मूर्ति-पूजा

देव्हारा  :   येथपर्यंत मी जें लिहिलें त्या माझ्या बालवयांतल्या चेष्टा होत्या.  हा प्राथमिक शाळेंतला १२ वर्षांच्या वयांतला काळ होता.  ह्या काळांतही मी घरीं देवपूजा केव्हां केव्हां फार मन लावून करीत असें.  देव्हार्‍यावर देव पुष्कळ असत.  शिवाय इतर कोनाड्यांतूनही पूजनीय वस्तु पुष्कळ ठेविलेल्या असत.  उदाहरणार्थ, आमचा देव्हारा म्हणजे देवधरांतल्या भिंतींत माझ्या कंबरेइतक्या उंचीवर एक मोठा चार फूट रुंद व तितकाच उंच आणि ३।४ फूट खोल असा कोनाडा होता.  त्यांत प्रथम देवांच्या मूर्ति आणि पितरांचे टांक नीट मांडावयाचे असत. त्यापुढें शाळिग्राम, निरनिराळ्या नद्यांतले गोटे, त्याचेहीपुढें घंटा, धूपारती, कापुरारती, निरांजनें, पळी, पंचपात्री आणि उजवीकडे एका अडणीवर मोठा शंख आणखी एक लहान शंख वगैरे ठेवलेले असत.  उजवीकडे आंत पुन्हां एका खिडकींत श्रीयल्लमाची चवरी आणि आमच्या आजीची ताळी वगैरे जवाहीर असे.  डावीकडील एका लहानशा देवळींत एक समई आणि जवळ एक काशीहून आणलेला गंगोदक बंद करून ठेवलेला तांब्या अशा किती तरी वस्तूंचा सुंदर संभार असे.

पूजेचा उत्साह :  मनाला आलें कीं, ह्या सर्व देवदेवता आणि इतर वस्तु धुऊन पुसून व्यवस्थेनें मांडून त्यांवर गंधाक्षता, कुंकुं, हळद, फुलें यथासांग लावून पूजा करण्यांत त्या बाळपणीं देखील मला मोठें सुख आणि ईर्षा वाटे.  ती माझ्या वडील भावाला वाटत नसावी आणि हा आम्हां दोघां भावांमधील भेद बहुतकरून माझ्या बाबांच्या लक्षांत आला असावा; म्हणून ते मलाच पूजा करावयास सांगत असावेत.  ह्यावरून माझ्या स्वभावांतील उत्साह हा गुणही दिसून येतो.  विशेष सणावारीं घरीं कांहीं गोडधोड नैवेद्याचें झालें, म्हणजे माझ्या बाळभक्तीला तर पूरच येत असे.  मानवी जातीप्रमाणें व्यक्तींतही सकाम भक्ति अगोदर असणारच.  मग मला ह्यांत लाज आणणारें कांहीं विशेष नाहीं.

आध्यात्मिकता :  मूर्तिपूजा मुलांना आणि बायकांना देखील आवश्यक नाहीं, असें माझें आतां धर्माचा इतिहास शास्त्रीय दृष्टीनें वाचून ठाम मत झालें आहे.  तरी त्या वेळीं मूर्तिपूजेंत माझी मोठी करमणूकच होई.  आपण कांहीं विशेष गोष्ट करीत आहों असें वाटे.  ती गोष्ट आध्यात्मिक होती, हें त्या वेळीं वाटणें शक्यच नव्हतें.  तरी मला जो उत्साह आणि निरतिशय आनंद वाटत होता, तो केवळ नैवेद्याच्या लोभामुळेंच होता असेंही नव्हतें.  माझ्या बाबांचा दरारा घरीं फार होता, तरी माझ्या आईवर लहानपणींही मी इतका दाब टाकीत असें कीं, हट्ट धरला असता तर देवांच्याही अगोदर मला केलेले गोड पदार्थ खावयाला मिळाले असते.  बाबांनींही ज्या अर्थी पूजेची मजवर सक्ति कधीं केली नाहीं त्या अर्थी पूजा करण्यांत मला तितक्या कोवळ्या वयांतही ९।१० वर्षांचा असतांना तेव्हां न सांगतां येण्यासारखें कांहीं तरी आंतरिक सुख होत असावें.  नाहीं तर माझ्यासारख्या त्या वेळच्या काफिर अरबाला अगर तुफान पठाणाला ह्या हिंदु पूजेची दगदग सहनच झाली नसती !  ''व्यतिषजति पदार्थान् आंतरः कोऽपि हेतुः'' ह्या पूजेंत माझी कोवळी आध्यात्मिकताच असेल, नसेल कशावरून !

हा जो मीं वरील तर्क रचला आहे त्याला कारण पुढें जें लिहीत आहें त्यांत दिसणार आहे.  तो चुकीचा ठरला तर माझी चूक कबूल करावयाला मी केव्हांही तयार आहें.  कारण हें जें सारें प्रकरण मी लिहीत आहें तें मी मोठा धार्मिक होतों असें भासविण्यासाठीं नसून, पुढें प्रौढपणीं माझ्यांत ज्या धार्मिक भावना स्पष्ट झाल्या त्याचेंच हें प्राथमिक अस्पष्ट रूप होतें, हें दाखविण्याचा माझा शास्त्रीय प्रयत्‍न आहे.

शिवलिंगपूजा  :  इंग्रजी तिसर्‍या-चौथ्या इयत्तेंत असतांना मी १४।१५ वर्षांचा होतों.  त्या वेळीं माझ्या भावनाशील अंतःकरणांत स्पष्ट रूपानें भक्तिभावनांचा उद्रेक मला दिसून आला.  ह्या वेळीं माझी मराठी वाङ्‌मयांत चांगली प्रगति होत होती.  मी पौराणिक पोथ्या वाचीत होतों.  विशेषतः मी शिवलीलामृत ह्या लहानशा पोथीचें पारायण आवडीनें करीत असें.  हें मी स्नान करून जेवणापूर्वी करीत असें.  शिवाय श्रावणमासांत शिवलिंगाचें अर्चन मी मोठ्या भक्तिभावानें करूं लागलों.  पाटावर शिवलिंग ठेवून मी त्यावर बेलपत्राचीं सहस्त्रदळें वाहात असें.  म्हणजे बरोबर जरी हजार पानें नसलीं तरी पुष्कळशी पत्री मी स्वहस्तें तोडून आणून माझ्या आवडत्या शिवलिंगावर अर्पीत असें आणि विष्णुसहस्त्रनामाप्रमाणें शिवनामाचा जप करीत असें.

शिव व विष्णु  :  हिंदु धर्मांतील शिव आणि विष्णु ह्या मुख्य दैवतांपैकीं मला पहिलेंच विशेष आवडे.  अजूनही मला विष्णुमंदिरापेक्षां एखाद्या शिवालयांत जाऊन बसणें अधिक पसंत आहे.  ह्याचें कारण विष्णु सापेक्षतः अधिक अर्वाचीन आणि त्यांत शिवालयापेक्षां भजनपूजनाचा व स्त्रीपुरुषांचा अधिक गोंगाट असतो.  शिवालयें प्राचीन आणि निवांत असतात.  गाभार्‍यांत मूताअचा सुळसुळाट आणि उपकरणांचा दणदणाट नसतो.  हरिचरित्रांत मी कृष्णाचे जे चाळे वाचीत असें त्यापेक्षां शंकर-पार्वतीचे गोष्टींत अधिक साधेपणा आणि भोंळेपणा मला त्या लहान वयांतही दिसत असे.  ह्यामुळें कृष्णापेक्षां भोळा सांब मला अधिक आवडे !

पुराणिकाचा थाट  :  ह्या दोनचार वर्षांत मी शाळेंतील माझ्या सोबत्यांस जमवून सुट्टीचे दिवसांत हरिविजयांतील गोवर्धनाख्यान, रामविजयांतील कुंभकर्णवध किंवा पांडवप्रतापांतील हरिश्चंद्राख्यान असले भक्तिरसोत्पादक अध्याय वाचून पुराणिकाप्रमाणें अर्थ सांगत असें.  विशेषतः शेवटच्या आख्यानाचे वेळीं श्रोते आणि वक्ता आम्ही दोघेही करुण रसानें व्याकुळ होऊन रडत बसल्याचें मला आतां नीट आठवत आहे.  तसेंच विठोबाच्या मठांत मागें वर्णन केलेल्या सप्‍ताहांत अगदीं लहानपणीं मी जो तमासगिराप्रमाणें जात होतों तो ह्या वेळीं प्रेमानें वश होऊन भाग घेऊं लागलों.  पुढें बाबा गुरुचरित्र वाचून दत्तमंदिरांत जाऊं लागले.  तेव्हां त्या चरित्रांतील कथा मला रामरावणाच्या युद्धापेक्षां, किंबहुना कृष्णगोपींच्या लीलेपेक्षां अधिक मानवी तर्‍हेच्या व करुण भक्तीला पोषक असलेल्या अधिक आकळूं लागल्या.  दत्तमंदिरांतील करुणाष्टकें बाबांच्या तोंडून ऐकणें मला फार आवडे.  ह्या माझ्या बुद्धिविकासाबरोबर जो धर्मभावनांचा विकास होऊं लागला त्यांतील शास्त्रीय संबंध जरी त्या वेळीं मला कळून येणें शक्य नव्हतें, तरी वस्तुस्थिति तशी होती खरी !

गोड फरक :  पोथ्या वाचणें हा तिसर्‍या प्रहरचा आणि भजनास जाणें हा एक सायंकाळचा, कांहीं अंशीं फावल्या वेळेचा प्रकार होता.  तरी श्रावण महिन्यांत स्नान करून जेवणाचे पूर्वी मी श्रीशिवलीलामृताच्या पारायणाचा, नामजपाचा, लिंगार्चनाचा आणि उपवास करून रामतीर्थास (१॥ मैल डोंगरांत) जाऊन येण्याचा जो नाद घेतला त्यांत खरा भक्तिभाव होता.  हा माझ नवीन नाद पाहून आईबाबांना कौतुकच नव्हें तर आश्चर्य वाटे.  श्रावणमासांत डोंगरांत आपल्या वानरसेनेला घेऊन जाऊन रामेश्वराहून परत येतांना जिवंत विंचवांची माळ घरीं आणून लहान बहिणींना भेडसावणारा पठाण पोर्‍या, आतां सरळ मार्गानें उपाशी एकाकी रामेश्वराला जाऊन त्याचा अंगारा आणून वडिलांनाही लावतो हा कोण गोड फरक !  हा फरक आपल्या मुलाच्या स्वभावांत पडत आहे, हें पाहून कोणा प्रेमळ आईबापांना कौतुक वाटणार नाहीं !  

हा जो परिपाक माझ्या स्वभावांत दिसूं लागला तो कांहीं तिसर्‍या चौथ्या इयत्तेंत एकदम आला असें नव्हे.  माझ्या भावाच्या मृत्यूबद्दल शोक, घरांतील दारिद्र्य, आईबाबांचा उदासीनपणा वगैरे अनेक नैसर्गिक कारणें ह्या अंतरपालटाचीं होतीं.  तिसर्‍या, चौथ्या इयत्तेंत मला माझ्या वर्गांतील हुषारीमुळें सोबत्यांमध्यें आणि वर्गामध्यें जें यश आणि प्रभुत्व मिळालें त्याचाही हा सात्त्विक परिणाम होता.  इतर मुलांप्रमाणें मी यशामुळें आढ्य, हेकेखोर व जुलमी न होतां माझ्या सोबत्यांना घेऊन जरी बराच वेळ धांगडधिंगा घालीत असें, तरी पुन्हां कांहीं वेळ पोथ्या वांचण्यांतही घालवीत असें, ही विशेष ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट आहे, असें मला वाटत आहे.  पण तेव्हां मात्र मी केवळ अनभिज्ञ, मुग्ध आणि भावनाशील होतों !

भक्ति व यश  :  शाळेला मी नियमानें जात होतों.  कारण नंबर पहिला असल्यानें वर्गाचा सेक्रेटरी मलाच व्हावें लागे.  मार्कपत्रकें, हजेरीपत्रकें नीट ठेवणें वगैरे शिक्षकांच्या हाताखालचीं सटरफटर कामें सेक्रेटरी या नात्यानें मला करावीं लागत, म्हणून शाळेंत उशीर करून जाणें किंवा गैरहजर राहणें हें शक्यच नसे.  तरी मी शाळेस जाण्यापूर्वी आईला किंवा बाबांना न सांगतां, अथवा जातां जातां शाळेपूढच्या मारुतीचें दर्शन न घेतां कधींच जात नसें !  पुढें बबलादीचे सिद्ध पुरुष २।३ वर्षे घरीं येऊं लागले.  त्यांचेवरही माझी श्रद्धा बसली.  तसा त्यांच्यांत मजविषयीं प्रेमळपणा होता.  त्यांचा प्रसाद म्हणून बराच अंगारा मी एका पेटींत घालून ठेवीत असें.  ह्यांतच रामेश्वराचा, मारुतीचा, दत्ताचा वगैरे अंगारा असे.  शाळेंत जाण्यापूर्वी सर्व देवांचीच नव्हे तर बबलादीच्या सर्व सिद्ध पुरुषांचीं नांवें घेऊन आणि कपाळाला हा मिश्र अंगारा लावून मी शाळेंत जाई आणि मला वाटे कीं, ह्या माझ्या भक्तीमुळें मला वर्गांत रोज इतरांपेक्षां जास्त मार्क मिळून माझा नंबर नेहमीं पहिला राही.  वस्तुतः हा माझा धर्मभोळेपणा होता.  कारण खरा प्रकार असा कीं, हा माझ्या भक्तीचा नवीन उद्रेक होण्यापूर्वीच १।२ वर्षे माझी हायस्कुलांत प्रगति होऊन माझी प्रसिद्धि झाली होती.  भक्ति प्रथम असो किंवा यश प्रथम असो; ह्या दोन्हींचें कांहीं वर्षांनीं पुढें साहचर्य घडलें ही गोष्टही खोटी नाहीं.

पांचव्या इयत्तेंत असतांना मला खरूज फार लागली व घरीं आम्ही सर्वजण बेजारलों.  तेव्हां श्रीयल्लमाचे यात्रेला जाण्याचा मींच घरीं आग्रह धरला आणि तो बाबांनीं पारही पाडला.  या गोष्टीवरून जरी ह्या माझ्या धर्माच्या दुसर्‍या विकासांत कांहीं अंशीं सकामपणाची झांक मारते, तरी एकंदरींत त्या वेळच्या माझ्या भक्तिभावनांतून बर्‍याच अंशानें सहजमधुरता होती असें मला वाटतें.  एरवीं माझ सोबती जे अभ्यासांत, खेळांत आणि इतर करमणुकींत माझ्या प्रभावळींत गुरफटले ते माझ्या धार्मिक छंदांतही तसेच गुरफटले नसते.

अधिक स्फोट  :  हा जो मजमध्यें भक्तीचा उद्रेक झाला म्हणून मीं वर म्हटलें तो जसा अकस्मात् एखादा भूकंप व्हावा तशा प्रकारें मी हायस्कूलमध्यें असतांना झाला असें मुळींच नव्हे.  हायस्कूलमध्यें गेल्यावर मी नव्या जगांत गेल्यासारखें मला कां वाटूं लागलें, घरची स्थिति बदलल्यामुळेंही माझ्या स्वभावांत फरक कसा झाला वगैरे वेळोवेळीं माझ्या स्वभावविकासाची मीमांसा शास्त्रीय दृष्ट्या मीं केली आहे.  धर्मभावनेविषयीं माझ्या स्वतःच्या शास्त्रीय दृष्टीचें थोडें दिग्दर्शन मीं केलें आहे.  यावरून धार्मिक भावना ह्या इतर भावनांहून अगदीं तत्त्वतः भिन्न आहेत असें मी समजत नाहीं.  माझी पुढची कहाणी ऐकून वाचक गोंधळूं नयेत, म्हणून ह्याचा थोडावा जास्त स्फोट करणें मला येथें जरूर दिसतें.

बालस्तावत् क्रीडासक्तस्तरुणस्तावत् तरुणी-रक्तः ।
वृद्धस्तावत् चिंतामग्नः परेब्रह्मणि कोपि न लग्नः ॥

असें प्रत्यक्ष आद्य शंकराचार्य म्हणतात; पण मला तर वाटतें कीं, लहानपणीं मुलांची खेळाची आवड, तरुणपणीं तरुणीसंबंधी उदात्त रस आणि म्हातारपणीं एखाद्या ऐहिक बाबतींतील सात्त्विक चिंतामग्नता, ह्या तिन्ही भावनांहून भक्तीची भावना तत्त्वतः अगदीं भिन्नच आहे असें म्हणतां येत नाहीं.  ह्या भावनांत जी वयपरत्वें अंतःकरणांची परिणति होत जाते तीच किंचित् आणखी थोडी जास्त शुद्ध, जास्त व्यापक आणि जास्त जोरदार झाली कीं तिला आम्ही भक्ति हें नांव देतों.  ज्या सहज आनंदानें मूल खेळतें, तरुण रमतो आणि वृद्ध सात्त्विक चिंतेनें व्याकुळ होतो तोच आनंद ईश्वराच्या उत्तमोत्तम भक्तींत आहे, हें माझें मत कित्येकांना विपरीत वाटेल.  ऐहिक रस आणि पारमार्थिक रस ह्यांना मी एकाच माळेंत गोंवतों, ही माझी कोणाला अक्षम्य भूल वाटणें साहजिक आहे.  परंतु ऐहिक काय किंवा पारमार्थिक काय, रस तो रसच.  तो कांहीं अरस होणार नाहीं.  ह्याच दृष्टीनें वेदान्तानेंही ईश्वराची 'रसोहि सः' अशी व्याख्या केली आहे आणि सत, चित् आणि शेवटचें आनंद हें त्याचें स्वरूप सांगितलें आहे.  मग मी भक्तिभावनेची इतर स्वाभाविक भावनांमध्येंच गणना करतों ह्यांत काय पाप घडतें ?  ह्या न्यायानें पाहतां बाळपणींचा मी खेळकर, पोरपणींचा मी खोडकर किंबहुना कादंबर्‍या वाचून अकालींच शृंगार रसाच्या वेदनांनीं विव्हळ होणारा, पुढें पोक्तपणीं अनेक राजसी भावनांचे हेलकावे खाऊन, शेवटीं वृद्धपणीं महारापोरांच्या घरच्या चिंतेंत असो किंवा स्वतः माझ्या घरच्या मुलाबाळांच्या चिंतेंत असो, प्रसंगोपात्त मग्न झालों असलों तरी ह्या सर्व निरनिराळ्या भावनांत आणि माझ्या धार्मिक आयुष्यांतील उत्तमोत्तम भक्तिभावनेंत तत्त्वतः भिन्नता माझ्या तरी अनुभवास आली नाहीं.  मी मोठा झाल्यावर प्रार्थनासमाजांत असतांना आवड, प्रेम आणि भक्ति ह्या विषयांवर एका कौटुंबिक उपासनेच्या प्रसंगीं प्रवचन करीत असतांना जे विचार प्रकट केले आहेत ते विचार आतां मी येथें भक्तिभावनेविषयीं जी मीमांसा करीत आहें तिच्या उलट आहेत हें खरें; पण हल्लींची माझी दृष्टि आधुनिक शास्त्रांतील विकासवादाला अधिक सुसंगत आहे असें वाटतें.  ह्यामुळें हायस्कूलमधलाच काय पण पुढचाही माझ्या धर्मभावनांचा सर्व विकास माझ्या आयुष्यांतील इतर सर्व अनुभवांशीं आणि तदनुसार घडलेल्या वागणुकीशीं तत्त्वतः मुळींच विसंगत नाहीं, असें माझें आतां मत झालें आहे.

साधुसमागम  :  पोरवयांतल्या सहजभक्तीच्या आठवणी सांगतांना मीं माझ्या पूजाअर्चांच्या, पोथीवाचनाच्या, नामजपाच्या, भजनाच्या व यात्रादिकांच्या वगैरे आठवणी सांगितल्या, पण आणखी एका मुख्य विषयाच्या आठवणी सांगणें जरूर आहे.  ती गोष्ट संतसमागम ही होय.  आतां ह्या पोरवयांत मला खरे संत व खोटे संत ह्यांत फरक तो काय कळणार ?  मी करीत होतों त्या भक्तीचा विषय जरी मूर्तिच होत्या आणि ती भावना जरी पोरकट होती, तरी त्या सर्व भावना त्या वेळच्या मानानें अगदीं शुद्ध, निष्कपट आणि जोरदार होत्या एवढीच गोष्ट मुद्द्याची आहे.  त्याचप्रमाणें ज्या ज्या कांहीं पुरुषांच्या समागमामुळें मला ह्या वयांत धार्मिक आनंद होत असे, त्या त्या पुरुषांचा खरा साधुपणा किंवा विज्ञान कोणत्या दर्जाचा होता हा मुद्दा गौण आहे.  माझी श्रद्धा व प्रेम त्या त्या माणसावर बसत असे हाच मुद्दा मुख्य आहे.  ह्याच दृष्टीनें पुढच्या आठवणींचें महत्त्व आहे.  एरवीं त्यांत कांहीं विशेष अर्थ नाहीं.  बाबांना देवळांचा व भजनांचा जबर नाद होता, तसाच भटकणार्‍या साधु-बैराग्यांचा आणि सिद्ध-महंतांचाही नाद होता.  त्यांनीं नादावून घरीं आणलेल्या असल्या माणसांवरच साधु समजून माझीही श्रद्धा बसत असे.

जटाधारी गोसावी  :  अघोरी पंथांतल्या एका जटाधारी गोसाव्याकडे बाबा एका काळीं फार जात येत असत.  त्या वेळीं मी हायस्कुलांत जात होतों कीं त्यापूर्वीचा हा काळ होता हें मला नीट स्मरत नाहीं.  हा एका ठिकाणीं गुप्‍त होऊन दुसरीकडे प्रगट होतो, अशी कांहीं भाविक लोकांची समजूत झाली असावी.  साधारणपणें हा बुवा गांवाबाहेर कोठल्या तरी झाडाखालीं धुनी पेटवून रात्रंदिवस अंगाला राख लावून बसलेला असे.  तो बसल्या जागचा कधीं उठतच नसे अशीही लोकांची समजूत असे.  ह्याची मुद्रा प्रसन्न, बोलणें हेंगाडें व मराठीच का असे ना, पण प्रेमळ असे.  हा एकाएकीं एके दिवशीं दोन प्रहरीं आमच्या गोठ्यांतल्या एका अंधारी कोपर्‍यांत उभा असलेला आम्हांला दिसला.  बाबा जरी विश्वासू आणि आदरशील होते, तरी भलत्यासलत्या चमत्कारावर भुलून जाण्याइतकी त्यांची श्रद्धा आंधळी नव्हती.  म्हणून त्या बोवाचें हें चमत्कारिक येणें बाबांना आवडलें नाहीं.  त्यांनीं त्याला आपल्या ठिकाणीं पोंचविलें.  तरी पण विशेष न रागावतां त्या बुवाला रोज दोन प्रहरीं एक भाकरी व थोडी भाजी पाठविण्यास बाबांनीं आईस सांगितलें.  हें अन्न रोज नेऊन पोंचविण्याचें काम मजकडे होतें आणि तें मी आनंदानें करीत असें.  ह्यांत मला आनंद कां वाटावा बरें ?  लहान मुलाला असलीं कामें नियमानें करण्याची हौस असणें मुळींच साहजिक नाहीं.  मला तर त्या साधूकडे जाऊन त्याचा समाचार घेणें, तो भुकेलेला गोसावी तें अन्न आतुरतेनें घेई म्हणून विशेषतः कळकळीनें तें पोंचविणें, अन्न ज्या ताटांतून नेत असें त्यांत तो साधु चार दाळिंबाचे दाणे, खोबर्‍याचा लहानसा तुकडा किंवा थोडीशी खडीसाखर प्रसाद म्हणून कांहीं तरी आपल्याजवळचें घालून ताट परत करीत असे- तो प्रसाद मी श्रद्धेनें घरीं भावंडाना आणून वांटणें वगैरे गोष्टी त्या लहान वयांत भक्तीच्याच द्योतक होत्या !  केवळ भुकेलेल्यास अन्न देण्याची परोपकारी भावना किंवा साधुसमागमाची जाणूनबुजून आवड राखण्याच्या आध्यात्मिक भावनेला माझें तें लहान वय पात्र नव्हतें.  पण ह्या दोन्हींच्या मधली एक स्थिति मी तेव्हां अनुभवीत होतों हें खरें.  तिला काय नांव द्यावें हें मला आतां देखील नीट समजत नाहीं !

इतर बैरागी  :  मराठा जातींत कोणी तरी गोसावी गुरु करून घेण्याची परंपरा चालत आली आहे.  नाशिक जिल्ह्यांतील त्र्यंबकेश्वर येथील विठ्ठलपुरी नांवाचे गोसावी माझे वडिलांचे गुरु होते.  ते वृद्ध होते.  त्यांचे शिष्य गोसावी ह्यांचा उपदेश मला आणि माझ्या भावाला बाबांनीं कान पुंफ्कण्याचा विधि करून देवविला होता.  हे गोसावी एक दोन वर्षांनीं आमचे घरीं फिरतीवर येऊन संभावना घेऊन जात.  त्या वेळीं त्यांच्याशीं माझा लळा विशेष असे.  तुळजापूरचे भोपे भवानराव कदम आमचे घरीं कुळदेवतेचा नवस वगैरे काय असेल तें घेऊन जाण्यास मधून मधून येत.  तेही मला फार आवडत.  पुढें इंग्रजी शाळेंत असतांना नाशिककडचे भगवानदास आणि माधवदास नांवाचे दोन वैष्णव बैरागी आमचेकडे वरचेवर येत असत.  हे नुसते पांथस्थ या नात्यानें जमखंडीच्या कोठल्या तरी देवळांत उतरून बाजारांत भिक्षा मागून एक वेळ जेवून राहात.  आमच्याकडून त्यांना कसलीही अपेक्षा नसे.  तरी त्यांचा व आमच्या घरचा फार लोभ जडला होता.  त्याचें विशेष कारण मी इंग्रजी शाळेंत जाणारा, मोठा समजूतदार, प्रेमळ मुलगा हें ओळखून, बाबा असोत नसोत, माझ्या भेटीला घरीं येऊन माझ्याशीं त्यांनीं परिचय वाढविला होता.  शेवटीं इंग्रजी ६ व्या ७ व्या इयत्तेंत असतांना बबलादीच्या सिद्धांचें येणें-जाणें फार वाढलें.

योग्य पारख :  देवपूजा, भजन, पोथीवाचन आणि साधूंची आवड वगैरे जे धार्मिक भावनांचे प्रकार आठवतील तसे मीं सांगितले त्यांवरून व आमच्या घराण्यांतील आजी आणि आई ह्यांचीं व्रतें आणि उपास ह्यांविषयीं जी मीं हकिकत दिली तिच्यावरून आमच्या घराण्यांत हिंदु धर्माची जुनी परंपरा, आचारविचार आणि बाळबोधपणा कसा रुजला होता हें दिसून येतें.  पण ह्यापेक्षां विशेष गोष्ट सांगावयाची ती ही कीं, जुन्या धर्माचे इतके तपशिलवार आचार आमचे घरीं चालत होते तरी केवळ कर्मठपणा, धर्मभोळेपणा, दंभ आणि दुराग्रहाचा पगडा आमच्या घरीं आई-बाबांच्या वर्तनांत मला केव्हांच दिसून आला नाहीं.  एखाद्या ढोंगी साधूचें कपट दिसून आलें किंवा कोणाही सांप्रदायिक अतिथीचा स्वार्थी मतलब दिसून आला कीं, बाबांचा निःस्पृहपणा उग्र स्वरूप धारण करीत असे.  आल्या अतिथीची आमचे घरीं जरी शक्तिनुसार संभावना होण्याला कधीं चुकत नसे, तरी त्यानें एखादें दुर्वर्तन केलें किंवा त्याचा लोभी आणि मतलबी डाव दिसला तर लागलीच त्याची उलट दिशेनें संभावना करावयाला बाबा कधीं मागें घेत नसत !  ह्यामुळें भलत्यासलत्या सालोमालो भटक्याला आमचे दारांत पाय ठेवण्यापूर्वी विचार करावा लागत असे.  आईच्या भक्तींत कोणताही वरपंग नव्हता.  माझ्या वडिलांच्या स्वभावांतच माझ्या भावी सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचीं बीजें पूर्णपणें आढळतात.  आईनें व्रतें जरी बरींच केलीं तरी अमक्या वेळीं अमका नवस केलाच पाहिजे, अमक्याला अमकें दान दिलेंच पाहिजे, असा हट्ट कधींच केला नाहीं.  दोघांच्याही धर्मभावना साध्या, सहज आणि निर्हेतुक होत्या.  आणि त्यांतच माझ्या 'भावी' धर्माचा माझ्या सर्व सामाजिक सुधारणांचाही उगम आहे.