पुनर्घटना
ह्यापुढें तीन महिन्यांनीं पुणें शाखेचे नवीन नेमलेले जॉइंट सेक्रेटरीज रा. कृ. गो. पाताडे (स्पृश्य), रा. डी. व्ही. गायकवाड व रा. रा. स. घाडगे (अस्पृश्य) यांनीं पुणें शाखेचा ता. १ एप्रिल १९२१ ते ८ जुलै १९२३ पर्यंतचा सव्वादोन वर्षांचा मराठींत अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यांत पान ६ वर खालील मजकूर आहे.
ता. २९ मार्च १९२३ रोजीं व्ही. आर. शिंदे यांनीं आपलें एक सविस्तर निवेदन ज्ञानप्रकाश व केसरी इत्यादि पत्रांतून प्रसिद्ध केलें. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अस्पृश्य बंधूंना ह्या मिशनमध्यें स्वराज्याचे सर्व हक्क देऊन त्यांच्या आत्मोद्धाराची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर टाकणें हें या पुनर्घटनेचें मुख्य लक्षण आहे. ता. २९ एप्रिल १९२३ रोजीं पुणें शाखेच्या सर्व वर्गणीदारांची साधारण सभा बोलावली. त्या सभेनें पूर्वीच्या कमिटींत भर घालून तिजमध्यें अस्पृश्यवर्गाच्या सभासदांचें बहुमत राहील असें केलें व तिजला नवीन नियमांची सनद करण्याचा अधिकार दिला. ह्या नव्या सनदेचा खर्डा ता. १५।४।२३ रोजीं भरलेल्या साधारण सभेंत पास केला. अशा रीतीनें पुनर्घटनेचें काम चाललें असतां कांहीं विघ्नसंतोषी मंडळींकडून अडथळे येऊं लागले. इतकेंच नव्हे तर कांहीं विद्वान् सभासदांनीं अस्पृश्यांपैकीं कांहीं सभासदांना चिथावून अडवणुकीचाही मार्ग पत्करला. सनदशीर प्रयत्न करण्याचें अंगवळण आमच्या लोकांत अगोदरच कमी. तशांत ज्या वर्गासाठीं हें मिशन आहे त्याच्यांतच दुही माजवून दिल्यावर ह्या कामीं अत्यंत हिरमोड करणारे अडथळे येऊं लागले. परंतु श्री. अण्णासाहेब शिंदे ह्यांनीं निर्भीडपणें रेखाटलेलें धोरण अस्पृश्य वर्गांना इतकें प्रिय झालें कीं, महारमांग, चांभार, भंगी जातींचे पुढारी देखील आपसांतील पुष्कळ दिवसांचे बखेडे विसरून आपला फायदा ओळखून झीज सोसून कामें करूं लागले. बहुतेक दररोज रात्रीं कमिटीच्या सभा होऊं लागल्या. विरुद्ध पक्षाची कारवाईही कांहीं वर्तमानपत्रांतून चमकुं लागली. मिशनमध्यें कधींच लक्ष न घातलेलीं माणसें आणि कांहीं अस्पृश्यवर्गीय व्यक्तीही ह्या विरोधांत दिसूं लागल्या. ता. २९ मार्च १९२३ च्या सभेला ७७ सभासद व सभासद नसलेले १२ गृहस्थ हितचिंतक म्हणून हजर होते. ता. १५ एप्रिल १९२३ च्या सभेला (जींत नवीन घटना पास व्हावयाची होती) फक्त सभासदांनाच घेण्याचें ठरल्यामुळें ज्यांना हजर राहण्याचा अधिकार नव्हता असे कित्येक लोक सभेच्या वेळेपूर्वीच अहल्याश्रमाच्या आजूबाजूला टेहळूं लागले. हे डावापेंच कार्यकारी मंडळींना ठाऊक असल्यानें २५ स्वयंसेवकांची तुकडी बंदोबस्तासाठीं ठेवली होती. नियमांची सनद मंजूर झाल्यावर २२ सभासदांचें नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यांत आलें. त्यांत अस्पृश्यवर्गाचे दोनतृतीयांश सभासद असून महार, चांभार, मांग, भंगी, मुसलमान या वर्गांचे प्रत्येकीं दोन आणि पारशी मराठा, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या जातींचा प्रत्येकीं एक असे जातवारीनें कमिटीनें १४ सभासद घेण्याचें ठरवलें. ८ अधिकार्यांपैकीं ६ व तीन ट्रस्टींतील १ अस्पृश्यवर्गांतील निवडण्यांत आले.
याप्रमाणें पुणें शाखेचे मुख्य अधिकार आणि कार्याची जबाबदारी अस्पृश्य पुढार्यांवर ता. १५।४।२३ पासून सोंपएयांत आल. या पुनर्घटनेला अद्यापि कांहीं लोक नाकें मुरडीत आहेत. पण अशा अपशकुनांकडे रा. शिंदे यांनीं लक्ष दिलें असतें तर त्यांच्या हातून हें मिशन निघालेंच नसतें. अस्पृश्यवर्गाचे कांहीं पुढारी ह्या स्वराज्याचे हक्कासाठीं फार उतावीळ होऊन आपल्या परिषदांतून इतका वेळ प्रतिकूल टीका करीत असत. परंतु ते आतां मिशनचे कृतज्ञ अनुयायी साह्यकारी बनले आहेत. श्री. अ. को. घोगरे, कांबळे, थोरात, घाडगे, उभाळे, सदाफुले, आदिकरून पोक्त आणि अनुभवशीर मंडळींनीं पुनर्घटनेस मनःपूर्वक मदत केली हें ह्या मिशनला अत्यंत भूषणावह आहे.''
अधिकारसंन्यास : येणेंप्रमाणें पुनर्घटना होऊन पुणें शाखेच्या सर्व अधिकार्यांची निवडणूक झाल्यानंतर माझें कार्य आटोपलें आणि मीं मातृसंस्थेंतील व इतर शाखांतील सर्व अधिकार खालीं ठेवले आणि फक्त मिशनचा संस्थापक ट्रस्टी एवढाच माझा अधिकार उरला. माझ्या व माझ्या बहिणीच्या अल्प वेतनाची नेमणूकही मीं सोडली आणि आम्ही पुन्हां एकवार उघडे पडलों. पुणें शाखेच्या नव्या अधिकार्यांनीं मला एखादें लहानसें पेन्शन द्यावें असा विचार काढला; पण कांहीं मिशनर्यांनीं काम सोडलें होतें आणि त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळाली नव्हती. मग मींच काढलेल्या मिशनमधून आणि मींच मिळवलेल्या पैशामधून मीं रिकामपणीं पेन्शन घेणें हा विचारही मला दुःसह झाला. कांहीं अंशीं शारीरिक विश्रांति आणि मानसिक शांति मिळाली हेंच पुरें झालें. झालेली पुनर्घटना मातृसंस्थेला कळवून तिची संमति घेऊन पूर्वीप्रमाणें सहकार्य चालवणें हें या पुणे शाखेचें आणि मातृसंस्थेचें काम होतें. या बाबतींत यापुढें मला कांहींच अधिकार उरला नव्हता; पण खेदाची गोष्ट ही होती कीं, मातृसंस्थेनें पुनर्घटनेस मुळींच संमति दिली नाहीं. मातृसंस्थेनें केलेल्या नियमांतील पुनर्घटनेप्रमाणें पुणें शाखेची ही नवी घटना स्पृश्य आणि अस्पृश्य वर्गांच्या सहकार्याची असूनही मातृसंस्थेची संमति न मिळाल्यानें पुणें शाखेच्या नव्या अधिकार्यांना आश्चर्य वाटलें. इतकेंच नव्हे, तर पुढील सर्व काम वादग्रस्त होऊन परस्परांचा तीव्र निषेध सुरू झाला आणि पुढील दोन तीन वर्षांत वर्तमानपत्रांत निष्कारण वाद माजला. पुणें शाखेचे मोठमोठे फंड उदा. मिस् क्लार्क मेमोरियल फंड मातृसंस्थेच्या ट्रस्टीकडे अनामत होता. शिवाय ह्या पूर्वीच्या काळांत मातृसंस्थेचा जनरल सेक्रेटरी आणि पुणें शाखेचा स्थानिक सेक्रेटरी हे दोन्ही अधिकार माझ्यामध्येंच एकवटलेले असल्यामुळें पुणें शाखेच्या बाहेरच्या कामाचा बराचसा खर्च साहजिकपणें पुणें शाखेच्या खजिन्यांतूनच झाला होता. हा नवीन अकल्पित वाद निघाल्यामुळें मातृसंस्थेकडे एका दृष्टीनें कर्जाऊ असलेल्या ह्या रकमांची परतफेड पुणें शाखेला मिळण्यास विरोध होऊं लागला; पण ह्या सर्व वादाचा तपशील येथें देणें केवळ अशक्यच नव्हे तर अनिष्ट आहे. तो सर्व देणें म्हणजे ग्रंथविस्तार अधिक होईल आणि तो कितीही तिर्हाईतपणें देऊ गेल्यास दोहों पक्षांसही मान्य होणार नाहीं. म्हणून या विषयाची अत्यंत कष्टानें रजा घेत आहें.
पुनर्घटना १५ एप्रिल १९२३ रोजीं पूर्ण झाली आणि पुढच्या २३ एप्रिल १९२३ रोजीं माझा ५१ वा वाढदिवस आला. पुणें शाखेंतील सर्व अधिकारी व शिक्षकवर्ग व विद्यार्थीवर्ग या सर्वांनीं मिळून माझा तो वाढदिवस साजरा केला. मला निरोप देतांना आनंद व खेद या भावनांनीं जमलेल्या सर्व मंडळींनीं मला एक मानपत्र दिलें. उदास वृत्तीनें मीं त्याचा स्वीकारही केला. ''जोडोनिया धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेंच करी ॥'' हा तुकारामांचा अनुभव मला प्रत्यक्ष आला.
पांचवें परिवर्तन : माझ्या जन्मापासून प्रत्येक १० वर्षांनीं एक असें माझ्या आयुष्यांत परिवर्तन घडत आलें आहे, याची मीमांसा मीं मागें केलेलीच आहे. त्याप्रमाणें आज हें पांचवें परिवर्तन घडून आलें. सुमारें ४ महिने पुण्यास स्वस्थ राहिलों. ह्यापुढें साहित्यसेवा करावी असे विचार मनांत येऊं लागले. या वेळीं आर्य-द्रवीड-वाद या संशोधन विषयाकडे माझें लक्ष लागलें होतें. इंदूर, बडोदा वगैरे संस्थानांतून आणि म्हैसूर वगैरेच्या युनिव्हर्सिट्यांतून कागदपत्रांचा पुरावा मिळवून हिंदुस्थानच्या पुरातन इतिहासाची सामुग्री मिळवण्याचा प्रयत्न चालवला होता. त्या वेळीं बडोदा येथें एक साहित्यसंमेलन झालें. त्याला हजर राहून श्रमंत सयाजीरावमहाराजांची मीं प्रत्यक्ष भेटही घेतली होती. मी बडोद्यास कायमचा जाऊन रहात असेन तर बडोद्याची मोठी सेंट्रल लायब्ररीच नव्हे तर संस्थानचे सर्व नवे-जुने कागदपत्र शोधून पाहण्याचा पूर्ण अधिकार महाराजांनीं मला देऊं केला होता. इंदूर, धार, ग्वाल्हेर आणि रजपूत संस्थानें ह्यांच्याशीं पत्रव्यवहारही मीं सुरू केला होता. डॉ. व्रजेन्द्रनाथ शील हे ब्राह्म-समाजाचे मोठे विद्वान् गृहस्थ म्हैसूर युनिव्हर्सिटीचे व्हाइस चॅन्सेलर होते. कविसम्राट् रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या विश्वभारतीलाही मीं लिहलें होतें. पण एवढें मोठें काम माझ्या एकट्याच्या आवांक्याबाहेरचें होतें. रोख पैशाचा पूर्ण अभाव असल्यानें ह्या कामांत शेवटीं मुळींच यश आलें नाहीं. 'उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथाः' हेंच शेवटीं खरें ठरलें !
चार महिन्यांनंतर माझे जुने मित्र कलकत्त्याच्या साधारण ब्रह्म समाजाचे प्रचारक बाबू हेमचंद्र सरकार यांची मुंबई येथे राममोहनदास आश्रमांत गांठ पडली. मिशनच्या कटकटींतून मी मोकळा झालों हें ऐकून त्यांना मोठा आनंद झाला. मी चार महिने कलकत्त्यास साधारण ब्राह्म समाजाच्या साधनाश्रमांत येऊन स्वस्थ राहावें अशी त्यांनीं माझ्या मागें निकड लावली. हो ना म्हणतां म्हणतां मी १९२३ च्या सप्टें. मध्यें माझी पत्नी आणि धाकटा चिरंजीव रवींद्र यांस घेऊन कलकत्त्याला गेलों. तेथें चार महिने बंगाल येथील Backward Classes Mission ची प्रशंसनीय कामगिरी ठिकठिकाणीं खेडोपाडीं जाऊन पाहिली. मी फिरतीवर असतांना माझी पत्नी सौ. रुक्मिणीबाई मलेरियानें फार आजारी पडली. स्वतः हेमबावूही ट्रॅमगाडींतून पडून त्यांचा पाय दुखावल्यामुळें अंथरुणावर पडून होते. १९२४ सालाच्या जानेवारींत साधारण ब्राह्म समाजाचा माघोत्सव सुरू झाला. याच सुमारास इंग्लंडहून रेव्हरंड डॉ. ड्रमंड (मँचेस्टर कॉलेजचे प्रि. डॉ. ड्रमंड यांचे चिरंजीव व माझे गुरुबंधु) विलायतेंतील ब्रिटिश ऍंड फॉरीन् मिशनचे प्रतिनिधि म्हणून कलकत्त्यास आले. त्यांना सर्व हिंदुस्थान फिरून पहावयाचा होता. दक्षिण आणि पश्चिम हिंदुस्थानांतील त्यांच्या सफरीवर मीं त्यांचेबरोबर जावें, मुख्य मुख्य ठिकाणीं नेऊन ब्राह्म समाजाच्या पुढार्यांचा व त्यांचा परिचय करून द्यावा आणि मँचेस्टर कॉलेजांतील पुढील हिंदी विद्यार्थ्यांची निवड करण्यांत मदत करावी आणि डॉ. ड्रमंड स्वदेशीं गेल्यावर मी पश्चिम नैर्ॠत्य किनार्यावरील मंगलूरच्या ब्राह्म समाजाचे आचार्य म्हणून तेथें राहावें असें कलकत्त्यांतील साधारण ब्राह्म समाजाच्या कमिटीनें ठरवलें आणि मी माझ्या कुटुंबाला घेऊन १९२४ च्या फेब्रुवारींत पुण्यास परत आलों.