निवडणूक
१९२० सालीं माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांची धामधूम उठली. वरील सुधारणान्वयें नोव्हेंबर महिन्यांत पहिली निवडणूक होणार होती. मराठ्यांमध्यें जे दोन भिन्न पक्ष पडले होते त्या दोहोंची एक संयुक्त सभा जेधे मॅन्शनमध्यें झाली. त्या सभेचें मला बोलावणें आलें. पुढील निवडणुकींत मीं उभें राहावें असें दोघांचें मत पडलें. मराठ्यांसाठीं सात राखीव जागा सरकारनें ठेवल्या होत्या. ''त्या राखीव जागेसाठीं मी उभा राहणार नाहीं. त्यांतील जातीयवाचक तत्त्वाच्या मी विरुद्ध आहें'' असें मी बजावलें. पुणें शहरच्या उघड्यां जागेसाठीं सर्व पक्षांनीं मिळून मदत केल्यास मीं उभा राहण्याचें कबूल केलें. माझें म्हणणें कळवण्यासाठीं 'बहुजनपक्ष' या नांवानें मीं माझा सविस्तर जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांतील पुढील उतार्यावरून माझें मत समजेल - हिंदुस्थानांतील एकंदर बहुजनपक्ष लोकसंख्येचे केवळ राजकीय दृष्ट्या दोन मुख्य भाग पडत आहेत. ते हे कीं (१) विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबलानें पुढारलेला वर्ग. (२) आणि दुसरा यांतील कोणतेंच बल अंगीं नसल्यानें व नाइलाजानें मागासलेला वर्ग किंवा बहुजनसमाज. ह्या दुसर्या वर्गांतच अत्यंत तिरस्कृत अशा अस्पृश्यवर्गाचा अंतर्भाव होतो. हल्लींच्या राजकीय सुधारणेचा नुसता अरुणोदय होतो न होतों तोंच ह्या दोन भागांत मोठा विरोध भासूं लागला आणि या विरोधानुसारे बहुजनसमाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाचा एक नवीन पक्षच होऊन चुकला आहे. ह्यालाच ब्राह्मणेतरपक्ष असें नांव दिलें जातें. पण नाइलाज आणि बलहीनता हीं जी मागासलेल्या वर्गाची मुख्य लक्षणें तीं ह्या वर्गाच्या पक्षास 'ब्राह्मणेतरपक्ष' असें जातिविशिष्ट नांव दिल्यानें अगदीं काटेकोर रीतीनें सार्थ होत नाहींत. म्हणूनच ह्या नवीन पक्षास बहुजनपक्ष अथवा जनपदपक्ष असें अगदीं सार्थ व निर्विकल्प नांव दिल्यानें त्यावर कसलाही आक्षेप आणण्यास जागा उरणार नाहीं.
कार्यपद्धति : हा नवीन पक्ष जरी इतरांशीं स्वतंत्रपणानें वागणारा आहे तरी जेथें जेथें त्याचा हितसंबंधाचा प्रश्न उभा राहील, तेथें तेथें त्याचा समानतेचा दर्जा संभाळून जी कोणी व्यक्ति असो अथवा पक्ष असो त्याला सक्रीय साहाय्य करण्यास तयार असेल त्याच्यासाठीं तेवढ्यापुरतें सहकार्य करावयाला हा पक्षही तयार राहील. कारण ह्या पक्षाच्या पायाखालीं केवळ पोकळ भावना नसून भरीव हितसंबंध आहेत. ह्या पक्षांत खालील वर्ग मोडतात.
१ ला, शेतकरी वर्ग : ह्यांत डोईजड जमीनदारांचा किंवा पिढीजात जहागीरदारांचा समावेश मुळींच होत नाहीं. जो आपल्या मालकीचें अथवा कौलाचें शेत आपणच वाहतो आणि त्या कामासाठीं पुरेशा मजूरदारांना समान दर्जानें योग्य वेतन देऊन संभाळतो तोच शेतकरी जाणावा.
२ रा, शिपाईवर्ग : ह्यांत सरदारांची गणना मुळींच नाहीं. पण सामान्य शिपायाचे हितसंबंध आमच्या पक्षानेंच राखले पाहिजेत. कारण ते मागासलेलेच आहेत. कुणबी हा ह्या सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमीनदार व जहागिरदार हे केवळ त्याचे पोष्य होत. तसेंच हातावर शिर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय. तो केवळ पट्टेवाला चपराशी नव्हे.
३ रा, शिक्षकवर्ग : ह्यांत सोंवळे शास्त्री, हक्कदार पुरोहित किंवा बलुते जोशी हे किंवा इतर ऐतखाऊ यांची गणना करतां येत नाहीं. वाङ्मयाचें किंवा उद्यमाचें व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायख आहेत व जे आपल्या वृत्तीचा पिढीजात हक्क न सांगता बाजारभावाप्रमाणें चालू वेतन घेण्यास तयार आहेत त्यांची जात, धर्म कांहीं असो, त्यांचे हितसंबंध ह्या पक्षानें राखणें जरूर आहे.
४ था, उदमी : सुतार, सोनार, शिंपी, तेली, तांबोळी, गवळी इत्यादि लहान लहान धंदे करून राष्ट्राची सेवा करणारे जे अशिक्षित व अनधिकारी वर्ग आहेत तेही राष्ट्राचे धारक असून त्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई यांपेक्षां रतिभरही कमी नाहीं.
५ वा, दुकानदार : ह्यांत व्याज देऊन दुसर्याचें भांडवल वळवून आणून त्यावर गबर होणारे पेढीवाले किंवा कंपनीवाले वर्ज्य आहेत. परंतु उदमी लोकांच्या व मजुरांच्या साहाय्यानें जी राष्ट्रीय संपत्ति शेतकर्यानें निर्माण केली व शिपायांनीं राखली तिची देशभर वांटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांची तितकीच जरुरी आहे. हा वर्ग डोईजड होऊन बहुजनसमाजाचें रक्त बिनहक्क शोषणार नसेल तर ह्यालाही पुढें आणण्यासाठीं आमच्या पक्षानें झटणें अवश्य आहे.
६ वा, मजूरवर्ग : ह्यांत बाजारभावाप्रमाणें वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हेत तर बुद्धिचातुर्य लढवणारे वकील, डॉक्टर यांचाही समावेश होण्याचा संभव आहे. परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबळामुळें आपल्या गरजेपेक्षां जास्ती धनसंचय करून अधिकारपदावरही सहजच जाऊन बसतो. इतकेंच नव्हे तर आपल्या विद्येच्या व चळवळी स्वभावाच्या जोरावर बहुजनसमाजाचें पुढारीपणही बहुतेक हिस्से त्याच्याच वांट्याला येतें. असे लोक तत्वतः मजूर असले तरी वस्तुतः मागासलेले नसल्यामुळें त्यांच्या हितसंबंधांची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणें बरें. बाकी उरलेल्या खर्या अंगमेहनती मजुरांची दाद आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेंच लागणें शक्य नाहीं. मजूरही डोईजड झाल्यास त्यांची समजूत करण्याचा अधिकार बहुजनपक्षालाच आहे.
७ वा, अस्पृश्यवर्ग : अस्पृश्यपणामुळें हा वर्ग मागासलेलाच आहे; एवढेंच नव्हे तर चिरडला गेला आहे. धर्माचीं, परंपरेचीं, रूढीचीं अगर दुसरीं कोणतींही खरीं-खोटीं कारणें सांगत न बसतां अस्पृश्यता व असहाय्यता नष्ट करून त्यांना अगदीं समान दर्जानें बहुजनसमाजांत एकजीव करणें हें ह्या पक्षाचें केवळ पवित्र कार्य आहे. पुष्कळशी संधि वायफळ वादांत, ढोंगी ठरावांत व मतलबी सहानुभूतींत अगोदरच दवडली गेली असल्यामुळें ह्या वर्गांतील व्यक्तींना साहजिकच भलतेंच वळण लागूं लागलें, म्हणून आमच्या पक्षानें सावध राहिलें पाहिजे.
८ वा, स्त्रीवर्ग : चालू राज्यक्रांतींत आमच्या देशांतील स्त्रीवर्गाच्या हातीं कांहींच लाभलें नाहीं. आमचा पक्ष विद्वानांचा नाहीं; वक्तयांचा नाहीं; ओरडणारांचा नाहीं; म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारा आहे असें थोडेंच होणार आहे ? स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा. त्यांची हयगय करूं तर पाळण्यांतच आमचें थडगें डोलूं लागेल हें आम्ही पूर्ण जाणून आहोंत.
येथवर आम्ही केवळ वर्गवारीनें हितसंवर्धनाचें निरीक्षण केलें. पण ज्यांची वर्गवारी मुळींच करतां येत नाहीं असे पुष्कळ हितसंबंध आहेत. सक्तीच्या शिक्षणाचा, मद्यपाननिषेधाचा, धार्मिक विधि व सामाजिक परंपरा पाळण्याचे बाबतींत स्वयंनिर्णयाचा इत्यादि कोणताही पक्ष घ्या. हे सर्व राष्ट्रीय असूनही स्वतःस 'राष्ट्रीय' म्हणवून घेणाराच पक्ष जेव्हां त्यांच्या आड येतो आणि 'प्रागतिक' म्हणवून घेणारा आपले हात टेकतो तेव्हां बहुजनसमाजास जागें करून त्याला स्वतःच्या पायावर उभें करण्याचें कठीण काम करण्यासाठीं आमच्यासारख्या एखाद्या स्वतंत्र व नवीन पक्षाला पुढें येणें जरूर आहे. राष्ट्रहिताची ज्याला चाड असेल त्याच्या हिताला आमचाही विरोध नसेल. ते सर्व आम्हांला सामील होतील, निदान साहाय्य तरी करतील अशी आम्हांला उमेद आहे.''
विठ्ठल रामजी शिंदे
नानाची पेठ, भोकरवाडी
पुणें, ता. १ सप्टें. १९२०
निवडणुकीच्या बहुतेक खर्चाची तरतूद करण्याची जबाबदारी बडोद्याचे माझे परमपूज्य मित्र रा. खासेराव जाधव यांनीं स्वतः पत्करली. इतकेंच नव्हे तर ते अंगमेहनतीनें स्वतः मतें मिळविण्यासाठीं पुण्यास दोन महिने येऊन राहिले. पुण्याच्या जागेकरितां रा. नरसोपंत केळकर (जहालांमार्फत), मवाळांमार्फत शेठ मानूरकर आणि स्वतंत्रपणें रा. वासुदेवराव गुप्ते व मी असे चार उमेदवार उभे होतों. पैकीं वासुदेवराव गुप्ते यांना कोल्हापूरचे श्रीमंत शाहुछत्रपति यांचा पूर्ण पाठिंबा होता. स्वतः महाराज आणि त्यांचे दिवाण रा. ब. सबनीस हे पुण्यास येऊन राहिले होते. मला पाठबळ देण्यासाठीं मेहेरबान खासेराव जाधवांच्या अध्यक्षतेखालीं भवानी पेठेंत एक प्रचंड जाहीर सभा भरली. तींत आपली बाजू मांडण्यासाठीं रा. नरसोपंत केळकरांनीं आपलें भाषण केलें. ''त्यांचे वाडवडील शेतकरी होतें. ते 'मराठा' पत्राचे संपादक होते, म्हणून मराठेच आहेत.'' ही बातमी ऐकल्यावर श्रीमंत शाहूमहाराजांचें मला स्वदस्तरचें एक सविस्तर पत्र आलें. त्याचा सारांश खालीलप्रमाणें आहे.
छत्रपतींचें पत्र : रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांस सप्रेम लोकांची वृद्धि असावी ही विनंती. मला मनापासून आपलें अभिनंदन करण्याची परवानगी द्या. आपण शहरातर्फे निवउून यावें अशी माझी आशा आहे. रा. नरसिंह चिंतामण केळकर म्हणतात कीं ''मी मराठा आहे, म्हणून मला निवडून द्यावें. कारण मी 'मराठा' वर्तमानपत्र चालवतों.'' त्याच्यावर मी म्हणतों कीं माझ्या बैलाचें नांव 'ब्रिटानिया' ठेवलें आहे, माझ्या आवडत्या घोड्यांचें नांव 'टर्किश फ्लॅग' ठेवलें, माझ्या गाईचेचं नांव 'जपानिका' ठेवलें म्हणून का मी जपानी अगर टर्की लोकांचा पुढारी होणें योग्य होईल ? वि. रा. शिंदे मराठे वर्गापैकीं आहेत. जपानांतील सामुराई (क्षत्रिय) वर्गानें आपलें उच्च स्थान सोडून सर्व लोकांस आपल्या बरोबरीचें केलें व देशोन्नति केली तसें शिंद्यांनीं केलें आहे. मी पुण्यास लवकर येणार आहें. भेटीअंतीं सर्व खुलासा होईल. परमेश्वर आपणांस इलेक्ट करो.
ता. क. जहाल असो किंवा मवाळ असो. जपानी असोत किंवा टर्किश असोत, आमचें धोरण असेंच कीं, ज्यांत जनतेचें धोरण त्यांशीं आम्ही सहाय्य करणेचें व आमचा पक्ष स्वतंत्रच राहावयाचा. सत्यपक्षांशीं नेहमीं साहाय्य करण्याचें हेंच ना आम्हीं आमचें ध्येय ठेवण्याचें ? ह्यांत काय चुकत असल्यास लिहून कळवावें. आपण, वृद्ध, अनुभवशीर आहांत, म्हणून मी आपल्या उपदेशाची अपेक्षा करीत आहे.
ता. क. आम्ही कोणांतच मिळूं इच्छित नाहीं. सत्य असेल तेथें मिसळल्याशिवाय राहणार नाहीं. हेंच ना आम्हीं मुलांनीं ध्येय ठेवायचें ? लोभ करावा ही विनंती.
( सही ) शाहू छत्रपति
स्टेशन बंगला, ता. ३०।८।२० इसवी
आपण आम्हां सर्वांचे विनंतीस मान देऊन इलेक्शनला उभें राहण्याचें कबूल केलें याबद्दल आम्हांस आपले उपकार वाटत आहेत. आपल्यासारखे मोठे योग्य पुरुष मराठा समाजाला काय तर कोणत्याही समाजाला लाभले तर फारच उत्तम आहे. इलेक्शनच्या कामीं माझ्या हातून जी सेवा होईल ती मी मोठ्या आनंदानें करीन.
( सही ) शाहू छत्रपति
भवानी पेठेंतील मारामारी : शाहू छत्रपति पुण्यास आले. शिवाजी मराठा शाळेनें त्यांचे अध्यक्षतेखालीं भवानी पेठेंत एक मोठी जाहीर सभा बोलाविली. त्यांत सर्व पक्षांची व इतरही मराठे मंडळी हजर होती. छत्रपतींनीं मराठा क्षात्रजगदगुरु नेमण्याचा विचार चालविला होता. मींही कांहीं बोलावें असा आग्रह केल्यावरून मीं उठून सांगितलें, ''धार्मिक बाबतींत कांहीं वाद निघाल्यास त्यांत अखेरचें मत अभिषिक्त राजानें द्यावें अशी परंपरा पहिल्या शाहूमहाराजांपासून आहे, असें इतिहास सांगतो. आतां छत्रपति शाहू महाराजांनीं दुसर्या कोणास जगदगुरु न नेमतां त्याचे सर्व अधिकार आपणच चालवावेत.'' यानंतर माझ्या मागून रा. भास्करराव जाधव यांचें भाषण झालें. त्यावर बराच वाद माजून सभेंत गोंधळ उडाला. चांगली मारामारी झाली. सभा उधळली. शेवटीं या सभेचा परिणाम माझ्या निवडणुकीवर झाला. कारण ज्या सर्वपक्षाच्या मराठ्यांनीं मिळून मला उभे केलें होतें, त्यांच्यांत भयंकर फूट पडली.
याच सुमारास अखिल राष्ट्रांत महात्मा गांधींच्या कौन्सिलप्रवेशावर बहिष्काराची चळवळ मोठ्या जोरांत चालली. म्हणून रा. नरसोपंत केळकर यांनीं आपली उमेदवारी मागें घेतली आणि अखेरीस मलाही या निवडणुकींत अपयश आलें. तथापि माझे मित्र खासेराव जाधव ह्यांनीं घरोघर हिंडून मतें मिळवण्यासाठीं जी अंगमेहनत केली आणि हजारों रुपयांची झीज सोसली त्याबद्दल त्यांचे उपकार मी कधीं विसरणार नाहीं. 'विजयी मराठा'कार श्रीपतराव शिंदे, रा. रा. गंगारामबुवा काळभोर, रा. जेधेबंधु आणि लष्करांतील माझे पारशी मित्र डॉ. मोदी यांनीं जी निष्काम मदत केली त्या सर्वांचा मी ॠणी आहें.