कॉलेजचा पसारा : मी फर्ग्युसन कॉलेजांतील पहिल्या म्हणजे प्रीव्हियसच्या वर्गांत इ.स.१८९३ सालाचे आरंभीं गेलों; तेव्हां तें कॉलेज फलग्रेड कॉलेज झालें होतें कीं नाहीं हें मला आठवत नाहीं. निदान बी.ए. चा वर्ग त्या वेळीं असला तरी तो सुरू होऊन फार वर्षे झालीं असतील, असें मला वाटत नाहीं. कॉलेज पुणें शहरांत शनिवार पेठेंतील गद्रे ह्यांच्या वाड्यांत भरत होतें. त्यांतच न्यू इंग्लिश स्कूलही भरत होतें. त्याला लागूनच होळकरांचा मोठा वाडाही आहे. तो मी पुढें इंटरमिजिएट वर्गांत गेल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे आला होता. त्या वेळीं शिक्षणासाठीं ह्या मंडळीच्या एवढ्याच इमारती होत्या. खेळण्यासाठीं पुढें लवकरच नारायण पेठेंतील नदीजवळचा कबूतरखानाही मिळाला असावा. कारण आम्ही इंटरमिजिएटमध्यें असतांना तेथें फटबॉल खेळत होतों.
व्याख्यानपद्धति : प्रीव्हियसचा क्लास त्या वेळीं गद्रेवाड्यांच्या समोरच्या मोठ्या दिवाणखान्यांत भरत असे. आमच्या वेळीं देखील हा भव्य दिवाणखाना भरेल इतके सुमारें ६०।७५ विद्यार्थी तरी असत. ह्या वर्गांत पोटतुकड्यां नव्हत्या. त्यामुळें हा क्लास म्हणजे एक मेंढवाडाच दिसत असे. मराठी प्राथमिक शाळा सोडून जमखंडीस हायस्कुलांत गेल्यावर मला जसें नव्या जगांत व संस्कृतींत स्थित्यंतर झाल्याप्रमाणें वाटलें तसेंच तेथें वाटलें. कॉलेजांतल्या शिक्षणाच्या फरकाचें मुख्य लक्षण म्हणजे व्याख्यानपद्धति ही होय. शें-पन्नास मुलांनीं एका उंच पीठावर बसलेल्या अगर उभ्या असलेल्या शिक्षकाचें निरूपण अगर प्रवचन ऐकत बसणें म्हणजे हायस्कूलमधल्या वैयक्तिक शिक्षणपद्धतीला मुकणेंच होय. हायस्कुलाच्या वर्गांत तीस मुलांपेक्षां अधिक शिष्यसमुदाय असणें इष्ट नाहीं. कॉलेजांत ह्या संख्येला आळाच नसतो. त्यामुळें शिक्षकाचा शिष्याशीं व्यक्तिगत संबंध तुटतो आणि विद्यार्थी धागा तुटलेल्या पतंगाप्रमाणें शिक्षकापासून किती लांब गेलेला असतो, हें शिक्षकास कळणें अशक्य होतें. तथापि आम्ही व्याख्यान ऐकणारे सभ्य गृहस्थ (Gentlemen) झालों, ही भावना कॉलेजांत गेल्याबरोबर प्रसवून एक प्रकारची आढ्यता येत असेल खरी; पण तिनें खरा आध्यात्मिक किंवा बौद्धिक लाभ घडत नाहीं, हें माझ्या अनुभवास लवकरच येऊं लागलें. आमच्या ह्या नवीन आढ्यतेची एक मौजेची गोष्ट आठवते. ती अशी-
मॅग्नाचार्टा : शेंपन्नास मुलांची हजेरी रोज घेणें अवश्य होतें. कारण विश्वविद्यालयाच्या परीक्षेला बसण्यापूर्वी अमुक दिवसांची हजेरी (टर्म) कॉलेजांत भरली आहे, असा दाखला विद्यार्थ्याला विद्यालयास द्यावयाचा असतो. प्रोफेसरचा वेळ हजेरी घेण्यांत जाऊं नये म्हणून हें काम ह्या कॉलेजच्या श्री. दीक्षित नांवाच्या एक अनुभविक कारकुनाकडे असे. हे भले धिप्पाड गृहस्थ न्यू इंग्लिश स्कूलमध्यें ड्रिलही शिकवीत असत. त्यामुळें हे लष्करी कुर्र्यांत हजेरी घेत. ह्यांचा आवाज दणकट व चर्या उग्रट म्हणून त्यांची वागणूक विद्यार्थ्यांशीं-विशेषतः बाहेरगांवच्या नवख्यांशीं-थोडीशी चढेलपणाची व उर्मटपणाची होती. प्रत्येक विद्यार्थ्याचें नांव पुकारल्यावर विद्यार्थ्यानें Present Sir असें सभ्यपणाचें उत्तर द्यावयाचें असतें. ही स्वारी विद्यार्थ्याचें नांव पुकारतांना त्याच्या मागें मिस्टर हें सभ्यतादर्शक उपपद लावण्याचा कंटाळा दाखवूं लागली; पण विद्यार्थ्यांना आपण सभ्य गृहस्थ आहोंत ही जाणीव होती. 'मिस्टर' नांवामागें न ऐकुं आल्यानें Sir (महाराज) हें Present (हजर) ह्या उत्तरांपुढें लावण्याची ही सभ्य मंडळी टाळूं लागली. शेवटीं हें प्रकरण प्रिन्सिपॉलपर्यंत जाऊन ह्या ड्रिल (कवाईत) शिकविणार्या कारकूनजीला विद्यार्थ्यांच्या नांवामागें मिस्टर हें पद जरूर लावण्याचा धडा शिकावा लागला ! आणि अशा प्रकारें आम्हां विद्यार्थ्यांनाही आम्ही सभ्य गृहस्थ आहोंत ह्याबद्दलचा मॅग्नाचार्टा-पुराव्याचा पट्टा-मिळाला !
लाजाळू वृत्ति : सभ्य गृहस्थपणाचें तिसरें लक्षण म्हणजे हायस्कूलप्रमाणें कॉलेजांत शिक्षकांपुढें ५।६ तास रोज डांबून बसण्याची आवश्यकता नव्हती. दोन तीन तास दोन तीन विषयांवर व्याख्यानें ऐकलीं कीं, आम्ही सभ्य गृहस्थ झालों मोकळे ! मग वाटल्यास पुस्तकांत डोकें खुपसून बसा, किंवा खेळाच्या मैदानांत बागडा किंवा गांवांतून उनाडक्या करा. कोणा विचारणाराच नसे. सभ्यपणाच्या लक्षणांच्या एकाहून जास्त माळा इतरांप्रमाणें माझ्याही गळ्यांत जरी पडल्या होत्या, तरी मी इतरांसारखा व इतका एकदम कांहीं 'सभ्य गृहस्थ' होण्याइतका धीट बनलों नाहीं. भेदरट, लाजाळू, अनोळखी असा मी सर्वांत मागच्या बांकावर बसत असें आणि ही संवय पुढें अनेक कारणांनीं शेवटपर्यंत मला कायम जडली.
आमच्या कॉलेजचें त्या वेळीं विद्यार्थिवसतिगृह नव्हतें. तें पुढें १८९५ सालीं कॉलेजची स्वतःची इमारत चतुःशृंगीच्या माळावर उभारल्यावर झालें. तें झाल्यावरही माझ्यामध्यें निरंतर सुख मानून वास करणार्या माझ्या दारिद्र्य मित्रानें तेथें राहण्याची मला मनाई केली. अर्थात् मग मला शहरांत जेथें जागा मिळेल तेथें माझ्या बिर्हाडाची सोय करावी लागली.
पेंच-प्रसंग : मला स्कॉलरशिप तर अवघी दरमहा १० रुपयांची ! प्रिन्सिपॉलनें माझ्या फीमाफीचा अर्ज तर देखतहुकूम धुडकावून लावला. दरमहा ५ रुपये कॉलेजची फी. तीही सगळ्या टर्मची आगाऊ ३० रुपये भरावयाची होती. शिवाय कॉलेजचीं पुस्तकें व इतर उपकरणें घ्यावयाचीं होतींच. मग खोलीभाड्यांला व खाणावळीला काय उरणार ? मीं ही सर्व आवश्यक सोय कशी लावली ह्याचा उलगडा मला आतां किती आठवण करून पाहिलें तरी सुचत नाहीं. मीं त्या वेळीं काय केलें तें एक हरीच जाणे ! विशेष पेंच का कीं, ज्या आगरकरमहाशयांनीं मला नादारी दिली नाहीं, त्यांच्या सुधारकांतील लेख वाचून माझी अलीकडे कित्येक दिवसापूर्वीपासूनच त्या हरीवरील श्रद्धा ही बरीच कमी कमी होत आली होती; पण ज्या अर्थी मी जगून वांचून राहिलों आणि बी.ए. व अर्धा एल.एल.बी. झालों त्या अर्थी ह्या सर्व सोयी झाल्या हें तर खासच आणि ज्या अर्थी तुरुंगांत कधीं गेलों नाहीं व आजारीही फारसा पडलों नाहीं त्या अर्थी मी कांहीं तरी उपाय केले असावेत.
वरील प्रश्नास उत्तर म्हणजे त्या वेळची स्वस्ताई आणि त्यापेक्षांही निखालस उत्तर म्हणजे गरजा आणि उणीवा सहन करण्याची माझी अपार तयारी. माझ्या आईबाबांनीं विशेषतः ही माझी तयारी सगळ्या आयुष्यभर पुरून मागें मुलांबाळांस लागल्यास उरेल इतकी केली होती. मी पुण्यास आल्याबरोबर जरी कॉलेजांतला 'सभ्य गृहस्थ' बनलों नाहीं, तरी कशीही वेळ आल्यावर वर्षअखेर परीक्षा उतरण्याची तयारी ठेविली.
तिघेजण : कोठून ओळख निघाली किंवा काढली तें कोंहीं आतां आठवत नाहीं; पण लवकरच सदाशिव पेठेंतील ताडपत्रीकरांच्या वाड्यांतील ढेलजेंतील दोन खाणांची एक खोली आम्हां तिघां जमखंडीच्या विद्यार्थ्यांना भाडें कांहीं न पडतां राहावयास फुकट मिळाली. हे तिघे विद्यार्थी म्हणजे जनुभाऊ करंदीकर (रा.जनार्दन सखाराम करंदीकर), विश्वनाथ पोंक्षे आणि मी स्वतः ! ह्याच खोलींत केव्हां केव्हां अभ्यास करावयाला व विशेषतः आम्हां सर्वांच्या आवडीचें वर्गांत लावलेलें इंग्रजी पुस्तक जेन ऑस्टिनची कादंबरी 'प्राइड ऍण्ड प्रेज्युडीस' हें आमच्याबरोबर वाचावयाला वाईचे केशव रामचंद्र कानिटकर 'फर्ग्युसन कॉलेज' चे भावी प्रसिद्ध प्रिन्सिपॉल, हेही येत असत. बाहेरगांवचा (पुण्याचा नव्हे हो) हाच काय तो सोबती आणि मित्र आम्हां जमखंडीकरांना लाभला आणि तो अद्यापि टिकला आहे; पण खुद्द पुण्याच्या एकाही विद्यार्थ्यानें अंगाशीं लावून घेतलें नाहीं. ह्याचें नांव पुणें !
कॉलेजखर्च : राहण्याची सोय झाल्यावर अर्थात् खाणावळही पाहिलीच. दरमला ५ रुपयांत, कदाचित् ४॥ ही असतील, खाणावळ भागे. भात, चपाती, वरण, भाजी, तूप, साखर सर्व कांहीं बेतानें, पण असेच. दूध नाहीं तरी पुण्याचें नमुनेदार पारदर्शक ताक तरी असेच ! आंघोळीला पाणी पुण्यांतील तेव्हांच्या हौदांत गल्लोगल्लीं थंडगार मुबलक मिळे. वाटेल तितक्या बादल्या टाळक्यावर ओतून घेतल्या तरी कोणी विचारीत नसत. पाण्याच्या बाबतींत पुण्याइतका सुखी गांव त्या वेळीं सार्या जगांत कोठें नसेल ! बाकीचा चिल्लर खर्च आम्ही तिघांमध्यें अगदीं गोडीगुलाबीनें सहज वांटून घेत असूं. एकंदरींत त्या वेळचा माझा कॉलेजचा खर्च हल्लींच्या माझ्या मुलाच्या हायस्कूलच्यापेक्षां निम्म्याहूनही कमी येत असावा. एरवीं माझें शिक्षण झालेंच नसतें !
काटकसर : कॉलेजांत दरवर्षी दोन मोठ्या सुट्या होत्याच. त्या वेळीं घरीं येण्याजाण्याचा जो आगगाडीचा खर्च होई तो खाणावळीचा जो खर्च वांचे त्यांतून होई. कुडची स्टेशनावरून जमखंडीस जावयाला ३३ मैलांचा गाडीचा रस्ता आहे. कित्येक वेळां माझा सर्व बोजा घेऊन हा सर्व रस्ता मीं पायींच प्रवास केलेला मला नीट आठवत आहे. बैलगाडींत एका स्वारीला चार आण्यांपासून फार तर आठ आण्यांपर्यंत खर्च येई. तो वांचविण्यासाठीं मला हे ३३ मैल पायींच रखडावें लागे. आजची तरुण मंडळी मुंबईत अर्धा मैल जावयाचें झाल्यास निदान एक आणा ट्रामला खर्चून वर दोन आण्यांचा चहा पितात. एवढ्यांतच हात आटोपले तरी त्यांना काटकसरी म्हणण्यास मी तयार आहे.
मला दरमहा दहा रुपयेप्रमाणें एक वर्षांत १२० रुपये स्कॉलरशिप मिळे. त्यांत साठ रुपये तर कॉलेजची फी झाली. बाकीच्या साठ रुपयांत जितके महिने मी पुण्यास राहात असें तितके ५ रु तरी खाणावळीस द्यावे लागत. सुट्टींतले वांचलेले रुपये गांवी जाण्यायेण्यास, खोलीभाड्यांस आणि दिवाबत्ती, न्हावी, धोबी वगैरे खर्चास आवश्यक असत. मग माझ्या कॉलेजच्या पुस्तकांना मीं पैसे कोठून आणिले ह्याचा मला कांहींच थांग लागत नाहीं. जरूर तेवढींच पुस्तकें आमचीं स्वतःची निरनिराळीं असावींत; बाकीचीं कांहीं तिघांत मिळून होतीं. तरी एवढीं जरूर ती पुस्तकें आम्हीं कशीं विकत घेतलीं असतील, हें मला आतां कांहींच आठवत नाहीं. मात्र मीं तीं किंवा त्यांची किंमत कोणापासून चोरली नव्हती एवढेंच स्पष्ट आठवतें. अशा कठीण कात्रींत माझीं कॉलेजचीं पहिलीं तीन वर्षे, म्हणजे इंटरमिजिएटची दुसरी परीक्षा पास होईपर्यंत मीं कसे दिवस काढलें तें ईश्वर जाणे !
पैशांची टंचाई : माझी प्रिलिमिनरी म्हणजे कॉलेजांतील पूर्वीची चांचणी परीक्षा पास झाली. अर्थात् मला मुंबईच्या विश्वविद्यालयांतील पहिल्या प्रीव्हियस परीक्षेला बसावयाचें होतें. त्या परीक्षेची फी २० रुपये होती. ती कोठून आणावयाची हा मोठा तांतडीचा प्रश्न पडला. परीक्षेचा फॉर्म (अर्जाचा नमुना) भरण्याचे दिवस आले; पण वीस रुपये कांहीं मजजवळ येईनात. मी गांगरलों ! वेळ कठीण आला. प्रीव्हियसच्याही पूर्वीची एक अधिकच परीक्षा मजपुढें आली म्हणावयाची ! शेवटीं हताश होऊन बसलों असतां एका गृहस्थानें एक विचार सुचविला. नरहरपंत नांवाचे एक गरीब ब्राह्मण गृहस्थ भटकीसाठीं ताडपत्रीकरांच्या वाड्यांत जात-येत असत. त्यांचा व आम्हां विद्यार्थ्यांचा परिचय झाला होता. मी मराठा असून इतका शिकलों ह्याचें त्यांना कदाचित् कौतुक वाटत असावें. मी ह्या पेंचांत पडलों असें पाहून त्यांनीं मला रावबहादूर नवलकर नांवाच्या एका प्रभू सुधारक गृहस्थाकडे नेलें. त्यांनीं मला परीक्षेच्या फीकरितां दोन रुपये दिले व माझी फार निकडीची गरज आहे. म्हणून मला ताबडतोब मदत करावी अशा अर्थाची एक चिठ्ठी, आपल्या कांहीं मित्रांचीं नांवें मला कळवून, त्यांना दाखविण्यासाठीं दिली. परंतु ही चिठ्ठी घेऊन इतक्याजणांकडे जाणें मला फारच अवघड वाटूं लागलें. एक तर हीं माणसें फार मोठमोठीं होतीं आणि त्यांचे बंगले शोधून काढून त्यांच्यापुढें जाऊन उभा राहिलों तरी ते मला कसे वागवितील ह्याची मला फारच भीति वाटूं लागली. कारण अशा प्रकारच्या याचनेचा माझ्या आयुष्यांतला हा अगदीं पहिलाच प्रसंग होता. रावबहादूर नवलकरांच्या घरींदेखील मला रा. नरहरपंतांनींच बळेंबळें नेलें होतें. त्यांनींच मला भरीस भरवून रावबहादूर महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, सरदार कुप्पुस्वामी मुदलियार, वकील राजन्ना लिंगो वगैरे मोठमोठ्या माणसांकडे पाठविलें. इतर कांहींजणांकडे ही चिठ्ठी घेऊन मी उन्हातान्हांतून दीववाणा होऊन फिरलों; त्या सर्वांचीं नांवें आतां आठवत नाहींत. रुपये सारे १४ च जमले. फी भरण्याची घाई तर अगदीं गळ्याला फांसासारखी लागली. अशा स्थितींत कधीं न विसरण्यासारखी गोष्ट घडली ती अशी.
डॉ. शेळके : वरील चौदा रुपये जमविण्याकरितां मी ज्या गृहस्थांकडे गेलों त्यांत मराठा जातीचा कोणीच गृहस्थ नव्हता. प्रत्यक्ष म्हस्केसाहेबांकडे मी मुळींच गेलों नाहीं. कारण त्यांनीं आपल्या संस्थेंतून स्कॉलरशिप दिली, ह्याचेंच मला असह्य ओझें झालें होतें. फीला पुनः पैसे पाहिजेत, हें दैन्य त्यांचेपुढें दाखविण्याचें धैर्य मला मुळींच होईना. सबंध वर्षभर मीं जे काटकसरीचे हाज सोसलें त्यापायीं मदत मागण्यास जर मी त्यांचेकडे कधींच गेलों नाहीं, तर मग आतां तरी कसे जावयाचें ! शेवटीं नरहरपंतांनीं डॉ. शेळके नांवाच्या एका मराठा जातीच्या गृहस्थाच्या घरीं जाण्याचा आग्रह केला. शुक्रवार पेठेंत बाळंत स्त्रियांसाठीं जो दवाखाना आतां आहे तेथें पूर्वी म्युनिसिपालिटीचा एक दवाखाना होता. त्यांत शेळके हे डॉक्टर होते. हे मूळचे कोल्हापूरचे. तेथें त्यांचें एक घर आहे. ह्यांचेपुढें मी नवलकरांची चिठ्ठी ठेवल्याबरोबर त्यांनीं जें मला खरपुस तासडलें तें मला आमरण आठवेल ! ''मराठ्यांच्या कुळांत जन्मून असें हें भिक्षापात्र मिरविण्याची तुला लाज वाटत नाहीं ? जवळ पैसे नसल्यास गुरें राखावींत. कशास शिकावें ?....'' वगैरे वगैरे. ती चिठ्ठीच नव्हे तर मजजवळचे १४ रुपयेही ह्या मराठा जमदग्नीपुढें ठेवून तेथून निसटावें असें मला झालें. माझ्या अंगाला घाम आला.
सौ. बहिणाबाई : बाकीचे ६ रुपये आणि मुंबईला जाण्याचा खर्च ह्याबद्दल मला जी अनपेक्षित मदत झाली ती अशी - तेरदाळचे रा. विष्णुपंत देशपांडे हे माझे अत्यंत जिवलग बाळमित्र. माझ्यावर आलेली ही अडचण त्यांच्या लक्षांत आली. ते घरचे जरी श्रीमंत होते तरी ते स्वतः वयांत न आल्यानें त्यांचे हातीं पैसे खेळत नव्हते. त्यामुळें त्यांना तळमळ लागली. त्यांची प्रेमळ पत्नी सौ. बहिणाबाई यांना ही तळमळ पाहवेना. त्यांनीं आपल्या माहेराकडून दिवाळींतील भाऊबीजेच्या ओवाळणींत मिळालेले २० रुपये रा. विष्णुपंतांमार्फत मला पोंचविले. जुन्या वळणांतील ही साध्वी बाई आपल्या नवर्याचा मी मोठा भाऊ असें समजून मजसमोर अद्यापि कधींही उभी राहिली नाहीं. असा हा खर्या कळकळीचा अपूर्व मासला होता. मात्र ह्यापुढें मीं स्वतःसाठीं कोणापुढें भीक अशी कधींच मागितली नाहीं. तरी आतांपर्यंत माझा व माझ्यावर अवलंबून असलेल्यांचा योगक्षेम चालला ह्याचें श्रेय डॉ. शेळके ह्यांनाच देणें मला बरें वाटतें ! परोपकारासाठीं पुढें लाखों रुपये जमविण्याची पात्रता व इच्छा मला आली ह्यांतही कदाचित् डॉ. शेळके ह्यांचाच हा विरोधी आशीर्वाद कारण झाला असेल, नसेल कशावरून ?
आमच्या वेळेला आतांप्रमाणें प्रीव्हियसची परीक्षा कॉलेजांत घेत नसत. तिचेसाठीं आम्हांला मुंबईलाच जावें लागलें. त्या निमित्तानें मला ह्या मोहमई ऊर्फ मुंबईचें प्रथम दर्शन घडलें. ह्या प्रथम दर्शनाचा परिणाम मुळींच अनुकूल नव्हता. आम्ही अगदीं ऐन परीक्षेच्या वेळींच मुंबईस आलों आणि जागेपणाचे बहुतेक तास अभ्यासांत किंवा परीक्षेचे पेपर्स लिहिण्यांतच जात. त्याशिवाय मुंबईची कोंडलेली गर्दीची वस्ती, समुद्रकांठची घामट हवा, मुंबईच्या लोकांचा आत्मशून्य वरपांगी स्वभाव इत्यादि अनेक कारणें होतीं. कांदेवाडींत खत्रे यांच्या चाळींत दोन खणांचे एका खोलींत आम्ही कांहींजणांनीं जागा घेतली. त्या वेळीं ह्या दोन खणांना चार रुपये भाडें पडलें. तें आम्हांला किती जास्त वाटलें ! पण आतां त्याच जागेला १२ रु. पेक्षां जास्त भाडें पडत असावें. रात्रंदिवस जागून कशीतरी परीक्षा देऊन मी फार वेळ न दवडितां सुट्टींत जमखंडीस गेलों. परीक्षेंत पास झाल्याचा निकाल जमखंडीस समजला. माझ्यापेक्षां माझ्या आईबाबांनाच फार आनंद झाला !