स्थानिक कार्य

प्रेमळ गोतावळा  :  वर आंखलेल्या आराखड्यांप्रमाणें मीं स्थानिक कामास लागलों.  दिवसाचीं कामें आटोपल्यावर रात्रीं सभासदांच्या भेटी घेणें, रात्रीच्या शाळांची देखरेख करणें वगैरे आटोपून घरीं येण्यास रात्रीचें ११।१२ वाजत.  मुंबईसारख्या अफाट वस्तींत सभासदांचीं घरें १०।१२ मैल लांबवर पसरलेलीं असत व शाळाही दूर दूर असत, म्हणून इतका वेळ लागे.  कामांत वक्तशीरपणा राखण्यास जड जाई.   प्रथम प्रथम संघटना होणें कठीण गेलें.  समाजांत तरुणांचा उत्साह वाढत होता.  त्यांचें साहाय्य आनंदानें मिळूं लागलें; पण अनियमितपणाबद्दल कांहींजणांकडून प्रथमपासूनच टीका चालत असे; पण ती प्रेममूलक होती.  त्यामुळें ती दुःसह होत नसे.  समाजाच्या बाहेरची मंडळी मला माझ्या कामांत कितपत यश मिळेल याबद्दल साशंक नजरेनें पाहात असत, तर कांहीं कौतुकानें पाहात असत.  या भिन्न प्रवृत्तींमुळें मी माझी करमणूक करून घेत असें.  आमच्या घरची मंडळी साध्या राहाणीची व खेडवळ प्रांतांतून आलेली.  त्यांना ह्या मुंबईसारख्या नवीन नवीन ढंगांच्या समाजामध्यें आपलें बस्तान बसविण्यास प्रथम प्रथम कठीण गेलें.  प्रार्थनासमाजाच्या थोर थोर घराण्यांनीं आमची खरी स्थिति पाहून आम्हांस मोठ्या मान्यतेनें सांभाळून घेतलें.  भांडारकर, माडगांवकर, चंदावरकर वगैरे घराण्यांतील स्त्रियांनीं माझ्या वृद्ध आईशीं मिळूनमिसळून वागणूक ठेवून मुंबईचा परकेपणा व तुटकपणा भासूं दिला नाहीं.  वासुदेव बाबाजी नवरंगे, सदाशिवराव केळकर, द्वारकानाथ वैद्य, सौ. लक्ष्मीबाई रानडे वगैरे घराणीं तर आम्हांस आमच्या घराण्यासारखींच वाटत होतीं.  रा, कोरगांवकरांनीं तर प्रथमपासूनच माझ्याबद्दल फारच काळजी वाहिली.  वामनराव साहोनी व सय्यद अबदुल कादर हे तर माझ्या कामांत आजीव येऊन मिळाले.  डॉ. सुखटणकरांचा माझ्याशीं परदेशांतून कळकळीचा पत्रव्यवहार चालू असे.  डॉ. काशीबाई नवरंगे, डॉ. वैकुंठ कामत वगैरे तरुण मंडळी आमच्या घरगुती अडचणी भागविण्याला सदैव तत्पर असत.  असा हा गोतावळा भोंवतालीं जमून आल्यामुळें मुंबई शहरांतल्या राहणीच्या आर्थिक तंगीच्या वेदना सहज सह्य झाल्या.  जसजसा माझ्या कामाचा व्याप वाढूं लागला तसतसा हा गोतावळाही वाढूं लागला.

क्रांति  :  विसाव्या शतकाच्या आरंभापासून वृद्ध पिढी जाऊन नवीन पिढीनें त्यांची जागा घेतल्यामुळें प्रार्थनासमाजांत एक प्रकारची क्रांती होऊन तो वाढीला लागला.  जुन्या संस्थांचा नवीन जोम आणि नवीन संस्थांची भर ह्यामुळें चहूंकडे नवचैतन्य फुलूं लागलें.  रा. द्वारकानाथ वैद्यांनीं सुबोध-पत्रिका सांवरली, वामनराव सोहोनी यांनीं रात्रीच्या शाळा हातीं घेतल्या, कोरगांवकरांनीं जमाबंदीची काळजी केली आणि इतर नवीन नवीन तरुण स्वयंसेवक म्हणून पुढें आले.  ह्याचा परिणाम पुढें कांहीं वर्षे समाजाच्या वार्षिक उत्सवाचें वेळीं स्पष्ट दिसूं लागला.  दूरदूर राहणार्‍या सर्व कुटुंबांची स्नेहसंमेलनें घडूं लागलीं.  निरनिराळ्या दर्जांमध्यें परिचय वाढून निरनिराळ्या कुटुंबांमध्यें कौटुंबिक उपासना होऊं लागल्या.  सगळा समाज म्हणजे एक कुटुंब ही भावना रुजूं लागली.  ह्यामुळें परकीयांचें लक्षही समाजजीवनाकडे अधिक लागूं लागलें.  हितचिंतक सभासद होऊं लागले आणि सभासद कार्यवाहक होऊं लागले.  गिरिजाशंकर त्रिवेदीसारखी गुजराथी मंडळी देखील सभासद होऊं लागली.  कराचीचे डॉ. रुबेन ह्यांच्या भजनाचा लाभ वरचेवर घडूं लागला.  स्वामी स्वात्मानंदजी ह्या आर्यसमाजिस्ट प्रचारकाची जोड प्रचारकार्यामध्यें मिळूं लागली.  मणिलाल पारेखसारख्या भावनाशील भक्ताची भर पडली.  सय्यद अबदुल कादर व त्यांची बहीण हाजराबाई हीं दोन भावंडें तर जमखंडीपासूनच आमच्या घरांत नेहमींचींच असत.  केरो रावजी भोंसलें ह्या मराठा तरुणानें नुसते सभासदच होऊन न राहतां पंढरपूर येथील अनाथ आश्रमाचें चालकत्व आपणांकडे घेऊन तो बराच नांवारूपास आणला.  प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास यांचें मूक औदार्य या सर्व नवचैतन्यास पुष्टिदायक होऊन चिरस्मरणीय झालें.  डॉ. भांडारकरांसारख्या पूज्य विभूतीचा समागम मुंबईकरांस वेळोवेळीं घडून आध्यात्मिक लाभांत भर पडूं लागली.  शिवरामपंत गोखले या वृद्ध प्रचारकाचा बालबोध उपदेश बायकामुलांनाही आवडूं लागला; पण ह्या सर्व घटनेचा मध्यबिंदु प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांनीं साधला.  ते मुंबईचे एक तोलदार नागिरिक असल्यामुळें सरकारदरबारांत तसेंच प्रतिष्ठित लोकसमाजांत प्रार्थना समाजास एक अढळ भूमिका त्यांनीं मिळवून दिली.  गत पिढींतल्या एकाहून एक महानुभाव श्रेष्ठ विभूतींनीं प्रार्थनासमाजाला जें उच्च अधिष्ठान मिळवून दिलें तें अद्यापि मागें उरलेल्या दादासाहेब भांडारकरांनीं आणि नवीन मिळालेल्या चंदावरकरांनीं कायम राखिलें.


ह्या सर्वांचा एक दृश्य परिणाम समाजाच्या ३८ व्या वार्षिकोत्सवामध्यें (१९०५ मध्यें) स्पष्ट दिसून आला.  स्त्रियापुरुष, लहानथोर, तरुणवृद्ध, सभासद आणि हितचिंतक वगैरे सर्वांनींच ह्या उत्सवांत जोमानें भाग घेतला.  ह्या वर्षाचें प्रीतिभोजन फारच थाटाचें झालें.  त्यांत प्रो. गोपाळ कृष्ण गोखले, प्रिन्सिपाल रघुनाथराव परांजपे, रा. बंडोपंत भाजेकर अशा किती तरी बाहेरच्या हितचिंतकांनीं भाग घेतला.  इतकेंच नव्हे तर अस्पृश्य समाजांतील कांहीं मंडळी पंक्तीस हजर होती.  त्यामुळें थोडीशी आंतबाहेर खळबळ उडाली; पण ही नवी प्रथा लवकरच पचनीं पडून सामाजिक जीविताला भरपूरपणा आल्यावांचून राहिला नाहीं.

उपासनापद्धति  :  उपासनापद्धतींत या क्रांतिकाळांत एक महत्त्वाची भर पडली.  ती अशी :- सिंध आणि पंजाब या प्रांतांतून डॉ. रुबेन आणि लाहोराहून रामरखामलसारखी भजनाची रसिक मंडळी राममोहन आश्रमांत येऊन राहात.  तसेंच बंगालहून तरुण विद्यार्थी ब्राह्मसमाजाचे सभासद मुंबईत शिक्षणासाठीं येऊन राहात.  त्यांत प्रबोधकुमार दत्त या नांवाचे तरुण गृहस्थ कलकत्त्याकडील ब्राह्मसमाजांत प्रसिद्ध गायक होते.  या सर्वांचा आमच्या घराशीं फार निकट संबंध जडला.  त्यांच्या सहवासामुळें प्रार्थनासमाजाच्या साप्‍ताहिक उपासनेच्या पूर्वी वेदीखालीं बसून अर्धा तास भजन करण्याची प्रथा पडली.  त्यांत विशेषेंकरून सिंध प्रांतांतील हिंदी भजनें आणि बंगालमधील रवीन्द्रनाथ टागोरकृत सुंदर पदें यांचा समावेश अधिकाधिक होऊं लागला.  मुंबईसमाजांतील उपासनेच्या वेळीं ब्राह्मसंगीत म्हणण्याचे बाबतींत आमच्या सभासदांच्या भगिनीमंडळाकडून पुढाकार घेण्यांत येऊं लागला.  त्यांत द्वा. गो. वैद्य यांच्या पत्‍नी व सितारामपंत जव्हेरे यांची कन्या गुलाबबाई व त्यांची बहीण कृष्णाबाई जव्हेरे आणि विशेषतः मराठी पद्यें म्हणण्यामध्यें माझी बहीण श्रीमती जनाक्का यांचा पुढाकार असे.  प्रार्थनासमाजांत बंगाली गाण्यांचा प्रवेश सितारामपंत जव्हेरे यांच्या कालापासून आहे.  सत्येंद्रनाथ टागोर सातार्‍याला डिस्ट्रिक्ट जज्ज होते, तेव्हां सातार्‍याला एक प्रार्थनासमाज चालला होता.  सितारामपंतांच्या मुलींनीं- गुलाबबाई, कृष्णाबाई, इंदिराबाई यांनीं- तेव्हांपासून बंगाली गाणीं घेतलीं.  सितारामपंतांनीं त्यांचें मराठी भाषांतर करून प्रार्थनासंगीतांत त्यांचा समावेश केला.  आम्ही राममोहन आश्रमांत राहायला लागल्यावर प्रबोधकुमार दत्त यांचा आमच्या घरीं फार लळा पडला.  त्यांचा गळा अत्यंत मधुर असून ब्राह्मसंगीतांत त्यांचें सुंदर प्रभुत्व असे.  त्यांच्याकडून श्रीमती जनाबाईंनीं बंगाली भाषेची आणि विशेषतः संगीताची बरीच माहिती करून घेऊन आपल्या इकडील संगीतांत त्याचा प्रसार केला.

सुलभ संगीत  :  प्रार्थनासंगीताची ६ वी आवृत्ति सन १९०१ मध्यें प्रसिद्ध झाली.  तेव्हांपासून हें पुस्तक बरेंच बोजड आणि आणि किंमतीनें महाग होतें.  रात्रीच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठीं आणि बहुजनसमाजांत ब्राह्मोपासनेचा प्रसार करण्याचे कामीं संगीत पुस्तकें आटोपशीर व स्वस्त दराचीं असणें आवश्यक झालें.  म्हणून ब्राह्मो पोस्टल मिशनच्या द्वारें सुलभ संगीत या नांवाचें एक लहानसें पुस्तक प्रसिद्ध करण्यांत आलें.  या कामीं माधवराव केळकर यांनीं बरीच मदत केली.  डॉ. रुबेन यांच्या भजनामुळें सिंधप्रांतीय गाणीं इकडील मंडळींना विशेष आवडूं लागलीं.  त्यामुळें प्रेमलहरी नांवाचें एक छोटेंसें पुस्तक प्रसिद्ध केलें.  उपासनेच्या वेळचें संगीत भगिनीमंडळींनीं म्हणावें आणि उपासनेच्या पूर्वीच्या वेळचें भजन तरुणांनीं म्हणावें असा प्रघात पडूं लागला.  या बाबतींत सय्यद अबदुल कादर यांनीं पुढाकार घेतला.  त्या वेळीं त्यांची प्रथम पत्‍नी वारली असल्यामुळें त्यांच्या मनाची स्थिति विरक्त झाली होती.  'अपने हरीके मै जोगन बनी' हें पद म्हणतांना तर ते गहिंवरून जात.  ह्या सुलभ संगीत पुस्तकाची लोकप्रियता इतकी वाढली कीं, पुढें त्याच्या पांच आवृत्त्या निघाल्या आणि बहुजनसमाजांतच नव्हे तर प्रत्यक्ष प्रार्थनासमाजाचें उपासनेच्या वेळीं आतां हींच पुस्तकें उपासकांच्या हातीं बहुतेक दिसत आहेत.  आतां हें भजनाचें काम व पोस्टल मिशनचें काम प्रार्थनासमाजाचे सेक्रेटरी व राममोहन हायसकूलचे शिक्षक रा. वेलिनकर यांनीं चालविलें आहे.  पूर्वीच्या पिढींत हें भजनाचें आणि गाण्याचें काम रा. गणपतराव आंजर्लेकर हरिकीर्तनाचे आणि उपासनेचे वेळीं दादासाहेब भांडारकरांचे मागें राहून चालवीत असत.