१९१४ सालच्या महायुद्धामुळें सरकारचें, शेटसावकारांचें, पुढार्यांचें आणि जनतेचेंही लक्ष देशाबाहेरच्या गोष्टींकडे लागलें. सरकारची सहानुभूति पददलित म्हणून अस्पृश्यवर्गाकडे होती, ती आतां आणखी एका कारणामुळें अस्पृश्यांकडे विशेष लागली. अस्पृश्य लोकांनीं, विशेषतः महार व चांभार जातींनीं ब्रिटिश लष्करांत फार चांगलीं कामें केलेलीं आहेत. दक्षिण देशांतील पारिया वगैरे पलटणींनीं लॉर्ड क्लाइव्हच्या कालापासून लष्करी कामगिरींत प्रसिद्धि मिळवलेली आहे; पण पुढें बराच काळा शांतींत गेल्यामुळें या गरीब लोकांना लष्करांत मिळालेलें स्थान टिकून राहिलें नाहीं. हा इतिहास स्वतंत्रपणें अभ्यासण्यासारखा आहे. २० व्या शतकाच्या आरंभापासून विशेषतः महार जातीय पुढार्यांनीं ह्या बाबतींत उचल खाल्ली होती. शांतीच्या काळांत कमी केलेल्या पलटणी पुन्हां सुरू कराव्यात अशा प्रकारचे अर्ज गव्हर्नर, व्हाइसरॉय, स्टेट सेक्रेटरी यांच्याकडे वेळोवेळीं करून पाहिले होते. पुण्याचे शिवराम जानबा कांबळे, पनवेलचे सुभेदार मेजर वलनकर वगैरेंनीं ह्या बाबतींत पुढाकार घेतला होता. अर्थात् या युद्धाच्या वेळीं सरकारला रिक्रूटांची आवश्यकता लागली. तेव्हां मराठ्यांबरोबर महारांचाही जयजयकाराचा ध्वनि उमटूं लागला. मुंबई व पुणें येथील टाऊन हॉलमध्यें चालू युद्धाकडे अस्पृश्यांचें लक्ष वेधण्याकरितां मोठमोठ्या जाहीर सभा होऊं लागल्या. मिशनचें काम ह्या वर्गाची सर्व बाजूंनीं उन्नति व्हावी - मग ती शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा राजकीय असो; सरकारसंबंधीं असो किंवा सनातनी धर्माधिकार्यासंबंधीं असो - चोहींकडून सतत चालवणें हें होतें. म्हणून ह्या युद्धामुळें ह्या वर्गाच्या राजकारणी महत्त्वाकांक्षेला नवीन अंकूर फुटूं लागले. ते वाढीस लावणें मिशनला क्रमप्राप्तच होतें.
लखनौ पॅक्ट : महायुद्धाला जसजसा रंग चढूं लागला तसतसा भारतीय वरिष्ठ वर्गांच्या पुढार्यांच्या महत्त्वाकांक्षेला नवीन वळण लागूं लागलें. १९१६ सालीं लखनौला काँग्रेस भरली त्या वेळीं हिंदुस्थानांतील जे निरनिराळे पक्ष होते त्यांच्यांत दृढ ऐक्य व्हावें अशी गरज भासूं लागली. युद्धाचे शेवटीं विलायत सरकारपुढें हिंदुस्थानसाठीं अधिक हक्क मागण्याचे कामीं ह्या मागण्या एकमुखानें व्हाव्यात म्हणून, हें ऐक्य आवश्यक होतें. हिंदुस्थानांतील मुख्य पक्ष म्हणजे हिंदु आणि मुसलमान. ह्यांना एकमेकांजवळ ओढण्याचा प्रयत्न काँग्रेसला करावयाचा होता. म्हणून लखनौच्या अधिवेशनांत हिंदुमुसलमानांचा लखनौ पॅक्ट (गट्टी) हा इतिहासप्रसिद्ध बनाव तयार झाला. पुण्याचे लोकमान्य टिळकांची या वेळीं मोठी चलती होती. त्यांनीं ह्या गट्टींत पुढाकार घेतला होता; पण ही गट्टी नुसती हिंदु-मुसलमानांपुरतीच होऊन कार्य भागणारें नव्हतें. हिंदूंमध्यें जे अनेक पंथ व जाती आहेत त्यांच्यांतही ऐक्य व्हावयाला पाहिजे होतें. पण ज्या वर्गांत राजकारणाबद्दल जागृतीच नाहीं तेथें ऐक्य कसें होणार ? भारतीय राजकारण म्हणजे सुशिक्षितांची आणि कांहीं भांडवलदारांची चळवळ. अफाट शेतकरीवर्ग, मजूरवर्ग व एकंदरींत बहुजनसमाज कोणत्याही सार्वजनिक चळवळीला पारखा होता. सुशिक्षित पुढारी काय बोलतात, काय करतात हें ह्या बहुजनसमाजाला कळण्यासारखें नव्हतें. काँग्रेसचीं कामें मोठमोठ्या शहरांतून व इंग्रजी भाषेंतून चालत. तीं पाहावयाला जायचें झालें तरी आधीं बूटपाटलोणीची तयारी करावी लागे. ह्यावरून ही चळवळ खालच्या वर्गांमध्यें अजून आली नव्हती हें खरें. तो काळ आतां येऊन ठेपला होता. महायुद्धाच्या दाबाखालीं हिंदी लोकांना कांहीं तरी हक्क देण्याचा विचार विलायतेंतील मुत्सद्दयांच्या डोक्यामध्यें येऊं लागला होता. पुढें होणार्या मोर्ले-मिंटो सुधारणेचा वास कांहीं पाताळ्यंत्री पुढार्यांना अगोदरच येऊन चुकला होता. लखनौ पॅक्ट हें त्याचेंच एक चिन्ह होतें.
अशा वेळीं महाराष्ट्रांत शिवाजी उत्सवासारख्या राष्ट्रीय उत्सवांचा ऊत आला होता. शिवाजी-उत्सव, गणपति-उत्सव अशाच भावनाशील उत्सवांच्या द्वारें जनतेला हलवणें शक्य होतें. असे उपाय करण्यांत लोकमान्यांचा हातखंडा असे.
राष्ट्रीय ऐक्याची चळवळ : ह्याप्रमाणें राष्ट्रीय ऐक्य वाढविण्यासाठीं महाराष्ट्रांतील निरनिराळ्या जातींचें ऐक्य करण्याचे प्रयत्न एकीकडे चालू असतां दुसरीकडे बहुजनसमाजांत मागासलेले, पुढारलेले ब्राह्मण व ब्राह्मणेतर, स्पृश्य व अस्पृश्य असे तट पाडण्याचे प्रयत्न चालू असलेले माझ्या नजरेस आले. विशेषतः ब्राह्मण नसलेल्या सर्व जातींना एकत्र करण्यासाठीं ब्राह्मणेतर पक्ष म्हणून निर्माण होऊं लागला. सर्व राष्ट्राची जागृति होत असतां नवीन एक पक्ष उभारणें मला त्या काळी इष्ट दिसलें नाहीं. निदान आमच्या मिशनच्या प्रयत्नामुळें तरी राष्ट्राच्या ऐक्याला कोणत्याही प्रकारें बाध घडूं नये, अस्पृश्यांची जागृति तर व्हावी, पण त्यानें राष्ट्राच्या ऐक्याच्या चळवळीपासून फुटून वेगळें व्हावें हें श्रेयस्कर नाहीं असें मला वाटूं लागलें. मी वर्हाड आणि मध्यप्रांत येथील मिशनच्या शाखांच्या कामीं अमरावती येथें गेलों असतां तेथील मिशनच्या स्थानिक कमिटीनें एक मोठी जाहीर सभा बोलावून त्या वेळीं चाललेल्या राष्ट्रीय ऐक्याच्या चळवळीसंबंधीं माझें मत काय आहे हें मीं लोकांस सांगावें आणि मिशनच्या कामाला बळकटी आणावी ह्यासाठीं ही जाहीर सभा भरविण्यांत आली होती. त्यांत मीं ही गोष्ट जाहीर केली कीं, ''नवीन होऊं घातलेला ब्राह्मणेतरवाद ऐक्याला फार घातुक होईल. योग्य रीतीनें तो चालविला नाहीं तर दोघांचें भांडण व तिसर्याचा लाभ असा प्रकार होईल. अस्पृश्यांची अद्यापि नीटपणें जागृति न झाल्यामुळें त्यांची दिशाभूल होईल'' वगैरे मुद्दे मीं स्पष्ट करून सांगितले. ब्राह्मणेतरपक्ष त्या वेळीं मुळींच संघटित झाला नव्हता. ह्या नवीन वादाची वार्ताही पुष्कळांना माहीत नव्हती. त्यामुळें ह्या व्याख्यानाची नवीनता लोकांना कौतुकास्पद वाटली. कित्येकांनीं तर त्या वेळीं याची जरुर काय, असा प्रश्न केला. पण लौकरच ह्या वादाचें उग्र रूप दिसून आल्यावर शंकाकारांना व्याख्यानाची जरुरी पटली.
पुढें पुण्यास परत आल्यावर जेधेमॅन्शनमध्यें शिवाजी-उत्सवाची पूर्वतयारी करण्याविषयीं एक सभा भरली होती. तो उत्सव खर्या राष्ट्रीय स्वरूपानें कसा करण्यांत यावा ह्याविषयीं सभेंत भाषण करण्यासंबंधीं मला आमंत्रण आलें. त्या वेळची परिस्थिति पाहून माझ्या मनानें घेतलें कीं, महाराष्ट्रांत मराठा समाज हा बहुसंख्य असून महाराष्ट्राच्या पाठीचा कणा असल्यासारखा आश्रयभूत आहे. तेव्हां ह्या समाजाची जागृति तर एका बाजूनें व्हावीच; पण त्या जागृतीमुळें महाराष्ट्रांत फूट न पडावी. उलट ब्राह्मणांपासून तों अस्पृश्यांपर्यंत हें जागृतीचें व ऐक्याचें लोण खालीं उतरावें, आणि ह्या हेतूनें मध्यवर्ती मराठ्यांना जागें करावें हा विचार सतत माझ्या मनांत घोळूं लागला. पुढें लौकरच ''मराठा राष्ट्रीय संघ'' या नांवाची संस्था उघडण्यांत आली. तया संघाचें एक जाहीर पत्रक छापूर प्रसिद्ध करण्यांत आलें. तयांत आरंभीं खालील मजकूर आहे.
मराठा राष्ट्रीय संघ : ''हल्लीं आपल्या देशांत जी जोराची राष्ट्रसुधारणेची चळवळ चालू आहे तिच्यामुळें लहानथोर समाजांमध्यें चांगली जागृति झाली आहे. आपल्या महाराष्ट्रांत केवळ संख्येनेंच नव्हे तर इतर अनेक कारणांमुळें मराठा समाज हा एक प्रमुख समाज आहे. गतकालांत तर हा समाज सर्व महाराष्ट्राचा पोशिंदा होता असें पूर्वेतिहास सांगत आहे. हल्लीं देखील शेती, शिपाईगिरी आणि गिरण्यांतील कष्टसाध्य काम वगैरेंच्या दृष्टीनें देशाच्या पोषणाचीच नव्हे तर त्याच्या संरक्षणाचीहि मुख्य जबाबदारी ह्याच इतिहासप्रसिद्ध समाजावर अवलंबून आहे; आणि ही जबाबदारी पार पाडण्यांत ब्रि. साम्राज्याच्या संरक्षणाचे कामीं देखील मराठ्यांनीं माघान न घेतां आपलें रक्त ओतून सक्रीय राजनिष्ठा प्रकट केली आहे. अशा हल्लींच्या आणिबाणीच्या स्थितीमध्यें मराठ्यांनीं सर्वसाधारण राष्ट्रीय बाबीसंबंधीं उदासीन किंवा अज्ञानी राहणें मुळींच श्रेयस्कर नाहीं. इतकेंच नव्हे, तर मराठ्यांचे विशेष हितसंबंध, गरजा आणि अडचणी असतील त्यांची उज्ज्वल जाणीव त्यांच्यांत असणें, हें केवळ त्यांच्याच नव्हे तर राष्ट्राच्या हिताला पोषक आहे; कारण वर निर्दिष्ट केलेल्या त्यांच्या वरील राष्ट्रीय जबाबदारीवरून त्यांचे हितसंबंध म्हणजे पर्यायानें राष्ट्राचेच हितसंबंध आहेत असें दिसून येईल.
वरील सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून पुणें येथील प्रमुख मराठा मंडळीची एक प्रास्ताविक सभा रा. गोविंद कृष्णाजी बोत्रे, रा. त्रिंबक हरी आवटे व रा. काशिनाथ ठकूजी जाधव, रा. नरहर गोविंद शिंदे ह्यांच्या आमंत्रणावरून रा. बोत्रे यांचे वाड्यांत ता. २६ ऑक्टोबर १९१७ रोजीं सायंकाळीं ५ वाजतां भरली होती. त्या वेळीं रा. नारायण ग्यानबा एखंडे ह्यांनीं मंडळींच्या सूचनेवरून अध्यक्षस्थान स्वीकारलें आणि त्यांच्या विनंतीवरून रा. विठ्ठल रामजी शिंदे यांनीं साधारणतः हल्लींच्या परिस्थितींचें आणि विशेषतः मराठा समाजाच्या आजच्या कर्तव्याचें दिग्नदर्शन केलें. त्यानंतर रा. निंबाळकर, रा. गायकवाड, रा. त्रिंबकराव हरी आवटे, रा. जाधव वगैरेंचीं समयोचित भाषणें झालीं. त्यानंतर सर्वांनुमतें ह्या संघाचें राष्ट्रीय सभेला अनुकूल असें धोरण ठरून पुढील संघाचें पहिलें काम म्हणून राष्ट्रीय सभा व मुस्लीम लीग ह्यांनीं लखनौच्या बैठकींत स्वराज्याची जी एकत्र योजना ठरविली तिला पाठिंबा देण्यासाठीं पुणें शहरांत व भोंवतालच्या भागांत राहणार्या सर्व पंथांच्या, जातींच्या व धर्मांच्या लोकांनीं सभा बोलवावी असें ठरलें.''
वर ठरलेली जंगी जाहीर सभा गुरुवार ता. ८ नोव्हेंबर १९१७ रोजीं सायंकाळीं येथील मराठा संघाच्या विद्यमानें शनिवारवाड्यांपुढील भव्य पटांगणांत भरली. तींत शहरांतील सर्व जातींचे, धर्मांचे व पंथांचे लोक उपस्थित होते. लखनौ येथें राष्ट्रीय सभेनें पास केलेल्या स्वराज्याच्या योजनेस पुष्टी देणें हा या सभेचा उद्देश होता. सभेस सुमारें १०,००० पर्यंत लोकसमुदाय हजर होता. सभेचें अध्यक्षस्थान मजकडे आलें होतें.
सूचनेस श्री. मा. ह. घोरपडे ह्यांचें अनुमोदन मिळाल्यावर अध्यक्ष म्हणाले, ''गेल्या दोन-तीन महिन्यांत आपणांमध्यें मागासलेले व पुढारलेले ब्राह्मण व अब्राह्मण असे तट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. मागासलेल्या तटांत मराठ्यांचीही गणना होऊं लागली व त्यांचा स्वराज्यास विरोध आहे असें भासविण्यांत येऊं लागलें. वस्तुस्थिति तशी नाहीं. ज्या मराठ्यांनीं दोनशें वर्षांपूर्वीच स्वराज्य स्थापन करून त्याचा उपभोगही घेतला ते मराठे स्वराज्य मागण्यासही भितात हें केव्हांही शक्य नाहीं. मराठ्यांसंबंधानें पसरविण्यांत आलेल्या ह्या विपरीत ग्रहाची असत्यता सिद्ध करण्याकरितां व मराठा जातीच्या खास हिताचें संरक्षण करण्याकरितां गेल्या विजयादशमीच्या सुमुहूर्तावर ह्या शनिवारवाड्यांस साक्षी ठेवून जवळच असलेल्या एका घरीं 'मराठा राष्ट्रीय संघ' अस्तित्वांत आला. त्याची ही सभा म्हणजे पहिली कमगिरी होय.
''मराठ्यांचे हितसंबंध वेगळे आहेत असें कित्येक म्हणतात. परंतु त्यांचे हितसंबंध वेगळे ते काय असणार ? सगळ्या महाराष्ट्राचे हितसंबंध तेच मराठा जातीचे हितसंबंध. स्वराज्य तर मागावयाचें पण आमच्या जातीचे स्वतंत्र प्रतिनिधि असले पाहिजेत अशी सर्वांनीं मागणी करावयाची म्हणजे देणाराचा व घेणाराचा दोघांचाही गोंधळ उडून जावा. मराठ्यांना स्वराज्य तें काय हें कळतच नाहीं असाही एक आक्षेप आहे; पण त्यांत कांहीं राम नाहीं. आमच्यापैकीं पुष्कळ लोक अशिक्षित असले तरी कार्य हें उपजतबुद्धीनेंच कळतें. आमच्या घरची व्यवस्था आम्हीं ठेवावयाची इतकें न कळण्याइतके का ते दुधखुळे आहेत ? स्वराज्याची मागणी व्हावी तितक्या जोरांत होत नाहीं असें माँटेग्यूसाहेबांनीं कांहीं दिवसांपूर्वी बोलून दाखविलें. वस्तुतः पाहतां स्वराज्याची तृष्णा सर्वांना सारखी आहे. ती वारंवार बोलून दाखविण्याचें काम मराठा संघाकडून होईल.''
सभेच्या सुरुवातीस लखनौ येथें पास झालेल्या स्वराज्याच्या ठरावास पुष्टी देणारा ठराव मांडला तो रा. त्र्यं. ह. आवटे ह्यांनी सभेपुढें मांडला व त्यास निरनिराळ्या जातींच्या व संस्थांच्या वतीनें निरनिराळ्या वक्तयांनीं पुष्टी दिली.
स्वराज्याच्या ठरावावर लोकमान्य टिळक यांचें भाषण झालें. ते म्हणाले, ''जातिभेदाच्या अनिष्ट तत्त्वाचा नवीन राज्यांतहि शिरकाव करूं नका. आतां आपल्याला पूर्वीचें स्वराज्य नको असून पाश्चिमात्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे. आपल्या जातिभेदामुळेंच येथें ब्रि. राज्य स्थापन झालें व तो जातिभेद असाच पुढें चालू राहणार असेल तर स्वराज्यांतही अशीच आमची अधोगति होईल. जातिभेदानें आमचे फार नुकसान झालें आहे. राष्ट्रीय सभेनें केलेली मागणी कोणत्याही एका जातीपुरती नसून तिच्यांत सर्व जातींच्या सर्व हितसंबंधांचे संरक्षण होईल.'' रा. टिळक यांच्या भाषणानंतर पास झालेले ठराव राष्ट्रीय सभेकडे व सरकारी अधिकार्यांकडे पाठवण्याचा अधिकार अध्यक्षांना देण्यांत आल्यावर त्यांचे आभार मानून सभा विसर्जन करण्यांत आली.
न्या. मू. चंदावरकर : परवांच्या सभेच्या अध्यक्षीय भाषणांत सर नारायणराव म्हणाले, ''आजपर्यंत मीं पुष्कळ सभांचें अध्यक्षस्थान स्वीकारलें आहे; परंतु आजच्या सभेचें अध्यक्षस्थान स्वीकारतांना मला जितका मनःपूर्वक आनंद होत आहे तितका यापूर्वी केव्हांही वाटला नव्हता. तुमचा उद्धार झाला तरच एकंदर देशाचा उद्धार होणार. आजच्या सभेच्या कार्यक्रमामध्यें राजकीय सुधारणेसंबंधानें दोन ठराव आहेत. राजकीय बाबतींत तुमच्यामध्यें जागृति होत आहे ही समाधानाची गोष्ट आहे. राजकीय सुधारणा व्हावी ही हिंदी लोकांची मागणी कित्येक वर्षांची आहे. कोणत्या सुधारणा करावयाच्या तें ठरविण्याकरितां स्टेट सेक्रेटरी मि. माँटेग्यू व व्हाइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड हे निरनिराळ्या प्रांतांत फिरून चौकशी करणार आहेत. राजकीय बाबतींत सुधारणा झालीच पाहिजे; परंतु ती सुधारणा सर्वांनाच फायदेशीर झाली पाहिजे. सर्व जातींच्या व धर्मांच्या लोकांना - स्पृश्य व अस्पृश्य लोकांना - फायदा झालाच पाहिजे. अस्पृश्यवर्गांतील लोकांची संख्या या देशांतील एकंदर लोकसंख्येच्या एकपंचमांशाइतकी आहे. ह्या लोकांनांही या सुधारणा फायदेशीर झाल्या पाहिजेत. तेव्हां त्यांनीं आपलें म्हणणें सरकारास कळविलें पाहिजे. या वेळीं तें उदासीन राहिले तर त्यांचें नुकसान होईल. अस्पृश्यांचा उदयकाल नजीक आला आहे. मात्र त्यांनीं ह्या काळाचा फायदा घेण्यासाठीं दक्षता ठेवली पाहिजे.''
ना. म. जोशी : ह्यानंतर अध्यक्षांच्या आज्ञेवरून रा. ना. म. जोशी यांनीं भाषण केलें, ''ह्यापूर्वी शिक्षणप्रसार, अस्पृश्यत्वाचा निषेध, मद्यपाननिषेध वगैरे विषयांसंबंधीं अस्पृश्य लोकांतील पुष्कळ सभा आजपर्यंत भरल्या आहेत. परंतु आजची सभा ह्या सभांहून भिन्न आहे. राजकीय बाबतींत अस्पृश्यांतही जागृति होत असल्याचें, त्यांच्यामध्यें स्वहक्कांबद्दल जाणीव होत असल्याचें, ही सभा दर्शवते. त्याबद्दल मी त्यांचें अभिनंदन करतों. ह्या देशांतील अधिकारीवर्गानें पुष्कळ चांगल्या गोष्टी केल्या आहेत, पण तो परकीय असल्यानें आणि त्याच्यावर लोकमताचा दाब नसल्यानें एकंदरींत राज्यपद्धति सदोषच आहे. जोड्यांतला कांटा पायाला कोठें टोंचतो हें तो जोडा वापरणारासच समजतें. त्याप्रमाणें लोकांचीं सुखदुःखें लोकांच्या प्रतिनिधींना जितकीं समजतील तितकीं अधिकारीवर्गाला कळणें अशक्य आहे. हिंदी लोकांना महत्त्वाचे राजकीय हक्क मिळाले तर अस्पृश्यवर्गाची सुधारणा बंद होईल अशी कित्येकांना भीति वाटते. परंतु तशी भीति वाटण्याचें कारण नाहीं. आपल्याच देशांतील लोकांचें मन वळविणें कठीण जाईल कीं परकीयांचें ह्याचा विचा करा. अस्पृश्यांचे स्वतंत्र प्रतिनिधि कायदे कौन्सिलांत बसूं नयेत, असें म्हणणारे कांहीं लोक आहेत.''
दुही : ही सभा उधळून लावण्याकरितां रा. नारायणराव पवार आणि इतर कांहीं मंडळी सभेंत चळवळ करीत होती. त्यांना तेथें यश आलें नाहीं, तरी अखेरीस राष्ट्रीय मराठा पक्ष व सत्यशोधक मराठा पक्ष असे दोन तट मराठा समाजामध्यें पडले. पहिल्या पक्षाच्या दोन परिषदा बेळगांव व वर्धा येथें पुढील दोन वर्षांत झाल्या. दुसर्या पक्षाच्या मुंबई व पुणें येथें झाल्या; पण मराठा राष्ट्रीय संघाला अनुसरून त्या पक्षांतील कांहींना सामाजिक सुधारणा मान्य होईना आणि सत्यशोधक समाजाला सामाजिक सुधारणा पूर्ण मान्य होती तरी राष्ट्रीय सभेची चळवळ मान्य होईना. हळूहळू ब्राह्मणेतर पक्षाची स्वतंत्र घटना होऊं लागली. शनिवारवाड्यांपुढील जाहीर सभेंत महारांच्या वतीनें कोणी वक्ता नव्हता हें ध्यानांत घेण्यासारखें आहे. चांभार, मांग वगैरेंच्या बहुसंख्य लोकांना राष्ट्रीय सभेचें अनुयायित्व पटत असे, पण महार बहुशः राष्ट्रीय सभेपासून फटकून राहात. ब्राह्मणेतर पक्षांतही ते मिसळत नसत. त्यांचा स्वतंत्र तृतीय पंथ निघाला.
पुण्याला बहुजनसमाजांतून राष्ट्रैक्याची चळवळ चालू असतां मुंबईस आमच्या मिशनतर्फे अगदीं अशीच एक जंगी जाहीर सभा ता. ११ नोव्हेंबर रोजीं भायखळा येथील मदनपुर्यांत झाली. सुमारें ५००० लोकसमुदाय जमला होता.
विजापूर येथील धर्मकार्य : ता. १२ मे १९१८ च्या सुबोध पत्रिकेंत विजापूर येथील धर्मपरिषदेची हकीकत खालीलप्रमाणें आहे.
''विजापूर येथें गेल्या आठवड्यांत जी प्रांतिक परिषद झाली, तीस एक दिवस उशीरा आरंभ झाल्यानें ता. ४ रोजीं प्रांतिक परिषदेच्या मंडपांत फार महत्त्वाचें कार्य झालें. तेथें या दिवशीं जी सभा झाली तीस ''उदार धर्माची सभा'' असें अन्वर्थक नांव देण्यांत आलें होतें. अध्यक्षस्थानीं ना. पांडुरंगराव देसाई यांची योजना झाली होती. या सभेस प्रार्थना व ब्राह्म समाज ह्यांची बाजू रा. रा. वि. रा. शिंदे व बाबू सुधीरचंद्र बानर्जी यांनीं सभेपुढे मांडली. रा. शिंदे म्हणाले, ''राजकीय प्रांतिक परिषदेसाठीं हा भव्य मंडप उभारला असतांना तिचें अधिवेशन होण्यापूर्वीच या धर्मसभेचें पिल्लू या मंडपांत कां सोडण्यांत आलें असा प्रश्न तर्कप्रिय लोकांकडून करण्यांस आलेला माझ्या कानांवर आला आहे. त्याचें उत्तर देण्याला हाच प्रसंग योग्य आहे. आम्हां पौरस्त्य लोकांच्या विशेषतः सनातन म्हणून गाजलेल्या हिंदुधर्मीयांच्या कीर्तीचा नगारा असा आहे कीं, आम्ही कोणतेंही काम ईश्वराचें नांव आणि धर्माचा संस्कार केल्याशिवाय करीत नाहीं. जेवणाचा घांससुद्धां नारायणाचे नांव घेऊन घेतों. उद्यां तर ह्या ठिकाणीं मोठमोठे राष्ट्रीय निश्च होणार आहेत. त्यापूर्वी ईश्वरस्मरण न करणें हें आपल्या सनातन धर्माभिमानास शोभेल काय ? ह्यावरून आजची ही धर्मसभा उद्यांच्या राष्ट्रकार्याचें पुण्याहवाचन म्हटल्यास हरकत नाहीं आणि त्याविषयीं कुतर्क काढणें म्हणजे आमच्या पूर्वपरंपरेला झुगारून देणेंच होय. प्रार्थनासमाजाचा एक सभासद म्हणून मी बोलत आहें. व्यक्तीची उन्नति करणें हें प्राचीन हिंदु धर्माचें लक्षण होतें आणि केवळ समाजाच्या उन्नतीकरितां झटणें हें आधुनिक ख्रिस्ती धर्माचें लक्षण आहे. ह्या दोहींचा गोड मिलाफ करण्याची हांव प्रार्थनासमाज बाळगीत आहे आणि या ध्येयाच्या आड येणें म्हणजे अधर्म अशी माझी अल्पमति आहे.'' असें सांगून रा. शिंदे यांनीं अशा आणीबाणीच्या पुढार्यांनीं अथवा अनुयायांनीं आपल्या जातीच्या, मताच्या किंवा पंथाच्या सबबीवर आमच्या या हतभागी देशांत दुहीचें, द्वेषाचें किंवा भ्रांतीचें साम्राज्य माजवूं नये, अशी विनंती केली. ह्या प्रसंगीं जवळजवळ २००० लोकसमूह होता व त्यांत शंभर एक स्त्रिया होत्या. विजापूरसारख्या ठिकाणीं इतक्या लोकांना प्रार्थना व ब्राह्म समाजाची माहिती करून देण्याची संधि आमच्या बंधूंना साधतां आली हें फार ठीक झालें. हा योग रा. शिंदे यांनीं जुळवून आणल्याचें कळतें.
सुबोधपत्रिकेच्या ह्याच अंकांत (१२ मे १९१८) खालील मजकूर आढळतो. (ही परिषद डी. सी. मिशनच्या विद्यमानें भरली होती. पुण्याचे ना. बी. एस. कामत अध्यक्ष होते. परिषदेच्या कामांत मदत करण्यासाठीं रा. कृ. गो. पाताडे मजबरोबर होते.)
महार परिषद : ''विजापूर येथें मागासलेल्या वर्गाच्या वतीनें जी परिषद झाली तींत झालेल्या भाषणांत वक्त्यांनीं उच्च जातींच्या पुढार्यांची मनसोक्त निंदा केली. ती इतकी कीं, झाला हा प्रकार ठीक झाला नाहीं असें टाइम्स ऑफ इंडियासारख्या पत्रालाही वाटलें. इकडे हा असा प्रकार झाला तर तिकडे अकोल्यास महारांच्या परिषदेंत निराश्रित साह्यकारी मंडळींचे आभार मानण्याचा ठराव पसार होऊन या संस्थेचें राजकीय धोरण आपल्याला पसंत नाहीं असा अव्यापारेषु व्यापार करणारा ठराव पास झाला आहे ! ही मंडळी लोकहिताचें काम करण्यासाठीं स्थापन झालेली आहे व हिच्यांतील सर्व माणसांचें राजकीय बाबतींत मतैक्य नाहीं ह्या एका गोष्टीवरूनच संस्थेचें असें राजकीय धोरण असणें शक्य नाहीं हें कोणासही सहज कळण्यासारखें आहे. असें असतां आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठीं ही कुचेष्टा करण्याची बुद्धि आमच्या महारबंधूंना झाली ह्याबद्दल आम्हांला फार वाईट वाटतें. निराश्रित सहकारी मंडळी ही सरकारमध्यें नोंदलेली संस्था आहे हें पूर्णपणें माहीत असून तींतील कांहीं मंडळींचे विचार सबंध संस्थेवर लादून संस्थेला राजकीय करण्याचा प्रयत्न करणें हें सरळ वृत्तीच्या माणसाला शोभण्यासारखें नाहीं.''