वडील भावाचा मृत्यु

१८८५ सालीं मी १२ वर्षांचा झालों.  माझा भाऊ १७।१८ वर्षांचा झाला होता.  ह्या सालाच्या आरंभीं माझी मराठी ५ वी इयत्ता संपून मी इंग्रजी पहिल्या इयत्तेत हायस्कूलांत गेलों.  एव्हांपासून माझ्या आयुष्यांतील एक नवीन टप्पा सुरू झाला.  माझें बाळपण संपलें आणि विद्यार्थीदशेला प्रारंभ झाला म्हणावयाचा.

नवीन टप्पा :   मराठी शाळेंत माझा गणित व भाषा वगैरे अभ्यास त्या वेळच्या शिक्षणाच्या मानानें बरा होता.  मराठी शाळेचे हेडमास्तर विष्णुपंत गवंडे फार कडक होते.  तरी माझी तरतरी पाहून ते मजवर प्रेम करीत असत.  चौथ्या इयत्तेंत अंताजीपंत पोंक्षे नांवाचे मास्तर होते.  तेही प्रेम करीत असत.  त्या वेळीं ब्राह्मणेतरांचीं मुलें सरकारी शाळेंत फारच कमी असत, त्यामुळें व मी हुषार म्हणून कोणीही माझें कौतुकच करीत.  पण दुसर्‍या इयत्तेंत असतांना दत्तापंत बेडेकर नांवाचा एक मास्तर फार तिरसट असे.  त्यानें एके दिवशीं मला अतिशय मारलें, त्यामुळें मांडींतून रक्त येत असतांना मी घरीं आलों.  हें पाहून माझे बाबा शाळेंत गेले व त्यांनीं त्या मारकट मास्तराचा खरपूस समाचार घेतला.  त्यामुळें पुढें सगळ्याच मास्तरांवर दाब बसला.  माझ्या वडील भावाची प्रगति मात्र शाळेंत मुळींच होईना.  बाबांनीं त्याला नेहमीं बोलण्याचें व मारण्याचें हें एक कारण होतें.

इंग्रजी शाळेच्या अभ्यासांत इंग्रजी शब्द पाठ करण्याचा व विशेषतः त्यांच्या स्पेलिंगचा मला भारी कंटाळा येई.  इतका कीं त्यामुळें मला इंग्रजी शाळा नकोशी वाटूं लागली.  आबा म्हैसकर नांवाचा एक ब्राह्मण मास्तर पहिल्या इयत्तेवर होता.  तो स्पेलिंग नुसतें पाठ करावयाला लावी.  घरीं किंवा शाळेंत मला मदत करावयास कोणीच नव्हतें.

ह्या वेळीं आमच्या घरीं एक अरिष्ट घडलें.  इ.स.१८८५ मध्यें जमखंडींत पटकीचा उपद्रव सुरू झाला आणि अगदीं सुरुवातीलाच माझा तरुण भाऊ १।२ दिवसच आजारी पडून एकदम वारला.  तो शांत व समजूतदार होता.  म्हणून शेजार्‍यांना व नातलगांना माझ्यापेक्षां तोच जास्त आवडत असे.  बाबा त्याच्यावर राग करीत, म्हणून आईला तो अधिक आवडत असे.  तो असा एकाएकीं वारल्यामुळें आईला व बाबांना एकदम फारच मोठा धक्का बसला.  आईनें तर पुढें ५।६ वर्षे अतिशय शोक केला.

बंधु एकनाथ  :   माझा भाऊ वारल्यावर सुमारें पांच वर्षे आम्ही अत्यंत भयंकर दारिद्र्याचे हाल सोसले.  इ.स. १८८५ च्या डिसेंबर महिन्यांत माझा धाकटा भाऊ एकनाथ हा जन्मला.  ह्यापुढचीं, माझी धाकटी बहीण मुक्ताबाई हिच्या पाठीवरचीं मुलें जन्मतःच फार अशक्त जन्मलीं.  जन्मतः एकनाथही अशक्त व किरकिर्‍या होता.  आईच्या अंगावर दूध मुळींच नव्हतें.  भाऊच्या मरणाच्या शोकानें तिचें सारें रक्त जळून गेलेलें.  मग दूध कोठून असणार ?  अशा स्थितींत धोंडूबाई नांवाची एक गवळण आईचे ओळखीची होती.  तिला ह्या मुलाची करुणा आली.  ती रोज त्याच्यापुरतें म्हशीचें ताजें दूध फुकट देत असे.  एरव्हीं एकनाथ हा वांचलाच नसता.  भाऊ वार्‍यावर मीच सर्वांत वडील अपत्य झालों.  तेव्हांपासून पोरकटपणा जाऊन माझ्या स्वभावांत एकदम फरक पडला.  आमच्या घरच्या करुणास्पद स्थितीची मजमध्यें एकदम जाणीव उत्पन्न झाली.  मी बारा वर्षांचा होतों, तरी मला सर्व कळूं लागलें.  मलाही भावाचा शोक होत होता.  त्या वेळीं मीं कसलीशी एक कविता रचली होती व दत्तात्रयावर एक आरती रचली होती.

माझ्या स्वभावांत एकदम पडलेल्या ह्या फरकामुळें आईबाबांना माझें मोठें कौतुक वाटूं लागलें.  शाळेंत माझा अभ्यासही उत्तम होऊन माझी वाहवा होऊं लागली.  इ.स. १८८६ सालीं माझी इंग्रजी पहिली इयत्ता पास होऊन मी दुसर्‍या इयत्तेंत गेलों.  तेथें गेल्यावर वर्गांत माझा नेहमीं पहिला नंबर लागूं लागला.  रोजच्या मार्कांची बेरीज होऊन महिन्याचे शेवटीं नंबर लागत.  दुसर्‍या इयत्तेपासून मीं जो एकदां पहिला नंबर पटकावला, तो अखेर सातव्या इयत्तेपर्यंत एक नंबरही खालीं उतरलों नाहीं.  एकदां पांचव्या इयत्तेंत असतांना यल्लामाच्या यात्रेला गेलों म्हणून काय तो माझा नंबर खालीं गेला.  मॅट्रिकच्या परीक्षेला जमखंडी हायस्कूलमधून जितकी मुले गेली, त्यांतही माझाच नंबर पहिला होता.

चुणचुणीतपणा  :   पहिल्या इयत्तेंत मला जी इंग्रजी भाषा अवघड वाटून, अगदीं आत्महत्या करून घ्यावी इतकें वाईट वाटत होतें, त्याच भाषेंत मी सर्व वर्गांत प्रवीण ठरलों.  विष्णुपंत गाडगीळ गांवाचे ब्राह्मण मास्तर दुसर्‍या इयत्तेवर होते.  माझी सर्व विषयांत तरतरी पाहून ते नेहमीं मजवर खूष असत.  इतर वर्गांतील सर्व मुलें ब्राह्मणांचीं असून मीच काय तो मराठ्याचा आणि तोही पहिला; ह्याचें माझ्या ब्राह्मण मासतरांना मोठें कौतुक वाटे.  कोणीही ब्राह्मणांनीं माझा जातिभेदामुळें हेवा किंवा द्वेष कधीं मी शाळेंत असतांना तरी केला नाहीं.  भाषांतरपाठमालेच्या धड्यांत मी अगदीं चुणचुणीत उत्तरें देत असें.  एकदां मला पक्कें आठवतें कीं, मास्तरांनीं एक प्रश्न केला.  तो वर्गांत कोणाला आला नाहीं.  मी त्याचें उत्तर बरोबर देईन अशी त्यांची खात्री होती आणि तसें तें मी चटकन दिलेंही.  तेव्हां गाडगीळ मास्तरांनीं मला प्रत्येक मुलाच्या तोंडावर थुंकावयास सांगितलें.  तें माझ्याच्यानें कांहीं केल्या होईना.  पण मास्तरांनीं आग्रहच धरला.  तेव्हां मला प्रत्येक मुलापुढें जाऊन किंचित् थुंकल्यासारखें करावें लागलें.  जसजसा मी वरच्या वर्गांत जाऊं लागलों, तसतसे नवीन विषय संस्कृत, बीजगणित, भूमिति, शास्त्रें वगैरे लागूं लागलीं.  तशाच लेखी परीक्षा सुरू झाल्या. पण सर्वांत पृथक् पृथक् माझाच नेहमीं पहिला नंबर असे.  त्यामुळें सर्वच मास्तरांचा व विद्यार्थ्यांचा मी आवडता झालों होतों.

चिमुकली स्कॉलरशिप  :   हायस्कुलांतील प्रत्येक वर्गांत असतांना पहिल्या दोन मुलांना दरमहा एक लहानशी स्कॉलरशिप मिळत असे.  दुसर्‍या इयत्तेंत १-१॥ रुपयापासून ती सातवे इयत्तेंत ३ रुपयेपर्यंत होती.  अर्थात् मला नेहमीं पहिल्या नंबरची स्कॉलरशिप मिळे.  ह्या वेळीं घरीं तर भयंकर दारिद्र्य असे.  माझ्या चिमुकल्या स्कॉलरशिपचीच घरीं मोठी मदत होत असे.  त्या वेळीं जमखंडींत मोठी स्वस्ताई असे.  एक रुपयाला १६ पायल्या धान्य झालेलें मला आठवतें.  मग माझ्या चिमुकल्या स्कॉलरशिपकडे माझ्या आईचे डोळे लागून राहात, ह्यांत नवल काय !  इतकी जरी स्वस्ताई होती, तरी आमचे घरीं उत्पन्न नसल्यानें आई आम्हां चार मुलांचे, बाबांचे व आपले प्राण कसे राखीत असे तें आईला किंवा देवालाच ठावें !  अर्थात् तिला बाजारांतलें वाईट व स्वस्त धान्य व तसलाच भाजीपाला आणावा लागे.  पुष्कळ वेळां पेवांत बरेच दिवस ठेवून बिघडलेले जोंधळे बाजारांत विकावयास येत.  ते फार स्वस्त म्हणून आई नेमके तेच आणी.  त्यांचा वास वाईट येई, पण आम्ही मुलें त्याच्याच भाकरी गोड करून खात असूं.   कारण गोडी धान्यांत नसून आमच्या आईच्या हातांत असे.  असल्या दाण्यांची भाकरी, तसल्याच तुरीच्या डाळीचें वरण व तांबड्यां मिरच्यांची चटणी हे तीन पदार्थ आम्हांला बासुंदीपुरीसारखे गोड लागत.  आमचें लक्ष अन्नाकडे जाऊं नये, म्हणून आई आपल्या माहेरच्या लहानपणच्या व सासरच्या करुणास्पद कहाण्या सांगत असे. त्या आमच्या काळजांत इतक्या खोल जात कीं, आमचें जेवण आटपून आमचे हात वाळले तरी आम्हांला भान राहात नसे.

पुष्कळ वेळां हें कदान्नहि आम्हांला पुरेसें मिळत नसे.  वालूबाई नांवाची एक कुणबीण पूर्वी आमची स्थिति बरी असतांना आमचे घरीं कामाला होती.  पुढें आम्हांला अशी भयंकर स्थिति प्राप्‍त झाल्यावर त्या प्रामाणिक बाईला आम्हां बाळांचा कळवळा येऊन, कोठले तरी फार दिवसांचे शिळे तुकडे आणून तिनें हळूच झांकून आईला आणून द्यावे.  मग आईनें ते ताकांत अगर वरणांत अगर दोन्ही नसल्यास नुसते पाण्यांत भिजवून आमचेसाठीं ठेवावे.  आम्हीं सर्व मुलें शाळेंतून भूक, भूक करीत आल्यावर तेंच पक्वान्न खावें आणि पुढें किती तरी वेळ नुसतीं बोटेंच चाटीत बसावें.  आमचा हा अल्पसंतोषीपणा पाहून आईनें आम्हांला न कळत आंसवें गाळावीं आणि अशा आनंदांत आपली भूक विसरावी !

तुकारामाचा संसार  :  इतकें झालें, तरी आईनें कधीं कोणाची मजुरी केली नाहीं, कीं कोणाचे दारीं चिमूटभर मीठ मागण्यासाठीं उभी राहिली नाहीं.  तिच्या आईप्रमाणें तीही उंबरठ्याच्या आंतच राही.  बाजारहाट, हिशेब वगैरे सर्व आईलाच करावें लागे.  वाणी. माळणी, तेलणी, गवळणी आईची कदर ओळखून असत.  त्या सढळ हातानें माप देत व पैशांची कधींही जिकीर करीत नसत.  एकंदरींत आमचा संसार अगदीं तुकारामबोवाच्या वळणावर चालला होता.  फरक इतकाच कीं, तुकारामाच्या मुलांना मराठी तरी लिहितां येत होतें कीं नाहीं शंका आहे.  पण मी मात्र हायस्कूलमध्ये पहिला नंबर होतों.  इतकेंच नव्हें तर माझ्या बहिणीही मुलींच्या शाळेंत लिहिणें, वाचणें, कशिदा काढणें वगैरे शिकत होत्या.  दारिद्र्यानें पाठ पुरविली, तरी आमच्या घराण्याचा रुबाब कांहीं कमी झाला नाहीं किंवा चालत असलेल्या धार्मिक व सामाजिक परंपरेंत खंड पडला नाहीं.  एकादशी, शिवरात्री, हरतालिका, गौरी-गणपति, रानसटवाई या क्षुद्र दैवतांचीही समजूत माझे आई व बाबा करावयास कधींच चुकले नाहींत.  मग नवरात्रांत समारंभ चुकत नसत हें सांगावयास नको.  या समारंभांत आमच्या घरचा पुरोहित तम्मणभट्ट डेंगरे, निदान त्याच्या घरचा कोणी लहान मुलगा का होईना, रोज पूजा सांगावयाला यावयाचाच !  नवरात्रांत नऊ दिवस तो रोज सकाळीं ११ वाजतां कांहीं मंत्र म्हणून जात असे.  तसेंच नऊ दिवस प्रत्येक रात्रीं मोठी पूजा होऊन थाटानें आरती होत असे.  मूठभर का होईना पुरण घालून आई नैवेद्याचे पांच कानोले करी.  ते आम्ही चार भावंडें पूजा आटपल्यानंतर भांडभांडून खात असूं.  भाद्रपदांतील गणेशचतुर्थीच्या उत्सवांतील गणपति पाण्यांत बुडविण्याचे वेळीं ब्राह्मण विहिरीपर्यंत आलाच पाहिजे.  दिपवाळींत एकाच पैशाच्या फटाकड्यां मी आणि माझी बहीण जनाक्का थांबून थांबून उडवीत असूं.  धाकटी तान्याक्का (मुक्ताबाई) नुसतें पाहूनच सुखी होई.  हीच आवृत्ति तुळशीचे लग्नाचे वेळीं !  आमची सांपत्तिक स्थिति बरी होती, तेव्हां भरपूर मिळालेली दक्षिणा आठवूनच, आमचे पुरोहितांनीं आपली सर्व परंपरा बिनतक्रार चालविली.  नागाचा उपास, हरतालिकेचा उपास, नवरात्राचा उपास असे नाना तर्‍हेचे उपास आई व बाबा करीत आणि आम्ही बोके त्यांच्या फराळावर हात मारून पुन्हां दुसरे दिवशीं पारण्याची वाट पाहात त्यांच्या अधीं ताटावर शेंडीला पीळ घालीत व लंगोटीचें शेपूट ओढीत बसलेले तयार !