सुट्या आठवणी

लाला लजपतराय  :   मिशन नुकतेंच सुरू झालें होतें.  सुरतेच्या काँग्रेसच्या बैठकीस (१९०७ सालीं) लाला लजपतराय आले होते.  आमच्या मिशनच्या निराश्रित सेवासदनांत माझे आईबाबा आणि घरची सर्व मंडळी राहून महारामांगांची सेवा करितात ही गोष्ट लालाजींच्या कानावर गेली.  म्हणून ते हें सदन पाहण्यास आले.  माझी वृद्ध आई समोरी गेली.  लालाजींनीं एकदम तिच्या चरणांवर मस्तक ठेवून दंडवत प्रणाम केला.  आईनें त्यांना उचलून उभें केलें आणि त्यांच्या कपाळावर हात फिरवून आपल्या शिरावर कडकडून बोटें मोडलीं.  हा कुरवाळण्याचा मराठी प्रकार पाहून लालाजींना अत्यंत आनंद झाला. It is one of the holiest thing that can be done by the religious and charitable societies of this country.
Lala Lajpatrai


सय्यद आणि शिंदे  :  कर्नाटक शाखेची घटना करीत असताना सय्यद आणि शिंदे या नांवांचा मोठा गमतीदार घोटाळा होत असे.  एके दिवशीं मध्यरात्रीं बेळगांवच्या स्टेशनवर उतरलों.  भूक लागली होती.  सबंध बाजारांत एकच चहाचें दुकान उघडें होतें.  सफरीवर असतांना आम्हां दोघांचीं नांवें वर्तमानपत्रांतून जाहीर झालीं होतीं.  आम्ही चहा घेण्यास दुकानांत गेलों असतां आम्हांस चहा देण्यास दुकानदार मागेंपुढें करूं लागला.  माझी दाढी पाहून मीच सैय्यद असावा, असा त्यास संशय आला.  सय्यदला दाढी नव्हती म्हणून त्याच्या हिंदुत्वाविषयीं संशय आला नाहीं.  हा घोंटाळा ओळखून सय्यद पुढें होऊन चहावाल्यास म्हणाले कीं, ''अहो, दाढी असली म्हणून काय झालें ?  ते हिंदु आहेत !''  पण खुद्द सय्यदविषयीं प्रश्नच निघाला नाहीं.  कांहीं आढेवेढे न घेतां आम्हांला चहा मिळाला आणि काम झालें.

पुढें धारवाड व हुबळी येथील कामें आटोपून आम्ही गदग येथें गेलों.  तेथील एका श्रीमंत व्यापार्‍यानें गांवाबाहेरील आपल्या एक मोठ्या बंगल्यांत उतरण्याची आमची सोय केली होती.  पण जेवण्याची सोय आम्हांसच करावयाची होती.  कर्नाटकांत लिंगायतांच्या मठांत पैसे घेऊन भाकरी देण्याची सोय असते.  एक दिवस तशी सोय झाली.  पण आम्ही कुणीतरी महारामांगांमध्यें काम करणारे विक्षिप्‍तराव आहोंत असें ऐकून दुसरे दिवशीं मठाधिकार्‍यांनीं भाकरी देण्याचें नाकारलें.  आमचा स्वयंपाक आम्हीच करूं लागलों.  बागेंतल्या नळावर बसून मी भांडीं घासावींत आणि सय्यदनें आंत बसून स्वयंपाक करावा अशी वांटणी झाली.  गांवांतून लहानमोठें गृहस्थ आम्हांस भेटण्यास येत.  भांडीं घांशीत बसलेला मीच सय्यद असें समजून शिंदेसाहेब कोठें आहेत असें मला विचारीत.  ''दिवाणखान्यांत बसा, भेटतील तेथें'' म्हणून मी त्यांना आंत पाठवीं.  आंत गेल्यावर सय्यदलाही तोच प्रश्न विचारीत.  ''आणून भेटवतों'' असें सांगून तो त्यांना बसवी.  थोड्यां वेळानें हात वगैरे धुऊन आम्ही त्यांना भेटावयास गेलों म्हणजे खरे शिंदे कोण व खरे सय्यद कोण हें त्यांना कळल्यावर त्यांचे हिरमुसलेले चेहरे पाहण्यासारखे होत.

म्हैसूरच्या राजवाड्यांत   :   दौर्‍यावर असतांना मोठमोठ्या राजेरजवाड्यांना समक्ष भेटायचे प्रसंग येत.  बावळटपणामुळें केव्हां केव्हां माझी फजिती उडे.  अहल्याश्रमाची कोनशिला बसवण्यासाठीं म्हैसूरच्या महाराजांना आमंत्रण करण्यास म्हैसूर येथें १९२१ सालीं गेलों होतों.  माझ्या पाहुणचाराची उत्तम सोय झाली.  पण ''महाराजांना समक्ष भेटावयाचें असल्यास पाहुण्यानें दरबारी पोषाक घातलाच पाहिजे असा म्हैसुरी रिवाज आहे'' असें प्रायव्हेट सेक्रेटरीनें सांगितलें.  हा पोषाक मजजवळ नव्हता.  अशा पाहुण्यासाठीं सरकारी पोशाक मिळतो असें सेक्रेटरीनें सांगितलें.  डोक्याला म्हैसूरी जरतारी फेटा, अंगांत लांब अंगरखा, ढिली विजार आणि कमरेला भरजरी दुपेटा हा सर्व साज नाइलाजानें अंगावर घालून मी म्हैसूरचा दरबारी अय्या बनलों.  वाड्यांत गेलों तर म्हैसूरचे महाराज आपल्या भव्य दालनांत माझी वाट पाहात उभे होते.  मी सामोरा गेलों तों मागें माझ्या दुपेट्याची टांचणी सुटून दुपेट्याचे एक दोन विळखे माझ्यामागें मारुतीच्या शेपटाप्रमाणें लोळत असलेले माझ्या ध्यानांतच आले नाहींत.  महाराजांचे हुजरे महाराजांच्या मागें उभे राहून तोंडावर हात ठेवून गालांतल्या गालांत हंसूं दाबीत असल्याचें दिसलें.  पण महाराज मात्र गंभीर उभे होते.  त्यांनीं मला आसनावर बसवलें व मग आपण जवळ बसले.  बसतांना मागें वळून पाहातों तों माझी लांब शेपटी आवरणें फार कठीण झालें.  जी धांदल उडाली ती शब्दानें सांगणें कठीण.  मी महाराजांना नम्रपणें म्हणालों कीं, ''महाराज, ही पोषाकाची उपाधि आमच्यासारख्यांच्या पाठीमागें कां असावी ?''  त्यांनाही वाईट वाटलें, आणि ते म्हणाले ''आपल्यासारख्यांना हा नियम लागूं नाहीं.  चूक झाली.''  नंतर मीं माझ्या भेटीचें कारण सांगितलें.  समारंभास युवराजांना पाठवण्याचें महाराजांनीं कबूल केलें.

ह्याच वेळीं मद्रास प्रांतांत आणि म्हैसूर प्रांतांतही बिशप व्हाइट हेड या साहेबांची अस्पृश्यांचीं गांवेंच्या गांवें त्यांना बाप्‍तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्याची, चळवळ चालली होती ही गोष्ट मीं महाराजांच्या कानावर घातली. महाराज म्हणाले, ''अशा गोष्टी सहसा आमचे कानावर येत नाहींत.  सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहें.''  मिशनची हकीकत ऐकून महाराजांनीं आनंद व्यक्त केला.  पुढल्या खेपेस मुंबईला आल्यावर आपण मिशनला अवश्य भेट देऊं असें आश्वासन दिलें आणि त्यांनीं तसें केलेंही.

धारचे महाराज  :   महाराजांना भेटण्यास मी एकदां धारला गेलों होतों.  त्यांच्या प्रा. सेक्रेटरीकडे उतरलों होतों.  महाराजांना भेटण्याचे आदले दिवशीं मला भेटायला एक गृहस्थ आले होते.  त्यांचा चेहरा दिसण्यांत बरोबर महाराजांसारखा होता.  पण मीं स्वतः महाराजांना कधींच पाहिलें नव्हतें.  आम्ही मुंबई-पुण्याकडचे लोक.  दरबारच्या चालीरीती आम्हांस माहीत नसतात म्हणून टांग्यांतून महाराजांना भेटावयास नेत असतां प्रायव्हेट सेक्रेटरीनें पुष्कळशा सूचना केल्या होत्या.  महाराज मला भेटण्याकरतां व्हरांड्यांच्या पायरीवर येऊन उभे होते.  अंगांत घरगुती साधा पोषाख होता.  राजचिन्ह कांहींच नवहतें.  महाराज आंत बसले असतील म्हणून मी भरभर पायर्‍या चढून जाऊं लागलों.  काल भेटलेले इसमच हे असें समजून मी महाराजांचे हात धरून विचारलें ''कां हो तुम्ही कसे येथें'' प्रायव्हेट सेक्रेटरीसह सगळेजण थक्क झाले.  केलेल्या सर्व सूचना व्यर्थ गेल्या.  झालेली चूक चटकन् ध्यानांत येतांच मी सांवरून म्हणालों, ''महाराज, आपण आंत असावयाचें, येथें येण्याची तसदी कां घेतली ?''  बुंदसे गयी तो हौदसे आती नहि.

गोंडलचे महाराज  :   राजकोटास असतांना मी एकदां गोंडलच्या महाराजांना भेटावयास गेलों.  माझ्याबरोबर भगिनी जनाक्काही होत्या.  ही गोष्ट सर भगवतसिंगजींना कळवली नव्हती.  आम्हांस दुरून येतांना पाहून ते चटकन् उठून आंत गेले.  ते आम्ही पाहिले, पण कां ते आम्हांस प्रथम कळेना.  इतक्यांत महाराज आपल्या पत्‍नीला व कन्येला घेऊन बाहेर आले.  त्यांनीं मोठ्या अदबीनें माझ्या बहिणीशीं ओळख करून दिली.  मोठ्या लोकांचा हा रुबाब पाहून आम्हांस फार संतोष झाला.

धेडोने माटे धेडोने माटे  :   काठेवाडांत फिरत असतां एके दिवशीं दोन प्रहरीं एका स्टेशनावर पुढील अनुभव आला.  साधारणपणें आगगाडींत पहिला, दुसरा आणि तिसरा असे वर्ग असत.  क्वचित् ठिकाणीं फक्त युरोपियनांसाठीं म्हणून खास चौथा असामान्य वर्ग असतो.  पण काठेवाडांत 'धेडोने माटे' म्हणजे 'अस्पृश्यांसाठीं' म्हणून मला एक पांचवा असामान्य वर्ग सांपडला. या वर्गांत कांहीं अस्पृश्यांची स्त्री-पुरुषमंडळी गर्दी करून बसली होती.  तिसर्‍या वर्गांत मी होतों.  वेळ भर दोन प्रहरची होती.  इतक्यांत एक पोलीस पार्टी आली.  त्यांनीं अस्पृश्यवर्गीयांना धक्के मारीत खालीं उतरवलें व त्या डब्यांत ऐसपैस पाय पसरून बसले.  धेडांना दुसरीकडे जागा मिळणें अशक्य होतें.  पोलिसापुढें त्यांचा उपाय चालेना.  मला अत्यंत चीड आली.  गार्डाकडे गेलों आणि मीं होत असलेला अन्याय ताबडतोब दूर झाला पाहिजे ''नाहीं तर मी येथल्या येथेंच वरिष्ठांस तारा करून योग्य तो उपाय केल्यास तुम्हांस जड जाईल'' असें सांगितलें.  गार्डाला मी कोण तें स्टेशनवर कळलें.  त्यानें लगेच पोलिसाला खालीं उतरवून अस्पृश्यांची सोय केली.  मला थोडें आश्चर्य वाटलें.  कारण इतर ठिकाणीं मलाच मोठी अद्दल घडली होती.  या ठिकाणीं इतक्या सहजासहजीं मला यश आलेलें पाहून शोध करूं लागलों असतां असें कळलें कीं, हा गार्ड पूर्वाश्रमींचा धेड असून हल्लीं ख्रिश्चन झाल्यानें त्याला गार्डची जागा मिळाली होती.  म्हणून त्यानें आनंदानें माझ्या तक्रारीचा बंदोबस्त केला.  

थूंगांवची परिषद  :  वरिष्ठ वर्गाच्या मोठमोठ्या परिषदा आम्हीं भरवल्या होत्या; पण अमरावती जिल्ह्यांतील थूंगांव येथें रा. गणेश आक्काजी गवई यांनीं एक महार परिषद भरवली होती.  थूंगांव हा गणेश आक्काजी गवईचा राहण्याचा गांव होता.  अकोल्याचे दादासाहेब महाजनी, हरीभाऊ परचुरे व सौ. परचुरे, उमरावतीचे काणे वकील वगैरे बडी बडी १५।२० मंडळी मोठ्या सहानुभूतीनें परिषदेस आली होती.  मी व भगिनी जनाबाई हजर होतों.  आम्ही सर्व मंडळी भर दोन प्रहरीं थूंगांवला पोंचलों.  अमरावतीहून ब्राह्मण आचारी बरोबर घेतले होते.  पण थूंगांवला पोंचल्यावर तेथील सर्व भ्रष्टाकार पाहून हे सर्व आचारी बुजले आणि पळ्या खांद्यावर ठेवून ते परत गेले.  आम्ही आंघोळीस ओढ्यावर जाऊन पाहतों तों पाणी पाय घालण्याच्यासुद्धा लायकीचें नव्हतें.  पिण्यास पाणी जेथें मिळेना तेथें खावयास अन्न मिळालें नाहीं याचें दुःख काय !  परिषदेच्या पाहुण्यांना डाळकुरमुर्‍यांवर भूक शमवावी लागली.  अर्थात् परिषद लवकर आटोपली हें निराळें सांगावयास नकोच.  यावत् तैलं ।  तावत् व्याख्यानम् ॥  संध्याकाळच्या आंतच मंडळींनीं आपापली वाट सुधारली; पण महारवाडा म्हणजे आमचें माहेरघर. गवईंच्या घरच्या मंडळींशीं आमचा दाट परिचय.  महारांचा मोठा भंडारा चालला होता.  गांवोगांवचे महार परिषदेला पुष्कळ जमा झाले होते.  गवईंच्या घरच्या मंडळींनीं पुष्कळ आग्रह करून आम्हांस ठेवून घेतलें.  खेडेगांवचा धुरळा, महारवाड्यांतला उकिरडा आणि वर्‍हाडांतला उन्हाळा.  एक का दोन आम्हांला पुष्कळ प्रेक्षणीय स्थळें पाहण्यास मिळाली.  

दुसरे दिवशीं तिसरे प्रहरीं आम्ही परत निघालों.  मुख्य अनुभव पुढेंच येणार होता.  वर्‍हाडचे छकडे नमुनेदार.  गाडी हांकणारा दांडीवर बसला कीं मागे जेमतेम एकाच माणसाला जागा उरावयाची.  आम्ही दोघे कसेबसे बसलों.  दोन बैल चांगले पोसलेले दणगट होते.  नाकांत वेसणी नव्हत्या.  थूंगांवाहून अमरावती १६ मैल.  मधोमध आठ मैलांवर आल्यावर गाडीचा कणा मोडला.  चाक एकीकडे, बैल एकीकडे व बसणार दुसरीकडे असा प्रकार झाला.  मोडक्या गाडीला बैल बांधून दुसरी गाडी आणण्यासाठीं गाडीवान थूंगांवला गेला.  गाडीची एक चाकाची धांव निखळून पडली होती.  बाळपणची आठवण होऊन ती मी धांव घेऊन चाकासारखी फिरवूं लागलों. धांव बैलाच्या अंगावर गेल्यावर तोहि उधळून थूंगांवला गेला.  रात्रीचा अंधार होऊं लागला.  बर्‍याच वेळानें थूंगांवचे लोक दुसरी गाडी घेऊन आले.  आम्हांला परत थूंगांवला जाऊन जादा पाहुणचार घ्यावा लागला.

मालाडचा लांडगा  :  राजवाडे, महारवाडे ह्यांतच माझे अनुभव संपत नाहींत.  खालील प्राण्यांचेही अनुभव आहेतच. भंगिनी जनाबाई मालाड येथील दयाराम गिडुमल यांनीं निराश्रित स्त्रियांसाठीं काढलेल्या आश्रमांत कांहीं दिवस सुपरिंटेंडेंट होत्या.  हा आश्रम अगदीं जंगलांत होता.  आजूबाजूस मैलभर मनुष्यवस्ती नव्हती.  रखवालदार पुरभैय्याही बाहेर राहण्यास धजत नव्हता.  श्वापदांच्या आरोळ्यांनीं त्याला झोंप लागत नवहती.  अशा वेळीं एका रात्रीं एक भयंकर लांडगा आश्रमाच्या दाराशीं येऊन उभा राहिला.  भय्याची गाळण उडाली.  तो आंत येण्यास गयावया करूं लागला.  त्याच्यासाठीं दार उघडावें तर भय्या आधीं कीं लांडगा आधीं हा प्रश्न उभा राहून आंतील स्त्रिया भीतीनें दार उघडीनात.  त्या मोठमोठ्यानें किंचाळूं लागल्या.  त्या आवाजानेंच लांडगा निघून गेला, आणि जिवावरचा प्रसंग निभावला.  दुसरे दिवशीं दयारामभाईंना निराळी व्यवस्था करणें भाग पडलें.

भोकरवाडींतील गाढवी  :  एका लोणार्‍याच्या गाढवीला पाठीस लाळ पडून अहल्याश्रमाच्या विस्तीर्ण पटांगणांत निचेष्ट येऊन ती पडली.  आश्रमाच्या दवाखान्यांतन तिची शुश्रूषा चालली.  बर्‍याच दिवसांनीं ती बरी झाल्यावर लोणारी तीस परत नेण्यास आला.  गाढवी पूण्र बरी झाली नव्हती व तशांत गाभण असल्यानें ती विण्याचे दिवस जवळ आले होते.  आमच्या मॅटर्निटी होममध्यें तिची दुसरी शुश्रूषा चालली.  तिला एक सुंदर पिलूं झालें.  थोड्यां दिवसांनीं तें उडूं-बागडूं लागल्यावर परिचयामुळें गाढवी माझ्याभोंवतीं फिरूं लागली.  मोठ्या कष्टानें तिची माहेरांतून पाठवणी करावी लागली.

बंड्यां माकड  :  आमचे बंधु एकनाथराव यांच्या एशियाटिक पेट्रोलियम् कंपनीमधील एक अत्यंत खोडकर माकड सर्व नोकरवर्गांस प्रिय झालें होतें.  अनेक चेष्टा करून तें एका प्राणांतिक प्रसंगांतून वांचलें होतें.  एकदां तर तें तेलाच्या टाकींत पडल्यामुळें त्याला मुष्किलीनें वांचवण्यांत आलें.  साहेबलोकांनीं त्याला गोळी घालण्याचा प्रयत्‍न केला होता.  शेवटीं त्याला आमच्या बंधूंनीं घरीं आणून ठेवलें.  तेथेंही त्यानें पुष्कळ प्रताप गाजवले.  शेवटीं तें 'अहल्याश्रमांत' आणण्यांत आलें.  बायकामुलांस त्याचा फार उपद्रव होत असे, पण तें माझ्या संवयीचें होतें.  इतरांच्या खोड्यां करी; पण मी गेलों कीं माणसासारखा सलाम करी.  हिंवाळ्यांत त्याल उबदार पोषाख केला.  पण दुसर्‍या दिवशीं फाडून तो बरगड्यां खाजवीत बसलेलें आढळायचें.  एके दिवशीं तें सुटून पळालें आणि शेजारच्या ख्रिश्चन व ज्यू लोकांच्या घरीं त्यानें मोठा धुमाकूळ माजवला.  मी गेलों तरी हुलकावण्या दाखवून पार होई.  कंटाळून मी घरीं घेऊन बसलों असतां आपण होऊनच माझ्या टेबलावर मला सलाम करीत आला.  जणूं कांहीं झालेला प्रकार त्याला ठाऊकच नाहीं.  शेवटीं ही ब्याद दुसर्‍याला देऊन टाकावी लागली.

मुडबीक्षिचा डॉ. ह्यूम  :   मिशनच्या सुरुवातीला एका ख्रिश्चन इसमास शिक्षकाची नोकरी देण्यांत आली होती.  तो अमेरिकन मिशनमधून आला होता.  लगेच मिशनचे प्रमुख साहेब डॉ. ह्यूम ही तक्रार घेऊन मला भेटण्याला राममोहन आश्रमांत (मुंबईस) आले आणि हुज्जत घालूं लागले कीं, आम्ही ख्रिश्चन लोकांस फूस लावून आमच्या धर्मांत घेतों.  मीं सांगितलें, ''साहेब, त्याच्या अर्जावरून त्याला आम्हीं फक्त शिक्षकाची नोकरी दिली आहे.  त्याचा ख्रिस्ती धर्म अद्यापि कायम आहे.  डॉ. ह्यूम साहेब, आजवर हजारों हिंदु लोकांस तुम्ही ख्रिस्ती केलेंत.  आमच्याकडून कोणी तक्रार घेऊन आलें काय ?  मग आज एकासाठीं विनाकारण इतकी तळमळ कां ?  तो येण्यास तयार असल्यास त्याला तुम्ही खुशाल परत घेऊन जा !''  डॉक्टरसाहेबांची समजूत पटेना.  ''ही तुमची सुरुवात आहे.  मला वेळींच बंदोबस्त केला पाहिजे.  मी अमेरिकन वर्तमानपत्रांत तुमच्या उलट लिहून तिकडून तुम्हांला जी मदत मिळत असते ती बंद करवीन.''  मला हंसूं आवरेना.  ''साहेब, एवढें तुम्ही अवश्य करा.  माझ्या मिशनची अमेरिकेंत फुकट जाहिरात होऊन आजवर नसलेली मदत उलट मिळूं लागेल.''  साहेब निरुत्तर होऊन निघून गेले !

ना. आगाखान  :   ना. आगाखान हा 'कलंकी अवतार' आहे असें सांगून महारमांगांना मुसलमान करण्याची मागें एकदां हूल उठली होती.  भोकरवाडींतील कांहीं मांग कुटुंबांनीं मुसलमानी धर्म स्वीकारला होता अशी अफवा उठली होती.  त्या वेळीं पुणें शहरांत रा. माटे यांची चळवळ चालू होती.  कांहीं जाहीर सभाही धर्मांतर होऊं नये म्हणून झाल्या.  पण पैसे घेऊन धर्मांतर केलेले पुन्हां हिंदु धर्मांत येऊन दाखल झाले.