[ जन्म ( अदमासें ) १८४० -- मृत्यु ८ फेब्रुवारी १९१० ]
येथवर आठवणी लिहून कोणाचीच जन्माची किंवा मृत्यूची तिथि, महिना अगर निदान वर्ष तरी मीं कां लिहिलें नाहीं याचें कारण मला माहीत नाहीं. माझ्या बाबांचा चौकसपणा, सुसंस्कृतपणा इतका होता कीं, त्यांनीं आमच्या घरच्या पुरोहितांकडून घरच्या सर्व मुलांच्या जन्मपत्रिका ज्योतिष शास्त्रान्वयें वर्तवून ठेविल्या आहेत. सुदैवानें तेवढ्या तरी आम्हीं अद्यापि जपून ठेवल्या आहेत. मीं मोठा झाल्यावर मला आपली जन्मभूमि बदलावी लागली. इतकेंच नव्हें तर मी एवढी मोठी परीक्षा इतक्या मागल्या काळांत पास होऊनही आपल्या संसारांत लक्ष न घालतां आजन्म दारिद्र्याचें व्रत घेतलें. त्यामुळें व्यवहारांत मी बाबांपेक्षांही अधिक नालायक व निष्काळजी ठरलों. बाबांनीं कर्जाखालीं खानदानी घालविली तर त्यांच्यापेक्षां सुशिक्षितपणाचा कांदा त्या मीं ती कधींच मिळविली नाहीं, किंबहुना खानदानीनें राहण्याला मी अपात्र ठरलों. तशांत कांहीं वर्षे मुंबईंत व नंतर पुण्यांत नेहमीं बदलणार्या भाड्यांचे घरांत राहावें लागल्यामुळें बाबांच्या पोथीपुस्तकांची व कागदपत्रांची मीं अक्षम्य हयगय केली आणि दैवहत असा मी आतां आठवणी लिहीत बसलों आहें ! फार काय पण मीं माझा स्वतःचा पत्रव्यवहारही जपून ठेवला नाहीं. ही चूक मला खेद देत आहे.
बाबांचें लग्न : माझी आई आलगूर या गांवीं जन्मली. ती आपल्या आईबापांची बहुतेक पहिलीच मुलगी असावी असें तिच्या बोलण्यावरून दिसतें. नंतर कांहीं मुलांनंतर आतां हयात असलेले आमचे मामा रामजीबाबा व शेवटची मुलगी आमची मावशी तानूबाई ही होय. आमच्या आईची पहिली मुलगी बाळाबाई हिचेपेक्षां माझा मामा रामजी हा लहान असावा असें दिसतें. सोमा मुलगा अगदीं लहान असतांना आलगूरचे आजोबा एक वर्ष गुडघी रोगानें आजारी पडले. त्या आजारांत चूल व मूल यांची सर्व जबाबदारी माझ्या अगदीं लहान असलेल्या आईवर पडली. आईचें लग्न ह्या आजारापूर्वी झालें की मागाहून झालें हें कळत नाहीं. आमच्या घरची स्थिति जर चांगल होती आणि माझे बाबा जर शिकलेले व हुशार होते तर माझ्या आजोबांनीं अशा गरीब व लंगड्यां मनुष्याशीं सोयरीक कां केली बरें ? यावरून वाटतें कं, माझ्या आईबाबांचें लग्न अगदीं लहानपणीं - म्हणजे माझ्या बाबांच्या शिक्षणापूर्वी झालें असेल. म्हणजे माझी आई आत वर्षांची व बाबा बारा वर्षांचे असतील. हा सर्व केवळ अजमासच आहे. या अजमासाला आणखी एक कारण आहे. माझे बाबा लहानपणीं फार खोडकर असत. विशेषतः त्यांना झाडावर चढण्याचा नाद असे. माझ्या आजोबांच्या मळ्यांत एक मोठें केवड्यांचें झाड होतें. केवडा काढावयास जाऊन बाबा लहानणीं त्या झाडावरून पडून मरतां मरतां वांचले. तेव्हांपासून आमच्या आईनें हरतालिकेचें व्रत घेतलें असें ती लहानपणीं सांगत असे. तिचें लग्न होण्यापूर्वी जर बाबा पडले असते तर तिनें हें व्रत घेण्याचें कारणच नाहीं. लग्नाचें वय मुलीचें ७।८ व मुलाचें १२।१३ हें सामान्यतः असतें. निदान ह्यापेक्षां जास्त तितक्या मागल्या काळांत असणें संभवनीय नाहीं. झाडावरून पडण्यालाही १२ वर्षांचे वय - २।३ वर्षे पुढें मागें-संभवतें.
यमुनाबाई : माझे बाबा आपल्या आईप्रमाणें काळे व रूपानेंही आपल्या आईचे चेहर्याचे होते. माझी आई तिच्या आईप्रमाणें फारशी गोरी नसली तरी थोडी उजळ निमगोरी आणि चेहर्यानें आपल्या बापासारखी होती. अर्थात् आईला लिहितां-वाचतां येणें शक्य नसलें तरी वैष्णव ब्राह्मणाचें वळण, सात्त्विक राहाणी, शाकाहार, घरकामांत कष्टाळूपणा व हुषारी वगैरे गुणांनीं ती मंडित होती. म्हणून बाबांच्या वडिलांनीं हा जोडा पसंत केला असावा. ह्या दोन्ही घराण्यांचें ब्राह्मणी वळण व माझ्या बाबांचें सुशिक्षण यामुळें माझें शिक्षण इतकें झालें. इतकेंच नव्हे तर शेवटपर्यंत माझा सहवासही ब्राह्मणांशींच घडला.
आईची कानडी भाषा अगदीं शुद्ध वैष्णव ब्राह्मणाची तर बाबांची मराठी भाषा कर्नाटकांतील शुद्ध देशस्थ ब्राह्मणाची. त्याप्रमाणें पेहराव व तशाच संवयी, गोपीकृष्णावरची किती सुंदर सुंदर कानडी गाणीं व पुरंदर विठ्ठलाचीं भजनें म्हणून आई लहानपणीं आम्हांला पाळण्यांत निजवीत असे. तिचा गळा फार गोड व म्हणण्यांत स्वाभाविकपणेंच करुण रसाचा उठाव असे. मोठेपणींही ही गाणीं ऐकवून व गोपीकृष्णाच्या गोष्टी सांगून ती आम्हां भावंडांना दारिद्र्याच्या कठीण वेदना हळुवार करीत असे. व्रतें, उपास व इतर गृहकृत्यें ब्राह्मणाप्रमाणें करण्याला आई आलगुरांत लग्नापूर्वीच शिकली असावी. शिवाय बसवंतरावांच्या सुशिक्षित व पाणीदार मुलाला मुलगी दिली म्हणून कुळकर्ण्याच्या घरच्या बायामंडळींनीं या लहान यमुनेला अधिकच काळजीनें घरगुती वळण लावलें असावें, कारण माझा आजी गंगाताई हिच्या अंगांत कांहीं हें वळण देण्याची करामत नव्हती. इतके बसवंतराव जरी मोठे पाणीदार व रुबाबदार मराठे होते, तरी आमच्या बाबांना कारकुनी बाण्याचें वळण लावणें त्यांना शक्य नव्हतें. ह्या कोवळ्या जोडप्याला ब्राह्मण संस्कृति सहानुभूतीनें व योग्य दक्षतेनें तीं एकमेकांस विवाहपाशानें बद्ध होण्यास योग्य ठरली. ही एक भाग्याची विधिघटनाच नव्हे तर काय ! माझ्या आईबापांचा अगदीं आदर्शवत् वैवाहिक संबंध मला ३७ वर्षे पाहावयास मिळाला. माझ्या आजीचे दागिने तितक्या मागील काळीं कर्नाटकी ब्राह्मणेतरांप्रमाणें किंचित् ग्राम्य असत. पण माझ्या आईचे दागिने मराठा पद्धतीचे, सर्व सोन्यामोत्यांचे, वजनदार व जडावाचे होते. केवळ सांपत्तिक दृष्ट्या पाहातांही माझे वडील कर्ते झाल्यावर आजोबांपेक्षां अधिक संभावित व श्रीमंत स्थितीला पोहोंचले; पण आजा-आजीचे मागें त्यांनीं आपल्या निष्काळजीपणानें म्हणा किंवा धार्मिकपणानें म्हणा आपल्या घराची धूळधाण केली. इतकेंच नव्हे तर, त्यांनीं आम्हांला अन्नालाही महाग केलें. आईची जोड व एक प्रकारचा निर्बंध नसता, तर बाबा आम्हांला कोणावर तरी टाकून बैरागी होऊनही गेले असते. म्हणून आम्हीं सर्वस्वीं आईचे ॠणी आहोंत.
सासुरवास : माझ्या आईच्या अंगीं ही दैवी पात्रता येण्याला तीन प्रकारचे टाकीचे घाव तिला अगदीं लहानपणापासून तों अगदीं मरणाचे दारापर्यंत, जवळजवळ ७० वर्षे सोसावे लागले. प्रथम माहेरच्या दारिद्र्यामुळें आणि बाप लंगडा व आई कर्तृत्वहीन असल्यामुळें माझ्या आईचे झालेले हाल. दुसरें तिला परकीयांचें म्हणजे वैष्णव ब्राह्मणांचें लागलेलें वळण आणि तिसरें तिला झालेला कठीण सासुरवार. तिसरा जो सासुरवास त्याच्या गोष्टी आईनें आमच्या लहानपणीं ज्या उठतां-बसतां सांगितल्या त्या ऐकून आमचें कोवळें हृदय करपत होतें. आमच्या आजीचा-संताबाईचा-स्वभाव खाष्ट होता. ती फार क्रूर होती अशांतला प्रकार नव्हता; पण अगदीं हेकट, सहानुभूतिशून्य आणि पक्षपाती होती. तिला दोनच मुलें होतीं व त्यांतल्या त्यांत तिचें प्रेम तिच्या मुलीवर, अंबाबाईवर जास्त होतें. गरिबीमुळें ही मुलगी आमच्या घरींच राहात असल्यामुळें सासूच्या कहरांत नणंदेची भर पडत असे. त्यामुळें ती सुनेला मरेमरेतों राबवी.
आमचा रयतावा : आमचे घरीं रयतावा मोठा होता. दावणींत औताचे आठ बैल तर असतच; शिवाय गाई, म्हशी आणि वासरांचें शिल्लार असे. आजी रानांत गड्यांच्या बरोबर सर्व काम स्वतः करी. तिचा भाऊ व्यंकप्पाही राबत असावे. माझ्या आईला मात्र शेतांत जावें लागत नसे. पण घरकामाचा बोजा लहानपणापासून एकटीवरच पडे. नणंद होती तिचा उपयोग चहाड्यां सांगण्यापुरताच. आजोबा, आजी, बाबा, नणंद अंबाबाई, केव्हां केव्हां तिचा नवराही, व्यंकप्पा, त्याचा मुलगा शिद्दु, आम्ही तीन तीन मुलें, अंबाबाईची मुलगी भागूबाई, दोन चार गडीमाणें व यांशिवाय अतिथि, बैरागी, पाहुणे इतका हा नेहमींचा राब ! सकाळीं चार वाजल्यापासून दळणाची घरघर सात वाजेपर्यंत चाले. मग विहिरींतून पाणी आणणें, स्वयंपाक, भांडीं धुणें, जेवण होतें न होतें तोंच सूत कातणें, मग इतक्या बैलांच्या शेणाच्या गोवर्या करणें, शिवाय रात्रीचा स्वयंपाक. श्रीमंत आप्पासाहेबांचें राहणें जमखंडीहून १॥ मैलावर डोंगरांत रामतीर्थ नांवाचे ठिकाणीं असे. तें काम आटोपून यावयाला रात्रीं ११।१२ वाजहत. तोंपर्यंतही घरचें काम आटपत नसे. बाबा कामावरून लौकर येत नसत. पुन्हां भल्या सकाळीं दळणाला उठावें लागत असे. बाबांचें आणि आजोबांचें वैभव असतां तरुण सुनेला इतकें काम कां ? तर त्या काळची साधी आणि कष्टाळू राहाणी आणि विशेषतः आजीचा हेकटपणा. आजोबांना हा सासुरवास आवडत नसे. पण नित्याची कटकट करणेंही त्यांच्या सुखवस्तु स्वभावाला पटत नसे. नशीब आईचें !
हालअपेष्टा : आईला नुसता कामाचा भार नसे. तिला एकदां जी अगदीं लहानपणीं सासरीं आणली होती ती माहेर ६ मैलांवर असूनही २।४ वर्षांत एकदांही तेथें पाठविण्याची मारामार पडूं लागली. कारण माहेरचीं माणसें गरीब, आईचें बाळंतपणही करण्यास असमर्थ. घरांत वस्त्रालंकारांची रेलचेल असूनही सुनेला ते घरांत घालून तिचें कौतुक करण्याची सहृदयता आजींत नसे. इतकेंच नव्हें तर आपल्या लाडक्या मुलीला तितकेच दागिने नाहींत म्हणून कांहीं अंशीं मत्सरही आड येत असावा. हिंदु सासुरवासाची नाजूक कारणें इतकीं आहेत कीं, जुन्या वळणांतील सर्व लोकांनासुद्धां त्यांची मीमांसा करतां येत नसे. आमच्या बाबांचाही स्वभाव फार रागीट असे. मुलें होऊं लागेपर्यंत एक प्रकारचा जाच व मुलें होऊं लागल्यावर तो एक दुसराच भार. आमच्या आईला एकंदर वीस मुलें झालीं (एक खंडीभर अशी म्हण आहे). त्यांपैकीं एकाच वेळीं पांचांहून जास्त केव्हांच नव्हतीं. ह्यावरून निदान पंधरा तरी मुलांचा शोक आईला करावा लागला. तिच्या प्रेमाला सीमाच नव्हती. दोन मुलें मोठीं होऊन वारलीं. माझा मोठा भाऊ-त्याचें नांव परशुराम (लाडकें नांव भाऊच होतें.) हा अठरा वर्षांचा होऊन वारला. सर्वांत धाकटी बहीण चंद्राबाई नांवाची सुमारें १४।१५ वर्षांची होऊन वारली. भाऊ पटकीनें दोन दिवसांत तडका-फडकीं वारला. त्याचा शोक तिनें कित्येक वर्षे इतका केला कीं, दगडालाही पाझर फुटावा. पुढें आईचे म्हातारपणीं चंद्राबाई क्षयानें झिजून वारली. तिचा शोक आईला मरेपर्यंत पुरून उरला !
घरचें काम इतकें पडे कीं, त्याचा एकदां हृदयद्रावक परिणाम घडला. मी ५ वा मुलगा. माझ्या अगोदरचा कृष्णा म्हणून एक मुलगा होता. तो रंगानें उजळ आणि पिंडानें गुटगुटीत होता. सुमारें ६ महिन्यांचा असतांना तो आईच्या अंगाखालीं चिरडून झोपेंत कधीं मेला तें तिला कळलेंच नाहीं. त्याला पाजीत असतांना आईला गाढ झोंप लागून, मुलाचा दम कोंडून सकाळीं तो मेलेला आढळला ! मग त्या आकांताला व आईच्या हालाला कोण सीमा असणार !! हा प्रकार इ.स. १८७०।७१ मध्यें घडला असला पाहिजे. आजा-आजी असेतोंपर्यंत म्हणजे इ.स. १८८० पर्यंत तरी आईला स्वातंत्र्य म्हणजे काय तें माहीत नव्हतें. कोणत्या अस्सल हिंदु सुनेला हें स्वातंत्र्य असणार ! आणि आजी गेल्यावर लवकरच आमच्या घरची सुबत्ताही तिचे बरोबर गेली. कारण बाबांनीं माझ्या जन्माचे अगोदरच म्हणजे इ.स. १८७३ चे सुमारासच सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. इतकेंच नव्हे तर त्यांनीं त्यानंतर कोणताच किफायतीचा धंदा केला नाहीं. गड्यांमाणसांवर शेती कसची चालते ! खर्च बिनहिशोबी. एकूण आईला घरी स्वातंत्र्य मिळतें न मिळतें तोंच अठरा विश्वे दारिद्र्यानें तिला गांठलें !
तान्याक्का : माझी आजी संताबाई वारल्यावर माझ्या आईचीं दोनतीन वर्षे फार हालांत गेलीं. त्या वेळीं माझी बहीण मुक्ताबाई (जनाक्काच्या पाठीवरची, आठवी मुलगी) हिचे जन्मापूर्वी आई गरोदर होती. जवळजवळ एक वर्षभर ती हिंवतापानें बेजार होती. त्या वेळीं मीं नुकताच मराठी शाळेंत जावयास लागलों असेन. बहुतकरून तें १८८०।८१ साल असावें. आईला रोज दोन प्रहरीं कडकडून हींव भरत असे. तिला तहान फार लागे. तेवहां पाणी तापवून देण्यालाही घरीं कोणी नसे. बाबा कोठें तरी बाहेर जात असत. माझी बहीण जनाक्का २।३ वर्षांची असेल. आई फार खंगली होती. शेवटीं अशांतच बाळंतपण आलें. आई सर्व महिने आजारी असल्यामुळें जन्मलेलें मूल तान्याक्का अर्थात् अशक्त व रोगीच झालें. या आजारामुळें तान्याक्काच्या मेंदूवरही परिणाम झाला होता. ती फार भोळसर होती.
जनाक्का : माझा भाऊ परशुराम ह्याच्या पाठीवर आम्ही चौघे मुलगेच झाल्यामुळें व सातवी मुलगी जनाक्का जन्मल्यामुळें ही आमच्या घरांतली पहिलीच मुलगी. म्हणून जनाक्का ही आम्हां सर्वांची लाडकी होती. विशेषतः ती माझ्या बाबांची मोठी लाडकी होती. ती लहानपणीं अंगानें गुटगुटीत, बुद्धीनें चुणचुणीत, भांडखोर व बोलकी असे. दिवसांतूनच काय पण तासांतूनहि आम्ही कितीदां तरी भांडत असूं. कारण दोघांचाही स्वभाव तापट, हावरा, अधाशी, खोडकर व दोघेंही आम्ही बाबांचे लाडके. त्यामुळें आमच्या कागाळ्यांना सीमाच नसे ! आमची वर्दळ आईकडे केली कीं, स्वयंपाक-घरांतलें काम सोडून तिनें आम्हांला धमकावयाला सोप्यांत बाहेर यावें. पण आईचा स्वभाव शांत व सहनशील असल्यानें आम्हां दोघांनाही तिच्या रागाचा धाक मुळींच वाटत नसे. पण बाबांचा नुसता त्यांच्या नांवाचाही आम्हांस जबर धाक असे. ते घरीं असेतोंपर्यंत त्यांच्यासमोर उभें राहाण्याचीही आम्हांला छाती होत नसे. ते बाहेर गेले कीं, ताबडतोब आमच्या धांगडधिंग्याला सुरुवात होई. माझा मोठा भाऊ माझ्या आई-सारखा शांत व मवाळ होता. तो आमच्यांत फारसा मिसळत नसे. धाकटी तान्याक्का थोडी मोठी झाल्यावर आमचेबरोबर खेळावयास येई. पण ती फारच भोळसर असल्यामुळें आम्ही सांगूं तें तें ती मुकाट्यानें करी. माझा मोठा भाऊ इ.स. १८८५ सालीं पावसाळ्यांत पटकीच्या रोगानें वारला. त्या वेळीं गांवांत ही सांथ बरीच होती. म्हणून जमखंडीच्या गांवकर्यांनीं मरीआईची मोठी यात्रा केली. त्या वेळीं कित्येक रेडे, पुष्कळशीं बकरीं व कोंबड्यांची तर गणतीच नाहीं, इतक्या प्राण्यांचा वध झाला !
आमचा वाडा : इतकी मुलें लहानपणी वारण्याचें कारण आमच्या वाड्यांची आरोग्याच्या दृष्टीनें परिस्थिति वाईट होती. आमचे घराचे पश्चिमेला लागून एक मोठें तळें होतें. त्याच्या खालच्या सखल भागांत आमचा वाडा असे. सांडपाणी जाण्याला कोठें वावच नव्हता. दक्षिणेलाही आमच्या घराचे मागें उंचवटाच होता. स्वयंपाकघरांत एक न्हाणी होती व बाहेर सोप्याचें खालीं, मोठ्या दरवाजाला लागूनच एक दुसरी न्हाणी होती. पण दोनहि न्हाण्यांचें सांडपाणी दोनचार हातांवर जमिनींतच जिरत असे. अर्ध्या घरांत अंधार, सोल व कोंदट हवा असे. मोठा मुख्य दरवाजा उत्तरेकडे तोंड करून होता व त्याच्या आंत थोडें अंगण व थोडी पडवी होती. हवा आणि उजेड यावयाला काय ती एवढीच वाट होती. दक्षिणेच्या बाजूला तीन खिडक्या होत्या. त्या लहान होत्या व त्या बाजूला गांवचे लोक शौचास बसत. म्हणून त्या आम्हांला झांकाव्या लागत. उजेडाला साणी राखली होती. त्यांतून दोन प्रहरीं ऊन पडे. पण हवा येणें शक्य नसे. आरोग्याचे दृष्टीनें हें घर अतिशय वाईट असे. मोठ्या दाराच्या पुढें सुमारें एक एकराचें आंगण असे. त्यांत उकिरडे, कडब्याच्या गंजी, गोवर्यांचे हुडवे, शेणाचे ढिगारे असत. वायव्य कोनास एक पेवाचा पायखाना असे. त्याचा उपसाही वेळेवर होत नसे. एवढेंच बरें होतें कीं, आमच्या वाड्यांच्या दक्षिण, पश्चिम व उत्तर बाजूनें बर्याच अंतरापर्यंत दुसर्या कोणाचींही घरें नसत. पश्चिमेच्या बाजूला तर मोठें विस्तीर्ण तळें (लक्कनकेरी नांवाचें) आणि त्याच्या पश्चिमेस मोठा डोंगर होता. आमचा वाडा गांवाच्या पश्चिम हद्दीवरचा शेवटचाच होता. वाड्यांबाहेर जरी मोकळी हवा मुबलक होती, तरी आंतली स्थिति अपायकारक होती. बाळंतपणांत बाळंतिणीचे खोलींतच एक खड्डा खणून त्यांतच बाळंतिणीला १०।१२ दिवस न्हाऊं घालीत. अशा स्थितींत इतकीं मुलें लहानपणींच वारलीं हें आश्चर्य नसून आम्ही ५।७ जण कसे वांचलों हेंच आश्चर्य होय !
आईच्या गोष्टी : दर दुसरे वर्षी आमच्या आईचें बाळंतपण हें ठरलेलेंच असे आणि त्या वेळीं मागलें मूल कांहीं जिवंत नसे. बाळंतपण, मुलांचा आजार किंवा मरण यांखालीं माझ्या आईची सर्व शक्ति खचली. तरी पण मुलांचा कंटाळा किंवा संसाराचा तिटकारा - किंबहुना दुःखाचा किंवा निराशेचा एक उद्गारही कधीं आईच्या तोंडांतून आमच्या कानांवर आला नाहीं. उलट दारिद्र्याच्या असह्य वेदना, वर्याचा रागीट स्वभाव मुलांचा जोजार सोसूनही आम्हां लहानग्यांना नेहमीं आपल्या माहेरच्या सुखदुःखाच्या गोष्टी रसिकपणानें सांगून आई आमची गोड करमणूक करीत असे. आईच्या गोष्टी व गाणीं हाच आमचा मोठा मेवा होता. तिची आनंदी आणि विनोदी वृत्ति हीच आमची विश्रांति होती. तिच्या गोष्टींची आम्हांला पुढें पुढें चटक लागली. इतकी कीं, जर भूक लागली असली, स्वयंपाकाला अवकाश असला, किंबहुना भाकरीबरोबर खावयास चांगली भाजी नसली, तर आम्हीं आईच्या काठवटीभोंवतीं जमून तिला गोष्टी सांगण्यास लावीत असूं. मग तिनें आम्हांस अशा प्रेमळ कहाणींत गुंतवावें कीं, स्वयंपाक केव्हां झाला, आम्ही काय खाल्लें कीं मुळींच कांहीं खाल्लें नाहीं याचें आम्हांस भान राहात नसे. बाबा एखादे वेळीं रात्रीं उशिरां घरीं आले कीं, आमच्या गोष्टीची मेजवानी लांबे ! केव्हां केव्हां आम्हीं वन्समोअरही म्हणत असूं ! एकंदर आईच आमची खेळगडी होती. आम्हांला बाहेरच्या खेळगड्यांची जरुरीच लागत नसे. आमचा वाडा वकीकडचा, अंधारी व मयाण असल्यानें लोकांच्या नजरेंत तो भुताटकीचा एक मोठा अड्डाच होता. शिवाय आमचे आजूबाजूचे सर्व घरांतून, किंबहुना आमचे सर्व मराठा जातींतही आमच्याइतकें सुशिक्षित व वजनदार घराणें नसल्यानें भोंवतालच्या लोकांना आमचा मोठा दरारा वाटत असे.
आत्मसंतोष : आमच्या बाबांचा स्वभाव रागीट, सडेतोड, करारी असल्यानें व आमची आई आपल्या आईप्रमाणेंच, कधीं आपल्या दाराच्या बाहेर कामाशिवाय पाऊलही टाकणारी नसल्यामुळें आमचे घरीं शेजार्यांचा विनाकारण सुळसुळाट कधींनसे. कितीही त्रास असो व कसलाही प्रसंग येवो, बाबा घरीं असोत-नसोत, आई आम्हां चौघां पिलांस एखाद्या पक्षिणीप्रमाणें पंखाखालीं घेऊन आनंदानें बसे व आम्हांलाही तिच्या पंखाशिवाय दुसरा आसरा नको असे. आजा-आजी असेतोंपर्यंत ज्या वाड्यांत मोठ्या दणक्यानें रयतावा चालत असे तेथें त्यांच्यामागें थोड्यांत वर्षांत सर्व वैभव होरपळून रानांत शेत नाहीं, गोठ्यांत गुरें नाहींत, घरांत माणसेंही नाहींत, अशी ओसाड सिथति झाली. तरी बाबांना संसाराची काळजी म्हाणून कसली ती लागली नाहीं किंवा आईच्या स्वभावांत कडूपणाची छटा कधीं दिसून आली नाहीं. ह्या धन्य संतोषाचा माझ्या मनावर जो परिणाम झाला, मला जें बाळकडू मिळालें तेंच माझें अमूल्य भांडवल. माझ्या पुढील आयुष्याचें तारूं अनेक तुफानांतून जें सुरक्षितपणें चाललें त्याला आधार काय ती माझ्या आईबापांची आत्मसंतुष्ट वृत्ति.
सोळा वर्षे माझ्या बाबांनीं अगदीं कांहीं धंदारोजगार न करितां घरीं निजून काढलीं. या सोळा वर्षांत घरची शेतीभाती, गुरें, गडीमाणसें, आईच्या अंगावरची सर्व चीजवस्तु फुटक्या घड्यांतील पाण्याप्रमाणें गळून व झिरपून माझ्या नजरेसमोर गेली. मी अगदीं लहान असतांना माझ्या हातांत सोन्याची कडीं, कमरेस सोन्याचा झिळीमिळी करगोटा, गोठ्यांत मोठमोठे धिप्पाड बैल आणि शेतांत फार दिवसांचे इमानी नोकर होते. दोहोंकडच्या आजाआजींच्या कुशींत मी लडिवाळपणें लोळलों होतों; सणवार, उत्सव-समारंभ पाहात होतों. घरांत पाहुण्यांची व आश्रितांची मांदी जमत असे. घरीं पुराणिक, पुरोहित, भजनीमंडळी, साधु, संत, फकीर, बैरागी, तडीतापडी यांची रीघ लागे. हळूहळू मी नुसत्या दोनतीन भावंडांतच सुख मानून माझ्या आईभोंवती घिरट्या घालून सुखानें राहाण्यास शिकलों. हा कोणाचा प्रभाव ? केवळ माझ्या आईच्या दैवी संतोषाचा !
वाशांचें सरपण : बाबा देवळांतून, मठांतून कोठें तरी भजनाला जात. घरीं आले तरी ते निघून राहात. जागेपणीं त्यांचेसमोर उभें राहाण्याची आम्हां कोणाची छाती नसे. मग आम्ही चार मुलें व आई हेंच पंचायतन आत्मसंतोषाचें दिव्य आगर होतें. आमच्या भोंवतालचें भंगुर वैभव कसें पार नाहीसें झालें याचें एकच हृदयद्रावक उदाहरण सांगतों. आमच्या राहात्या घरांतील माया तर सर्व गेलीच; पण आमच्या बाहेरच्या विस्तीर्ण अंगणांत चौफेर कुळवाडी होती. म्हणजे भोंवतालीं खोल्यांतून गरीब भाडोत्री कुटूंबें राहात असत. त्यांच्यापासून बाबा कांहीं भाडें घेत असतील, असें मला वाटत नाहीं. कारण त्या वेळीं घराला भाडें घेणें लाजीरवाणी गोष्ट समजत. हळूहळू हीं सर्व कुळें परागंदा झालीं. त्यांच्या धाबीवजा खोल्यांच्या दुरुस्तीचा त्राण आमच्यांत उरला नाहीं. स्वतः आमच्या जळणाचीही पंचायत पडूं लागली. मग काय विचारतां ! या पडक्या खोल्यांच्या मोठ्या तुळ्या व वासे आम्ही सोळा वर्षांत सरपण करून जाळलें. 'विठू, वासे आण' म्हणून आईनें सांगण्याचा अवकाश, कीं एका हातानें शेंडी व दुसर्या हातानें लंगोटीचें शेंपट ओढीत मी वासे ओढावयाला धांवलोंच ! पांडवप्रतापांतील द्रौपदीवस्त्रहरणाचें चित्र मीं पोथींतून पाहिलेंच होतें. दुःशासनाचा आविर्भाव म्हणून मी आमच्या जुन्या वाड्यांतील अंगणाचे बाजूच्या धाब्याचे वासे ओढीत असे आणि मोठ्या फुशारकीनें आईला जळण नेऊन देत असे.
करवीरची यात्रा : घराचें आणि संसाराचें कांहीं होवो. बाबांच्या देवदेवतेमध्यें व भजनपूजनांत कांहीं खंड पडला नाहीं. आजी वारल्यावर दोनतीन वर्षांनीं बाबांना दत्ताच्या उपासनेचा नाद लागला. घरीं श्रीगुरुचरित्राच्या पोथीचें पारायण चाललेलें. बाहेरची भाविक मंडळी ऐकावयास येत व बाबा मोठ्या खड्यां आवाजांत पोथी वाचून अर्थ सांगत. जमखंडींत काण्णव आळींत एक दत्ताचें देऊळ आहे. तेथें बाबा सायंकाळीं भजनाला जात. त्याच वेळीं नरसोबाच्या वाडीची आणि कोल्हापूरच्या यात्रेची टूम निघाली. त्या वेळीं आमच्या घरचे गाडीबैल, गडीमाणसें होतीं. बाबा, आई, आम्ही चार भावंडें, एखादें पांचवें तान्हें मूल, शिवाय चिऊबाई नांवाची काण्णव आळींतील एक विधवा ब्राह्मणाची बाई (ही आमच्या घरची पुरोहित चंद्रभट डेंगरे यांची बहीण होती) व आमचा तुकाराम नांवाचा मराठा गडी इतकेजण आमच्या स्वतःच्या गाडींतून कोल्हापूरचे महालक्ष्मीचे यात्रेस निघाले. वाटेंत अथणी, शेडबाळ, कागवाड, कुरुंदवाड, मिरज, सांगली, हातकणंगलें वगैरे लहानमोठीं गांवें आम्हीं पाहिलीं व नरसोबाच्या वाडींत श्रीदत्ताची यात्रा केली. एका ब्राह्मणाचे घरीं उतरून आम्हीं देवाचा नैवेद्य व ब्राह्मणभोजन केलें. कोल्हापुरास गांवाबाहेर पूर्वेकडे एकवेरीचें देऊळ आहे. त्याच्या ओवरींत आम्ही तीन दिवस उतरलों होतों. कोल्हापूरचे राजधानीचें वैभव, अंबाबाईचें भव्य देऊळ, त्याचें महाद्वार, कोल्हापुरांतील पाण्याचे नळांना लावलेलीं सुंदर गायमुखें, रंकाळे व पदमाळे हे तलाव या सार्यांचा मनावर चांगला ठसा उमटला. एकवेरी देवळांतील आंगणांत एक मोठा विस्तीर्ण चबुतरा आहे. त्यावर खेळत असतां तेथील एका मुलाशीं भांडण होऊन माझी मारामारी झाली. ''विठ्या, तूं कोठें गेलास तरी तुझी आगळीक कांहीं थांबत नाहीं ना रे !'' असें म्हणून आईनें मला त्या वेळीं मारामारींतून सोडविलें. येथपर्यंत माझ्या पूर्वजांचा वृत्तान्त संपला. येथून पुढें माझ्या स्वतःच्या पिढीचा वृत्तान्त सुरू होत आहे.