निवेदन

प्रचारकांच्या बदल्या  :  १९१९ च्या सुमाराला सय्यद अबदुल कादर यांनीं आपलें काम सोडलें.  ते त्यापूर्वीच आपलें नागपूर येथील काम सोडून असि. सेक्रेटरीचा चार्ज घेऊन आले होते.  १९१८ तील अस्पृश्यतानिवारक परिषदेचें काम, मुंबईस त्यांनीं फार अंगमेहनतीनें केलें.  बहुतेक मिशनच्या शाखांशीं त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला होता.  त्यांच्या कामांत त्यांच्या पत्‍नीचें सहकार्य होतें.  रा. सय्यद यांच्यानंतर लौकरच रा. वामनराव सोहोनी यांनीं आपल्या मुंबई शाखेचा चार्ज सोडला.  ह्या दोघां आद्यप्रवर्तकांचा संबंध अशा रीतीनें सुटल्यानें मला फार वाईट वाटलें.  स्वतः माझ्या मानेवरचेंच जूं मी केव्हां खालीं ठेवावें या विचारांत होतों.  म्हणून हा सहकार्‍यांचा वियोग मीं कसाबसा सहन केला.  बंगलोर शाखेंतून रा. पाताडे यांनीं १९२१ च्या सुमाराला मुंबई शाखेचा कारभार त्यांच्या स्वाधीन केला; पण १।२ महिन्यांतच त्यांना पुण्यास आणण्यांत येऊन व त्यांचे जागीं हुबळी शाखेचे दा. ना. पटवर्धन यांस मुंबईस नेमलें.  अशा या तात्पुरत्या अदलाबदलीमुळें मिशनच्या कामाची फार आबाळ होऊं लागली.

निवेदन  :   अशा या कठीण प्रसंगीं सर्व मिशनची पुनर्घटना निदान पुणें शाखेची तरी विशेष घटना करणें मला भाग पडलें.  त्याविषयीं अगोदर माझें एक प्रांजल निवेदन वर्तमानपत्रांतून जाहीर करणें इष्ट वाटलें.  त्याप्रमाणें ता. ३ एप्रिल १९२३ रोजीं केसरींत व ता. २९ मार्च १९२३ रोजीं ज्ञानप्रकाशांत मीं माझें जें निवेदन प्रसिद्ध केलें त्यांतील कांहीं भाग पुढें देत आहें -

''ही मंडळी स्थापण्याचें श्रेय ब्राह्मण धर्माला आहे.  प्राथमिक प्रयत्‍नांस पूर्ण पाठिंबा मुं. प्रा. समाजांतील प्रमुख सभासदांनीं दिला; पण हें मिशन समाजाचें अंग म्हणून न चालवतां, स्वतंत्रपणें एक राष्ट्रकार्य म्हणूनच चालवणें मंडळीस श्रेयस्कर वाटलें.  स्थापनेच्या वेळीं वरवर विचार करणार्‍या लोकांनीं अनुकूल-प्रतिकूल भविष्यें वर्तवलीं.  अस्पृश्यवर्गांत तादात्म्य पावून त्यांचा उद्धार न होतां स्पृश्य कार्यवाहकांचीच अवनति होण्याचा संभव आहे असे प्रांजलपणाचे उद्‍गार एका सच्छील गृहस्थानें काढले.  पुढें पुढें तर हा प्रयत्‍न अस्पृश्यांस वर नेण्यानेक्षां ब्राह्मणादि वरिष्ठ लोकांस खालीं ओढण्यासाठींच आहे असे उद्‍गार जाहीर सभांतून स्पष्ट निघूं लागले.  ह्या मिशनच्या कार्यवाहकांनीं अस्पृश्य-वस्तींत आपल्या कुटुंबासह त्यांच्या बायकामुलांस समान वृत्तीनें मिसळून बिनबोभाट निरपेक्ष रीतीनें काम करावें, हें ह्या मंडळीचें आद्या तत्त्व ठरलें.  ह्या तत्त्वाप्रमाणें ७ बंधु व २ भगिनी यांनीं काम केलें आहे.  त्यांपैकीं ५ मराठे, ३ ब्राह्मण व १ मुसलमान प्रार्थनासमाजिस्ट, अशी त्यांची जातवारी आहे.  हे बहुतेक ब्राह्म धर्मानुयायीच असल्यामुळें प्रथम जातिभेद टाकूनच ही मंडळी कार्यास लागली.

''ह्या मिशनचें काम पुढेंमागें अस्पृश्यांनीं स्वतः आपल्यावर घ्यावें म्हणून प्रत्येक प्रांतिक शाखेच्या मुख्य ठिकाणीं अस्पृश्य-विद्यार्थीगृह चालवण्याचा आग्रह आजपर्यंत चालू आहे.  त्याशिवाय ह्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक राहणीवर उच्च संस्कार होणें अशक्य आहे हें जाणून मुंबई, पुणें, हुबळी, नागपूर, बंगलोर, मंगलोर वगैरे ठिकाणीं अशा गृहांची योजना कमीअधिक प्रमाणांत चालू आहे.  अस्पृश्यतानिवारणाच्या प्रश्नाला आज जें स्वरूप आलें आहे याचीं कारणें पुष्कळ अंशीं ह्या वसतिगृहांतच सांपडतील.

''मंडळीच्या कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विस्तार सर्व हिंदुस्थानभर झाला आहे.  नर्मदेच्या उत्तरेकडील भागांत पूर्वेस ब्राह्म समाजानें व वायव्येस आर्य समाजानें हेंच काम चालवलेलें आहे.  अलीकडे महात्मा गांधींनीं ह्या कामाचा स्वीकार केल्यानें राष्ट्रीय सभेचाही पूर्ण पाठिंबा ह्या कामास मिळाला आहे.  तरी पण राजकारण, समाजकारण, जुन्या धर्माचें आचरण, परंपरेचें परिपालन इत्यादि परस्पर भिन्न विषयांमुळें हा प्रश्न फार गुंतागुंतीचा झाला आहे.  प्रत्यक्ष काम करणारांची स्थिति अत्यंत केविलवाणी होऊं लागली आहे.  अस्पृश्यांत जोराची जागृति होत आहे एवढेंच समाधान कार्यकर्त्यांत उरलें आहे.  ह्या मंडळीचें मध्यवर्ती ऑफिस जरी मुंबईस आहे तरी ह्या मंडळीला एखादें आश्रयस्थान ऊर्फ आश्रम बांधण्यासाठीं प्रशस्त जागा कितीही प्रयत्‍न करून मुंबईस मिळण्यासारखी नाहीं हें पाहून हा प्रयत्‍न पुण्यास केला.  ह्यासाठीं १९१२ सालापासून मला पुण्यास राहावें लागलें.  १८५२ सालीं ज्योतिबा फुले ह्यांनीं पुण्यास अशीच एक मंडळी स्थापन केली होती.  त्या मंडळीची भोकरवाडी येथील (परडी सर्वे नं. ५) सुमारें ७ एक जागा पुणें म्युनिसिपालिटीच्या ताब्यांत सरकारमार्फत आली होती.  ती जागा मिशनला मिळून तिच्यावर १ लक्ष ७ हजार रुपये किंमतीच्या पक्क्या इमारती पूर्ण झाल्या आहेत ह्याबद्दल म्युनिसिपालिटीचें व सरकारचें मिशन अत्यंत ॠणी आहे.  

'' ५ सप्टें. १९२१ रोजीं म्हैसूर युवराजांच्या हस्तें मुख्य शाळेच्या इमारतीची कोनशिला बसवण्यांत आली.  त्या समारंभाचे वेळीं अस्पृश्यपुढार्‍यांनीं आतां हें काम आपल्यावर घ्यावें अशी नम्र सूचना मजकडून करण्यांत आली.  त्यावर ज्ञानप्रकाश, मुं. क्रॉनिकल (सुबोध पत्रिका) वगैरे पत्रांनीं आपलें मत दिलें कीं, केवळ अस्पृश्यांवरच हें काम सोंपवण्याची वेळ अद्याप आली नाहीं.  वरिष्ठ व कनिष्ठ म्हणणार्‍यांनीं मिळून सहकार्यच केलें पाहिजे.  तत्त्वतः हें खरें असलें तरी ज्या अर्थी अस्पृश्यवर्गांत योग्य पुढारी निर्माण होऊं लागले आहेत आणि कौन्सिलांतून व म्युनिसिपालिट्यांतून अभिनंदनीय कामगिरी ते करूं लागले आहेत त्या अर्थी त्यांचें स्वतःचेंच मिशन चालवण्यास ते केवळ असमर्थ आहेत असें म्हणतां येणार नाहीं.  हें जाणून गेल्या दोन वर्षांत स्थानिक व्यवस्थापक कमिट्यांतून अस्पृश्यवर्गांतील पुढारी घेण्यांत आले आहेत.  इतकेंच नव्हे तर नागपूर व बंगलोरच्या शाखा ह्याच वर्गाच्या अधिकार्‍यांकडे सोंपवण्यांत आल्या होत्या.  अशा अधिकार्‍यांकडून प्रत्यक्ष काम करीत असतांना जरी कांही चुका घडून आल्या आहेत, तरी अधिक अधिक प्रत्यक्ष जबाबदारी यांचेवर टाकणें हेंच श्रेयस्कर आहे.  आम्ही स्वराज्यवादी तरी इंग्रज अधिकार्‍याकडे हीच मागणी करीत आहों.  अस्पृश्यवर्गहि तीच मागणी करीत आहे ही संतोषाची गोष्ट आहे.  हें सर्व ध्यानांत आणून ह्या मिशनच्या मुंबई येथील मातृसंस्थेच्या साधारण सभेनें गेल्या वर्षी नियमांची पुनर्घटना केली.  निरनिराळ्या स्थानिक शाखांनीं आपआपले कारभार चालवण्यासाठीं स्थानिक कमिट्या, वर्गणीदार लोकांतून, निवडणुकीच्या तत्त्वावर स्थापाव्यात, मध्यवर्ती कमिटीकडून मिशनरी मागवावे व शक्य तेथवर अस्पृश्यवर्गांतील अधिकारी नेमावे, अशी दिशा पतकरली आहे.

''इमारतीची योजना पूर्ण झाल्यानें माझी या शाखेची अंतर्व्यवस्थेची खास कामगिरी संपली आहे.  वयपरत्वें सामान्य देखरेखीपेक्षां अधिक जबाबदारी स्वतःवर ठेवणें इष्ट नाहीं.  म्हणून मी ह्यापुढें मिशनच्या ऑनररी ऑर्गनायझिंग जनरल सेक्रेटरी याच नात्यानें, मजकडून होईल तें काम करण्याची इच्छा अद्यापि बाळगून आहें. विशेषतः अस्पृश्यतानिवारणाचे जें सामाजिक काम मिशनच्या बाहेरील मंडळीही करूं लागली आहे त्यांच्याशीं ह्या मंडळीचें सहकार्य घडवून आणावें हा माझा उद्देश आहे.  ईश्वर कृपा करो.''