ता. १६ गुरुवार ऑगस्ट १९२८ रोजीं हौरा स्टेशनवर पोंचलों. १८ शनिवारीं ब्राह्म समाज शतसांवत्सरिक उत्सव सुरू झाला. सायंकाळीं प्रतिनिधीच्या स्वागतार्थ सभा झाली. मुंबईतर्फे उत्तर देण्याचें काम मजकडे आलें. ता. १९ ला दुपारीं २ पासून रात्रीं ८ पर्यंत सर्व धर्मीयांची मजलस झाल. पार्शी, हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमान व बहाई इतक्या धर्मांचे प्रतिनिधि पहिल्या अधिवेशनांत बोलले. सर्वांत उत्तम भाषण मि. एस. एच. कोरेंशी ह्यांनीं बहाई धर्मावर केलें. ता. २० रोजीं सायंकाळीं सर पी. सी. रॉयचे अध्यक्षत्वाखालीं ब्राह्म समाजाचा संदेश ह्या विषयावर भाषणें झालीं. सुरुवातीची प्रार्थना करणें मजकडे आलें. ती मीं इंग्रजींत केली. ती सतीशचंद्र चक्रवताअना फार आवडली असें ते मुद्दाम येऊन म्हणाले. पहिलें भाषण माझेंच झालें. तें फार जोरांत, थोडक्यांत व निश्चित मुद्द्यांचें झालें. ता. २१ सकाळीं मींच उपासना चालवली. त्यांत म्हटलें, ''प्रत्येकानें आपापला देव घडवला पाहिजे. पार्थिवपूजेंत जशीं नित्य नवीं लिंगें करावीं लागतात त्याप्रमाणें आम्हीं आपला देव बनवावा. सत्यं, ज्ञानं, अनंत हीं नांवें आम्हींच देवांस दिलीं आहेत. भक्तिविजयांतील प्रथमाध्यायांत देव भक्तानें कसा नांवारूपास आणिला तें सांगितलें आहे.''
कविसम्राट् टागोर : ता. २२ रोजीं बंगाली भाद्रपद मासाची षष्ठी असल्यानें हाच ह्या शतसांवत्सरिक उत्सवांतील मुख्य दिवस होता. सकाळीं ५॥ वाजल्यापासूनच मंदिरांत गर्दी जमूं लागली. आज प्रसिद्ध कविवर्य डॉ. रवींद्रनाथ टागेर हे उपासना चालवणार होते. ८॥ वाजतां कविवर्य आले. मीं त्यांना प्रथमच पाहिलें. चेहरा अत्यंत सुंदर व गंभीर. किंचित् औदासीन्याची छटा दिसली. प्राचीन ॠषिकालाची कल्पना मूर्त स्वरूपास आली. वेदी सर्व स्फूर्त झाली. वेदीभोंवतींचीं मोठमोठीं शुभ्र व लाल उत्फुल्ल गुलाबाचीं फुलें विकसित होऊन कविवर्यांचे उद्गार ऐकण्यास टपलेलीं होतीं असा भास झाला. खालीं मान घालून कविवर्यांनीं जें आसन घातलें ते अर्धा तास वर पाहीचनात. आवाज अलगुजासारखा कोमल व हृदयप्रवेशी होता. मग पुढें विरल व अथांग दृष्टीनें श्रोतृवृंदाकडे पाहात ते आपलें प्रवचन वाचूं लागले. त्या वेळीं कमलनयन म्हणून काय चीज आहे ती अनुभवास आली. केशकलापांची शुभ्र शोभा गोधूमकांतीच्या भरु कपाळावर विलसत होती. पिंगट रंगाचा रेशमी सैल सदरा असून त्यावर त्याच रंगाची चादर पसरली होती. सरल नासिका, विखुरलेली दाढी, पाणीदार दृष्टिविक्षेप, एकंदरींत एक दैवतच पुढें दिसलें. एक तास प्रवचन झालें. ''ईश्वरी दयेला त्याच्या रौद्र स्वरूपाचें कोंदण लागतें. विभूतीचें मोठेपण संकटाला सतत तोंड देण्यांतच असतें.'' हा प्रवचनाचा आशय होता. सर्व भाषण बंगालींत होतें. तरी त्यांत संस्कृत शब्दांची लयलूट असल्यानें बरेंच कळलें. शेवटीं लोकाग्रहास्तव कवींनीं आपलें एक लहानसें पद्य गाऊन दाखवलें. हा प्रसंग शंभराव्या वाढदिवसाला शोभण्यासारखा झाला.
सामाजिक प्रश्न : २४ रोजीं सकाळीं पुन्हां परिषद भरली. विषय ''आमचे सामाजिक प्रश्न'' हा होता. प्रथम मिसेस् के. एन. रॉयबाईंनीं बंगालींत भाषण केलें. त्यांत स्त्रियांनीं नृत्य, गायन व नाटकें करण्यांत व पाहण्यांत कांहीं वावगें नाहीं असें त्यांनीं समर्थन केलें. अध्यक्ष सतीशचंद्र चक्रवर्ती यांनी उठून इषारा दिला कीं, ह्या विषयावर कोणींही बोलूं नये असें पूर्वीच ठरलें आहे. पण ज्या अर्थी बाईनें हा विषय पुढें आणला त्या अर्थी दुसर्या बाजूनें उत्तर आलेंच पाहिजे. ह्यावर मीं उठून स्पष्ट सांगितलें, ''उत्तर आल्यास पुन्हां प्रत्युत्तर येऊन ह्या नाजुक विषयावर मोठें युद्ध माजेल. शिवाय त्यांत स्त्रीदाक्षिण्यही नाहींसें होईल.'' हें रा. गिरिजाशंकर ह्यांस आवडलें नाहं. त्यांनीं आपल्या भाषणांत प्रेमस्वातंत्र्याचा मुद्दा अप्रस्तुतपणें पुढें आणून अध्यक्षांचें निर्णायक मत मागितलें. अध्यक्षांनीं ''प्रेमाला बंधन असलेंच पाहिजे'' असें ब्राह्म समाजाचें स्पष्ट मत सांगितलें. नंतर माझें भाषण झालें. ''गेल्या शतकांत ब्राह्म समाजानें स्वातंत्र्याचा पुकारा केला आहे. आतां पुढल्या शतकीं जनता जागृत होणार. स्त्रिया समानाधिकारी होणार आणि युवक स्वतंत्र होणार. दासमनोवृत्तचें ब्राह्म समाजाकडून निर्मूलन झाल्यावर वरील तिन्ही बाजूंनीं वावटळ उठणार. त्याला ब्राह्म समाज तयार आहे काय ? आजवर धार्मिक स्वातंत्र्याचें भावनामय युद्ध झालें. येथून पुढें आर्थिक स्वातंत्र्याचें व्यावहारिक युद्ध जुंपणार. त्यांत ब्राह्म समाज माघार घेईल, तर आपणच उठवलेल्या वावटळींत स्वतःच गारद होण्याचीं आपत्ति येणार !''
ता. २५ रोजी 'मिशनचें कार्य' ह्या विषयावर माझ्या अध्यक्षतेखालीं परिषद झाली. (१) स्वदेशांतील (२) बाहेरदेशांतील (३) बहुजनसमाजांतील वा दलितवर्गांतील असे मिशनकार्याचे तीन भाग होते. डॉ. ग. य. चिटणीस व सुधीरचंद्र बानर्जी ह्यांचें 'बाहेरदेशांतील कार्य' ह्या विषयावर भाषण झालें. २८ रोजीं दुपारीं डॉ. ग.य. चिटणीस व डॉ. खांडवाला ब्राह्म समाजाचे सफरीवर निघणार होते. त्यांना निरोप देण्यासाठीं जाहरी उपासना झाली, ती मीं, चालवलीं.