येथवर माझ्या प्रचारकार्याचें स्थानिक आणि प्रांतिक स्वरूपाचें वर्णन केलें; पण प्रथम सांगितल्याप्रमाणें माझें लक्ष ब्राह्मधर्माच्या विश्वव्यापकत्वाकडे आणि त्या उच्च अधिष्ठानावरून ब्राह्मधर्माच्या भारतीय कार्याकडे नेहमीं लागून राहिलेलें असे. या धर्माचें मुख्य अंग ही धर्मपरिषद होती. सन १८८५ सालीं हिंदी राष्ट्रीय सभेचें पहिलें अधिवेशन मुंबई येथें भरलें. त्यांत न्या. मू. रानडे यांचा अप्रत्यक्ष पुढाकार होता. त्यांची बुद्धि अष्टपैलू, भावना उदार व उच्च प्रतीच्या होत्या. पुढील दोन अधिवेशनें कलकत्ता व मद्रास शहरीं झाल्यावर अलहाबादला चौथी बैठक भरली. आरंभापासूनच राजकारणास समाजसुधारणेचा बळकट पाठपुरावा होता. अर्थात् ह्या चौथ्या बैठकींत उदारधर्माचा पाठिंबा ह्या राष्ट्रीय चळवळीस मिळणें क्रमप्राप्तच होतें. एकेश्वरी बैठकीचे अध्यक्ष ना. मू. रानडे झाले. कळकत्त्याचे मिस्टर आणि मिसेस् आनंदमोहन बोस, लखनौचे बिपिनबिहारी बोस, बिहारचे बलदेव नारायण, लाहोरचे पं. शिवनारायण अग्निहोत्री यांनीं आपापल्या प्रांतांतील ब्राह्मसमाजाच्या कार्यासंबंधीं भाषणें केलीं. पुढें सालोसालीं राष्ट्रीय सभा जेथें जेथें भरेल तेथें तेथें त्या वेळीं ही धर्मपरिषदही भरविण्यांत यावी आणि पुढील वर्षाचे सेक्रेटरी म्हणून पं. शिवनाथशास्त्री यांना नेमावें, असा ठराव करण्यांत आला.
ब्राह्मसंघ : १८८९ सालीं मुंबईला ही परिषद मुं. प्रांतिक समाजांत भरली आणि त्या वेळीं प्रांतोप्रांतींच्या पुढार्यांनीं भाग घेतला. कलकत्त्याहून नवविधान समाजाचे प्रतापचंद्र मुझुमदारही हजर होते. तेव्हां Theistic Union (ब्राह्मसंघ) या नांवाची एक मध्यवर्ती संस्था स्थापून पुढील कार्याचा प्रयत्न करण्यांत यावा असें ठरलें. (१) ब्राह्मसमाजाच्या निरनिराळ्या पक्षांच्या एकत्र उपासना व संमेलनें व्हावींत. (२) प्रचारासाठीं एकत्र प्रयत्न व्हावा. (३) परोपकाराचें आणि भूतदयेचें काम एकत्र व्हावें वगैरे. नवीनचंद्र राय ह्यांना ह्या संघाचे सेक्रेटरी नेमलें. कलकत्त्यास साधारण ब्राह्मसमाज, नवविधान ब्राह्मसमाज व आदि ब्राह्मसमाज असे निरनिराळे पक्ष पडून ब्राह्मसमाजाच्या सामाईक कार्यांत फूट पडली होती. ह्या नवीन संघामुळें ही फूट भरून येण्याचा बराच संभव होता आणि त्यांत आम्ही मुंबईकडील पुढार्यांनींच न्या. मू. रानडे ह्यांच्या नेतृत्वाखालीं उचल खाल्ली असा तर्क करण्यास बरीच जागा आहे. कारण पुढील दोनतीन सालीं रानडे ह्यांनाच परिषदेचें अध्यक्षस्थान देण्यांत आलें होतें. चवथी बैठक नागपुरास १८८१ सालीं भरली. तेथें ब्राह्मसमाज नसल्यामुळें काम फारसें झालें नाहीं. पुढील सालाकरितां वामन आबाजी मोडक व पांडुरंग सदाशिव केळकर यांस सेक्रेटरी नेमण्यांत आलें. १८९४ सालीं मद्रासच्या बैठकीस डॉ. भांडारकर हे अध्यक्ष होते व पुढील सालीं म्हणजे १८९५ सालीं पुण्याच्या काँग्रेसचे वेळीं पुणें प्रार्थनामंदिरांत ही बैठक भरली. त्या वेळीं अमेरिकेचे युनिटेरियन धर्माचे प्रसिद्ध प्रचारक रेव्हरंड जे. टी. संडरलंड हे हजर होते. ह्यापुढें मधूनमधून १९०३ पर्यंत जरी ह्या परिषदेच्या बैठकी भरल्या तरी तिचें काम मंदावलें. ५ वी बैठक अलाहाबाद येथें भरली असतां मुंबईच्या सुबोध-पत्रिकेनें लिहिलें, ''अशा प्रांतिक बैठकींचें महत्त्व राष्ट्रीय सभेच्या धामधुमींत भरणार्या भारतीय अधिवेशनापेक्षांही किंबहुना अधिक आहे. कारण प्रांतिक बैठकीनें मिळविलेल्या माहितीवरून आणि अनुभवावरून राष्ट्रीय बैठकीचें काम अधिक पायाशुद्ध व पद्धतशीर होण्याचा संभव आहे.''
अशा मंदावलेल्या स्थितींत १९०३ च्या नाताळांत मद्रासेंत भरलेल्या अधिवेशनावरून ह्या परिषदेची झालेली विस्कळित स्थिति माझ्या मनांत भरली आणि पुढील सालीं मुंबईला भरणार्या राष्ट्रीय सभेच्या वेळीं धर्मपरिषद संघटित स्वरूपांत बोलावण्याचा मीं निश्चय केला, हें मीं सांगितलेंच आहे. त्याप्रमाणें हीं पुनर्घटित एकदोन अधिवेशनें सोडून कराचींत भरलेल्या १९१३ सालच्या अखेरच्या बैठकीपर्यंत या कार्याचा सर्व भार सेक्रेटरी या नात्यानें मीं माझ्यावरच घेतला.
पुढील कोष्टकावरून ह्या एकेश्वरी धर्मपरिषदेच्या कार्याचें नीट समालोचन करण्यास बरें पडेल.
तक्ता
(तक्ता पाहाण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबई : १९०३ सालच्या मद्रास-बंगालच्या सफरीवरून हिंदुस्थानांतील निरनिराळ्या ब्राह्मसमाजांची मला बरीच प्रत्यक्ष माहिती झाली होती. १९०४ सालीं मुंबईच्या परिषदेंत हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांतून पुष्कळसे प्रमुख पुढारी मुंबईस आल्यानें त्यांच्या समक्ष परिचयाची भर पडली आणि त्यांच्यावर ह्या नवीन संघटित परिषदेचा परिणाम घडला. मुंबई प्रार्थनासमाजांतील पुढार्यांनाही ह्या नवीन प्रयत्नांचें महत्त्व कळून चुकलें. कलकत्त्याच्या खालोखाल मुंबई प्रार्थनासमाजाचें महत्त्व असल्यानें येथील बैठक समाजाबाहेरील लोकांवरही परिणामकारी झाली. यंदाच्या सामाजिक परिषदेचें अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीरावमहाराजांनीं स्वीकारल्यामुळें तो एक नवीनच विशेष घडला. म्हणून धर्मपरिषदेंतही महाराजांनीं प्रत्यक्ष भाग घ्यावा ही कल्पना मला सुचली. स्वतः मी त्यांस आमंत्रण करण्यास गेलों हें वर आलेंच आहे. स्वागताध्यक्षाचें काम सर नारायण चंदावरकरांनीं आणि अध्यक्षाचें काम गुरुवर्य डॉ. भांडारकरांनीं केल्यामुळें ह्या अधिवेशनास अधिक रंग चढला. रात्रीच्या शाळांचा बक्षीससमारंभ झाला. त्यांत अध्यक्षस्थान पत्करून त्याच रात्रीं राममोहन आश्रमांत जें थाटाचें प्रीतिभोजन झालें त्यांतही महाराजांनीं प्रमुखपणें भाग घेतला. ह्या भोजनास मुंबईच्या आर्यसमाज आणि सामाजिक परिषदेचे प्रतिनिधि यांना आमंत्रण केलें होतें. आर्यसमाजाचे सेक्रेटरींनीं १५० सभासदांना घेऊन येण्याचें कबुलही केलें होतें. प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष दानशूर दामोदरदास सुकडवाला यांनीं भोजनाचा सर्व खर्च सोसण्याची जबाबदारी घेतली होती; पण मुंबई प्रा. समाजानें कांहीं मुसलमान गृहस्थांना प्रार्थनासमाजाची दीक्षा दिलेली होती, म्हणून आयत्या वेळीं आर्यसमाजिस्टांनीं भोजनाला हजर राहण्याचें टाळलें. कृतीची बाजू आल्यावर केवळ ध्येयवादावर आकांडतांडव करणारे हे वाचीवीर कशी बगल मारतात ह्याचें हें उदाहरण आहे. शिवाय तो काळ १९०५ सालचा होता. आर्यसमाजांत बहुतेक गुजराथ्यांचाच भरणा होता. कृतीच्या सुधारणेला गुजराथ प्रांत त्या काळीं तयार नव्हता त्याचें हें उदाहरण; पण महाराज श्रीमंत सयाजीराव यांनीं गुजराथ्यांना हे उदाहरण घालून दिलें ही गोष्ट मोठी संस्मरणीय झाली. परिषदेंत निरनिराळ्या ब्राह्मो पुढार्यांचीं भाषणें झालीं. तींही नमुनेदार होतीं. पुढील परिषद बनारस येथें काँग्रेस भरत असल्यानें तेथें भरविण्याचें ठरलें. तेव्हांपासून अशा परिषदांच्या जनरल सेक्रेटरीचें काम मींच पाहावें, असें सर्वानुमतें ठरविण्यांत आलें.
काशी : काशी येथें स्थानिक ब्राह्मसमाज नाहीं. गांव जुन्या मताचा व क्षेत्राचा असल्यामुळें तेथें स्वागतमंडळ स्थापणें फार जड गेलें; पण ह्या परिषदेचें महत्त्व प्रांतोप्रांतींच्या पुढार्यांना कळलें असल्यानें मीं त्यांना उद्देशून जें सर्क्युलर काढलें त्याला सर्वांकडून उत्तेजनपर उत्तरें व वर्गणीच्या रकमा आल्या. बांकीपूरचे गुरुदास चक्रवर्ती आणि कानपूरचे महेंद्रनाथ सरकार ह्या दोघां साधारण ब्राह्मसमाजाचे सभासदांनीं काशीला जाऊन परिषदेची पूर्वतयारी करण्याचे कामीं मला मोठी मदत केली.
तीन पक्ष : ब्राह्मसमाजाचे तीन पक्ष म्हणजे (१) राममोहन राय यांनीं स्थापलेला आणि देवेंद्रनाथांनीं चालविलेला आदि ब्राह्मसमाज, (२) त्यांतून फुटून निघालेला केशवचंद्र सेन यांचा नवविधान ब्राह्मसमाज आणि (३) त्यालाही विरोध करून विभक्त झालेला साधारण ब्राह्मसमाज. ह्या कलकत्त्यांतील तीन वेगळ्या शाखांचा बरावाईट परिणाम अखिल भारतांतील ब्राह्मसमाजावर आणि त्याच्या प्रसारावर काय घडला हें सांगण्याचें हें स्थळ नव्हे. मी तो परिणाम अभ्यासू या नात्यानें जाणून होतों; पण ह्या तेढीचें स्वरूप ह्या तिन्ही पक्षांचे लोक काशी येथील परिषदेंत हजर होते म्हणून मला प्रत्यक्ष दिसलें. इतकेंच नवहे पण पुढील कार्यांत तें पावलोपावलीं नडूं लागलें. अध्यक्षाची निवड करण्यांतच मोठी नड आली. परिषद कमिटीचे चेअरमन डॉ. भांडारकर व मुंबई समाजाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांना काशीस येणें जमलें नाहीं. वेळोवेळीं महाराष्ट्रीयांनीं पुढाकार घेणें हें इष्ट नव्हतें. काशी हें गांव बगालच्या सीमाप्रांतावर असल्यानें, पुढील अधिवेशन कलकत्त्यांत भरणार असल्यानें आणि उत्तरेकडील प्रांतांत बंगाली ब्राह्मणांचीच बहुसंख्या असल्यानें कलकत्त्यांतीलच कोणा तरी सर्वमान्य पुढार्याला अध्यक्षस्थानीं बसविणें इष्ट होतें. म्हणून पं. शिवनाथशास्त्री यांना अध्यक्षस्थान देण्यांत आलें आणि त्यांनीं अटकळीप्रमाणें काम देखील सुंदर रीतीनें केलें. परिषदेचें काम एखाद्या स्थानिक समाजाच्या वार्षिक उत्सवाप्रमाणें डिसें. २४ पासून ३१ पर्यंत मोठ्या सोहळ्यानें पार पडलें. उपासना, भजनें, व्याख्यानें, नामासंकीर्तनें आणि शेवटीं प्रीतिभोजन इत्यादि तपशिलांत कोठेंच व्यत्यय आला नाहीं. निरनिराळ्या प्रांतांतून सुमारें ७५ ठिकाणांहून ब्राह्मसमाजाचे प्रतिनिधि आले होते. लंडन ख्रिश्चन मिशनच्या प्रशस्त हायस्कुलाशिवाय काशी येथें दुसरीकडे कोठेंही जागा मिळाली नाहीं. दोन तीन वर्षांच्या अनुभवामुळें ह्या खंडवजा हिंदुस्थानांतील दूरदूरच्या ब्राह्मसमाजांची सर्व प्रकारची माहिती आणि त्यांची सूचि तयार करण्याची आवश्यकता मला भासूं लागली होती. ब्राह्मधर्मसूचिग्रंथ मींच तयार करून प्रसिद्ध करावा, असा एक ठराव परिषदेनें एकमतानें पास केला. हा एक ह्या परिषदेचा विशेष म्हणावयाचा. म्हणून परिषद संपल्यावर मीं बंगाल-बिहार-आसाम या प्रांतांतून एक मोठा विस्तृत दौरा काढला. बर्याच दृष्टींनीं हा दौरा महत्त्वाचा होता, म्हणून त्याचा तपशील खालीं देणें जरूर आहे.
ह्या परिषदेंत बंगाल्यांतील तीन्ही पक्षांची परस्पर सहानुभूति बरीच वाढली व शिवाय निरनिराळ्या प्रांतांतील ब्राह्मांचा स्नेह झाला. अशा हितकारक परिषदेची खबर अधिक पसरावी, मुं. प्रा. समाजासारख्या तिर्हाइताचे कामाची माहिती इकडल्या दूरदूरच्या समाजांस कळावी, (कारण प्रार्थनासमाज व आर्यसमाज ह्यांतील भेद न जाणणारे कांहीं ब्राह्मसमाजिस्ट इकडे भेटले.) कांहीं प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करून घ्यावी, मुख्य मुख्य स्थानिक समाज पाहावे वगैरे हेतू मनांत धरून मी ह्या सफरीवर निघालों.
बांकीपूर : बिहार प्रांताची राजधानी बांकीपूर येथें ता. २ जाने. १९०६ रोजीं आलों. हा देश जरी बिहारी (हिंदुस्थानी) लोकांचा असला तरी येथें बंगाली लोकांची बरीच वस्ती असून सार्वजनिक बाबतींत त्यांचाच पुढाकार व सुळसुळाट दिसला. वायव्येकडील प्रांतांत ज्याप्रमाणें एकही तद्देशीय ब्राह्म सांपडणें कठीण त्याप्रमाणें सबंध बिहार प्रांतांत बिहारी ब्राह्मांची एकाच बोटावर मोजण्याइतकी संख्या आहे. मुख्य ब्राह्मसमाज नवविधान मताचा आहे. भाई प्रकाशचंद्र राय हे त्याचे पुढारी. हे सर्वांशीं मिळूनमिसळून वागून सार्वजनिक कामांत पुढाकार घेणारे आहेत. राममोहन राय सेमिनरी ही साधारण ब्राह्मसमाजाची असून त्या शाळेंतच ह्या पक्षाच्या उपासनाही होतात. ता. ४ रोजीं राय यांचे घरीं मीं प्रमुख मंडळी जमवून प्रथम मुंबईकडची हकीकत सांगितली. उत्सवांत एकमेकांनीं मिळून कार्यक्रम ठरवावा, एकमेकांच्या उपासनेस पाळीपाळीनें जावें असें ठरलें. बॅ. दास यांचे घरीं ता.५ रोजीं दोन्ही पक्षांच्या स्त्रियांची सभा भरलीं. पोस्टल मिशन, डोमेस्टिक मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामें स्त्रियांनीं कशीं करावयाचीं हें मीं सांगितलें. सिल्हेटहून काशी परिषदेस आलेल्या सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्यांनीं हिंदींत भाषण केलें.
मोंघीर : ता. ६ रोजीं मोंघीर येथें आलों. हें रमणीय स्थान भागीरथीचे कांठीं आहे. पुराणांतील राजा दानशूर कर्ण ह्याची दान देण्याची जागा अद्यापि गंगेच्या तीरावर दाखवितात. ब्राह्म यात्रेकरूंस या स्थळाचें महत्त्व असें सांगण्यांत येतें कीं, ब्राह्मसमाजांत पुढें जो भक्तिसंप्रदाय सुरू झाला तो मूळ या ठिकाणीं. सन १८७२ सालीं हल्लीचें मंदिर बांधण्यांत आलें. या मंदिरांत एकदां कांहीं वैष्णव मंडळींस भजनास बोलविलें होतें. त्यांपैकीं एका चांडाळ जातीच्या भक्तानें इतकें सुश्राव्य व आवेशयुक्त भजन केलें कीं, त्याचा मंडळीवर विलक्षण परिणाम झाला. पुढें साधु अधीरनाथ ब्राह्मप्रचारक यांचें भजनाविषयीं प्रेम अधिकाधिक वाढून शेवटीं स्वतः केशवचंद्र सेन येथें असतां त्यांच्यावरही भजनाचा परिणाम घडला व येथील कार्य बरेंच वाढलें. तरी येथील हल्लींची ओसाड व दीनवाणी स्थिति पाहून माझें मन गहिंवरलें व मानवी मनाची अस्थिरता पाहून विस्मयलें. मंदिरापुढील पटांगणांत केशवचंद्र सेन, साधु अघोरनाथ व दीननाथ चक्रवर्ती यांच्या तीन समाधि मध्यभागीं एका चौथर्यावर बांधल्या आहेत. १९०२ सालीं या गांवीं आर्यसमाजाची स्थापना झाली; पण तोही नीट चालत नाहीं.
भागलपूर : भागलपूर येथें ता. ७ रोजीं पोंचलों. हा समाज ता. २२ फेब्रु. १८६४ रोजीं स्थापण्यांत आला. राजा शिवचंद्र बॅनर्जी नांवाच्या एका अत्यंत आस्थेवाईक हितचिंतकानें स्वतः सर्व खर्च सोसून मंदिर बांधविलें. केशवचंद्र सेन ह्यांच्या हस्तें हें मंदिर उघडण्यांत आलें. समाजांत थोडी का होईना, पण बडी बडी प्रमुख व वृद्ध मंडळी आहेत; पण उपासनेशिवाय कांहीं काम होत नाहीं. ता.९ रोजीं सुमारें ५।६ तरुण पदवीधर ब्राह्ममंडळींपुढें मुंबईच्या तरुण ब्राह्ममंडळाचे छापील नियम मीं वाचून दाखविले आणि तेथील पूर्वीची तरुण संस्था पुन्हां स्थापन करण्याचें ठरविलें. ह्यानंतर रात्रीं ७ वाजतां बाबू निवारणचंद्र मुकर्जी यांचे घरीं प्रमुख मंडळी जमली. मुंबईकडील समाजाचें तिर्हाईतपणाचें काम ऐकून त्यांना फार समाधान झालें. दोघांनीं तर वारंवार अशी इच्छा प्रगट केली कीं, मुंबई व बंगाल प्रांतांतील ब्राह्मांचे अधिक निकट संबंध जुळविणें फार इष्ट आहे व त्याकरितां परस्पर विवाहव्यवहार करणें अवश्य आहे. मीं म्हटलें कीं, निरनिराळ्या प्रांतांतील ऐपतदार ब्राह्मांनीं निरनिराळ्या प्रांतांत प्रवास केल्याशिवाय वरील व्यवहार कधींही शक्य होणार नाहीं.
काठीहार : हें रेल्वेचें एक मोठें जंक्शन आहे. बरीच चौकशी केल्यावर अर्धवट बांधलेल्या ब्राह्ममंदिराचा पत्ता लागला; पण येथें समाज नाहीं. दारें व खिडक्या नाहींत. नुसत्या भिंतीच पाहून हें मुक्तद्वार गौडबंगाल काय आहे याचा तपास करण्यासाठीं मी तेथेंच राहिलों. शेजारच्या एका मुसलमान गृहस्थानें सांगितलें कीं, या अर्धवट इमारतीचा क्वचित् प्रसंगीं अत्यंत खेदजनक दुरुपयोग होतो. १८८७ सालीं रेल्वेंतील ब्राह्म नोकरांच्या-विशेषतः जानकीनाथ गांगुली व रखलदर्श चतर्जी यांच्या-प्रयत्नानें येथें समाज स्थापन झाला. त्या वेळीं १० सभासद होते. १८९९ सालीं ही अर्धवट इमारत उभी राहिली; पण इतक्यांत येथील रेल्वे ऑफिस एकदम कलकत्त्यास गेल्यामुळें येथें एकही ब्राह्मो उरला नाहीं.
पूर्णिया : काठीहारपासून १८ मैलांवर पूर्णिया हें जिल्ह्याचें गांव आहे. येथें बाबू हजारीलाल हे आस्थेवाईक गृहस्थ होते. त्यांचेकडे गेलों. तेथें मला तारकनाथ राय नांवाचे गृहस्थ भेटले. ह्या दोघांना मीं काठीहारचें वर्तमान कळविलें. तेथील पूर्वीच्या फंडापैकीं २०० रु. अद्यापि शिल्लक आहेत, असें कळलें. काठीहर येथें मंदिर आहे, पण समाज नाहीं आणि पूर्णिया येथें समाज आहे, पण मंदिर नाहीं. पूर्णिया येथील आस्थेवाईक सभासदांस घेऊन काठीहार येथें पुन्हां गेलों. सायंकाळीं माझें हायस्कुलांत व्याख्यान झालें. तेथील मुख्य अधिकारी मुन्सफ एक उदार मताचे बॅरिस्टर मुसलमान होते. त्यांनीं आपल्या सहीच्या आमंत्रणचिठ्ठया लोकांना पाठविल्या व अध्यक्षस्थान पत्करलें. व्याख्यानानंतर बाबू हजारीलाल यांनीं येथील कांहीं मंडळींच्या सल्ल्यानें बाकी उरलेल्या शिलकेंतून मंदिर पुरें करून देण्याचें ठरविलें.
ह्या प्रकारें बिहार प्रांतांतील काम झाल्यावर मी श्रीगंगेच्या निरोप घेऊन तिचा पिता जो पर्वतराज हिमाचल त्याचे चरणांगुलीवर विराजमान झालेली वनश्रीची जणूं माहेरकडची सखी जी कुचबिहार नगरी तिच्यांत सायंकाळच्या शांत समयीं अत्यादरपूर्वक प्रवेश केला.
कुचबिहार : कुचबिहार संस्थानची हद्द भूतान संस्थानचे हद्दीस लागूनच आहे. येथील मूळचे रहिवासी जे अर्धवट जंगली लोक (कोल = कोळी) शेतकी करून आहेत, त्यांची सांपत्तिक हद्द कंगालपणाच्या सीमेला लागून आहे. ह्यांच्या चेहर्यांत आर्यांपेक्षां मोंगली साम्य अधिक दिसतें. कुचबिहारचें राजघराणें ह्याच जंगली जातीचें आहे. राजा, प्रजा व मानकरीमंडळ हे सर्व एकजात असून यांचे दरम्यानचा अधिकारीवर्ग मात्र कारकुनापासून तों थेट दिवाणापर्यंत बंगाली बाबूंचा आहे. मनुष्यस्वभावास अनुसरून यांचें एतद्देशीयांशीं अरेरावीचें वर्तन पाहून किंचित् कौतुकच वाटतें. उत्पन्नाचे मानानें हें संस्थान जवळजवळ कोल्हापूर संस्थानइतकें आहे; पण बंगाल्यांत हें पहिल्या प्रतीचें गणलें जाऊन शिवाय ब्रिटिश सरकारच्या मर्जीतलेंअसावें असें दिसतें. येथें एम.ए. पर्यंतचें पूर्ण दर्जाचें एक कॉलेज आहे. त्यांत सुमारें ३०० विद्यार्थी असून फी सपशेल माफ आहे. शिवाय एतद्देशीय विद्यार्थ्यांसाठीं फुकट बोर्डिंग आहे. सुधारणेचीं हीं थोडीं चिन्हें सोडून दिल्यास कुचबिहार नगरावर व तेथील अस्सल प्रजेवर अद्यापि हिमालयाचेंच पुरातन वन्य साम्राज्य चालू आहे. राजमहाल, चार बड्यां लोकांचीं घरें आणि कांहीं सरकारी इमारती सोडून दिल्यास बाकी सर्व लहानमोठ्यांची घरें म्हणजे अक्षरशः झोपड्यांच ! गांवाकडे नजर फेकल्यास असें वाटतें कीं, केळी व पोफळी यांच्या सुंदर बनांत एकान्त जागा पाहून आधुनिक सुधारणेच्या प्लेगला कंटाळून जणूं एक सेग्रिगेशन कँपच बांधला आहे. रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ह्या बांबूच्या झोपड्यां दरम्यान बरीच मोकळी जागा सोडून हारीनें बांधलेल्या दिसतात. प्रथम जमिनीवर सुमारें तीन फूट उंचीच्या खांबावर ओटा बांधून तक्तपोशी वेळूची, भिंती वेळूच्या, वरचें छत व छप्पर वेळूचें, आंतील सामान वेळूचें आणि बाहेरील भक्कम कंपाऊंडही वेळूचेंच ! याचीं कारणें पुष्कळ आहेत. एक तर लोक गरीब आणि अल्पसंतुष्ट, दुसरें, देश दलदलीचा, सर्द व अति पावसाचा, तिसरें, घरें बांधण्यास चिखल व दगड दोन्ही मिळत नाहींत. जमीन राखेच्या रंगाची, मऊ व बारीक रेतीची. तिच्या विटाही बनत नाहींत. बरें इतक्यालाही न जुमानतां आढ्यतेनें जर एखादें घर उभारलें, तर हिमालयबुवा वरचेवर भूकंपाचे धक्के देऊन जागे करण्यास तयार आहेतच. राजाचा सुमारें १३ लाखांचा सुंदर व भव्य प्रासाद व भोंवतालची विस्तीर्ण बाग पाहून प्रेक्षक बाहेर राजरस्त्यांत येतो, पण दुतर्फा सेग्रिगेशन कँप पाहून त्याचा बराच हिरमोड होतो.
ब्राह्मधर्माचा दिग्विजय करण्याकरितां जी प्रचारकसेनेची अभेद्य फळी उभारली होती तिची दुफळी केली ती याच कोपर्यांतल्या कुचबिहारनें. कुचबिहारांत साधारण ब्राह्मसमाजपक्षाचा आणि नवविधान पक्षाचा असे दोन समाज व त्यांचीं मंदिरें आहेत. साधारण पक्षाचे अध्यक्ष स्वतः दिवाण रायबहादूर कालिकादास दत्त होत. त्यांचे विचार पूर्णपणें उदार आहेत, पण त्यांची व्यवहारकुशलता त्याहूनही परिपूर्ण असल्यामुळें ते केवळ अध्यक्ष होण्यापुरते हितचिंतक आहेत. हा साधारण ब्राह्मसमाज विजयकृष्ण गोस्वामी यांनीं १८८४ सालीं स्थापन केला. १८९७ सालच्या भूकंपांत पूर्वीचें मंदिर पडल्यामुळें त्याच्याच पायावर हल्लींचें (१९०५) मंदिर नुकतेंच बांधलें आहे.
१८७८ सालीं केशवचंद्र सेन यांच्या ज्येष्ठ कन्येचा विवाह कुचबिहारचे राजे सर नृपेंद्रनारायण भूपबहादूर यांच्याशीं झाला. राजेसाहेब आणि राणीसाहेब यांना आपल्या नवविधान पक्षाचा निराळा समाज पाहिजे होता, म्हणून १५ ऑगस्ट १८८६ रोजीं येथील नवविधान समाज स्थापण्यांत आला. त्यापूर्व म्हणजे १८८४ सालींच केशवचंद्र सेन वारले होते. विवाहाचे वेळीं केशवचंद्रांच्या कन्येचें वय १४ वर्षांहून कमी होतें, म्हणून ब्राह्मसमाजांत दुफळी झाली हें सर्वश्रुतच आहे. हल्लीं या समाजाचे प्रमुख स्वतः राजेसाहेब आहेत; पण सर्व व्यवस्था राणीसाहेबांचे हातूनच होत असते. राजाचें कुटुंब धरून समाजांत एकंदर ११ अनुष्ठानिक कुटुंबें आहेत. त्यांत एकंदर ७० मुलेंमाणसें आहेत. शिवाय ४० हितचिंतक आहेत. समाजाच्या खर्चाकरितां सालिना ५००० रु. ची नेमणूक आहे. एक कायमचा मिशनरी व गायक यांचा खर्च त्यांतूनच होत असतो. अर्थातच समाजाचें एक सुंदरसें मंदिर आहे.
मंदिर : इतकें सुंदर ब्राह्ममंदिर निदान माझ्या तरी पाहण्यांत कुठें आलें नाहीं. डाक्का, कलकत्ता वगैरे ठिकाणीं यापेक्षां मोठमोठीं मंदिरें आहेत; पण तीं केवळ व्याख्यानमंदिरें. आत्म्याला जागृत करण्याकरितां त्यांत विशेष असा कांहं सात्त्विक भाव नाहीं, तो ह्या मंदिरांत भरपूर आहे. ह्या मंदिरांत रविवारीं सायंकाळीं उपासना झाली. ती फार गंभीर झाली. बराच धूप जळत असल्यानें चहूंकडे सात्त्विक गंध सुटला होता. नियमित वेळीं घंटानाद झाल्यावर नेमणुकीचे प्रचारक वेदीवर बसले. दुर्गानाथराय हे केशवचंद्रांच्या प्रिय शिष्यांपैकीं एक असून फार साधे व सात्त्विक दिसले. गायन सुस्वर व भजन प्रेमळ झालें.
माझ राहण्याची सुंदर सोय व थाटाचा पाहुणचार एका बोर्डिंगांत केला होता. ता.१३ रोजीं टाउन हॉलमध्यें Religion at the Basis of Life ह्यावर माझें इंग्रजींत व्याख्यान झालें. दिवाणसाहेब अध्यक्ष होते. कुचबिहार येथें दोन पक्षांचे समाज आहेत. एकाचे अध्यक्ष राजेसाहेब व व्यवस्थापक राणीसाहेब. शिवाय तत्त्वज्ञानाच्या अध्ययनाबद्दल सर्व बंगाल्यांत नांवाजलेले व्रजेंद्रनाथ झील हे कॉलेजचे ब्राह्म प्रिन्सिपॉल होते. मी तेथें असतांना तेथील कॉलेजकुमारांनीं दाखविलेली जिज्ञासा, तत्परता, सभा पुन्हां सुरू करण्याची उत्सुकता व त्यानंतर त्यांचीं आलेलीं पत्रें ह्या सर्वांवरून पाहतां कुचबिहार संस्थानांत एखादा ताज्या दमाचा प्रचारक पाठविल्यास पुष्कळ काम होण्यासारखें आहे; पण राजकारणामुळें तें होणार नाहीं ह्याचीही खात्री आहे. म्हणून मी दोन दिवसांतच कार्यक्रम आटोपून मुकाट्यानें १५ जानेवारी रोजीं ब्रह्मपुत्रेची वाट धरली.
डुब्री : ''ब्राह्मधर्माचा प्रचारक होण्यांत मला जी मान्यता व सुख वाटत आहे त्यापुढें राजसुखही तुच्छ होय'' हें वाक्य जेव्हां मीं बाबू उपेन्द्रनाथ बोस, डुब्री ब्राह्मसमाजाचे एक वजनदार पुरस्कर्ते, यांच्यापुढें उच्चारलें तेव्हां त्यांची मुद्रा संचित झाली. कोठें अरबी समुद्रावरील मुंबई बेट व कोठें आसाम प्रांतांतील हा डुब्री गांव ! पण ज्या सनातन ब्राह्म समाजाचा मी वार्ताहर होतों त्याचा शुभमहिमा असा आहे कीं, त्यायोगें ह्या विशाल भरतखंडांचींच नव्हेत तर ह्या विपुल पृथ्वीचींही दूरदूरचीं टोकें पवित्र प्रेमरज्जूनें एकत्र होणार आहेत व हल्लीं होतही आहेत. तथापि वरील उद्गार ह्या विशिष्ट प्रसंगीं निघण्याचें कारण हें केवळ अंतरीचें सुखच होतें, असें नव्हे तर त्यांत भोंवतालच्या शांत व गंभीर देखाव्यांची जबर भर पडली होती. ता. १५ जानेवारी रोजीं सायंकाळीं आगगाडींतून उतरल्यावर बाबूमजकुरांबरोबर मी ब्रह्मपुत्रेच्या उंच व विस्तीर्ण तीरावर फिरावयास निघालों. प्रथम एका अक्षरशः एकान्त व तटस्थ स्थळीं - जणुं प्रार्थनेंत मग्न झालेलें - ब्राह्ममंदिर पाहिलें. मंदिराच्या दाराशेजारींच एका गत ब्राह्मबंधूची सुंदर संगमरवरी समाधि पाहिली. ह्या बंधूच्या प्रार्थना फार प्रेमळ व तन्मय होत असत व अशीच एकदां प्रार्थना करीत असतांना तिच्या भरांत ह्यांचें देहावसान झालें. म्हणून त्या प्रसंगाच्या स्मारकार्थ समाजमंडळींनीं ही समाधि बांधली आहे, हें ऐकून व समाधि पाहून झाल्यावर मागें वळतों तोंच साक्षात् ब्रह्मपुत्रेनें मला आपलें विराट् दर्शन दिलें. ''मृत्योर्मा अमृतं गमय'' असें मनांत येतें न येतें तोंच अमृताची पताकाच माझ्यापुढें फडकुं लागली. हिमालयाच्या पलीकडे कैलास पर्वताच्या पूर्व पायथ्याशीं असलेल्या मानससरोवरांतून निघून पित्यांस प्रदक्षिणा घालून आलेली ही महाभाग ब्रह्मपुत्रा ! हिनें केवळ दर्शनहेळामात्रेंकरून किती दिवसांची वार्ता सांगितली ! किती काळाची साक्ष दिली ! डुब्री गांवच्या तिन्ही बाजूंनीं हिचा प्रवास असल्यानें हा गांव तिनें खांकेंत कवटाळून धरल्यासारखा दिसतो. महासागरास पाहून ईश्वराच्या अनंत स्वरूपाची व गंभीरतेची थोडी कल्पना येते खरी; पण अशा महानदीच्या विभूति पाहिल्याशिवाय ईश्वराचें कार्य व संसाराची प्रगति याविषयींची प्रत्यक्षता ध्यानांत येण्यासारखी नाहीं. अस्तमान झपाट्यानें होऊं लागला. सर्व दृश्य जगावर रात्रीचा अभेद्य पडदा पडूं लागला. मातीच्या डोळ्याला जसजसें कमी दिसूं लागलें तसतसें स्मृतीच्या डोळ्यांस अधिकाधिक दूरदूरचा प्रदेश दिसूं लागला. किती देश, किती भाषा ! किती जाती, किती रीति ! पण सद्धर्माची किंचित् आंच लागल्याबरोबर हे सर्व भेद विरघळून जाऊन एकत्र प्रेमरस कसा पाझरतो ! धर्माची पताका धारण करून निघालों म्हणजे किती पाहुणचार ! किती आदर ! किती कळकळ ! हीं जणुं आपला शोध काढीत येतात आणि मग आलेल्या वाटेनें आपल्या मागें हें प्रेमसुताचें जाळें किती फैलावलेलें दिसतें ! तशीच पुढील खांचखळग्यांची दिसणारी वाट जसजशी पायांखालीं येते तसतशी कशी सपाट होते - आजच्या चिंताच उद्यांच्या आनंदास कशा कारणीभूत होतात - काल भोगलेले क्षणिक शारीरिक कष्ट आज कसे अक्षय्य मानसिक सुख देतात - या प्रकारें आंतील मानससरोवरांतून निघणार्या या स्मृतिनदाचे सुखदायी तरंग बाहेरील ब्रह्मपुत्रा दिसेनाशी झाली तरी एकावर एक स्वप्नवेगानें सुटूं लागले असतां वरील धन्यतेचे उद्गार माझे तोंडून निघाले यांत काय नवल !
हा गांव लहान व येथील समाजही अगदींच लहान होता. तरी समाजांतील मंडळींची जूट व एकमेकांविषयींची कळकळ पाहून संतोष झाला. विशेषेंकरून स्त्रियांमध्यें उपासनेविषयीं अत्यंत आतुरता दिसली. त्याच रात्रीं मी घरीं परत येऊन पोशाख बदलून प्रार्थनेला गेलों तों स्त्रिया आधींच येऊन पडद्याआड बसल्या होत्या. बहुतेक सर्व उपासना त्यांच्यासाठीं हिंदी भाषेंत करणें भाग पडलें. दुसरे दिवशीं सायंकाळीं समाजांत Some Ideals for Modern India ह्यावर माझें इंग्रजींत व्याख्यान झालें. ता.१७ रोजीं सकाळीं तरुणांसाठीं शाळेंत व्याख्यान झालें. ता. १७ रोजीं तेथून निघून नदीवरून आगबोटीनें जगन्नाथगंज येथें गेलों. ता. १८ रोजीं मैमनसिंग येथें पोंचलों.
मैमनसिंग : येथें दोन्ही पक्षांचे दोन समाज आहेत. बाबू ईशानचंद्र विश्वास हे गृहस्थ कलकत्त्याहून येथें येऊन त्यांनीं १८५५ चे सुमारास ब्राह्मसमाजाची स्थापना केली. नंतर डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वडील भगवानचंद्र येथें आल्यापासून ह्या समाजाची भरभराट झाली. तथापि गांवांत ह्यांना फार हाल काढावे लागले सबंध गांव येथील जमीनदाराचे ताब्यांत असल्यामुळें आणि तो विरुद्ध असल्यानें मंदिराकरितां जागाच मिळेना. प्रथम मंदिर १८६७ मध्यें बांधलें; पण तें १८८६ च्या भूकंपांत पडलें, म्हणून पुन्हां बांधण्यांत आलें. ह्यापूर्वीच कुचबिहारच्या लग्नामुळें झालेल्या दुफळीमुळें ह्या समाजमंदिराच्या मालकीसंबंधीं तंटा होऊन विघ्नें उपस्थित झालीं. १८९७ सालच्या भूकंपांत हें मंदिरही पडलें. ह्याच भूकंपांत पूर्वी ज्या जमीनदारानें विरोध केला त्याचाही वाडा जमीनदोस्त झाला. हल्लीं (१९०५) जें मंदिर बांधलें आहे त्याचे उंच व नकशीचे भारी दरवाजे, तुळ्या व इतर संगमरवरी दगडाचें सामान ज्याच्याकडून पूर्वी जागाही मिळाली नाहीं त्याच जमीनदाराकडून मिळालें आहे. समाजाला त्याची बरीच सहानुभूति आहे. नवविधान समाजांत एकंदर बायकामुलें मिळून २६ व साधारण समाजांत ७८ मंडळी आहेत. साधारण समाजाचे आचार्य श्रीनाथ चंदा यांनीं गांवाबाहेर बरीच जागा घेऊन तेथें ब्राह्म लोकांचें एक स्वतंत्र खेडें वसविलें आहे. नित्याचा कार्यक्रम आटोपून मी मैमनसिंगहून डाक्काच्या वाटेवर कौरेड नांवाच्या एका लहानशा खेडेगांवीं गेलों. हें खेडें नामदार के. जी. गुप्त यांच्या मालकीचें आहे. शेतांत साहेबमजकुरांचें घर नदीचे कांठीं आहे. बाबू कालीनाथ गुप्त हे त्या कमिशनरांचे वडील असून भाविकपणाबद्दल सर्व ब्राह्मसमाजांत प्रसिद्ध आहेत. हें एकान्तस्थळ त्यांच्या आवडीचें आहे. कोणी अतिथि आल्यास त्याची सोय नेमलेलीं नोकरमाणसें मोठ्या आदरानें करीत असतात; पण येथें समाज नाहीं. येथें एक दिवस एकान्त व आत्मसमाधान भोगून मी ता. २१ रोजीं पूर्व बंगालची राजधानी डाक्का येथें गेलों.
डाक्का : येथील समाज कलकत्ता समाजाच्या खालोखाल महत्त्वाचा आहे. या सफरीच्या प्रवासाचा ताण मजवर इतका पडला कीं, त्यामुळें माझी तब्येत किंचित् ढासळली होती. मद्रासच्या सफरींत अन्नांतील तिखटामुळें जसा परिणाम झाला होता तसाच उलट बाजूनें बंगालचे भोजनांत गोड फार असल्यामुळें व त्यांतील मोहरीच्या तेलाचा मला अत्यंत वीट आल्यामुळें प्रकृतीवर फार वाईट परिणाम झाला होता. डाक्का समाजांत माघोत्सवाचा समारंभ चालू होता. मँचेस्टर कॉलेजमधून उच्च धर्मशिक्षण घेऊन परत आलेला मी म्हणून माझ्या व्याख्यानाला अलोट गर्दी जमली होती. मी इंग्रजींत बोलावयास उठलों. १०।५ मिनिटें बोललों नाहीं तोंच भोंवळ येऊन मी खुर्चीत गळून पडलों. सभेचा मोठा विरस झाला. मला उचलून घरीं पोंचविण्यांत आलें. एकदोन दिवस विश्रांति घेतल्यावर ब्रह्मपुत्रा नदीवरील बोटीनें प्रवास करून बंगालच्या उपसागरावरील बारिसाल या जिल्ह्याच्या गांवीं मी पोंचलों. या जलप्रवासानें प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. बारिसालमधील माझें व्याख्यान फार परिणामकारक झालें; पण व्याख्यान आटोपून मी खालीं उतरतों तोंच माझ्या हातांत चौथ्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे एक तांतडीची तार देण्यांत आली. मुंबई येथें माझी पत्नी फार आजारी असल्यामुळें व अहमदनगर येथें माझी बहिण चंद्राक्का आसन्नमरण झाल्यामुळें मला मुंबईस परतावें लागलें.
कलकत्ता : १९०६ सालच्या नाताळांत या परिषदेची कलकत्ता येथें मोठ्या थाटानें बैठक झाली. सर नारायण चंदावरकर यांनीं के. नटराजन, बंडोपंत भाजेकर यांना आणि मला आपल्याबरोबर कलकत्त्यास नेलें. कोकोनाडाचे डॉ. व्यंकटरत्नम् नायडू यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें. ब्रिटिश ऍंड फॉरेन असोसिएशनचे एक प्रतिनिधी मि. जी. ब्राउन हेही हजर होते. सुरुवातीची उपासना सिटी कॉलेजचे वृद्ध प्रिन्सिपॉल बाबू उमेशचंद्र यांनीं चालविली. केशवचंद्र सेनचे शिष्य प्रसिद्ध गायक त्रैलोक्यनाथ संन्याल यांचें भजन झालें. या अधिवेशनाच्या सर्व सभा ब्राह्मसमाजाच्या सिटी कॉलेजच्या हॉलमध्यें यशस्वी रीतीनें पार पडल्या.
या वेळीं मी माझे मित्र प्रसिद्ध बिपिनचंद्र पाल यांचे घरीं उतरलों होतों. हे मँचेस्टर कॉलेजमधून ब्राह्मप्रचारक झाले होते; पण स्वदेशीं येतांच ते राजकारणाकडे वळले. तरी देखील ब्राह्मसमाजाच्या कार्यांत ते अत्यंत सहानुभूतीनें भाग घेत होते. ह्या वेळीं कलकत्त्याच्या समाजांत एका महत्त्वाच्या प्रश्नावर मोठा वाद माजला होता. तो विषय म्हणजे ब्राह्मसमाजांतील तरुणांनीं रंगभूमीवर नाटकांतील कामें करावींत किंवा नाहीं हा होय. ब्राह्मसमाजांतील६ तिन्ही पक्षांतील सर्व वृक्ष मंडळी- विशेषतः कृष्णकुमार मित्र आणि हेरंबचंद्र मैत्र - यांचा या कामीं फार विरोध होता. पण प्रसिद्ध कलाप्रिय रवींद्रनाथ टागोर हे या कामीं फार अनुकूल होते. बहुतेक सारा तरुणवर्ग त्यांच्याच मताचा होता. डॉ. रवींद्रनाथ टागोर यांना साधारण ब्राह्मसमाजाचे सन्मान्य सभासद करावें असा आग्रह तरुणांनीं घेतला. वृद्धांना याची फार चीड आली. बिपिनचंद्र पाल हे टागोर यांच्या मताचेच होते. त्यांच्याकडूनच मला ह्या रणसंग्रामाची बरीच हकीकत कळली. पुढें बरींच वर्षे हा तंटा विकोपाला गेला. अखेरीस रवींद्रबाबूंचाच जय झाला. १९११ सालीं ब्राह्मसमाजाच्या माघोत्सवांत रविवारच्या नीतिशाळेचा जो बक्षीससमारंभ झाला त्या वेळीं तरुण मुलांमुलींनीं एक सुंदर नाट्यप्रयोग केला. पण तो पाहण्यास वृद्धांचीच अधिक गर्दी जमली होती. पुढें पुढें तर रवींद्रनाथ टागोर हे माघोत्सवाच्या वेळीं आपल्या घरीं आपल्या लेकी, सुना व नातवंडें यांना घेऊन आपण लिहिलेल्या नाटकांचे प्रयोग जाहीरपणें करून दाखवीत. १९२३ च्या सुमारास मी कलकत्त्यास गेलों असतां रवींद्रनाथ टागोर यांना साधारण ब्राह्मसमाजानं आपल्या वेदीवरून उपासना करण्यास बोलावलें. त्या वेळीं मी हजर होतों. तरुणवर्गाचा हा मोठा विजय; पण वृद्ध हेरंबचंद्रबाबूंना हा शेवटपर्यंत कधींच खपला नाहीं. त्यांचीच एक चमत्कारिक गोष्ट सांगतात कीं, बाबूमहाशय एकदां रस्त्यानें जात असतां त्यांच्याजवळ एक तरुण विद्यार्थी येऊन त्यानें ''अमुक एक नाटकगृह कोठें आहे ?'' असें विचारलें. बाबूजींना अत्यंत संताप आला. ''मला ठाऊक नाहीं जा !'' असें रागारागानें सांगून त्यांनीं त्याला झिडकारलें. विद्यार्थी गेला; पण बाबूजींना आपण खोटें बोललों याचा पश्चात्ताप झाला व त्यांनीं त्या विद्यार्थ्यास परत बोलावलें. ''अरे, मला ठाऊक आहे. पण मी सांगत नाहीं जा !'' असे म्हणून त्यांनीं त्यास पुन्हां झिडकारलें.
सुरत : १९०७ च्या नाताळांत सुरतेस या परिषदेची बैठक झाली. रवीन्द्रनाथ टागोरांचे वडील बंधु व हिंदुस्थानांतील पहिले आय. सी. एस. सत्येन्द्रनाथ टागोर हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते. अहमदाबाद समाजाचे अध्यक्ष लालशंकर उमियाशंकर यांनीं स्वागतमंडळाचे अध्यक्ष या नात्यानें प्रतिनिधींचे स्वागत केलें. सुरतेस समाज नसतांही ही बैठक समाधानकारक रीतीनें येथील टाउन हॉलमध्यें पार पडली. पहिली उपासना मुंबई समाजाचे स्वामी स्वात्मानंदजी यांनीं हिंदींत चालविली. जाहीर सभेंत डॉ. भांडारकर, गुजराथचे प्रसिद्ध कवि नानालाल, लाहोरचे प्रो. रुचिराम सहानी यांची भाषणें झालीं. ठरावाचे वेळीं ह्या परिषदेचे मार्फत लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार यांचे नेतृत्वाखालीं दुष्काळनिवारणाचे कामीं घटना व्हावी. असा एक विशिष्ट ठराव पास करण्यांत आला.
राष्ट्रीय सभेचा मात्र या वेळेस फार गोंधळ उडाला. ही सभा आजपर्यंत मवाळांच्या हातांत होती. लोकमान्य टिळकांनीं ती ह्या वर्षी उधळून लावली व पुढें कित्येक वर्षे तिला आपल्या मुठींत ठेवलें. गेल्या वर्षी मुंबईंत स्थापन झालेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनची एक जाहीर सभा ह्याच वेळीं झाली.
मद्रास : १९०८ च्या नाताळांत मद्रास शहरीं ही परिषद भरली. मी मद्रासला निघालों. त्या वेळीं माझी प्रकृति किंचित् नादुरुस्त होती; म्हणून बंगलोरपर्यंत मीं सेकंड क्लासमधून प्रवास केला. वेळ नाताळची असल्यामुळें व्यापारी वगैरे मंडळींची डब्यांत बरीच गर्दी होती. गुंटकल स्टेशनवर तार करण्यासाठीं मी खालीं उतरून परत येऊन पाहतों तों तीन आडदांड युरोपियन गृहस्थ माझ्या डब्यांत बसले होते व बाकीची सारी हिंदी मंडळी उतरून दुसरीकडे गेली होती. माझें सामान एकीकडे ठेवण्यांत आलें होतें. मी माझ्या जागेवर जाऊन बसलों व तेथून कांहीं हाललों नाहीं. उतरून गेलेल्या मंडळींत एक मोंगलाईंतला मुसलमान आडमुठ्या अधिकारी होता. मी बसलेला पाहून थोडेंसें धैर्य आल्यामुळें उतरून गेलेले व्यापारी परत येऊन बसले. युरोपियनांनीं मला कोणताही त्रास दिला नाहीं. बियर पिणें, चिरूट ओढणें आणि पते खेळणें ह्यांतच ते गुंग झाले होते; पण ह्या पुन्हां आलेल्या कानडी अप्पांनीं त्यांच्या खेळण्यांत मुद्दामच लक्ष घालून फाजील आगंतुकपणा दाखविल्यानें तो असह्य होऊन त्या युरोपियनांना फार चीड आली. त्यांचें इंग्रजी व ह्यांचें कानडी परस्परांस न कळल्यानें प्रकरण अधिक विकापास जाऊं नये म्हणून मला मध्यस्थी करणें भाग पडलें. प्रसंगविशेषीं आम्हां कांहीं एतद्देशीयांना आपला आब राखून घेतां येत नाहीं, म्हणून असले खटके उडतात.
लाहोरचे अविनाथचंद्र मुझुमदार हे या परिषदेचे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष मंगळूर समाजाचे अध्यक्ष उल्लाल रघुनाथय्या यांनीं सुंदर भाषण केलें. ही जाहीर बैठक Anderson Memorial Hall मध्यें झाली. सरोजिनी नायडू, अहमदाबादचे रमणभाई नीलकंठ, लाहोरचे धर्मदास सुरी यांचीं व माझीं जाहीर भाषणें झालीं. ब्रिटिश ऍंड फॉरेन असोसिएशनचे प्रतिनिधि प्रो. टी. डेव्हिस हे कोलंबोहून मुद्दाम आले होते. डिप्रेस्ड् क्लासेस मिशनची जाहीर सभा ३० डिसेंबर रोजीं करविण्यांत आली. त्या वेळीं रा. ब. एम. आदिनारायणय्या यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें. परिषदेंतील मुख्य प्रवचन करण्याचें काम मजकडे होतें. परिषदेच्या खर्चाप्रीत्यर्थ ब्राह्मसमाजाचे प्रसिद्ध हितचिंतक मीठापूरचे महाराज यांनीं ५०० रु. दिल्यामुळें परिषदेच्या यशांत भर पडली. याच वेळीं डि. क्ला. मिशनची मद्रास शाखा उघडण्यांत आली. तिचेसाठीं मला ५।६ दिवस मद्रासेंत राहावें लागलें. त्यानंतर कोइमतूर, कालिकत, फ्रेंचांचा गांव माही, कानानारे, या गांवीं भेट देऊन व शेवटीं मंगलोर येथें दोन तीन दिवस थांबून मी मुंबईस परतलों.
लाहोर : १९०९ सालीं लाहोर येथें ही परिषद झाली. या परिषदेचे जोड-सेक्रेटरी अविनाशचंद्र मुझुमदार यांनीं परिश्रम घेऊन स्वागताची जंगी तयारी ठेवली होती. कलकत्त्याचे विनयेंद्रनाथ सेन ह्यांचें अध्यक्षीय भाषण फारच परिणामकारक झालें. पंजाब येथील तिन्ही पक्षांच्या ब्राह्मसमाजिस्टांनीं मिळूनमिसळून काम केलें. या परिषदेंतील एक विशेष म्हणजे बडोद्याचे श्रीमंत सयाजीरावमहाराज यांनीं आपल्या संस्थानांतल्या विद्वान् माणसांना प्रतिनिधि म्हणून लाहोरास पाठविलें होतें. परिषदेचें काम पाहून त्यांना आनंद झाला आणि उदार धर्माच्या कार्याचें महत्त्व कळलें. मुंबईचें गिरिजाशंकर त्रिवेदी हे लाहोरास जातांना व परत येतांना माझ्याबरोबर प्रवास करीत होते. जातांना वाटेंत अहमदाबाद, पालनपूर, जयपूर, आग्रा, मथुरा, वृंदावन आणि दिल्ली हीं शहरें आम्हीं उतरून बारकाईनें पाहिलीं. परिषद आटोपल्यावर अमृतसर येथें जाऊन शिखांचें सुवर्णमंदिर पाहिलें. ह्या वेळीं कांहीं कारणांवरून पंजाबांतील आर्य समाजावर पतियाळाच्या संस्थानाधिपतींचा फार रोश झाला होता. लाला मुन्शीराम, कुटीलस्वामी श्रद्धानंद यांचेवर ह्या रोषाचा घाला पडला होता. पतियाळाच्या आर्यसमाजमंदिराचें रूपांतर संस्थानच्या घोडशाळेंत करण्यांत आलें होतें. लालाजींना आम्ही भेटण्यास गेलों, तेव्हां ते खिन्न मुद्रेनें पण उदात्त वृत्तीनें या शाळेंत बसलेले दिसले. सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्या ब्राह्मभगिनीकडे आम्ही एक दिवस उतरलों. उपासना वगैरे आटोपून आम्ही निघालों. परत येतांना अजमीरजवळील अबूच्या पहाडांत आम्हीं दोन दिवस धर्मचिंतनांत घालविले. तेथील सुप्रसिद्ध जैनमंदिर, दिलवारा आणि प्रेक्षणीय स्थळें पाहिलीं. ह्या मंदिराचें सर्व काम संगमवरी दगडाचें असून तेथें कलाकुसरीची इतकी कमाल झाली आहे कीं, तशी सुबकता व नाजुकता जगांत इतरत्र क्वचितच आढळेल. मोंगलांच्या तडाक्यांतून हें रत्न कसें वांचलें याचें आम्हांला मोठें आश्चर्य वाटलें. हें स्थळ इतकें अपूर्व असून त्या मानानें त्याची प्रसिद्धि कां नाहीं याचें अधिक आश्चर्य वाटलें. कदाचित् अप्रसिद्धपणामुळेंच हें स्थळ सुरक्षित राहिलें असेल अशी भोळी समजूत आम्हीं करून घेतली.
मातोश्रीचा अंत : ह्या प्रवासास निघण्यापूर्वी माझी वृद्ध मातोश्री कॅन्सरच्या व्यथेनें अत्यवस्थ होती. तिला सोडून मला प्रवासास निघवेना आणि गेल्याशिवाय राहवेना असा पेंच पडला; पण मातोश्रींनीं मला धीर दिला. त्यांनीं मला जावयास अनुज्ञा दिली आणि ''तूंपरत येईपर्यंत मीं तुला सोडून जात नाहीं'' असें आश्वासनही दिलें. हा जुन्या माणसांचा करारीपणा ! मी परत आल्यावर ता. ८ फेब्रुवारी १९१० रोजीं माझ्या प्रेमळ मातोरी सुमारें ७० वर्षांच्या होऊन निवर्तल्या.
ह्या परिषदेचा अहवाल प्रसिद्ध करतांना मुंबईंतील सुबोधपत्रिकेंत खालील अर्थाचा मजकूर आहे :-
परिषदेचे जनरल सेक्रेटरी रा. वि. रा. शिंदे यांनीं परिषदेपुढें आपल्या प्रास्ताविक भाषणांत सांगितलें कीं, १९०३ सालीं भरलेल्या मद्रासच्या बैठकींत या परिषदेची मंदावलेली स्थिति पाहून १९०४ सालीं मुंबईच्या बैठकींत हिची पुनर्घटना करण्यांत आली. तेव्हांपासून मुंबई, काशी, कलकत्ता, सुरत, मद्रास आणि लाहोर या सहा ठिकाणीं परिषद भरल्यामुळें तिंची भरतखंडांत एक फेरी संपूर्ण झाली असून तिच्या विकासाचा एक टप्पा संपला आहे. म्हणजे ब्राह्मसमाजाच्या सामान्य गरजा निरनिराळ्या प्रातिक पुढार्यांच्या द्वारं एकमेकांस कळून चुकल्या आहेत. ह्यापुढें ह्या परिषदेची अधिक पद्धतशीर घटना व्हावी, मध्यवर्ती कचेरी, निधि आणि वाहून घेतलेले कार्यवाहक नेमून त्यांच्या द्वारें वेळोवेळीं करण्यांत आलेल्या ठरावांची अंमलबजावणी व्हावी, अशी कळकळीची विनंती रा. शिंदे यांनीं केली. ह्यावर पुढें दोन तास कडाक्याचा वाद होऊन शेवटीं परिषदेला अद्याप अशी घटनेची वेळ आली नाहीं, असें बहुमतानें ठरलें. या निराशेचें कारण कलकत्त्यांतील ब्राह्मसमाजाच्या शाखांचीं मनें अद्यापि परस्परांविषयीं कलुषित राहिल्यामुळें एकत्र कार्य कारणें अशक्य होतें.
अलाहाबाद : १९१० सालीं ही परिषद अलाहाबाद येथें भरली. तेथें पूर्वी एक ब्राह्मसमाज होता; पण अलीकडे तो बंद पडला होता. लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार या प्रांतांतील माहितगार होते, म्हणून त्यांना माझ्या जोडीला सेक्रेटरी म्हणून नेमण्यांत आलें होतें. परिषदेच्या पूर्वी तीन आठवडे जाऊन त्यांनीं पूर्वतयारी चालविली. जागा मिळण्यास कठीण जाऊं लागलें. कर्नलगंज बंगाली स्कूलच्या अधिकार्याला त्यांच्या शाळेला २०० रुपयांची मदत देऊन परिषदेसाठीं तेथें जागा मिळविली. अध्यक्ष कोणास नेमावें हाही प्रश्न बिकट झाला. शेवटीं पं. शिवनाथशास्त्री यांनीं कबूल केल्यावर हा प्रश्न सुटला.
मी तेथें एक आठवड्यांपूर्वी गेलों. प्रत्येक परिषदेपूर्वी सर्व ब्राह्म आणि प्रार्थनासमाजांना सर्क्युलर काढून खर्चाची तरतूद करणें हें माझें काम असे. केव्हां पुरेसे पैसे मिळत आणि केव्हां मिळतही नसत. माझ्या प्रवासखर्चाची ही नेहमींची रड असे. एकच महिन्यापूर्वी (नोव्हेंबर १९११ मध्यें) मुंबई प्रार्थनासमाजाशीं प्रचारक या नात्यानें मीं संबंध सोडला होता. अर्थात् प्रवासखर्चाचाच नव्हे तर घरखर्चाचाही प्रश्न मजपुढें आ पसरून उभा होता. नाताळचे थंडीचे दिवस, आगगाडींतून भयंकर गर्दी, थर्ड क्लासची दगदग, अशा स्थितींत मध्यरात्रीं मी अलाहाबादेस उतरलों. प्रो. बाबू रामानंद चतर्जी यांचेकडे मी उतरणार होतों; पण गाडीवाल्याला तें ठिकाण माहीत नव्हतें तास दोन तास अपरात्रीं इकडे तिकडे भटकल्यावर नाइलाज म्हणून त्यानें शेवटीं म्युइर कॉलेजच्या विस्तीर्ण पटांगणांत माझें सामान टाकलें व तो निघून गेला. बशी भयंकर पडली होती. सामानाला डोकें टेकून त्या माळरानावर ती रात्र मीं कशीथंडी मोठ्या कष्टानें काढली. माझ्या प्रवासांत हे सोहाळे नित्याचेच असत. कलकत्त्याचे बाबू हेमचंद्र सरकार ह्या परिषदेला हजर होते. ह्या परिषदेचें विशेष काम म्हणजे परिषदेच्या संघटनेचा खलिता तयार करून मंजूर करून घेणें. हा मसुदा तयार करण्यासाठीं हेमचंद्र सरकार, नृत्यगोपाळ राय, लाहोरचे लाला रघुनाथ सहाई आणि मी स्वतः यांची एक पोटसमिति नेमण्यांत आली होती. खलित्यांत पुढील मुद्दे होते : (१) नांव थिइस्टिक कॉन्फरन्स असें असावें. (२) उद्देश एकेश्वरी धर्माचा प्रसार. (३) एकेश्वरी धर्माचे कोणीही अनुयायी, रीतसर निवडून आलेले, हे सभासद. (४) परिषदेचा तत्कालीन अध्यक्ष, चार सभासद, एक किंवा दोन सेक्रेटरी यांची स्टँडिंग कमिटी. या सर्वांची निवडणूक दरवर्षी परिषदेंत होणें. वर्षभर काम करून शेवटीं अहवाल सादर करणें. (५) ठरावांचा अंमल करणें वगैरे स्टँडिंग कमिटीचीं कामें. (६) परिषदेच्या ठिकाणीं स्थानिक सभासदांची स्वागत कमिटी नेमून आपले अवश्य ते अधिकार स्टँडिंग कमिटीनें या कमिटीस तात्पुरते देणें. या नियमांत बदल करावयाचा असल्यास परिषदेच्या उघड्यां जाहीर सभेंत दोनतृतीयांश सभासदांच्या अनुमतीची जरुरी.
लवकर एकमत होईना, म्हणून अध्यक्षानें हा खलिता निरनिराळ्या ब्राह्म आणि प्रार्थना समाजांच्या अभिप्रायासाठीं सर्व देशभर फिरविण्यांत यावा आणि कलकत्त्यांत पुढच्या वषाअच्या परिषदेंत हें सर्व प्रकरण सादर करावें, असा ठराव मांडल्यावर तो पास झाला. प्रचाराचें काम चोहींकडे फार अव्यवस्थित रीतीनें चाललें होतें, पण तत्कालीन प्रचारक आपापलीं कामें सोडून बाहेरगांवीं फारसा संचार करीत नसत. म्हणून मीं एक ठराव आणला कीं, देशांतील मुख्य मुख्य ब्राह्मसमाजांनीं आपापल्या प्रचारकांना निवडक प्रांतांतून निदान तीन महिने तरी संचारास पाठवावें. अर्थात् बंगाल्यांनीं हा ठराव हाणून पाडला. एकत्र काम करा म्हटलें कीं त्यांचा मस्तकशूळ उठत असे. मीं दुसरा ठराव बहुजनसमाजांत ब्राह्मधर्माचा प्रचार करावा हा आणल्याबरोबर मात्र तत्काळ एकमत झालें कारण ठरावच तसा मोघम होता. हेमचंद्र सरकारनें ठराव आणला कीं, सन १८७२ चा तिसरा कायदा मिश्रविवाहासंबंधीं होता, तो सुधारावा. कलकत्त्यांतील ब्राह्मसमाज कमिटीनें या बाबतींत काय प्रयत्न केले ह्याची हकीकत त्यांनीं सांगितली. ठराव एकमतानें पास झाला. पुढील सालाकरितां वि. रा. शिंदे, बाबू अविनाशचंद्र मुझुमदार, विनयेंद्रनाथ सेन, व्यंकटरत्नम् नायडू, गुरुदास चक्रवर्ती आणि नृत्यगोपाळ राय ह्यांची स्टँडिंग कमिटी नेमण्यांत आली. हेमचंद्र सरकार ह्यांना जनरल सेक्रेटरी नेमण्यांत आलें.
कलकत्ता : १९११ च्या नाताळांत कलकत्त्यास सिटी कॉलेजमध्यें ही परिषद भरली. मंगळूर ब्राह्मसमाजाचे अध्यक्ष उल्लाल रघुनाथय्या यांना अध्यक्ष नेमण्यांत आलें. जर्मनींतील गॉटिंजन युनिव्हर्सिटीचे प्रख्यात प्रोफेसर डॉ. रुडॉल्फ ऑटो हे परिषदेसाठीं मुद्दाम आले होते. पहिली उपासना सत्येन्द्रनाथ टागोर यांनीं संस्कृतमध्यें चालविली. स्वागतमंडळाचे अध्यक्ष प्रिन्सिपल हेरंबचंद्र मित्र यांनीं भाषण करून स्वागत केलें. निरनिराळ्या ठिकाणच्या अनेक प्रसिद्ध सभासदांनीं महत्त्वांचीं भाषणें करून निबंध वाचले. बारा महत्त्वाचे ठराव पास झाले. तिसरा ठराव परिषदेच्या संघटनेबद्दल होता. मागल्या परिषदेंतील मसुदा आणि समाजाच्या अभिप्रायाचा अहवाल वाचल्यावर अविनाशचंद्र मुझुमदारांनीं तो ठराव पुढें मांडला. परिषदेच्या अध्यक्षाच्या नेमणुकीबद्दल एक जादा नियम घातला होता. तो हा कीं स्टँडिंग कमिटीने स्वागत कमिटीचा अभिप्राय घेऊन अध्यक्ष निवडावा व तो परिषदेच्या बैठकींत मंजूर व्हावा. हा ठराव पास झाला. कलकत्ता ही देशाची राजधानी आणि ब्राह्मसमाजाचें मुख्य केंद्र असल्यानें हा सर्व समारंभ त्या मानानें थाटाचा झाला. नंतर एक सुंदर स्नेहसंमेलन मेरी कार्पेंटर हॉलमध्यें झालें. त्यांत प्रोफेसर रुडॉल्फ ऑटो यांचें सहानुभूतिपर भाषण झालें.
बांकीपूर : १९१२ सालीं ही परिषद बांकीपूरला भरली. अध्यक्षस्थान सर नारायण चंदावरकर यांस देण्यांत आलें होतें. या ठिकाणीं कलकत्त्यांतील दोन्ही शाखांचे (साधारण व नवविधान) ब्राह्मसमाज असल्यानें आणि बाबू हेमचंद्र सरकार हे जनरल सेक्रेटरी असल्यानें पूर्वतयारीचा त्रास पडला नाहीं. माझ्याबरोबर डि. क्ला. मिशनचे एक आस्थेवाईक कार्यकर्ते अमृतलाल ठक्कर हे बांकीपुरास आले होते. मिशनची एक जाहीर सभा झाली. राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष नामदार आर. एन. मुधोळकर ह्यांनीं सभेचें अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें. अमृतलाल ठक्करनीं माहितीचे आंकडे वगैरेंची जय्यत तयारी करून ही सभा यशस्वी रीतीनें पार पडली. पुढील अधिवेशन कराची येथें ठरलें. तेथें नवविधान पक्षाचा फार जोर असल्यानें परिषदेचा जनरल सेक्रेटरी म्हणून मलाच नेमण्यांत आलें.
कराची : १९१३ सालीं नाताळांत ही परिषद कराचीच नव्यानेंच भरविण्यांत आली. हैदराबाद समाजाचे अध्यक्ष दिवाण कौरामल वगैरे पुढार्यांनीं कराचीच्या सभासदांच्या मदतीनें कराचीचा टाऊन हॉल 'खालिकदिना हॉल' येथें परिषदेच्या जाहीर बैठकीची सोय केली होती. अमेरिकेचे जे. टी. संडरलंड हे या परिषदेसाठीं मुद्दाम आले होते. त्यांनाच अध्यक्ष नेमण्यांत आलें. युनिटेरियन लोकांच्या नेतृत्वाखालीं एक उदारधर्ममतवादी लोकांची जागतिक परिषद आजपर्यंत युरोपांतील आणि अमेरिकेंतील निरनिराळ्या ठिकाणीं भरविण्यांत येत असे. १९०३ सालीं ऍम्स्टरडॅम येथें भरलेल्या परिषदेंत हिंदुस्थानचा प्रतिनिधि म्हणून हजर राहून मीं भाग घेतला होता. १९०५ सालीं जिनिव्हा येथें भरलेल्या परिषदेंत डॉ. सुखटणकर हे हजर होते. १९११ सालीं कलकत्ता येथें भरलेल्या परिषदेंत ह्या आंतरराष्ट्रीय जागतिक परिषदेचें अधिवेशन लवकरच हिंदुस्थानांत भरवावें असा ठराव पास करण्यांत आला होता. म्हणून अमेरिकेंतील युनिटेरियन असोसिएशननें डॉ. संडरलंड यांस जागतिक परिषद हिंदुस्थानांत भरविण्याची पूर्वतयारी करण्यास मुद्दाम पाठविलें होतें. डॉ. संडरलंड हे १८९५ सालीं काँग्रेस पुण्यास भरली असतां तिला हजर होते आणि पुण्यांत भरलेल्या एकेश्वरी परिषदेंत त्यांनीं भागही घेतला होता. शिकागो येथें १८९२ सालच्या सुमारास पार्लमेंट ऑफ रिलिजन ह्या पहिल्या परिषदेंत हिंदुस्थानच्या ब्राह्मसमाजाच्या वतीनें बाबू प्रतापचंद्र मुझुमदार, बळवंतराव नगरकर आणि हिंदुधर्माच्या वतीनें स्वामी विवेकानंद ह्यांनीं प्रामुख्यानें भाग घेतला होता, म्हणून हिंदुस्थानला ही जागतिक परिषद अगदीं अपरिचित होती असें नव्हे.
जे. टी. संडरलंड साहेबांची व माझी पूर्वीपासून चांगली ओळख होती. कारण त्यांच्या शिफारशीनें ऑक्स्फर्ड येथील मँचेस्टर कॉलेजांत व अमेरिकेंतील मिडिव्हल थिऑलॉजिकल स्कूलमध्यें हिंदुस्थानांतील ब्राह्म विद्यार्थ्यांना पाठवून प्रचारक बनवण्याची योजना सुरू करण्यांत आली होती. संडरलंड यांनीं ह्या वेळीं आपल्याबरोबर आपल्या मुलीस आणलें होतें. संडरलंड साहेबांची सोय कराचींतील एका युरोपियन हॉटेलांत करण्यांत आली होती. ते परिषदेचे नियोजित अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी म्हणून कांहीं महत्त्वाच्या कामासाठीं मी त्यांना हॉटेलांत भेटावयास गेलों असतां एक मासलेवाईक प्रकार घडला. नाताळच्या मोसमांत युरोपियन पाहुण्यांनीं हॉटेल गच्च भरलें होतें. हॉटेलच्या मॅनेजरांनीं संडरलंड साहेबांस भेटण्यास मला मनाई केली. मला आंत जातां येत नसल्यास साहेबमजकुरांस मला भेटण्यास बाहेर आणलेंच पाहिजे, असा मीं आग्रह धरला. डॉ. संडरलंड बाहेर आले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनीं खेद प्रदर्शित केला. मीं त्यांना स्पष्ट बजावलें कीं, कामानिमित्त मला वेळोवेळीं भेटावें लागणार. ह्या प्रकाराची पुनरावृत्ति झाल्यास येथील पाहुणचार सोडून आम्ही व्यवस्था करूं तेथें साहेबांना अवश्य जावें लागेल. साहेब सध्यां अमेरिकेच्या स्वतंत्र वातावरणांत नाहींत; आमच्या देशांत आमच्याइतकेच परतंत्र आहेत. साहेबमजकुरांना हा व्यावहारिक प्रकार पाहून खर्या उदारधर्माच्या प्रसाराबद्दल पुन्हां एकवार विचार करावा लागला. ब्राह्मपरिषदेचीं सर्व कामें रीतसर पार पडलीं.
सर नारायण चंदावरकर आणि इतर प्रांतांतील बडीबडी मंडळी ह्या बैठकीस हजर होती. पुढील जागतिक परिषद हिंदुस्थानांत भरावयाची तिच्या पूर्वतयारीचा विचारविनिमय करण्यासाठीं एक खासगी सभा बोलावली. हिंदुस्थान देश म्हणजे एक छोटा युरोप खंड. एका अधिवेशनानें या नवीन चळवळीचें काम भागणार नाहीं. म्हणून १९१४ सालीं कलकत्ता, मद्रास, मुंबई, लाहोर या चार मुख्य ठिकाणीं चार अधिवेशनें भरविण्याची योजना ठरली. अमेरिका, युरोप आणि हिंदुस्थान या तीन देशांतील उदार धर्मवाद्यांनीं पैशाचा निधि जमवण्याची जबाबदारी घेतली. कलकत्त्यास हेमचंद्र सरकार, मद्रासेंत डॉ. व्यंकटरत्नम नायडू, मुंबईस वि. रा. शिंदे, लाहोरास प्रो. संचीराम सहानी या चौघांना आपापल्या प्रांतांतील अधिवेशनाचे सेक्रेटरी नेमण्यांत आले.
मदतीचें आश्वासन : कराची येथील काम आटोपल्यावर बडोद्याचे श्रीमंत सर सयाजीरावमहाराज गायकवाड यांची डॉ. संडरलंडशीं समक्ष भेट करून देण्यासाठीं महाराजांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला आगाऊ भेटून तयारी केली. डॉ. संडरलंड, त्यांची कन्या व मी महाराजांचे पाहुणे म्हणून बडोद्यास दोन तीन दिवस होतों. अशा जागतिक परिषदेची महाराजांना हौस फार. त्यांची सहानुभूति आणि मदत मिळण्याची आम्हांला आशा होती. त्यांनीं मदतीचें आश्वासन दिलें. राजवाड्यांत डॉ. संडरलंडचें एक व्याख्यांन त्यांनीं करविलें. विषय 'इमर्सन' हा होता. व्याख्यान संपल्यावर लक्ष्मीविलास राजवाडा संपूर्णपणें फिरून दाखविण्यांत आला. वाड्यांचें एकंदर काम व मांडणी पाहून डॉ. साहेबांनीं संतोष व्यक्त केला आणि जगांतील उत्तमोत्तम वाड्यांमध्यें ह्याचा नंबर बराच वर येतो असा अभिप्राय दिला. हिंदुस्थानांतील प्रमुख शहरीं ह्या जागतिक परिषदेची ठरलेली योजना तेथील पुढार्यांस समक्ष समजावून सांगून डॉक्टरमजकूर अमेरिकेस परत गेले.
महायुद्ध : लगेच मी ह्या नवीन कामास लागलों. एक जाहीर विनंतीचें लहानसें पुस्तक मीं छापलें आणि तें हिंदुस्थानांतील, युरोपांतील आणि अमेरिकेंतील परिचित गृहस्थांना पाठवून पत्रव्यवहार सुरू केला. बरींच समाधानकारक उत्तरें आलीं. युरोपांतील त्या काळचे प्रसिद्ध व अग्रगण्य जर्मन तत्त्वज्ञानी प्रो. रुडॉल्फ ऑयकेन यांचे 'परिषदेस हजर राहून भाग घेतों' अशा आशयाचें पत्र आलें. प्रोफेसर मजकूर पुढील वर्षी जपानला जाणार होते. म्हणून वाटेंत हा कार्यभाग उरकून घेण्यास त्यांना कठीण पडणार नव्हतें. पूर्वतयारीची ही धामधूम चालली असतांना विधिघटना निराळीच चालू होती. १९१४ च्या ऑगस्ट महिन्यांत महायुद्ध अकस्मात् सुरू झालें. त्यांत ही परिषदच काय पण अनेक जागतिक महत्त्वाच्या गोष्टींची होळी झाली. महायुद्धानें सर्व जगाला 'त्राहि माम्' करून सोडलें. मग पुढें भरणार्या परिषदेची कथा काय ! गेल्या दहा वर्षांत अत्यंत श्रम करून ज्या एकेश्वरी धर्मपरिषदेला आम्हीं नांवारूपाला आणलें होतें तिचासुद्धां ह्या खाईंत स्वाहा झाला.
प्रार्थनासमाजाचा प्रचारक या नात्यानें माझा संबंध १९१० सालीं सुटला होता. पुढें तीन वर्षे डि. क्ला. मिशनच्या कामानिमित्त मध्यवर्ती शाखा मुंबईतच होती, म्हणून मला मुंबईलाच राहावें लागलें; पण मिशनची वाढ कल्पनेबाहेर वाढूं लागली. म्हणून माझें मुख्य ठिकाण मुंबई हें सोडून पुणें करावें लागलें.