धर्मसेवा
माझी मनोरचना : माझ्या सार्वजनिक कामाच्या आठवणी आणि अनुभव देण्यापूर्वी माझीं ध्येयें आणि मनोरचना यांविषयीं थोडासा सामान्य विचार करणें जरूर आहे. त्याशिवाय पुढील आयुष्यामध्यें ज्या क्रांत्या झाल्या आणि जे वळसे पडले त्यांची वाचकांना नीटशी कल्पना येणार नाहीं. कोणाही व्यक्तीच्या सार्वजनिक जीविताचा जो परिपोष होतो त्याचे दोन अगदीं भिन्न प्रकार आहेत. एकाचा उदय विश्वात्मकतेमध्यें होऊन हळूहळू स्थानिक प्रश्नाकडे उतरत जातो, तर दुसर्याचा उदय अगदींच स्थानिक प्रयत्नांत होऊन त्याचें वलय विश्वात्मकतेकडे विस्तृत होऊं लागलें. उदाहरणार्थ, एखादा आपल्या जातीच्या सुधारणेडे लक्ष घालतो किंवा जातिभेदावर त्याचा मुळींच विश्वास नसला तर नागरिक सेवेंत लक्ष घालतो व हळूहळू राष्ट्राकडे आणि अखेरीस विश्वाकडेही त्याचा लय लागतो. याच्या उलट दुसरी व्यक्ति एकदम धर्मसुधारणेकडे वळते, म्हणजे विश्वधर्मापासून सुरुवात करून त्याचीं भिन्न भिन्न प्रतीकें, समाजसुधारणा, समाजसेवा, राष्ट्रोद्धार, त्यांतील निरनिराळ्या वर्गांची उन्नति किंवा अखेरीस आपल्या स्वतःच्या कुटुंबांतील आप्तांची काळजी इकडे उतरूं लागते. माझा जीवितविकास यांपैकीं दुसर्या प्रकारें घडला. पहिल्या भागांत (पृष्ठ १२९) 'जागृतींतलें स्वप्न' म्हणून जें सदर आहे तें फार अर्थपूर्ण आहे. लंडन येथील पॅस्मोर एडवर्ड इन्स्टिट्यूटमधील चित्रें पाहून व व्याख्यानें ऐकून माझ्या विश्वव्यापक ध्येयाला जी चालना मिळाली त्याचें हें स्वप्न द्योतक आहे. ह्या स्वप्नाप्रमाणें जरी माझ्या हातून जगभर प्रवास घडला नाहीं, तरी माझ्या जीवितकार्यांत माझें विश्वध्येय ध्रुवाच्या तार्याप्रमाणें माझ्या नजरेपुढें कायमचें राहिलें.
पहिल्या भागांत माझ्या मनोविकासाचें वर्णन करीत असतांना मीं म्हटलें आहे कीं, मी ब्राह्मसमाजांत गेल्यानें सुधारक झालों असें नसून मी सुधारक होतों, म्हणून ब्राह्मसमाजांत गेलों. माझ्या उदार ध्येयामुळें मीं मनामध्यें जीं वेळोवेळीं मानवी आयुष्याचीं चित्रें रेखाटलीं तिला तंतोतंत जुळेल अशी ब्राह्मसमाजाची ठेवण मला दिसली. त्यामुळें मी एकदम ब्राह्मसमाजांत (मुंबई प्रार्थनासमाजांत) शिरलों. एवढेंच नव्हे, तर लवकरच त्याच्याशीं मी इतका तादात्म्य पावलों कीं, स्वतःला पूर्णतः वाहून घेऊन त्याचें प्रचारकार्य हीच तळमळ मला लागली.
दोन पक्ष : त्या वेळीं हिंदुस्थानांत, विशेषतः महाराष्ट्रांत, सार्वजनिक चळवळ करणार्यांचे दोन भिन्न पक्ष होते. एक स्वतःला राष्ट्रीय ऊर्फ जहाल म्हणवीत असे, तर दुसरा स्वतःला प्रागतिक ऊर्फ उदार म्हणवीत असे. पण एकाचा जहालपणा आणि दुसर्याचा उदारपणा प्रतिपक्ष्याच्या कार्यांत मात्र दिसून येत नसे. म्हणून हे एकमेकांच्या कार्यांचा हेवादावा आणि वेळप्रसंगीं एकमेकांस उघडउघड विरोध करण्यासही कचरत नसत. दोघांचें एकच कार्य म्हणजेच राष्ट्रीयता व प्रागतिकता पूर्णांशानें होतें हें कांहीं दोघांना पटत नव्हतें. त्यामुळें त्या वेळच्या माझ्यासारख्या तरुणांची फार ओढाताण होत असे. मोठमोठीं धेंडें मोठमोठ्यानें ओरडून काय सांगतात आणि वागतांना किती आकुंचन पावतात ह्याविषयीं निर्णय घेतांना माझ्यासारख्याला लहान तोंडीं मोठा घास घेतल्यासारखें होई. मग सार्वजनिक सेवेंत पदार्पण केल्यावर प्रत्यक्ष काम चालविण्यांत मला फार जड जाऊं लागलें. उदाहरणार्थ, सर डॉ. भांडारकर व नामदार गोखले हे दोघेही प्रागतिक पक्षाचे मेरुमणि होते. पण डॉ. भांडारकरांचा आपले सर्व प्रयत्न धर्माच्या पायावर करण्याचा अट्टाहास, तर गोखल्यांना धर्माबद्दल पूर्ण औदासिन्य असून राजकारणाचा जेथें तेथें मोह पडत असे. विलायतेहून परत आल्यावर एकदां नामदार गोखल्यांनीं, ''आपण आस्तिक झालेलें बरें'' असे उद्गार मजजवळ काढले. उलटपक्षीं मी प्रार्थनासमाजाचा प्रचारक असूनही वेळोवेळीं राजकारणांत डोकावतों हें पाहून डॉ. भांडारकर मला प्रेमानें आणि विनोदानें टोमणा मारीत कीं, ''अरे, तूं कांहीं झालें तरी गोखल्यांचाच शिष्य.'' मीही मग तितक्याच विनोदानें उत्तर देत असें कीं, ''दादासाहेब, नामदार गोखले आपले शिष्य. मग मी आपला नातशिष्य ठरत नाहीं काय ?''
भांडारकर व गोखले ह्यांच्यामध्यें जर अशी तेढ तर चंदावरकर आणि टिळक ह्यांच्यामध्यें किती सलोखा असावा ह्याची कल्पनाच केलेली बरी. मला तर माझ्या कामासाठीं या दोघांशींही जोड राखावी लागत असे. म्हणजे अगोदरच अवघड असलेलें काम ह्या नव्या मानसिक उपाधीमुळें जवळजवळ अशक्य, निदान अत्यंत क्लेशकारक होऊन जात असे. पण ही ओढाताण अखेरपर्यंत राहिली नाहीं. भारतीय चळवळीचा विकास होऊन आज ही ओढाताण महात्मा गांधींच्या अष्टपैलुत्वामुळें बरीच कमी झाली आहे.
गंगा व यमुना ह्या दोन्ही नद्यांचा उगम हिमालयांत आहे; पण त्या मोठ्या प्रदेशावरून एकमेकांपासून अलग वाहात येऊन प्रयाग येथें पुन्हां एकत्र होतात. तोच प्रकार आमच्या भारतीय चळवळीचा झाला आहे. ह्या दृष्टीनें पाहातां राजा राममोहन राय हे हिमाचलाप्रमाणें आणि महात्मा गांधी हे प्रयागप्रमाणें भारतीय इतिहासांत अखंड शोभत राहतील. राष्ट्रीयतेची यमुना आणि प्रागतिकतेची गंगा ही राजा राममोहन रायच्या चरणापासून निघून महात्माजींच्या अंजलीमध्यें पुन्हां एक झाल्या आहेत, हें किती गोड दृश्य ! पण हें दृश्य मला माझ्या कार्याच्या सुरुवातीला दिसण्यासारखें नव्हतें. कारण ह्या गंगा व यमुना त्या वेळीं एकत्र झाल्या नव्हत्या. म्हणून मला वाजवीपेक्षां अधिक त्रासाला तोंड द्यावें लागलें.
प्रयोगाचें नाविन्य : १९०३ च्या नोव्हेंबरमध्यें मुंबई प्रार्थनासमाजानें एकमतानें ठराव करून मला आपला प्रचारक नेमलें. अल्लड तरुण असतांना ज्या मुंबई प्रार्थनासमाजाला मी वरवर पाहून इतरेजनांप्रमाणें नांवें ठेवीत होतों त्याच्याच मी आतां एकनिष्ठ सेवक झालों. त्यावरून अंगांत थोडासा पोक्तपणा येऊं लागला असा अंदाज करण्यास हरकत नाहीं. प्रार्थनासमाजाचें प्रचारकार्य हा त्या वेळीं एक अननुभूत प्रयोग होता. माझ्यापूर्वी श्री. सदाशिवराव केळकर व श्री. शिवरामपंत गोखले ह्या दोघांनीं हें प्रचारकार्य केलें होतें. तथापि ह्या प्रचाराची घटना माझ्या वेळीं अगदीं नवीन होती, असें म्हणावयास हरकत नाहीं. प्रचारकार्यासाठीं योग्य संस्थेंतून तयार होऊन येणें, आल्यावर तें कार्य जीविताचा एकमेव हेतु म्हणून पत्करणें, आपल्या व कार्याच्या योगक्षेमासाठीं केवळ ईश्वराशिवाय इतरांवर अवलंबून न राहणें, कार्याचा विस्तार जसजसा होईल तसतशी साधनसामग्री हातास कशी येते याची प्रचीति घेणें वगैरे गोष्टी अगदीं नवीन होत्या. हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध यांचीं तत्त्वें आणि ध्येयें जशीं निरनिराळीं आहेत तशीच त्यांची प्रचारकार्यपद्धतिही तत्त्वानुसार वेगवेगळी आहे. ब्राह्मसमाजानें ह्या निरनिराळ्या धर्मतत्त्वांचा व ध्येयांचा ज्या अर्थी समन्वय केला आहे त्या अर्थी कार्यपद्धतींतही त्याला समन्वयच करणें भाग आहे. ह्यासाठीं त्याला कोणी वंदो अथवा निंदो.
पद्धतीचे भेद : मुसलमान पद्धति लोकसत्तात्मक (Democratic), तर ख्रिस्ती पद्धति पितृवात्सल्याची, मेंढपाळाची (Pastoral), हिंदुप्रचारपद्धति भिन्न जाती व वर्ग यांच्यामध्यें विभागलेली, राजकारणी (Political), तर बौद्धांची निस्संग उदासीन वृत्तीची (Supreme Indifference). ब्राह्मसमाजानें ह्या आवळ्यांची आणि भोपळ्यांची मोट कशी बांधावी ?
बंगाल्यांतील ब्राह्मसमाजाचें कार्य मोठ्या प्रमाणावर चाललें असल्यामुळें राममोहन राय, देवेंद्रनाथ, केशवचंद्र सेन ह्या विभूतींच्या अवतारकार्यामुळें गेल्या शतकांत त्या प्रांतीं आजीव प्रचारकांची वाण भासली नाहीं. केशवचंद्रांच्या प्रभावळींत घरदार टाकून किंबहुना तें घेऊनही लहानथोर ताकतीचीं माणसें बेहोष होऊन पडत असत. त्या मानानें गेल्या शतकाच्या शेवटापर्यंत ब्राह्मधर्माचें प्रचारकार्य तेजस्वीपणानें पार पडलें. केशवचंद्रांचे दोन प्रभावी शिष्य पंडित शिवनाथशास्त्री आणि प्रतापचंद्र मुझुमदार यांनीं त्यांच्या मागूनही प्रचारकांची उणीव भासूं दिली नाहीं. पण बंगाल्यांतला प्रकार वेगळा आणि बंगाल्याबाहेरचा प्रकार वेगळा. बंगाल म्हणजे ब्राह्मधर्माचें सरोवर आहे. त्यांतील पाणी कालव्यानें काढून अखिल भारतावर बागाईत करावयाची आहे. बंगाल-बिहार प्रांतांत साक्षात् बौद्धधर्माचा उदय आणि प्रसार झाला असल्यानें जातिभेद आणि मूर्तिपूजा यांचें विष इतर प्रांतांप्रमाणें रुजलें नाहीं. हा प्रांत आर्यावर्ताच्या बाहेरचा, मोंगली सीमेजवळचा, अर्धमोंगली असल्यामुळें ह्याच्यावर आर्यांचे राजकारणी हल्ले दक्षिण दिशेप्रमाणें झाले नाहींत. रामायणाचें कार्यक्षेत्र द्राविड देशांत सताड पसरलें; पण रामानें पूर्वेकडे महाकोसलाची सीमा देखील ओलांडली नाहीं. मध्ययुगांत मद्रासेकडे अळवार नांवाच्या भक्तांनीं वैष्णवधर्म पसरविला. महाराष्ट्रांत तो वारकर्यांनीं वाढविला. तें काम चैतन्यानें बंगाल्यांत केलें. ब्राह्मसमाजाची वाढ इतर प्रांतांपेक्षां बंगाल्यांतच अधिक खुली कां झाली त्याचीं कारणें वर दिलीं आहेत. ब्राह्मसमाजाची उपासनापद्धति देवेंद्रनाथानें घालून दिली ती ख्रिश्चनपद्धतीप्रमाणें आहे, अशी निंदाव्यंजक टीका होत असते. ती टीका विशेष निरीक्षण करून केली जाते असें नाहीं. देवेंद्राचें इंग्रजी शिक्षण विशेषसें न झाल्यानें व हिंदुस्थानाबाहेर प्रवासही न घडल्यानें त्यानें प्रणीत केलेल्या उपासनापद्धतीला वेदोपनिषदांचेंच आवरण फार पडलें. त्याच्यामागें केशवचंद्र सेनावर चैतन्याच्या भक्तिमार्गाचें दडपण पडल्यानें टाळ, मृदंग आणि पताका यांचा कहर ब्राह्मसमाजांत झाला. तरी टीकाकार म्हणतो कीं, ब्रह्मोपासना ख्रिस्ती पद्धतीचीच. उपासनेचें कसेंही असो, प्रचारकपद्धतींत ख्रिस्तांचा जोरकपणा, सहानुभूति आणि व्यावहारिकता हे गुण येतील तितके कमीच म्हणायचे. व्यापार करण्याच्या पद्धतींत जर ख्रिस्त्यांची व्यावहारिकता आम्ही मुकाट्यानें उचलतों, तर धर्मप्रचाराबाबत ती कां हेटाळावी ?
माझ्या वेळची परिस्थिति : १९०३ सालच्या अखेरीस प्रत्यक्ष कार्यास सुरुवात कशी करावी या बाबतींत मला आकाश फाटल्याचा अनुभव येऊं लागला. मी जरी एका प्रांतिक समाजाचा प्रचारक होतों, तरी मुं.प्रा. समाजाचें कार्य मुंबई शहरापुरतेंच चाललेलें होतें. पुणें, नगर, सातारा ह्या ठिकाणीं जरी समाज होते तरी आर्थिक दृष्ट्या हे समाज मुंबई समाजापासून स्वतंत्र आणि तुटक वागतात. परस्पर मदतीची देवघेव होत असली तरी मध्यवर्ती घटना नाहीं आणि तिला कोणी अनुकूलही नाहीं. तशी सूचना मीं वेळोवेळीं करूनही कांहीं लाभ झाला नाहीं. त्या वेळीं इकडील प्रांतांत आणखी एक क्रांति घडून आली होती. मुंबई समाजाची १८६७ सालीं स्थापना झाली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं मुंबई समाजाची पहिली पिढी कालवश झाली होती. डॉ. आत्माराम पांडुरंग, मामा परमानंद, वासुदेव बाबाजी नवरंगे, वामन आबाजी मोडक, महादेव गोविंद रानडे वगैरे वृद्ध मंडळी धर्मसंस्थापनेच्या दृष्टीनें खरोखर वरच्या दर्जाची होती. म्हणूनच त्यांचे हातून समाजस्थापनेचें महत् कार्य झालें; पण चालू युगाच्या आरंभीं डॉ. भांडारकरांखेरीज आद्य प्रवर्तकांपैकीं कोणी उरला नाहीं. सर नारायण चंदावरकर हे पहिली पिढी व दुसरी पिढी यांना सांधणारा महत्त्वाचा दुवा होते. त्यांची गणना वृद्धापेक्षां तरुणांतच करणें बरें. भांडारकर पुण्यास येऊन राहिल्यामुळें मुंबई समाजाच्या नेतृत्वाचें जूं चंदावरकरांच्याच मानेवर पडलें. त्यांना अनुयायांचा भरणा अगदीं तरुणांचाच मिळाला. स्टुडंट्स ब्रदरगुड (विद्यार्थ्यांचें भ्रातृमंडळ) या नांवाची केवळ कॉलेजांतील तरुण विद्यार्थ्यांची सभा प्रोफेसर वेलणकरांच्या नेतृत्वाखालीं चालली होती. सर नारायणरावांच्या नेतृत्वाला ही संस्था एक अत्यंत अनुकूल क्षेत्रच मिळालें. समाजाच्या अप्रत्यक्ष प्रचारकार्याचें हें एक उज्ज्वल उदाहरण होतें. प्रो. वेलणकर हे ख्रिस्ती असून शेवटीं ते प्रार्थनासमाजांत लय पावले. त्यांच्यामागें किती तरी तरुण लोक आले. त्यांचा उघड निर्देश करणें जरूर नाहीं. सांगण्याचा मतलब एवढाच कीं, सर नारायणराव हे तरुणच होते.
नाताळांतील धामधूम : ब्राह्मधर्माचें विश्वव्यापी कार्य, या प्रांतीं त्याचें असंघटित क्षेत्र, पहिली सगळी पिढी दिवंगत झालेली आणि मी स्वतः एक सामान्य अननुभवी तरुण अशी परिस्थिति होती; पण ह्यांत मला अनपेक्षित असें कांहींच नव्हतें. सुरुवातीचे वेळीं डिसेंबर महिना आला होता. त्याचा शेवटचा नाताळचा आठवडा म्हणजे भरतभूमीचा जागृतिक काळ. नाताळांत ख्रिस्त जन्मला ही गोष्ट ऐतिहासिक असो वा नसो, नाताळ म्हणजे आधुनिक ज्योतिषदृष्ट्या मकरसंक्रमणाचा दिवस असल्यामुळें त्या दिवशीं उत्तरेकडील आकाशांत सूर्य जन्म घेतो ही गोष्ट खरी. ह्या आठवड्यांत भारतीय सभेची धामधूम त्या वेळीं देशभर चालत असे. काँग्रेसचा पुढारी असो, सभासद असो, नुसता बघ्या तमासगीर असो, किंवा तिला हसणारा किंवा प्रत्यक्ष विरोध करणारा असो, हे सर्व प्राणी त्या अधिवेशनाचे जागीं हमखास जमावयाचेच. ह्या वर्षीची काँग्रेस दक्षिण प्रांतीं मद्रास शहरीं जमणार होती. अर्धे युरोप पायाखालीं घालून मी नुकताच आलों होतों, पण महाराष्ट्राबाहेरील भारत अद्यापि पाहिलेलें नव्हतें. म्हणून मुंबईतील स्थानिक कामाच्या जंजाळांत पडण्यापूर्वी भारतीय यात्रा करण्याचा चालून आलेला प्रसंग मीं आनंदानें स्वीकारला आणि प्रवासखर्चाची तमा न बाळगतां दक्षिणेची वाट धरली. तत्त्वानें बेहोष झालेल्याला तपशिलाची कदर नसते अशांतला मी एक. प्रथम मी बेळगांवला उतरलों. सुबोध-पत्रिकेंतल्या माझ्या विलायतेहून लिहिलेल्या पत्रांवरून निदान महाराष्ट्रांत तरी माझा परिचय झाला होता. बेळगांवांतील एका वृद्धांच्या क्लबामार्फत माझें व्याख्यान ठरलें. पण व्याख्यानाचा विषय ठेवतांना वाद माजला. वृद्धांचा क्लब असल्यानें राजकारणावर बहिष्कार होता. धर्मकारण तर सर्वांनाच नावडतें होतें. समाजसुधारणा वादग्रस्त होती. व्याख्यान करविणारांचें एकमत होईना. तेव्हां मीं त्यांस सांगितलें, ''व्याख्यान करविणारे तुम्ही असलां तरी करणारा मी आहें ना ! विषयाचें नांव तुम्ही कांहींही द्या. वक्ता आपल्याला सांगावयाचें तें सांगितल्याशिवाय राहणार नाहीं.'' आधुनिक जगांत तौलनिक धर्माच्या अध्ययनानें विचारी जगांत काय काय फरक पडला आहे हें मीं सप्रमाण व सविस्तर सांगितलें. त्याला म्हणण्यासारखा कोणी आक्षेप घेतला नाहीं.
बंगलोर : कर्नाटकांतून मी पुढें तामीळ प्रदेशीं गेलों. त्या प्रांताची प्रवेशभूमि बंगलोर ही होय. येथें दोन तीन ब्राह्मसमाज होते. येथून मला नवीन सृष्टि निरीक्षण्यास मिळाली. युरोपांत ग्लासगोपासून नेपल्सपर्यंतचा प्रदेश आक्रमिला, तरी भाषेशिवाय भिन्न असें मला कांहींच दिसलें नाहीं. खाणेंपिणें, वस्त्रप्रावरण वगैरे लहान-सहान गोष्टींपासून सामाजिक चालीरीती, राजकारणीय घटना, शेवटीं धर्मासारखी निर्वाणाची गोष्ट ह्या सर्वांत मला एकसुत्रीपणा दिसला. ते देखावे माझ्या डोळ्यांपुढें अजूनही तरंगत होते. बंगलोरसारख्या शहरांत आल्याबरोबर द्राविडी संस्कृतीची ध्वजा मला स्पष्ट दिसूं लागली. नुसती भाषाच नव्हे तर सर्वच गोष्टींत पडदा पालटला. आर्यसंस्कृतीहून भिन्न असणार द्राविड संस्कृति आणि त्यावर पांघरूण घालणारी पाश्चात्य संस्कृति असें कांहीं तरी विचित्र दृश्य माझ्यासमोर दिसूं लागलें. बाजारांत गेलों तर भाजी विकणारी माळीण तुटक्या इंग्रजी शब्दांत बोलते, तर एखादा कॉलेजांतील अंडरग्रॅज्युएट तरुण इंग्रजी भाषाच तामिळ स्वरांत बोलतो. पायांत पाटलोण असली तरी तो अनवाणीच चालतो. गळ्यांत कॉलर, नेकटाय असतांनाही डोक्यावर कांहींच न घेतां शेंडीचा मोठा बुचडा तो मानेवर टाकतों. अशीं अनेक दृश्यें पाहून माझ्या निरीक्षणशक्तीवर ताण पडूं लागला. बंगलोर शहरांतील एक फेरी या मथळ्याखालीं मीं एक पत्र सुबोध-पत्रिकेकडे पाठवलें.
मद्रास : शेवटीं नाताळांत मी मद्रासला पोंचलों. काँग्रेसची जय्यत तयारी चालली होती. जॉर्ज टाऊन या भागांत ब्राह्मसमाजाचें मंदिर आहे. ह्याला ब्लॅक टाऊन असें दुसरेंही नांव आहे. सगळें मद्रास काळें असतांना ह्या भागालाच काळें शहर हें नांव कां दिलें हें समजत नाहीं. मी ब्राह्ममंदिरांत उतरलों. समाजाची स्थिति खालावलेली दिसली. काँग्रेसच्या अधिवेशनाच्या जागीं दुसर्या राष्ट्रीय परिषदाही भरावयाच्या असत. म्हणून राष्ट्रीय सामाजिक परिषदेसाठीं सर नारायण चंदावरकर हेही आले होते. ब्राह्मसमाजाची एकेश्वरी धर्माची परिषद होणार होती; म्हणून तामीळ, तेलगू, मल्याळम् वगैरे प्रांतांतील बा्रह्मबंधूंच्या गांठीभेटी होऊं लागल्या. आंध्र साहित्यसम्राट् वीरेशलिंगम् पंतलु, विद्वदरत्न डॉ. व्यंकटरत्न नायडू, तिनेवल्लीचे कैलासन् पिल्ले वगैरे धुरीणांच्या गांठीभेटी झाल्या. सामाजिक परिषदेचें अधिवेशन फार चांगले पार पडलें. विशेषतः चंदावरकर यांचें वक्तव्य आणि पवित्रा फार उठावदार दिसला. प. वा. न्या. मू.रानडे हयात असेपर्यंत सामाजिक परिषदेचें उद्धाटन यांच्याच हातून व्हावयाचें. ती माळ आतां सर नारायणरावांच्या गळ्यांत पडली. ती फार शोभूं लागली. पण मुख्य सभा जी राष्ट्रीय सभा तिला मुहूर्त चांगला लागला नाहीं. सभेच्या दिवशींच जोराची पर्जन्यवृष्टि होऊन विस्तीर्ण सभामंडप जणूं काय वाहूनच गेला. आयते वेळीं दुसरी व्यवस्थाच करणें अशक्य झाल्यानें सभेचें काम जवळजवळ बंदच पडलें. ह्या प्रांतांत वळीवाचे पाऊस मोठ्या जोरानें पडल्यानें असा विरस कित्येक काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळीं झाला आहे. मद्रासेकडील कार्यच नव्हे तर अखिल भारतांत ब्राह्मसमाजाच्या कामाला विस्कळितपणा कसा आला होता याची चुणूक मला प्रथम या दक्षिण राजधानींत दिसून आली. माझें प्रथम राष्ट्रकार्य म्हणून मी एकेश्वरी परिषदेची पुनर्घटना करावी ही प्रेरणा मला तेथें झाली. पुढची काँगेस कर्मधर्मसंयोगानें मुंबई शहरांत होणार होती, म्हणून या प्रेरणेचें पुढें निश्चयांत रूपांतर झालें. मद्रासचें काम आटोपल्यावर परत मुंबईस न येतां मी बंगालच्या वाटेस लागलों. याचें एक कारण असें होतें कीं, पुढील जानेवारींत कलकत्त्यास माघोत्सवाचा काळ आला होता. म्हणून वाटेवरील आंध्र, ओरिसा या प्रांतांत दौरा करण्याचा मीं निश्चय केला. वाटेंत नेलोर, बेझवाडा, राजमहेंद्री, कोकोनाडा, पार्लाकिमडी, कटक, जगन्नाथपुरी वगैरे मोठीं व मुख्य शहरें व तेथील ब्राह्मसमाज यांचें मीं निरीक्षण केलें. या दौर्यांत प्रवासाची दगदग, खाण्यापिण्याची आबाळ, कामाचा ताण वगैरे अनेक कारणांनीं कलकत्त्यास पोंचण्यापूर्वी मी बराच थकून गेलों होतों.
मद्रासचें तिखट : युरोपांत असतांना तेथील तिखट मसाल्याविरहित खाण्याची संवय लागल्यानें आणि परत आल्याबरोबर दक्षिण प्रांतांतल्या तिखटाचा वर्षाव मजवर झाल्याने माझी अगदींच तारांबळ उडाली, प्रत्येक ठिकाणीं 'माझ्यासाठीं बिनतिखटाचा स्वयंपाक करा', असें गृहिणीला किती जरी बजावलें तरी तिखटाशिवाय स्वयंपाक करणें म्हणजे जन्मांत मोठी अपकीर्ति करून घेणें, या समजुतीनें तिच्या दृष्टीनें अत्यंत थोडें तिखट घातलें असलें तरी तें मला सात दिवस पुरेल इतकें असें. त्यामुळें मी अर्धपोटी जेवी. त्या अर्ध्या जेवणांतलें अर्धे तिखटहि मला भारी होई. शिवाय या प्रांतींचा हिवाळा मला युरोपांतल्या उन्हाळ्यापेक्षां कडक भासला. युरोपांतून परत आल्यावर स्वदेशाला चालतील असे नवीन कपडे तयार करण्याचेंहि आर्थिक सामर्थ्य माझ्यांत नसल्यानें तेच युरोपियन कपडे मला कांहीं काळ वापरावे लागले. त्यामुळें वरून जरी मी मोठा साहेब दिसत होतों तरी आंतून नेहमीं पुढच्या प्रवास खर्चाची व प्रकृतीला न मानवणार्या अन्नाची धास्ती बाळगणारा एक कंगार फकीर होतों. तामीळनाड व बंगाल यांचे मधील आंध्र प्रांत हा मोठा भावनाशील दिसला. या प्रांतांत खेड्यांखेड्यांतून देखील ब्राह्मसमाजाची चळवळ चालू आहे असें मीं ऐकलें. पुढें महात्मा गांधींची बहिष्काराची चळवळसुद्धां याच भावनाशील प्रांतांत विशेष जोराची झाली. परंतु भावनाशीलतेच्या बरोबर प्रयत्नांचा दमदारपणा व टिकाऊपणा नसल्यानें नदीला पूर येऊन गेल्याप्रमाणें या प्रांतांतील चळवळीची लागवड अस्थिर ठरते. आंध्र देशांतील पुढार्यांनी मागील इतिहासांतहि धाडसाचीं मोठमोठीं कृत्यें केल्याचा पुरावा आहे. इकडील राजांनीं आणि लष्करी पुढार्यांनीं पूर्वेकडे ब्रह्मदेश, सयाम, जावा, सुमात्रा, बाली, वगैरे दूरदूरच्या ठिकाणीं आर्यसंस्कृतीचा फैलाव केला आहे. पण आतां तिचा मागमूसहि उरला नाहीं. ब्राह्मधर्माच्या प्रचाराची तशीच पुनरावृत्ति होणार नाहीं अशी आशा आहे.
जगन्नाथपुरी : आंध्र आणि ओरिसा यांच्या शिवेवर जगन्नाथपुरी हें प्रसिद्ध धर्मक्षेत्र आहे. हें बंगाली उपसागरावरील एक महत्त्वाचें बंदर आहे. हिंदु धर्माच्या प्रसारार्थ ह्या वैष्णव क्षेत्रानें मागें किती मोठी कामगिरी केली असेल ती असो, हल्लीं मात्र याचें स्वरूप भेसूर दिसतें. निरीक्षण दृष्ट्या हें स्थळ फार आकर्षक आहे म्हणून मी येथें उतरलों. येथें ब्राह्मसमाज नाहीं. शिवाय ना ओळख ना पाळख. आणि मी तर साहेबी पोशाखांतला एक काळा आदमी ! त्यामुळें माझी उतरण्याची फारच आबाळ झाली. जेथें नुसती उतरण्याची सोय लागेना तेथें जेवणाचें काय विचारतां ! यात्रेकरूंनीं स्वतःचा स्वयंपाक करूं नये असा दंडक होता. आणि देवळांतील महंत बडवे अत्यंत स्वार्थी, कठोर मनाचे, आणि पैसे उकळण्याचे विद्येंत कसलेले. जगन्नाथजीला रोज एक मणाचा भाताचा भोग लागत असे. तोच भात यात्रेकरूंना खापरांतून विकत मिळत असे. पहिल्या दिवसाचा भात आदल्या दिवसाच्याच रांजणांत भरून ठेवल्यामुळें ताजें कोणतें व शिळें कोणतें याचें संशोधन करण्याचे कामीं यश येण्याची फारशी आशा नव्हती. उलट असें संशोधन करणाराच तेथें पापी ठरत असे. आशि अशा पाप्याला पाहुणचार मुळींच मिळत नसे. शोध करतां करतां एक बंगाली बाबू, तेथें एक मोठे सरकारी अधिकारी आहेत असें कळलें. ते ब्राह्मसमाजाचे एक सभासद होते. पण ते एकलकोंडे असल्यानें त्यांच्या अधिकाराच्या मानानें त्यांचा ब्राह्मधर्म प्रसिद्ध नव्हता. अशा मोठ्या क्षेत्राच्या देवळांत यात्रेकरूंची एकसारखीच नेहमी रीघ असे. पण या सरकारी अधिकार्यांच्या मदतीनें मला या देवळांतील कानेकोपरे आणि मुख्य गाभार्यांतील मूर्ति निरखून पाहण्याची चांगली सोय झाली. देऊळ भव्य, तितकेंच बेढब असून त्यांतील सर्व प्रकार त्याच सुरांत आणि तालांत दिसत होते. गाभार्यांत देवाची मुख्य मूर्ति तर अत्यंत भेसूर, बायकामुलांच्या अंतःकरणांत धडकी भरविणारी दिसली. ती पाहण्यासाठीं बायका, पुरुष, मुलें, सर्व दर्जाची आणि वयाचीं माणसें गर्दी करून एकमेकांशीं इतकीं बिलगत कीं, अलिकडे लंडनमध्यें बाँब्सच्या भीतीनें तळघरांत शिरलेलीं माणसेंहि तितकीं बिलगत नसतील. गाभार्यांत नेहमींच अंधाराचे साम्राज्य असतें.
दर्शनाचे हे सोहाळे उपभोगून बाहेरील विस्तीर्ण पटांगणांत आल्यावर हायसें वाटलें. मग भूक लागल्याचें स्मरण झालें. आदला दीड दिवस उपोषण घडलें होतें. भोग लागलेला भात फुटक्या मडक्यांत घालून स्वस्त दराची चढाओढ करीत देवळांतील महंताचे दलाल यात्रेकरूंच्या मागें लागत. यात्रेकरूंनीं ह्या प्रसादाशिवाय दुसरें कांहीं खाऊं नये असें शास्त्र सांगे. तो भात घेऊन दोन घांस खातों न खातों तों ह्या प्रसादापेक्षां भूक बरी वाटून यात्रेकरूंच्या हातांतील मडकीं सहजच खालीं गळून पडत. तीं झाडून काढण्याची म्युनिसिपालिटीकडून व्यवस्था नव्हती. या देवळांत कोणत्याहि प्रकारचा जातिभेद न राखतां अस्पृश्यांशिवाय सर्वांना येण्याला सरसकट परवानगी आहे. अंगणाची जमीन फरसबंदीची होती. तिच्यावर उष्ट्या भाताचीं पुटें पडून कायमची घसरगुंडी झालेली असे. पण देवळांतल्या प्रमाणें अंगणांत अंधार नसल्यामुळें अन्नाची भूक हवेवर भागवून घ्यावी लागली.
ह्या देवळाचें अत्यंत मासलेवाईक वैशिष्टय सांगण्याचें अजून पुढेंच आहे. प्राचीन द्रावीड संस्कृति तिच्या नमुनेदार शिल्पकलेविषयीं प्रसिद्ध आहे. मदुरा, त्रिचनापल्ली, श्रीरंगपट्टम् येथील प्रसिद्ध भव्य देवळें त्यांच्या अवाढव्यपणाबद्दलच नव्हे तर नाजुक सौंदर्याविषयीं देखील सर्व जगानें वाखाणण्यासारखीं आहेत. या सौंदर्याला दृष्ट लागूं नये म्हणून द्राविडांनीं एक अपूर्व तोडगा काढला आहे. दक्षिण देशांत कोठेंहि जा लहानमोठ्या देवळाच्या भिंतीवरच नव्हे तर रथादि वाहनांवरहि अत्यंत बीभत्स चित्रें नजरेंस भरण्यासारख्या ठिकाणीं कोरलेलीं दिसतात. जगन्नाथजीचें मंदिर जरी सुंदर नाहीं तरी दृष्टिदोष घडूं नये म्हणून कानाकोपर्यांत सर्व भिंतीवर खालपासून वरपर्यंत जेथे म्हणून चित्र कोरण्याला जागा आहे, अशा सर्वच ठिकाणीं बीभत्स चित्रांची लयलूट झाली आहे. ह्या दृष्टिदोषासंबंधीं द्राविडांची कल्पना अशी आहे कीं, कांहीं वाईट माणसांच्या दृष्टींत सुंदर वस्तूंचा भंग करण्याची शक्ति असते. म्हणून त्याच्या दृष्टीची लालसा कुरूप वस्तूंत लय पावून सुंदर वस्तु सुरक्षित रहावी. या समजुतीनेंच भोळ्या आया आपल्या गोर्या मुलाला गालबोट लावतात. पण गोर्या मुलाबरोबर काळ्या मुलालाहि जसें गालबोट लागतें तशांतलाच प्रकार जगन्नाथपुरींतला आहे. आणि त्यांतील बीभत्सपणाच्या कल्पकतेलाहि ऊत आलेला आहे. कोकशास्त्रांतल्या असंख्य आसनांपेक्षांहि अत्यंत बीभत्स अशीं दहापांच अधिक आसनें पाहणाराला येथें दिसतील. सर्वांत मनोवृत्तीला थक्क करणारें दृश्य म्हणजे हें कीं, ह्या नागड्यां स्त्रीपुरुषांच्या संलग्न दंपतीची पूजा करण्यासाठीं तरुण कुमारिका आणि विधवा बाया हळदीकुंकु आणि फुलांच्या परड्यां घेऊन सर्व मूर्तीचा परामर्ष घेण्यांत गुंतलेल्या आढळतात. सारांश, या आधुनिक युगांत हें देऊळ आणि त्यांतले प्रकार अद्याप अखंड चालूं आहेत हें एक समाजशास्त्रांतील मोठें कोडें आहे असें म्हणत सुशिक्षित प्रेक्षक खजील होऊन देवळांतून बाहेर पडतो.
राममोहन रायची आई : मनावर झालेल्या परिणामांच्या परिमार्जनासाठीं मी समुद्रकिनार्यावरील अत्यंत सुंदर व विपुल वाळवंटावर गेलों. बंगालच्या उपसागराच्या लाटा जणु जगन्नाथाच्या दर्शनासाठीं अविश्रांत येत होत्या. पण त्यांना पाहण्यासाठीं यात्रेकरूंपैकीं कोणीच तेथें नसे. जगाचा खरा नाथ कोठें आणि हा तोतया जगन्नाथ कोठें ! पण जगांतील सर्व धर्मांचा समन्वय करणारा राममोहन राय ह्याच्याच आईनें ह्या तोतया जगन्नाथाच्या सेवेंत आपला देह ठेवला हें स्मरण करून मीं माझा आवंढा गिळला. राममोहन राय हे आपल्या आईच्या भेटीला येथें आले होते, तेव्हां त्यांच्या आईनें देवदर्शन घेण्याची त्याला गळ घातली. राममोहन व्यवहारचतुर असल्यानें, ''हे माझ्या आईच्या देवा, तुला नमस्कार असो !'' असें म्हणून त्यांनीं आपल्या आईचें समाधान केलें.
माघोत्सव : १९०४ च्या जानेवारीच्या मध्याच्या सुमारास मी कलकत्त्यास पोंचलों. त्यावेळीं तेथील माघोत्सव चालूं होता. सबंध जानेवारी महिना हा उत्सव मोठ्या समारंभानें चालत असतो. ब्राह्मसमाजाचे तीन पक्ष. साधारण ब्राह्मसमाज, नवविधान ब्राह्मसमाज आणि आदि ब्राह्मसमाज. हे तीनहि पक्ष स्वतंत्रपणें हा उत्सव चढाओढीनें करीत असतात. मला हा प्रथमच प्रसंग असल्यानें प्रत्येक लहानसहान गोष्ट मी मोठ्या कौतुकानें निरीक्षण करूं लागलों. बंगाली वर्षाचा माघ महिना हा आमच्याकडील पौष महिन्यांतच येतो. शुद्ध एकादशी दिवशीं ब्राह्मसमाजाच्या स्थापनेचा दिवस पडतो. तो बहुतकरून ता. २४ जानेवारीला येतो. या सुमारास तीन दिवस सरकारी नोकरींतील सर्व ब्राह्मसमाजिस्टांना हक्काची रजा मिळते. बंगाल्यांतील लहानथोर स्थानिक समाजांतून ब्राह्म कुटुंबें मोठ्या श्रद्धेनें कलकत्त्यास या उत्सवाप्रित्यर्थ येतात. त्यांची उतरण्याची व जेवणाची सोय एका स्वतंत्र नेमलेल्या मंडळाकडून मंदिराच्या आवारांत केलेली असते. पंधरा दिवस सर्व आल्या-गेलेल्यांना दोन वेळां फुकट जेवण व चहा मिळतो. ब्राह्मसमाजाला ही जणूं काय एक निराळी नवीन घटनाच बनल्यामुळें परस्परांची ओळख होणें, सामाजिक संबंध दृढ होणें वगैरे महत्त्वाचे फायदे या उत्सवापासून होतात. रोज सांजसकाळ ब्राह्मोपासना, व्याख्यानें व भजनें असें कांहींना कांहीं मुख्य मंदिरांत चाललेलें असतें. कलकत्ता शहरांतील ब्राह्मबंधू शक्य तितका वेळ आपल्या बायकामुलांना घेऊन मंदिरांत जमत असतात. दिवसभर सारखी गर्दी. मुख्य दिवशीं पहाटे तीन वाजल्यापासून भजनाला सुरुवात होते. टाळमृदंगाचा घोष चालतो. लताफुलांनीं मंदिर सुशोभित करण्याचे आदले दिवसापासूनच चाललेलें असतें. तीन तपास भजन झाल्यावर मुख्य आचार्य वेदीवर येऊन बसतात. एक तास उद्बोधन, एक तास प्रार्थना, दोन तास प्रवचन अशी एकंदर सात तास ही मुख्य उपासना चालते. मंदिराच्या दोन्ही मजल्यावर चिक्कार गर्दी असते. ह्यावर्षी ही उपासना मुख्य आचार्य पं. शिवनाथशास्त्री ह्यांनीं चालविली. उपासनेंत भक्तिरसाचा पूर वहातो. माझ्या मनावर त्याचा फार मोठा परिणाम झाला. शास्त्रीमहाशयांचें वक्तव्य केव्हां केव्हां इतकें प्रभावी होतें कीं, कित्येक मूर्छा येऊन पडतात असें ऐकलें आहे. माझ्याजवळ प्रसिद्ध ब्राह्म पुढारी, बॅ. आनंदमोहन बोस हे बसले होते. त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुधार चालली होती. श्रोतृसमाजांत बाहेरचे लोक देखील पुष्कळच असत. सकाळीं ६ वाजण्याचे आंत येऊन मंदिरांत जागा न पटकावल्यास समाजिस्टांनाहि जागा मिळेनाशी होते. एकंदरींत प्रसंग अपूर्व खरा !
महर्षि देवेन्द्रनाथ ठाकूर : ता. ३० जानेवारी १९०४ रोजीं, तिसरे प्रहरीं पं. शिवनाथशास्त्री ह्यांनीं मला आणि लाहोरचे प्रचारक भाई प्रकाशदेव यांना प्रसिद्ध कवि डॉ. रवींद्रनाथ टागोर यांचे वडील महर्षि देवेंद्रनाथ यांचे दर्शनास नेलें. ब्राह्मसमाजांतील तीन प्रमुख विभूतींपैकी देवेन्द्रनाथ हे मधले होते. ते आपल्या घरच्या दुसर्या मजल्यावर कोचावर बसले होते. जिन्यांत चढतांना एका तरुणाची तसबीर दिसली. ती त्यांच्या २५ वर्षे वयाच्या नातवाची होती. यावरून देवेंन्द्रनाथांचें वय किती पिकलेलें होतें याची कल्पना होते. आम्ही समोर दिसल्याबरोबर 'यावें शास्त्री महाशय' असे उद्गार काढून महषाअनी स्वागत केलें. पं. शिवनाथशायांनीं माझी गौरवपूर्वक ओळख करून दिली व मुंबईला राममोहन आश्रमाची उभारणी झाल्याची हकीकत सांगितली. अशा रीतीनें मुंबईकडे नवचैतन्य झाल्याचें ऐकून महषाअना गहिंवर आला आणि त्यांनीं माझ्या अंगावरून हात फिरविला. ह्या महापुरुषाचे दर्शनानें मला धन्यता वाटली. महर्षि म्हणाले, ''मी आतां फार थकून गेलों आहे. शिवनाथ, तूं आमचें कार्य पुढें चालव.'' महर्षि मोठे एकांतप्रिय. माघोत्सवाची गडबड त्यांना मानवत नसे. ते त्याला गोलमाल (गडबड) असें संबोधीत. दुसरी महत्त्वाची भेट म्हणजे ब्रह्मानंद केशवचंद्र यांचे शिष्य प्रतापचंद्र मुझुमदार यांची होय. ते मंदिरांत उपासनेला बसले होते. शुभ्र लोंकरी शाल त्यावर त्यांची शुभ्र विपुल दाढी, भव्य कपाळ, पाणीदार डोळे, एकंदर दृश्य मोठें प्रेरक दिसलें. प्रतापबाबूंचें इंग्रजी भाषेवरचें प्रभुत्व अपूर्व होतें. "Oh God of all nations !" या शब्दानें त्यांनीं आपली गंभीर प्रार्थना इंग्रजींतून सुरू केली. ती आत्म्याला हालवून जागी करणारी होती. हे दोन्ही महापुरुष पुढल्यावर्षीच वारले. त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला म्हणून मला विशेष समाधान वाटलें.
कालीमाता : ह्या सफरींत कलकत्त्यास मीं एक अत्यंत किळसवाणा प्रकार पाहिला. तो तेथील कालीमातेच्या देवळांतला होता. एके दिवशीं तिसरे प्रहरीं मी कालीमातेचें देऊळ पाहण्यास गेलों. सण वगैरे कांहीं नसतां देवळांत बरीच गर्दी होती. फूलवाल्यांची दुकानें देवळाच्या रस्त्यावर रांगेनें बसलीं होतीं. हजारों फुलांच्या माळा कालीमातेवर वाहून पुजारी पुन्हां त्याच माळा गिर्हाइकांस विकत असत. गिर्हाईक त्या मुकाट्यानें घेत. इतर ठिकाणीं नारळाचीं दुकारें असतात त्याप्रमाणें येथें लहान लहान कोंकरांचीं दुकानें होतीं. कित्येक दिवस खावयास न मिळाल्यानें हे प्राणी अत्यंत रोडावलेले दिसत. मंदिर हुगळी नदीचे कांठीं आहे. कालीमातेची मूर्ति अत्यंत भेसूर असून तिच्या तोंडांतून भली मोठी जीभ बाहेर आलेली पाहून नवख्याच्या पोटांत धडकी भरे. पुढें विस्तीर्ण अंगण असून मध्यभागीं देवीसमोर दोन मोठ्या खांबांचें वधस्थान आहे. भक्त लोक डोळ्यांत जीव धरलेल्या कोंकराला नदींत बुडवून व आपणहि सचैल स्नान करून वधस्थानीं येत. दोन लांकडांमध्यें त्या बिचार्याची मान घालून पुजारी एका झटक्यासरशीं शीर धडावेगळें करीत. अर्थात पुजारी जातीनें अस्सल ब्राह्मणच असे. गरम गरम रक्ताचा टिळा भक्ताच्या कपाळावर लावून त्याचा नवस पूर्ण करीत असे. असे बली अंगणांतून अस्ताव्यस्त पडलेले मीं जवळ जवळ चाळीस मोजले. त्यांत सुमारे चार रेड्यांचीं प्रेतें होतीं. सबंध अंगणभर रक्तामांसाचा चिखल सांठला होता. त्यांतून जाण्याची मोठी मुष्कील पडे. जगन्नाथाच्या देवळांतील वैष्णवशोभा पाहिल्यावर येथील शाक्तांच्या लीला पाहून निरीक्षकाचा दृश्यपालट चांगला होतो. हिंदुधर्माची पुरातन काळापासून होत असलेली ही विटंबना अजून अखंड चाललेली पाहून मन उद्विग्न होतें. सहानुभूतिशून्य परकीयांना हा प्रकार पाहून काय वाटत असेल ! हिंदुधर्माचीं उज्ज्वल स्थानें इतरत्र आहेत, नाहीं असें नाहीं. पण प्रमुख क्षेत्रांतील असले भीषण अत्याचार पाहून उज्ज्वल स्थानांचें स्मरण कोणाला होणार ? मूर्तिपूजेचा हा महिना पाहून हिंदु धर्माच्या सुधारणेची प्रेरणा महात्म्यांना होते. पण त्यांस सनातनीयांकडून एकजात विरोधच होतो, हें धर्माचें नशीब ! यापुढें वाटेंत कोठेंही न थांबतां मी मुंबईस आलों. अनुभवानें मन इतकें भरून गेलें कीं, सर्व भारताची यात्रा होतां होईल तों लवकर आटोपण्याचा मीं निश्चय केला.