विहंगमावलोकन
हेतु : परदेशांत १९०१ ते १९०३ या दोन वर्षांत माझें जें निरीक्षण व शिक्षण झालें त्याचा आराखडा विहंगमदृष्ट्या प्रथम घेणें बरें. मी इंग्लंडांत केवळ ऑक्सफर्ड येथें मँचेस्टर कॉलेजांत धर्माचें पुस्तकी शिक्षण घेण्याकरतां गेलों नव्हतों. मुख्यतः तुलनात्मक पद्धतीनें जगांतील सर्व धर्मांच्या इतिहासाचें ऊर्फ विकासाचें अवलोकन करून स्वतःची धर्मबुद्धि विशद करून धर्मप्रचाराची तयारी करणें हा तर मुख्य हेतु होताच. पण तो एक हेतु होता. शिवाय युरोपांतील प्रमुख चालीरीती पाहाव्या, वाङ्मय वाचावें, पंडित आणि सज्जन यांच्या भेटी घ्याव्या, नव्या-जुन्या संस्थांनी वाढ निरखावी, निरनिराळ्या वर्गांची-विशेषतः खालच्या व चिरडलेल्या वर्गांची-अंतःस्थिति ओळखावी व त्यांच्यांत राहावें, सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळें पाहावींत आणि तेथें एकान्तवास करावा व आत्मशोध करावा इ. अनेक हेतू होते.
कॉलेजांतील सुट्टया : मँचेस्टर कॉलेज हें सुधारकी कॉलेज होतें. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटींत जुन्या ख्रिस्तीमताचा दाब दृढ असल्यानें ह्या कॉलेजचा त्या युनिव्हर्सिटींत प्रवेश होणें शक्य नव्हतें. तथापि त्या विश्वविद्यालयाचा बरा-वाईट परिणाम व संसर्ग ह्या कॉलेजवर न घडणें अशक्य होतें. ह्या कॉलेजचा अध्ययनाचा व अनध्ययनाचा ऊर्फ सुट्टीचा काळ इतर कॉलेजांप्रमाणेंच नियमित केला होता. पहिली टर्म ऑक्टोबरच्या मध्यापासून तों डिसेंबरच्या मध्यापर्यंत ८।९ आठवड्यांची व नंतर नाताळची सुटी ४ आठवडे. दुसरी टर्म जानेवारीच्या मध्यापासून तों मार्चच्या मध्यापर्यंत ८ आठवडे व नंतर ईस्टरची सुटी ६ आठवडे. तिसरी टर्म मेच्या सुरुवातीपासून जवळ जवळ जून अखेर; नंतर उन्हाळ्याची दीर्घ सुटी सप्टेंबरअखेर १२ आठवड्यांची. म्हणजे जवळ जवळ सहा महिने सुटी व सहा महिने अभ्यास असा प्रकार आहे. मी ऑक्सफर्डमध्यें दोन वर्षे होतों. त्या काळीं सहा टर्म्स व सहा सुट्या पडल्या. पहिली नाताळची सुटी मीं लंडनमध्यें घालविली. दुसरी सुटी पॅरिसमध्यें घालविली. तिसरी उन्हाळ्याची दीर्घ सुटी इंग्लिश व स्कॉच Lake Districts मध्यें, म्हणजे पर्वतशिखरें व सरोवरें पाहण्यांत हिंडून घालविली. पैकीं पहिले पंधरा दिवस बॉरोडेल नांवाच्या सुंदर दरींत डरवेंट वॉटर नांवाच्या सुंदर सरोवराच्या किनार्यावर माझे परमपूज्य प्रो. जे. एस्लीन कार्पेंटर यांच्या लीथ नांवाच्या कुटीरांत पाहुणा म्हणून होतों. माझ्याबरोबर ७।८ विद्यार्थी होते. चौथी दुसर्या नाताळची सुटी मीं मुद्दाम ऑक्सफर्डमध्येंच राहून घालविली. पांचवी मीं कॉर्नवॉलमध्यें नैऋत्य किनार्याकडील प्रदेशांतील बस्टनहॅम वगैरे शहरें व खेडीं पाहण्यांत घालविली. पैकीं १३ दिवस माझे मित्र मिस्टर आणि मिस् जे. वॉल्टरकॉककडे त्यांच्या (बॉस कॅसल् या भागांतील) पोलट्रुनी नामक झोंपडींत पाहुणचार घेतला.
शेवटची दीर्घ सुटी मी कांहीं दिवस चेस्टनहॅम येथील मध्यदेशांत घालवून पुढें हॉलंडची राजधानी अँमस्टरडॅम येथें अनेक सुधारलेल्या देशांतील उदार धर्मीयांची परिषद भरली होती, तींत हिंदुस्थानच्या ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून गेलों. नंतर जर्मनी, स्वित्झर्लंड व इटली हे देश पाहिले. जर्मनी येथील कलोन गांवचें प्रसिद्ध कॅथेड्रल (उपासना-मंदिर), जें जगांतील सात आश्चर्यांपैकीं एक असें मानलें जातें, हें विशेष रीतीनें पाहण्यासाठीं दोन दिवस घालविले. स्वित्झर्लंड येथील आल्प्स पर्वतांतील अत्यंत सुंदर अशा लुसन प्रदेशांत अवलोकनासाठीं मुद्दाम चार दिवस घालविले. मुंबई युनिव्हर्सिटींत माझा ऐच्छिक विषय रोमचा इतिहास होता. त्या इतिहासांतील प्राचीन स्थळें, इमारती, अलीकडची लोकस्थिति व लोकसंस्था पाहण्यासाठीं जिनोआ व रोम येथें एक आठवडाभर राहिलों. शेवटीं नेपल्सजवळ जुनें पाँपे शहर, भूकंपाखालीं दडपून गेलेलें पण नुकतेंच उत्खनन केलेलें, त्यांतील देखावे व वस्तु पाहण्यासाठीं आणि जवळचा ज्वालामुखी व्हेसुवियस पर्वत नुकताच आ पसरून आपल्या पोटांतील ज्वलतप्रवाह ओकत होता, हें पाहण्यासाठीं नेपल्सला ४ दिवस राहिलों. शेवटीं तेथील बंदरांतून इटॅलियन बोटीनें ता. ६ ऑक्टोबर १९०३ रोजीं मुंबईस येऊन पाहोचलों.
माझ्या दोन वर्षांच्या प्रवासांत मी इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड व इटली हे देश थोडेबहुत पाहिले. एकंदरींत इंग्लिश लोक बरे दिसले. फ्रेंच अधिक उल्हासी व किंचित् उथळ भासले. इटॅलियन मात्र मेकॉलेनें म्हटल्याप्रमाणें हिंदु लोकांसारखे मनांतून बरेच उतरतात. हा कॅथालिक पंथाचा प्रभाव. आल्प्स पर्वत व र्हाइन नदी प्रशस्त व रमणीय दिसली. पॅरिस शहर ख्यातीप्रमाणें सुंदर व नटवें दिसलें. लंडन बोजड व बेंगरूळ दिसलें. त्यांत बराच फापटपसारा आढळून आला. इंग्लंडमध्यें विशाल असा देखावाच नाहीं. सर्व लहान प्रमाणावर, साधेंच पण नयनमनोहर असायचें. लोक घुम्मे पण पक्के व्यावहारिक व शहाणे दिसले. श्रीमंत व दरिद्री हे भिन्न दर्जे एकमेकांत शेजारीं गुण्यागोविंदानें वागतात. संतोष व शांति ह्या चिमुकल्या बेटांत मूर्तिमंत दिसल्या. अर्थात् गर्वाची बाधा दोघांनाही आंतून झालेलीच, हें खोल नजरेंत आल्याशिवाय राहात नाहींच. दारूचें व्यसन व लैंग्य व्यभिचार मोठमोठ्या शहरांतून चोहोंकडेच बोकाळला आहे व वाढत आहे. पण खेडीं व रानें शुद्ध आहेत. शेती खालावत आहे. बेकारी माजत आहे.
ख्रिस्ती धर्माचा पगडा इतर मोठ्या देशांपेक्षां इंग्लिश बेटांत अधिक सुरक्षित दिसतो. मात्र तो संभावित स्वरूपांतच विशेष आहे. म्हणजे अध्यात्मापेक्षां सामाजिक जीवनच सांभाळून आहे. खर्या परोपकाराचीं कामें मागें पडून धर्माची संभावित रहाटीच अधिक चालविली जात आहे. ह्या म्हणण्याला मुक्तिफौजही (Salvation Army) अपवाद नाहीं.
लैंगिक नीतीचा बोभाटा पॅरीस व फ्रेंच हद्दीवरील शहरांतून बराच आहे. तरी पण इतर देशांतील-विशेषतः अमेरिकन खुशालचेंडूच-या बोभाट्याला अधिक कारण आहेत. खुद्द फ्रेंच राष्ट्र कॅथॉलिक पेंचांतून सुटलें नाहीं, तरी वरपांगी स्वातंत्र्याच्या शाब्दिक गलबल्याला अधिक हातभार लावीत आहे. मला आयर्लंड, रशिया व ग्रीक हे देश पहावयास मिळाले असते तर बरें झालें असतें. रशियांतील कौंट टॉलस्टॉयचे पट्टशिष्य क्रांतिकारक चेट्कॉव्ह हे एकदां मँचेस्टर कॉलेजच्या मार्टिनो क्लबमध्यें व्याख्यान देण्याला आले होतेच. त्यांची मीं खाजगी भेट घेतली तेव्हां भावी महायुद्धाचें व रशियन क्रांतीचें स्वप्नही मला पडलें नव्हतें. तरी पण युरोपियन किनारा सोडण्यापूर्वी पाश्चात्य संस्कृतीच्या घमेंडखोर पोकळपणाचा मला जवळ जवळ वीट आला होता.