लोकमताचे हेलकावे

लोकमताचे हेलकावे  :   आमच्या मिशनचा प्रसार सर्व देशभर झाल्यानें मी निरनिराळ्या प्रांतांत फिरत असतांना वेळोवेळीं अनेक मानपत्रें मिळालीं.  त्यांपैकीं कांहींचा खालीं उल्लेख करीत आहें -

(१) पालघाट, मलबार.
(२) हुबळी, कर्नाटक.
(३) २३ एप्रिल १९२३ रोजीं पुणें शाखेचे शिक्षक व विद्यार्थी यांजकडून ५१ व्या वाढदिवसानिमित्त.
(४) २३ एप्रिल १९२३ रोजीं पुणें शाखेच्या शिक्षकिणी व विद्यार्थिनी यांजकडून ५१ व्या वाढदिवसानिमित्त.
(५) २३ एप्रिल १९२३ रोजीं पुणें शाखेच्या शिक्षकिणी व विद्यार्थिनी यांजकडून भगिनी जनाबाईस.
(६) २३ एप्रिल १९२५ रोजीं ब्राह्मणेतर पुढार्‍यांतर्फे.
(७) १९२८ सालीं दौलतपूर (पूर्व बंगाल) कॉलेज विद्यार्थ्यांतर्फे.
(८) १९३३ डिसेंबर २३ रोजीं चोखा मेळा बोर्डिंग, आर्वी (नागपूर).
(९) १९३३ डिसेंबरमध्यें नागपूर अस्पृश्यवर्गातर्फे गणेश अक्काजी गवईंकडून.
(१०) १९३४ जून १८ रोजीं मुंबईंतील ४१ संस्थांतर्फे.

१९२५ सालांतील ब्राह्मणेतर पक्षाच्या मानपत्रास मीं खालीलप्रमाणें उत्तर दिलें.

''मुंबई येथें ४१ संस्थांतर्फे, १९३४ सालीं, जो मानपत्रसमारंभ झाला तो सर्वांत मोठा होता.  महात्मा गांधी हे या समारंभाचें अध्यक्षस्थान घेणार असें प्रसिद्ध झाल्यानें संध्याकाळीं परळच्या दामोदरदास ठाकरसी हॉलमध्यें अलोट गर्दी झाली होती.  इतकी कीं कांहीं वेळा ट्रॅमगाड्यां बंद ठेवाव्या लागल्या.  शेवटीं श्री. मथुरादास वसनजी यांच्या अध्यक्षतेखालीं समारंभ पार पडला.  उत्तर देतांना मीं म्हटलें. ''हा मी माझा स्वतःचा सन्मान समजत नाहीं.  हा माझ्या कार्यांत साह्यकारी झालेल्या सर्वांचा सन्मान आहे.  मला हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, युरोपियन वगैरे सर्वांनीं मदत केली आहे; पण ती त्यांनीं माझ्यावर मेहेरबानी म्हणून केलेली नसून कर्तव्य म्हणून केलेली आहे.  हिंदुस्थानांतला अस्पृश्यतेसारखा एक मोठा अन्याय स्वस्थ बसून चालूं दिल्याबद्दल सर्व जग अपराधी आहे.  म्हणून या कामांत सर्व जगानें भाग घेतला पाहिजे .......... मला एक गोष्ट स्पष्ट सांगून टाकली पाहिजे.  ती ही कीं, मला इतक्या पुष्कळ संस्थांनीं मिळून मानपत्र दिलें त्याबद्दल मी आभारी आहें.  पण म्हणून मी तुमचा मिंधा राहणार नाहीं.  माझें जेथें तुमच्याशीं जमणार नाहीं, तेथें मी तुमच्याविरुद्ध गेल्याशिवाय राहणार नाहीं !''

हीं सर्व मानपत्रें बोलूनचालून माझा गौरव करण्यासाठीं दिलीं होती म्हणून त्यांतील विचार आणि भाषा अर्थात् एकाच सुराची होती म्हणून त्यांचा उल्लेख करणें मला येथें जरूर दिसत नाहीं.  परंतु माझें कठीण काम करीत असतांना माझ्यावर जी वेळोवेळीं प्रतिकूल टीका होत असे, वेळीं तीव्र निषेधही होत असे त्यांतील कांहींचा उल्लेख करणें जरूर आहे.

मिशन नुकतेंच सुरू झालें असतां एका मराठा गृहस्थाकडून खालील पत्र आले.

श्रीयुत रा. रा. शिंदे यांचे सेवेसी -
अनेक नमस्कार वि. वि.

आपणांस समक्ष पाहावें अशी इच्छा फार दिवसांची होती.  तो योग अकस्मात् ता. ३ रोजीं घडून आला.  आपण माझ्याशीं बोलत असतां आपण मराठे असल्याबद्दल आपले ठिकाणीं वसत असलेला अभिमान पाहून व अलीकडे प्रचलित असलेल्या वेदोक्तासंबंधीं आपले प्रगल्भ विचार ऐकून आपलेसंबंधीं वसत असलेलें प्रेम अधिक दृढ झालें.  परंतु आपल्यासारख्या, आमच्या समाजास सहसा न लाभणार्‍या विद्वानांनीं देशरूढीचा त्याग करून भलत्याच पद्धतीनें राहणें योग्य नाहीं असें मी आपणांस नम्रपणें सुचवतों.  आपण क्षत्रियांनीं दाढी ठेवणें हें अशास्त्र आहे असें म्हटलेंत; पण त्याचा परिणाम अज्ञानी जनसमाजाचे मनावर इष्ट न होतां अनिष्ट होतो हें आपल्यासारख्या विद्वानाच्या मनांत आलें पाहिजे.  आपल्यासारख्या दुर्मिळ विद्वानाचें लक्ष सध्यां आमचे लोकांची पीछेहाट व दैना उडाली तिकडे दुर्लभ करून महारमांगांची स्थिति सुधारण्याकडे लागावें व आम्ही जे पूर्वी उत्तम अवस्थेंत होतों ते सध्याच्या अवनत स्थितीकडे पोंचलों असतां तिकडे दुर्लक्ष व्हावें ही केवढी खेदाची गोष्ट !  हें आपलें करणें, घरचीं माणसें उपाशीं ठेवून दुसर्‍यांस पक्वान्न घालण्यासारखें आहे.  आपण ज्या समाजांत जन्मलां आणि ज्या समाजाच्या मदतीनें पदवीधर झालां व एवढें नांवारूपास चढलां, त्या समाजाची काय दैना उडाली आहे इकडे आपलें पहिल्यानें लक्ष गेलें पाहिजे होतें.  आपण प्रार्थनासमाजांत शिरलां हें माझ्या मतें बरें झालें नाहीं.  पुन्हां प्रार्थना करून सांगतों कीं, आपण प्रचारांत नसलेला पोशाख व राहणी बदला.  असें करण्यास परमात्मा आपणांस बुद्धि देवो !

आपला नम्र सेवक
गणपतराव भिकाजीराव जाधव
Clerk, Mora Barge, Uran
ता. ५।१२।१९०६


सन १९१७ सालीं मीं मराठा आणि इतर बहुजनसमाजाला राष्ट्रीय पक्षांकडे ओढण्याचा प्रयत्‍न केला म्हणून बहुजनसमाजांत खळबळ उडाली.  त्या वेळीं खालील धमकीचें पत्र नांव, गांव, पत्ता व तारीख नसलेलें मला आलें.

रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे यांस  :-

एका सरकारी अंमलदाराच्या (आज सकाळीं मला) गुप्‍त हेराकडून बातमी लागली कीं, आपण एक 'मराठा स्वराज्य संघ' स्थापन केला आहे.  आपण केवढी मोठी भयंकर चूक करून बसलां आहांत हें अजूनही आपल्या लक्षांत येत नाहीं.  तेव्हां आपण अगदीं मूर्खांतले मूर्ख आहांत असेंच म्हटलें पाहिजे.  तुम्हांला हे ब्राह्मण लोक हरबर्‍याच्या झाडावर चढवीत आहेत.  तुमच्या हातून ते मराठ्यांत फूट पाडीत आहेत.  तेव्हां आपण समाजघातक, राष्ट्रघातक होणार काय ?  तुम्ही केळकरांशीं केलेला गेल्या आठवड्यांतील सर्व गुप्‍त व्यवहार किंवा कट ही सर्व बातमी सी.आ.डी.च्या मार्फत सरकार व गव्हर्नरसाहेब यांजकडे कळविण्यांत आली आहे.  तर आपल्या मिशनचें चंबू गबाळें लवकरच आटोपून आपणांस कायमचा रामराम ठोकावा लागेल आणि मग खुशाल ब्राह्मण लोकांच्या पायांचें तीर्थ चाटीत बसा.  ब्राह्मण लोकांनीं फसवलें आहे.  तेव्हां लवकर शुद्धीवर या, नाहीं तर तोंडघशी पडाल.  मागून बोंब मारण्यांत अर्थ नाहीं.  तेव्हां मराठा स्वराज्य संघ मोडून टाका व कोणासही मदत करूं नका.  तुमच्या मिशनशिवाय तुम्ही दुसरें कोणतेंही कार्य करूं नका.  परंतु मिशनबद्दलची कळकळ आतां सरकारास राहणार नाहीं.  कारण तुम्ही जे मुख्य ते राजद्रोही आहांत म्हणून.  

हितचिंतक


अशा पत्राबद्दल कांहीं लिहिण्याची जरुरी नाहीं.  पण मराठे लोकांपैकीं कांहींनीं राष्ट्रीय कामाबद्दल असा निषेध केला असतां ब्राह्मणांतील कांहीं विद्वान् व जबाबदार व्यक्तींनीं माझी वृत्ति राष्ट्रीय नाहीं असा गैरसमज करून घेऊन उलट दिशेनें कसा निषेध केला आहे हें खालील उतार्‍यावरून समजून येईल.  सदर उतारा जानेवारी १९२३ सालच्या 'चित्रमय जगतां'तील रा. रा. महादेव राजाराम बोडस यांच्या 'अस्पृश्योद्धार' या लेखांतील आहे.

''आपली सामाजिक व धार्मिक सुधारणांचीं तट्टें चोहोंकडे नाचवण्याकरतांच निराश्रितांचा कैवार घेणार्‍यांचे हातून तयांचा उद्धार कधींही व्हावयाचा नाहीं.  कोणतीही चळवळ एकनिष्ठ असल्याशिवाय यशस्वी होत नाहीं.  एका कामांत दुसरीं दहा खेंकटीं घुसडलीं कीं सर्वच कामें बिघडतात.  अस्पृश्यतेच्या प्रश्नाला रोटीबेटीव्यवहार आणि सनातन धर्माची टवाळी चिकटविल्यानें निराश्रित शिखंडींना पुढें करून सबगोलंकार करण्याचा या मंडळींचा बेत आहे अशी साधारण लोकांची समजूत झाली व त्यामुळेंच कारण नसतां सर्व जातींचा या चळवळीला विरोध होऊं लागला.  पण तेंच सन १९१८ सालीं लो. टिळकांनीं सहानुभूति दाखवल्याबरोबर १९२० सालीं महात्मा गांधींनीं हा प्रश्न हातीं घेतला व १९२१ सालीं अहमदाबादच्या काँग्रेसमध्यें राजकीय व राष्ट्रीय करून टाकला.  रा. विठ्ठलराव शिंद्यांना १२ वर्षांत जें कार्य करतां आलें नसतें तें गांधींनीं दोन दिवसांत केलें.  म्हणजे शिंद्यांच्या कामाचें महत्त्व कमी होतें असें नाहीं. उलट असेंही म्हणतां येईल कीं, शिंद्यांच्या १२ वर्षे नांगरणीमुळें गांधींना बीजारोपण करतां आलें.  परंतु एकाच कार्याविषयीं उभयतांचा दृष्टिकोन आणि कार्यपद्धति यांतील भेद दाखवण्याकरतांच ही तुलना केली.  रा. शिंदे निराश्रितांना व्यक्तिशः सुखी करण्याकरतां झटत असल्यामुळें समाजाला विशेष कळकळ वाटत नव्हती.  समाजांत सुखी व दुःखी दोन्ही प्रकारचे लोक असल्यामुळें वैयक्तिक सुखाविषयीं लोकांना फारशी आस्था वाटत नाहीं.  पण राष्ट्राच्या भवितव्यतेचा प्रश्न आला कीं, सर्व समाज खडबडून जागा होतो.  पांचसहा कोटी निराश्रितांचा उद्धार करावयाचा तो ते अधिक सुखांत व ऐषआरामांत राहावे म्हणून नव्हे तर तीस कोटी हिंदुराष्ट्र एकजीव होऊन स्वराज्य मिळवण्यास लायक व्हावें म्हणून.  लो. टिळकांनीं निराश्रितांविषयीं नुसती शाब्दिक कळकळ दाखवली म्हणून त्यांची टवाळी करणारांचे ध्यानांत एक गोष्ट येत नाहीं कीं, ज्यांचे हातांत निराश्रितांची चळवळ आहे त्यांची जास्त योग्यताच नाहीं.  टिळक-गांधींसारख्यांकडून जास्त मदत मिळवायची असेल तर त्यांच्याप्रमाणेंच राष्ट्रकार्याला कंबर बांधली पाहिजे.  साहेब लोकांना खूष ठेवायचें, मिशनरींच्या मागें लागायचें, पैशाकरतां श्रीमंत लोकांच्या दारोदार हिंडावयाचें, मग लो. टिळकांनीं असल्या भिक्षेकर्‍यांना नुसत्या शब्दांची भीक घातली तर नवल काय ? 'You cannot serve both God and man at the same time.'  अशी एक इंग्रजींत म्हण आहे.  निराश्रितांना केवळ ऐहिक सुखेंच देणें ज्यांचें ध्येय त्यांनीं सर्व ऐहिक सुखावर पाणी सोडलेल्या टिळक-गांधीं-सारख्यांकडून मदतीची अपेक्षा करूं नये हेंच उत्तम. कारण त्यांचें ध्येय निराळें, मार्ग निराळा व दृष्टिकोनही निराळा.''

ह्याप्रमाणें लोकमताचे परस्परविरोधी हेलकावे मीं वाचकांपुढें ठेवले आहेत.  वाचकांनींच आपल्या मनाचा समतोलपणा राखून विचार करावा ह्यापेक्षां जास्त कांहीं मला सांगावयाचें नाहीं.