कॉलेज-प्रवेश

इ.स. १८९३ चे आरंभापासून तों इ.स. १८९८ अखेर सहा वर्षे मी पुणें येथील फर्ग्युसन कॉलेजमध्यें होतों.  ह्या काळाचे दोन भाग पडतात.  प्रिव्हियन आणि इंटरमिजियट परीक्षांचा पहिला भाग आणि बी.ए. आणि एलएल.बी. या परीक्षांचा दुसरा भाग.  ह्या दोन भागांत माझ्या घरची स्थिति, सांपत्तिक स्थिति, मनःस्थिति व देशस्थिति वगैरे अनेक कारणांमुळें बराच भेद पडला आहे.

घरची अत्यंत गरिबी, निराधार होऊन मी पुण्यासारख्या विस्तीर्ण शहरांत कोणाची ओळख ना पाळख असा आलेला.  तशांत फर्ग्युसन कॉलेजमध्यें कसा प्रवेश मिळाला ह्याचें मला अद्यापि आश्चर्य वाटतें.  हायस्कुलांतील सहाव्या इयत्तेंतील माझे शिक्षक रा. वासुदेवराव चिरमुले, बी.ए. ह्यांनीं 'पुणें येथें गरीब मराठा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे बाबतींत मदत करणारी एक संस्था आहे,' असें सांगितलें, म्हणून केवळ माझे नशिबाची परीक्षा करण्याकरितां मी ह्या अफाट शहरांत येऊन पडलों.

त्या वेळीं मला विसावें वर्ष देखील पुरें झालें नव्हतें.  मॅट्रिकच्या परीक्षेकरितां मी पुण्यास इ.स. १८९१ चे अखेरीस फार तर एक आठवडा राहिलों असेन.  पण परीक्षेच्या घाईंत ह्या शहरांतील परीक्षेच्या मंडपापलीकडे अधिक माहिती होणें संभवनीय नव्हतें.  आमचे हायस्कूलचे हेडमास्तर रा. त्रिंबकराव खांडेकर ह्यांना मी आवडत असें.  त्यांचे एक बंधु पुण्यास वकील होते.  त्यांना एखादें माझ्या ओळखीचें पत्र दिलें असेल कीं काय हेंही मला आतां आठवत नाहीं.  ह्या वकिलांचा एक मुलगा जमखंडी हायस्कुलांत शिकण्यासाठीं आपल्या चुलत्यांकडे राहण्यासाठीं आला होता.  त्याचेशीं माझी थोडी ओळख होती.  पण त्याची भेट होऊन त्याच्याकडून किंवा त्याच्या वडिलांकडून मला विशेष मदत झाली असेल असें कांहीं मला वाटत नाहीं.  पुण्यास गरीब मराठ्यांना कॉलेजांत मदत करणारी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन नांवाची संस्था आहे व तिचे संस्थापक व सेक्रेटरी रा. गंगाराम भाऊ म्हस्के ह्या नांवाचे एक मराठा जातीचे इंग्रजी शिकलेले पुढारी गृहस्थ प्रसिद्ध वकील आहेत वगैरे माहिती रा. खांडेकर वकिलांनीं मला दिली असावी.  ह्या वेळीं सदाशिव पेठेंतल्या हौदाच्या रस्त्यावरील फडतरे यांच्या वाड्यांत मी थोडे दिवस होतों, एवढीच अंधुक आठवण मला आतां आहे.

गं. भा. म्हस्के  :  गंगाराम भाऊ म्हस्के ह्या गृहस्थाचे मराठा जातीवर मोठे उपकार आहेत.  त्या काळचे एक फरडे इंग्रजी शिकलेले, सुधारकी बाण्याचे हुशार वकील अशी त्यांची प्रसिद्धि होती.  पुणें लष्करांत मेन स्ट्रीटवर त्यांचें मोठें चांगलें स्वतःचें घर आहे.  रानडे, भांडारकर वगैरेसारखी त्या काळच्या सुधारक पक्षांत त्यांची चांगली मान्यता होती.  वकिलींत त्यांनीं बरेच पैसे मिळविले होते.  हिराबागेंत असलेल्या कॉस्मॉपॉलिटन क्लबच्या दिवाणखान्यांत पुण्याच्या तत्कालीन मोठमोठ्या माणसांच्या मोठमोठ्या तैल-तसबिरी टांगल्या आहेत, त्यांत त्यांचीही एक तसबीर अद्याप लटकत आहे.  त्यांची मराठा संस्थानिक, राजे व इतर जातींचे प्रागतिक शिक्षणप्रेमी श्रीमंत गृहस्थ यांच्यामध्यें त्या काळीं छाप होती.  त्यांच्याकडून मदत घेऊन त्यांनीं व लष्करांत राहणार्‍या राजन्ना लिंगो नांवाच्या वकिलांनीं ही 'डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन' संस्था काढली होती.

एके दिवशीं रा. म्हस्केसाहेबांना भेटावयाला मी पुणें लष्करांत गेलों.  मेन स्ट्रीटचा भव्य रस्ता, त्यांतील दोन तीन मजली घरें, परदेशी मालांनीं भरलेलीं तेथील बोहर्‍यांचीं दुकानें आणि लष्करांतील इतर रस्ते व शोभा पाहून माझे डोळे दिपले होते !  अशा स्थितींत मी रा. म्हस्के यांच्या दिवाणखान्यांत जाऊन पोंचलों.

स्कॉलरशिप  :  म्हस्केसाहेब त्या वेळीं आपल्या नेहमींच्या आरामखुचाअत पाय पसरून उताणे पडले होते.  दिवाणखान्यांत अगदीं अलीकडच्या पद्धतीची पूर्ण सजावट केलेली होती.  दिवाणखाना ऐसपैस, लांबरुंद व हवाशीर असून चांगल्या सतरंजीची व वरती कांहीं गालीच्यांची बिछायत होती.  मधोमध एक गोल टेबल आणि इकडे तिकडे बर्‍याच मऊ खुर्च्या व साध्या खुर्च्यांची चंगळ होती.  ह्यावरून म्हस्केसाहेब हे एक पुण्यांतील सुक्षिक्षित व संभावितं पुढारी होते, ह्याची खात्री झाली.  ते घरच्या पोषाखांत म्हणजे धोतर आणि सदरा ह्यांत होते; पण तोंडांत एक मोठा अस्सल विदेशी चिरूट होता.  त्याचा विपुल धूर सोडीत, खालीं पिकदाणींत थुंकत आणि चिरुटाची राख जवळच्या एका लहानशा टेबलावरील रक्षापात्रांत टाकीत स्वारी अगदीं एकटी आराम करीत होती.  चेहरा गंभीर व वागणूक खरोखर संभावीत होती.  मला खुर्चीवर जवळच बसावयास सांगून त्यांनीं सर्व भाषण इंग्रजींत केलें; पण तें सर्व ओठांतून-निदान दांतांतून चिरूट व सोडतांच-केलें.  माझें लक्ष बोलण्यापेक्षां त्या चिरुटाकडेच जास्त लागलें !  एकंदरींत म्हस्केसाहेबांनीं मला बरें वागविलें.  स्कॉलरशिप मात्र दरमहा दहा रुपयांचीच देणें शक्य आहे, असें त्यांनीं सांगितलें.  कॉलेजांत जाण्याची कशीबशी सोय होईल अशी आशा उत्पन्न झाली.  पण ह्यापलीकडे राहण्याची किंवा अभ्यासाची दुसरी कसलीही सोय म्हस्केसाहेबांनीं केली नाहीं किंवा कळकळ दाखविली नाहीं.  एखाद्या युरोपियन सभ्य गृहस्थाचें वर्तन ज्याप्रमाणें एखाद्या नेटिव्ह माणसाशीं बेतानेंच असतें तशीच त्यांची ढब दिसली.  रंगानें ते सावळे, जवळजवळ काळेच होते.  एरवीं सर्व थाट युरोपियन वळणाचा दिसला.

त्या काळांत मराठ्यांत इतका इंग्रजी शिकलेला गृहस्थ हा एकटाच होता.  इतकेंच नव्हें तर ते वकिलींतही बरेच पुढारलेले आणि तत्कालीन नागरिकांत मान्यता पावलेले होते हें माझ्या तेव्हां लक्षांत आलें नाहीं.  कारण ही तुलना करण्याइतकी मला पुण्याची माहिती नव्हती.  ज्या म्हस्केसाहेबांच्या प्रयत्‍नानें आज शेंकडों मराठे पदवीधर झाले, त्यांपैकीं एकही आज पुण्यांतल्या समाजांत अशा मान्यतेनें राहात नाहीं.  म्हस्केसाहेब त्या वेळीं कसे राहूं शकले ही एक मननीय गोष्ट आहे.

फर्ग्युसन कॉलेज  :  कॉलेजांत माझी हजेरी कशी तरी एकदां लागली.  फर्ग्युसन कॉलेज त्या वेळीं पुणें शहरांत शनिवार पेठेंतील गद्रे ह्यांच्या विस्तीर्ण जुन्या वाड्यांत होतें.  हें कॉलेज माझ्यासारख्या गरिबांकरितांच होतें.  हें नसतें तर डेक्कन कॉलेजसारख्या भारी खर्चाच्या संस्थेंत माझा प्रवेश अशा तुटपुंज्या स्कॉलरशिपनें झाला नसता.  फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल वामन शिवराम आपटे (संस्कृत कोशकार) हे मी जाण्यापूर्वीच वारले असल्यामुळें त्यांचे जागीं प्रसिद्ध सुधारक रा. गोपाळ गणेश आगरकर हे होते.  हे गांवांत न राहतां गांवाच्या पश्चिम बाजूस ज्या विस्तीर्ण जागीं हल्लीं कॉलेजच्या स्वतःच्या इमारती आहेत त्या जागेवर एक झोपडें बांधून राहात असत.  त्या झोपडीशिवाय आजूबाजूस त्या काळीं वसतीचें एकही चिन्ह दिसत नव्हते.  दरमहा दहा रुपये स्कॉलरशिपमध्यें माझ्या त्या वेळींही कॉलेजचा खर्च भागण्याचे मुष्किल होतें.  कारण कॉलेजची फी दरमहा ५ रु. वजा जातां माझ्या हातीं ५ रुपयेच उरत !  म्हणून कॉलेजची फी माफ करण्याबद्दल मी एक अर्ज घेऊन प्रिन्सिपॉल आगरकर ह्यांना भेटावयाला गेलों.

आगरकर मोठे सुधारकाग्रणी ही कीर्ति माझ्या कानावर जमखंडीस असतांनाच आली होती.  इ.स. १८९२ सालीं मी जमखंडी शाळेंत शिक्ष्क असतांना त्यांचे सुधारक पत्रांतले सणसणीत लेख माझ्या वाचनांत येऊन माझीं मतें झपाट्यानें सुधारणेच्या बाजूचीं बनत चाललीं होतीं.  रा. गंगाराम भाऊ म्हस्के हे सुधारक आणि वकीलही होते.  त्यांना पाहून पुणेरी सुधारक कसे असतात ह्याविषयीं मला कांहींशी कल्पना आली होती; पण आगरकरांना प्रथम पाहिल्यावर त्या देखाव्याचा माझ्या ह्या कल्पनेशीं नीट मेळ बसेना.

प्रि. आगरकर  :  माझ्या भेटीची वेळ सकाळीं नऊ वाजण्याच्या सुमाराची होती.  दिवस हिंवाळ्याचे होते.  आगरकर कायमचेच दमेकरी होते.  ते झोपडीच्या बाहेर अंगणांत उन्हांत उभे होते.  लोकरीचा जवळजवळ फाटलेला काळा मळकट कोट,चित्पावनी थाटाचें नेसलेलें धोतर, लहानशा शेंडीचे थोडेसे विखुरलेले केस, पायांत आगरकरी सुधारणेचा जोडा-म्हणजे ब्राह्मणी जोडाच; पण त्याचें टाचेवरचे कातडे टाचेच्या मागें वर उभें आलेलें, मुद्रा बरीच त्रासलेली, भिवयांचे केस दाट व डोळे किंचित् खोल व भेदक असें हें प्रथम दर्शन घडलें.  माझा अर्ज पाहून, मला डेक्कन मराठा असोसिएशनची स्कॉलरशिप मिळत आहे हें ऐकल्याबरोबर स्वारीनें मला फी माफ व्हावयाची नाहीं हें निर्भीडपणें सांगितलें.  उगाच नादाला लावण्यापेक्षां त्यांचें हें तडकाफडकी उत्तर एका रीतीनें योग्यच होतें; पण मजवर मात्र त्या उत्तराचा परिणाम बरा झाला नाहीं.  आधींच त्यांचा एकंदर पोषाख व मुद्रा पाहून, त्यांच्या सुधारकी कीर्तीमुळें मीं जी भलतीच कल्पना करून घेतली होती ती ढासळली होती आणि त्यावर हा नकाराचा बाँब मजवर आदळल्यामुळें आगरकरांविषयीं माझा ग्रह अनुकूल झाला नाहीं.  हा ग्रह कॉलेजच्या इतर प्रोफेसरांशीं माझा पुढें जो अत्यल्प प्रत्यक्ष संबंध आला त्यामुळें कांहीं म्हणण्यासारखा दुरुस्त झाला नाहीं.  खरोखर पाहतां ह्यांत आगरकरांचा, इतर प्रोफेसरांचा किंवा कॉलेजच्या इतर परिस्थितीचा कांहींच दोष नव्हता.  केवळ ह्या निराशेला माझा अजाणपणा व अननुभवीपणा हेंच कारण होय.