भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
येथवर माझ्या प्रचारकार्याचें स्थानिक आणि प्रांतिक स्वरूपाचें वर्णन केलें; पण प्रथम सांगितल्याप्रमाणें माझें लक्ष ब्राह्मधर्माच्या विश्वव्यापकत्वाकडे आणि त्या उच्च अधिष्ठानावरून ब्राह्मधर्माच्या भारतीय कार्याकडे नेहमीं लागून राहिलेलें असे. या धर्माचें मुख्य अंग ही धर्मपरिषद होती. सन १८८५ सालीं हिंदी राष्ट्रीय सभेचें पहिलें अधिवेशन मुंबई येथें भरलें. त्यांत न्या. मू. रानडे यांचा अप्रत्यक्ष पुढाकार होता. त्यांची बुद्धि अष्टपैलू, भावना उदार व उच्च प्रतीच्या होत्या. पुढील दोन अधिवेशनें कलकत्ता व मद्रास शहरीं झाल्यावर अलहाबादला चौथी बैठक भरली. आरंभापासूनच राजकारणास समाजसुधारणेचा बळकट पाठपुरावा होता. अर्थात् ह्या चौथ्या बैठकींत उदारधर्माचा पाठिंबा ह्या राष्ट्रीय चळवळीस मिळणें क्रमप्राप्तच होतें. एकेश्वरी बैठकीचे अध्यक्ष ना. मू. रानडे झाले. कळकत्त्याचे मिस्टर आणि मिसेस् आनंदमोहन बोस, लखनौचे बिपिनबिहारी बोस, बिहारचे बलदेव नारायण, लाहोरचे पं. शिवनारायण अग्निहोत्री यांनीं आपापल्या प्रांतांतील ब्राह्मसमाजाच्या कार्यासंबंधीं भाषणें केलीं. पुढें सालोसालीं राष्ट्रीय सभा जेथें जेथें भरेल तेथें तेथें त्या वेळीं ही धर्मपरिषदही भरविण्यांत यावी आणि पुढील वर्षाचे सेक्रेटरी म्हणून पं. शिवनाथशास्त्री यांना नेमावें, असा ठराव करण्यांत आला.
ब्राह्मसंघ : १८८९ सालीं मुंबईला ही परिषद मुं. प्रांतिक समाजांत भरली आणि त्या वेळीं प्रांतोप्रांतींच्या पुढार्यांनीं भाग घेतला. कलकत्त्याहून नवविधान समाजाचे प्रतापचंद्र मुझुमदारही हजर होते. तेव्हां Theistic Union (ब्राह्मसंघ) या नांवाची एक मध्यवर्ती संस्था स्थापून पुढील कार्याचा प्रयत्न करण्यांत यावा असें ठरलें. (१) ब्राह्मसमाजाच्या निरनिराळ्या पक्षांच्या एकत्र उपासना व संमेलनें व्हावींत. (२) प्रचारासाठीं एकत्र प्रयत्न व्हावा. (३) परोपकाराचें आणि भूतदयेचें काम एकत्र व्हावें वगैरे. नवीनचंद्र राय ह्यांना ह्या संघाचे सेक्रेटरी नेमलें. कलकत्त्यास साधारण ब्राह्मसमाज, नवविधान ब्राह्मसमाज व आदि ब्राह्मसमाज असे निरनिराळे पक्ष पडून ब्राह्मसमाजाच्या सामाईक कार्यांत फूट पडली होती. ह्या नवीन संघामुळें ही फूट भरून येण्याचा बराच संभव होता आणि त्यांत आम्ही मुंबईकडील पुढार्यांनींच न्या. मू. रानडे ह्यांच्या नेतृत्वाखालीं उचल खाल्ली असा तर्क करण्यास बरीच जागा आहे. कारण पुढील दोनतीन सालीं रानडे ह्यांनाच परिषदेचें अध्यक्षस्थान देण्यांत आलें होतें. चवथी बैठक नागपुरास १८८१ सालीं भरली. तेथें ब्राह्मसमाज नसल्यामुळें काम फारसें झालें नाहीं. पुढील सालाकरितां वामन आबाजी मोडक व पांडुरंग सदाशिव केळकर यांस सेक्रेटरी नेमण्यांत आलें. १८९४ सालीं मद्रासच्या बैठकीस डॉ. भांडारकर हे अध्यक्ष होते व पुढील सालीं म्हणजे १८९५ सालीं पुण्याच्या काँग्रेसचे वेळीं पुणें प्रार्थनामंदिरांत ही बैठक भरली. त्या वेळीं अमेरिकेचे युनिटेरियन धर्माचे प्रसिद्ध प्रचारक रेव्हरंड जे. टी. संडरलंड हे हजर होते. ह्यापुढें मधूनमधून १९०३ पर्यंत जरी ह्या परिषदेच्या बैठकी भरल्या तरी तिचें काम मंदावलें. ५ वी बैठक अलाहाबाद येथें भरली असतां मुंबईच्या सुबोध-पत्रिकेनें लिहिलें, ''अशा प्रांतिक बैठकींचें महत्त्व राष्ट्रीय सभेच्या धामधुमींत भरणार्या भारतीय अधिवेशनापेक्षांही किंबहुना अधिक आहे. कारण प्रांतिक बैठकीनें मिळविलेल्या माहितीवरून आणि अनुभवावरून राष्ट्रीय बैठकीचें काम अधिक पायाशुद्ध व पद्धतशीर होण्याचा संभव आहे.''
अशा मंदावलेल्या स्थितींत १९०३ च्या नाताळांत मद्रासेंत भरलेल्या अधिवेशनावरून ह्या परिषदेची झालेली विस्कळित स्थिति माझ्या मनांत भरली आणि पुढील सालीं मुंबईला भरणार्या राष्ट्रीय सभेच्या वेळीं धर्मपरिषद संघटित स्वरूपांत बोलावण्याचा मीं निश्चय केला, हें मीं सांगितलेंच आहे. त्याप्रमाणें हीं पुनर्घटित एकदोन अधिवेशनें सोडून कराचींत भरलेल्या १९१३ सालच्या अखेरच्या बैठकीपर्यंत या कार्याचा सर्व भार सेक्रेटरी या नात्यानें मीं माझ्यावरच घेतला.
पुढील कोष्टकावरून ह्या एकेश्वरी धर्मपरिषदेच्या कार्याचें नीट समालोचन करण्यास बरें पडेल.
तक्ता
(तक्ता पाहाण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबई : १९०३ सालच्या मद्रास-बंगालच्या सफरीवरून हिंदुस्थानांतील निरनिराळ्या ब्राह्मसमाजांची मला बरीच प्रत्यक्ष माहिती झाली होती. १९०४ सालीं मुंबईच्या परिषदेंत हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांतून पुष्कळसे प्रमुख पुढारी मुंबईस आल्यानें त्यांच्या समक्ष परिचयाची भर पडली आणि त्यांच्यावर ह्या नवीन संघटित परिषदेचा परिणाम घडला. मुंबई प्रार्थनासमाजांतील पुढार्यांनाही ह्या नवीन प्रयत्नांचें महत्त्व कळून चुकलें. कलकत्त्याच्या खालोखाल मुंबई प्रार्थनासमाजाचें महत्त्व असल्यानें येथील बैठक समाजाबाहेरील लोकांवरही परिणामकारी झाली. यंदाच्या सामाजिक परिषदेचें अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीरावमहाराजांनीं स्वीकारल्यामुळें तो एक नवीनच विशेष घडला. म्हणून धर्मपरिषदेंतही महाराजांनीं प्रत्यक्ष भाग घ्यावा ही कल्पना मला सुचली. स्वतः मी त्यांस आमंत्रण करण्यास गेलों हें वर आलेंच आहे. स्वागताध्यक्षाचें काम सर नारायण चंदावरकरांनीं आणि अध्यक्षाचें काम गुरुवर्य डॉ. भांडारकरांनीं केल्यामुळें ह्या अधिवेशनास अधिक रंग चढला. रात्रीच्या शाळांचा बक्षीससमारंभ झाला. त्यांत अध्यक्षस्थान पत्करून त्याच रात्रीं राममोहन आश्रमांत जें थाटाचें प्रीतिभोजन झालें त्यांतही महाराजांनीं प्रमुखपणें भाग घेतला. ह्या भोजनास मुंबईच्या आर्यसमाज आणि सामाजिक परिषदेचे प्रतिनिधि यांना आमंत्रण केलें होतें. आर्यसमाजाचे सेक्रेटरींनीं १५० सभासदांना घेऊन येण्याचें कबुलही केलें होतें. प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष दानशूर दामोदरदास सुकडवाला यांनीं भोजनाचा सर्व खर्च सोसण्याची जबाबदारी घेतली होती; पण मुंबई प्रा. समाजानें कांहीं मुसलमान गृहस्थांना प्रार्थनासमाजाची दीक्षा दिलेली होती, म्हणून आयत्या वेळीं आर्यसमाजिस्टांनीं भोजनाला हजर राहण्याचें टाळलें. कृतीची बाजू आल्यावर केवळ ध्येयवादावर आकांडतांडव करणारे हे वाचीवीर कशी बगल मारतात ह्याचें हें उदाहरण आहे. शिवाय तो काळ १९०५ सालचा होता. आर्यसमाजांत बहुतेक गुजराथ्यांचाच भरणा होता. कृतीच्या सुधारणेला गुजराथ प्रांत त्या काळीं तयार नव्हता त्याचें हें उदाहरण; पण महाराज श्रीमंत सयाजीराव यांनीं गुजराथ्यांना हे उदाहरण घालून दिलें ही गोष्ट मोठी संस्मरणीय झाली. परिषदेंत निरनिराळ्या ब्राह्मो पुढार्यांचीं भाषणें झालीं. तींही नमुनेदार होतीं. पुढील परिषद बनारस येथें काँग्रेस भरत असल्यानें तेथें भरविण्याचें ठरलें. तेव्हांपासून अशा परिषदांच्या जनरल सेक्रेटरीचें काम मींच पाहावें, असें सर्वानुमतें ठरविण्यांत आलें.
काशी : काशी येथें स्थानिक ब्राह्मसमाज नाहीं. गांव जुन्या मताचा व क्षेत्राचा असल्यामुळें तेथें स्वागतमंडळ स्थापणें फार जड गेलें; पण ह्या परिषदेचें महत्त्व प्रांतोप्रांतींच्या पुढार्यांना कळलें असल्यानें मीं त्यांना उद्देशून जें सर्क्युलर काढलें त्याला सर्वांकडून उत्तेजनपर उत्तरें व वर्गणीच्या रकमा आल्या. बांकीपूरचे गुरुदास चक्रवर्ती आणि कानपूरचे महेंद्रनाथ सरकार ह्या दोघां साधारण ब्राह्मसमाजाचे सभासदांनीं काशीला जाऊन परिषदेची पूर्वतयारी करण्याचे कामीं मला मोठी मदत केली.
तीन पक्ष : ब्राह्मसमाजाचे तीन पक्ष म्हणजे (१) राममोहन राय यांनीं स्थापलेला आणि देवेंद्रनाथांनीं चालविलेला आदि ब्राह्मसमाज, (२) त्यांतून फुटून निघालेला केशवचंद्र सेन यांचा नवविधान ब्राह्मसमाज आणि (३) त्यालाही विरोध करून विभक्त झालेला साधारण ब्राह्मसमाज. ह्या कलकत्त्यांतील तीन वेगळ्या शाखांचा बरावाईट परिणाम अखिल भारतांतील ब्राह्मसमाजावर आणि त्याच्या प्रसारावर काय घडला हें सांगण्याचें हें स्थळ नव्हे. मी तो परिणाम अभ्यासू या नात्यानें जाणून होतों; पण ह्या तेढीचें स्वरूप ह्या तिन्ही पक्षांचे लोक काशी येथील परिषदेंत हजर होते म्हणून मला प्रत्यक्ष दिसलें. इतकेंच नवहे पण पुढील कार्यांत तें पावलोपावलीं नडूं लागलें. अध्यक्षाची निवड करण्यांतच मोठी नड आली. परिषद कमिटीचे चेअरमन डॉ. भांडारकर व मुंबई समाजाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांना काशीस येणें जमलें नाहीं. वेळोवेळीं महाराष्ट्रीयांनीं पुढाकार घेणें हें इष्ट नव्हतें. काशी हें गांव बगालच्या सीमाप्रांतावर असल्यानें, पुढील अधिवेशन कलकत्त्यांत भरणार असल्यानें आणि उत्तरेकडील प्रांतांत बंगाली ब्राह्मणांचीच बहुसंख्या असल्यानें कलकत्त्यांतीलच कोणा तरी सर्वमान्य पुढार्याला अध्यक्षस्थानीं बसविणें इष्ट होतें. म्हणून पं. शिवनाथशास्त्री यांना अध्यक्षस्थान देण्यांत आलें आणि त्यांनीं अटकळीप्रमाणें काम देखील सुंदर रीतीनें केलें. परिषदेचें काम एखाद्या स्थानिक समाजाच्या वार्षिक उत्सवाप्रमाणें डिसें. २४ पासून ३१ पर्यंत मोठ्या सोहळ्यानें पार पडलें. उपासना, भजनें, व्याख्यानें, नामासंकीर्तनें आणि शेवटीं प्रीतिभोजन इत्यादि तपशिलांत कोठेंच व्यत्यय आला नाहीं. निरनिराळ्या प्रांतांतून सुमारें ७५ ठिकाणांहून ब्राह्मसमाजाचे प्रतिनिधि आले होते. लंडन ख्रिश्चन मिशनच्या प्रशस्त हायस्कुलाशिवाय काशी येथें दुसरीकडे कोठेंही जागा मिळाली नाहीं. दोन तीन वर्षांच्या अनुभवामुळें ह्या खंडवजा हिंदुस्थानांतील दूरदूरच्या ब्राह्मसमाजांची सर्व प्रकारची माहिती आणि त्यांची सूचि तयार करण्याची आवश्यकता मला भासूं लागली होती. ब्राह्मधर्मसूचिग्रंथ मींच तयार करून प्रसिद्ध करावा, असा एक ठराव परिषदेनें एकमतानें पास केला. हा एक ह्या परिषदेचा विशेष म्हणावयाचा. म्हणून परिषद संपल्यावर मीं बंगाल-बिहार-आसाम या प्रांतांतून एक मोठा विस्तृत दौरा काढला. बर्याच दृष्टींनीं हा दौरा महत्त्वाचा होता, म्हणून त्याचा तपशील खालीं देणें जरूर आहे.
ह्या परिषदेंत बंगाल्यांतील तीन्ही पक्षांची परस्पर सहानुभूति बरीच वाढली व शिवाय निरनिराळ्या प्रांतांतील ब्राह्मांचा स्नेह झाला. अशा हितकारक परिषदेची खबर अधिक पसरावी, मुं. प्रा. समाजासारख्या तिर्हाइताचे कामाची माहिती इकडल्या दूरदूरच्या समाजांस कळावी, (कारण प्रार्थनासमाज व आर्यसमाज ह्यांतील भेद न जाणणारे कांहीं ब्राह्मसमाजिस्ट इकडे भेटले.) कांहीं प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करून घ्यावी, मुख्य मुख्य स्थानिक समाज पाहावे वगैरे हेतू मनांत धरून मी ह्या सफरीवर निघालों.
बांकीपूर : बिहार प्रांताची राजधानी बांकीपूर येथें ता. २ जाने. १९०६ रोजीं आलों. हा देश जरी बिहारी (हिंदुस्थानी) लोकांचा असला तरी येथें बंगाली लोकांची बरीच वस्ती असून सार्वजनिक बाबतींत त्यांचाच पुढाकार व सुळसुळाट दिसला. वायव्येकडील प्रांतांत ज्याप्रमाणें एकही तद्देशीय ब्राह्म सांपडणें कठीण त्याप्रमाणें सबंध बिहार प्रांतांत बिहारी ब्राह्मांची एकाच बोटावर मोजण्याइतकी संख्या आहे. मुख्य ब्राह्मसमाज नवविधान मताचा आहे. भाई प्रकाशचंद्र राय हे त्याचे पुढारी. हे सर्वांशीं मिळूनमिसळून वागून सार्वजनिक कामांत पुढाकार घेणारे आहेत. राममोहन राय सेमिनरी ही साधारण ब्राह्मसमाजाची असून त्या शाळेंतच ह्या पक्षाच्या उपासनाही होतात. ता. ४ रोजीं राय यांचे घरीं मीं प्रमुख मंडळी जमवून प्रथम मुंबईकडची हकीकत सांगितली. उत्सवांत एकमेकांनीं मिळून कार्यक्रम ठरवावा, एकमेकांच्या उपासनेस पाळीपाळीनें जावें असें ठरलें. बॅ. दास यांचे घरीं ता.५ रोजीं दोन्ही पक्षांच्या स्त्रियांची सभा भरलीं. पोस्टल मिशन, डोमेस्टिक मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामें स्त्रियांनीं कशीं करावयाचीं हें मीं सांगितलें. सिल्हेटहून काशी परिषदेस आलेल्या सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्यांनीं हिंदींत भाषण केलें.
मोंघीर : ता. ६ रोजीं मोंघीर येथें आलों. हें रमणीय स्थान भागीरथीचे कांठीं आहे. पुराणांतील राजा दानशूर कर्ण ह्याची दान देण्याची जागा अद्यापि गंगेच्या तीरावर दाखवितात. ब्राह्म यात्रेकरूंस या स्थळाचें महत्त्व असें सांगण्यांत येतें कीं, ब्राह्मसमाजांत पुढें जो भक्तिसंप्रदाय सुरू झाला तो मूळ या ठिकाणीं. सन १८७२ सालीं हल्लीचें मंदिर बांधण्यांत आलें. या मंदिरांत एकदां कांहीं वैष्णव मंडळींस भजनास बोलविलें होतें. त्यांपैकीं एका चांडाळ जातीच्या भक्तानें इतकें सुश्राव्य व आवेशयुक्त भजन केलें कीं, त्याचा मंडळीवर विलक्षण परिणाम झाला. पुढें साधु अधीरनाथ ब्राह्मप्रचारक यांचें भजनाविषयीं प्रेम अधिकाधिक वाढून शेवटीं स्वतः केशवचंद्र सेन येथें असतां त्यांच्यावरही भजनाचा परिणाम घडला व येथील कार्य बरेंच वाढलें. तरी येथील हल्लींची ओसाड व दीनवाणी स्थिति पाहून माझें मन गहिंवरलें व मानवी मनाची अस्थिरता पाहून विस्मयलें. मंदिरापुढील पटांगणांत केशवचंद्र सेन, साधु अघोरनाथ व दीननाथ चक्रवर्ती यांच्या तीन समाधि मध्यभागीं एका चौथर्यावर बांधल्या आहेत. १९०२ सालीं या गांवीं आर्यसमाजाची स्थापना झाली; पण तोही नीट चालत नाहीं.
भागलपूर : भागलपूर येथें ता. ७ रोजीं पोंचलों. हा समाज ता. २२ फेब्रु. १८६४ रोजीं स्थापण्यांत आला. राजा शिवचंद्र बॅनर्जी नांवाच्या एका अत्यंत आस्थेवाईक हितचिंतकानें स्वतः सर्व खर्च सोसून मंदिर बांधविलें. केशवचंद्र सेन ह्यांच्या हस्तें हें मंदिर उघडण्यांत आलें. समाजांत थोडी का होईना, पण बडी बडी प्रमुख व वृद्ध मंडळी आहेत; पण उपासनेशिवाय कांहीं काम होत नाहीं. ता.९ रोजीं सुमारें ५।६ तरुण पदवीधर ब्राह्ममंडळींपुढें मुंबईच्या तरुण ब्राह्ममंडळाचे छापील नियम मीं वाचून दाखविले आणि तेथील पूर्वीची तरुण संस्था पुन्हां स्थापन करण्याचें ठरविलें. ह्यानंतर रात्रीं ७ वाजतां बाबू निवारणचंद्र मुकर्जी यांचे घरीं प्रमुख मंडळी जमली. मुंबईकडील समाजाचें तिर्हाईतपणाचें काम ऐकून त्यांना फार समाधान झालें. दोघांनीं तर वारंवार अशी इच्छा प्रगट केली कीं, मुंबई व बंगाल प्रांतांतील ब्राह्मांचे अधिक निकट संबंध जुळविणें फार इष्ट आहे व त्याकरितां परस्पर विवाहव्यवहार करणें अवश्य आहे. मीं म्हटलें कीं, निरनिराळ्या प्रांतांतील ऐपतदार ब्राह्मांनीं निरनिराळ्या प्रांतांत प्रवास केल्याशिवाय वरील व्यवहार कधींही शक्य होणार नाहीं.
काठीहार : हें रेल्वेचें एक मोठें जंक्शन आहे. बरीच चौकशी केल्यावर अर्धवट बांधलेल्या ब्राह्ममंदिराचा पत्ता लागला; पण येथें समाज नाहीं. दारें व खिडक्या नाहींत. नुसत्या भिंतीच पाहून हें मुक्तद्वार गौडबंगाल काय आहे याचा तपास करण्यासाठीं मी तेथेंच राहिलों. शेजारच्या एका मुसलमान गृहस्थानें सांगितलें कीं, या अर्धवट इमारतीचा क्वचित् प्रसंगीं अत्यंत खेदजनक दुरुपयोग होतो. १८८७ सालीं रेल्वेंतील ब्राह्म नोकरांच्या-विशेषतः जानकीनाथ गांगुली व रखलदर्श चतर्जी यांच्या-प्रयत्नानें येथें समाज स्थापन झाला. त्या वेळीं १० सभासद होते. १८९९ सालीं ही अर्धवट इमारत उभी राहिली; पण इतक्यांत येथील रेल्वे ऑफिस एकदम कलकत्त्यास गेल्यामुळें येथें एकही ब्राह्मो उरला नाहीं.
पूर्णिया : काठीहारपासून १८ मैलांवर पूर्णिया हें जिल्ह्याचें गांव आहे. येथें बाबू हजारीलाल हे आस्थेवाईक गृहस्थ होते. त्यांचेकडे गेलों. तेथें मला तारकनाथ राय नांवाचे गृहस्थ भेटले. ह्या दोघांना मीं काठीहारचें वर्तमान कळविलें. तेथील पूर्वीच्या फंडापैकीं २०० रु. अद्यापि शिल्लक आहेत, असें कळलें. काठीहर येथें मंदिर आहे, पण समाज नाहीं आणि पूर्णिया येथें समाज आहे, पण मंदिर नाहीं. पूर्णिया येथील आस्थेवाईक सभासदांस घेऊन काठीहार येथें पुन्हां गेलों. सायंकाळीं माझें हायस्कुलांत व्याख्यान झालें. तेथील मुख्य अधिकारी मुन्सफ एक उदार मताचे बॅरिस्टर मुसलमान होते. त्यांनीं आपल्या सहीच्या आमंत्रणचिठ्ठया लोकांना पाठविल्या व अध्यक्षस्थान पत्करलें. व्याख्यानानंतर बाबू हजारीलाल यांनीं येथील कांहीं मंडळींच्या सल्ल्यानें बाकी उरलेल्या शिलकेंतून मंदिर पुरें करून देण्याचें ठरविलें.
ह्या प्रकारें बिहार प्रांतांतील काम झाल्यावर मी श्रीगंगेच्या निरोप घेऊन तिचा पिता जो पर्वतराज हिमाचल त्याचे चरणांगुलीवर विराजमान झालेली वनश्रीची जणूं माहेरकडची सखी जी कुचबिहार नगरी तिच्यांत सायंकाळच्या शांत समयीं अत्यादरपूर्वक प्रवेश केला.