिवस वडील मंडळींनीं तिकडे लक्ष दिलें नाहीं. मी तीनचार वर्षांचा झालों तरी अशींच नांवें घेऊं लागलों. आजोबांनीं मला बाबा व आई अशा हांका मारण्यास सांगावें, पण तसें म्हणण्यास मला मोठी लाज वाटत असे ! एक दिवस दाराआड उभा राहून मीं 'बाबा' अशी हांक मारली व लाजून आंत पळून गेलों. सर्वत्र हंशा पिकला. तेव्हां तर मला या नवीन नांवांची जास्तच लाज वाटायला लागली. माझ्या बाबांना व आईलाही आपल्या वडिलांसमोर ह्या नांवांनीं हांका मारून घेण्याचें आवडेना ! हा संवयीचा परिणाम !
१८७७ चा दुष्काळ : मी चार वर्षांचा झालों त्या वेळीं, म्हणजे इ.स. १८७७ सालीं दक्षिणेंत भयंकर दुष्काळ पडला होता. तेव्हां चार शेरांची धारण होती असें म्हणतात. पण त्या वेळीं आमच्या घरांत आबादीआबाद होती. आमच्या मळ्यांत मक्याचें पीक फार माजलें होतें. मक्याचीं कणसें आमचे घरांत रचावयास जागा पुरेना. हीं कणसें शिजवून खाणें आम्हांला आवडत असे. कणसें खाऊन आम्ही भुरकुंडें बाहेर फेकून देत असूं. तीं पटकन् उचलून भिकारी लोक फोडून त्यांचा कोंडा खात. एकदां तर हा कोंडा न पचल्यामुळें एक भिकारी ओकला आणि त्याचा ओकच दुसर्या भिकार्यानें आधाशीपणानें खाल्ला, हें मीं स्वतःच्या डोळ्यांनीं पाहिलें. पण मी इतका लहान होतों कीं, दुष्काळ म्हणजे काय याची मला कल्पना नव्हती. आम्ही कणसें अर्धवट खाऊन टाकीत असूं, म्हणून दारीं भिकार्यांची गर्दी जमे. पण त्यांत करुणेपेक्षां कौतुकच जास्त असे.
चोरटें दान : आमचे आजोबा एका ठोकळ्यांत एक शेरभर दाणे घालून कट्टयावर आलेल्या भिकार्याला एकेक मूठ भिक्षा घालण्यासाठीं सकाळीं बसत असत. त्यांना नीट दिसत नसे, म्हणून ठरलेले दाणे संपले कीं, आम्ही लहान मुलें थोडे जास्त दाणे ठोकळ्यांत टाकीत असूं. ही लबाडी लवकरच उघडकीस येऊन आमच्या ह्या लीलेला आळा पडत असे. पण आमच्या लबाडीला गरिबांचे दुवे मिळत, हें सांगावयास नको. त्या वेळीं मी माझेपुढें आलेलें ताट एका दुष्काळी पीडिताला वाढलेलें आठवतें. चहूंकडे दुष्काळ असतां आमचें हें शेत फार पिकलें. ह्याचे कारण तें नदीबूड रान होतें. आजोबांच्या व बाबांच्या उघड दानामुळें व आमच्या लहानपणच्या चोरट्या दानामुळें आमच्या घराण्याचा मूळचा बोलबाला अधिक वाढला. एरवीं आमच्या शेतांतलें पीक उघडपणें आमच्या घरीं पोंचलेंही नसतें.