मिशनची घटना : येणेंप्रमाणें मुंबई येथील मध्यवर्ती संस्थांची कामें होऊं लागून एका नमुनेदार मातृसंस्थेची उभारणी झाली. यापुढें या संस्थेच्या प्रत्यक्ष शासनाखालीं प्रांतिक मुख्य शाखांची घटना करावयाला जनरल सेक्रेटरी लागले. ह्या मिशनच्या सनदेचे जे नियम होते त्यांच्या अन्वयें मिशनच्या शाखांचे तीन प्रकार ठरले होते. पहिला प्रकार अंगभूत शाखांचा. ह्या शाखा मिशनची जी मध्यवर्ती कार्यवाहक कमिटी होती तिच्या प्रत्यक्ष अंमलाखालीं चालावयाच्या होत्या. जमाखर्चाची सर्व जबाबदारी आणि इतर कारभार मध्यवर्ती कमिटीच्या संमतीनें चालावयाचा होता. प्रांतिक शाखांचे मुख्य चालक आणि त्यांच्या मदतनीस कमिटीचें सभासद हें मध्यवर्ती कमिटीच्या संमतीनें नेमले जात. हा चालक स्वतःला वाहून घेऊन काम करणारा असल्यास त्याच्या पगाराची जबाबदारी मध्यवर्ती कमिटीकडे असे. बाकीचा सर्व खर्च चालविण्याची जबाबदारी ह्या मुख्य चालकांवर आणि त्याच्या कमिटीवर असे. वर्षअखेर जमाखर्चाचा खर्डा स्थानिक ऑडिटरनें मंजूर केल्यावर तो खर्डा आणि वार्षिक अहवाल मध्यवर्ती कमिटीच्या पसंतीला मुंबईस पाठवण्यांत येई. वेळोवेळीं या शाखांची आणि त्यांच्या आश्रयाखालीं चाललेल्या इतर शाखांच्या संस्थांची तपासणी जनरल सेक्रेटरीकडून होत असे. ह्या शाखांची वर्षअखेर जी शिल्लक असे तींपैकीं जास्तींत जास्त १००० रु. मध्यवर्ती कमिटीच्या द्वारें मातृसंस्थेकडे येत. याशिवाय विशिष्ट हेतूनें दिलेले कायमचे निधि असतील तर हे ट्रस्टफंड या नात्यानें वरील ट्रस्टींकडे येत.
दुसरा प्रकार संलग्न शाखांचा. ह्या शाखांची जमाखर्चाची आणि कामाची जबाबदारी प्रत्यक्षपणें मध्यवर्ती कमिटीकडे नसे. मात्र कामाचें धोरण मिशनच्या हेतूला धरून चाललें आहे कीं नाहीं हें जनरल सेक्रेटरी वेळोवेळीं तपासून पाहात. मिशनच्या वार्षिक सर्वसाधारण अहवालांत सामील करण्यासाठीं अशा शाखांच्या जमाखर्चाचा तक्ता आणि कामाचा अहवाल जनरल सेक्रेटरीच्या ऑफिसांत वेळेवर येत असे.
तिसरा प्रकार सहकारी शाखांचा. ह्या बहुतेक स्वतंत्रपणें चालत. सामान्य धोरण आणि परस्पर सहानुभूति असली कीं अशा शाखा मिशन मान्य करीत असे.
मातृसंस्थेचे आद्य ट्रस्टी - (१) नामदार गोकुळदास कहानदास पारेख, बी.ए. एलएल.बी.; (२) शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला व (३) श्री. विठ्ठल रामजी शिंदे, बी.ए. ता. १ जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत मिशनचें दप्तरी वर्ष ठरलेलें असे.
पुणें शाखा : मि. ए. के. मुदलियार हे पुणें शाखेचे सनमान्य सेक्रेटरी. ह्यांनीं पाठविलेल्या पहिल्या सहामाही अहवालाचा पुढील सारांश आहे : १९०८ सालच्या एप्रिलमध्यें पुणें येथील कांहीं अस्पृश्य पुढार्यांच्या कळकळीच्या विनंतीवरून मिशनचे जनरल सेक्रेटरी वि. रा. शिंदे यांनीं पुण्यास भेट दिली. मिशनची पहिली अंगभूत शाखा पुण्यास असावी असा त्यांचा विचार ठरला. पुढें दोन महिन्यांनीं रा. शिंदे यांनीं आपले मदतनीस रा. सय्यद अबदुल कादर यांना पुण्यास पाठविलें. त्यांनी २२ जून १९०८ रोजीं पुणें लष्कर, सेंटर स्ट्रीट, येथील एका घरांत या शाखेची पहिली दिवसाची शाळा उघडली. पैशाची व्यवस्था तात्पुरतीच होती. शाळेचें सामान कांहींच नव्हतें. एका अस्पृश्यवर्गीय पुढार्याकडून एक टेबल व खुर्ची तात्पुरती मिळाली होती. पुढील सर्व व्यवस्था करण्याचें काम रा. ए. के. मुदलियार यांचेवर सोंपवून रा. सय्यद मुंबईस परत गेले. वर्तमानपत्रांतून जाहिराती देऊन पहिल्या महिन्यांत ५७७ रु. जमविण्यांत आले. बॅ. एच. ए. वाडिया या उदार गृहस्थानें १०० रु. ची पहिली देणगी दिली. नंतर मि. डब्ल्यू. टी. मॉरिसन, आय. सी. एस. मध्यभाग कमिशनर, व डेक्कन कॉलेजचे प्रोफेसर वुडहाउस यांनीं प्रत्येकीं ३० रु. देऊन सुरुवातीच्या अडचणी भागविल्या; पण शिकविण्यास शिक्षक कोणी मिळेना. म्हणून मातृसंस्थेंतून मुंबईहून ए. व्ही. गुर्जर या नांवाच्या गृहस्थास पाठवावें लागलें. खर्चाची रात्रदिवस तळमळ लागली असतां मुंबईचे त्या वेळचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांजकडे पुणें शाखेचे चिटणीस रा. मुदलियार यांनीं एक विनतीपत्र पाठविण्याचें धाडस केलें. मिशनचे चालक कोण आहेत आणि त्यांचें कार्य कसें चालू आहे याची योग्य ती चौकशी केल्यावर गव्हर्नरसाहेबांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीकडून रा. मुदलियार यांस ता.१८-८-१९०८ रोजीं खालील उत्तर आलें, ''आपल्या गेल्या महिन्याच्या १९ तारखेच्या पत्रास नामदार गव्हर्नरसाहेबांच्या आज्ञेनें कळविण्यांत येतें कीं, आपले मिशन मदतीला लायख आहे आणि तें यशस्वी होवो अशी गव्हर्नरसाहेबांची इच्छा आहे. मदतीसंबंधी आपणांस कळविण्यांत येते कीं, गव्हर्नरसाहेबांनीं आपली कन्या मिस व्हायोलेट क्लार्क यांना पुढील महिन्यांत एक जाहीर गायनाचा जलसा करण्याची परवानगी दिली आहे. जलशाच्या उत्पन्नांतून मिशनला बरीचशी शिल्लक उरेल अशी आशा आहे.''
मदतीसाठीं जलसा : हा प्रसिद्ध गायनवादनाचा जलसा पुणें येथें सप्टेंबर महिन्यांत करण्यांत आला. प्रत्यक्ष गव्हर्नरसाहेबांचा आणि पुणें येथील सैन्यविभागाचे कमांडर मेजर आल्डरसन यांचा आश्रय होता, म्हणून ह्या इलाख्यांतील बर्याच राजेरजवाड्यांनीं आणि शेठ-सावकारांनीं मुक्त हस्तें उदार आश्रय दिला. सर्व खर्च वजा जातां ३,४६७ रु. १३ आणे पै ही शिल्लक ह्या मिशनला मिळाली. ती मातृसंस्थेच्या अध्यक्षाकडे मुंबईस पाठविण्यांत आली. राजेरजवाडे आणि प्रसिद्ध पुढारी गृहस्थांच्या नजरेला ह्या मिशनचें कार्य आल्यामुळें ह्या प्रसंगाचें महत्त्व दिसून येण्यासारखें आहे.
या जलशाच्या कांहीं देणगीदारांचीं नांवें -
श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड ... ५०० रु.
श्रीमंत सर शाहू छत्रपतीमहाराज ... ... ... ... २०० रु.
आमोदचे ठाकूरसाहेब ... ... ... ... ... ... .. १०० रु.
साचीनचे नबाबसाहेब ... ... ... ... ... ... .. १०३ रु.
धरमपूरचे अधिपति ... ... ... ... ... ... ... १० रु.
नामदार आगाखान ... ... ... ... ... ... ... . ५०० रु.
भोरचे अधिपति ... ... ... ... ... ... ... ... २०० रु.
केरवाडचे ठाकूरसाहेब ... ... ... ... ... ... .. १०० रु.
इचलकरंजीचे अधिपति ... ... ... ... ... ... . २५ रु.
जलसा झाल्याबरोबर रा. शिंदे हे मुंबईहून पुण्यास आले. त्यांनीं पुणें शहरांतील आणि आसपासच्या खेड्यांतील अस्पृश्य मानलेल्या लोकाची माठी सभा भरविली आणि गव्हर्नरसाहेबांचा ठराव पसार करून त्यांच्याकडे पाठविला. ह्यानंतरही श्रीमंत लोकांकडून कांहीं देणग्या येऊं लागल्या. त्यांत सर जेकब ससून यांजकडून रुपये ५०० आणि मुधोळच्या अधिपतींकडून रु. १०० आले. डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. एफ. जी. सेल्बी, अध्यक्ष, मि. ए. के. मुदलियार, सेक्रेटरी, मि. अर्जुनराव, आर. मुदलियार, खजिनदार ह्यांनीं मातृसंस्थेच्या अनुमतीनें कमिटी नेमून जोरानें काम चालविलें. १९०८ अखेर ह्या शाखेच्या पुढील संस्था होत्या : (१) पुणें, लष्कर, दिवसाची शाळा, (२) पुणें, लष्कर, रात्रीची शाळा, (३) पुणें, लष्कर, वाचनालय, (४) गंज पेठ, रात्रीची शाळा, (५) मंगळवार पेठ, रात्रीची शाळा. शेवटची शाळा रा. शिंदे यांनीं १९०५ सालीं उघडून पुणें प्रा. समाजाकडे चालविण्यास दिली होती. ती आतां मंगळवार पेठेंत नेऊन मिशनच्या कार्यांत सामील करून घेण्यांत आली.
१९१० च्या जूनमध्यें संपणार्या दुसर्या वर्षाच्या अखेरीस ह्या शाखेच्या कामाचा जोर आणि विस्तार बराच वाढला होता. नवीन जोरदार कमिटी खालीलप्रमाणें नेमण्यांत आली :-
डॉ. हॅरोल्ड एच. मॅन, शतकी कॉलेजचे प्रिन्सिपॉल, अध्यक्ष, प्रिन्सिपॉल आर. पी. परांजपे, उपाध्यक्ष, रा. बी. एस. कामत, कॅ. एच. सी. स्टीव्ह, दि. ब. व्ही. एम. समर्थ, रा. एम. डी. लोटलीकर, (सेक्रेटरी, पुणें प्रा. समाज) खजिनदार, रा. ए. के. मुदलियार, सेक्रेटरी.
शिक्षणाखेरीज इतर कामें झालीं त्यांत शिमग्यांतील ओंगळ प्रकार बंद व्हावेत म्हणून ठिकठिकाणीं जाहीर सभा भरून प्रयत्न करण्यांत आले. त्यांत प्रसिद्ध समाजसेवक श्री. गोपाळ कृष्ण देवधर ह्यांनीं प्रमुख भाग घेतला. ह्या प्रकाराविरुद्ध प्रचारार्थ कांहीं गाणीं श्री. मुदलीयादर यांची कन्या कु. ठकूताई हिनें केलीं होतीं.
पहिला बक्षिससमारंभ : २६ सप्टें. १९०९ रोजीं श्रीमंत महाराज सर सयाजीराव यांच्या हस्तें आणि अध्यक्षत्वाखालीं हा समारंभ मोठ्या थाटानें पार पडला. इडारचे अधिपति श्रीमंत प्रतापसिंग, लेडी म्यूर मॅकेंझी, भोरचे अधिपति रावसाहेब, नामदार गोखले, डॉ. भांडारकर, सरदार नौरोजी पदमजी वगैरे थोर मंडळी प्रमुख स्थानीं बसली होती. इस्लामिया स्कूल हॉलमध्यें चिक्कार गर्दी भरली होती. कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅन यांनीं पाहुण्यांचें स्वागत केलें. ह्या वेळीं एक वादग्रस्त प्रश्न उद्भवला. महार जातीचे पुढारी शिवराम जानबा कांबळे यांचे नेतृत्वाखालीं एक मानपत्र महाराजांना देण्याचा विचार ठरला; पण हें मानपत्र महार जातीकडूनच जावें असा त्यांचा आग्रह पडला. इतर अस्पृश्य जातींनाही त्यांत भाग घ्यावासा वाटला. हा वाद लवकर मिटेना आणि समारंभाचा तर दिवस आला, म्हणून मला मुंबईहून बोलावण्यांत आलें. सर्व वर्गांच्या पुढार्यांना बोलावून त्यांना मीं सांगितलें कीं, ''मिशनचें रजिस्टर्ड ट्रस्टडीड आहे. त्याबरहुकूम मिशनलाच अशा प्रकारचा जातिविशिष्ट काम करण्याचा अधिकार नाहीं. मिशनचे कार्यामध्यें जीं वरिष्ठवर्गीय माणसें आहेत तीं सर्व जातींचीं व धर्मांचीं आहेत; पण त्यांनाही सार्वत्रिक उदार धर्माच्या पायावरच मिशनचें कार्य करावें लागत आहे. स्वतः महाराजसरकारांनाही जातिविशिष्ट मानपत्र रुचणार नाहीं.? ह्याउप्पर महार लोकांचा आग्रहच असेल तर आणि महाराज असें मानपत्र स्वीकारीत असतील तर ह्या मंडपाचे बाहेर अन्य ठिकाणीं व अन्य वेळीं कुणींही मानपत्र द्यावें. येथेंच आणि आतांच द्यावयाचें असेल सर्व अस्पृश्यवर्गानें एकत्र होऊन द्यावें. त्यांनीं हा एकत्रपणा दाखविला नाहीं तर त्यांच्यासाठी काम करण्यामध्यें वरिष्ठ वर्गालाही विघ्नें येऊं लागतील.'' सर्वांची समजूत पटून मिळूनमिसळून मानपत्रसमारंभ झाला. ह्यानंतर सेक्रेटरी मुदलियार यांनीं अहवाल वाचला. लेडी म्यूर मॅकेंझी यांचे सुंदर व जोरदार भाषण झालें. शेवटीं महाराजांनीं यथोचित भाषण करून १००० रु. ची देणगी दिली. तो कायमनिधि समजून सयाजीराव गायकवाड स्कॉलर्शिप या नांवानें होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलर्शिप देण्याचें ठरलें. श्रीमंत सयाजीरावमहाराजांना ह्या प्रसंगीं मानपत्र देण्यांत आल्यावर महार, माग व चांभार जातींच्या तीन बायकांनीं महाराजांना आरती ओवाळली. तेव्हां महाराजांनीं प्रत्येक आरतींत एक एक सोन्याची गिनी टाकली.
पुण्याचा पाठिंबा : ता. १८ ऑक्टो. १९०९ रोजीं हा डिप्रेस्ड् क्लास मिशन डे साजरा करण्यासाठीं पुणें शहरीं किर्लोस्कर थिएटरांत एक प्रचंड जाहीर सभा भ्भरविण्यांत आली. पुणें शहरांत अशा प्रकारची ही पहिलीच सभा होती. मिशनला चोहींकडून जरी मदत मिळाली तरी पुण्यासारख्या जुन्या वळणाच्या शहराची अद्याप मिळावयाची होती, म्हणून हा समारंभ घडवून आणला. प्रि.र. पु. परांजपे ह्यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें. महारांचे पुढारी श्रीपतराव थोरात, सुप्रसिद्ध वकील ल. ब. भोपटकर, मुसलमानांचे पुढारी इस्माइल बहादूर, हंपी येथील शंकराचार्यांचे एजंट रा. हरकारे, रा. न. चिं. केळकर, प्रो. धर्मानंद कोसांबी यांनीं जोरदार भाषणें केली. अध्यक्षांचे आभार मानतांना प्रो. धोंडो केशव कर्वे यांनीं आपली १०० रु. ची देणगी दिली. रा. हरकारे यांनीं आपल्या भाषणाचे शेवटीं हंपीचे शंकराचार्यांचे प्रत्यक्ष सहानुभूतीचें द्योतक म्हणून त्यांचे आज्ञेनुसार ३०० रु. ची देणगी दिली. ह्या सभेमुळें ह्या इतिहासप्रसिद्ध शहराचें हृदयकपाट उघडलें.
मुरळी-प्रतिबंधक सभा : २५ एप्रिल १९१० रोजीं जेजुरीच्या यात्रेंत ही सभा पुणें शाखेकडून भरविण्यांत आली. खडकीचे लक्ष्मणराव सत्तूर, मुंबईहून मी स्वतः व स. के. नाईक ह्या सभेस मुद्दाम हजर होते. मुरळी सोडण्याची दृष्ट चाल महाराष्ट्रांत प्रसिद्धच आहे. मुरळी सोडण्याचा धार्मिक विधि आणि तिचा प्रसार ह्या खंडोबाचे देवळांतूनच होतो. ही चाल बंद पाडण्यांत यावी असा ह्या सभेचा हेतु होता; पण अस्पृश्यवर्गीय जनतेला मान्य होण्यासारखा तो काळ नव्हता. कित्येक लोक दारूनें झिंगून सभेला विरोध करूं लागले. सभा चालविणें अशक्य झालें. मिशनमधील भजन करणार्या विद्यार्थ्यांकडून गाणीं म्हणविण्यांत आलीं. मग सभेला रंग येऊन ती यशस्वी रीतीनें पार पाडली. पुढें जी मुरळीप्रतिबंधक चळवळ मोठ्या प्रमाणावर झाली तिचें मूळ ह्या सभेंत आहे.
मेघवृष्टीनें प्रचार : येथपर्यंत अंगभूत शाखांतील केंद्रीभूत कार्याचें वर्णन केलें. आतां मेघवृष्टीनें सर्व देशभर जें कार्य झालें त्याचें कथन करतों. हीं दोन भिन्न कार्ये समांतर आणि सारखीं चालू ठेवणें अवश्य असतें. १९१० सालीं या कार्यांत मुंबई सोशन रिफॉर्म असोसिएशनचें सहकार्य लाभलें. मिशनच्या संस्थापनेचा दिवस ता. १८ ऑक्टो. १९०६ हा होता. ह्याचें स्मरण सर्व देशभर व्हावें म्हणून ठिकठिकाणीं जाहीर सभा भरवण्यांत आल्या. त्यांचा रिपोर्ट मागवण्यांत आला त्याचें कोष्टक पुढील पानावर आहे.
वसतिगृहाची स्थापना : भगिनी जनाबाई ह्या ३ नोव्हेंबर १९१२ रोजीं वर्हाडांत हिंडून तेथील परिस्थिति पाहून फंड जमविण्यासाठीं दौर्यावर निघाल्या. अमरावती, यवतमाळ, यूगांव, रामसौर, खामगांव, मलकापूर, धुळें वगैरे ठिकाणीं फंड जमवून त्या मुंबईस परत आल्या. खर्च वजा जाऊन त्यांनीं सुमारें ६०० रु. फंड जमवला होता. त्यानंतर मी स्वतः पुन्हां अमरावती, यवतमाळ येथें जाऊन व्याख्यानें देऊन यवतमाळ येथें एक अस्पृश्यवसतिगृह काढण्याची तयारी करून आलों. यवतमाळचे रा. ब. मुंबुले वकील, जमीनदार लांडगे, जिनिंग फॅक्टरीचे द्रवीड यांचे साहाय्यानें तेथें एक बोर्डिंग स्थापण्यांत आलें. त्याची व्यवस्था भगिनी जनाबाई यांच्याकडे सोंपवून त्यांना तिकडे पाठविण्यांत आलें. कोल्हापूरचे रा. जी. के. कदम, वकील ह्यांनाही त्यांच्या मदतीस देण्यांत आलें होतें.
चंदावरकर यांचा दौरा : १९१४ च्या डिसें. पासून १९१५ च्या एप्रिलअखेर निराश्रित साहाय्यकारी मंडळीचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांनीं सदर मंडळीचे कार्यांत प्रत्यक्ष हातभार लावण्यासाठीं दक्षिण हिंदुस्थानांत विस्तृत दौरा काढला. मद्रासच्या डी. सी. एम. च्या शाखेनें अखिल भारतीय मिशनच्या वतीने डिसेंबर १९११ सालीं ऍंडरसन हॉलमध्यें परिषद भरविली. तिचें अध्यक्षस्थान चंदावरकरांनीं पत्करलें. पुढें त्याच महिन्यांत मद्रासचे गव्हर्नरांचे अध्यक्षतेखालीं एक मोठी जाहीर सभा भरविण्यांत आली. त्या वेळीं सर नारायण चंदावरकरांनीं भाषण करून मिशनच्या मुंबईकडील कार्यासंबंधीं माहिती कळविली. गव्हर्नरसाहेबांनीं मिशनच्या कार्याचा गौरव करून मदतीचें आश्वासन दिलें. त्यानंतर सर नारायणराव कोईमतूर, पालघाट, तेलीचेरी इत्यादि ठिकाणीं हिंडले व गोरगरिबांत मिसळून त्यांनीं त्यांची स्थिति बारकाईनें निरखिली. परत आल्यावर आपल्या निरीक्षणासंबंधींचीं पत्रें त्यांनीं टाइम्स ऑफ इंडिया व सोशन रिफॉर्मरमध्यें प्रसिद्ध केलीं. मंगळूरचे के. रंगराव, पालघाटचे श्री. शेषय्या आणि वल्लभराजा, कालिकतचे मि. रामण्णी, मि. मोमन् मि. मंजरी रामय्या, तेलीचेरीचे मि. केळू वगैरे कार्यकर्तांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांनीं त्यांना उत्तेजन दिलें. ही सर्व उत्साही मंडळी जरी थोडी असली तरी त्यांच्या कार्याचें महत्त्व फार होतें. ह्या दौर्याचा परिणाम दक्षिणेकडील कार्यांत फार मोठा झाला.
तक्ता पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.
वेड्यांचें इस्पितळ : अस्पृश्यांनीं ठराविक रस्त्यावरून चालावयाचें नाहीं व इतर रस्त्यांवरून चालतांना आपल्या जातीचा पुकारा करीत चालावयाचें, हा प्रकार मलबारवांचून इतर कोणत्याही प्रांतांत नाहीं. मलबारांत जातीजातीच्या सूक्ष्म भेदांचें अवडंबर फार असून कडक नियम पाळण्यांत येतात. हें पाहून स्वामी विवेकानंदांनीं मलबार हें एक वेड्यांचें इस्पितळ आहे, असें म्हटलें आहे. अस्पृश्यांस भीक मागण्याचीही परवानगी नाहीं, प्रामाणिकपणें काम करण्याची मुभा नाहीं, याबद्दल सर नारायणरावांनीं कडक टीका करून त्यांना उद्योग करण्याची तरी परवानगी देण्यांत यावी, अशी करुणा भाकली. मलबारांत नायादी म्हणून नीचतम मानलेली एक जात आहे. या लोकांशीं सर नारायणरावांनीं भाषण केलें. त्यांच्या भाषणांत 'वैराग्य' सारखे पुष्कळ शब्द आलेले पाहून सर नारायणरावांस फार आश्चर्य वाटले. नीचांतला नीच, अक्षरशत्रु, चांभारापासूनही शंभर चार्ड दूर राहावें हा त्याचा अधिकार. आपली अस्पृश्यता पुकारीत भीत भीत जो गांवांत येतो त्यांच्या तोंडीं इतके संस्कृत शब्द ! त्यांचीं नांवें उच्चवर्णीयांसारखीं हें कसें, ह्याचें सर नारायण ह्यांस फार आश्चर्य वाटलें. चौकशीअंतीं त्यांस असें कळून आलें कीं, नायादी लोकांचें मूळ नंबुद्री ब्राह्मणापर्यंत पोंचतें ! कांहीं नंबुद्री ब्राह्मण कुटुंबाचे हातून कांहीं प्रमाद घडले, म्हणून त्यांस बहिष्कृत करण्यांत आलें. त्यांचें पतन होत होत त्यांस आज नायादी जातीची स्थिति प्राप्त झाली. सर नारायण ह्यांनीं मलबारांत केलेला प्रवास अस्पृश्योद्धाराचे बाबतींत बराच जागृतीस कारण झाला.