साहित्यसेवा

आतांपर्यंत मीं माझ्या क्रियात्मक सेवेच्या आठवणी दिल्या.  साहित्यसेवेविषयीं कांहीं उल्लेख न केल्यास या ग्रंथास अपूर्णत्व येईल म्हणून या प्रकरणीं त्याचा संक्षेपानें उल्लेख करणें भाग आहे.  माझें सर्व आयुष्य परिश्रमाचें काम करण्यांत गेल्यामुळें मोठमोठे ग्रंथ तयार करण्याकडे मला वेळच मिळाला नाहीं.  तथापि प्रवासवर्णनें, इतिहाससंशोधन, तत्त्वविवेचन, धर्मोपदेश वगैरे विषयांवर माझीं जीं व्याख्यानें झालीं तीं समग्र लिहून काढून तत्कालीन वर्तमानपत्रांतून आणि मासिक पत्रांतून प्रसिद्ध करण्यांत आलीं आहेत.  ह्याशिवाय निरनिराळ्या परिषदांत आणि अध्यक्षपदावरून केलेलीं विस्तृत भाषणें वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होऊन शिवाय पुस्तकरूपानें छापण्यांत आलीं आहेत.  विलायतेंतील प्रवास, हिंदुस्थानांतील प्रवचनें आणि व्याख्यानें हीं सर्व एकत्र करून माझे मित्र रा. बी. बी. केसकर यांनीं स्वतंत्रपणें पुस्तकरूपानें छापलीं.  तीं पुस्तकें इंदुप्रकाशकारांनीं आपल्या वर्गणीदारांस १९३२ सालीं मोफत वांटलीं.

मराठा विद्यार्थी भ्रातृमंडळ पुणें, ह्या मंडळापुढें ''सुशिक्षित मराठ्यांचीं कर्तव्यें'' ह्या विषयावर माझें विस्तृत व्याख्यान झालें.  तें इंदुप्रकाशांत, जून १९१४ स ता. २३ ते २६ अखेर प्रसिद्ध झालें आहे.  त्यांत दिलेली आंकडेवारी आणि केलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत.  स्वतंत्र पुस्तकरूपानेंही हें व्याख्यान प्रसिद्ध झालें आहे.

मी तरुण असतांना ललितवाङ्‌मय लिहिण्याच्या विचारांत होतों.  एका सामाजिक कादंबरीची योजनाही मीं करून ठेवली होती.  पण कार्यबाहुल्यामुळें वेळ मिळाला नाहीं.  माझ आवडीचा विषय इतिहास.  त्यावर मात्र मीं वेळोवेळीं व्याख्यानें दिलीं आहेत.

१९२३ सालीं डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या कामांतून मी निवृत्त झालों.  त्यानंतर माझ्या साहित्यसेवेच्या इच्छेनें उचल खाल्ली.  हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे आर्यांचा इतिहास.  आर्यांच्या आगमनापासून हिंदुस्थानच्या इतिहासास सुरुवात झाली वगैरे वगैरे भ्रामक कल्पना जाड्यां जाड्यां विद्वानांमध्येंसुद्धां अजूनही दिसतात.  आर्यांच्या पूर्वीही हिंदुस्थानांत द्राविड आले.  ते पश्चिमेकडून आले.  त्यांच्याही पूर्वी हिंदुस्थानांत मोगल (कोल = कोळी वगैरे) आले.  हिंदुस्थानभर त्यांनीं वस्ती केली.  त्या विषयावर निरपेक्ष रीतीनें संशोधन करण्याची जरुरी आहे असें वाटल्यावरून आर्य-द्राविड वाद ह्या विषयावर १९२५ सालच्या सुमारास, नाशिक, कोल्हापूर वगैरे ठिकाणीं जाहीर व्याख्यानें दिली.  तीं विषयाच्या नाविन्यतेमुळें, सामान्य जनांस रुचत नसत.  ता. २१ जाने. १९२५ च्या Indian Daily Mail ह्या इंग्रजी दैनिकांत व त्याच सुमारास Indian Social Reformer मध्यें व मद्रासच्या  ह्या इंग्रजी दैनिकांत ह्या विषयावरील माझे संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

माझ्या मिशनच्या कामानिमित्त आखिल भारतांतून अनेक वेळां फिरतीवर असतां ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळें मी मुद्दाम जाऊन पाहात असें.  ओरिसांतील अत्यंत सुंदर भुवनेश्वरीचें देऊळ आणि खंडगिरी व उदयगिरी ह्या डोंगरांवरील जैन लेणीं पाहिलीं आणि खारवेल राजाचा इतिहासप्रसिद्ध शिलालेख वाचून पाहिला.  दक्षिणेंस कृष्णेच्या मुखाजवळील अमरावती येथील बुद्धावशेष, कर्नोल-कडप्पा येथील ऐतिहासिक स्थळें, हंपी विरूपाक्षाचें देऊळ, व्यंकटाचल पर्वतावरील तिरुपतीचें वैष्णवमंदिर, दक्षिण कानडांतील मूडबिद्री आणि कारकळ येथील जैनमंदिरें, उत्तरेकडील गिरनार पर्वतांतील देवालयें, अबूचे पहाडावरील दिलवारामंदिर, मांडू येथील प्रेक्षणीय स्थळें, आग्रा, दिल्ली, मथुरा, अमृतसर येथील इतिहासप्रसिद्ध स्थळें वगैरे अनेक स्थळें पाहून त्यासंबंधींची माहिती वर्तमानपत्रांत लिहून ठेवली आहे.

जयराम पिंडये नांवाच्या कवीनें केलेल्या 'राधामाधवविलासचंपू' नांवाचें काव्य म्हणजे शहाजीराजे यांची प्रशस्ति शोधून काढण्याचें श्रेय प्रसिद्ध इतिहासकार राजवाडे यांनीं मिळवलें आहे.  मूळ चंपू ७६ पानांचा व त्यावर प्रस्तावना २०० पानांची राजवाड्यांनीं लिहली आहे.  शहाजीमहाराजांची प्रशस्ति उजेडांत आणतांना मराठे जातीच्या सामान्य जनांवर बेजबाबदार टीका करून त्यांच्या नांवाला काळोखी लावण्याचा केलेला प्रयत्‍न पाहून मला चीड आली.  म्हणून ह्या प्रस्तावनेवर चार टीकात्मक लेख १९२३ सालच्या 'विजयी-मराठा' पत्रांत आले आहेत.  ह्याच प्रस्तावनेंत राजवाड्यांनीं जैन-लिंगायतांशीं भांडकुदळपणा केला आहे.  म्हणून टीकात्मक लेखांची भाषा फार कडक झाली आहे.

पुणेरी पेशव्यांची कामगिरी  :   'केसरी' कारांनीं प्रो. जदुनाथ सरकारांची भेट घेऊन त्यांचे मराठ्यांच्या इतिहासासंबंधीं विचार प्रसिद्ध करण्याचा प्रयत्‍न ता. ४ नोव्हें.१९२४ च्या 'केसरींत' केला आहे.  त्यांत जदुनाथ सरकार म्हणतात - (१) सातारच्या १ ल्या शाहू महाराजांच्या अंगांत राज्य चालविण्याची धमक नव्हती.  (२) साम्राज्याची कल्पना त्यांच्या डोक्यांत पेशव्यांनींच भरून दिली.  त्यांनींच (पेशव्यांनीं) मराठ्यांना साम्राज्य व संपत्ति मिळवून दिली वगैरे.  ह्यावर विजयी मराठ्यांत मीं तीन टीकात्मक लेख लिहिले.  ते अनुक्रमें ता. १,८, १५ डिसें. १९२६ च्या अंकांत प्रसिद्ध झाले आहेत.

कानडी-मराठी संबंध  :   रा. रा. भि. जोशी यांनीं 'नवीन मराठी भाषेची घटना' हें पुस्तक प्रसिद्ध केलें.  त्याची पुरवणी म्हणून 'कानडी-मराठीचा परस्पर संबंध' म्हणून माझा लेख प्रसिद्ध केला आहे.  तोच लेख केसरीनें ता. ३० ऑक्टो., २० नाव्हें., ४ डिसें. आणि १४ डिसें. १९२३ रोजीं अनुक्रमें चार अंकांत प्रसिद्ध केला आहे.

जुलै १९२६ च्या 'विविध ज्ञानविस्तार' च्या अंकांतील पान ८९ वर माझा 'कोंकणी व मराठी याचां परस्पर संबंध' हा लेख प्रसिद्ध झाला आहे.  त्यांत कोंकणी ही मराठीचीच एक उपभाषा आहे असें सांगण्याचा मीं प्रयत्‍न केला आहे.  ऑक्सफर्ड येथें असतांना मीं तौलनिक भाषाशास्त्र, तौलनिक मानववंशशास्त्र, तौलनिक धर्मशास्त्र ह्या शास्त्रांचें ऐतिहासिकदृष्ट्या अध्ययन केलें होतें.  कोंकणी आणि कानडी याप्रमाणेंच बंगाली, उरिया, हिंदी, सिंधी, गुजराथी इत्यादि भाषांचा मराठीशीं परस्पर संबंध काय आहे हें मी लेख, तौलनिक व्याकरणशास्त्र यांच्या दृष्टीनें लिहिणार होतों.  पण वेळ मिळाला नाहीं.  परंतु मराठी भाषेचा प्रवास कसा झाला याविषयीं केसरींत एक लेख लिहिला आहे व त्यांत मीं म्हटलें आहे, ''१९२३ नंतर बंगाल, ओरिसा, तेलंगण आणि दक्षिण कोंकण ऊर्फ केरळ या चार प्रांतांतून गेल्या दोन वर्षांत मला प्रवास करावा लागला.  त्यावरून हल्लींची मराठी ही 'महाराष्ट्री' असें  नांव असलेल्या एका प्राचीन प्राकृतांतूनच आलेली नसून ती मगध देशांतून पश्चिम बंगाल, ओरिसा, तेलंगण, वर्‍हाड आणि १००० वर्षांपूर्वीचा उत्तर कर्नाटक (कृष्ण व गोदावरी ह्यांमधील भाग) ह्या प्रांतांतून प्रवास करीत असलेली एक भाषा असावी असा माझा पूर्ण ग्रह बनत चालला आहे.  इतकेंच नव्हे, तर अशा अर्धवट बनलेल्या स्थितींतच ही प्रगमनशील सुमारें १०००-१२०० वर्षांत उत्तर कोंकण ऊर्फ अपरांत या प्रांतीं आणि तेथून दक्षिण कोंकण ऊर्फ केरळ या प्रांतांत उतरली आणि त्या दोन्ही प्रांतांत हल्लीं मालवणी, कोंकणी, गोव्हनी या नांवांनीं ती रूढ आहे.''

तौलानिक भाषाशास्त्राचा अभ्यास करीत असतां मला शब्दांच्या व्युत्पत्तिशास्त्राचाही नाद लागला.  १९३१ सालच्या सुमारास 'महाराष्ट्र शब्दकोशाचें' काम चाललें असतां, प्रत्येक शब्दची व्युत्पत्ति कसून नीट लावली पाहिजे व त्यासाठीं निदान आर्येतर एक तरी भाषा जाणणार्‍या विद्वानांची एक कमिटी नेमावी अशी सूचना मीं कोशकारांना केली.  त्याप्रमाणें प्रि. राजवाडे, रा. मोडकशास्त्री, रा. कुलकर्णी वगैरेंची एक कमिटी दर आठवड्यांतून एकदां शब्दकोशकचेरींत भरत असे.  मीही त्या कमिटीवर होतों.  

१९२९ सालच्या डिसेंबर महिन्यांत बडोद्याच्या सहविचारिणी सभेनें मला 'तौलनिक शास्त्रावर' व्याख्यान देण्यासाठीं खास आमंत्रण केलें.  'तौलनिक भाषाशास्त्राच्या अध्ययनाची आवश्यकता' ह्या विषयावर जयसिंगराव स्टेट लायब्ररी, बडोदें येथें ता. २९ डिसेंबर १९२९ रोजीं रविवारीं सायंकाळीं ६ वाजतां माझें व्याख्यान झालें.  बडोदा म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष रा. सुधाळकर हे अध्यक्षस्थानीं होते.  ह्यानंतर मी अहमदाबादेस गेल्यावर येथें एक व्युत्पत्तिशास्त्रावर माझें व्याख्यान झालें.  तेथील प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ अध्यक्षस्थानीं होते.  पुण्यांतील शब्दकोशाची आणि व्युत्पत्तिकमिटीची हकीकत मीं सांगितली आणि तिच्याशीं सहकार्य करण्यासाठीं अहमदाबादेंतील विद्वान् लोकांनीं तशीच एक कमिटी नेमावी अशी सूचना केली.  ती मंडळींनीं मान्य केली.

भागवतधर्माचा विकास  :   हिंदुस्थानचा पूर्वापार विस्तृत इतिहास लिहिण्याचा माझा मानस पूर्वीपासूनच होता.  पण कार्यव्यापृतत्वामुळें हें काम केवळ मला अशक्य होतें; पण हिंदुस्थानांतील धर्मांचा इतिहास तरी लिहावा असा विचार वरचेवर मनांत येऊं लागला.  म्हणून तो इतिहास लिहिण्याचें हातीं घेण्यापूर्वी त्याची एक विस्तृत प्रस्तावना तरी लिहावी आणि तिच्यावरून मग धर्माचा इतिहास हा मूळग्रंथ लिहिण्याचें ठरवावें म्हणून १९२५ सालीं मी भागवतधर्माचा इतिहास ह्या विषयावर पांच संशोधक व्याख्यानें लिहून काढलीं आणि तीं व्याख्यानरूपानें लोकांपुढें ठेवलीं.  पहिलें व्याख्यान पुणें येथें ता. १७ जुलै १९२५ रोजीं झालें.  त्यांत भागवतधर्माची व्याख्या, श्रद्धा व भक्ति ह्या दोन तत्त्वांत आहे असें ठरवून ह्या धर्माचा आणि वैदिक धर्माचा फारसा संबंध नाहीं असें ठरवलें.  ह्या धर्माचें अतिप्राचीन स्वरूप वेदादींच्याहीपेक्षां अतिप्राचीन आहे असें मीं दाखवलें.  अर्थात् ह्या धर्माचें प्राचीन स्वरूप आतांप्रमाणें नव्हतें.  तें फार अविकसित स्थितींत होतें.  वैदिक धर्म म्हणजे अविचार (जादू-टोणाधर्म) धर्म.  त्याचा श्रद्धा व भक्तीशीं संबंध येत नाहीं.  वैदिक धर्म म्हणजे भौतिक धर्म व भागवत धर्म म्हणजे नैतिक धर्म असा मुळांतच फरक आहे वगैरे विचार मीं पहिल्या व्याख्यानांत मांडले.

पांच भागवत  :   दुसरें व्याख्यान पुणें प्रा. स. मंदिरांत २४ जुलै १९२५ ला झालें.  त्यांत भागवत शब्दाचा इतिहास सांगितला.  भग शब्दापासून भागवत शब्द झालेला आहे.  भाग्य ह्या शब्दामध्येंसुद्धां भग हा शब्द आहे.  भाग्य या शब्दाचा अर्थ संतति, संपत्ति, ऐश्वर्य असा आहे.  भाग्य देणारा तो भगवान् व त्याची उपासना म्हणजे भागवतधम्र.  हा भगवान् म्हणजे ईश्वर असें नव्हे.  ईश्वर हा अर्थ मागाहून प्रचारांत आला.  एखादी मोठी नैतिक विभूति असा भगवान् या शब्दाचा अर्थ ईश्वरवाद निर्माण होण्यापूर्वी होता.  ह्या पूर्वीच्या अर्थानें देवीभागवत, शिवभागवत, बौद्धभागवत, जैनभागवत आणि विष्णुभागवत असे भागवताचे पांच प्रकार होते.  देवीभागवत म्हणजे देवीचे ऊर्फ शक्तीचे उपासक म्हणजे शाक्त होते.  देवीभागवतांतील 'भग' ह्या शब्दाची व्युत्पत्ति इतर भागवतांतील 'भग' या शब्दाच्या व्यत्पत्तीपेक्षां अगदीं निराळी आहे.  'भग' म्हणजे योनि.  स्त्रीचें जननेंद्रिय.  योनि म्हणजे एक मोठी शक्ति आहे अशी प्राचीन कल्पना.  ही प्रभावी शक्ति म्हणजे देवी.  तिची उपासना करणें म्हणजे शाक्त धर्म.  देवीचा उल्लेख वेदांमध्यें फार ओझरता आहे.  रात्री, दुर्गा, वगैरे नांवें वेदांमध्यें ह्या शक्तीचीं आढळतात.  ह्या देवीला अनुरूप 'शिव' म्हणून दुसरी एक देवता प्राचीन कालीं विशेषतः द्राविडांमध्यें होती.  'शिस्न' देव या नांवानें या देवाचा वेदांत उल्लेख आहे.  याचा आर्यांना मोठा तिटकारा असे.  मोहेंजोदारो आणि हरप्पा या सिंध आणि पंजाब प्रांतीं हल्लीं जें मोठ्या प्रमाणावर पुराणवस्तुसंशोधन झालें आहे त्यांत शिस्नाच्या (पुरुष जननेंद्रियाच्या) मातीच्या आकृति पुष्कळ सांपडल्या आहेत.  ह्या शिस्नांकृति वस्तूंची फार मोठ्या प्रमाणावर पूजा होत असे.  अद्यापिही हिंदुधर्माप्रमाणें शिवाची म्हणून जी पूजा होते ती पिंडीच्या रूपानें होते.  ही पिंढी म्हणजे 'भगा' मध्यें लिंग प्रविष्ट झालेलें दृश्य स्वरूप होय.  ह्याशिवाय शिवाची पूजा अन्य रितीनें होत नाहीं.  'भग' ह्या शब्दाची दुसरी व्युत्पत्ति 'बोगू' म्हणजे भाग्य देणारा देव असा असून या अर्थाचा शब्द स्लाव्ह (रशियन) भाषेंत आहे, असें प्रो. मॅक्यमुल्लरचें मत आहे.  सिद्धार्थ बौद्ध आणि महावीर जैन यांना त्यांचे अनुयायी भगवान् म्हणत असत; तरी त्या दोन्ही धर्मांमध्यें ईश्वरवाद नाहीं.  वेदांमध्यें 'विष्णु' म्हणून एक लहानशी देवता होती.  वासुदेव कृष्णानें हा विष्णुधर्म प्रचारांत आणला; त्याचा ईश्वरवादांत अविकास झाला.  श्वेताश्वतर उपनिषदामध्यें शैव-ईश्वरवादाचा आणि भगवद्‍गीतेमध्यें वैष्णव ईश्वरवादाचा विकास आढळतो.  पण ह्या दोन्ही उपनिषदांच्या पूर्वी सिद्धार्थ आणि महावीर ह्या मानवी विभूतींनीं आपापल्या धर्माचा प्रसार केला !  वगैरे विचार मीं दुसर्‍या व्याख्यानांत मांडले.

तिसरें व्याख्यान २८ जुलै १९२५ रोजीं पुणें प्रार्थनासमाजांत झालें.  वर निर्दिष्ट केलेल्या पांच भागवतधर्मांचा प्रसार आणि अवनति कशी झाली हें मीं तिसर्‍या व्याख्यानांत सांगितलें.  मंदिरें, मूर्ति, यात्रा, पुराणें वगैरे साधनांच्या द्वारें प्रसार होतां होतां त्याची अवनति झाली.  धर्म म्हणजे मोक्षाकरितां आहे हें खरें असूनही त्याचा प्रचार करणार्‍यांनीं आपला धंदा बनवल्यामुळें जनतेंत अंधश्रद्धा माजून धर्माला विकृत स्वरूप प्राप्‍त झालें.  हें विकृत स्वरूप देवीभागवत आणि शिवभागवतांतच नव्हे, तर बौद्ध आणि जैन धर्मांतूनही प्रगट झालें.  मंदिरें व मूर्ति ह्या तर जैनांनींच प्रथम प्रचारांत आणल्या.  शैवांनीं व शाक्तांनीं आणि पुढें वैष्णवांनीं त्यांचें अनुकरण केलें.  त्यामुळें सर्वांचाच बिघाड झाला.  वेदांमध्यें मूर्तिपूजेला बिलकूल वाव नव्हता.  तथापि प्राचीन आर्यांमध्यें व द्राविडांमध्यें शिल्पशास्त्राचा व वास्तुशास्त्राचा प्रचार बराच होता.  ॠभू नांवाच्या ब्राह्मण रथकारांना तर वेदकालीं अगदीं देवासारखा मान होता.  त्यांनीं इंद्रास दोन पिवळ्या रंगाचे घोडे आणि अश्विनीकुमारांस एक हलकासा पृथ्वीभोंवतीं फिरणारा रथ करून दिला.  ते मोठे कारागीर होते.  उद्यानें, विमानें, यंत्र, किल्ले, विहिरी, कवच, आयुधें वगैरे करण्यांत ते फार पटाईत असत.  (विश्वंभर वास्तुशास्त्र)

विश्वब्राह्मणाचा इतिहास नांवाच्या बाळशास्त्री क्षीरसागर ह्यांनीं लिहिलेल्या ग्रंथांत ह्यांविषयीं बरीच मनोरंजक माहिती आहे.  ह्या ब्राह्मणांनीं धर्माला लौकिक स्वरूप आणून दिलें आणि त्यामुळें ज्ञान, भक्ति, कर्म, वैष्णव वगैरे धर्मांचीं मोक्षदायक मूलतत्त्वें मागें पडून, ब्राह्मक्रियेची बजबजपुरी वाढली.  ह्यांतच मंत्र आणि तंत्राची भर पडली.  मंत्रानें धर्माचरणावर संक्षेप बसला व धर्माला गूढ स्वरूप प्राप्‍त झालें.  जेथें मंत्र सांगण्याची अक्कल सांगणार्‍यांमध्यें व ऐकणार्‍यांमध्ये उरली नाहीं तेथें तंत्र निघाले.  तंत्र म्हणजे कांहीं तरी भ्रम उत्पन्न करणारे बाह्य उपचार.  

दैवाधीनं जगत् सर्वं मंत्राधीनं तु दैवतम् ।
तन्मंत्रं ब्राह्मणाधीनें ब्राह्मणो मम दैवतम् ॥
भूतानां प्राणिनः श्रेष्ठाः प्राणिनां बुद्धिजीविनः ।
बुद्धिमत्सुवराः श्रेष्ठाः नरेषु ब्राह्मणाः स्मृताः ॥
मनुस्मृति १-९६

मांत्रिकाची आणि मूर्तिकारांची दुकानदारी, तांत्रिकांचा वाममार्ग, पुराणांनीं केलेला इतिहासाचा विपर्यास ह्या सर्वांचा परिणाम घडून हिंदुस्थानांतील धर्म म्हणजे एक विचित्र मायपोट होऊन बसलें.  बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून गेला.  जैनधर्माची प्रगति खुंटली. बाकी उरलेल्या वैष्णव, शाक्त आणि शेष ह्या सर्वच पंथांची अवनति झाली.

चवथें व्याख्यान प्रार्थनासमाजांत १८ जुलै १९२५ रोजीं झालें.  त्यांत हिंदुधर्माचें पुनरुज्जीवन व सुधारणा झाली.  ती महाराष्ट्र भागवत धर्मानें म्हणजे पंढरपूरच्या वारकरी संप्रदायानें कशी केली हें मीं सांगितलें.  ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत वारकर्‍यांनीं हिंदु धर्म चोखाळला व तो लोकसत्तात्मक केला हें मीं विशद करून सांगितलें.

पांचवें व्याख्यान प्रार्थनासमाजांत ३१ ऑगस्ट १९२५ रोजीं झालें.  त्यांत दक्षिणेकडील लिंगायत धर्म, उत्तरेकडील शीखधर्म आणि पूर्वेकडील चैतन्यांचा वैष्णवधर्म ह्यांनीं हिंदुधर्माची सुधारणा कशी केली हें सांगितलें.  ह्यानंतर युगांतर झालें.  पाश्चात्य सुधारणेचा हिंदुस्थानांत प्रवेश झाला.  ब्राह्म आणि प्रार्थनासमाज, आर्यसमाज, थिऑसफी, विवेकानंदांचें रामकृष्ण मिशन वगैरेंचे हिंदुधर्माची उजळणी करण्याचे प्रयत्‍न महशूरच आहेत.  त्यांचे प्रयत्‍न अद्यापि चालू असल्यामुळें त्यांचा परामर्श मीं माझ्या व्याख्यानांत घेतला नाहीं.

मराठ्यांची पूर्वपीठिका  :   तौलानिक भाषाशास्त्रांप्रमाणेंच तौलनिक मानववंशशास्त्राचेंही मी अध्ययन केलें होतें.  मराठ्यांची पूर्वपीठिका या विषयावर 'रत्‍नाकर' मासिकांत मीं एकंदर तीन लेख प्रसिद्ध केले.  पहिला लेख मार्च १९२९ च्या अंकांत व दुसरा मे १९२९ च्या अंकांत आला.  त्यानंतर १९३० सालच्या चळवळींत पडून मी कारावासांत गेल्यामुळें तिसरा लेख मे १९३१ च्या 'रत्‍नाकारांत' प्रसिद्ध झाला.  मराठ्यांची पूर्वपीठिका हा लेख लिहिण्याचा उद्देश मीं मराठा असून जातिनिष्ठेमुळें लिहिला असें मुळींच नाहीं.  मराठा नांवाचे लोक हिंदुस्थानांतील अनेक जातींपैकीं एक जात नसून ते एक राष्ट्र आहेत आणि एक प्रसिद्ध मानववंशहि आहेत अशी माझी समजूत आहे.  परस्परांमध्यें अन्नव्यवहार न करणें हें एक जातीचें मुख्य लक्षण आहे.  हें लक्षण मराठ्याला मुळींच लागू पडत नाहीं.  अस्पृश्यवर्ग सोडल्यास इतर कोणाहि हिंदुधर्मीयांशीं अन्नव्यवहार करण्यांत मराठे म्हणवणारे फारशी हरकत घेत नाहींत.  पण इतर जाती आपसांत बेटीव्यवहार करण्याला मुळींच हरकत घेत नाहींत.  तर मराठे लोक केवळ मराठा म्हणूनच एखाद्याला मुलगी देण्यास किंवा घेण्यास कबूल नसतात.  ते ह्या बाबतींत कुळी ऊर्फ गोत्र, खानदानी, देवक, पदर (पूर्वीचे संबंध किंवा नातें) वगैरे गोष्टी पाहतात.  अशा दृष्टीनें हा वर्ग वैशिष्टयपूर्ण आहे.  इतकेंच नव्हे तर ह्यानेंच महारामांगांच्यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीन काळांत महाराष्ट्र देशाची वसाहत केली.  जमिनीचे हेच मालक आणि वाहक आहेत.  अशा स्थूल आणि तिर्‍हाईत दृष्टीनेंच मीं ह्यांच्या पूर्वपीठिकेचा विचार केला आहे.  पहिल्या लेखांत भाषाशास्त्राच्या दृष्टीनें ह्यांच्या नांवाचा मीं सांगोपांग विचार केला आहे.  रट्ट हें पाली नांव.  (शब्द) राज आणि रथ ह्या तीन निरनिराळ्या शब्दांशीं मराठा ह्या नांवाचा संबंध येतो.  ह्या संबंधाचा विस्तारानें पहिल्या लेखांत मीं विचार केला आहे.  

दुसर्‍या लेखांत चालीरीती आणि इतर सामाजिक संस्था अथवा दर्जा ह्या दृष्टीनें विचार केला आहे.  मराठा व कुणबी हीं दोन नांवें ह्या वर्गांत प्रसिद्ध आहेत आणि हीं दोन्हीं नांवें एकाच मानववंशाचीं आहेत.  ह्या नांवांवरून दर्जाचा भेद दिसून येतो; पण वंशाचा भेद दिसून येत नाहीं.  विवाह, दत्तकविधि, पडदा, अंत्येष्टि, श्राद्ध, पेहेराव आणि खाणें-पिणें वगैरे दृष्टींनीं पाहतांना मराठ्यांमध्यें वरवर भेद दिसून येतात.  तरी ह्या बाह्या भेदांवरून त्यांच्यांत मानववंशीय भेद आहेत, असें मुळींच सिद्ध होत नाहीं.  उलट ह्या बाह्य आचारांवरून त्यांचे मौलिक ऐक्यच जास्त स्पष्टपणें सिद्ध होतें.  छत्तीस कुळी, छप्पन्न कुळी, शहाण्णव कुळी, म्हणून ज्यांची संख्या वेळोवेळीं वाढते अशा कुळी परंपरागत आहेत.  त्या सर्व मराठ्यांत सारख्याच आहेत.

तिसर्‍या लेखांत मराठ्यांच्या पीठिकेविषयीं मीं कांहीं लेखी पुरावे दिले आहेत; पण ते फार थोडे आहेत.  नाहींच म्हटलें तरी चालतील.  रॉलिन्सन् नांवाच्या लेखकानें Story of the Nations ह्या पुस्तकमालेंत History of the Parthians म्हणजे पार्थवांचा इतिहास नांवाचा ग्रंथ लिहिला आहे.  त्यांत त्यानें पार्थवांच्या जातीय स्वभावाचीं आणि चालीरीतींचीं जीं विशिष्ट लक्षणें म्हणून सांगितलीं आहेत तीं उत्तरेकडील राजपुताना व दक्षिणेकडील मराठ्यांना इतकीं तंतोतंत जुळतात कीं मराठे हे पार्थव किंवा पल्लव वंशाचे असतील असें वाटूं लागतें.

साहित्यसंमेलनें  :   मी महाराष्ट्र साहित्य संमेलनास बर्‍याच वेळां हजर होतों.  १९३० च्या डिसेंबर महिन्यांत नागपूर येथें हें संमेलन भरलें.  त्या वेळीं इतिहासाचें प्रदर्शन मांडलें होतें.  तें उघडण्याचा समारंभ माझ्या हस्तें करण्यांत आला.  न्यायमूर्ति आणि नागपूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरु रा. नियोगी हे अध्यक्षस्थानीं होते.  त्यांनीं मजसंबंधीं मोठें गौरवपर भाषण केलें.  मीं सांगितलें, ''इतिहासवाङ्‌मय आणि ललितवाङ्‌मय ह्यांत मोठा फरक आहे.  इतिहास लिहिण्यांत भावना वर्ज्य कराव्या लागतात तर लालित्यांत भावना आवश्यक असतात.  १९३५ सालीं हें संमेलन नाताळांत बडोद्यास भरलें.  त्या वेळीं संमेलनांतील विचारासाठीं निरनिराळ्या विषयांसाठीं निरनिराळ्या शाखा करून प्रत्येक शाखेवर स्वतंत्र उपाध्यक्ष नेमण्यांत आला होता.  'धर्माचें तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र' ह्या शाखांचा उपाध्यक्ष मी होतों.  पण ही योजना फारशी यशस्वी झाली नाहीं.  संमेलनाचें लक्ष कोणत्याही गंभीर विषयाकडे नसतें.  बहुतेक तरुण मंडळींचें लक्ष अश्लीलतेच्या ठरावाकडे लागून राहिलेलें असतें.  ह्या नेहमींच्या अनुभवावरून मी पुढें संमेलनास कधीं गेलों नाहीं.

समारोप  :   आतां मी माझ्या वाचकांची रजा घेतों.  माझ्या अत्यंत दुबळ्या अवस्थेकडे पाहिलें असतां इतक्या पानांचा मजकूर मीं कसा सांगितला ह्याचें माझें मलाच आश्चर्य वाटतें.  दृष्टि अतिशय मंदावलेली.  हात कंपवायूनें सदैव कांपत असत.  त्यामुळें वाचन फार दुर्घट झालें.  लिहिण्याचा प्रश्न तर दूरच राहिला.  स्मरणशक्तिही बरीच क्षीण झालेली.  ह्यामुळें ह्या सर्व लिखाणाचें श्रेय माझे धाकटे चि. कुमार रवींद्र यांचेकडेच आहे, हें मला आनंदानें नमूद केलें पाहिजे.  अनेक जुन्या रोजनिशा, हस्तलिखित पत्रें, वर्तमानपत्रांतील व मासिकांतील कात्रणें वगैरे वगैरे सामुग्रीचा ढीग अस्ताव्यस्त रीतीनें पडलेला.  त्यांतून विषयाला लागू असें लिखाण शोधून काढण्यास दिवसचे दिवस लागत.  मित्रांकडून इतर माहिती गोळा करणें आणि पुणें शहरांतील परिचितांकडे हेलपाटे घालणें वगैरे दगदगीचीं कामें चि. रवींद्रानें मोठ्या हौसेनें आणि तितक्याच चिकाटीनें केलीं.  पुष्कळ वेळां मी गळून पडलों तरी मोठ्या विनयानें त्यानें मला उत्साहाचा दम भरला.  हें सर्व करीत असतां स्वतः रवींद्राची तब्येतहि बरोबर नव्हती.  तरीही त्यानें हे श्रम घेतले ही विशेष गोष्ट आहे.  सामुग्री पुरवण्याचे कामीं, प्रकृतीची क्षीणावस्था व उतारवय असतांही माझे मित्र श्री.बी.बी. केसकर ह्यांनीं जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार ॠणी आहें.