११. भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाची स्थापना

पूर्वतयारी  :  अमावास्येची काळोखी रात्र.  १९०५ सालचे उन्हाळ्यांतले दिवस.  अहमदनगरच्या समाजाच्या उत्सवासाठीं मी तेथें गेलों होतों.  नेहमींचीं दगदगीचीं कामें करून मीं नुकतेंच कोठें जमिनीला अंग टेकलें होतें.  अवचित अस्पृश्यवर्गाचें एक शिष्टमंडळ रात्रीं १२ वाजतां मला भेटण्यास आलें.  भिंगार म्हणून अहमदनगराहून चार मैलांवर एक खेडेगांव आहे.  तेथील स्थानिक अस्पृश्यांनीं अशा वेळीं एक मोठी जाहीर सभा बोलावली होती.  तिचें अध्यक्षस्थान स्वीकारून मीं चार शब्द सांगावे म्हणून आमंत्रण करण्यासाठीं हें शिष्टमंडळ अपरात्रीं आलें होतें.  नित्याप्रमाणें माझे बरोबर स्वामी स्वात्मानंद हेही होते.  मी त्यांना म्हणालों, ''चला स्वामिजी, जाऊं या.''  ''काय हो, कोण हे लोक ?  काय ही सभा !  आगाऊ तपास केल्याखेरीज एकाएकीं कसें जावयाचें ?''  स्वामीजी किंचित् त्रासून उद्‍गारले.  ''स्वामिजी, सत्कार्याला काळ वेळ, मुहूर्त लागत नाहीं.  तुमच्या शंकेला उत्तर सभेच्या ठिकाणीं गेल्याशिवाय मिळणार नाहीं.  भलताच कांहीं प्रकार घडला, तर तुमच्या हातांत दंडा आहेच.  आणखी मग काय पाहिजे ?''  

स्वामिजींना चेव आला.  ''बेशक चलीये !''  म्हणून ते टांग्यांत बसले.  गांवाच्या हद्दीवर महारवाड्यांत उतरलों.  मोठमोठे हिल्लाळ पेटलेले होते.  लहानथोर, बायकामुलें गजबजलेली सभा वाट पहात बसली होती.  आम्ही गेल्याबरोबर टाळ्यांच्या प्रचंड गजरांत स्वागत झालें.  खेडेगांवांतल्या मागासलेला समाजाचा एवढा जमाव जमलेला पाहून स्वामिजी आश्चर्य पावले.  ''ही सभा अशा अवेळीं कां बोलाविली ?''  असें स्वामिजींनीं चालकांना विचारलें.  ''साहेब, आम्ही गरीब लोक.  दिवसभर कष्टांत राबावें लागतें.  आम्हांला हिच्याशिवाय दुसरी वेळ कोणती ?  तशांत आम्ही सर्व चालकमंडळी शेजारच्या जिल्ह्याच्या गांवच्या परकीय साहेबांच्या घरगुती कामांत गुंतलेलों.  आम्हांला या वेळेपूर्वी हूं की चूं करण्यास वेळ मिळत नाहीं.  आपल्यास तसदी दिली याची माफी असावी.''  माझ्या अंतःकरणांत चक्क उजेड पडला.  ह्या लोकांची हजारों वर्षांची कहाणी अभ्यासून माझें मन हळुवार झालें होतें.  अधिक खुलासा नको होता.  स्वामीजींच्याही सर्व शंका तत्काळ मिटल्या.  कामास सुरुवात झाली.  

किसन फागू बंदसोडे आणि वर्‍हाड-नागपूरकडील इतर अस्पृश्य पुढारी यांनीं सोमवंशी हितचिंतक समाज ही संस्था त्या प्रांतीं काढली होती.  त्यांच्या सूचनेवरून अहमदनगर येथील अस्पृश्यांचे पुढारी श्रीपतराव थोरात (बटलर), पांडुरंग लक्ष्मण डांगळे (हेडमास्तर), रावजी सदोबा गायकवाड (शिक्षक नगर म्यु. पालिटीची शाळा) वगैरेंनीं ही सभा बोलविली होती.  ह्या मंडळींचे आत्मसुधारणेचे कामीं पुण्यांतील पुढारी शिवराम सदोबा कांबळे यांच्या मदतीनें ठिकठिकाणीं चार पांच वर्षे प्रयत्‍न चालले होते.  मोहपा (नागपूर) येथील मंडळीकडून आलेलें छापील जाहीरपत्रक जमलेल्या सभेस वाचून दाखविण्यासाठीं त्यांनीं माझे हातीं दिलें.  त्यांतील उद्देश मला फार बोधपर वाटले.  हजारों वर्षे वरच्या जातीचा जुलूम सहन करूनही वरिष्ठ वर्गांचीं मनें विनाकारण न दुखवितां, किंबहुना कोणत्याही प्रकारें त्यांच्या वाटेस न जातां, अस्पृश्यवर्गांनीं आपल्या स्वतःच्या हिताचे प्रयत्‍न करावे अशा अर्थाचा एक उद्देश सभेला मी नीट समजावून सांगत असतां हें उद्धाराचें काम आपण स्वतः अंगावर घेऊन, या कामांत स्वतःचें भावी चरित्र वाहून घ्यावें अशी प्रेरणा मला जोरानें होऊं लागली.  इतर सर्व कामें टाकून एका घडीचाही वेळ न दवडतां ह्या कार्यास लागावें.  असा संकल्प परमेश्वराला स्वरून ह्याच रात्रीच्या मुहूर्तावर केल्याचें मला पक्कें आठवतें.  ह्या अपूर्व सभेची आठवण ठेवून मीं काढलेल्या मिशनचें धोरण आणि पद्धत सहिष्णुतेच्या जोरावर मीं पुढें चालवली.  सूडबुद्धि आणि अत्याचार यांपासून ह्या हताश झालेल्या लोकांना सतत दूर ठेवावें आणि स्वतःही दूर राहावें या तपश्चर्येला हें जाहीरपत्रक मला ध्रुवाच्या तार्‍यासारखें मार्गदर्शक झालें.

लोकजागृति  :  नगरहून परत आल्यावर मुंबई येथील सामाजिक मंडळापुढें (Social Reform Association) माझें एक इंग्रजींत व्याख्यान करविण्यांत आलें.  त्यांत मी हिंदुस्थानांतील बहिष्कृत वर्गांच्या अडचणी, त्यांची प्रांतवार संख्या, त्यांच्या निवारणार्थ वरिष्ठ वर्गाकडून होणारे निरनिराळे प्रयत्‍न आणि स्वतः तया लोकांकडूनच स्वोद्धारार्थ होणारे प्रयत्‍न, ह्यांची मीं प्रथमच व्यवस्थेशीर मांडणी केली.  हें व्याख्यान ह्या मंडळास आणि त्या मंडळाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांस इतकें आवडलें कीं, इंडियन सोशल रिफॉर्मर या पत्रामध्यें हें व्याख्यान प्रसिद्ध करून त्याच्या पुस्तकरूपानें स्वतंत्र प्रती काढून या वाटण्यांत आल्या.  त्या व्याख्यानाचा शेवटीं जो खालील निष्कर्ष सांगितला तो ध्यानांत घेण्यासारखा आहे.  ''मीं ह्याप्रमाणें, वरिष्ठ वर्गांचा परोपकारी प्रयत्‍न आणि ह्या गरीब लोकांचा स्वोद्धारार्थ प्रयत्‍न ह्यांचें वर्णन केलें आहे.  जाणून अथवा नेणून हे दोन्ही प्रयत्‍न एकमेकांपासून, हल्लीं चालू असल्याप्रमाणें, पुढें अलग चालू राहिले तर ते थकून बंद पडतील, म्हणून मुंबईचें सुधारणा मंडळ आणि प्रा. समाज या दोन्ही संस्थांनीं एकत्र विचार आणि नवीन योजना करून ह्याच विषयावर १९०६ सालच्या ऑगस्टमध्यें दुसरें एक लहानसें इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केलें.  त्यांत त्यांनीं एक एतद्देशीय स्वतंत्र मिशन स्थापावें अशी जोराची जाहीर विनंती केली.  त्यांत म्हटलें कीं, 'ह्या लोकांच्या उद्धारासाठीं नुसती शिक्षणसंस्था, मग ती कितीही मोठ्या प्रमाणावर असो, स्थापून चालवयाचें नाहीं, तर त्यामध्यें जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे असें एक मिशन तयार झालें पाहिजे.  अशा मिशननें ख्रिस्ती मिशनर्‍यांप्रमाणें ह्या लोकांच्या जीवितामध्यें क्रांति व विकास घडवून आणला पाहिजे.  मुंबई शहर हें अशा कार्यासाठीं योग्य क्षेत्र आहे व मुंबई प्रार्थना समाज ही एकच संस्था अशा प्रकारचें मिशन चालविण्यास पात्र आहे.''

अस्पृश्य मानलेल्या लोकांचे वरिष्ठ लोकांच्या संख्येशीं जें प्रमाण बसतें तें १९०१ सालच्या खानेसुमारीवरून आंकडे गोळा करून पुढीलप्रमाणें प्रसिद्ध करण्यांत आलें.


अंत्यज आणि एकूण हिंदु यांची प्रांतनिहाय संख्या

तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्यांचें वर्गीकरण करतां आलें नाहीं व जे अर्धवट रानटी स्थितींत आहेत अशा हिंदु लोकांची संख्या ह्याशिवाय निराळी आहे.  ती धरली असतां एकूण हिंदूंची संख्या २०,७१,४७,०२६ इतकी होते.

हिंदुस्थानांतील निरनिराळ्या भागांतील एकूण हिंदुसंख्येमध्यें अति उच्च आणि नीच मानलेल्या जातीचें दर शेंकडा प्रमाण खालीं दिल्याप्रमाणें आढळून येतें.

तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा


ह्या आंकड्यांवरून असें सिद्ध होतें कीं, हिंदु लोकांपैकीं एकचतुर्थांश लोकसंख्या हीन मानलेल्या अंत्यज लोकांची आहे व मुसलमान लोकांपैकीं जवळजवळ एकसत्पमांश लोकसंख्या हीन मानलेल्या अर्जालू लोकांची आहे.  ह्या हीन मानलेल्या मुसलमानांची संख्या विचारांत न घेतां नुसत्या हिंदु अंत्यजांची संख्या हिंदुस्थानच्या एकंदर लोकसंख्येशीं ताडून पाहिली तरी ही तिच्या एकषष्ठांशाहूनही अधिक भरते.  म्हणजे प्रत्येक सहा हिंदी माणसांत (मग ते कोणत्याही जातीचे.  धर्माचे अगर रंगाचे असोत) एक अगदीं टाकाऊ, शिवून घेण्यास देखील अयोग्य असा मनुष्यप्राणी सांपडतो.

तिरपगडा  :  पण मुख्य प्रश्न बाजूलाच राहिला आहे.  तो हा कीं, जवळ-जवळ साडेपांच कोटी प्रजेनें अशा हीन स्थितींत राहून चालेल काय ?  हिंदुसमाज तर आपला सोवळेपणा सोडावयाला तयार नाहीं आणि तो सोंवळेपणा कायम आहे तोंपर्यंत ह्या हीन जातीला पुढें सरकावयाला जागा नाहीं; तर मग हें व्हावें कसें ?  इतक्या सगळ्यांनीं एकदम ख्रिस्ती व्हावें !  यक्षिणीची कांडी फिरून इतक्या लोकसमुदायाला एकदम कोणी ख्रिस्ती करील म्हणावें तर संभवनीय नाहीं.  तथापि हिंदु लोकांची उदासीन विस्कळितता शाश्वत राहिली तर मात्र वरील चमत्कारही घडण्याचा संभव आहे.  असा प्रकार खरोखरीच घडून आला तर राष्ट्रीय दृष्ट्या काय प्रकार होईल पहा.  हल्लीं भारतीय साम्राज्यांत खालीलप्रमाणें लोकसंख्या आहे.

(इतर १५ + हीन ५॥ मिळून) २०॥ कोटी हिंदु लोक.
(इतर ५ + हीन १ मिळून) ६ कोटी मुसलमान.

३० लक्ष ख्रिस्ती.
१ कोटी जंगली.
१ कोटी बुद्ध, जैन, शीख वगैरे

हिंदुसमाजाची उदासीनता आणि ख्रिस्ती समाजाची चळवळ आतांप्रमाणेंच कायम राहिली तर पुढें खालीलप्रमाणे गणना होण्याचा संभव आहे.

१५ कोटी हिंदु, ६ कोटी मुसलमान, ७ कोटी ख्रिस्ती, १ कोटी बुद्ध, जैन, शीख.

म्हणजे राष्ट्रीय दृष्ट्या आतां जी हिंदुमुसलमानांची दुही आहे तिच्या ऐवजीं वरील प्रकार घडलाच तर हिंदु, मुसलमान व ख्रिस्ती यांचा तिरपगडा होणार !  १५ कोटी मवाळ हिंदु आणि जवळजवळ तितकेच कडवे मुसलमान आणि ख्रिस्ती मिळून या तिघांचें सूत कसें जमणार ईश्वर जाणे !

स्थापना  :  ता. १८ ऑक्टोबर १९०६ रोजीं कार्तिकी वर्षप्रतिपदेचा शुभ दिवस उगवला.  दोनच दिवसांपूर्वी मुंबई प्रार्थनासमाजाचे उदार उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदार सुखडवाला यांनीं अशा मंडळीची स्थापना होऊन काम सुरू व्हावें म्हणून १००० रु. दिले होते.  दिवाळी-पाडव्याच्या शुभ दिवशीं सकाळीं ९ वाजतां मुंबई येथील एल्फिन्स्टन रोडलगतच्या मुरारजी वालजी यांच्या बंगल्यांत भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची पहिली शाळा उघडण्याकरितां प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष न्या. चंदावरकर ह्यांनीं जमलेल्या मुलांना पहिला धड घालून दिला.  त्यांनीं आपल्या भाषणांत पुढील सूत्रवाक्य सांगितलें.  ''ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्‍न करण्यानें आम्ही स्वतःलाच वर आणीत आहोंत.  हें पवित्र कार्य करीत असतां ह्या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणांत न शिरो आणि आम्हां सर्वांना ह्या घोर अन्यायामुळें जी अधोगती मिळाली आहे ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे, असा साधा आणि सात्त्विक भाव आम्हांमध्यें निरंतर जागृत राहो.''

मंडळीची पहिली कार्यकारी समिति - अध्यक्ष - सर नारायण गणेश चंदावरकर.  उपाध्यक्ष - शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला.  जनरल सेक्रेटरी - विठ्ठल रामजी शिंदे.  खजिनदार - रा. रा. नारायण भास्कर पंडित.  सुपरिंटेंडेंट - डॉ. संतुजी रामजी लाड.  पहिले शिक्षक - लक्ष्मणराव मल्कू सत्तूर.

त्रैवार्षिक अहवाल  :  पहिल्या तीन वर्षांच्या शेवटीं अहवाल प्रसिद्ध करण्यांत आला.  त्यांत खालील वाढ झाल्याचें आढळतें.  मुंबईंतील मध्यवर्ती शाखेच्या संस्था -

१.  परळ येथील शाळा - मराठी ४ इयत्ता व इंग्रजी ४ इयत्ता, शिक्षक ७.  पटावरील मुलांची संख्या २७५.  पुस्तक बांधणें आणि शिवणकामाचा वर्ग.

२.  देवनार येथील प्राथमिक शाळा - २ शिक्षक, ४७ मुलें, मराठी ४ इ.

३.  मदनपुरा प्राथमिक शाळा - ५ शिक्षक, १५० विद्यार्थी.  मराठी ५ इ.

४.  कामाठीपुरा गुजराथी शाळा - ही भंगी लोकांसाठीं मुंबईतील पहिली शाळा होय.  शिक्षक मिळणें दुर्मिळ झालें, तरी देखील १ शिक्षक आणि ५१ विद्यार्थी.

५.  रविवारच्या शाळा - १ परळ येथें व दुसरा मदनपुरा येथें.  धर्मशिक्षणाच्या आणि नीतिशिक्षणाच्या शाळा.

६.  भजनसमाज - १ परळ येथें व दुसरा मदनपुरा येथें.  पोक्त मंडळी भजनासाठीं आणि उपदेशासाठीं जमत आणि उपासना चालवीत.

७.  व्याख्यानें - वेळोवेळीं उपयुक्त विषयांवर.

८.  परस्पर सहाय्यक चामड्यांचा कारखाना - शशीभृषण रथ व दुसर्‍या एका जर्मन तज्ज्ञाच्या नेतृत्वाखालीं नवीन तर्‍हेचे बूट करण्याचा कारखाना काढला.

९.  निराश्रित सेवासदन - दोन तरुण गृहस्थ आणि तीन स्त्रिया यांच्या सहाय्यानें वरील सदन उघडण्यांत आलें.  या तीन स्त्रीया गरीब लोकांच्या घरीं समाचाराला जात, आजार्‍यांची शुश्रूषा करीत, निराश्रितांना सदनांत आणीत व शिवण्याचा वर्ग आणि बायकांचा वर्ग चालवीत.  तरुण गृहस्थ सर्व संस्थांची देखरेख करीत.  परळ शाळेंतील सुमारें १२ विद्यार्थ्यांच्या जेवण्याखाण्याची सोय सदनांतील वसतिगृहांत केली जाई.

१०.   Purity Servant या नांवाचें इंग्रजी मासिक दर महिन्याच्या ता. १५ ला प्रसिद्ध होत असे.  त्यांत मद्यपाननिषेध व इतर सामाजिक विषयांवर लेख येत.  आणि मिशनची सर्व बातमी प्रसिद्ध होई.  ह्याचे संपादक श्री. वा. स. सोहोनी हे होते.  ह्याशिवाय मुंबईबाहेर खालील शाखा होत्या.

१.  पुणें - (१) दिवसाची शाळा, (२) रात्रीची शाळा, (३) भजनसमाज, (४) चर्चामंडळ.  शाळांतील पटावरील संख्या, अनुक्रमें १४९,२५,३३.

२.  मनमाड - १ रात्रीची शाळा, ४५ विद्यार्थी.

३.  इगतपुरी - १ दिवसाची शाळा, ६८ मुलें.  ही शाळा दोन महार तरुणांनीं चालविली होती.  शिवाय रविवारची धर्मशिक्षणाची शाळा व धर्मसमाज चालू होते.

४.  इंदूर - १ रात्रीची शाळा, २० विद्यार्थी.

५.  अकोला - २ रात्रीच्या शाळा, ७२ विद्यार्थी, १ भजनसमाज, १ विद्यार्थी वसतिगृह

६.  अमरावती - २ रात्रीच्या शाळा, ५३ विद्यार्थी.

७.  दापोली - १ दिवसाची शाळा, ३७ विद्यार्थी. ह्याशिवाय मुलांना विद्यार्थीवेतनें मिळत.

८.  मंगळूर - १ दिवसाची शाळा, ४९ विद्यार्थी, हातमागाचा विणण्याचा कारखाना.  सर्व मुलांना दुपारचें जेवण मिळे.  ७ मुलें मोफत वसतिगृहांत राहात.

९.  मद्रास - १ पारिया जातीच्या अस्पृश्यांसाठीं दिवसाची शाळा, २३विद्यार्थी, १ चांभारांसाठीं दिवसाची शाळा, विद्यार्थी २९.

१०.  महाबळेश्वर - मे १९०९ मध्यें गव्हर्नरच्या बंगल्यावर लेडी म्यूर मॅकेंझी यांच्या आश्रयाखालीं मिशनच्या हितचिंतकांची सभा भरली.  सुपरिंटेंडेंट मेजर जेम्सन हे अध्यक्ष होते.  पूर्वी जमलेला ९०० रु. चा फंड मिशनला देण्यांत आला आणि ही शाखा उघडली.  दोरखंड तयार करणें, वेताचें विणकाम करणें वगैरे कामें होत.

११.  नाशिक - १९०९ सप्टेंबरमध्यें जनरल सेक्रेटरी ह्या जिल्ह्यांत दौर्‍यावर गेले असतांना नाशिक येथें जाहीर सभा होऊन जिल्ह्याची कमिटी नेमण्यांत आली.  जिल्ह्याचे कलेक्टर मि. जॅक्सन ह्यांस अध्यक्ष नेमण्यांत आलें.  येणेंप्रमाणें तिसरे वर्षाच्या अखेरीस ह्या मिशनच्या १२ शाखा, १६ दिवसाच्या प्राथमिक शाळा, १०१८ विद्यार्थी, सहा रविवारच्या शाळा, ५ भजनसमाज, ४ उद्योगशाळा, ७ मिशनरी कामाला वाहून घेतलेले कार्यवाह आणि एक मासिक पत्र इतकी वाढ झाली.