मंगलोर ब्राह्म समाज
डॉ. ड्रमंड : मी ता. ४ फेब्रुवारी १९२४ ला कलकत्त्याहून पुण्यास आलों. ठरल्याप्रमाणें डॉ. ड्रमंड देखील अहल्याश्रमांत माझे पाहुणे म्हणून आले. ते आठ दिवस मजबरोबर होते. ह्या वेळीं पुढील गोष्ट घडली. कर्नल एच. सी. स्टीन नांवाचे एक लष्करी अधिकारी पुणें शाखेचे दरसाल १०० रु. देणारे प्रथमपासूनच मेंबर होते. पुणें शाखेचें मीं काम सोडल्यावर ते त्या शाखेचे अध्यक्ष म्हणून अद्यापही काम करीत आहेत. माझे पाहुणे डॉ. ड्रमंड ह्यांचा कर्नल स्टीनशीं परिचय होता म्हणून कर्नल स्टीननीं डॉ. ड्रमंड यांना पुणें लष्कर येथील वेस्टर्न इंडिया क्लबमध्यें एक दिवस जेवायला नेलें. रात्रीं जेवणाचे वेळीं विवक्षित पोषाख घालायला असा जो युरोपियन सभ्यतेचा प्रघात आहे तो पोषाक त्या वेळीं ह्या दोघांच्याही अंगावर नव्हता. जो पोषाख होता तो सभ्य तर्हेचा होता. तथापि ठराविक आढ्यतेच्या सांचाचा तो नव्हता. म्हणून क्लबच्या मॅनेजरानें नेहमींच्या टेबलावर जेवणाची त्यांना परवानगी दिली नाहीं. दुसर्या एका खोलींत कोपर्यांत ठेवलेल्या टेबलावर कसें तरी जेवायला घालून त्यांची बोळवण केली. हा फाजील गौरव पाहून डॉ. ड्रमंडना फार वाईट वाटलें असें त्यांनीं मला सांगितलें. यःकश्चित् पोषाखाच्या बाबतींत जर अस्सल युरोपियनांस अशी गचांडी बसते तर राजकीय हक्कासंबंधीं भांडत असतां अत्यंत प्रतिष्ठित हिंदु लोकांचा युरोपियनांकडून कसा उपमर्द होत असावा याची कल्पना डॉ. ड्रमंडनीं करावी असें मीं त्यांना सुचवलें. पुढें वेळोवेळीं राजकारणाचा वाद निघे तेव्हां डॉ. ड्रमंडचें व माझें एकमत होईना. साहजिकच आहे. ज्याच्या पायांत जोडा त्याला खिळा टोंचतो. म्हणून आम्ही राजकारणावर अतःपर बोलूं नये असें ठरलें. आम्ही धर्मबंधु असलों म्हणून राजकारणबंधु थोडेच होणार ! हिंदुस्थानांतील आम्ही काळे लोक राजकारणांत एक होऊं शकत नाहीं, मग नुकतेच बाहेरून आलेल्या गोर्यांशीं आमचें एकमत कसें होणार ?
मंगलोरचें स्वागत : बंगलोर, मद्रास, कोकोनाडा, पीठापूर, कोइमतूर, कालिकत, मंगलोर वगैरे ठिकाणीं फिरून तेथील परिस्थिति डॉ. डमंडला कळवून त्यांना पाठवून देण्यांत आलें आणि मी मुंबईला आलों. मुंबईस माझे कनिष्ठ बंधु एकनाथराव यांचेकडे माझी पत्नी व दोन मुलें यांस ठेवून, भगिनी जनाबाई व धाकटा मुलगा चि. रवींद्र यांस घेऊन एप्रिल महिन्यांत १९२४ त मंगळूरला आलों. हिंदुस्थानच्या नैर्ॠत्य किनार्यावर कानडा भागांत कानडी भाषा चालू आहे. मद्रास इलाख्याकडील हा शेवटचा कानडी जिल्हा होय. ह्या जिल्ह्याच्या दक्षिणेस ब्रिटिश मलबार (कालिकत जिल्हा) आणि त्याच्या दक्षिणेस त्रावणकोर व कोचीन ह्या दोन संस्थांचा अस्सल मलबार प्रांत लागतो. याच्या पूर्वेस कोइमतूरपासून बंगलोर नेलोर ते तहत कारोमांडलच्या किनार्यापर्यंत तामीळ प्रांत लागतो. ह्या दक्षिण भागांत मंगलोर, कालिकत, कॅनानोर, कोइमतूर वगैरे शहरीं व त्रावणकोरमध्यें देखील कांहीं लहानमोठ्या ब्राह्म समाजाचें काम चालू होतें. पण तेथे अनुभवशीर आणि वाहून घेतलेला, कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजाचा प्रतिनिधि म्हणून कोणी प्रचारक राहात नव्हता. त्यामुळें ह्या प्रांतीं ब्राह्म समाजाचें काम अव्यवस्थित व विस्कळित चाललें होते. आतां मी ब्राह्मसमाजाचें काम करण्यास मोकळा झाल्यानें कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजानें या प्रांतीं आपला प्रतिनिधि म्हणून माझी मोठ्या आनंदानें निवड केली. मंगलोर शहरीं एक सुसंघटित ब्राह्म समाज आणि सुंदर ब्राह्ममंदिर होतें. इतकेंच नव्हे तर वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें रा. के. रंगराव यांनीं चालवलेली आणि अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी संस्थेला संलग्न झालेली डी. सी. मिशनची एक शाखा पण होती. ह्या मिशनच्या कामानिमित्त माझें या प्रांतीं वेळोवेळीं जाणें-येणें होतें. ह्या प्रांतांतल्या ब्राह्म समाजाच्या पुढार्यांशीं माणा व्यक्तिशः परिचय होता. शिवाय मला कानडी चांगलें अवगत असल्यानें मंगलोर ब्राह्म समाज हें माझ्या आचार्यपदाचें मुख्य ठाणें आणि हा सर्व नैर्ॠत्य भाग माझें प्रचारक्षेत्र ठरवण्यांत आलें. मागें १९०७ सालीं आणि पुढें एकदोनदां मंगलोर शहरीं ब्रा. समाजाच्या खास प्रचारासाठीं आलों असतां तेथील समाजबंधूचें प्रेम मजवर फार निकट जडलें होतें. म्हणून माझी ही नेमणूक सर्वानुमतें पसंत झाली होती. आम्ही मंगलोर शहरीं ज्या वेळीं आलों त्या वेळीं सर्व मंगलोर ब्राह्म समाज आमचे स्वागतार्थ बंदरावर लोटला होता.
राजकारणाचें वावडें : १९०७ सालचा काळ वेगळा आणि आतां १९२४ सालचा एप्रिल महिना वेगळा. राजकारणानें ह्या दोन काळांत हिंदुस्थानांत मोठी क्रांति घडवून आणली. लो. टिळकांनीं काँग्रेसला जहाल स्वरूप आणलें होतें, तर महात्मा गांधींनीं बहिष्कार, सत्याग्रह इत्यादि चळवळींनीं राजकारणास त्याहूनही उग्र स्वरूप आणलें होतें. मंगलोर ब्राह्म समाजांत यापूर्वीपासून प्रविष्ट झालेलीं चारपांच सारस्वत घराणीं होतीं. पं. उल्लाल रघुनाथय्या,पं. परमेश्वरय्या, रा. कृष्णराव गांगोळी B.A., B.L.,वकील, प्रत्यक्ष के.रंगराव, समाजाचे सेक्रेटरी आणि त्यांतच राजकीय तरुणांचे पुढारी व महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी कर्नल सदाशिवराव, B.A., B.L., अशीं हीं पांच घराणीं होतीं. बाकी सर्व सभासदमंडळी सुमारें पाऊणशें बिल्लव जातीची होती. ह्या जातीचे लोक ब्राह्म समाजांत येण्यापूर्वी अस्पृश्य गणले गेले होते. ब्राह्म समाजाच्या एकदोन पिढ्यांच्या अनुषंगानें हे लोक चांगले सुशिक्षित व प्रतिष्ठित दर्जाला येऊन पोंचले होते. सरकारी नोकरींत व तिकडील मोठमोठ्या युरोपियन कंपन्यांतून चांगल्या अधिकाराच्या जागेवर कामें करून ही मंडळी मान्यता पावली होती. पण राजकारणांत ह्यापैकीं कोणीही, केव्हांही भाग घेत नव्हता हें साहजिकच होतें. मी या वेळीं कोणत्याहि पक्षाशीं तादात्म्य झालों नसलों तरी माझ्या प्रांतीं (महाराष्ट्रीं) राजकारणांत स्वतंत्रपणें भाग घेत होतों, हें ह्या मंडळीस अद्यापि कळून आलें नव्हतें. त्या वेळीं माझ्या डोक्यावर गांधी टोपी होती. तिनें माझी राजकारणाची चहाडी ह्या बुजग बिल्लव लोकांना तात्काळ कळवली. गुप्त कुरकुर, उघड संशय, प्रांजल भीति वगैरे भावनांच्या परंपरा सुरू झाल्या. माझें काम कठीण आहे, ही नोटीस मला मिळाली. अस्पृश्यांविषयींची माझी सेवा ह्या बिल्लवमंडळींना मान्य होती हें खरें; पण त्या वर्गांतून ह्या ब्राह्म बंधूंची सुटका होऊन दोन पिढ्या लोटल्यामुळें त्या वर्गाचा त्यांचा संबंध आता तुटला होता. त्याची आठवण करून घेण्यास ते राजीही नव्हते. अर्थात् माझ्या पात्रतेचें मुख्य लक्षणच आतां लुळें ठरलें.
मी मंगलोरास गेल्यावर सर्व पंथांत व धर्मांमध्यें काम करूं लागलों. त्या प्रांतीं रोमन कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट पंथांचे मोठें जाळें पसरलें होतें. कांहीं कांहीं भागांत ख्रिश्चनांचीच बहुसंख्या होती. इतकेंच नव्हे तर पुष्कळ ठिकाणीं ख्रिस्ती झालेले पूर्वाश्रमींचे हिंदु आपल्या पूर्वाश्रमींचे जातिभेद आणि थोडीशी रूप बदललेली मूर्तिपूजा पाळीत असल्यामुळें हिंदु समाजांतही त्यांना मोठी मान्यता मिळत असे. मी माझ्या प्रचारासाठीं व्याख्यानें व भजनेंच करून न राहतां हिंदु पद्धतीनें कीर्तनेंही करीत असें. कीर्तनाची पद्धत जरी हिंदु होती तरी निरूपणाचा विषय नवीन व सुधारणावादी असल्यामुळें ख्रिश्चन व मुसलमान श्रोतेदेखील कीर्तनास हजर असत. एके वेळीं मंगलोरच्या सरकारी कॉलेजांत मुद्दाम ख्रिस्ती लोकांसाठीं मीं कीर्तन केलें. त्यांत सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी ह्या रोमन कॅथालिक संताचें व्याख्यान लावलें होतें. सेंट फ्रान्सिस हा विरक्त संन्यासी होता तरी त्याच्या विचारांत मोठी सुधारणा होती. ती तत्कालीन पोप इनोसंट (Pope Innocent) ला आवडत नाहीं. ह्या नाजुक गोष्टीचें निरूपण मीं इतक्या परिणामकारक रीतीनें केलें कीं कॅथालिक मंडळींत मोठी खळबळ उडाली आणि त्यांच्यांत माझ्या प्रवचनाविषयीं भवति न भवति होऊं लागली. त्यामुळें कांहीं नवीजुनी कॅथालिक मंडळी माझीं प्रवचनें ऐकण्यास ब्राह्ममंदिरांत येऊं लागली. मी जाईपर्यंत मंगलोरचा ब्राह्म समाज राजकारणांत मोठा सोंवळा होता. माझे स्वतंत्र विचार ऐकून नवीन प्रवृत्तीची तरुण मंडळीं समाजांत बरीच येऊं लागली. अशा रीतीनें ब्राह्म समाजाचा अंतस्थ भाग पेटला असतां त्यावर पुढें लिहिल्याप्रमाणें एक अकस्मात् बाँब येऊन पडला.