दुष्काळ व इतर कामें
दुष्काळाची आपत्ति : निवडणुकीची दंगल संपते न संपते तोंच दुसरी एक मोठी आपत्तिही येऊन पडली. पुणें येथील डी. सी. मिशन शाखेचे सेक्रेटरी श्री. कृ. गो. पाताडे यांनीं १९२१-२३ सालचा जो अहवाल प्रसिद्धिला आहे, त्यांत पान ४१ वर खालील मजकूर आहे :-
''१९२० सालीं नगर व पुणें जिल्ह्यांतील कांहीं तालुक्यांतील दुष्काळामुळें कसेंही करून प्राण वांचवावें ह्या हेतूनें अस्पृश्यवर्गाची-मुख्यतः मातंग (मांग) जातीची सुमारें १००० मंडळी त्या सालच्या हिंवाळ्यांत आमच्या मिशनच्या मैदानांत येऊन दाखल झाली. सदर मंडळींजवळ कपडालत्ता, खावयास अन्न किंवा राहण्यास जागा यांचा अभाव असून, कडक हिंवाळ्यामुळें जे आजारी पडूं लागले व कांहीं मृत्यूही पावले. ही गोष्ट रा. वि. रा. शिंदे ह्यांच्या नजरेस येतांच त्यांनीं व रा. जी. जी. ठकार यांनीं या सर्व कुटुंबांची पाहणी करून प्रथमतः मिशनतर्फे अल्प मदत देण्यास सुरुवात केली.
पण तेवढ्यानें भागणार नाहीं असें दिसतांच पुणें शहर म्युनिसिपालिटीच्या दिवाणखान्यांत एक जाहीर सभा श्री. एल. जे. आपटे (म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष) यांचे अध्यक्षतेखालीं भरून त्यांचेच अध्यक्षतेखालीं दुष्काळ-आपत्तिनिवारक कमिटी स्थापन करून तिच्या स्वयंसेवकांतर्फे धान्य, कपडे, पैसे जमवण्यास जोरांत सुरुवात झाली. मदत जमविण्याचे निरनिराळे सहा सेंटर्स ठरविले होते. दुष्काळग्रस्तांस राहण्यासाठीं एक विस्तृत मांडव आणि कच्च्या भिंतीची एक चाळ बांधण्यांत आली. धट्टयाकट्टया माणसांसाठीं सदर मांडवांत दिवसा तागाच्या आणि वाखाच्या दोर्या वळण्याचा कारखाना सुरू करण्यांत आला. मुलें आणि वृद्ध माणसें ह्यांना ज्वारी, बाजरी व तांदूळ फुकट देऊन अगदीं अनाथांना तर स्वयंपाकही तयार करून वाटण्यांत येत असे. औषधपाणी व कपडे मिळतील तसे दर दिवशीं क्रमानें वाटण्यांत आले. असि. कलेक्टर श्री. जी. टी. गॅरेट. I.C.S. व मध्यभाग कमिशनर मि. प्रॅटसाहेब ह्यांनीं दुश्काळग्रस्तांची कमिटीच्या विनंतीवरून समक्ष पाहणी करून मिशन पसंत करील त्या गरीब लोकांना आठवड्यांतून दोन वेळां तांदूळ, बाजरी, ज्वारी फुकट वांटण्याचें (डोल) काम सुरू केलें. गॅरेटसाहेबांच्या आज्ञेनें शहरमामलेदार मि. देशपांडे हे स्वतः डोल वांटीत त्या वेळीं मिशनचे अधिकारी समक्ष हजर राहून शिफारस करीत.
असोसिएटेड प्रेस व बॉम्बे क्रॉनिकलच्या बातमीदारांनीं व मुंबईचे शेठ एल. आर. तेरसी ह्यांनीं वेळोवेळीं सर्व प्रकार समक्ष येऊन पाहून कमिटीला फार उत्कृष्ट मदत केली.
ता. १५।३।२१ रोजीं कमिटीतर्फे मदत वांटण्याचें काम बंद करून त्याच दिवशीं डॉ. एच. मॅन् ह्यांच्या अध्यक्षत्वाखालीं जाहीर सभा करून कमिटीचा अहवाल वाचण्यांत आला व ती कमिटीही बरखास्त करण्यांत आली. सदर कमिटी आणि शेठ तेरसी यांचे, त्याचप्रमाणें दुष्काळग्रस्त आजार्यांना तपासून दररोज तास दोन तास येऊन मोफत काम करणारे डॉ. यमकनमर्डी आणि त्यांचेबरोबर नर्सिंगचें काम करणार्या भगिनी जनाबाई, डॉ. गोखले, डॉ. मुदलियार, डॉ. पळसुले यांचे आभार मानण्यांत आले. पुणें गर्ल्स हायस्कूलच्या लेडी सुपरिंटेंडेंट मिस. एच. एम. फील्डिंग, मिस् नवलकर, श्रीमती वारूताई शेवडे (हिंगणें बुद्रुक), सौ. सुंदराबाई ठकार यांनींही फार अमोल कामगिरी केली. केसरी व ज्ञानप्रकाश ऑफिस, फ्री मराठा बोर्डिंग येथील स्वयंसेवक, पुणें सोमवंशीय समाज, डेक्कन व भारत व्हॉलंटियर कारे आणि व्यक्तिशः श्री. एस. एम. माटे, बाबूराव जेधे, एस. सी. दरंदले, (ट्रेनिंग कॉलेज, पुणें) व्ही. आर. गद्रे, बी. डी. वायदंडे व गावडे आदिकरून मंडळींनीं जें साहाय्य केलें त्याबद्दल मिशन फार आभारी आहे.''
विशेषतः माझे मित्र लक्ष्मीदास रावजी तेरसी ह्यांनीं वेळोवेळीं क्रॉनिकल वगैरे पत्रांत लिहून मुंबईहून हजारों रुपयांची मदत पाठवली आणि आपल्या गिरणीवाल्या मित्रांकडून नव्या कापडांचे गठ्ठेच्या गठ्ठे पाठविले. त्यामुळें व सरकारनें दिलेल्या धान्याच्या मदतीमुळें ह्या हजारों गरीब जीवांचें रक्षण झालें. ह्या मदतीमुळें भोकरवाडी येथील गरीब लोकांच्या मनावर मिशनविषयीं फार अनुकूल परिणाम झाला. म्हातारीं माणसें आणि लहान मुलें पुढें कित्येक वर्षे ह्या सत्कृत्याची आठवण डोळ्यांत आंसवें आणून करीत होतीं.
कृष्णराव भाऊराव बाबरकृत 'कर्मवीर विद्यार्थी' या पुस्तकांतील ८८ पानावर खालील मजकूर आहे.
होलिकासंमेलन : ''शिमग्याच्या सणाला रूढीमुळें जें वाईट स्वरूप आलेलें आहे तें नाहींसें व्हावें म्हणून कर्मवीर विठ्ठलराव यांनीं १९०७ सालापासून प्रयत्न चालविले होते. हल्लीं या सणाला शहरांतून व पुष्कळ खेड्यांपाड्यांतून बरेंच चांगलें स्वरूप प्राप्त झालें आहे. ३० वर्षांपूर्वीच्या व आत्तांच्या शिमग्यांत फारच फरक पडला आहे हें कोणीही म्हातारा मनुष्य कबूल करील. शिमग्याच्या सणाला आलेलें हिडिस स्वरूप धर्माला अनुसरून नाहीं आणि या गलिच्छ पद्धतीनें हिंदु माणसांची नीति बिघडते व राष्ट्राचीही परदेशांत नाचक्की होते हें लोकांना समजावून सांगण्यासाठीं सन १९०७ सालीं कर्मवीर विठ्ठलरावांच्या प्रयत्नानें मुंबईस पहिली सभा भरली. अध्यक्षस्थान सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर यांनीं सुशोभित केलें होतें. ग्लोब मिलच्या मैदानांत सभा झाली. खालच्या जातीचे लोक व मजूर यांच्यासाठींच मुख्यतः ही सभा होती. कारण शिमग्यांतील वाईट गोष्टींचा हे लोकच पुरेपूर फायदा घेत होते. दारूसारख्या नाशकारक पदार्थाचें सेवन करणें, अंगाला शेण-राख फांसून विद्रूप बनणें आणि ऐकुं नयेत असले वाईट शब्द तोंडानें काढणें इत्यादि प्रकार या सणांत प्रामुख्यानें घडत. म्हणूनच विठ्ठलरावांनीं या होलिकोत्सवाचे विरुद्ध चळवळ केली. ही चळवळ पुढें सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीनें सोशन सर्व्हिस लीग नांवाची निराळी संस्था स्थापून रा. नारायण मल्हार जोशी यांचे मार्फत चालविली. पुण्यास आल्यावर १९१३ सालापासून कर्मवीर विठ्ठलरावांनीं या चळवळीकडे जास्तच लक्ष दिले. या सालीं त्यांनीं पुण्यास किलोस्कर थिएटरांत एक जंगी सभा भरविली. त्या वेळीं मिरजेचे अधिपति बाळासाहेब पटवर्धन यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें. फर्ग्युसन व शेतकी कॉलेजांतील प्रोफेसर्स व विद्यार्थी ह्यांनीं ह्या सभेंत प्रामुख्यानें भाग घेतला होता. पुढें सालोसाल हा प्रयत्न चालू ठेवून विठ्ठलरावांनीं अखिल महाराष्ट्रांत ह्या चळवळीचा प्रसार केला. मुंबई इलाख्याचे विद्याधिकार्यांची भेट घेऊन खेड्यांपाड्यांतील शाळांमास्तरांपर्यंत या पद्धतीचें लोण पोंचवण्यांत आलें आहे. हल्लीं प्रत्येक शाळेमार्फत शिमग्याच्या सणाचे वेळीं मुलांकरवीं सभा भरवून भाषणें व संवाद करवून आणि मर्दानी खेळ करवून शिमग्याच्या सणाला चांगलें स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळें मोठ्या माणसांवरही चांगला परिणाम झालेला दिसून येत आहे.''
सदर पुस्तकांतील पान २५ वर खालील मजकूर आहे.
सक्तीचें शिक्षण : '१९१९ सालीं पुण्यास सक्तीच्या शिक्षणाची मोठी चळवळ झाली. ह्या चळवळींतहि कर्मवीर विठ्ठलरावांनीं प्रामुख्यानें भाग घेतला होता. पुणें म्युनिसिपालिटीतर्फे प्राथमिक शिक्षण सक्तींचें करण्याबाबत चर्चा चालू होती. पण तूर्त मुलांपुरतेंच सक्तीचें शिक्षण चालू करावें, मुलींचा इतक्यांत समावेश करूं नये, अशा प्रकारचें बहुमत करण्याचा प्रयत्न कांहीं पुढार्यांनीं चालविला होता. टिळक पक्षाचे बरेच पुढारी या प्रयत्नांत सामील झाले होते. या प्रयत्नाचे विरुद्ध विठ्ठलरावांनीं चळवळ सुरू केली. मुलींनाही सक्तीचें शिक्षण ताबडतोब चालू केलें पाहिजे असें सांगण्याचा या चळवळीचा हेतु होता. म्युसिनिपालिटीची साधारण सभा या प्रश्नाचा विचार करण्यासाठीं भरणार होती. त्याच दिवशीं विठ्ठलराव यांनीं स्त्रियांची एक जंगी मिरवणूक पुणें शहरांतून काढली. तिच्यांत सेवासदन व डि. सी. मिशनमधील स्त्रियांनीं प्रामुख्यानें भाग घेतला. कै. रा. ब. महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या नेतृत्वाखालीं सेवासदनांतून वरिष्ठ वर्गांच्या स्त्रियांचा एक छबिना पश्चिमेकडून आला आणि बहुजनसमाजांतील विशेषतः अस्पृश्यवर्गीय स्त्रियांचा दुसरा छबिना पूर्वेकडून ताबूत स्ट्रीटमधील डि.सी. मिशनमधून आला. या दोघांची गांठ बुधवार चौकांत पडून हा अपूर्व देखावा पाहण्यासाठीं हजारों लोकांची गर्दी जमली. हे दोन्ही छबिने रे मार्केटांत म्युनिसिपालिटीच्या ऑफिसांत गेले. तेथें फार गर्दी झाल्यामुळें म्युनिसिपालिटीची सभा तहकूब करावी लागली.
''सक्तीच्या शिक्षणाच्या बाबतींत विचार करण्यासाठीं प्रि. राजवाडे यांच्या अध्यक्षतेखालीं एक खास कमिटी नेमली होती. ह्या कमिटीनें अनुकूल मत दिलें होतें. मुलींचाही सक्तीच्या शिक्षणाच्या क्षेत्रांत प्रवेश करावा असें या कमिटीचें मत होतें. पण म्युनिसिपालिटीचीं सूत्रें ज्यांच्या हातांत होतीं त्यांना हें पसंत नव्हतें. त्यांनीं लोकमत अजमावण्याचा बहाणा करून त्यासाठीं ग्रामस्थांची सार्वजनिक सभा भरविण्याचें ठरविलें. लवकरच अशा प्रकारची जाहीर सभा किर्लोस्कर थिएटरांत भरविण्यांत आली. चीफ ऑफिसर रा. शंकरराव भागवत यांची अध्यक्षस्थानीं निवड झाली होती आणि लोकांवर वजन टाकण्यासाठीं सिंहगडावरून लो. मा. टिळकांनाही मुद्दाम बोलावून आणलें होतें. ह्या सभेस कर्मवीर विठ्ठलराव व त्यांचे सहकारी मित्र हजर होतेंच. विठ्ठलरावांनीं लो. मा. टिळकांना विरोध केला आणि त्यांनीं सभेंत न बोलणेंच बरें म्हणून सांगितलें. पण त्यांचें न ऐकतां टिळक बोलावयास उभे राहिले. लोकांनीं गडबड सुरू केली. कोणी एकानें टिळकांच्या अंगावर अंडीं फेकलीं. टिळकांना मार बसूं नये म्हणून विठ्ठलराव व त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रतापराव यांना मध्यें पडावें लागलें. अखेरीस ही सभा कांहीं काम न होतां बरखास्त करावी लागली. पुढें टिळकांच्या गायकवाडवाड्यांत सभा करण्याचा प्रयत्न झाला. पण तेथील सभाही तरुण मराठ्यांनीं उधळली.
''ही शिक्षणाची चळवळ पुढें दौरा काढून सर्व दक्षिण महाराष्ट्रांत विठ्ठलरावांनीं सुरू केली. या चळवळींत प्रि. केशवराव कानिटकर यांची आणि हुबळी येथील मिशनच्या शाखेचे सेक्रेटरी रा. हा. ना. पटवर्धन यांची चांगलीच मदत झाली. ह्याच वेळीं रा. विठ्ठलरावांनीं लो. मा. टिळकांच्या उलट 'ज्ञानप्रकाशांत' जोराची लेखमाला लिहिली ती पाहण्यासारखी आहे. पुण्याच्या सभेच्या वेळीं या चळवळींत कर्मवीर विठ्ठलरावांना पुण्यांतील तरुण मराठा वर्गाचें चांगलें साहाय्य झालें. आज पुढारी म्हणून प्रसिद्ध झालेले रा. केशवराव जेधे, रामराव बर्गे वगैरे मंडळी या तरुण वर्गांतीलच होती.
''या सक्तीच्या शिक्षणाच्या चळवळीचा परिणाम पुढें होऊन विठ्ठलराव यांचे दुसरे एक स्नेही रँ. र. पु. परांजपे यांनीं कौन्सिलांत येऊन शिक्षणमंत्री होतांच त्यांनीं सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. ह्या कायद्याच्या आधारें कांहीं म्युनिसिपालिटीनीं आपल्या हद्दींत सक्तीचें शिक्षण सुरू केलें आहे. तथापि अजूनही हा प्रश्न भिजत पडलेला आहे. बहुजनसमाजावर सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची अमलबजावणी सरकारच्या दिरंगाईमुळें झालेली नाहीं.''
मद्यपानबंदी : ''कर्मवीर विठ्ठलरावांनीं मद्यपानबंदीच्या चळवळींतही बराच भाग घेतला होता. आरंभीं लवाटे, टिळक इत्यादिकांचे बरोबर व नंतर म. गांधींच्या असहकारितेच्या काळांतही व्याख्यानें देऊन व पिकेटिंग करून विठ्ठलरावांनीं भाग घेतला. डॉ. एच. मॅनसाहेब यांचेंही त्यांना बरेंच साहाय्य होतें. ह्यासंबंधीं विठ्ठलरावांनीं पुणें वसंत व्याख्यानमालेंत मुद्देसूद आंकडेनिशी दिलेलीं व्याख्यानें प्रसिद्धच आहेत.''
मुरळी : ''महाराष्ट्रांत विशेषतः दक्षिण महाराष्ट्रांत खालच्या जातींतून मुरळी सोडण्याची चाल आहे. ही चाल पुरातन आहे. यासंबंधानें एक सविस्तर संशोधनात्मक लिहिलेला निबंध रा. बी. बी. केसकरकृत रा. रा. वि. रा. शिंदे यांचे लेख, व्याख्यानें, कीर्तनें या पुस्तकांत प्रसिद्ध झाला आहे. मुंबईस निराश्रित बालसंरक्षक मंडळी (सोसायटी फॉर दि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन) नांवाची संस्था १९०८-९ च्या सुमारास स्वतंत्रपणें काम करीत होती. लॉर्ड बिशप ऑफ बाँबे या संस्थेचे अध्यक्ष होते. रा. बंडोपंत भाजेकर. मि. मिर्झा, एका ख्रिश्चन मिशन शाळेचे हेडमास्तर मि. विल्सन आणि मी स्वतः असें चौघे सेक्रेटरी होते. अडचणींत सांपडलेल्या मुलांमुलींना शोधून काढण्यासाठीं रहिमतुल्ला खान या नांवाच्या गृहस्थांना वेतन देऊन वरील मंडळींनीं आपले एजंट नेमलें होतें. ह्या मंडळीचें काम मुंबईंत बरेच दिवस चांगलें चाललें होतें. अशा पतित स्त्रियांना चांगल्या देखरेखीखालीं ठेवून त्यांची उन्नति करण्यासाठीं सांताक्रूझ येथें प्रसिद्ध दयाराम गिडूमल यांच्या आश्रयाखालीं एक आश्रमही चालला होता. या आश्रमाची देखरेख भगिनी जनाबाई शिंदे यांनीं कांहीं दिवस चालविली होती. या अनाथ बालसंरक्षक मंडळीची शाखा पुणें येथें डॉ. एच. मॅन यांच्या नेतृत्वाखालीं बरींच वर्षे चालली होती.''
जिवावरचा प्रसंग : मी पुण्यास राहूं लागल्यावर मुरळीची चाल बंद करण्याचे बाबतींत रा. शिवराम जानबा कांबळे, श्रीपतराव थोरात वगैरे अस्पृश्यांचे सुधारणावादी पुढारी यांनीं पुढाकार घेतला होता. तरुण मंडळींचीं मनें वळवून त्यांचीं होतकरू मुरळ्यांशीं रीतसर लग्नें लावून भावी हानींतून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न ह्या सुधारणावादी मंडळींनीं बरेच केले. असाच एका अस्पृश्य मुरळीचा विवाह खडकी येथें घडवून आणण्यांत आला. तो व्यवहार रात्रीं बारा वाजतां झाला. आमंत्रणावरून मी ह्या विवाहास हजर होतों. त्या वेळीं माझ्या जिवावरचा प्रसंग गुदरला. या विवाहास जातांना मी होळकर ब्रिजवरून गेलों. येतांना मी तिकडूनच येईन अशा अंदाजानें विरुद्ध पक्षाकडून मला मारण्यासाठीं कांहीं मारेकरी पुलावर ठेवण्यांत आले होते, असें मागाहून कळलें; सुदैवानें मी परत येतांना बंडगार्डनच्या पुलावरून घरीं परतलों. म्हणून ही अनिष्ट आपत्ति टळली.
इन्फ्लुएंझा : १९१८ सालीं मुंबईंत इन्फ्लुएंझाची मोठी सांथ सुरू झाली. सांथ कसली दावाग्नीच तो ! वणव्यांत गवत जळावें त्याप्रमाणें माणसें जळूं लागलीं. त्याची झळ पुण्यालाही लागली. म्युनिसिपालिटीकडून इन्फ्लुएंझा मिक्श्चरच्या मोठमोठ्या बाटल्या भरून आणून आम्ही पुणें लष्करांत गरीब लोकांच्या घरोघरीं तें पाजूं लागलों. माझ्या घरची मंडळी बहुतेक आजारी झाली. थोडेंसें बरें वाटल्यावर तीं औषधें वांटण्याचीं कामें करीत. मुंबईत माझे धाकटे बंधु एकनाथराव राहात होते. त्यांची पत्नी मथुराबाई सांथीनें बीमार झाल्याचें पत्र आलें. गरोदरपणीं ही सांथ फार घातक होते आणि मथुराबाई तर ८ महिन्यांच्या गरोदर होत्या. म्हणून मी पुण्यास घरीं शुश्रूषेस राहावें कीं मुंबईला जावें हा मला मोठा पेंच पडला. मुंबईस गेलों व मथुराबाई रुक्मिणी हॉस्पिटलमध्यें दुसरेच दिवशीं बाळंत होऊन त्यांचें मूल वारलें. रात्रीं १२ वाजतां मुलास मीं आणि माझ्या भावानें नेलें. तेथें प्रेतवाहकांची अशी गर्दी लोटली होती कीं आमचा आंत शिरकाव होईना. त्या वेळेसच मुंबईचे मराठे व सोनापूरचे ट्रस्टी यांमध्यें कांहीं वाद माजून मराठ्यांचीं प्रेतें जाळण्याला हरकत येत होती. मी मराठा आहें या सबबीवर मुलासाठीं तेथें खड्डा मिळेना. रजिस्ट्रारकडे जाऊन मीं स्वतः सांगितलें कीं, ''मी प्रार्थना समाजिस्ट आहें. या उप्पर जर प्रेतास हरकत घेत असाल तर अंगावर भयंकर जबाबदारी घेत आहांत याची याद राखा !'' खड्डा मिळाला. मुलाचे अंत्यविधि करून अपरात्रीं घरीं आलों तों रुक्मिणी हॉस्पिटलांतून निरोप आला कीं सौ. मथुराबाई निवर्तल्या. दुसरे दिवशीं त्यांचें प्रेत घरीं आणून प्रार्थना समाजांतून प्रेतयात्रेची गाडी आणून सोनापुरांस गेलों. प्रार्थना समाजांतील कांहीं निवडक बंधु यात्रेला हजर होते. पण सोनापुरांत त्या वेळीं जळणाचा मोठा तुटवडा होता. हताश होऊन बसलों असतां माझे मित्र लक्ष्मीदास रावजी तेरसी यांची तेथें गांठ पडली. सार्वजनिक सेवेंत एखाद्या पिशाच्चासारखी ही मूर्ति सर्वत्र आढळत असे. माझी त्यांची खास मैत्री असल्यामुळें आमची भाषा एकेरीवर चाले. ''अरे, तूं मोठा देशभक्त म्हणवतोस आणि म्युनिसिपालिटींतही आहेस; पण आम्हांला येथें वेळ नाहीं आणि मेलों तर जाळायाला सर्पण नाहीं.'' तेरसी ताबडतोब गेले आणि लांकडाच्या ओंडकेच्या ओंडके भरलेल्या लॉर्या सोनापुरांत धडकुं लागल्या. एका लॉरीवर स्वतः तेरसी व दुसरीवर म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष सी. व्ही. मेहता गाडी हाकलीत होते. ही खरी लोकसेवा.
ह्या सुमारास अशा अनेक अडचणी येऊन मी फार खंगून गेलों होतों. मुंबईंत जनरल सेक्रेटरीचें काम आणि पुण्यास तेथील शाखेची सर्व जबाबदारी हीं दोन्हीं कामें चालविणें फार जड जाऊं लागलें. ८ दिवस मुंबईस तर ८ दिवस पुण्यास अशा खेपा घालाव्या लागल्या. माझ मुंबईंतल्या कार्यवाहकांस वाटावें कीं, मी पुण्यास फार वेळ घालवितों. पुणेंकरांना वाटावें कीं मला मुंबईचा मोह सुटेना. अशा संधींत इमारतीचें काम जसजसें नांवारूपाला येऊं लागलें तसतसें पुणें शाखेचें बूड मातृशाखेहून जड होऊं लागलें. स्थावर मिळकत म्हणजे भांडणाचें मूळ. पुण्याच्या इमारतीच्या पायाखालीं हें भांडणाचें मूळ रोंवलें गेलें होतें.