नागपूर शाखा : मुंबई इलाख्यांत मुंबई, पुणें, हुबळी वगैरे अंगभूत शाखा आणि त्यांच्या उपशाखांचें येणेंप्रमाणें बस्तान बसल्यावर माझें लक्ष नागपूर येथें सर्व मध्यप्रांतासाठीं मिळून एक अंगभूत शाखा काढण्याकडे लागलें. कोल्हापूरचे वकील रा. गणपत कृष्णाजी कदम ह्यांनीं ह्या कामीं स्वतःला वाहून घेण्याचें कबूल केलें. अमरावती, अकोला, यवतमाळ वगैरे ठिकाणीं संलग्न शाखांची कामें ह्यापूर्वीच चालू होतीं. राजधानीचें ठिकाण नागपूर येथें ह्या प्रांताची मध्यवर्ती शाखा उघडून ह्या संलग्न शाखा तिच्याकडे सोंपवून एक प्रांतिक नवीन अंगभूत शाखा उघडण्याची वेळ ठेपली होती. १९१४ च्या उन्हाळ्यांत मी एकटाच नागपूरला गेलों. नागपूर शहराची परिस्थिति पाहून निधि मिळविण्याचा अंदाज करणें हा उद्देश होता. तेथील प्रागतिक पक्षाचे वृद्ध पुढारी रा. ब. वामनराव कोल्हटकर यांच्या घरीं मी उतरलों. त्यांनीं माझें फार प्रेमळपणें स्वागत केलें. उन्हातान्हांतून मला घरोघर नेऊन त्यांनीं आपल्या वजनदार मित्रांचा परिचय करून दिला; थोडीबहुत आरंभींची मदतही मिळवून दिली. ह्या गोष्टीनें उत्तेजन मिळून पुढें लवकरच रा. कदम यांना बरोबर घेऊन मध्यप्रांतांतील हिंदी जिल्ह्यांतून पूर्वतयारीसाठीं आणि निधि जमवण्यासाठीं एक विस्तृत दौरा मीं काढला. भंडारा, बालाघाट, जबलपूर, रायपूर, बिलासपूर आणि उत्तर हिंदुस्थानांत सागर व दमोह वगैरे ठिकाणीं माझीं आणि रा. कदम यांचीं व्याख्यानें झालीं. सुमारें ४००० रु. ची मदत मिळाली. दमोहहून कदमांना नागपूरकडे परत पाठविलें आणि मी पुढें एकटाच भोपाळ, देवास, इंदूर आणि धार या संस्थानिकांच्या भेटी घेऊन आणि सहानुभूति घेऊन मुंबईला परत आलों. नागपूर येथें पुन्हां जाऊन एंप्रेस मिलचे मॅनेजर सर बेझनजी यांची गांठ घेऊन त्यांच्या मालकीची पांचपावली येथील चाळींपैकीं एक चाळ मिशनकडे घेतली. सर मोरोपंत जोशी, ना. मुधोळकर वकील, वामनराव कोल्हटकर, डॉ. ल. वि. परांजपे, नामदार नियोगी वगैरेंची एक कमिटी नेमण्यांत आली. पुढें लौकरच प्लेगची सांथ उद्भवून कामांत मोठाच अडथळा आला. रा. कदमांकडून हें काम निभवेना म्हणून स्थानिक कमिटीच्या तक्रारीवरून त्यांना कमी करून त्यांच्या जागीं रा. सय्यद अबदुल कादर यांची हुबळीहून सहकुटुंब रवानगी करण्यांत आली. त्यांनीं पांचपावली येथें वर सांगितलेल्या चाळींत एक वसतिगृह म्हणून तेंच आपलें राहण्याचें ठिकाण मुक्रर केलें आणि तेथून अमरावती, अकोला, यवतमाळ वगैरेंकडील संस्थांची देखरेख आपल्याकडे घेतली.
हुबळी शाखा : रा. सय्यद यांची रवानगी हुबळी येथून नागपूरला करण्यांत आल्यानें त्या शाखेची जबाबदारी घेण्याला कोणा तरी तज्ज्ञ अधिकार्याची नेमणूक करणें भाग पडलें. रा. दामोदर नारायण पटवर्धन ह्यांची तयारी पुणें येथील कामांत पूर्ण झाल्याचें दिसून आलें. हुबळी येथील आश्रमांत सहकुटुंब जाऊन राहण्याची आणि तेथील वसतिगृहाची जबाबदारी घेण्यास रा. दामोदरपंत आणि त्यांच्या सुशील पत्नी सौ. अन्नपूर्णाबाई यांनीं आनंदानें कबुली दिली. दामोदरपंतांची इतकी तत्परता दिसून आली कीं, त्यांनीं आपल्या वृद्ध आईलाही बरोबर नेलें. हा प्रांत कर्नाटकांतील असल्यानें येथील सर्व कामें कानडींतच चालत. रा. सय्यद व त्यांची सुशिक्षित पत्नी कल्याणीबाई यांना मूळचेंच कानडी येत असल्यानें त्यांची योजना त्या शाखेला करण्यांत आली होती. शाळेच्या आणि वसतिगृहाच्या संख्येंत रा. सय्यद यांनीं दवाखान्याचीहि भर घातली होती. त्यांच्यामागें रा. पटवर्धनांनीं हुबळी येथील स्थानिक कामांतच नव्हे तर धारवाड, बेळगांव, विजापूर वगैरे ठिकाणीं आपल्या उपशाखाही उघडल्या. हुबळी म्यु. पालिटीकडून एक पुरेशी मोकळी जागा ९९ वर्षांच्या करारानें, सवलतीच्या भाड्यांनें घेतली. मिशनच्या जागेपुढेंच एक दुसरें खाजगी हायस्कूल होतें. त्याच्या एका कोपर्यांतील उघडी जागा मिशनकडे घेऊन त्यावर मिशनची एक लहानशी इमारत रा. सय्यद यांनीं बांधली होती. त्यांत दवाखान्याची आणि शाळांची योजना केली होती. रा. पटवर्धनांनीं ती पूर्ण केली. तीन चार महिन्यांत रा. पटवर्धन कानडी शिकले आणि लौकरच त्या मागासलेल्या प्रांतांत त्यांनीं आपला जम चांगल्या रीतीनें बसविला. तो इतका कीं, पुढील म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीमध्यें हुबळी शहरचे म्युनिसिपालिटीवर सरकारतर्फे त्यांची नेमणूकही झाली.
मांगांची वसाहत : पुण्यास जी महाराष्ट्र परिषद झाली तींत सातार्याहून मांग लोकांचे पुढारी श्रीतपराव चांदणे यांचा परिचय झाला होता. मांग लोकांवर पोलिसांचा जो हजेरीचा कहर होत होता त्यासंबंधीं त्यांनीं ह्या परिषदेपुढें जोराची तक्रार केली होती. ऑगस्ट १९१३ मध्यें पुणें येथें मिशनचें जें शिष्टमंडळ गेलें त्यावर मि. चांदणे यांना मुद्दाम नेण्यांत आलें होतें. त्यांनीं गव्हर्नरसाहेबांपुढें खालील तक्रारी मांडल्या :-
(१) मांग गरीब असून त्यांना विशेष धंदा नाहीं. (२) गुन्हेगार असा आळ त्या सर्वांवर अन्यायानें आला आहे. (३) सातारा जिल्ह्यांत बरीच पडीक जमीन आहे. ती सवलतीच्या दरानें मांगांना देण्यांत यावी. (४) शेतकीचा धंदा मांगांना फार योग्य आहे. (५) सातारा जिल्ह्यांत कोठें तरी प्रशस्त जागा घेऊन मांगांसाठीं एक शेतकी खेडें (वसाहत) डि. सी. मिशनकडून स्थापण्यांत यावें. मिशनच्या मध्यवर्ती कमिटीनें ह्याविषयींची चौकशी करण्यासाठीं पुण्यांत खास कमिटी नेमली. तिनें २६ जून १९१४ रोजीं खालील ठराव केला :-
(१) निदान १०० कुटुंबांची सोय होईल, अशी एक वसाहत प्रयोगादाखल सातारा जिल्ह्यांत उघडावी. (२) रा. शिंदे यांनीं तिच्यासाठीं योग्य असा एक मनुष्य शोधून काढावा. (३) सरकारकडून पुणें व सातारा जिल्ह्यांतील जंगलखात्यांतून नांगरटीसाठीं निवडून काढलेल्या जागांची यादी मागवावी आणि त्यांपैकीं ४०० एकर एकत्र असलेली जागा रा. शिंदे यांनीं निवडून काढावी.
डॉ. मॅन आणि मीं या कामीं मध्यभागाचे कमिशनर मि. मेकॉनकी यांची गांठ घेतली. जमाबंदीखात्याचे मुख्य कौन्सिलर मि. लँबसाहेब व पोलिसखात्याचे इन्स्पेक्टर जनरल कनेडीसाहेब यांचेकडे रा. चांदणे यांना नेऊन त्यांच्या कार्याला वरील अधिकार्यांची पूर्ण सहानुभूति आधींच मिळवून ठेवली होती. गव्हर्नरांपासून तों जिल्ह्याच्या कलेक्टरांपर्यंत पूर्ण सहानुभूति आणि मदतीचें आश्चासन मिळाल्यावर मी व डॉ. मॅन प्रत्यक्ष चौकशीसाठीं सातारा जिल्ह्यांतील तालुकानिहाय गांवें पाहण्यास निघालों. शेतकीच्या प्रश्नावर चौकशीच्या कामीं मला मदत करण्यास विठ्ठल नामदेव काळे या तज्ज्ञ गृहस्थांस मीं बरोबर घेतलें होतें. सातारा जिल्ह्यांत आम्ही एकंदर तीन सफरी केल्या आणि खालील तीन खेडीं वसाहतीसाठीं केंद्र बनविण्याची चौकशी करण्याचें ठरविलें. (१) एरंडोली-मिरजेच्या पश्चिमेस ९ मैलांवर, (२) कुपवाड-बुधगांव स्टेशनच्या दक्षिणेस ३ मैलांवर व सांगली, मिरज आणि बुधगांव संस्थानच्या हद्दीच्यामध्यें. याच खेड्यांत सुमारें १२०० एकर जमीन जंगलखात्याकडून मिळण्यासारखी असून त्यांपैकीं १५० एकर जमीन नांगरटीसाठीं अगदीं उत्तम आणि ३०० एकर साधारण प्रतीची आहे. (३) पळूस-कुडलरोड ह्या स्टेशनपासून तीन मैलांवर सांगली व औंध या संस्थानचे हद्दीमध्यें.
हीं तीन केंद्रें पहाण्यापूर्वी सातारा जिल्ह्यांत आम्हांला १००० मैल प्रवास भर उन्हाळ्यांत करावा लागला. त्या काळीं सातार्यांत बैलगाडीचे रस्तेही चांगले नव्हते. बराच भाग पायीं जावें लागलें. तिसर्या सफरींत वसाहतकमिटीचे चेअरमन डॉ. मॅन हे मजबरोबर होते. त्यांना शेतकीचा उत्तम अनुभव असल्यामुळें आणि ते स्वतः मजबरोबर कांहीं ठिकाणीं पायीं आल्यामुळें चौकशींत कसलीही कसून उरली नाहीं. वसाहतीचें खेडें शेतकीच्या आणि उद्योगधंद्याच्या दृष्टीनें वसविण्यांत येणार होतें. खर्चाचा आरंभींचा अंदाज किमानपक्षीं २०,००० रु. चा होता. कुपवाडचें केंद्र पसंत करण्यांत येऊन सरकाराकडे रीतसर अर्जही गेला. इतक्यांत महायुद्धाची धाड आली. आमच्या चौकशीचा फायदा सरकारास मिळाला. महायुद्धास कामीं आलेल्या शिपायांच्या कुटुंबांस मदत म्हणून वरील शेतकीच्या जमिनीची जरूर लागेल म्हणून आम्हांला ती तूर्त देतां येत नाहीं असें उत्तर आलें. मांगांच्या तोंडचा घांस शिपायांना मिळाला. पण अखेरीस काय झालें तें असो. कुपवाडच्या जमिनीच्या कांहीं भागावर हल्लीं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन कॉलेजची इमारत उभी दिसते. उन्हातान्हांतून चौकशीची धांवपळ केली कुणीं ? ती कशासाठीं केली ? आणि अखेरीस नशिबानें यशाची माळ कोणाच्या गळ्यांत घातली ? सावकाशपणें विचार करून वाचकांनींच काय वाटेल तें वाटून घ्यावें.
१९१४ च्या मध्याला युरोपांत महायुद्ध सुरू झालें. त्यानें बहुतेक जगालाच आग लावली. ते सुमारें चार वर्षे चाललें. त्या घाईंत मिशनला कोणतीच नवी गोष्ट करतां येईना. अशा वेळीं वर्हाड आणि मध्यप्रांत शाखांची घटना करण्याचें नवें काम अर्धेमुर्धे होऊन पडलेलें पूर्ण करावें लागलें. या कामासाठीं कोल्हापूरचे वकील गणपतराव कदम हे पुढें आले होते. आजपर्यंत अशी नवीन शाखा काढण्याचे पूर्वी ज्यांच्याकडे त्या कामाची जबाबदारी द्यायची, अशा प्रचारकाची पूर्वी तयारी केली जात असे. रा. कदमांची अशी तयारी करण्याला वेळ नव्हता. तशांत नागपूरला त्या वेळीं प्लेगचा कहर उडाला होता. अशा स्थितींत युद्धाचा वणवा पेटला. अनेक अडचणींमुळें कदमांकडून हें काम झेंपेना. खरें पाहतां मध्यप्रांतांत नागपूर हें ठिकाण अशा कामाला फार अनुकूल होतें. वर्हाड आणि मध्यप्रांतांत लोक सधन आहेत. जमीनदारपद्धति तेथें असल्यानें अशिक्षित लोकांतील पुष्कळ लोक सधन आहेत. महाराष्ट्रांतून सुशिक्षित लोक नशीब काढण्यास तिकडे जाऊन सुसंपन्न स्थितींत राहून सुधारणेला अनुकूल आहेत. वर्हाड-मध्यप्रांतांतील अस्पृश्यवर्गही इतर प्रांतांपेक्षां सांपत्तिक दृष्ट्या चांगल्या स्थितींत आहे. मुंबईस ह्या मिशनचें बोर्डिंग निघाल्यावर बहुतेक वर्हाडांतील विद्यार्थ्यांचा भरणा या संस्थेंत झाला. यावरून या प्रांताची अनुकूलता मिशनच्या चालकांनीं ओळखली होती. म्हणून त्यांनीं येथें उपक्रम सुरू केल्यावर वर सांगितलेल्या अडचणींतूनहि वाट काढून मिशननें आपलें ठिकाण येथें दृढ केलेंच. रा. सय्यद आणि त्यांची सुशिक्षित पत्नी कल्याणीबाई ह्यांनीं अत्यंत परिश्रम घेऊन हें आरंभींचें श्रेय मिळविलें. पुण्याची शाखा रा. सय्यद ह्यांनींच प्रथम उघडली. नंतर ती रा. ए. के. मुदलियार यांच्याकडे देण्यांत आली. रा. सय्यदांच्या बळावरच हुबळीची कर्नाटक शाखाही स्थापण्यांत आली आणि आतां अडचणीमुळें नागपूराही सय्यदांनाच सहकुटुंब पाठवावें लागलें ही गोष्ट रा. सय्यद यांना मोठी भूषणावह आहे. काम काढल्यावर पैशाची मदत कशीबशी मिशनला मिळे पण लायक आणि वाहून घेतलेल्या माणसांचा तुटवडा मिशनला नेहमींच भासे. सत्त्वाची पदोपदीं परीक्षा करणार्या ह्या कठीण कामाला वाहून घेण्याला स्त्री-पुरुष मिळावयाचे तर ते वेडेपीरच असले पाहिजेत. असले वेडेपीर पुरेसे मिळाले नाहींत तरी जे मिळाले तेंच मिशनचें भाग्य समजावें. वाहून घेणारा माणूस मिळण्यापूर्वीच मिशनच्या कार्यक्षेत्रावर नवीन अगभूत शाखांचा उदय होत असे, आणि त्याला कोठून तरी, कसा तरी कामचलाऊ मनुष्य मिळत असे.