ब्रह्मदेशाची यात्रा

ब्राह्मदेशाला जाण्याचा माझा मुख्य उद्देश, बौद्ध धर्माचें जीवन प्रत्यक्ष पहावें आणि स्वतः अनुभवावें हा होता.  मंगलोरहून परत पुण्यास आल्यावर १९२५-२६ सालीं मीं बौद्धधर्मासंबंधीं विशेष अभ्यास केला.  विशेषतः पाली भाषेंतील धम्मपद हें पुस्तक प्रो. चिं. वि. जोशी यांच्याजवळ वाचल्यापासून माझ्या मनाला मोठी शांति प्राप्‍त होऊन बर्‍याच अंशीं माझा स्वभावही बदलत चालला होता.  दुसरा हेतु ब्रह्मदेशची सामाजिक सिथति पाहणें.  त्या देशांतील सामाजिक व कौटुंबिक स्थितीचें मला फार कौतुक वाटत असे.  ब्रह्मदेशांत जातिभेद तर नाहींत, पण स्त्री-पुरुषांत समानतेचें नातें किंबहुना स्त्रियांचा वरचष्मा आहे असें मीं ऐकलें होतें.  बौद्ध धर्माचें जीवन पाहण्यासाठी विशेशतः एकान्त विहारांत राहून त्या धर्माचें रहस्य अनुभवण्याचा विचार मनांत येऊन मीं ही यात्रा करण्याचें ठरवलें.  प्रथमतः मी ह्या प्रवासाची तारीखवार तपशील देऊन नंतर कांहीं मुख्य मुख्य गोष्टींचें विवेचन करीन.

ब्रह्मदेशांत गेल्यावर तेथें जातिभेद नसला तरी अस्पृश्यता आहे असा मला शोध लागला.  त्याविषयींची तपशीलवार माहिती माझ्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या पुस्तकांत सविस्तर आली आहे.  म्हणून तेवढा भाग मी येथें वगळतों.

ता. २१ जानेवारी १९२७ रोजीं तिसरे प्रहरीं पुण्याहून निघालों.

ता. २४ जानेवारीला कलकत्त्याला पोंचलों.

'मी बौद्ध आहें'  :   ता. २४ जानेवारीपासून ता. ६ फेब्रुवारीपर्यंत कलकत्त्याच्या ब्राह्म समाजाचा माघोत्सव होता.  त्यांत एके दिवशीं ब्राह्म समाजाच्या मिशनरींची परिषद झाली.  तींमध्यें भाषण करतांना मीं म्हटलें, ''मी बौद्ध आहें.''  हें ऐकून माझ्या मिशनरी बंधूंना आश्चर्य वाटेल. आमच्या ब्राह्म समाजांत निरनिराळ्या धर्मांतून माणसें येतात, हें खरें ना ?  मग मी बौद्ध धर्मांतून आलों असलों तर काय चुकलें ?  आज जर गौतम बुद्ध जिवंत होऊन आले आणि त्यांनीं ब्राह्म समाजाचें औदार्य पाहून त्यांत प्रवेश करण्याची इच्छा प्रदर्शित केली तर त्यांना तुम्ही ब्राह्म समाजांत घेणार नाहीं काय ?  जेथें ख्रिस्ताला व बुद्धाला शिरकाव नाहीं तेथें मजसारख्या पामराची काय धडगत !  ह्या विषयावर वाद माजूं लागला हें पाहून अध्यक्षस्थानीं गुरुदास चक्रवर्ती हे बौद्ध प्रचारक होते, त्यांनीं उठून सांगितलें, ''रा. शिंदे ह्यांचा आध्यत्मिक भाव मनांत आणा.  शब्दावर वाद नको.  ब्राह्म समाज सर्वसंग्राहक आहे आणि रा. शिंदे हें त्याचें नमुनेदार उदाहरण आहे.  आतां ते लवकरच ब्रह्मदेशांत बौद्ध धर्म पहावयास जाणार आहेत.  तेथील लोकांना त्यांच्या ब्राह्म धर्माचा उदार भाव पाहून ते ब्राह्म समाज या दोघांना फायदाच होईल.''

ता. ८ फेब्रुवारी रात्रीं रंगूनला पोचलों.  दुसरे दिवशीं बंदरांतून डॉ. पी. के. मुजुमदार, ४७ वा रस्ता, घ.नं. १५२ मध्यें पाहुणा झालों.  न्यूयॉर्क शहराप्रमाणें रंगूनचे रस्ते आंकड्यांवरून उल्लेखिले जातात.  ११ फेब्रुवारीला ब्राह्ममंदिरांत व्याख्यान देऊन ता १२ ला उपासना चालविली.  ता. १९ ला रामानंद चतर्जी व मला रंगून ब्राह्म समाजानें बेंगाल ऍकॅडेमीमध्यें चहापार्टी दिली.  ब्रह्मदेशचे, दक्षिण ब्रह्मदेश व उत्तर ब्रह्मदेश, असे दोन भाग आहेत.  दक्षिण ब्रह्मदेशांत पाश्चात्य सुधारणेचा संस्कार, शिक्षण, व्यापार, राजकारण वगैरे द्वारां अधिक झालेला दिसतो.  उत्तर ब्रह्मदेशांत जुनें वळण फार आहे.  म्हणून मीं प्रथम दक्षिण ब्रह्मदेश फिरून पाहिला.  

उ कोडण्णा  :  ता. २० फेब्रुवारीला रविवारीं सकाळीं रंगूनहून निघून मोलेमनला गेलों.  तेथील मुख्य पॅगोडे पाहून एका वृद्ध फोंजीला (भिक्षूला) भेटून त्याचा मठ पाहिला.  नंतर थाटून ह्या इतिहासप्रसिद्ध गांवीं गेलों.  हें ठिकाण प्राचीन काळीं आंध्र राजाची राजधानी होती.  म्या दबे नांवाचा पगोडा १००० फूट उंच टेकडीवर असलेला चढून पाहिला.  ह्या निर्जन आणि एकान्त स्थळीं माझी ध्यानसाधना फार चांगली झाली.  नेमेंद्र चाँ नांवाच्या विहारांत उ कोडण्णा (कौंडिन्य) नांवाच्या फोंजीला मी भेटलों.  हे पूर्वाश्रमींचे डेप्युटि कलेक्टर होते.  कोणाही प्रापंचिक गृहस्थास कांहीं काल बुद्ध भिक्षूची दिक्षा घेऊन परत गृहस्थाश्रमांत जाण्याला मुभा आहे. ह्या सवलतीला अनुसरून उ कोडण्णा यांनीं विश्रांतीसाठीं आणि अध्ययनासाठीं हा चौथा आश्रम घेतला होता.  कोडण्णा यांच्या भेटीनें शांति व गंभीरपणा ह्याचा परिणाम माझ्या मनावर फार झाला.  त्या विहाराचें वातावरणही आध्यात्मिक भावनांनीं भरलेलें होतें.  इतकें कीं आपणही कांहीं काळ बौद्ध धर्माची उपसंपदा (दीक्षा) घ्यावी असें मला वाटूं लागलें.  पोशाख व राहणी ह्याविषयीं कोडण्णा यांनीं जुने आचार घेतले तरी विचारांत ते अगदीं नवीन होते.  मीं त्यांना विचारलें, 'बुद्धं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि' हीं तीन शरण्यरत्‍नें आहेत खरीं; पण बौद्धालाच तेवढें सरण जाऊन माझा बौद्ध धर्मांत प्रवेश होऊं शकणार नाहीं काय ?  आणि तुम्ही मला दीक्षा देऊं शकाल काय ?''  त्यांनीं स्मितपूर्वक उत्तर केलें, ''तुमचा आध्यात्मिक भाव पाहून मला आनंद होत आहे.  तुम्हांला बाह्य उपसंपदेची जरुरी तरी काय उरली ?  शिवाय दिक्षा देण्यास मला अधिकार नाहीं.  तो अधिकार मठाधिपतीकडे असतो.  मी अद्यापि साधकच आहें.  एकंदरींत तुमच्या भेटीमुळें मला मोठें समाधान झालें.''  

२४ फेब्रुवारीला पेगूला गेलों व कल्याणिसीमा व श्वे थ याँ बुद्ध (उजव्या हातावर मान ठेवून, निजलेला मोठा पुतळा) पाहिला.  ता. २५ सकाळीं पेगूचा मोठा बाजार पाहून सायंकाळीं रंगूनला आलों.  ता. २६ ला रामदासनवमी आली.  सायंकाळीं महाराष्ट्र मित्रमंडळाचे विद्यमानें रा. मयेकर यांचे घरीं 'महाराष्ट्रधर्म' ह्या विषयावर कीर्तन केलें.  मिसेस् पी. के. मुजुमदार यांचेकडे मी पाहुणा होतों.  ह्याच दिवशीं तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथि होती.

२ मार्चला मिसेस् मुजुमदार यांनीं आपले घरीं कांहीं बायकांना बोलावलें होतें.  त्यांच्यापुढें 'महाराष्ट्रांतील बायकांचीं कामें' ह्या विषयावर मीं संभाषण केलें.  ता. ५ मार्च, शनिवारीं नं. ६१ रस्ता लक्ष्मीनारायण धर्मशाळेंत 'बृहद् हिंदुधर्म' आणि 'जनतेचा उद्धार' ह्या विषयावर मी इंग्रजींत भाषण दिलें.  ता. ६ ला महाराष्ट्र मित्रमंडळीच्या वार्षिक सभेमध्यें अध्यक्ष या नात्यानें भाषण केलें.  ता. ७ ला सोमवारीं उत्तर ब्रह्मदेश पाहण्यास मंडालेकडे निघालों.  गाडींत तिसर्‍या वर्गांत इतकी गर्दी होती कीं, एकसारखें १८ तास ताटकळत बसावें लागलें.  ब्रह्मी लोकांचा भोंवतालीं कलकलाट चालू होता.

जिवंत माशांची विक्री  :  ८ मार्चला मंडाले येथें पोंचलों.  रा. दत्तात्रय सखाराम नागवंशे ह्यांनीं माझा उत्तम पाहुणचार ठेवला.  अहमदाबादचे डॉ. पायगुडे नांवाचे मराठे गृहस्थ भेटले.  ता. १० ला मंडाले येथील टेकडीवरील श्वे या दो बुद्धाचा २५ फूट उंचीचा हात वर करून उभा असलेला पुतळा पाहिला.  ता. ११ ला मंडालेंतील प्रमुख देवळांतील महात्म्या मुनीचा (बुद्ध) भव्य पितळी पुतळा पाहिला. ह्या देवळांत नेहमींच भक्तांची गर्दी असते.  बाहेर अगणांत स्वच्छ तळें होतें.  त्यांतून जिवंत मासे धरून कांहीं लोक ते विकावयास ठेवीत.  भाविक लोकांनीं ते मासे विकत घेऊन पुन्हां पाण्यांत सोडले असतां पुण्य लागतें, अशी त्यांची समजूत होती. पुन्हां पुन्हां तेच तेच मासे धरल्यानें ते इतके माणसाळून गेले होते कीं, ते आपोआपच टोपलींत येऊन पडत.

टॉ सिन को :  मृतमांस  :   मंडाले येथील जुन्या राजाचा वाडा आणि ज्या ठिकाणीं लो. टिळकांना ठेवलें होतें तो राजकीय तुरुंगही मीं पाहिला.  मंडालेहून कांहीं अंतरावर पूर्वेकडे मेमियो नांवाचें हवा खाण्याचें ठिकाण आहे.  तें ३४८१ फूट उंचीवर वसलें आहे.  तेथें टॉ सिन को नांवाच्या प्राचीन वास्तुशास्त्रज्ञाकडे मी २० तास पाहुणा होतों.  ते ब्रह्मदेशचे डॉ. भांडारकरच म्हणावयाचे.  त्यांच्याशीं ब्रह्मी पुरातन वास्तुविषयासंबंधीं बराच विचारविनिमय झाला.  माझी फकिरी वृत्ति दिसत असूनही इतकी शोधक बुद्धि पाहून त्यांना आश्चर्य वाटत असल्याचें त्यांनीं बोलून दाखवलें.  हे विद्वान् गृहस्थ अगदीं युरोपियन थाटांत राहात असत.  टेबलावर जेवीत असतां एक चमत्कारिक विषय भाषणांत निघाला.  ब्रह्मी लोक मृत मांस खातात असें मीं ऐकलें होतें.  पण अधिकारयुक्त रीतीनें या गोष्टीचा उलगडा करून देणारा मला अद्याप कोणी भेटला नव्हता.  तो विषय मीं मोठ्या अदबीनें टॉसाहेबांकडे काढला.  ते म्हणाले, ''याचें तुम्हांस आश्चर्य तें कां वाटतें ?  हो, आम्ही मृतमांस खातों.  तुम्हीही मांस खातां ना ?  मग तें जिवंतच असतें काय ?  एखादा प्राणी अपघातानें मेला किंवा अन्य दृष्टीनें त्याचें मांस खाण्यालायक असेल तर तें मांस खाण्यास हरकत कोणती ?  उलटपक्षीं एखादा प्राणी आजारी असला किंवा अन्य तर्‍हेनें त्याच्या अंगांत विष भिनलें असलें तर तो केवळ मारण्यानें शुद्ध होतो काय ?  मेलेला काय किंवा मारलेला काय हा प्रश्न नाहीं.  खातेवेळीं त्याचें मांस शुद्ध असलें म्हणजे पुरें.''

१३ मार्च रविवारीं सकाळीं मंडालेहून दक्षिणेकडे ८ मैलांवर अमरापुरा या गांवीं साँडर्स वीव्हिंग इन्स्टिट्यूटचे प्रि. रा. महादेवराव मांडे यांचेकडे उतरलों.  २४ तास राहिलों.  ता. १४ ते १८ पर्यंत सगाईन टेकडीवरील विहारांत राहिलों.  ता. १८ ला अमरापुरास परत.  दोन दिवस अमरापुरा व मंडाले येथें राहिलों.  श्री. मांडे यांची पत्‍नी मोठी सच्छील व भाविक बाई होती.

महादेवराव मांडे  :   दक्षिण ब्रह्मदेशांत रंगून येथें ब्राह्म समाज व महाराष्ट्र मित्रमंडळी या दोन संस्था असूनही तेथील मंडळींत धर्माविषयीं विशेष कळकळ दिसून आली नाहीं.  ब्राह्म समाजांत डॉ. पी. के. मुजुमदार व 'महाराष्ट्र मित्रमंडळांत' रा. सबनीस एवढेच काय ते कळकळीचे पुरुष दिसले.  पण उत्तरेकडे मंडाले येथें दत्तोपंत सखाराम नागवशे आणि अमरपुरा येथें महादेवराव मांडे आणि त्यांच्या कुटुंबांतील मंडळी ह्यांना जरी ब्राह्म समाजाची फारशी माहिती नव्हती, तरी माझ्या दोनचार दिवसांच्या समागमांत, ब्राह्मसमाजाविषयीं ह्यांना फार आदर उत्पन्न झाला.  रा. मांडे यांच्या इच्छेनें त्यांच्या घरीं ब्रह्मोपासना झाली.  मिसेस् मांडे व त्यांचा मुलगा विद्याधर हीं श्रद्धेनें उपासनेस बसलीं होतीं.  या समयीं मंडालेहून आलेले रा. नागवंशे व रा. भिडे हेही हजर होते.  ह्या उपासनेचा परिणाम सर्वांवर इतका इष्ट घडला कीं, पुढील रविवारीं सगाईहून परत आल्यावर मंडाले येथें रा. मांडे, पायगुडे व नागवंशे ह्या तिघांच्या कुटुंबांतील मंडळींनीं नागवंशे ह्यांच्या बंगल्यावर सर्व दिवस उपासना, चिंतन, भजन, संभाषण व भोजन ह्यांत घालवण्याचें ठरवलें होतें.  ही सर्व मंडळी मूळ महाराष्ट्रांतूनच आलेली म्हणून मला अधिकच आपलेपणा वाटत होता.  नागवंशे यांनीं आपल्या माडीवर उपासनेची सांगितल्याप्रमाणें तयारी ठेवली होती.  सर्व बेत ठरल्याप्रमाणें झाला.  येथें एखादा हिंदी जाणणारा मिशनरी आल्यास ह्या मंडळीची ब्राह्म समाज स्थापण्याची तयारी दिसली.  रा. मांडे यांचेकडे वरचेवर कौटुंबिक उपासना होई.  हे देहु गांवीं राहणारे देशस्थ ब्राह्मण होते.  मला निरोप देतांना त्यांना गहिंवर आला.  त्यांनीं माझ्या जुन्या बहाणा आठवणीदाखल स्वतःला ठेवून घेतल्या आणि बाजारांतून पुष्कळ ब्रह्मी चिजा आणून आठवणीदाखल मला दिल्या.

मनुहा  :  २३ मार्चला सकाळीं मंडाले सोडलें.  ७॥ वाजतां ऐरावती नदीवरून बोटींतून पॅगान ह्या शहराकडे निघालों.  सायंकाळीं मी जाँ ला पोचलों.  वामन पाठक व थत्ते बोटीवर आले.  बर्मा कॉटन कंपनींत हे नोकर होते.  ता. २४ ला तिसरे प्रहरीं पॅगानला पोंचलों.  धक्क्यावर प्रिन्सिपॉल उ सैन हे मला घेण्यास आले होते.  पॅगान येथें लाखेचीं भांडीं व इतर वस्तु तयार करण्याची सरकारी शाळा आहे.  त्याच शाळेचे उ सैन हे प्रिन्सिपॉल होते.  त्यांचेकडे तीन दिवस राहिलों.  पॅगान हें प्राचीन महत्त्वाचें शहर आहे.  त्याच्या आसमंतात् अनेक प्राचीन पॅगोडे आहेत.  ता. २५ ला महाबोधी, अथपिन्या, आनंद हीं देवळें पाहिलीं.  उ शांती मा या फोंजीचें (भिक्षूचें) दर्शन घेतलें.  पॅगानचे दक्षिणेस टाँय वॉ नांवाचें एक चांडालांचें खेडें आहे.  तेथील प्राचीन मनुहा राजाचें देऊळ पाहिलें.  सायंकाळीं अंधारी रात्र झाली तरी दोन मुलें व एक कंदील बरोबर घेऊन रात्रींच पाहिलें.  ह्या देवळांत मनुहा राजा नजरकैदेंत होता.  ह्याच्याच वंशजांस पुढें वंशपरंपरा अस्पृश्य करण्यांत आलें.

थैली  :  २७ मार्च रविवारीं न्याउ गांवास निघालों.  पॅगानच्या उत्तरेस ५ मैलांवर हा गांव आहे.  बरोबर प्रि. उ सैन हेही होते.  जवळच पयाचून नांवाच्या अस्पृश्य मानलेल्या जातीचें खेडें पाहिलें.  मनुहा ह्या तेलंग राजाच्या वंशजाची ही स्थिति ब्रह्मदेशच्या अनवरथ राजानें केलेली मीं प्रत्यक्ष पाहिली.  त्याच्या वंशांतल्या हल्लींच्या पुरुषाचें घर पाहून मला भडभडून आलें.  ता. ३० ला थयोमयो व अलनम्यो ही गांवें पाहिलीं.  अलनम्यो येथें रा. वाय. के.कर्णीक जपान कॉटन कंपनीचे मुख्य कारकून व इस्त्राइल गृहस्थ बेंजामिन नागवेकर हे भेटले.  कुशिनारा पॅगोडांतील गौतम बुद्धाचा शेवटचा आजार.  मृत्यु, स्मशानयात्रा, दहन वगैरेंचे मूर्तिमंत देखावे पाहिले.  ब्रह्मदेशच्या प्रवासांत जेथें जेथें महाराष्ट्रबंधु भेटले तेथें तेथें त्यांनीं माझें फारच सन्मानपूर्वक हार्दिक स्वागत केलें.  ता. ३१ रोजीं प्रोमला पोहोंचलों.  स्वरूपचंद्र गलियाराकडे उतरलों.  त्यांच्या कारकुनानें बाजार दाखवला.  २ एप्रिल रोजीं रंगूनला परत आलों.  ता. ३ ला सायंकाळीं महाराष्ट्र मित्रमंडळानें मला पानसुपारी दिली व अकस्मात् ३५१ रु. ची थैली अर्पण केली.  बॅ. पाटसकर हे अध्यक्ष होते.  मीं ही थैली कोणत्या तरी सार्वजनिक कृत्यास वाहण्याची परवानगी मागितली.  पण हे पैसे माझ्या कुटुंबाच्याच उपयोगासाठीं जमवले असल्यानें तसाच आग्रह पडला.  शेवटीं सेक्रेटरी रा सबनीस यांनीं माझा विश्वास पटेना, म्हणून हे पैसे माझे वडील चिरंजीव प्रतापराव यांच्याकडे पाठवले.