परत प्रवास

शेवटचा निरोप  :  ३१ ऑगस्ट १९०३ रोजीं सकाळीं मी होवर्न येथून निघालों.  लंडनला आणि इंग्लंडलाही शेवटचा रामराम केला.  जर्मन समुद्रांतून हॉलंडची राजधानी ऍम्स्टरटॅम येथें इंटरनॅशनल लिबरल रिलीजस कॉन्फरन्सकरतां गेलों.  तेथें मी ता. ४ सप्टेंबरपर्यंत होतों.    

एक अडचण  :  विलायतेला येतांना मला बोटीच्या प्रवासाबद्दलचा खर्च श्रीमंत सरकार सर सयाजीरावमहाराजांनीं दिला होता.  स्वदेशीं परत जाण्याचा खर्च मिळण्यापूर्वी माझ्या कॉलंजांतील अभ्यासाबद्दल कॉलेज अधिकार्‍यांकडून रिपोर्ट मागविण्याबद्दल हुकूम महाराजांकडून झाला होता.  त्याप्रमाणें हा इंग्रजींतला रिपोर्ट अध्यापकांकडून महाराजांकडे गेला.  त्याअन्वयें मीं महाराजांकडे अर्ज केला असतां त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीकडून पत्र आलें कीं, मी स्वदेशीं परत गेल्यावर बडोदें संस्थानांत नोकरी करण्याबद्दलचा करार लिहून देईन तर हा खर्च मिळेल.  मी ता.१ मे १९०३ रोजीं महाराजांना खुलाशाचें सविस्तर पत्र लिहिलें कीं, 'मला जी युनिटेरियन स्कॉलरशिप मिळाली होती तिची एक शर्त अशी होती कीं, मी आजन्म स्वतःला धर्मप्रचारासाठींच वाहून घेईन. यदाकदाचित् माझ्या योगक्षेमाची कोणीं जबाबदारी घेतली नाहीं, तर या प्रचाराला प्रतिकूल होणार नाहीं असेंच एखादें काम करून उदरनिर्वाह करीन; पण प्रचार सोडणार नाहीं.  महाराजांनीं हें सर्व पसंत केलें होतें.  म्हणून आतां कोणती हरकत न घेतां स्वदेशीं परत जाण्याला मला ते मदतच करतील.'  हें पत्र पावतांच महाराजांनीं टॉमस कुक कंपनीकडे तारेनें तिकीट देण्याबद्दल हुकूम केला असल्याचें त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरींनीं मला कळविलें.

ऍम्स्टरडॅमचा खर्च  :  कॉलेजला उन्हाळ्याची सुटी झाल्याबरोबर माझें इंग्लंडांतील काम संपलें म्हणून स्वदेशीं निघतां आलें असतें; पण ऍम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषदेला मला ब्राह्मसमाजानें हिंदुस्थानचा प्रतिनिधि निवडल्यामुळें आणि ती परिषद सप्टेंबरमध्यें भरणार असल्यानें दरम्यानचा तीन महिन्यांचा खर्च आणि जादा प्रवासखर्च यांचीं पंचायत पडली.  युनिटेरियन स्कॉलरशिप मला दरसाल १०० पौंडांची होती.  तीच अपुरी होती.  मीं फार काटकसरीनें राहून माझ्या खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी केली होती.  ऍम्स्टरडॅमच्या जादा खर्चाविषयीं माझे मित्र श्रीयुत बा. बा. कोरगांवकर यांनीं वर्गणीचे परिश्रम करून ता. २५ जुलै १९०३ रोजीं पत्रानें १३ पौंड ६ शिलिंग ८ पेन्सचा (म्हणजे २०० रुपयांचा) चेक पाठविला.  कलकत्त्याहून हेमचंद्र सरकारकडूनही निदान तितकीच रक्कम मिळेल असें कळविलें.  अशा रीतीनें माझी अडचण भागली.

ऍम्स्टरडॅमची परिषद  :  ता. १ सप्टेंबर रोजीं इंग्लंडहून निघालेल्या पाहुण्यांची बोट ऍम्स्टरडॅमला पोहोंचली.  तींतच मी होतों.  नदीच्या कांठांवरच्या सुंदर अम्सटील हॉटेलांत आमची व्यवस्था झाली होती.  व्याख्यानें, उपासना, मेजवान्या यांची एकच गर्दी उसळली होती.  डच लोकांनीं फारच संस्मरणीय स्वागत केलें.  मीं वाचलेला हिंदुस्थानांतील उदारधर्म हा निबंध ह्या परिषदेचें 'लिबर्टी' नांवाचें जें पुस्तक प्रसिद्ध झालें त्यांत प्रसिद्ध झाला आहे.

व्होलंदाम  :  ता. ४ सप्टेंबर रोजीं ऍम्स्टरडॅमहून व्होलंदाम नांवाचें एक जुनें खेडें पाहाण्यास निघालों.  बरोबर सुमारें निरनिराळ्या राष्ट्रांची २०० पाहुणे मंडळी होती.  आम्हा पाहुण्यांची व्यवस्था ठेवण्यास डच मंडळी आली होती.  सुमारें दोन वाजतां व्होलंदाम येथें पोहोंचलों.  हें खेडें समुद्रकिनार्‍याला एका धक्क्याच्या आश्रयाखालीं आहे.  समुद्रसपाटीपेक्षां या खेड्यांची सपाटी ४।५ फूट तरी खालीं असावी.  आमची इतकी गर्दी पाहाण्यासाठीं खेड्यांतील सर्व माणसें मुला-लेकरांना घेऊन दाराबाहेर उभी होतीं.  डच लोकांची स्वच्छतेसंबंधीं मोठी ख्याति आहे.  त्याप्रमाणें दोन प्रहरीं घरें धुण्याचें काम चाललें होतें.  आम्हीं कित्येक घरांत शिरून त्यांच्या चुली आणि निजावयाच्या जागा पाहिल्या.  साधेपणा, स्वच्छपणा व टापटीप पाहून आनंद झाला.  ह्या लोकांच्या पायांत ओबडधोबड लांकडी जोडे होते.  घरांत शिरतांना ते आपले जोडे बाहेर ठेवीत.  आम्हांला बुटांसह आंत जाण्याला लाज वाटूं लागली.  तरी आम्हांस हे लोक आंत जाण्यास खुशीनें परवानगी देत.  धक्क्यावर एक दोन मैलांवर आम्ही हिंडलों.  एदाम या खेड्यांत आम्ही आगगाडींतून उतरल्यावर व्होलंदामपर्यंत सुमारें दोन मैल एका कालव्यांतून जुन्या चालीच्या बोटींतून आम्ही कांहींजण निघालों.  या बोटींना एक लांब लांकडी दांडा लावला असून त्यास खांदा देऊन माणसें बोट पुढें ढकलीत असत.  संध्याकाळीं ५ पर्यंत इकडे तिकडे हिंडल्यावर आगबोटींतून आम्ही परत ऍम्स्टरडॅमला परत आलों.  अशा रीतीनें अगदीं आनंदाने ऍम्स्टरडॅम येथील परिषदेचा शेवट झाला.

कलोन कॅथेड्रल  :  ता. ५ सप्टेंबर रोजीं सकाळीं कलोन येथें पोहोंचलों.  हॉटेल एविग् लॅम्पमध्यें उतरलों.  लगेच न्याहारी करून येथील प्रसिद्ध कॅथेड्रल पाहाण्यास गेलों.  एवढी सुंदर इतिहासप्रसिद्ध इमारत असूनही बाजारांतील गर्दीच्या भागांत ती कोंडल्यासारखी झाली आहे.  मी चौकांतून तिच्याकडे पाहात राहिलों.  हातांत कॅमेरा होता.  पण चित्रासारखा किती तरी वेळ आ वासून पाहात राहिलों असतां, मलाच किती तरी लोक पाहून गेले असावेत.  आश्चर्याचा आवेग उतरल्यावर मी हळूहळू इमारतींत शिरलों.  बांधकाम गॉथिक थाटाचें आहे.  काळ्या कुरुंदाचा दगड वापरला आहे.  उंच निमुळत्या कमानी एकावर एक लागलेल्या असून गॉथिक शोभेची येथें परमावधि झाली आहे.

ता. ७ सोमवारीं १९०३ रोजीं स्वित्झरलंड आणि जर्मनीच्या हद्दीवरील बाझल शहरांत थोडा वेळ राहून त्याच रात्रीं ११ वाजतां आल्पूस पर्वतांतील ल्यूसर्न या नांवाच्या अत्यंत रमणीय गांवीं पोहोंचलों.  हा गांव ह्याच नांवाचे सरोवराचे कांठीं आहे.  चार दिवस विश्रांतींत आणि एकान्तवासांत घालविले.  मौंट पिलाटुस नांवाच्या आल्प्स् पर्वताच्या शिखरावर मी एकटाच सफर करून आलों.  समुद्रसपाटीपासून हें ठिकाण ७००० फूट उंच आहे.  जर्मनी सोडून स्वित्झर्लंडकडे जातांना आल्प्स पर्वतांतून सेंट गॉथर्ड नांवाचा १० मैल लांबीचा एक बोगला आहे.  त्यांतून आमची गाडी गेली.

ता.११ सप्टेंबर रोजीं मी कोलंबसाच्या जिनोवा या गांवीं गेलों.  ता.१२ रोजीं कॅम्पो सँटो नांवाची अत्यंत सुंदर स्मशानभूमि पाहिली.  इटालियरन शिल्पकलेची येथें लयलूट झालेली दिसली.  नंतर पांच दिवस मीं रोम शहरीं घालविले.  मुंबई विद्यालयांत माझा आवडीचा विषय रोमचा प्राचीन इतिहास असल्यानें हे पांच दिवस माझे मोठ्या बोधाचे गेले.  ता. १५ रोजीं रविवारीं व्हटिकन् नंवाचा पोपचा राजवाडा पाहिला.  तिसरे दिवशीं पोप पायसचें प्रत्यक्ष दर्शन घेतलें.  दूर अंतरावरून आलेली शेंकडों भक्तमंडळी यांच्या दर्शनासाठीं रांगेनें बसलेली होती.  पोपची स्वारी जवळ येतांच ही मंडळी त्याच्या चरणाचे चुंबन घेत.  माझ्यापुढें आल्यावर मीं हिंदुस्थानचा रहिवासी म्हणून त्यांनीं आपल्या हातांतील आंगठी माझ्यापुढें चुंबनासाठीं पुढें केली.  मीं चुंबन घेतलें.

मोझेसचा पुतळा  :  सिस्टाइन चॅपेल नांवाच्या एका दालनांत हा प्रसिद्ध भव्य पुतळा एका उंच कट्टयावर ठेवला होता.  मायकेल् ऍंजेलो नांवाच्या प्रसिद्ध शिल्पकाराला हा महत्त्वाचा पुतळा कोरण्याला ४० वर्षे लागलीं असें सांगतात.  दुसरी कडे सेंट पॉलचा लाइफ साईझ पुतळा हातांत नंगी तलवार घेऊन उभा आहे.  इटालियन लोकांच्या चित्रकलेंतील वैभवाला ह्या शहरीं नुसता पूर आला आहे.  २००० वर्षांपूर्वीच्या प्राचीन इमारतींचे अवशेष मोठ्या आतुरतेनें पाहिलें.  फॅबियन ऍंफिथिएटर नांवाची एक अर्धवर्तुळाकार प्रचंड इमारत पाहून गतवैभवाची कल्पना आली. ह्यांत ग्लॅडिएटर नांवाच्या मल्लांचें प्राणांतिक मल्लयुद्ध होत असे.  पादाक्रांत परकीय कैद्यांना (ह्यांत राजेही असत) ह्या इमारतीच्या भुयारांत आणून ठेवीत असत.  प्रसंगविशेषीं जनतेची करमणूक व्हावी म्हणून ह्या कैद्यांना बाहेर काढून आपसांत लढवीत असत.  तो भयंकर रक्तपात पाहून प्रेक्षकजन आनंद मानीत व मल्लयुद्ध जिंकणार्‍यावर खूष होत.  हें रोमन स्वराज्याचें लक्षण !

नेपल्स  :  ता. १८ रोजीं मी नेपल्सला गेलों.  ह्या बंदलाचा देखावा फारच सुंदर आहे.  मुंबईच्या मलबार हिमप्रमाणें समुद्रकांठावरील एका टेकडीवरून उंच उंच एक रस्ता आहे.  अपोलो बंदराप्रमाणें येथें धक्काही फार सुंदर आहे.  मात्र लोकांचा- विशेषतः व्हिक्टोरियावाल्यांचा-अप्रामाणिकपणा वेळोवेळीं नजरेस आला.  एकदोनदां तर माझ्या प्राणावरच बेतली होती.  माझ्या हॉटेलांतील खिडकींतून धुमसत असलेल्या व्हेसुवियस ज्वालामुखीचा देखावा फार भीषण दिसत होता.

पाँपी  :   दोन हजार वर्षांपूर्वी भूकंपामुळें व ज्वालामुखी पर्वताच्या तप्‍तरसामुळें हें शहर दडपून गेलें होतें.  त्याचें आतां उत्खनन होऊन त्याला आतां प्रेक्षणीय स्वरून आलें आहे.  हें नेपल्सपासून सुमारें ४।५ मैल अंतरावर आहे.  हें पाहण्यासाठीं मी ता. १९ शनिवारीं गेलों.  गरम राखेचा ढीग वर पडल्यानें त्याच्या खालीं जीं माणसें, जनावरें व इतर वस्तु सांपडल्या त्यांचे हुबेहूब सांगाडे तेथील म्युझिअममध्यें दाखविण्यांत येतात.  हे खरे सांगाडे नसून राखेखालीं ह्यांचे जे सांचे बनले होते त्यांत प्लॅस्टर ऑफ पॅरिस ओतून उत्खननकारांनीं कौशल्यानें हे सांगाडे बनविले आहेत.  कित्येक इमारतींती भिंतीवरचे रंग व चित्रें अगदीं ताजीं दिसलीं.  रस्ते व दुतर्फा ओटे फरसबंदी होते.  यावरून जड चाकांच्या चाकोर्‍यांच्या खोल खुणा दिसल्या.  एका दिवाणखान्याच्या भिंतीवर कांहीं बीभत्स चित्रें दिसलीं.  त्यांवरून त्या ऐश्वर्याच्या काळांत रोमन लोकांची नीति कशी खालावली होती हें कळलें.

ता.२१ सप्टेंबर १९०३ रोजीं सोमवारीं नेपल्सहून रुबाँ-टीनो नांवाचे आगबोटीनें मी हिंदुस्थानास येण्यास निघालों व ता. ६ ऑक्टोबर रोजीं ४ वाजतां तिसरे प्रहरीं मुंबईला परत स्वदेशीं आलों.  

स्वागत  :  मुंबई बंदरावर कित्येक मंडळी माझ्या स्वागतार्थ जमली होती.  मी विलायतेला निघाल्यावर मुंबई प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेट दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला ह्यांनीं परत आल्यावर मिशनरी म्हणून माझ्या राहण्याची स्वतंत्र सोय व्हावी व इतरही कामाची तजवीज व्हावी, म्हणून प्रार्थनामंदिराचे आवारांत एक राममोहन राय आश्रम म्हणून तीनमजली इमारत मी येण्यापूर्वीच बांधून ठेवली होती.  इमारतीच्या लगतच भगवानदास माधवदास नांवाचे गुजराथी समाजबंधु राहात होते.  त्यांच्या बंगल्यांत माझ्या स्वागतासाठीं समाजबंधूंचे संमेलन झालें.  डॉ. भांडारकर, चंदावरकर, माडगांवकर वगैरे मंडळी व सर्व वडीलथोर माणसें हजर राहून त्यांनीं आनंदानें स्वागतपर भाषणें केलीं.  माझे वृद्ध मित्र रा. दिनानाथराव माडगांवकर यांनीं माझ्या स्वागतासाठीं एक पद मुद्दाम रचलें होतें.  त्यांत खालील चरण होते -

तरुण असतां स्वार्थत्यागी तुम्ही दिसतां भले ।
प्रभुवरकृपें धर्माभ्यासीं तुम्हां यश लाभलें ॥
तरि तुमचिया हस्तें धर्मप्रचार बरा घडो ।
तनुमन तसें देवापायीं सदा तुमचें जडो ॥१॥

परिशिष्ट १ - मँचेस्टर कॉलेजचे दोन दाखले

Manchester College

Oxford, March 4, 1903.

The following is the report of Mr. V. R. Shinde presented to the Committee in June 1902 :-

Mr. V. R. Shinde, for want of previous preparation has had considerable difficulty in following the lectures on the New Testament.  He has not attended the classes in the Old Testament.  He has written two philosophical essays, showing original thought, one on Self-realization and the other on the Genesis of Free-will.  He wrote excellent fortnightly papers during the Lent term on subjects connect with the History of Religion in India.  During the Summer term he read Pali, weekly with Mr. Carpenter, and made excellent progress through his knowledge of Sanskrit.  He has sent in a very thoughtful essay on Theories of Incarnation in "Vishnavism and Buddhism."

In the present session he has attended classes in philosophy with Mr. Upton, in Old Testament with Mr. Addis and in Doctrainal Theology with me.  With his general conduct in the College we are more than satisfied.

(Sd/Dr.) James Drummond
Principal.

-----------------------------


Manchester College

Oxford, March 1st, 1903.

Mr. V. R. Shindde, B.A., has attended my lectures on the History of Religion, during two academical years with great diligence and faithfulness.  He has prepared a series of papers on subjects prescribed for his study with industry, care and insight; and has shown much ability in his power to condence into short compass the results of considerable reading.  The work of the second year which I have had from him, has been naturally in advance of that of the first, and has been in every way satisfacroty to me.  The subjects have included, Hinduism, Mohammedanism, Zoroastrianism and the Religions of China.  I may add that during on term, Mr. Shinde read with me every week, in the early Pali Texts of Buddhism and showed that his Sanskrit knowledge would enable him to make rapid advance in this branch of study.

(Sd/Dr.) J. Estlin Carpenter,
Case Lecturer in
Comparative Religion.