धर्मसेवा

माझी मनोरचना  :  माझ्या सार्वजनिक कामाच्या आठवणी आणि अनुभव देण्यापूर्वी माझीं ध्येयें आणि मनोरचना यांविषयीं थोडासा सामान्य विचार करणें जरूर आहे.  त्याशिवाय पुढील आयुष्यामध्यें ज्या क्रांत्या झाल्या आणि जे वळसे पडले त्यांची वाचकांना नीटशी कल्पना येणार नाहीं.  कोणाही व्यक्तीच्या सार्वजनिक जीविताचा जो परिपोष होतो त्याचे दोन अगदीं भिन्न प्रकार आहेत.  एकाचा उदय विश्वात्मकतेमध्यें होऊन हळूहळू स्थानिक प्रश्नाकडे उतरत जातो, तर दुसर्‍याचा उदय अगदींच स्थानिक प्रयत्‍नांत होऊन त्याचें वलय विश्वात्मकतेकडे विस्तृत होऊं लागलें.  उदाहरणार्थ, एखादा आपल्या जातीच्या सुधारणेडे लक्ष घालतो किंवा जातिभेदावर त्याचा मुळींच विश्वास नसला तर नागरिक सेवेंत लक्ष घालतो व हळूहळू राष्ट्राकडे आणि अखेरीस विश्वाकडेही त्याचा लय लागतो.  याच्या उलट दुसरी व्यक्ति एकदम धर्मसुधारणेकडे वळते, म्हणजे विश्वधर्मापासून सुरुवात करून त्याचीं भिन्न भिन्न प्रतीकें, समाजसुधारणा, समाजसेवा, राष्ट्रोद्धार, त्यांतील निरनिराळ्या वर्गांची उन्नति किंवा अखेरीस आपल्या स्वतःच्या कुटुंबांतील आप्‍तांची काळजी इकडे उतरूं लागते.  माझा जीवितविकास यांपैकीं दुसर्‍या प्रकारें घडला.  पहिल्या भागांत (पृष्ठ १२९) 'जागृतींतलें स्वप्न' म्हणून जें सदर आहे तें फार अर्थपूर्ण आहे.  लंडन येथील पॅस्मोर एडवर्ड इन्स्टिट्यूटमधील चित्रें पाहून व व्याख्यानें ऐकून माझ्या विश्वव्यापक ध्येयाला जी चालना मिळाली त्याचें हें स्वप्न द्योतक आहे.  ह्या स्वप्नाप्रमाणें जरी माझ्या हातून जगभर प्रवास घडला नाहीं, तरी माझ्या जीवितकार्यांत माझें विश्वध्येय ध्रुवाच्या तार्‍याप्रमाणें माझ्या नजरेपुढें कायमचें राहिलें.

पहिल्या भागांत माझ्या मनोविकासाचें वर्णन करीत असतांना मीं म्हटलें आहे कीं, मी ब्राह्मसमाजांत गेल्यानें सुधारक झालों असें नसून मी सुधारक होतों, म्हणून ब्राह्मसमाजांत गेलों.  माझ्या उदार ध्येयामुळें मीं मनामध्यें जीं वेळोवेळीं मानवी आयुष्याचीं चित्रें रेखाटलीं तिला तंतोतंत जुळेल अशी ब्राह्मसमाजाची ठेवण मला दिसली.  त्यामुळें मी एकदम ब्राह्मसमाजांत (मुंबई प्रार्थनासमाजांत) शिरलों.  एवढेंच नव्हे, तर लवकरच त्याच्याशीं मी इतका तादात्म्य पावलों कीं, स्वतःला पूर्णतः वाहून घेऊन त्याचें प्रचारकार्य हीच तळमळ मला लागली.

दोन पक्ष  :  त्या वेळीं हिंदुस्थानांत, विशेषतः महाराष्ट्रांत, सार्वजनिक चळवळ करणार्‍यांचे दोन भिन्न पक्ष होते.  एक स्वतःला राष्ट्रीय ऊर्फ जहाल म्हणवीत असे, तर दुसरा स्वतःला प्रागतिक ऊर्फ उदार म्हणवीत असे.  पण एकाचा जहालपणा आणि दुसर्‍याचा उदारपणा प्रतिपक्ष्याच्या कार्यांत मात्र दिसून येत नसे.  म्हणून हे एकमेकांच्या कार्यांचा हेवादावा आणि वेळप्रसंगीं एकमेकांस उघडउघड विरोध करण्यासही कचरत नसत.  दोघांचें एकच कार्य म्हणजेच राष्ट्रीयता व प्रागतिकता पूर्णांशानें होतें हें कांहीं दोघांना पटत नव्हतें.  त्यामुळें त्या वेळच्या माझ्यासारख्या तरुणांची फार ओढाताण होत असे.  मोठमोठीं धेंडें मोठमोठ्यानें ओरडून काय सांगतात आणि वागतांना किती आकुंचन पावतात ह्याविषयीं निर्णय घेतांना माझ्यासारख्याला लहान तोंडीं मोठा घास घेतल्यासारखें होई.  मग सार्वजनिक सेवेंत पदार्पण केल्यावर प्रत्यक्ष काम चालविण्यांत मला फार जड जाऊं लागलें.  उदाहरणार्थ, सर डॉ. भांडारकर व नामदार गोखले हे दोघेही प्रागतिक पक्षाचे मेरुमणि होते.  पण डॉ. भांडारकरांचा आपले सर्व प्रयत्‍न धर्माच्या पायावर करण्याचा अट्टाहास, तर गोखल्यांना धर्माबद्दल पूर्ण औदासिन्य असून राजकारणाचा जेथें तेथें मोह पडत असे.  विलायतेहून परत आल्यावर एकदां नामदार गोखल्यांनीं, ''आपण आस्तिक झालेलें बरें'' असे उद्‍गार मजजवळ काढले.  उलटपक्षीं मी प्रार्थनासमाजाचा प्रचारक असूनही वेळोवेळीं राजकारणांत डोकावतों हें पाहून डॉ. भांडारकर मला प्रेमानें आणि विनोदानें टोमणा मारीत कीं, ''अरे, तूं कांहीं झालें तरी गोखल्यांचाच शिष्य.''  मीही मग तितक्याच विनोदानें उत्तर देत असें कीं, ''दादासाहेब, नामदार गोखले आपले शिष्य.  मग मी आपला नातशिष्य ठरत नाहीं काय ?''

भांडारकर व गोखले ह्यांच्यामध्यें जर अशी तेढ तर चंदावरकर आणि टिळक ह्यांच्यामध्यें किती सलोखा असावा ह्याची कल्पनाच केलेली बरी.  मला तर माझ्या कामासाठीं या दोघांशींही जोड राखावी लागत असे.  म्हणजे अगोदरच अवघड असलेलें काम ह्या नव्या मानसिक उपाधीमुळें जवळजवळ अशक्य, निदान अत्यंत क्लेशकारक होऊन जात असे.  पण ही ओढाताण अखेरपर्यंत राहिली नाहीं.  भारतीय चळवळीचा विकास होऊन आज ही ओढाताण महात्मा गांधींच्या अष्टपैलुत्वामुळें बरीच कमी झाली आहे.

गंगा व यमुना ह्या दोन्ही नद्यांचा उगम हिमालयांत आहे; पण त्या मोठ्या प्रदेशावरून एकमेकांपासून अलग वाहात येऊन प्रयाग येथें पुन्हां एकत्र होतात.  तोच प्रकार आमच्या भारतीय चळवळीचा झाला आहे.  ह्या दृष्टीनें पाहातां राजा राममोहन राय हे हिमाचलाप्रमाणें आणि महात्मा गांधी हे प्रयागप्रमाणें भारतीय इतिहासांत अखंड शोभत राहतील.  राष्ट्रीयतेची यमुना आणि प्रागतिकतेची गंगा ही राजा राममोहन रायच्या चरणापासून निघून महात्माजींच्या अंजलीमध्यें पुन्हां एक झाल्या आहेत, हें किती गोड दृश्य !  पण हें दृश्य मला माझ्या कार्याच्या सुरुवातीला दिसण्यासारखें नव्हतें.  कारण ह्या गंगा व यमुना त्या वेळीं एकत्र झाल्या नव्हत्या.  म्हणून मला वाजवीपेक्षां अधिक त्रासाला तोंड द्यावें लागलें.

प्रयोगाचें नाविन्य  :  १९०३ च्या नोव्हेंबरमध्यें मुंबई प्रार्थनासमाजानें एकमतानें ठराव करून मला आपला प्रचारक नेमलें.  अल्लड तरुण असतांना ज्या मुंबई प्रार्थनासमाजाला मी वरवर पाहून इतरेजनांप्रमाणें नांवें ठेवीत होतों त्याच्याच मी आतां एकनिष्ठ सेवक झालों.  त्यावरून अंगांत थोडासा पोक्तपणा येऊं लागला असा अंदाज करण्यास हरकत नाहीं.  प्रार्थनासमाजाचें प्रचारकार्य हा त्या वेळीं एक अननुभूत प्रयोग होता.  माझ्यापूर्वी श्री. सदाशिवराव केळकर व श्री. शिवरामपंत गोखले ह्या दोघांनीं हें प्रचारकार्य केलें होतें.  तथापि ह्या प्रचाराची घटना माझ्या वेळीं अगदीं नवीन होती, असें म्हणावयास हरकत नाहीं.  प्रचारकार्यासाठीं योग्य संस्थेंतून तयार होऊन येणें, आल्यावर तें कार्य जीविताचा एकमेव हेतु म्हणून पत्करणें, आपल्या व कार्याच्या योगक्षेमासाठीं केवळ ईश्वराशिवाय इतरांवर अवलंबून न राहणें, कार्याचा विस्तार जसजसा होईल तसतशी साधनसामग्री हातास कशी येते याची प्रचीति घेणें वगैरे गोष्टी अगदीं नवीन होत्या.  हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध यांचीं तत्त्वें आणि ध्येयें जशीं निरनिराळीं आहेत तशीच त्यांची प्रचारकार्यपद्धतिही तत्त्वानुसार वेगवेगळी आहे.  ब्राह्मसमाजानें ह्या निरनिराळ्या धर्मतत्त्वांचा व ध्येयांचा ज्या अर्थी समन्वय केला आहे त्या अर्थी कार्यपद्धतींतही त्याला समन्वयच करणें भाग आहे.  ह्यासाठीं त्याला कोणी वंदो अथवा निंदो.

पद्धतीचे भेद  :  मुसलमान पद्धति लोकसत्तात्मक (Democratic), तर ख्रिस्ती पद्धति पितृवात्सल्याची, मेंढपाळाची (Pastoral), हिंदुप्रचारपद्धति भिन्न जाती व वर्ग यांच्यामध्यें विभागलेली, राजकारणी (Political), तर बौद्धांची निस्संग उदासीन वृत्तीची (Supreme Indifference).  ब्राह्मसमाजानें ह्या आवळ्यांची आणि भोपळ्यांची मोट कशी बांधावी ?

बंगाल्यांतील ब्राह्मसमाजाचें कार्य मोठ्या प्रमाणावर चाललें असल्यामुळें राममोहन राय, देवेंद्रनाथ, केशवचंद्र सेन ह्या विभूतींच्या अवतारकार्यामुळें गेल्या शतकांत त्या प्रांतीं आजीव प्रचारकांची वाण भासली नाहीं.  केशवचंद्रांच्या प्रभावळींत घरदार टाकून किंबहुना तें घेऊनही लहानथोर ताकतीचीं माणसें बेहोष होऊन पडत असत.  त्या मानानें गेल्या शतकाच्या शेवटापर्यंत ब्राह्मधर्माचें प्रचारकार्य तेजस्वीपणानें पार पडलें.  केशवचंद्रांचे दोन प्रभावी शिष्य पंडित शिवनाथशास्त्री आणि प्रतापचंद्र मुझुमदार यांनीं त्यांच्या मागूनही प्रचारकांची उणीव भासूं दिली नाहीं.  पण बंगाल्यांतला प्रकार वेगळा आणि बंगाल्याबाहेरचा प्रकार वेगळा.  बंगाल म्हणजे ब्राह्मधर्माचें सरोवर आहे.  त्यांतील पाणी कालव्यानें काढून अखिल भारतावर बागाईत करावयाची आहे.  बंगाल-बिहार प्रांतांत साक्षात् बौद्धधर्माचा उदय आणि प्रसार झाला असल्यानें जातिभेद आणि मूर्तिपूजा यांचें विष इतर प्रांतांप्रमाणें रुजलें नाहीं.  हा प्रांत आर्यावर्ताच्या बाहेरचा, मोंगली सीमेजवळचा, अर्धमोंगली असल्यामुळें ह्याच्यावर आर्यांचे राजकारणी हल्ले दक्षिण दिशेप्रमाणें झाले नाहींत.  रामायणाचें कार्यक्षेत्र द्राविड देशांत सताड पसरलें; पण रामानें पूर्वेकडे महाकोसलाची सीमा देखील ओलांडली नाहीं.  मध्ययुगांत मद्रासेकडे अळवार नांवाच्या भक्तांनीं वैष्णवधर्म पसरविला.  महाराष्ट्रांत तो वारकर्‍यांनीं वाढविला.  तें काम चैतन्यानें बंगाल्यांत केलें.  ब्राह्मसमाजाची वाढ इतर प्रांतांपेक्षां बंगाल्यांतच अधिक खुली कां झाली त्याचीं कारणें वर दिलीं आहेत.  ब्राह्मसमाजाची उपासनापद्धति देवेंद्रनाथानें घालून दिली ती ख्रिश्चनपद्धतीप्रमाणें आहे, अशी निंदाव्यंजक टीका होत असते.  ती टीका विशेष निरीक्षण करून केली जाते असें नाहीं.  देवेंद्राचें इंग्रजी शिक्षण विशेषसें न झाल्यानें व हिंदुस्थानाबाहेर प्रवासही न घडल्यानें त्यानें प्रणीत केलेल्या उपासनापद्धतीला वेदोपनिषदांचेंच आवरण फार पडलें.  त्याच्यामागें केशवचंद्र सेनावर चैतन्याच्या भक्तिमार्गाचें दडपण पडल्यानें टाळ, मृदंग आणि पताका यांचा कहर ब्राह्मसमाजांत झाला.  तरी टीकाकार म्हणतो कीं, ब्रह्मोपासना ख्रिस्ती पद्धतीचीच.  उपासनेचें कसेंही असो, प्रचारकपद्धतींत ख्रिस्तांचा जोरकपणा, सहानुभूति आणि व्यावहारिकता हे गुण येतील तितके कमीच म्हणायचे.  व्यापार करण्याच्या पद्धतींत जर ख्रिस्त्यांची व्यावहारिकता आम्ही मुकाट्यानें उचलतों, तर धर्मप्रचाराबाबत ती कां हेटाळावी ?

माझ्या वेळची परिस्थिति  :  १९०३ सालच्या अखेरीस प्रत्यक्ष कार्यास सुरुवात कशी करावी या बाबतींत मला आकाश फाटल्याचा अनुभव येऊं लागला.  मी जरी एका प्रांतिक समाजाचा प्रचारक होतों, तरी मुं.प्रा. समाजाचें कार्य मुंबई शहरापुरतेंच चाललेलें होतें.  पुणें, नगर, सातारा ह्या ठिकाणीं जरी समाज होते तरी आर्थिक दृष्ट्या हे समाज मुंबई समाजापासून स्वतंत्र आणि तुटक वागतात.  परस्पर मदतीची देवघेव होत असली तरी मध्यवर्ती घटना नाहीं आणि तिला कोणी अनुकूलही नाहीं.  तशी सूचना मीं वेळोवेळीं करूनही कांहीं लाभ झाला नाहीं.  त्या वेळीं इकडील प्रांतांत आणखी एक क्रांति घडून आली होती.  मुंबई समाजाची १८६७ सालीं स्थापना झाली.  एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं मुंबई समाजाची पहिली पिढी कालवश झाली होती.  डॉ. आत्माराम पांडुरंग, मामा परमानंद, वासुदेव बाबाजी नवरंगे, वामन आबाजी मोडक, महादेव गोविंद रानडे वगैरे वृद्ध मंडळी धर्मसंस्थापनेच्या दृष्टीनें खरोखर वरच्या दर्जाची होती.  म्हणूनच त्यांचे हातून समाजस्थापनेचें महत् कार्य झालें; पण चालू युगाच्या आरंभीं डॉ. भांडारकरांखेरीज आद्य प्रवर्तकांपैकीं कोणी उरला नाहीं.  सर नारायण चंदावरकर हे पहिली पिढी व दुसरी पिढी यांना सांधणारा महत्त्वाचा दुवा होते.  त्यांची गणना वृद्धापेक्षां तरुणांतच करणें बरें.  भांडारकर पुण्यास येऊन राहिल्यामुळें मुंबई समाजाच्या नेतृत्वाचें जूं चंदावरकरांच्याच मानेवर पडलें.  त्यांना अनुयायांचा भरणा अगदीं तरुणांचाच मिळाला.  स्टुडंट्स ब्रदरगुड (विद्यार्थ्यांचें भ्रातृमंडळ) या नांवाची केवळ कॉलेजांतील तरुण विद्यार्थ्यांची सभा प्रोफेसर वेलणकरांच्या नेतृत्वाखालीं चालली होती.  सर नारायणरावांच्या नेतृत्वाला ही संस्था एक अत्यंत अनुकूल क्षेत्रच मिळालें.  समाजाच्या अप्रत्यक्ष प्रचारकार्याचें हें एक उज्ज्वल उदाहरण होतें.  प्रो. वेलणकर हे ख्रिस्ती असून शेवटीं ते प्रार्थनासमाजांत लय पावले.  त्यांच्यामागें किती तरी तरुण लोक आले.  त्यांचा उघड निर्देश करणें जरूर नाहीं.  सांगण्याचा मतलब एवढाच कीं, सर नारायणराव हे तरुणच होते.