कौटुंबिक उपासनामंडळ
१९२५ च्या एप्रिल महिन्यांत मी मंगलोरहून पुण्यास आलों. त्यापूर्वी १० सप्टेंबर १९२४ रोजीं माझी पत्नी व चि. प्रतापराव व चि. विश्वास यांस घेऊन मुंबईहून पुण्यास अहल्याश्रमांत राहण्यास आली होती. थोडे दिवस सर्वजण एकत्र राहून विश्रांति घेतल्यावर मी भावी धार्मिक कामाची योजना मनांत आंखूं लागलों. अलीकडे बरेच दिवस ब्राह्म धर्माचाप्रचार साधारणपणें बहुजनसमाजांत आणि विशेषतः कुटुंबांत (बायकामुलांत) कसा होईल याची विवंचना मनाला लागली होती. ब्राह्म समाजाची चळवळ म्हणजे सुशिक्षितांत, शहरांत राहणार्यांत आजवर गुंतून राहिली होती. या समाजाची उच्च आणि शुद्ध बुद्धिवादाची शिकवण साध्याभोळ्या बहुजनसमाजाला सहज कळण्यासारखी नव्हती. इंग्रजी आणि संस्कृत न जाणणार्या आणि खेड्यांत राहणार्या लोकांसाठीं ब्राह्म समाजाकडून विशेष प्रयत्न होणें फार मुष्किलीचें होतें; म्हणून आजपावेतों ते फार झाले नव्हते. मग अशा लोकांच्या बायकामुलांसाठी प्रयत्न होणें दूरच राहिलें. म्हणून पुणें येथें तूर्त एक कौटुंबीय योजना मी करूं लागलों. या कामीं भगिनी जनाबाईंचें फार प्रोत्साहन मिळालें. शुक्रवार पेठेत माझे मित्र श्री. बाबुराव जगताप हे जनतेस उच्च शिक्षण देऊन त्यांची उन्नति करण्यासाठीं श्रीशिवाजी मराठा हायस्कूलचें काम आज बरेच दिवस करीत होते. ते आणि त्यांची इतर मित्रमंडळी रा. गणपतराव शिंदे, रामराव ज्योतीराव शिंदे, B.A., LL.B., जेधे, काळभोर वगैरे मराठा समाजाचे पुढारी धार्मिक बाबतींत प्रागतिक विचाराचे हेते. बाबुराव जेधे व पुणें सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. ह्या मंडळींच्या घरीं मी आणि भगिनी जनाबाई जाऊन रविवारीं आणि इतर सुटीच्या दिवशीं ब्राह्म धर्माच्या कौटुंबिक उपासना चालवूं लागलों. बायकामुलांस समजतील अशीं सोपीं भजनें व भक्तिपूर्ण प्रवचनें मंडळींना आवडूं लागलीं. हें काम सुमारें एक वर्ष झाल्यावर आम्ही आपली वस्ती अहल्याश्रमांतून काढून शुक्रवार पेठेंत श्रीशिवाजी मराठा हायस्कूलला लागूनच पश्चिमेस असलेल्या छपरबंद आळींतील माळवदकराच्या वाड्यांत हलविली. ह्या कामांत बरेंच यश येण्याचासंभव दिसूं लागल्यामुळें पुढील जाहीर विनंतीपत्र ता. १६ जून १९२६ रोजीं निघालें. तें असें -
कौटुंबिक उपासना मंडळ
विनंतीपत्र
यं हि किच्चं अपविद्धं अकिच्चं पन कयिरती ।
उन्नलानां पमत्तानां तेसं वङ्ढानि आसवा ॥ धम्पपद अ. २१, श्लो. ३.
अर्थ - जें करावयास पाहिजे त्याचा चुथडा होत आहे. जें करूं नये तें पण केलें जात आहे. उनाड आणि प्रमत्त जे, त्यांच्या वासना वाढत आहेत.
१. हल्लीं लोकसमाजाची स्थिति अत्यंत कींव येण्यासारखी झाली आहे. अध्यात्म म्हणजे काय हें लोकांना कळून त्याची थट्टा उघड उघड चालली आहे. तरुण नास्तिक व वृद्ध निराश झालेले दिसतात. मनुष्याचा मनुष्यावर विश्वास नाहीं. कारण एकच कीं धर्माचा पाया ढांसळूं लागला आहे.
२. धर्माविषयीं विचार अथवा उपासना करावयाची झाल्यास फार तर प्रौढ मंडळीच जमतात. तेही क्वचित. अशा एकांगी विचारांचा आणि उपासनांचा परिणाम कुटुंबावर होत नाहीं, ह्यांत नवल नाहीं. खरी धार्मिक उपासना सहकुटुंबच व्हावयास पाहिजे. म्हणून खर्या श्रद्धेनें व प्रेमानें प्रेरित झालेली मंडळी नियमितपणें उपासनेसाठीं एकत्र होणें आवश्यक आहे.
३. धर्म म्हणजे केवळ मत नव्हे. तत्त्वज्ञान किंवा ब्राह्म कर्मेहि नव्हत. धर्म ही बाब अंतःकरणाची व भावनांची आहे, म्हणून धर्माचा उदय आणि प्रसार कुटुंबाचे द्वारां होणेंच उचित आहे. तसें इतिहास सांगत आहे. कुटुंब म्हणजे केवळ बायकोच नव्हे. आईबाप, बहीणभाऊ, नवराबायको, मुलें ह्यांच्या प्रेमाचें केंद्र म्हणजे कुटुंब. हेंच धर्माचरणाचें व प्रसाराचें क्षेत्र. केवळ व्यक्ति नव्हे.
४. वरील गोष्टी ध्यानांत आणून अशा स्वतंत्र शुद्ध कार्यकारी उपासनेची एक घटना करण्याची मंडळाची इच्छा आहे. ज्यांना हा उद्देश पटतो त्यांनीं ह्या घटनेंत सहकुटुंब यावें, असें आमंत्रण आहे. ज्यांना हा उद्देश पटतो त्यांनीं ह्या घटनेंत सहकुटुंब यावें, असें आमंत्रण आहे. ज्यांना कुटुंबच नसेल त्यानें एकटें आल्यास चालेल; पण तो अथवा ती सभासद होऊं शकणार नाहीं. कोणाचीं खाजगी गतें अथवा कौटुंबिक परंपरा कशा आहेत हें पाहण्याची व तीं कशीं असावींत हें ठरवण्याची मंडळाची इच्छा नाहीं व अधिकारही नाहीं. प्रत्येकाचें अंतर जाणणारा ईश्वर समर्थ आहे. एकमेकांच्या अंतरांत डोकावण्यापेक्षां व वर्तनाविषयीं साशक राहण्यापेक्षां सर्वांनीं एकत्र जमून चित्तशुद्धि करणें म्हणजेच उपासना होय.
५. कुटुंबें कोणत्याही दर्जाचीं, जातीचीं, राष्ट्रांचीं, अगर धर्माचीं असोत, अथवा ह्यांपैकीं कोणतीही उपाधि नसलेली असोत. तिकडे पाहण्याचा मंडळाचा अधिकार नाहीं. मंडळांत येणार्यांना उपासनेसंबंधीं खरी श्रद्धा आणि कळकळ पाहिजे आणि ती नियमितपणा, वक्तशीरपणा, स्थिरपणा आणि शांतपणा ह्या गुणांच्या द्वारांच दिसून आली पाहिजे. एवढीच मंडळाची शर्थ आहे.
६. मंडळाचा सर्व विचार आणि व्यवहार केवळ बहुमतानें ऐहिक कार्याप्रमाणें चालणार नाहीं. योग्यायोग्यतेनुरूपच निकाल व अंमलबजावणी होईल.
कृष्णराव गोविंदराव पाताडे,
सेक्रेटरी कौ. उ. मंडळ, पुणें.
घ.नं. २९६ शुक्रवार पेठ, पुणें.
प्रथम ६ महिन्यांचा वृत्तांत
पुणें येथें हें मंडळ सुरू होऊन आज सहा महिने पुरे झाले. ह्यांत सुमारें १०।१२ कुटुंबें सभासद झालीं आहेत. पुणें शुक्रवार पेठेंतील श्रीशिवाजी हायस्कुलांत मंडळाच्या सार्वजनिक साप्ताहिक उपासना व प्रासंगिक कीर्तनें होत असतात. अशा ३० उपासना व पांच कीर्तनें झालीं. शिवा रा. रा. अण्णासाहेब शिंदे, काळभोर, जेधे, जगताप आणि लाड ह्यांचे घरीं कौटुंबिक उपासना झाल्या त्या वेळीं स्त्रियांच्याच केवळ २३ संगत सभा झाल्या. साप्ताहिक उपासनेच्या वेळीं श्रीशिवाजी बोर्डिंगांतील विद्यार्थी हजर असत. आणि स्त्रियांच्या सभांतून सभासद नसलेल्या कुटुंबांतून देखील बर्याच स्त्रिया आपल्या सुना-लेकींसह हजर असत. मंडळाचे उपासनेंत किंवा कोणत्याही कामांत जातींचा किंवा धर्माचा भेद मुळींच पाडण्यांत येत नाहीं. अर्ध वर्ष येणेंप्रमाणें ईश्वरकृपेनें निर्विघ्नपणें काम झालें. म्हणून मंडळानें २६ डिसें. १९२६ रोजीं रविवारीं हा सर्व दिवस गांवाबाहेर मुठा नदीचे कांठीं विठ्ठलवाडीजवळील आंबराईत आध्यात्मिक उत्सवांत घालविला. तेव्हां सकाळी ६ पासून सायंकाळीं ६ पर्यंत भजन, प्रार्थना, उपदेश, संभाषणें आणि सहल इत्यादि कार्यक्रम व्यवस्थेनं पार पडला. त्यांत लहानथोर स्त्री-पुरुष सुमारें ५० जणांनीं भाग घेतला होता. गेल्या सहा महिन्यांतील कामाप्रमाणेंच हा शेवटचा एक दिवसाचा उत्सवही श्री. अण्णासाहेब शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखालीं सुरळीतपणें साजरा झाला. अशा प्रसंगास वनोपासना म्हणण्यांत येतें. मंडळ ईश्वराचें आभारी आहे.
कोणत्याही जातीच्या व धर्माच्या कुटुंबाला मंडळाचें सभासद होतां येतें. आपले स्त्री-पुरुष आप्त असतांना एखाद्या स्त्रीस किंवा पुरुषास तुटकपणें व्यक्तिशः सभासद होतां येत नाहीं. मंडळ व्यक्तीचें नसून कुटुंबाचे आहे. तथापि सहानुभूति असल्यास एखाद्या आप्त नसलेल्या व्यक्तीसही मंडळाचा आध्यात्मिक फायदा घेण्यास हरकत नाहीं.
गणपतराव बापूजी शिंदे
पुणें, पेठ शुक्रवार, घ.नं. २९६
ता. १ जानेवारी १९२७
जिजाई ऊर्फ अवलाई : ता. २१ जुलै १९२६ रोजीं आषाढी महाएकादशी आली होती. त्या दिवशीं रात्रीं ८ पासून १२ पर्यंत शिवाजी हायस्कूलमध्यें माझें हरिकीर्तन झालें. श्रीतुकाराम महाराजांची पत्नी जिजाऊ ह्यांचे आख्यान लावण्यांत आलें होतें. प्रपंचामध्यें पुरुषांबरोबर स्त्रियांचें सहकार्य बिनबोभाट चाललेलें असतें. पुरुष ध्येयवादी असला तर बायका व्यवहारवादी असतात. मोठमोठे पुरुष कर्तबगारीनें व्यावहारिक आणि अध्यात्मिक विषयांत पुढें येतात; पण त्यांच्या बायका सुशिक्षित म्हणून नांवाजल्यामुळें त्यांनीं केलेले सहकार्य जगाच्या नजरेंत भरत नाहीं. तुकाराममहाराजंची पत्नी जिजाऊ ही कजाग होती, म्हणून तुकाराममहाराजांच्या तुलनेनें जिजाऊची जो तो निंदा करीत असतो. ह्या अन्यायाचें निराकरण अंशतः तरी व्हावें म्हणून मीं हें खालील पद मुद्दाम रचून त्याचें निरूपण आख्यानांत केलें.
अवलाईची नवलाई
(एक उपनिषद)
पद :- (चाल - चला चला गड्यांनो जाऊ चला)
अशी कशी तुक्याची अवलाई । ऐका तो तिची नवलाई ॥ घ्रु ॥
भजनीं असतां भांडभांडते । संत आलिया वसवस करिते ॥
विठुला ''काळ्या, वैरी'' म्हणते । भली तिची ती मंगळाई ॥
काय ही नवलाई ॥१॥
खुद्द पुण्याचा अपपा चुव्वा । अस्सल मराठा माणूस बरवा ॥
साहुकार जगजाहिर सर्वा । कन्या त्याची जीजाई ॥
कीं अवलाई ॥२॥
तरुण तुकोबा शेठ समर्थ । संसारीं अंतरीं विरक्त ॥
परंपरेचा विठ्ठलभक्त ॥ बाइल त्याची दुसरी ही
ही नवलाई ॥३॥
दोन बाइला त्यां समवेतां । साधित असतां इहपर वृत्ता ॥
दुकाळ आला पुढें अवचितां । पहिल मेली रखुमाई ॥
राहिली अवलाई ॥४॥
तुक्याचे घरीं दिवा घ्या दिसां । अवली घरि तरी धीर भरंवसा
कर्ज काढिलें रुपये दहाविसा । अबला असूनी सबला ही
आईका नवलाई ॥५॥
तुक्या बैसला भंडार्यावर । पोट उपाशी, भजनीं निर्भर
अवलि हुडकने तया घरोघर । त्याविण न शिवे पाण्याही
विसरे अबोलाही ॥६॥
कोंडाकळणा भाकर मळली । भंडार्यावर त्वरित निघाली ॥
भर दुपारां तहान लागली । परि थांबेना ती बाई ॥
जाहली कशी घाई ॥७॥
तीक्ष्ण सडाने पाय विंधिला । वाहुं लागलें रक्त भळाळा ॥
भोंवळली, पडली धरणीला । ब्राह्मज्ञानी पति पाही
जिंकिलें त्यालाही ॥८॥
मोक्षाहुनिह प्रपंच बांका । तुक्या येतसे नवा अवांका
अवली झाली प्रति-सहायिका । उघडे त्याचा डोळाही
पहा हो नवलाई ॥९॥
तुकया आम्हां सर्वा संत । परि तुकयाला अवली संत ॥
नसे तियेला त्याची खंत । सोडूनि गेला तरि राही ॥
तीच ती अवलाई ॥१०॥
इतर सती त्या चितेंत जळल्या । संसाराच्या ज्वाळा गहिर्या ॥
अवलीनें पण त्याही गिळल्या । डगमगली ना केव्हांही ॥
कशी मग अबला ही ॥११॥
तुका पळपुटा, अवली वीटा । कर्मयोगी सत्याग्रही स्पष्टा ॥
पंढरिचा विठु केला खोटा । खरी ठरविली मंगळाई ॥
घ्या मनीं नवलाई ॥१२॥
परब्रह्म तें सुखीच राहे ॥ प्रपंच परि हा कठीण आहे
ह्या सगुणामधिं निर्गुण पाहे ॥ शिकविते अ, आ, ई ॥
ब्रह्मज्ञान्यांही ! ॥१३॥
आम्हि तुकाब्बा सदैव वंदूं । परि अवलाई कधीं न निंदूं ॥
हा तियेचा ॠणानुबंधु ॥ जगीं पसरो आख्याई
मागणे लइ नाहीं ॥१४॥
प्रकृतिपासुन पुरुष जन्मला । भोगुनि तिजला जागा झाला ॥
पुन्हां निगुणीं झोपीं गेला । बाइल त्याची ती आई
संपली नवलाई ॥१५॥
श्रीशिवनेरी जीर्णोद्धार कमिटीतर्फे श्रीशिवरायाचें जन्मस्थान जुन्नर येथें शिवनेरी किल्ल्यावर श्रीजिजामाता स्मारक होत आहे. त्यांत सर्व जातींच्या स्त्रियांनीं विशेषतः महाराष्ट्रांतील स्त्रियांनीं आस्थेनं भाग घ्यावा म्हणून कौटुंबिक उपासना मंडळामार्फत मीं प्रयत्न करावेत म्हणून कमिटीनें विनंती केली. त्यासाठीं ता. १३-८-१९२७ रोजीं पुण्यांतील सर्व जातींतील स्त्रियांची मोठी जाहीर सभा पुणें येथील श्रीशिवाजी हायस्कुलांत भरविण्यांत आली. त्या वेळीं प्रथम माझें कीर्तन झालें. आख्यान जिजामातेचें लावलें होतें. शाळेचा ड्रॉइंगहॉल स्त्रियांनीं चिकार भरून गेला. जागा नसल्यामुळें पुरुषांची निराळी सभा भरवावी लागली. स्मारकास मदत म्हणून आरतीमध्यें रुपये, नोटा टाकण्यासाठीं बायकांची मोठी गर्दी झाली. रुपयांची पोंच देण्यालाहि कठीण पडूं लागलें. म्हणून देणग्या स्वीकारण्याचें काम बंद ठेवावें लागलें. स्त्रियांची एक खास कमिटी करून वर्गणी जमविण्याचें काम पुढें ढकलण्यांत आलें. जागच्याजागीं आरतींत २००हून अधिक रक्कम जमली. या वेळीं मीं केलेला फटका म्हणण्यांत आला.
फटका
ऐका हो साजणी बायांनो, नवलाचा गातों फटका ।
नउ लाखांचा माझा फटका, घटकाभर लाविल चटका ॥घ्रु.॥
जिकडे तिकडे म्लेंच्छ मातला, हिंददेवी विधवा झाली ।
स्वराज्यसौभाग्याचें कुंकुं, पुसिलें अवकळा आली ॥
धर्म बुडाला, न्याय बुडाला, दुकाळ पडला दारुण ।
प्याया नसे पसाभर पाणी, कोठुन दाणावैरण ॥
दुःख दैन्य दारिद्रय पसरलें, जुलुमाचें चहुदिशीं रान ।
शत्रुमित्र सर्वत्र उदासिन, पुसे न कोणाला कोण ॥
महाराष्ट्राचा धर्म पुरातन, तोही झाला कीं लटका ।
नऊ लाखांचा फटका माझा घटकाभर लाविल चटका ॥१॥
सह्यचलाच्या खाकेमध्यें शिवनेरचें वारूळ ।
त्यांत एक नागीण बैसली, पिलूं तिचें कर्दनकाळ ॥
काळाचा वरवंटा फिरला, नाग लागला देशघडी
परि धीराची ढाल जणूं का नागिण वारुळ ना सोडी ॥
यवन गारुडी खोट्या नादें फितवाया तिजला टपला ।
स्वजन बाटले, बापहि फितला, नागिण जातीची चपला ॥
ध्यास तियेनें मर्नी घेतला, कधीं कशी होईल सुटका
नऊ लाखांचा फटका माझा, घटकाभर लाविल चटका ॥२॥
स्वातंत्र्य मंत्र जादूनें आपुल्या पिलास शिकवी भाराया ।
गडी मावळे साधे भोळे महाराष्ट्र-भू ताराया ॥
तुळजाई जणूं सजीव झाली राष्ट्रभूमिला रक्षाया ।
सह्याद्रीचे वेंचक मणके मागुं लागली भक्षाया ॥
पाषाणाच्या नैवेद्यावरि तृप्त न होतां फुरफुरली ।
दुष्मानाच्या महाबळीवर काळनजर तिची फिरली ॥
अफझुल्लासम मेष मातले, क्षणांत करवियला झटका ।
नइ लाखांचा फटका माझा घटकाभर लाविल चटका ॥३॥
गोदावरि कावेरी शिवेचें दंडकारण्य आवरिलें ।
हिंदुपदाचें गळित छत्र तें उजळ करोनी उद्धरिलें ॥
भटीं भिक्षुकीं यवन कीटकीं आक्रमिला क्षत्रियभानू ।
खुला करुनिया महाराष्ट्राचें प्रकाशिलें सारें गगनू ॥
तीन विसावरी दोन शतक वरुषें अवतार जिजानामा ।
महाराष्ट्राचा श्वासोश्वासहि व्यापुनि परते निजधामा ॥
महाराष्ट्रमायेचा कथिला संक्षेपानें हा चुटका
नऊ लाखांचा माझा फटका घटकाभर लाविल चटका ॥४॥
माझ्या कीर्तनांतून नेहमीं भक्तिज्ञानपर, धार्मिक किंवा सामाजिक असे विषय असतात. पण केव्हां केव्हां सामान्य बायकांना, विशेषतः मुलांना कळण्यासाठीं त्यांचें विवेचन विनोदपरहि असतें. ता. २९-८-२६ रोजीं कृष्णजन्मानिमित्त जेधे मॅन्शनमध्यें कीर्तन झालें. विषय 'आजकालच्या सुधारणेचें दिवाळें' हा होता. तेव्हां मीं स्वतः रचलेली प्रासंगिक लावणी महणून दाखवली. जुनी श्रद्धा व नवीन सुधारणा यांचा हा झगडा आहे. वरून दिसण्यांत ग्राम्य पण आंत विषय खोल असा आहे.
जुन श्रद्धा व नवीन सुधारणा यांचा संवाद
(मला मुंबईला जायचें - या चालवर)
श्रद्धा :- अगे नवीनारी ! तूं चाललीस कुठं ? जरा थांब ना ॥ध्रु.॥
सुधारणा :- ताई, झाल कशि घाई, वेळ बोलायाची काइ, तुला ठावं कसं न्हाइ,
मला जायचं सेवासदना ॥१॥
श्रद्धा :- वरखालीं झकपक, मागें पुढें टकमक, अशि कशी बहिर्मुख,
अंतरीं वाइच तरी बघ ना ॥२॥
सुधारणा :- झालें परीक्षा पास, मतें मिळालीं खास, नेहरूदास,
उद्या कौन्सिल उघडेल बघ ना ॥३॥
श्रद्धा :- नाक नाहीं तिथं, वरी करी काई नथ, नुसती चोळी नाहीं हात
खालीं डोळे, ना, वरती चष्मा ॥४॥
सुधारणा :- मी युरोपला जाय, घरीन राष्ट्रांचे पाय, लोकसत्तेचा जय
मग तरी म्हणशिल होय ना ? ॥५॥
श्रद्धा :- १ पोर नेसली दाट, म्हून विसरली वाट, ही नवी वहिवाट,
कशी भटकते रानोराना ॥६॥
१ पोर भपकेदार लुगडें नेसली, म्हणून वाट विसरली.
वार्षिकोत्सव : रविवार ता. १७ जुलै १९२७ रोजीं मंडळाचा वार्षिकोत्सव श्रीशिवाजी हायस्कुलांत सर्व कुटुंबांना एक दिवसभर जमवून साजरा करण्यांत आला. कोल्हापुराहून रा. गोविंदराव सासने व जळगांवहून सौ. आनंदीबाई शिर्के हे खास निमंत्रणावरून आले होते. सकाळीं उपक्रम उपासना रा. बाबूराव जगताप यांनीं चालविली. ९॥ वाजतां सकाळीं चहा, नंतर सहल, १२ वाजतां सहभोजन, ३ वाजतां मुलामुलींचे बैठे खेळ, सायंकाळीं ५॥ वाजतां जाहीर सभा वगैरे कार्यक्रम झाले. गणपतराव शिंदे, गोविंदराव सासने, सौ. आनंदीबाई शिर्के, नाशिकचे भिकाजी नारायणराव गोडसे ह्यांचीं विचारपूर्ण व्याख्यानें झालीं. अस्पृश्य कुटुंबासह सर्व मंडळींनीं भेदभाव न बाळगतां सहभोजनांत भाग घेतला. सुमारें १०० हून अधिक पानें पडलीं होतीं.
ह्यापूर्वी १९२७ च्या एप्रिल महिन्यांत पुणें प्रार्थना समाजाचा ५६ वा वार्षिकोत्सव झाला. ह्या वेळीं मुंबईहून बरीच पाहुणेमंडळी आली होती. त्या समाजाचा व ह्या मंडळाचा परस्पर स्नेह व परिचय वाढावा म्हणून शुक्रवार ता. २२ एप्रिल १९२७ रोजीं कौ. उ. मंडळाच्या सर्व सभासदांनीं हिराबागेजवळील पुरंदरे यांच्या बागेंत सर्व दिवस वनोपासनेंत घालवला. सकाळीं ८ वाजतां डॉ. ग. य.चिटणीस यांनीं उपासना चालवली. तिसरे प्रहरीं श्रीशिवाजी हायस्कुलांत माझें व्याख्यान झालें. ह्या वेळीं मी ब्रह्मदेशांतून नुकताच आलों होतों. ब्रह्मदेशांतून आणलेल्या नवन चिजा दाखवून त्यांवर मीं सप्रयोग भाषण केलें.
वैशाख शुद्ध पौर्णिमेस श्रीगौतमबुद्धजयंति व ता. २५ डिसेंबर रोजीं ख्रिस्त जयंति ह्या मंडळाकडून गांवाबाहेर वनोपासना करून आतांपर्यंत साजर्या करण्यांत आल्या. बुद्धजयंतीला दोनदां प्रो. धर्मानंद कोसांबी ह्यांचा लाभ घडला. कलकत्त्याच्या ब्राह्म समाजाच्या शतसांवत्सरिक उत्सवाप्रीत्यर्थ अमेरिका व इंग्लंड वगैरेकडील स्त्रीपुरुष पाहुणेमंडळी, डॉ. आणि मिसेस् साउथवर्थ (चिकॅगो), मिसेस् वुडहाउस व मिस् नेट्लफील्ड ह्यांचा जाहीर सभा व संमेलनें करून सत्कार करण्यांत आला.
१९२७ सालांत ऑगस्टपासून डिसेंबरअखेर ५ महिने भगिनी जनाबाई शिंदे यांनीं श्रीशिवाजी शाळेंत मुलांमुलींचा विशेशतः मुलींचा एक गायनवर्ग चालवला. उपासनेंतील भजनें मुलांना शिकवण्याचा मुख्य उद्देश होता. मुली नियमानें येईनात, म्हणून हा वर्ग बंद करण्यांत आला.
मंडळाचें काम बाहेरगांवीं व्हावें म्हणून ब्राह्म समाज शतसांवत्सरिकानिमित्त १९२७ जुलै व त्यानंतर मीं कोल्हापूर, सातारा व अहमदनगर वगैरे ठिकाणीं सफरी काढल्या. बरोबर सातार्यापर्यंत गणपतराव शिंदे व बेळगांव, निपाणी, गडहिंग्लज वगैरे ठिकाणीं रा. कृ.गो. पाताडे आले होते. अहमदनगरच्या प्रा. स. च्या उत्सवांत रा. गणपतराव शिंदे तीनदां व रा. बाबूराव जगताप दोनदां आले होते. १९३१ सालीं अहमदनगास अहल्याबाई शिंदे (सौ. गणपतराव शिंदे) ह्या भगिनी जनाबाई शिंदे ह्यांचेबरोबर आल्या होत्या. कोल्हापूर येथें कौ. उ. मंडळाची स्थापना होऊन डॉ. कृष्णाबाई केळवकर, रा. भगवंतराव बारटक्के आणि विशेषतः रा. गोविंदराव सासने ह्यांच्या चिकाटीनें ह्या मंडळाचें काम १९२८ सालीं सुरू होऊन कांहीं वर्षे चाललें होतें.
१९३० सालापर्यंत हा कार्यक्रम व्यवस्थितपणें चालला होता. १९३० सालीं मे महिन्यांत मीं कायदेभंग केल्यावरून मला ६ महिने कारावास घडल्यानें वरील कार्यक्रमांतील बरींच कामें बंद पडलीं. तथापि साप्ताहिक उपासना, पाहुण्यांचें स्वागत, वनोपासना वगैरे कामें अद्यापि सुरळीत चालू आहेत. १९३६ सालीं मी वेताळ पेठेंतील माझें भाड्यांचें घर सोडून शिवाजीनगर वसाहतींत माझ्या स्वतःच्या घरीं येऊन राहूं लागलों. त्या वेळीं कौ. उ. मंडळाची भांबुर्डा उर्फ शिवाजीनगर शाखा नवीन उघडण्यांत आली. प्रथम प्रथम ह्या मंडळाच्या उपासना प्रो. वि. के. जोग ह्यांच्या घरीं होत. प्रो. जोग वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपॉल होऊन त्या कॉलेजांत राहूं लागल्यापासून ह्या उपासना 'राम-विहार' ह्या माझ्या राहत्या घरांत होऊं लागल्या असून त्या अद्याप चालू आहेत. पण मंडळाचें काम अशा दोन शाखांमधून विभागल्यामुळें आणि माझें वार्धक्य आणि आजार यांमुळें ह्या मंडळाचें काम हल्लीं फार थोड्यां प्रमाणावर चाललें आहे.