ब्राह्मदेशाला जाण्याचा माझा मुख्य उद्देश, बौद्ध धर्माचें जीवन प्रत्यक्ष पहावें आणि स्वतः अनुभवावें हा होता. मंगलोरहून परत पुण्यास आल्यावर १९२५-२६ सालीं मीं बौद्धधर्मासंबंधीं विशेष अभ्यास केला. विशेषतः पाली भाषेंतील धम्मपद हें पुस्तक प्रो. चिं. वि. जोशी यांच्याजवळ वाचल्यापासून माझ्या मनाला मोठी शांति प्राप्त होऊन बर्याच अंशीं माझा स्वभावही बदलत चालला होता. दुसरा हेतु ब्रह्मदेशची सामाजिक सिथति पाहणें. त्या देशांतील सामाजिक व कौटुंबिक स्थितीचें मला फार कौतुक वाटत असे. ब्रह्मदेशांत जातिभेद तर नाहींत, पण स्त्री-पुरुषांत समानतेचें नातें किंबहुना स्त्रियांचा वरचष्मा आहे असें मीं ऐकलें होतें. बौद्ध धर्माचें जीवन पाहण्यासाठी विशेशतः एकान्त विहारांत राहून त्या धर्माचें रहस्य अनुभवण्याचा विचार मनांत येऊन मीं ही यात्रा करण्याचें ठरवलें. प्रथमतः मी ह्या प्रवासाची तारीखवार तपशील देऊन नंतर कांहीं मुख्य मुख्य गोष्टींचें विवेचन करीन.
ब्रह्मदेशांत गेल्यावर तेथें जातिभेद नसला तरी अस्पृश्यता आहे असा मला शोध लागला. त्याविषयींची तपशीलवार माहिती माझ्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या पुस्तकांत सविस्तर आली आहे. म्हणून तेवढा भाग मी येथें वगळतों.
ता. २१ जानेवारी १९२७ रोजीं तिसरे प्रहरीं पुण्याहून निघालों.
ता. २४ जानेवारीला कलकत्त्याला पोंचलों.
'मी बौद्ध आहें' : ता. २४ जानेवारीपासून ता. ६ फेब्रुवारीपर्यंत कलकत्त्याच्या ब्राह्म समाजाचा माघोत्सव होता. त्यांत एके दिवशीं ब्राह्म समाजाच्या मिशनरींची परिषद झाली. तींमध्यें भाषण करतांना मीं म्हटलें, ''मी बौद्ध आहें.'' हें ऐकून माझ्या मिशनरी बंधूंना आश्चर्य वाटेल. आमच्या ब्राह्म समाजांत निरनिराळ्या धर्मांतून माणसें येतात, हें खरें ना ? मग मी बौद्ध धर्मांतून आलों असलों तर काय चुकलें ? आज जर गौतम बुद्ध जिवंत होऊन आले आणि त्यांनीं ब्राह्म समाजाचें औदार्य पाहून त्यांत प्रवेश करण्याची इच्छा प्रदर्शित केली तर त्यांना तुम्ही ब्राह्म समाजांत घेणार नाहीं काय ? जेथें ख्रिस्ताला व बुद्धाला शिरकाव नाहीं तेथें मजसारख्या पामराची काय धडगत ! ह्या विषयावर वाद माजूं लागला हें पाहून अध्यक्षस्थानीं गुरुदास चक्रवर्ती हे बौद्ध प्रचारक होते, त्यांनीं उठून सांगितलें, ''रा. शिंदे ह्यांचा आध्यत्मिक भाव मनांत आणा. शब्दावर वाद नको. ब्राह्म समाज सर्वसंग्राहक आहे आणि रा. शिंदे हें त्याचें नमुनेदार उदाहरण आहे. आतां ते लवकरच ब्रह्मदेशांत बौद्ध धर्म पहावयास जाणार आहेत. तेथील लोकांना त्यांच्या ब्राह्म धर्माचा उदार भाव पाहून ते ब्राह्म समाज या दोघांना फायदाच होईल.''
ता. ८ फेब्रुवारी रात्रीं रंगूनला पोचलों. दुसरे दिवशीं बंदरांतून डॉ. पी. के. मुजुमदार, ४७ वा रस्ता, घ.नं. १५२ मध्यें पाहुणा झालों. न्यूयॉर्क शहराप्रमाणें रंगूनचे रस्ते आंकड्यांवरून उल्लेखिले जातात. ११ फेब्रुवारीला ब्राह्ममंदिरांत व्याख्यान देऊन ता १२ ला उपासना चालविली. ता. १९ ला रामानंद चतर्जी व मला रंगून ब्राह्म समाजानें बेंगाल ऍकॅडेमीमध्यें चहापार्टी दिली. ब्रह्मदेशचे, दक्षिण ब्रह्मदेश व उत्तर ब्रह्मदेश, असे दोन भाग आहेत. दक्षिण ब्रह्मदेशांत पाश्चात्य सुधारणेचा संस्कार, शिक्षण, व्यापार, राजकारण वगैरे द्वारां अधिक झालेला दिसतो. उत्तर ब्रह्मदेशांत जुनें वळण फार आहे. म्हणून मीं प्रथम दक्षिण ब्रह्मदेश फिरून पाहिला.
उ कोडण्णा : ता. २० फेब्रुवारीला रविवारीं सकाळीं रंगूनहून निघून मोलेमनला गेलों. तेथील मुख्य पॅगोडे पाहून एका वृद्ध फोंजीला (भिक्षूला) भेटून त्याचा मठ पाहिला. नंतर थाटून ह्या इतिहासप्रसिद्ध गांवीं गेलों. हें ठिकाण प्राचीन काळीं आंध्र राजाची राजधानी होती. म्या दबे नांवाचा पगोडा १००० फूट उंच टेकडीवर असलेला चढून पाहिला. ह्या निर्जन आणि एकान्त स्थळीं माझी ध्यानसाधना फार चांगली झाली. नेमेंद्र चाँ नांवाच्या विहारांत उ कोडण्णा (कौंडिन्य) नांवाच्या फोंजीला मी भेटलों. हे पूर्वाश्रमींचे डेप्युटि कलेक्टर होते. कोणाही प्रापंचिक गृहस्थास कांहीं काल बुद्ध भिक्षूची दिक्षा घेऊन परत गृहस्थाश्रमांत जाण्याला मुभा आहे. ह्या सवलतीला अनुसरून उ कोडण्णा यांनीं विश्रांतीसाठीं आणि अध्ययनासाठीं हा चौथा आश्रम घेतला होता. कोडण्णा यांच्या भेटीनें शांति व गंभीरपणा ह्याचा परिणाम माझ्या मनावर फार झाला. त्या विहाराचें वातावरणही आध्यात्मिक भावनांनीं भरलेलें होतें. इतकें कीं आपणही कांहीं काळ बौद्ध धर्माची उपसंपदा (दीक्षा) घ्यावी असें मला वाटूं लागलें. पोशाख व राहणी ह्याविषयीं कोडण्णा यांनीं जुने आचार घेतले तरी विचारांत ते अगदीं नवीन होते. मीं त्यांना विचारलें, 'बुद्धं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि' हीं तीन शरण्यरत्नें आहेत खरीं; पण बौद्धालाच तेवढें सरण जाऊन माझा बौद्ध धर्मांत प्रवेश होऊं शकणार नाहीं काय ? आणि तुम्ही मला दीक्षा देऊं शकाल काय ?'' त्यांनीं स्मितपूर्वक उत्तर केलें, ''तुमचा आध्यात्मिक भाव पाहून मला आनंद होत आहे. तुम्हांला बाह्य उपसंपदेची जरुरी तरी काय उरली ? शिवाय दिक्षा देण्यास मला अधिकार नाहीं. तो अधिकार मठाधिपतीकडे असतो. मी अद्यापि साधकच आहें. एकंदरींत तुमच्या भेटीमुळें मला मोठें समाधान झालें.''
२४ फेब्रुवारीला पेगूला गेलों व कल्याणिसीमा व श्वे थ याँ बुद्ध (उजव्या हातावर मान ठेवून, निजलेला मोठा पुतळा) पाहिला. ता. २५ सकाळीं पेगूचा मोठा बाजार पाहून सायंकाळीं रंगूनला आलों. ता. २६ ला रामदासनवमी आली. सायंकाळीं महाराष्ट्र मित्रमंडळाचे विद्यमानें रा. मयेकर यांचे घरीं 'महाराष्ट्रधर्म' ह्या विषयावर कीर्तन केलें. मिसेस् पी. के. मुजुमदार यांचेकडे मी पाहुणा होतों. ह्याच दिवशीं तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथि होती.
२ मार्चला मिसेस् मुजुमदार यांनीं आपले घरीं कांहीं बायकांना बोलावलें होतें. त्यांच्यापुढें 'महाराष्ट्रांतील बायकांचीं कामें' ह्या विषयावर मीं संभाषण केलें. ता. ५ मार्च, शनिवारीं नं. ६१ रस्ता लक्ष्मीनारायण धर्मशाळेंत 'बृहद् हिंदुधर्म' आणि 'जनतेचा उद्धार' ह्या विषयावर मी इंग्रजींत भाषण दिलें. ता. ६ ला महाराष्ट्र मित्रमंडळीच्या वार्षिक सभेमध्यें अध्यक्ष या नात्यानें भाषण केलें. ता. ७ ला सोमवारीं उत्तर ब्रह्मदेश पाहण्यास मंडालेकडे निघालों. गाडींत तिसर्या वर्गांत इतकी गर्दी होती कीं, एकसारखें १८ तास ताटकळत बसावें लागलें. ब्रह्मी लोकांचा भोंवतालीं कलकलाट चालू होता.
जिवंत माशांची विक्री : ८ मार्चला मंडाले येथें पोंचलों. रा. दत्तात्रय सखाराम नागवंशे ह्यांनीं माझा उत्तम पाहुणचार ठेवला. अहमदाबादचे डॉ. पायगुडे नांवाचे मराठे गृहस्थ भेटले. ता. १० ला मंडाले येथील टेकडीवरील श्वे या दो बुद्धाचा २५ फूट उंचीचा हात वर करून उभा असलेला पुतळा पाहिला. ता. ११ ला मंडालेंतील प्रमुख देवळांतील महात्म्या मुनीचा (बुद्ध) भव्य पितळी पुतळा पाहिला. ह्या देवळांत नेहमींच भक्तांची गर्दी असते. बाहेर अगणांत स्वच्छ तळें होतें. त्यांतून जिवंत मासे धरून कांहीं लोक ते विकावयास ठेवीत. भाविक लोकांनीं ते मासे विकत घेऊन पुन्हां पाण्यांत सोडले असतां पुण्य लागतें, अशी त्यांची समजूत होती. पुन्हां पुन्हां तेच तेच मासे धरल्यानें ते इतके माणसाळून गेले होते कीं, ते आपोआपच टोपलींत येऊन पडत.
टॉ सिन को : मृतमांस : मंडाले येथील जुन्या राजाचा वाडा आणि ज्या ठिकाणीं लो. टिळकांना ठेवलें होतें तो राजकीय तुरुंगही मीं पाहिला. मंडालेहून कांहीं अंतरावर पूर्वेकडे मेमियो नांवाचें हवा खाण्याचें ठिकाण आहे. तें ३४८१ फूट उंचीवर वसलें आहे. तेथें टॉ सिन को नांवाच्या प्राचीन वास्तुशास्त्रज्ञाकडे मी २० तास पाहुणा होतों. ते ब्रह्मदेशचे डॉ. भांडारकरच म्हणावयाचे. त्यांच्याशीं ब्रह्मी पुरातन वास्तुविषयासंबंधीं बराच विचारविनिमय झाला. माझी फकिरी वृत्ति दिसत असूनही इतकी शोधक बुद्धि पाहून त्यांना आश्चर्य वाटत असल्याचें त्यांनीं बोलून दाखवलें. हे विद्वान् गृहस्थ अगदीं युरोपियन थाटांत राहात असत. टेबलावर जेवीत असतां एक चमत्कारिक विषय भाषणांत निघाला. ब्रह्मी लोक मृत मांस खातात असें मीं ऐकलें होतें. पण अधिकारयुक्त रीतीनें या गोष्टीचा उलगडा करून देणारा मला अद्याप कोणी भेटला नव्हता. तो विषय मीं मोठ्या अदबीनें टॉसाहेबांकडे काढला. ते म्हणाले, ''याचें तुम्हांस आश्चर्य तें कां वाटतें ? हो, आम्ही मृतमांस खातों. तुम्हीही मांस खातां ना ? मग तें जिवंतच असतें काय ? एखादा प्राणी अपघातानें मेला किंवा अन्य दृष्टीनें त्याचें मांस खाण्यालायक असेल तर तें मांस खाण्यास हरकत कोणती ? उलटपक्षीं एखादा प्राणी आजारी असला किंवा अन्य तर्हेनें त्याच्या अंगांत विष भिनलें असलें तर तो केवळ मारण्यानें शुद्ध होतो काय ? मेलेला काय किंवा मारलेला काय हा प्रश्न नाहीं. खातेवेळीं त्याचें मांस शुद्ध असलें म्हणजे पुरें.''
१३ मार्च रविवारीं सकाळीं मंडालेहून दक्षिणेकडे ८ मैलांवर अमरापुरा या गांवीं साँडर्स वीव्हिंग इन्स्टिट्यूटचे प्रि. रा. महादेवराव मांडे यांचेकडे उतरलों. २४ तास राहिलों. ता. १४ ते १८ पर्यंत सगाईन टेकडीवरील विहारांत राहिलों. ता. १८ ला अमरापुरास परत. दोन दिवस अमरापुरा व मंडाले येथें राहिलों. श्री. मांडे यांची पत्नी मोठी सच्छील व भाविक बाई होती.
महादेवराव मांडे : दक्षिण ब्रह्मदेशांत रंगून येथें ब्राह्म समाज व महाराष्ट्र मित्रमंडळी या दोन संस्था असूनही तेथील मंडळींत धर्माविषयीं विशेष कळकळ दिसून आली नाहीं. ब्राह्म समाजांत डॉ. पी. के. मुजुमदार व 'महाराष्ट्र मित्रमंडळांत' रा. सबनीस एवढेच काय ते कळकळीचे पुरुष दिसले. पण उत्तरेकडे मंडाले येथें दत्तोपंत सखाराम नागवशे आणि अमरपुरा येथें महादेवराव मांडे आणि त्यांच्या कुटुंबांतील मंडळी ह्यांना जरी ब्राह्म समाजाची फारशी माहिती नव्हती, तरी माझ्या दोनचार दिवसांच्या समागमांत, ब्राह्मसमाजाविषयीं ह्यांना फार आदर उत्पन्न झाला. रा. मांडे यांच्या इच्छेनें त्यांच्या घरीं ब्रह्मोपासना झाली. मिसेस् मांडे व त्यांचा मुलगा विद्याधर हीं श्रद्धेनें उपासनेस बसलीं होतीं. या समयीं मंडालेहून आलेले रा. नागवंशे व रा. भिडे हेही हजर होते. ह्या उपासनेचा परिणाम सर्वांवर इतका इष्ट घडला कीं, पुढील रविवारीं सगाईहून परत आल्यावर मंडाले येथें रा. मांडे, पायगुडे व नागवंशे ह्या तिघांच्या कुटुंबांतील मंडळींनीं नागवंशे ह्यांच्या बंगल्यावर सर्व दिवस उपासना, चिंतन, भजन, संभाषण व भोजन ह्यांत घालवण्याचें ठरवलें होतें. ही सर्व मंडळी मूळ महाराष्ट्रांतूनच आलेली म्हणून मला अधिकच आपलेपणा वाटत होता. नागवंशे यांनीं आपल्या माडीवर उपासनेची सांगितल्याप्रमाणें तयारी ठेवली होती. सर्व बेत ठरल्याप्रमाणें झाला. येथें एखादा हिंदी जाणणारा मिशनरी आल्यास ह्या मंडळीची ब्राह्म समाज स्थापण्याची तयारी दिसली. रा. मांडे यांचेकडे वरचेवर कौटुंबिक उपासना होई. हे देहु गांवीं राहणारे देशस्थ ब्राह्मण होते. मला निरोप देतांना त्यांना गहिंवर आला. त्यांनीं माझ्या जुन्या बहाणा आठवणीदाखल स्वतःला ठेवून घेतल्या आणि बाजारांतून पुष्कळ ब्रह्मी चिजा आणून आठवणीदाखल मला दिल्या.
मनुहा : २३ मार्चला सकाळीं मंडाले सोडलें. ७॥ वाजतां ऐरावती नदीवरून बोटींतून पॅगान ह्या शहराकडे निघालों. सायंकाळीं मी जाँ ला पोचलों. वामन पाठक व थत्ते बोटीवर आले. बर्मा कॉटन कंपनींत हे नोकर होते. ता. २४ ला तिसरे प्रहरीं पॅगानला पोंचलों. धक्क्यावर प्रिन्सिपॉल उ सैन हे मला घेण्यास आले होते. पॅगान येथें लाखेचीं भांडीं व इतर वस्तु तयार करण्याची सरकारी शाळा आहे. त्याच शाळेचे उ सैन हे प्रिन्सिपॉल होते. त्यांचेकडे तीन दिवस राहिलों. पॅगान हें प्राचीन महत्त्वाचें शहर आहे. त्याच्या आसमंतात् अनेक प्राचीन पॅगोडे आहेत. ता. २५ ला महाबोधी, अथपिन्या, आनंद हीं देवळें पाहिलीं. उ शांती मा या फोंजीचें (भिक्षूचें) दर्शन घेतलें. पॅगानचे दक्षिणेस टाँय वॉ नांवाचें एक चांडालांचें खेडें आहे. तेथील प्राचीन मनुहा राजाचें देऊळ पाहिलें. सायंकाळीं अंधारी रात्र झाली तरी दोन मुलें व एक कंदील बरोबर घेऊन रात्रींच पाहिलें. ह्या देवळांत मनुहा राजा नजरकैदेंत होता. ह्याच्याच वंशजांस पुढें वंशपरंपरा अस्पृश्य करण्यांत आलें.
थैली : २७ मार्च रविवारीं न्याउ गांवास निघालों. पॅगानच्या उत्तरेस ५ मैलांवर हा गांव आहे. बरोबर प्रि. उ सैन हेही होते. जवळच पयाचून नांवाच्या अस्पृश्य मानलेल्या जातीचें खेडें पाहिलें. मनुहा ह्या तेलंग राजाच्या वंशजाची ही स्थिति ब्रह्मदेशच्या अनवरथ राजानें केलेली मीं प्रत्यक्ष पाहिली. त्याच्या वंशांतल्या हल्लींच्या पुरुषाचें घर पाहून मला भडभडून आलें. ता. ३० ला थयोमयो व अलनम्यो ही गांवें पाहिलीं. अलनम्यो येथें रा. वाय. के.कर्णीक जपान कॉटन कंपनीचे मुख्य कारकून व इस्त्राइल गृहस्थ बेंजामिन नागवेकर हे भेटले. कुशिनारा पॅगोडांतील गौतम बुद्धाचा शेवटचा आजार. मृत्यु, स्मशानयात्रा, दहन वगैरेंचे मूर्तिमंत देखावे पाहिले. ब्रह्मदेशच्या प्रवासांत जेथें जेथें महाराष्ट्रबंधु भेटले तेथें तेथें त्यांनीं माझें फारच सन्मानपूर्वक हार्दिक स्वागत केलें. ता. ३१ रोजीं प्रोमला पोहोंचलों. स्वरूपचंद्र गलियाराकडे उतरलों. त्यांच्या कारकुनानें बाजार दाखवला. २ एप्रिल रोजीं रंगूनला परत आलों. ता. ३ ला सायंकाळीं महाराष्ट्र मित्रमंडळानें मला पानसुपारी दिली व अकस्मात् ३५१ रु. ची थैली अर्पण केली. बॅ. पाटसकर हे अध्यक्ष होते. मीं ही थैली कोणत्या तरी सार्वजनिक कृत्यास वाहण्याची परवानगी मागितली. पण हे पैसे माझ्या कुटुंबाच्याच उपयोगासाठीं जमवले असल्यानें तसाच आग्रह पडला. शेवटीं सेक्रेटरी रा सबनीस यांनीं माझा विश्वास पटेना, म्हणून हे पैसे माझे वडील चिरंजीव प्रतापराव यांच्याकडे पाठवले.
श्वे डगून पॅगोडा : ५ एप्रिल रोजीं रंगून येथील श्वे डगून पॅगोडा पाहिला. श्रावण, कार्तिक फाल्गुन येथें वर्षातून तीन वेळां मोठा मेळा जमतो. त्या वेळीं अन्नाच्या राशीच्या राशी पडतात. पण हें नैवेद्याचें अन्न वरिष्ठवर्गीय कोणीही खात नाहीं. तें पयाचून नांवाच्या अस्पृश्यांना देण्यांत येतें. त्यांनाही तें पुरून उरल्यामुळें कुत्र्या मांजराची धन होते. येथील लाकडी काम फार सुंदर दिसलें. तसें मंडालेच्या राजवाड्यांतही दिसलें नाहीं. सभ्य लोकही ह्या देवळांतील अंगण झाडण्यांत पुण्य मानतात; मूर्तीवर पाणी घालण्यांत पुण्य मानतात. प्रत्येक डबाभर (रॉकेलच्या) पाण्याला दोन आणे किंमत ठरवलेली होती. ट्रस्टीकडून लायसेन्स होतें. इतका विस्तीर्ण श्रीमान् सुंदर व भव्य फया (देऊळ) दुसरा कोठेंही नाहीं. हा टेकडीवर आहे म्हणून पाण्यास पैसे खर्चावे लागतात. तसेंच ३०० फूट उंचीवर बांधण्यांत आल्यानें हा रंगूनला समुद्रावरून येतांना प्रथमच दिसतो. येथें चिनी, सयामी लोक दिसतात. देवळांत ठिकठिकाणीं हजारों मूर्ति आहेत. ह्यांच्यापुढें पूजेचा संभार सुशोभित दिसतो. देवळांत एरव्हीं देखील पुष्कळ लोक उपासना करीत असतांना दिसतात. कोणास कोठेंही जाण्याची मनाई नाहीं. झाडूवाले हिंदी मजूर व पहारेवाले, ट्रस्टीचे पोलीस, पुरभय्ये दिसले. भोंवतालचें गंभीर वातावरण पाहून मनावर फार आध्यात्मिक परिणाम घडतो. ता. ८ शुक्रवारीं १९२७ रोजीं रंगून सोडलें. फेब्रुवारी ८ पासून आज ८ एप्रिलपर्यंत मी ब्रह्मदेशांत हिंडत होतों. 'एलिफंटा' बोटीनें मी मद्रासकडे निघालों. ता. ११ एप्रिलला मद्रासला पोचलों. जॉर्डा टाउन ब्राह्ममंदिरांत उतरलों. ता. १२ एप्रिलला प्रो. लक्ष्मी नरसू मिंट रोड नं. ३६७ यांची भेट घेतली. हा गृहस्थ मद्रासकडे बौद्ध धर्माचा प्रसार करण्यांत फार परिश्रम घेत आहे. ह्यांनीं मद्रासकडील पारिया नांवाच्या अस्पृश्यांत बुद्धधर्माचा प्रसार करून त्यांचे कांहीं समाजही ते चालवीत आहेत. अशा एकदोन समाजांत मी उपासनेस गेलों होतों. ता. १४ एप्रिल गुरुवारीं सायंकाळीं पुण्यास आलों. रा. कृ.गो. पाताडे, रा.सुभेदार राघोराम घाडगे यांनीं हार घालून माझें हार्दिक स्वागत केलें.
सगाईन टेकड्यां : जी. डब्ल्यू. बर्डस् Wanderings in Burma ह्या पुस्तकांतून घेतलेल्या उतार्याचें खालील भाषांतर आहे. ''सगाईनचें प्राचीन नांव जयपुरा. इरावती नदीच्या पश्चिम तीरावर आहे. ह्याच्यासमोर पूर्व तीरावर अवा अथवा रत्नपूर असें गांव होतें. हल्लीं येथें मध्य ब्रह्मदेशच्या मध्यभाग कमिशनरचें ठाणें आहे. नांवाची व्युत्पत्ति : सितकयांग. सित् = झाडाचें नांव, कयांग = झाडाची शाखा. दंतकथा अशी आहे कीं, जुन्या पॅगान येथील राजधानींतले दोन ब्रह्मी राजपुत्र एका पडावांत बसून इरावती नदीतून खालीं तरंगत होते. ते या टेकडीजवळ झाडाच्या फांदीजवळ अडकले. ते पुढें तरंगत प्रोमपर्यंत गेलें. त्यांच्या पोटीं पुढील राजवंश झाला. त्यांनीं ख्रिस्ती शकापूर्वी ४८३ वर्षांपासून ख्रिस्ती शकानंतर ९५ वर्षे राज्य केलें. इरावती नदीचे पश्चिम कांठीं उत्तरेकडे ह्या टेकड्यां नदीला लागून समांतर आहेत. १८९४ मध्यें ह्या टेकड्यांवर २४ मठ होते. त्यांत ६५७ भिक्षु राहात होते. त्या पूर्वी प्रथम येथें नऊच मठ होते. टेकडीच्या उतरणीवर मठांच्या पार्श्वभागी भिक्षूंनीं कित्येक गुहा कोरल्या होत्या. ह्या लेण्यांमधून हवा आणि प्रकाशाला बहुतेक प्रतिबंधच होता. दिवसांतून ५।७ तास भिक्षूंनीं त्या ठिकाणीं ध्यान करावें असा बौद्ध विनय ऊर्फ दंडक आहे.''
महाशिव चाँग : सगाईन हें टेकडीवरील ठिकाण सर्व ब्रह्मदेशांत अत्यंत पवित्र धर्मक्षेत्र आहे. हल्लीं या टेकडीवर भिक्षु आणि भिक्षुणींचें मिळून सुमारें ४०० विहार ऊर्फ मठ (ब्रह्मी भाषेंत चाँग म्हणतात. गचा उच्चार होत नाहीं.) आहेत. भिक्षूंची संख्या १००० व भिक्षुणींची संख्या २००० असावी. ता. १४ मार्चला अमरपुराहून तिसरे प्रहरीं मी सगाईनला निघालों. रा. महादेवराव मांडे यांनीं सगाईन येथील गांवीं राहणारे उ माँ माँ, एम. एल.सी. नांवाच्या एका श्रीमंत पारशी गृहस्थास पत्र लिहून सगाईन टेकडीवर माझी राहण्याची उत्तम व्यवसथा करून ठेवली होती. माझ्याबरोबर रा. वासुदेव गोविंद भिडे नांवाच्या एका पोक्त गृहस्थाला माझें दुभाष्याचें काम करण्याला दिलें होतें. हे कोंकणस्थ पेन्शनर ब्राह्मण गृहस्थ ब्रह्मदेशांत बरींच वर्षे होते. उत्तर ब्रह्मदेशांत असतांना यांनीं माझें दुभाषगिरीचें काम चांगलें केलें. ब्रह्मी, इंग्रजी व मराठी या तिन्ही भाषा यांना चांगल्या येत होत्या. भिडे आणि मी इरावती नदी ओलांडून वरील उ माँ माँच्या घरीं ता. १४ रोजीं तिसरे प्रहरीं पोंचलों. येथें आम्हां दोघांचा उत्तम प्रकारें सत्कार झाला. उ माँ माँ हे पारशी बाप व ब्रह्मी आई ह्यांच्या पोटचे सभ्य गृहस्थ होते. त्यांनीं आपली मोटार देऊन सायंकाळीं टेकडीवर पोंचवलें. माझ्याबरोबर उ पो विन हे भले ब्रह्मी वृद्ध गृहस्थ आदरपूर्वक आमची सरबराई करीत होते. आम्ही महाशिव चाँग ह्या विहारांत उतरलों. मुख्य फोंजी उ कुमार यांची ओळख झाली. त्यांचे हाताखालीं काम करणारे तरुण शिष्य व भिक्षु उ विलास हे वयानें ३२ वर्षांचे होते. मुख्य फोंजी उ कुमार ४५ वर्षांचें होते. दोघांनाही पाली भाषा थोडी येत होती; पण ब्रह्मी उच्चार फार वाईट असल्यानें ह्या पालीचा मला कांहीं एक फायदा झाला नाहीं. उ विलासाला थोडें इंग्रजीही येत होतें. त्याचा फायदा घेऊन ते आमचा वेळोवेळीं समाचार घेत व मदत करीत. आमची उतरण्याची सोय एका स्वतंत्र बंगल्यांत केली होती. उ कुमार मुख्य देवळांतच निजतो. उ विलास व त्याचे विद्यार्थी दुसर्या बंगल्यांत राहतात. याशिवाय त्या मठाच्या आवारांत दुसरे चार पांच लाकडी बंगले होते. एकंदर जागा दहा एकर होती. एवढ्या आवारांत नऊच माणसें होतीं. ह्यांना रोज पोषक कमिटीकडून (तांदूळ मंडळीकडून) रोज पुरेसे तांदूळ व थोडीशी भाजी मिळत असे. शिवाय रोज भिक्षुणी मठांतून शिजलेल्या उत्तम भाज्या, मासे, मांसान्न, आमट्या, लोणचीं वगैरे देतच असत. सकाळीं ६ वाजतां भिक्षूंची न्याहारी व ११॥ वाजतां मुख्य जेवण होत असे. मग दुसरे दिवशीं सकाळपर्यंत जेवणाचें नांव नाहीं. तहान लागल्यास फक्त पाणी प्यावें. आमच्या जेवणाची सोय उ माँ माँ यांनीं स्वतंत्रपणें व उत्तमपणें केली होती. मंडाले येथील सुवासिक तांदूळ, तरकार्या लोणचीं वगैरेंनीं युक्त असें जेवण फार रुचकर लागे.
भिक्षुणी मठ : ता १५ मार्च रोजीं सकाळीं पुष्कळ भिक्षुणी मठ हिंडून पाहिले. बरोबर उ विलास दाखवण्यास होतेच. ही टेकड्यांची रांग पांचसात मैल लांबपर्यंत इरावतीचे कांठांनीं पसरली होती. निरनिराळ्या टेकड्यां, खोली दर्यांवरील उंच शिखरें, जागजागीं विहारांनीं खेंचून भरल्या होत्या. शिखरांवर देवळें, उतरणीवर मठ अशी रमणीय शोभा होती. वरपासून खालपर्यंत दाट झाडी, अत्यंत स्वच्छ भूभाग, गर्द छाया आणि झुळझुळ वाहणारी शुद्ध हवा अशीं शारिरिक व आध्यात्मिक सुखाचीं विपुल साधनें ह्या पुण्यक्षेत्रीं भरलीं होतीं. इतकें असूनही ह्या पांचसात मैलांत गृहस्थाश्रमाचा मागमूसही नव्हता. स्वयंपाकघरच नव्हतें तर चूल व धूर यांची वार्ता कोठून असणार ? भिक्षूंनीं भिक्षा मागून तरी अन्न आणावें नाहीं तर भिक्षुणींनीं त्यांना अन्न आणून द्यावें. मठांत कोणतेंही काम हातानें करावयाचें नसतें. तरी सर्व प्रदेशांत स्वच्छता व टापटीप, शांति, समाधान व स्तब्धता यांमध्यें कोठेंही खंड दिसत नव्हता. हीं सर्व कामें साधारण मजुरांकडून करून न घेतां बाल आणि तरुण शिष्यवर्गाकडूनच आटोपून घेण्यांत येत होतीं. विहारांची खेंचाखेंच झाली असूनही नवीन विहार बांधण्याचें काम चालू होतें. भिक्षुणींना भिक्षूंप्रमाणें मान देण्यांत येत नसे. त्यांनीं कोरान्न भिक्षा मागावी. जरूर पडल्यास शिजवून भिक्षूंस वाढावें भिक्षूंच्या मठांत गेलें असतां कोणी कितीही श्रीमंत अथवा मोठ्या दर्जाचा असो, आवारांत शिरण्यापूर्वी त्याला पायांतले जोडे हातांत घ्यावे लागत असत. ते न काढल्याबद्दल युरोपियनांचेही खून पडलेले आहेत असें ऐकलें आहे. म्हणून जोडे काढून आंत जावें असा ब्रह्मदेशभर सरकारी वटहुकूम आहे आणि तशा जागजागीं पाट्याही आहेत. भिक्षुणींच्या मठांत मात्र जोडे घालून जाण्यास परवानगी आहे. एका विद्वान् भिक्षुणीची भेट झाली. ती आपल्या शिष्येस पाली शिकवीत होती. धम्मपद पुस्तकांतील सहस्त्रवग्ग हा अध्याय तिनें मला आपल्या शिष्यिणींकडून वाचून दाखवला. जोडाक्षर आल्याबरोबर तें उच्चारतांना शिष्यिणीचे जे हाल होत ते पाहून माझेही बरेच हाल झाले. समोरून भिक्षु आला तर इतर सामान्य जनाप्रमाणें भिक्षुणीस रस्त्यावर जमिनीला गुडघे व कपाळ टेकून भिक्षूला तीन वेळां नमस्कार करावा लागे. ब्रह्मदेशांत इतर सर्व ठिकाणीं ऐहिक बाबतींत स्त्रियांना पुरुषाबरोबर किंबहुना कांकणभर अधिकच मान असला तरी धार्मिक बाबतींतील स्त्रीपुरुषांचा पंक्तिप्रपंच पाहून मला आश्चर्य वाटलें. ह्या भेदाला ब्रह्मदेश जबाबदार नसून हिंदुस्थानांतून आलेला बौद्ध धर्म आहे.
ता. १५ मार्चला तिसरे प्रहरीं उ माँ माँ आणि उ पो विन हे नेहमींप्रमाणें महाशिवचाँगमध्यें आमच्या समाचारास आले. उ कुमार आणि शेजारच्या मठांतील मुख्य फोंजी ह्यांच्याशीं आमचें दोन तास भाषण झालें. सबंध भेटींत हे दोन श्रीमंत ब्रह्मी गृहस्थ भिक्षूंचा मान राखण्यासाठीं मांजराप्रमाणे जमिनीला बिलगून बसले होते. भिक्षु उभा असतां उपासकानें (सामान्य माणसानें) जमिनीवर बसावें; भिक्षु बसला असतां जमिनीला पडून बिलगावें. एकंदरींत भिक्षूपेक्षां उच्च पातळीवर जाऊं नये अशी ही मान देण्याची ब्रह्मी तर्हा आहे.
श्वे जिन् आणि तु धम्म : संभाषणाचा विषय पुढीलप्रमाणें :- श्वे जिन् आणि तु धम्म (सुधर्म) असे दोन मुख्य पंथ ह्या टेकडीवर आहेत. पहिला बौद्धविनय (बुद्धशिस्त) कडकडीत पाळतो. उदा. (१) विडी न पिणें, (२) विडा न खाणें, (३) नाटकें न करणें, न करूं देणें व न पाहणें, (४) पैशास न शिवणें, (५) प्राण्यानें ओढलेल्या गाडींत न बसणें, (६) गांवांत छत्री वगैरे आढ्यतेचा प्रकार न ठेवणें इत्यादि इत्यादि. ह्या पंथांत कित्येक भिक्षु शाकाहारी आहेत. उ खंती (क्षांती) च्या प्रयत्नामुळें ब्रह्मदेशांत शाकाहार वाढत आहे. निदान गोहत्तेला थोड तरी आळा बसत आहे. सुधर्मपंथांत इतका कडकडीतपणा नाहीं. धर्ममतांत कांहीं फरक नाहीं. ब्रह्म समाजाचें ध्येय सांगण्याचा मीं प्रयत्न केला; पण त्याचा परिणाम भिक्षूंवर झाला नाहीं. कारण त्यांची कूपमंडूक वृत्ति. ऐकून घेण्याची तयारी दिसेना. ब्राह्म समाजाची सर्वसंग्राहक तौलनिक वृत्ति पाहनू भिक्षूंच्या कपाळाला आंठ्या पडूं लागल्या. ब्राह्म समाज म्हणजे एक धड ना भाराभर चिंध्या असा गैरसमज होऊन भिक्षूंची तब्येत किंचित् गरम होऊं लागली असें दिसलें. आमचा दुभाषीपणा स्वतः उ माँ माँ, एम. एल. सी. ह्यांनीं चालवला होता. त्यांनीं चतुरपणें उ कुमाराची समजूत घातली. एरव्हीं ह्या बाबतींत अवास्तव गैरसमज वाढून आम्हांला पाहुणचारास मुकावें लागलें असतें. मी ह्या विहारांत उ माँ माँ च्या औदार्यानें उतरलों होतों. तरी मी नास्तिक आहें असें समजलें असतें तर मला बाहेर निघावें लागलें असतें. पण मीही एका मोठ्या धर्मचळवळीचा भिक्षु आहे व जगांत फिरून बौद्ध धर्माचा मोठ्या अभिमानानें अभ्यास करीत आहे हें नीट समजावून दिल्यावर भिक्षूंची समजूत पटली. हिंदुस्थानांत बौद्ध धर्मप्रसाराची चळवळ चालल्याचें ऐकून भिक्षूंना आनंद झाला.
चार वर्ग : मी ह्या ठिकाणीं एकंदर ३॥ दिवस होतों. (४ रात्री व तीन दिवस) एकंदर ठिकाणांतील पवित्र वातावरण पाहून पहिल्याच दिवशीं मजवर फार परिणाम झाला. कोणताही विधिसंस्कार न करतां मीं आपल्या स्वतःचच मनानें ह्या ठिकाणीं असेपर्यंत भिक्षूचें व्रत धारण केलें. एकान्तवास, शुद्ध चांदणें, कसलीही दगदग नाहीं, ददात नाहीं. माझ्यापुढें बौद्ध धर्माचा इतिहास साद्यंत उभा राहिला. बुद्धचारित्र्य मूतिमंत दिसूं लागलें. रात्रीं उपासनालयाकडे गेलों. दार झांकलेलें होतें. बाहेरच बसून किती तरी वेळपर्यंत ध्यान केलें. सकाळीं पुन्हां पहाटे उठून हाच अनुभव घेतला. मठांतला गुरुशिष्यसंबंध पाहिला तो असा :- बाहेरून येणारे विद्यार्थी :- (१) कोईन् म्हणजे मुंज झालेले पीतांबरधारा २० वर्षांखालचे शिष्य. (२) उब जेन् म्हणजे २० वर्षांवरचे दीक्षा घेतलेले तरुण भिक्षु (३) मठाचा मालक व चालक ऊर्फ शास्ता ह्याला फोंजी म्हणतात. (४) शिवाय कप्पियादायका नांवाचा गृहस्थाश्रमी व्यवस्थापक मदतनीस कोठें कोठें आढळतात. असे चार प्रकार झाले. बाहेरून येणारे विद्यार्थी सकाळचें जेवण विहारांतच जेवतात. दोन प्रहारानंतर आपले घरीं जेवून रात्रीं निजण्यास आपल्या विहारांतच येतात. बाकीचे सर्वजण विहारांतच राहतात. रात्रीं अंधार पडल्यावर कोणीही विहाराचे बाहेर जरुरीच्या कामाविना आणि फोंजीच्या परवानगीविना जाऊं नये असा सक्त नियम आहे. अंधार पडल्यावर कोणतीही भिक्षुणी कोणत्याही सबबीवर भिक्षूंच्या मठांत येऊं शकत नाहीं.
हाडांचा सांगाडा : श्वे जिन पंथाच्या मुख्य आश्रमांतील एका खोल गुहेंत मी गेलों असतां एका कोपर्यांत हाडांचा सांगाडा उभा केलेला मीं पाहिला. त्याच्यावर लय लावून अनित्याची (सर्व जग क्षणभंगुर आहे ही भावना) साधना साधावयाची असते. ह्याशिवाय उपोसथाचे दिवशीं (उपवासाचे दिवशी) उपासकांना (सामान्य जनांना) यात्रेकरूना किंवा साधारण पांथस्थांना थोडे दिवस उतरण्यासाठीं झया (धर्मशाळा) एक किंवा अधिक असतात त्या निराळ्या. पाण्यासाठीं विहिरी, तळीं, बहिर्विधीसाठीं पायखाने, चिंतनासाठीं अगदीं एकान्त जागीं बांधलेल्या झोपड्यांही वेगळ्या असतात. एकंदरींत बौद्ध विहारांतील देखावा व वातावरण फारच शांतिदायक व उन्नतिकारक असतें यांत शंका नाहीं.
उपोसथ : दोन अष्टम्या, पौर्णिमा, अमावास्या असे महिन्यांतून चार दिवस उपोषथाचे म्हणजे उपोषण करण्याचे असतात. त्या दिवशीं गृहस्थलोक एकमुक्त राहून उपासनेसाठीं विहारांत येतात. ह्या दिवशीं विद्यार्थ्यांना अनध्याय असतो पण आश्रमाची झाडलोट करण्याचें काम बरेंच असतें. आश्रम, साधारणतः दहाबारा एकर विस्तीर्ण असतो. त्यांत झाडे, गुंफा, वाटिका बर्याच असतात. ती सर्व जागा रमणीय व स्वच्छ ठेवण्यांत येते. हीं सर्व कामें विद्यार्थी व कोईन् करतात.
प्राथमिक शिक्षण : ब्रिटिश सरकाराचे पूर्वी प्राथमिक शिक्षणाचें काम हे विहारच करीत असत. इतर देशांचे मानानें प्राथमिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या फारच मोठी आहे व होती. गांवांत लहानमोठ्या प्रमाणांत ५०० पासून ३०० पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या (अंदाजें) असे. आश्रमांत कोणतेंही काम मजुराकडून करवून घेण्यांत येत नाहीं. तरी लहानमोठीं कामें सर्व लहानथोर बिनतक्रार व बिनबोभाट करीत असत. फोंजीशीं व कोईनशीं सर्वांचें वर्तन अत्यंत आदराचें असे. ह्या विहारांतील शाळा सरकारी विद्याखात्यानें मंजूर केलेल्या असतात. ब्रह्मदेशांत सर्वत्र पसरलेले हे विहार बुद्धधर्माचा जिवंतपणाच नव्हे तर उपयुक्तताही दाखवतात.
ता.१७ मार्च रोजीं फाल्गुनी पौर्णिमा आली. हा दिवस मुख्य उपोषणाचा होता. उ विलासनें आज भिक्षुणींचे कांहीं मठ दाखवले. हे मठ भिक्षुणी अगदीं स्वतंत्रपणें व दक्षतेनें चालवतात. प्रपंचांत तर सर्व बहुतेक व्यवहारांत ब्रह्मी स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या वर असतो, पण परमार्थांतही हा स्वतंत्र बाणा पाहून कौतुक वाटले.
तिसरे प्रहरीं श्वे जिन् पंथाचे सर्व भिक्षु आपल्या मुख्य मठांत जमले. उ विलास यांनीं आम्हांलाही तेथें नेलें. त्या वेळीं पालींत लांब प्रार्थना झाली आणि कांहीं ठराविक संघाचे प्रसंग झाले. येणेंप्रमाणें ३॥ दिवसांच्या संन्यासाचें पारणें फेडलें. ह्या पुण्यक्षेत्रांत संनयासधर्माचे सोहाळे अवलोकून ता.१८ मार्चला मीं ह्या स्थळाचा मोठ्या कष्टानें निरोप घेतला. पुर्वेकडील टेकडीच्या उतारावरील पायर्या उतरून इरावती नदीच्या पडावांतून आम्ही अमरपुर्यास आलों.
ख्रिस्ती धर्मांत जसा पोप ख्रिस्ताचा इहलोकींचा प्रतिनिधि व सर्व पारध्यांचा शास्ता तशाच प्रकारचा जवळजवळ बुद्धभिक्षूंचा शास्ता, ब्रह्मदेशांत तादना बँ नावांचा सर्वश्रेष्ठ धर्मधिकारी आहे. पण ऐतिहासिक दृष्ट्या पाहातां बुद्धाचा प्रतिनिधि म्हणून बौद्ध धर्मांत अशा अधिकार्यांस जागा नाहीं. ज्यांनी उठावें त्या भामट्यांनीं पीतांबरधारी होऊन भिक्षु व्हावें आणि धर्मांत व व्यवहारांत गोंधळ माजवावा अशांचा योग्य बंदोबस्त व्हावा व आपल्या राजकीय अधिकाराला पाठिंबा मिळावा म्हणून हे धर्माधिकारीपद प्राचीन ब्रह्मी राजांनीं निर्माण केलें होतें. प्रत्येक ब्रह्मी मुलामुलीनें विहारांत जाऊन भिक्षूकडून प्राथमिक शिक्षण घेणें जरूर होतें. बौद्धिक, सामाजिक व नैतिक दृष्टीनें जनतेला वर आणण्याचें कामीं बौद्ध फोंजी हा एक परिणामकारी अधिकारी होता. त्याच्या चळवळीवर व महत्त्वाकांक्षेवर योग्य तें नियंत्रण ठेवणें राजकीय दृष्ट्या शहाणपणाचें कृत्य होतें.
तादना बँ : अमरापुराचे पूर्वेस सुमारें दीड-दोन मैलांवर त गुंडो नांवाचें रेल्वेस्टेशन आहे. त्यापासून एक फर्लांगावर बाँ जा टेक नांवाचा एक जुना विहार आहे. त्याचेभोंवतीं एक विस्तीर्ण तट आहे. मध्यभागीं एका उंच जोत्यावर एक लाकडी विहार बांधला आहे. तो भव्य व भक्कम अशा गोल खांबावर उभारला आहे. त्यावर तीन छपरें निमुळतीं आहेत. यांत उ नदीयार नांवाचे अतिवृद्ध फोंजी राहतात. त्यांचे वय ९३ वर्षांचें आहे. त्यांच्याशिवाय २ उबजेन आणि ७ कोईन तेथें होते. मी येथें भर उन्हाळ्यांत १२ वाजतां अतिकष्टानें आलों. बरोबर उ सू हें ठिकाण दाखविण्यासाठीं आणि माँ साँ हे दुभाश्याचें काम करण्यासाठीं होतें. विहारांत ५।६ वर्षांचीं बाहेरून येणारीं ४।५ पोरें होतीं. ह्या विहाराला लागूनच जवळच एक जीर्ण विहार होता. त्यांत उपरोक्त तादना बँ निजले होते. बाहेर त्यांचा नातू बसला होता. त्याला मी तादना बँ ह्यांस उठविण्यास सांगितलें. त्यानें माझे इंग्रजी व्हिजिटिंग कार्ड आंत नेलें. कांहीं वेळानें आम्ही आंत गेलों. विहार अगदीं पडझड झालेला व अस्ताव्यस्त होता. त्याला कित्येक दिवसांत कोणी झाडू मारल्याचें चिनह दिसत नव्हतें. जमिनीवर एका वेताच्या चटईवर एवढे मोठे धर्माधिकारी लाकडाच्या ओंड्यांवर डोकें टेकून निजले होते. ते उठून माझ्याशीं थोडेंच बोलले. वृद्ध वय आणि दुपारची झोपेची वेळ म्हणून त्यांच्यानें फार बोलवेना.
सामाजिक चालीरीती व बायकांचा दर्जा : मी विलायतेस असतांना मि. फिल्डिंग ह्या गृहस्थानें ब्रह्मदेशाविषयीं लिहिलेलें The Soul of a People नांवाचें एक पुस्तक वाचलें होतें. तेव्हांपासून ब्रह्मदेश पाहण्याची इच्छा माझे मनांत होती. मलबारांत मातृसत्ताक पद्धति पाहून ब्रह्मदेशांतही असाच कांहींसा प्रकार असावा, असें वाटून तो प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा दुणावली. ब्रह्मी बायकांना शिक्षणामध्यें अजूनही पुरुषाबरोबरचा हिस्सा मिळाला नाहीं. टापटिपीनें पोषाख करणें, केस विंचरणें, तोंडाला पावडर लावणें ह्यांतच त्यांचे विशेष गुण दिसून येतात. देवळांत प्रार्थना करीत असतांना बहुतेक स्त्रिया आपल्यास पुढच्या जन्मीं पुरुषजन्म प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करीत असतात. शेतकर्याची बायको आपल्या शेतांतले सर्व तांदूळ युरोपियन कंपनीस आपल्या जबाबदारीवर विकते. त्यांत ती नवर्यापेक्षां जास्ती फायदा काढते. खरें पाहतां घरची मालकीण स्त्रीच असते. पुरुष तिच्या हाताखालीं वागत असतो शेवटचा थीबा राजा अशाच प्रकारचा एक बायकोच्या आधीन असलेला पति होता. मुलाचें लग्न बहुधा १८ वें वर्षी व मुलीचें १४ वे वर्षी होते. आईबापांपासून पळून जाऊन लग्न केल्याची उदाहरणें नेहमीं आढळतात. लग्नानंतर नवीन दंपती मुलीच्या माहेरींच दोन-तीन वर्षे राहतात. जांवई मुलीच्याच माहेरचा एक अशा रीतीनें वागतो. मुलगी एकुलती एक असल्यास मुलीचे आईबाप दांपत्य मरेपर्यंत, त्याच घरांत राहतें. घटस्फोट सर्रास चालू आहे. ब्रह्मी पुरुष एक संतुष्ट प्राणी आहे. श्रीमंत होण्याची त्याला महत्त्वाकांक्षा नसते. पुष्कळसा पैसा मिळालाच तर तो धर्मकृत्यांत खर्चून टाकतो आणि याचा मोबदला दुसर्या जन्मीं मिळेल म्हणून तो संतुष्ट असतों.''
ब्रह्मी माणसाचा पोषाक म्हणजे एक रेशमाची लुंगी, एक रेशमी पोलका आणि डोईला एक लहानसें फडकें. स्त्रियांचाही पोषाक याच धर्तीवर असतो. मात्र डोक्याला फडकें नसून केसांचा बुचडा ॠषीच्या जटेसारखा टाळूवर बांधलेला असतो. नटणें-मुरडणें सारखें चाललेलें असतें. बायकांना फुलांचा फार षोक दिसला. खेड्यांपाड्यांतसुद्धां घरांपुढें नाना प्रकारची फुलझाडें लावून त्यांची निगा राखण्यांत ब्रह्मी बायका मोठ्या चतुर दिसल्या. शेतकी आणि शिपाईगिरी हींच पुरुशांचीं कामें. बाकी घरची व्यवसथा राखणें, व्यापार करणें, सावकारी करणें वगैरे सर्व कामें स्त्रिया मोठ्या दक्षतेनें करतात. खेड्यांपासून तों रंगून-मंडालेसारख्या मोठमोठ्या शहरांपर्यंत केव्हांही कोठेंही जा, सर्व दुकानांतून बायकाच बसलेल्या दिसतील. कोंकणी माळणीपासून मौल्यवान् कापड आणि जवाहिराचीं दुकानें देखील स्त्रियाच मालकी हक्कानें चालवतांना आढळतील. मालविक्रीसाठीं बसल्या असतां त्यांची सारखी वेणीफणी चाललेली असते. नवरा दुकानांत असला तरी तो देवडीवाल्यासारखा किंवा एखाद्या भय्यासारखा बाहेर बसलेला असतो.
फोंजी ब्यान : एका भिक्षूची अंत्येष्टि : गुरुवार ता. १० मार्च रोजीं मी मंडाले येथें असतां रात्री १० वाजतां एका विहारांत एका बुद्ध भिक्षूचा मृत्युत्सव पाहण्यास गेलों होतों. अष्टमीचें शुद्ध चांदणें पडलें होतें. फोंजी मेला असतां ६ महिने त्याला ठेवण्यांत येतें. पोटांतील आंतडीं वगैरे काढून त्यांत मसाला भरण्यांत येतो. त्याची तिरडी पालखीसारखी शृंगारण्यांत येते. ठिकठिकाणचे भक्तगण वर्गणी करून मोठा मांडव घालून त्यांत ती सजवून ठेवतात. ह्या विहारांत आज दोनतीन दिवस मोठा उत्सव चालू होता. सुमारें ३।४ हजारांवर लोक जमले होते. मेवामिठाईचीं दुकानें होतीं. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ व नेहमींचा नाच-तमाशा ठिकठिकाणीं चालू होता. वृद्ध फोंजी देखील तो पाहात होते. चार उंच खांबांवर एक मोठा पाळणा टांगून त्यांत मृत भिक्षूची तिरउी घालून ती झुलती ठेवली होती. तीवर हिरवें वस्त्र घालून बेगड लावली होती. एकानें एक रुपया दिल्यावर एक सेवेकरी मोठमोठ्यानें रडक्या सुरांत प्रार्थना करूं लागला. गुजराथ्यांप्रमाणें हें भाडोत्री रडें होतें. डोळ्यांना पदर पुसून रडण्याचा आवाज आणीत होता. शोकाचें अगर गंभीरपणाचें चिन्ह कोठेंच दिसत नव्हतें. १२ वाजतां रात्रीं मी कंटाळून घरीं परतलों.
ब्रह्मी विवाह : परकीयांचा व ब्रह्मी लोकांचा मिश्रविवाह होण्याला कांहींच अडथळा नाहीं. पण असे विवाह फारसे झालेले दिसले नाहींत आणि जे झाले आहेत तेही फारसे यशस्वी झालेले नाहींत. ब्रह्मी विवाह ही एक अत्यंत साधी गोष्ट आहे. तरुण व तरुणीचीं मनें जमलीं कीं तीं एकत्र राहूं लागतात आणि पुढें सवडीनुसार कांहीं मित्रमंडळींना चहास बोलावून आपला विवाह झाला असें जाहीर करतात. घटस्फोटही विवाहाइतकाच सुलभ आहे. ह्याचा अर्थ ब्रह्मी लोकांचें वैवाहिक जीवन शिथिल आहे असा नाहीं. विधिसंस्कारांचें अवडंबर नसणें म्हणजे शिथिलपणा नव्हे. उलट ह्या ब्राह्मोपचारांचा जेथें अतिरेक होतो, तेथेंच शिथिलपणाला वाव मिळतो. विवाहपद्धति स्वाभाविक आणि निसर्गापासून दूर नसली म्हणजे वेश्याव्यवसायाला जागाच मिळत नाहीं. हिंदुस्थान, युरोप, अमेरिकेंतील लहान मोठ्या शहरांतून वेश्याव्यवसायाचें आणि इतर दुराचारांचें जें हिडिस प्रदर्शन दिसतें तसें ब्रह्मदेशांत मला कोठें दिसलें नाहीं.