ट्रस्टींचा गोंधळ
गुप्त कारस्थान : १२ नोव्हेंबर १९२२ रोजीं मातृसंस्थेच्या साधारण सभेनें माझ्या ट्रस्टीशिपविषयीं एक भानगड करून ठेवली होती. ती तिनें मला कळवली नव्हती. ती अशी होती कीं, श्रीयुत बॅ. मुकुंदराव जयकर, रा. लक्ष्मणराव नायक आणि मी हे तिघे ट्रस्टी असतां आमच्याऐवजीं रा. जी. बी. त्रिवेदी, मुंबई, जी. जी. ठकार, पुणें आणि रा. लक्ष्मणराव नायक, मुंबई हे नवीन ट्रस्टी नेमण्याचा ठराव केला होता. बॅ. मुकुंदराव जयकर यांनीं कदाचित् आपल्या ट्रस्टीशिपचा राजीनामा दिला असेल म्हणून त्यांच्या ठिकाणीं जी. जी. ठकार यांची नेमणूक झाली असेल; पण मी माझ्या ट्रस्टीशिपचा राजीनामा दिला नसतांही माझ्याऐवजीं जी. बी. त्रिवेदी ह्यांना ट्रस्टी कां नेमलें हें कळलें नाहीं. माझें नांव ट्रस्टीजमधून काढण्याचा जनरल बॉडीचा ठराव मला जवळ जवळ दोन वर्षे कळवण्यांतही आला नाहीं ह्याचें गूढ तर मला मुळींच कळेना. पुढें मातृसंस्थेनें माझ्याविरुद्ध हायकोर्टांत फिर्याद केली आणि हायकोर्टानें मलाच ट्रस्टी ठेवावें असा अनुकूल निकाल दिला. त्यावर मातृसंस्थेचे जनरल सेक्रेटरी लक्ष्मणराव नायक यांनीं ८ जुलै १९२५ रोजीं नं. ८६ चें सविस्तर खुलाशाचें पत्र पाठवलें. त्यांत असें लिहिलें होतें कीं, मी पुणें शाखा हीच सर्व मिशनचें मुख्य ठिकाण करूं पाहात होतों आणि मुंबई शाखा व बाहेरील सर्व कामें पुण्याहूनच चालवावयाचीं असा माझा प्रयत्न चालला होता. इतकेंच नव्हे तर मुंबई इलाख्याच्या विद्याखात्याच्या तत्कालीन पंचम वार्षिक अहवालांत असा उल्लेखही होता, असें सांगून रा. नायक त्याच पत्रांत म्हणतात कीं, ह्या खोट्या विधानाबद्दल कोण जबाबदार आहे हें कळत नाहीं.
पण ही सर्व माझ्या उलट चाललेली कारवाई, मातृसंस्थेनें १९२२ सालीं मला ट्रस्टींमधून कमी करण्याचा जो ठराव केला त्याच्यापूर्वी जर मला कळली असती, निदान झाल्यावर तरी लौकर कळवली असती तरी मी सलोख्यासाठीं चालवलेले प्रयत्न मातृसंस्थेला कळून तिनें माझ्याविरुद्ध हा ठराव केला नसता. १९२४ सालीं मी मिशन सोडून मंगलोरास ब्राह्म समाजाचे कामासाठीं जाऊन राहिल्यावर मला ट्रस्टींमधून काढलें आहे याची गुणगुण माझ्या कानांवर आली. माझ्या उलट हायकोर्टमध्यें फिर्याद करून माझ्या जागीं नवीन निवडलेल्या ट्रस्टीला कायम करून घेण्याबद्दलचा मातृसंस्थेचा प्रयत्न मला कळला. मी लागलीच जी. बी. त्रिवेदी यांस मित्रत्वाचे नात्यानें तांतडीच्या पत्रद्वारें कळवलें कीं, माझ्या उलट केलेल्या फिर्यादीनें मिशनला धोका आहे, आणि माझ्यावर तर अन्याय होत आहे. एखाद्या ट्रस्टीला ट्रस्टबोर्डवरून कमी करावयाचें असेल तर ट्रस्ट ऍक्टमध्यें सहा कारणें स्पष्ट सांगितलीं आहेत. त्यांपैकीं एकही कारण मजकडून घडलें नसतांना हा उपद्व्याप कां करण्यांत येत आहे ? दुसरा एक स्पष्ट अन्याय असा होत होता कीं, हायकोर्टपुढील खटल्याचें स्वरूप एका बाजूला मिशनसारखी सन्मान्य संस्था ही वादी होती आणि दुसर्या बाजूला मजसारखी एक गरीब व्यक्ति प्रतिवादी होती. मी ट्रस्ट ऍक्ट पूर्णतः जाणत असल्यानें खटला मला अनुकूल होईल असा मला आत्मविश्वास होता आणि तसा जर तो अनुकूल झाला असता तर प्रतिवादी आणि वादीचा खर्च मातृसंस्थेच्या पैशांतून भागवावा लागला असता. पण याउलट जर खटल्याचा निकाल माझ्याविरुद्ध लागला असता तर प्रतिवादी मी एक व्यक्ति आहें म्हणून तो व्यक्तिशः मला द्यावा लागला असता. म्हणून हा खटला करण्याची भानगड उपस्थित होऊं नये म्हणून अत्यंत कळकळीची सूचना रा. त्रिवेदींच्या द्वारें मीं मातृसंस्थेकडे पाठवली; पण शेवटीं खटला करण्यांत आलाच आणि ता. ६ फेब्रुवारी १९२५ रोजीं हायकोर्टाचा निकाला माझ्यातर्फे लागला. तो खालीलप्रमाणें :-
(१) डि. सी. एम. सोसायटी ऑफ इंडिया ह्या मिशनच्या साधारणसभेनें श्रीयुत विठ्ठल रामजी शिंदे आणि गोपाळ गणेश ठकार ह्यांच्याबरोबर काम करण्यास तिसरा ट्रस्टी नेमावा.
(२) १२ नोव्हेंबर १९२२ रोजीं मिशनच्या साधारणसभेनें जे नवीन ट्रस्टी निवडले त्यापूर्वीचे ट्रस्टी बॅ. मुकुंदराव जयकर, रा. नायक, आणि रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी बँकेला लिहून मिशनच्या नांवें असलेले बँकेंतील सर्व रोखे, विठ्ठल रामजी शिंदे व गोपाळ गणेश ठकार आणि हायकोरर््टाच्या हुकुमान्वयें मिशनच्या साधारणसभेनें निवडावयाचा तिसरा ट्रस्टी यांचे नांवें बदलून घ्यावेत.
(३) ह्यासाठीं रा. शिंदे, रा. जयकर आणि रा. नायक ह्यांनीं आपल्याकडे आलेले रोख नवीन ट्रस्टीला देण्यासाठीं बँक सेफ कस्टडीचे रिसीट्स् न मागतां घ्यावेत.
(४) बाँबे पोर्टट्रस्ट आणि ओरियंट क्लबच्या रोख्यांविषयीं अशीच तजवीज व्हावी.
(५) दोन्ही पक्षाचा कोर्टखर्च आणि खटल्याचा इतर खर्च मातृसंस्थेच्या फंडांतून व्हावा.
(६) कारण ह्या खटल्यांत वकिलांचा सल्ला घेण्याची जरूरी होती.
ह्याप्रमाणें ह्या अनिष्ट वादाचा निकाल लागून शेवटीं विनाकारण भूर्दंड मातृसंस्थेला पडणार ही माझी भीति खरी ठरली. पण माझ्या नांवाला विनाकारण कलंक लागण्याचीही आपत्तीहि टळली म्हणून मी हायकोर्टाचा आभारी झालों. पैसा जमवावा कोणी, गोंधळ माजवावा कोणी आणि शेवटीं आभार मानतो कोण ? सर्वच चमत्कार ! जग हें असें आहे.
ह्या कामीं प्रतिवादी या नात्यानें माझ्या बचावाचें काम माझे मित्र रा. कृ. गो. पाताडे यांनीं सर्वस्वीं आपल्यावर घेतलें. मुंबईची लालजी शहा आणि कंपनी ह्यांनीं हें काम रा. पाताडे यांच्या प्रयत्नानें अत्यंत सवलतीनें केलें. वादी ह्यांचे वकील दुभाष आणि कंपनी यांनीं आपला खर्च १००० रु. घेतला तर प्रतिवादीच्या सॉलिसिटर्सनीं ५०० रु. त काम केलें. पण या १५०० रु. ची खोट मिशनच्या माथीं बसली.
अहल्याश्रमाचें उद्धाटन : ता. २८ ऑक्टो. १९२४ रोजीं भोकरवाडींतील अहल्याश्रमाच्या नवीन इमारतीचें उद्धाटन झालें. त्या वेळीं मुंबईचे गव्हर्नर ना. सर लेस्ली विल्सन ह्यांनीं ह्या समारंभाचें अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें. त्यांचें स्वागत करण्यासाठीं आणि मिशनच्या तत्कालिन परिस्थितीसंबंधीं सविस्तर खुलाशाचें भाषण करण्यासाठीं मला मुद्दाम मंगलोरहून पुण्यास बोलावलें. पुण्यांतील मोठमोठी मंडळी समारंभास हजर होती. समारंभ यशस्वी रीतीनें पार पडला.
इमारतींचें नांव पी.डब्ल्यू.डी. खात्यानें सर्टिफाय केलेली रक्कम
रु. आ. पै.
(१) मध्यवर्ती इंग्रजी मराठी प्राथमिक शाळा ३८,९२०-३-४
(२) उद्योग-शाळा २०,१११-१४-८
(३) विद्यार्थी वसतिगृह १४,२९२-१-६
(४) सुपरिंटेंडेंटची राहण्याची जागा १९,१०३-०-६
(५) स्नानगृहें, शौचकूप, ड्रेनेज वगैरे ८,५५१-८-०
(६) कांटेरी कुंपण, दगडी खांब, दरवाजे वगैरे ४,९४५-१५-१०
(७) सरकारी पी. डब्ल्यू. डी. खात्यास दिलेला देखरेखीचा खर्च २,११८-०-०
(८) मिशन एस्टॅबलिशमेंट्स ४,२७५-०-२
--------------
एकूण खर्च - १,१२,३१८-८-०
ह्या इमारतीबद्दल हिंदुस्थान सरकारच्या मार्फत बादशहाच्या ज्युबिली फंडांतून मिळालेले २० हजार रुपये, मुंबई सरकारांतून मिळालेले ६७००० रु. रक्कम इतकी होती. बाकी उरलेली २५,१९७ रु. ८ आ. मिशनच्या फंडांतून देण्यांत आली.